वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 १/१ पृ. २४-२६
  • तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बेथलेमचा प्रवास
  • ख्रिस्ताचा जन्म
  • प्रोत्साहनदायक ठरलेली भेट
  • मनात जतन करून ठेवण्याकरता आणखी सुविचार
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • “पाहा मी प्रभूची दासी!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तिने काळजावरील घाव सोसला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 १/१ पृ. २४-२६

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’

मरीया गाढवाच्या पाठीवर अवघडलेल्या स्थितीत बसली होती. ती थोडीशी मागे सरकून व्यवस्थित बसली. कित्येक तासांपासून ती प्रवास करीत होती. तिच्यापुढे योसेफ चालला होता. ते बेथलेहमच्या दिशेने चालले होते. बाळाने पोटात पुन्हा हालचाल केल्याचे तिला जाणवले.

बायबलमध्ये म्हटले आहे की ती “गरोदर” होती आणि तिचे दिवस भरत आले होते. (लूक २:५) रस्त्याच्या बाजूला असलेली एकामागून एक शेते पार करत हे जोडपे पुढे चालले असताना, शेतात काम करणारे काही शेतकरी, शेताची नांगरणी किंवा पेरणी करता करता त्यांना पाहून विचार करत असावेत, की ही स्त्री या अवस्थेत प्रवास का करत असावी बरे? मरीया नासरेथ येथील आपल्या घरापासून इतक्या दूरवर कुठे निघाली होती?

या यहुदी तरुण स्त्रिला, अनेक महिन्यांपूर्वी एक अद्वितीय नेमणूक मिळाली होती. मानव इतिहासात अशी नेमणूक आजपर्यंत कोणालाही मिळाली नव्हती. तिला, मशिहा बनणाऱ्‍या देवाच्या पुत्राला जन्म द्यायचा होता. (लूक १:३५) बाळाला जन्म द्यायची वेळ आली तेव्हा या दोघांना प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान मरीयेला अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले ज्यात तिच्या विश्‍वासाची खरी परीक्षा होती. कोणत्या गोष्टीमुळे ती आध्यात्मिकरीत्या टिकून राहिली, हे आपण पाहू या.

बेथलेमचा प्रवास

फक्‍त योसेफ आणि मरीयाच प्रवासाला निघाले होते असे नाही. सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्‍याची आज्ञा झाली. त्यामुळे देशातील सर्व लोकांना या नावनिशीसाठी आपापल्या गावी जावे लागणार होते. योसेफाने काय केले? “योसेफ हा दावीदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोहि गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दावीदाच्या बेथलेहेम गावी गेला.”—लूक २:१-४.

कैसराने नावनिशी लिहिण्याचा हा जो हुकूम काढला होता तो योगायोग नव्हता. सुमारे ७०० वर्षांपूर्वी बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती, की मशिहाचा जन्म बेथलेहेमात होईल. आणि, नासरेथपासून फक्‍त अकरा किलोमीटर दूरवर एक गाव होते ज्याचे नाव बेथलेहेम होते. पण, बायबलमधल्या भविष्यवाणीत हे स्पष्टपणे सांगितले होते, की मशिहाचा जन्म “बेथलेहेम एफ्राथा” येथे होईल. (मीखा ५:२) आज नासरेथपासून दक्षिणेकडील या छोट्याशा गावाला जाण्याकरता १५० किलोमीटरचा डोंगराळ रस्ता पार करावा लागतो. याच बेथलेहेमेस जाण्यास योसेफाला आज्ञा देण्यात आली होती. हे बेथलेहेम राजा दावीदाच्या वाडवडिलांचे गाव होते आणि योसेफ व मरीया दोघेही याच घराण्यातले होते.

योसेफाने जेव्हा नावनिशी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मरीयेने त्याला साथ दिली का? कारण, ती तर गरोदर होती आणि हा प्रवास तिला झेपणार नव्हता. शिवाय, उन्हाळा नुकताच संपून पावसाळा सुरु झाला असल्यामुळे, हलका पाऊस पडण्याची शक्यता होती. आणि ते “गालीलातील नासरेथ गावाहून वर” चालले होते, असे जे म्हटले आहे ते बरोबरच आहे कारण बेथलेहेम २,५०० फूट उंचीवर वसलेले गाव होते. तिथे जाण्यासाठी योसेफ व मरीयेला अनेक दिवसांचा खडतर प्रवास करावा लागणार होता. मरीयेच्या अवस्थेमुळे तर तिथे पोहंचण्यासाठी त्यांना नेहमी पेक्षा जास्त दिवस लागले असावेत. कारण ते थांबत थांबत प्रवास करणार होते. अशा अवस्थेत असलेल्या कोणत्याही तरुण स्त्रिला आपल्या घरच्यांजवळ असायला आवडते. प्रसूती कळा सुरू झाल्यावर तिला मदत करायला धावणारे आप्तजन व मित्रजन जवळ असावेत, असे तिला वाटते. म्हणून हा प्रवास करायला मरीयेला धैर्याची आवश्‍यकता होती.

तरीपण, “नावनिशी लिहून देण्यासाठी,” योसेफाने मरीयेला बरोबर नेले, असे लूकने म्हटले आहे. लूक असेही म्हणतो, की मरीया “[योसेफाला] वाग्दत्त झालेली” होती. (लूक २:४, ५) योसेफाची बायको झाल्यामुळे मरीयेच्या जीवनात बराच मोठा बदल झाला होता. तिने त्याला तिचे मस्तक म्हणून स्वीकारले होते आणि त्याने घेतलेल्या निर्णयांमध्ये त्याला साथ देऊन देवाने तिला, योसेफाची साहाय्यक म्हणून दिलेली भूमिका स्वीकारली होती.a आज्ञाधारक राहून तिने तिच्या विश्‍वासाची परीक्षा पार पाडली.

आणखी कोणत्या गोष्टीमुळे मरीया आज्ञाधारकता दाखवण्यास प्रवृत्त झाली असावी? मशिहाचा जन्म बेथलेहेमात होईल, अशी जी भविष्यवाणी करण्यात आली होती ती मरीयेला माहीत होती का? बायबलमध्ये याविषयी काही सांगण्यात आलेले नाही. पण तिला कदाचित ही भविष्यवाणी माहीत असावी, कारण, धार्मिक नेत्यांना आणि सामान्य लोकांनाही ही भविष्यवाणी माहीत होती. (मत्तय २:१-७; योहान ७:४०-४२) मरीयेला शास्त्रवचनांचे ज्ञान होते. (लूक १:४६-५५) मरीयेने आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करण्याकरता हा प्रवास करण्याचे ठरवले की राजाचा हुकूम पाळण्याकरता, की यहोवाने केलेल्या भविष्यवाणीनुसार वागण्याकरता किंवा यापैकीच्या सर्वच कारणांमुळे हे आपल्याला माहीत नाही. पण ती मात्र आपल्या सर्वांसाठी एक उल्लेखनीय उदाहरण आहे. नम्र व आज्ञाधारक मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या स्त्रीपुरुषांची यहोवा खूप कदर करतो. आज्ञाधारकता या गुणाला तुच्छ लेखल्या जाणाऱ्‍या या युगात, मरीयेचे उदाहरण मात्र विश्‍वासू लोकांकरता चटकन नजरेला दिसणाऱ्‍या दीपगृहासारखे आहे.

ख्रिस्ताचा जन्म

बेथलेहेम दिसू लागल्यावर मरीयेने सुटकेचा निःश्‍वास सोडला असावा. डोंगर चढत असताना व शेवटच्या पिकाची कापणी म्हणजे जैतुनाच्या फळांची काढणी होत असल्याचे पाहताना योसेफ व मरीयेच्या मनात या गावचा इतिहास तरळून गेला असेल. मीखा संदेष्ट्याने म्हटल्याप्रमाणे हे गाव यहुदाच्या इतर शहरांमध्ये गणले जाणे योग्य नव्हते तरीपण, याच गावात, जवळजवळ हजारो वर्षांपूर्वी बवाज, नामी आणि राजा दावीद यांसारख्या लोकप्रिय लोकांचा जन्म झाला होता.

गावात शिरता शिरताच मरीया व योसेफला लोकांची गर्दी दिसली. त्यांच्या आधीच कितीतरी लोक तिथे नावनिशीसाठी आले होते. त्यामुळे गावात त्यांना राहायला जागाच उरली नाही.b म्हणून, ती रात्र एका तबेल्यात काढण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. मरीयेच्या प्रसूती कळा सुरू होऊन त्या जेव्हा वाढू लागल्या असाव्यात आणि त्या वेदनेने ती कशी विव्हळत आहे ते पाहून योसेफाच्या मनात काय घालमेल चालली असावी त्याची आपण कल्पना करू शकतो. एका तबेल्यात तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या.

मरीयावर गुदरलेला प्रसंग स्त्रियांना अतिशय चांगल्याप्रकारे समजू शकेल. वारशाने मिळालेल्या पापामुळे मूल प्रसवताना सर्व स्त्रियांना खूप वेदना होतील, असे यहोवाने सुमारे ४,००० वर्षांपूर्वी भाकीत केले होते. (उत्पत्ति ३:१६) मरीयेला कमी त्रास झाला, असा काहीही पुरावा बायबलमध्ये नाही. पण तिला किती वेदना झाल्या याचे नेमके वर्णन लूकने दिले नाही. त्याने फक्‍त इतकेच म्हटले, की “तिला तिचा प्रथमपुत्र झाला.” (लूक २:७) होय, मरीयेला यानंतर झालेल्या निदान सात मुलांपैकी हा “प्रथमपुत्र” होता. (मार्क ६:३) पण हा पुत्र तिच्या इतर मुलांपैकी वेगळा ठरणार होता. तो फक्‍त तिचाच प्रथम पुत्र नव्हता तर तो यहोवाच्या ‘सर्व उत्पत्तीतही ज्येष्ठ’ होता; तो देवाचा एकुलता एक पुत्र होता!—कलस्सैकर १:१५.

बाळाला जन्म दिल्यानंतर काय घडले त्याचे वर्णन तर सर्वांनाच माहीत आहे: “त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले.” (लूक २:७) संपूर्ण जगभर, नेटिव्हिटी दृश्‍यावर आधारित बसवलेल्या नाटकांमध्ये, रंगवलेल्या चित्रांमध्ये हे दृश्‍य खूपच केविलवाणे व अवास्तविक दाखवले जाते. पण तिथे नेमके काय झाले त्याचा विचार करा. गव्हाणी म्हणजे, गुरांना ज्यातून चारा दिला जातो असे एक लांब पात्र. योसेफ आणि मरीया एका तबेल्यात उतरले होते. तेव्हाच्या किंवा आताच्या तबेल्यांतही खेळत्या हवेची किंवा स्वच्छतेची तर आपण अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. आणि, पालकांकडे जर दुसरे पर्याय असतील तर कोणत्या पालकांना आपल्या मुलांचा जन्म अशा ठिकाणी व्हावासा वाटेल? बहुतेक पालक आपल्या तान्ह्‌युल्यांसाठी नक्कीच उत्तम ती व्यवस्था करतील. मरीया व योसेफाला तर देवाच्या पुत्राची आणखी किती चांगल्याप्रकारे काळजी घ्याविशी वाटली असावी!

पण जे ते करू शकत नव्हतेत त्यावर जास्त विचार करून ते निराश झाले नाहीत. त्यांच्या परिने जितके त्यांना जमत होते तितके त्यांनी अगदी मन लावून केले. उदाहरणार्थ, बाळाला जन्म दिल्याबरोबर मरीयेनेच स्वतः बाळाला कापडाच्या पट्ट्यांमध्ये घट्ट गुंडाळून गव्हाणीत झोपवले. बाळ सुरक्षित व उबदार आहे, याची तिने नक्कीच खातरी केली असावी. आपल्यावर ही काय परिस्थिती आली आहे त्यावर विचार करून हळहळ व्यक्‍त करण्यापेक्षा तिने, बाळाला होता होईल तितक्या आरामात कसे ठेवता येईल, यावर जास्त विचार केला असेल. तिला व योसेफाला हे चांगल्याप्रकारे माहीत होते, की या बाळाला देवाची उपासना करण्यास मदत करणे हे आपले सर्वात महत्त्वाचे काम आहे. (अनुवाद ६:६-८) देवाच्या सेवेला कवडी मोल समजणाऱ्‍या आजच्या जगात, सुज्ञ पालक योसेफ व मरीया यांच्याप्रमाणे आपल्या मुलांचे संगोपन करताना देवाच्या उपासनेला प्रथम स्थान देण्याची गोष्ट आपल्या मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात.

प्रोत्साहनदायक ठरलेली भेट

तबेल्यात इतक्या वेळ शांतता होती. अचानक तिथे लोकांचा आवाज ऐकू येऊ लागतो. काही मेंढपाळ लगबगीने तबेल्यात येतात. त्यांना तबेल्यात राहणाऱ्‍या त्या परिवाराला आणि खासकरून त्या बाळाला पाहायचे असते. या मेंढपाळांच्या चेहऱ्‍यांवरून आनंद ओसंडून वाहत असतो. ते आपल्या कळपासोबत डोंगर उतारांवर होते तेथून धावतपळतच डोंगर चढून वर आले होते.c या उत्साही लोकांना पाहून योसेफ व मरीया दोन मिनिटांसाठी बुचकळ्यात पडतात. मग हे मेंढपाळ, त्यांना आलेल्या अद्‌भुत अनुभवाविषयी सांगू लागतात. डोंगर-उतारावर मेंढरांवर पाळत ठेवून बसलेले असताना मध्यरात्री एक देवदूत त्यांच्यासमोर अचानक प्रकट झाला होता. तो देवदूत त्यांच्या जवळ आला तेव्हा यहोवाचे तेज त्यांच्या चहुबाजूला सर्वत्र पसरले. आणि त्या देवदूताने त्यांना सांगितले, की ‘बेथलेहेमात ख्रिस्ताचा किंवा मशिहाचा नुकताच जन्म झाला आहे. हे बाळ तुम्हाला कापडाच्या पट्ट्यांमध्ये गुंडाळून गव्हाणीत ठेवलेले आढळेल.’ हे बोलून झाल्यावर आणखी एक चमत्कारिक गोष्ट घडली. देवदूतांचा एक समूह अचानक प्रकट झाला आणि ते मोठ्याने यहोवाचे गौरव करीत गीत गाऊ लागले!

म्हणूनच तर हे मेंढपाळ इतक्या लगबगीने बेथलेहेमत आले होते! देवदूताने वर्णन केल्याप्रमाणेच त्यांनी जेव्हा एका नवजात बाळाला गव्हाणीत पाहिले असावे तेव्हा त्यांना किती आनंद झाला असावा! त्यांनी ही आनंदाची बातमी लपवून ठेवली नाही तर “त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्‍चर्यचकित झाले.” (लूक २:१७, १८) त्या काळातले धार्मिक पुढारी मेंढपाळांना तुच्छ लेखत असत. पण यहोवाने या नम्र व विश्‍वासू लोकांची किती कदर केली हे या घटनेवरून स्पष्ट दिसते. मेंढपाळांच्या या भेटीचा मरीयेवर काय परिणाम झाला?

बाळाच्या प्रसूतीनंतर मरीया निश्‍चित्तच पार गळून गेली असावी. तरीपण ती मेंढपाळ सांगत असलेला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत होती. एवढेच नव्हे तर “मरीयेने ह्‍या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या.” (लूक २:१९) ही तरुण स्त्री खरोखरच विचारी होती. देवदूताकडून मिळालेला हा संदेश महत्त्वाचा आहे हे तिला माहीत होते. यहोवा देवाची देखील इच्छा होती, की तिने त्याच्या पुत्राची ओळख करून त्याचे महत्त्व जाणावे. त्यामुळे मरीयेने देवदूताचा संदेश फक्‍त ऐकलाच नाही तर तो आपल्या अंतःकरणात जपून ठेवला जेणेकरून ती, येणाऱ्‍या महिन्यांमध्ये व वर्षांमध्ये त्यावर मनन करू शकेल. अशा प्रकारे मरीयेने आपल्या जीवनात उल्लेखनीय विश्‍वास दाखवला.

तुम्ही मरीयेच्या उदाहरणाचे अनुकरण कराल का? यहोवाच्या वचनात अनेक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सत्ये आहेत. पण जोपर्यंत आपण या सत्यांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा फायदा होणार नाही. कथा-कादंबरी म्हणून नव्हे तर देवाचे ईश्‍वरप्रेरित वचन म्हणून जेव्हा आपण बायबलचे नियमित वाचन करतो तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो. (२ तीमथ्य ३:१६) आणि मग वाचलेल्या गोष्टी आपण मरीयेप्रमाणे मनात साठवून ठेवल्या पाहिजेत आणि त्यांवर मनन केले पाहिजे. बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर आपण जर मनन केले, यहोवाने दिलेल्या सल्ल्याचे पालन कोणकोणत्या मार्गांनी करता येईल त्यावर विचार केला तर, आपला विश्‍वास वाढण्याकरता हवे असलेले पोषण आपल्याला मिळेल.

मनात जतन करून ठेवण्याकरता आणखी सुविचार

आठव्या दिवशी मरीया व योसेफ मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बाळाची सुंता करतात आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव येशू ठेवतात. (लूक १:३१) आणि मग, ४० व्या दिवशी ते त्याला बेथलेहेमेहून काही किलोमीटर दूर असलेल्या जेरूसलेमच्या मंदिरात नेतात व नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाचे बलिदान अर्पण करतात. नियमशास्त्रात गरीब लोकांना परवडेल अशा बलिदानांची, म्हणजे दोन होल्यांची किंवा दोन पारव्यांची सोय करण्यात आली होती. मरीया व योसेफाची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे, ते गरिबांसाठी असलेले बलिदान देतात. इतर पालकांप्रमाणे आपण एडक्याचे व होल्याचे बलिदान देऊ शकत नाही, म्हणून त्यांना जर संकोच वाटलाच असेल तर त्यांनी ही भावना आपल्या मनातून लगेच काढून टाकली असेल. काहीही असो, मंदिरात गेल्यावर मात्र त्यांना जबरदस्त प्रोत्साहन मिळाले.—लूक २:२१-२४.

शिमोन नावाचा एक वृद्धस्थ त्यांच्याजवळ येतो आणि मरीयेला आणखी काही तरी सांगतो जे ती आपल्या हृदयात सांभाळून ठेवते. मृत्यूपूर्वी तू मशिहाला पाहशील, असे वचन शिमोनाला देण्यात आले होते आणि बाळ येशू तो वचनयुक्‍त तारणकर्ता आहे हे यहोवाच्या आत्म्याने त्याला सूचित केले. एके दिवशी तुझ्या काळजाचे पाणी होईल अशी एक घटना तुला पाहावी लागेल आणि तेव्हा तुला तुझ्या ‘जिवातून तरवार भोसकल्यासारखे’ वाटेल, असे तो म्हणतो. (लूक २:२५-३५) शिमोनाच्या या भाकीतामुळे, तीस वर्षांनी येणारा तो वेदनादायक क्षण सहन करण्यास मरीयाला मदत झाली असावी. शिमोननंतर, हन्‍ना नावाची एक संदेष्ट्री बाळ येशूला पाहते आणि, जेरूसलेमच्या सुटकेची आशा बाळगणाऱ्‍या प्रत्येकाला त्याच्याविषयी सांगू लागते.—लूक २:३६-३८.

जेरूसलेममधील यहोवाच्या मंदिरात बाळ येशूला आणण्याचा योसेफ व मरीयेने घेतलेला निर्णय किती चांगला होता. यहोवाच्या मंदिरात विश्‍वासूपणे हजर राहण्याचा आयुष्यक्रम त्यांनी त्याला सुरू करून दिला. मंदिरात असताना त्यांनी, त्यांच्या परिने त्यांना जमेल तितकी यहोवाची सेवा केली शिवाय, बोधपर व प्रोत्साहनदायक सुविचारही त्यांना ऐकायला मिळाले. त्या दिवशी मंदिरातून निघताना मरीयेचा विश्‍वास नक्कीच आणखी मजबूत झाला असेल. मनन करण्याकरता व इतरांना सांगण्याकरता तिला बऱ्‍याच आध्यात्मिक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या.

आज अनेक पालकांना मरीयेच्या उदाहरणाचे अनुकरण करताना पाहून आपल्याला किती आनंद वाटतो. यहोवाचे साक्षीदार असलेले पालक विश्‍वासूपणे आपल्या मुलांना ख्रिस्ती सभांना घेऊन येतात. असे पालक, त्यांना जितके जमते तितकी देवाची सेवा करतात आणि आपल्या सोबतच्या बंधूभगिनींशी प्रोत्साहानाच्या दोन गोष्टी बोलतात. घरी जाताना त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत झालेला असतो, त्यांचा आनंद द्विगुणीत झालेला असतो व इतरांना सांगण्याकरता त्यांच्याजवळ पुष्कळ गोष्टी असतात. अशा पालकांना तुम्हाला भेटायचे असेल तर तुमचे स्वागत आहे. त्यांना भेटल्यावर तुम्हालाही जाणवेल की मरीयेप्रमाणे तुमचाही विश्‍वास अधिक पक्का झाला आहे. (w०८ १०/१)

[तळटीपा]

a ह्‍या उताऱ्‍याच्या व आधीच्या एका प्रवासाच्या वर्णनातील फरक पाहा: “मरीया [एलिझाबेथेस भेटावयास] . . . गेली.” (लूक १:३९) त्यावेळेला मरीयाचा फक्‍त साखरपुडा झाला होता. आणि या प्रवासाला जाण्याविषयी तिने कदाचित योसेफाची परवानगी घेतली नसावी. पण लग्न झाल्यावर मात्र, त्यांच्या प्रवासाला निघण्याविषयी जाण्याचे निर्णय मरीयेने नव्हे तर योसेफाने घेतल्याचे अहवालावरून सूचित होते.

b त्या काळी गावांत, प्रवाशांना व उतारूंना राहायला एक सामान्य खोली देण्याची प्रथा होती.

c मेंढपाळ आपल्या घरापासून दूर कळपाची राखण करीत बसले होते हा अहवाल बायबल कालगणनेशी तंतोतंत जुळतो: ख्रिस्ताचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला नव्हता तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला केव्हातरी झाला होता. कारण डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते व कळपाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्याकरता घराच्या अगदी जवळ ठेवले जाते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा