सन्माननीय आचरणाने यहोवाचे गौरव करा
“[यहोवाची] कृति साक्षात मान व महिमा आहे.”—स्तो. १११:३.
१, २. (क) “मान” या शब्दाची व्याख्या तुम्ही कशी कराल? (ख) या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?
बायबल सांगते की देव “मान व महिमा ह्यांनी मंडित आहे,” किंवा दुसऱ्या एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे त्याने जणू ‘सन्मानाचा झगा परिधान केला आहे.’ (स्तो. १०४:१) उचित पेहराव हा मानवांच्या बाबतीतही सन्माननीय आचरणाचा एक भाग असू शकतो. म्हणूनच, प्रेषित पौलाची अशी इच्छा होती की ख्रिस्ती स्त्रियांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे.” (१ तीम. २:९) पण, यहोवाचा “मान व महिमा” यांना शोभेल अशा प्रकारचे सन्माननीय आचरण हे केवळ उचित पेहराव करण्यापुरतेच मर्यादित नाही.—स्तो. १११:३.
२ बायबलमध्ये, “मान” असे भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचे, “वैभव,” “ऐश्वर्य,” “महिमा,” आणि “आदर,” असे देखील भाषांतर केले जाऊ शकते. एका शब्दकोशानुसार, “मान” या शब्दात एखाद्या व्यक्तीची योग्यता, आदरणीयता, आणि प्रतिष्ठा या गोष्टींचा समावेश होतो. आणि सर्वात आदरणीय व प्रतिष्ठेस योग्य यहोवाशिवाय दुसरा कोणीच नाही. म्हणूनच, त्याचे समर्पित सेवक यानात्याने आपण जे काही बोलतो व करतो त्यामुळे यहोवाचा आदर झाला पाहिजे. पण, मानवांना सन्मानपूर्वक वागणे का शक्य आहे? यहोवाचा मान व महिमा कोणत्या गोष्टींतून प्रकट होतो? त्याचा आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे? सन्माननीय आचरणाबद्दल आपण येशूकडून काय शिकतो? आणि आपल्या सन्माननीय आचरणाने आपण यहोवाचे गौरव कशा प्रकारे करू शकतो?
मानवांना सन्मानपूर्वक वागणे का शक्य आहे?
३, ४. (क) यहोवाने आपल्याला सन्मान दिला असल्यामुळे आपण काय केले पाहिजे? (ख) स्तोत्र ८:५-९ यातील भविष्यसूचक शब्द कोणाला लागू होतात? (तळटीप पाहावी.) (ग) गतकाळात यहोवाने कोणाचा सन्मान केला?
३ मानवांना देवाच्या स्वरूपात निर्माण केलेले असल्यामुळे सर्व मानवांमध्ये सन्मानपूर्वक वागण्याची कुवत आहे. यहोवाने पृथ्वीची देखभाल करण्याची जबाबदारी पहिल्या मानवावर सोपवून त्याला मान दिला. (उत्प. १:२६, २७) मानवाने पाप केल्यानंतरही, यहोवाने ही जबाबदारी त्याच्यापासून हिरावून घेतली नाही. याचा अर्थ आजही यहोवा मानवांना सन्मानाने “मुकुटमंडित” करतो. (स्तोत्र ८:५-९ वाचा.)a यहोवाने आपल्याला सन्मान दिला असल्यामुळे, आपण त्याच्या वैभवशाली नावाची आदराने व सन्मानाने स्तुती केली पाहिजे.
४ यहोवाने त्याची पवित्र सेवा करणाऱ्यांना विशेष मान दिला आहे. हाबेलाचे अर्पण स्वीकार करून देवाने त्याचा आदर केला. पण, त्याचा भाऊ काइन याच्या अर्पणाचा त्याने स्वीकार केला नाही. (उत्प. ४:४, ५) मोशेनंतर इस्राएल लोकांचा नेता बनलेल्या यहोशवावर ‘आपला काही मान ठेव’ असे देवाने मोशेला सांगितले होते. (गण. २७:२०, पं.र.भा.) दाविदाचा पुत्र शलमोन याच्याबद्दल बायबलमध्ये असे म्हटले आहे, “परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलांदेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याहि राजास पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजैश्वर्य त्याला दिले,” म्हणजेच, त्याला असाधारण सन्मान दिला. (१ इति. २९:२५) देवाच्या “राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य” ज्यांनी विश्वासूपणे घोषित केले अशा पुनरुत्थित अभिषिक्त ख्रिश्चनांना देव असाधारण गौरवाने सन्मानित करेल. (स्तो. १४५:११-१३) येशूच्या ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समुदायालाही यहोवाची स्तुती करण्याचा खास बहुमान लाभला आहे.—योहा. १०:१६.
यहोवाचा मान व महिमा कोणत्या गोष्टींतून प्रकट होतो?
५. यहोवा किती गौरवशाली आहे?
५ देवाच्या थोरवीपुढे मनुष्याचा उणेपणा दाखवणाऱ्या एका गीतात, दाविदाने असे गायिले: “हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे.” (स्तो. ८:१) अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत म्हणजेच, “आकाश व पृथ्वी” ही निर्माण करण्याआधीपासून तर पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या व मानवजातीला परिपूर्णतेकडे नेण्याच्या देवाच्या उद्देशाची भव्य पूर्णता होईपर्यंत, यहोवा देव सबंध विश्वात सर्वात गौरवशाली व सन्माननीय व्यक्ती आहे.—उत्प. १:१; १ करिंथ. १५:२४-२८; प्रकटी. २१:१-५.
६. यहोवा मान व महिमा यांनी मंडित आहे असे स्तोत्रकर्त्याने का म्हटले?
६ लुकलुकणाऱ्या “रत्नांनी” जडित चांदण्या रात्रीचे भव्य शांत आकाश पाहिल्यावर देवभीरू स्तोत्रकर्ता नक्कीच भारावून गेला असेल! देव ज्या प्रकारे ‘कनातीप्रमाणे आकाश विस्तारितो’ ते पाहून, स्तोत्रकर्ता आश्चर्यचकित झाला व देवाच्या अद्भुत सर्जनशील कौशल्यामुळे, देव मान व महिमा यांनी मंडित आहे असे त्याने म्हटले. (स्तोत्र १०४:१, २ वाचा.) सर्वशक्तिमान अदृश्य सृष्टिकर्त्याचा मान व महिमा त्याच्या दृश्य कार्यांतून प्रकट होतो.
७, ८. यहोवाच्या मान व महिम्याचे कोणते पुरावे आपल्याला आकाशात दिसतात?
७ उदाहरणार्थ, आपल्या आकाशगंगेचा विचार करा. ग्रह, तारे, आणि अनेक सौर मंडळांच्या या विशाल महासागरात, पृथ्वी ग्रहाचा आकार अगदीच गौण आहे, जणू मोठ्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा एक बारीक कण. या एकाच आकाशगंगेत १०,००० कोटी तारे आहेत! जर तुम्ही दर सेकंदास एक अशा प्रकारे दिवस-रात्र २४ तास न थांबता हे तारे मोजण्याचा प्रयत्न केला तर, १०,००० कोटी तारे मोजण्यासाठी तुम्हाला ३,००० वर्षांपेक्षाही जास्त काळ लागेल.
८ जर या एकाच आकाशगंगेत १०,००० कोटी तारे असतील, तर बाकीच्या विश्वाबद्दल काय? आपली आकाशगंगा, विश्वातील ५,००० कोटी ते १२,५०० कोटी आकाशगंगांपैकी एक असावी असा खगोल शास्त्रज्ञ अंदाज लावतात. मग, संपूर्ण विश्वात किती तारे आहेत? हा विचारही चक्रावून टाकणारा आहे. पण, यहोवा “ताऱ्यांची गणती करितो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.” (स्तो. १४७:४) यहोवाच्या मान व महिम्याचे हे पुरावे पाहून तुम्हाला त्याची स्तुती करण्याची प्रेरणा मिळत नाही का?
९, १०. अन्नाच्या तरतुदीतून कशा प्रकारे आपल्या सृष्टिकर्त्याची बुद्धी प्रदर्शित होते?
९ आता आपली दृष्टी भव्य आकाशातून एका सर्वसाधारण गोष्टीकडे म्हणजे आपण जे अन्न खातो त्याकडे वळवू या. यहोवाने केवळ ‘आकाश व पृथ्वीच’ निर्माण केली नाही, तर तो ‘भुकेल्यांना अन्नही देतो.’ (स्तो. १४६:६, ७) यहोवाचा “मान व महिमा” त्याच्या अद्भुत कार्यांतून प्रतिबिंबित होतो. निरनिराळे अन्नपदार्थ ज्या वनस्पतींपासून बनवले जातात त्यांचीही तरतूद यहोवानेच केली आहे. यांपैकी एका अन्नपदार्थाचे, भाकरीचे उदाहरण येथे पाहू या. (स्तोत्र १११:१-५ वाचा.) येशूने आपल्या अनुयायांना अशा प्रकारे प्रार्थना करण्यास शिकवले: “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (मत्त. ६:११) भाकर हे प्राचीन काळातील अनेक लोकांचे, ज्यांमध्ये इस्राएल लोकांचाही समावेश होतो, मुख्य भोजन होते. जरी भाकर अगदी सर्वसाधारण खाद्य असले, तरी ज्या रासायनिक प्रक्रियेने मोजक्याच घटक पदार्थांपासून अनेक प्रकारच्या रुचकर भाकरी बनतात ती प्रक्रिया मात्र गुंतागुंतीची आहे.
१० बायबल लिहिले जात होते त्या काळात, इस्राएल लोक भाकर बनवण्यासाठी गव्हाचे किंवा सातूचे पीठ आणि पाणी वापरत. कधीकधी या प्रक्रियेत खमीराचा किंवा यीस्टचाही वापर करण्यात येई. हे सर्वसाधारण घटकपदार्थ एकत्र येऊन, एक-दुसऱ्याशी क्रियाशील संबंध असलेली असंख्य रासायनिक संयुगे बनतात. ही संयुगे कशा प्रकारे कार्य करतात हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. शिवाय, आपल्या शरीरात भाकरीचे पचन ज्या प्रकारे होते ही देखील एक अद्भुत, क्लिष्ट प्रक्रिया आहे. म्हणूनच, स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली.” (स्तो. १०४:२४) तुम्हालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाची स्तुती करण्याची प्रेरणा मिळते का?
यहोवाचा मान व महिमा यांचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?
११, १२. देवाच्या अद्भुत कार्यांवर मनन केल्याने आपल्यावर कोणता प्रभाव पडू शकतो?
११ रात्रीच्या आकाशातील अद्भुत दृश्यांचा आनंद घेण्यासाठी आपण खगोल शास्त्रज्ञ असण्याची किंवा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण रसायनशास्त्रात पारंगत असण्याची गरज नाही. पण, सृष्टिकर्त्याच्या महानतेबद्दल आपल्या मनात कदर निर्माण करण्यासाठी मात्र, आपण त्याच्या कृत्यांवर मनन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. अशा प्रकारे मनन करण्याचा काय फायदा होईल? अशा प्रकारे मनन केल्यामुळे आपल्याला तोच फायदा होईल, जो यहोवाने त्याच्या लोकांसाठी केलेल्या अद्भुत कार्यांवर मनन केल्याने होतो.
१२ यहोवाने आपल्या लोकांकरता केलेल्या अद्भुत कार्यांबद्दल दाविदाने असे गायिले: “तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुतकृत्ये ह्यांचे मी मनन करीन.” (स्तो. १४५:५) बायबलचे वाचन करण्याद्वारे आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी वेळ काढण्याद्वारे, आपल्याला यहोवाच्या अद्भुत कृत्यांबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे असे आपण दाखवतो. अशा प्रकारे मनन केल्याने काय परिणाम होतो? देवाचा मान व महिमा यांच्यासाठी आपली कदर वाढते. आणि निश्चितच, आपणही दाविदासोबत मिळून यहोवाचा सन्मान करण्यास व असे म्हणण्यास प्रेरित होतो: “मी तुझी थोरवी वर्णीन.” (स्तो. १४५:६) यहोवाच्या अद्भुत कार्यांवर मनन केल्याने त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध आणखी मजबूत झाला पाहिजे आणि आवेशाने व दृढनिश्चयाने इतरांना त्याच्याबद्दल सांगण्याची आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. तुम्ही आवेशाने सुवार्तेची घोषणा करून, यहोवा देवाचा मान, महिमा, आणि वैभव यांची कदर करण्यास लोकांना मदत करत आहात का?
येशू, देवाच्या वैभवाचे परिपूर्ण प्रतिबिंब
१३. (क) दानीएल ७:१३, १४ या वचनांनुसार, यहोवाने आपल्या पुत्राचा सन्मान कशा प्रकारे केला आहे? (ख) राजा या नात्याने येशू आपल्या प्रजेशी कशा प्रकारे वागतो?
१३ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने आवेशाने सुवार्तेची घोषणा केली आणि स्वर्गातील आपल्या वैभवशाली पित्याचा सन्मान केला. यहोवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ‘प्रभुत्व व राज्य’ देऊन त्याला एक विशेष सन्मान बहाल केला. (दानीएल ७:१३, १४ वाचा.) पण, येशू गर्विष्ठ नाही किंवा स्वतःला श्रेष्ठ समजून लोकांना आपल्यापासून दूर लोटणाऱ्यांपैकी नाही. याउलट, तो आपल्या प्रजेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्याशी आदराने वागणारा एक दयाळू शासक आहे. देवाच्या राज्याचा नियुक्त राजा या नात्याने येशू आपल्या संपर्कात आलेल्या लोकांशी, विशेषतः ज्यांना तुच्छ लेखले जायचे आणि जे सर्वांना नकोसे वाटायचे अशा लोकांशी कशा प्रकारे वागला याचे एक उदाहरण पाहू या.
१४. प्राचीन इस्राएलात कुष्ठरोग्यांना कशा प्रकारची वागणूक मिळायची?
१४ प्राचीन काळात कुष्ठरोग हा रुग्णाला क्रमाक्रमाने मृत्यूजवळ नेणारा अत्यंत कष्टदायक रोग होता. हळूहळू रोग्याच्या शरीराचे अवयव रोगाने ग्रस्त व्हायचे. कुष्ठरोग्याला बरे करणे म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीला जिवंत करण्यासारखे समजले जायचे. (गण. १२:१२; २ राजे ५:७, १४) कुष्ठरोग्यांना अशुद्ध ठरवून त्यांना समाजातून बहिष्कृत केले जायचे. इतर लोकांना इशारा देण्यासाठी, त्यांना “अशुद्ध, अशुद्ध” असे ओरडावे लागत असे. (लेवी. १३:४३-४६) त्या काळात कुष्ठरोग्यांची अवस्था मेलेल्यांसारखीच होती. रब्बींच्या लिखाणांनुसार, कुष्ठरोग्यांना इतर लोकांपासून सुमारे सहा फूट दूर राहावे लागत असे. असे म्हटले जाते की काही धर्मगुरू कुष्ठरोग्यास दुरून पाहिले, तरी त्याला आपल्यापासून खूप दूर ठेवण्यासाठी दगड मारायचे.
१५. एका कुष्ठरोग्याशी येशू कसा वागला?
१५ पण, येशूजवळ येऊन आपल्याला बरे करण्याची विनंती करणाऱ्या एका कुष्ठरोग्याशी येशू ज्या प्रकारे वागला ते खरोखर उल्लेखनीय आहे. (मार्क १:४०-४२ वाचा.) सर्वांनी धुत्कारलेल्या त्या कुष्ठरोग्यास आपल्यापासून दूर करण्याऐवजी, येशू त्याच्याशी सहानुभूतीने व आदराने वागला. हा माणूस दयनीय अवस्थेत आहे आणि त्याला मदतीची गरज आहे एवढाच त्याने विचार केला. त्याची अवस्था पाहून येशूला राहावले नाही आणि त्याने लगेच आपला हात पुढे करून, कुष्ठरोग्याला स्पर्श केला व त्याला रोगमुक्त केले.
१६. इतरांशी येशू ज्या प्रकारे वागला त्यावरून तुम्हाला कोणता धडा शिकायला मिळाला?
१६ येशूने आपल्या पित्याचे अनुकरण करून इतरांचा आदर केला. येशूचे अनुयायी या नात्याने, आपण कशा प्रकारे येशूचे अनुकरण करू शकतो? एक मार्ग म्हणजे, लोकांचा समाजातील दर्जा, त्यांचे आरोग्य, किंवा वय याचा विचार न करता, ते सर्वच जण आदर व सन्मानाच्या लायक आहेत याची जाणीव बाळगणे. (१ पेत्र २:१७) विशेष म्हणजे, ज्यांना इतरांची देखरेख करण्याची जबाबदारी मिळाली आहे, जसे की पती, पालक, आणि ख्रिस्ती वडील यांनी त्यांच्या निगराणीत असलेल्यांना मान दिला पाहिजे आणि त्यांना स्वतःचा स्वाभिमान जपण्यास मदत केली पाहिजे. असे करण्याची जबाबदारी सर्व ख्रिश्चनांवर आहे यावर भर देऊन बायबल असे म्हणते: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोम. १२:१०.
उपासनेत आपले आचरण सन्माननीय ठेवणे
१७. यहोवाची उपासना सन्मानाने केली पाहिजे याबद्दल आपण बायबलमधून काय शिकू शकतो?
१७ यहोवाची उपासना करतेवेळी आपले आचरण सन्माननीय असण्यासाठी आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. उपदेशक ५:१ मध्ये असे म्हटले आहे: “तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक.” पवित्र ठिकाणी असताना मोशे व यहोशवा यांना पायातील जोडे काढण्याची आज्ञा देण्यात आली होती. (निर्ग. ३:५; यहो. ५:१५) देवाप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांनी असे करायचे होते. इस्राएली याजकांना आपले ‘अंग झाकण्यासाठी’ तागाचे चोळणे घालणे बंधनकारक होते. (निर्ग. २८:४२, ४३) यामुळे, वेदीजवळ सेवा करताना त्यांचे शरीर अनुचितपणे उघडे पडणार नव्हते. याजकाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने देवाच्या स्तरांचा सन्मान होईल अशा प्रकारे वागायचे होते.
१८. आपल्या सन्माननीय आचरणामुळे आपण यहोवाचे उपासक आहोत हे कशा प्रकारे दिसते?
१८ आपण पाहिल्याप्रमाणे, यहोवाच्या उपासनेत सन्मान व आदर यांना विशेष महत्त्व आहे. इतरांनी आपला सन्मान व आदर करावा असे आपल्याला वाटत असेल, तर आपली वागणूक आदरपूर्वक असली पाहिजे. पण, ही आदरपूर्वक वागणूक केवळ वरवरची किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी असू नये. इतरांचे लक्ष वेधण्याऐवजी, आपल्या वागणुकीमुळे हृदय पारखणारा देव आनंदित झाला पाहिजे. (१ शमु. १६:७; नीति. २१:२) अशा प्रकारचे सन्माननीय आचरण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनले पाहिजे. आपल्या मनोवृत्तीवर, इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर, आणि स्वतःबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावरही याचा प्रभाव पडला पाहिजे. खरेतर सर्व वेळी, आपण जे काही बोलतो किंवा करतो ते सन्माननीय असले पाहिजे. आपले वागणे-बोलणे, केशभूषा व वेशभूषा कशी असावी, याबद्दल आपण प्रेषित पौलाच्या शब्दांचे मनापासून पालन करतो: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.” (२ करिंथ. ६:३, ४) अशा प्रकारे, आपण ‘आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणतो.’—तीत २:१०.
आपले आचरण सतत सन्माननीय असू द्या
१९, २०. (क) इतरांचा सन्मान करण्याचा उत्तम मार्ग कोणता? (ख) सन्माननीय आचरणाबद्दल आपण कोणता दृढनिश्चय केला पाहिजे?
१९ “ख्रिस्ताचे राजदूत” असलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांचे आचरण सन्माननीय आहे. (२ करिंथ. ५:२०, ईझी टू रीड व्हर्शन) त्यांना एकनिष्ठपणे मदत करणारी “दुसरी मेंढरे,” मशीही राज्याचे सन्माननीय दूत आहेत. एक राजदूत किंवा दूत आपल्या सरकारच्या वतीने निर्भयपणे आणि सन्माननीय रीत्या बोलतो. म्हणून, आपणही देवाच्या सरकारचे म्हणजेच, त्याच्या राज्याचे निर्भयपणे व आदरपूर्वक समर्थन केले पाहिजे. (इफिस. ६:१९, २०) आपण इतरांना “सुवार्ता सांगतो,” तेव्हा आपण एक प्रकारे त्यांचा सन्मानच करत नसतो का?—यश. ५२:७.
२० देवाच्या मान व महिम्याला शोभेल असे आचरण ठेवण्याद्वारे आपण त्याचा गौरव करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे. (१ पेत्र २:१२) देवाचा, त्याच्या उपासनेचा, आणि आपल्या सहउपासकांचा आपण नेहमी मनापासून आदर करू या. यामुळे, मान व महिमा यांनी मंडित असलेला यहोवा देव, आपण सन्माननीय रीत्या त्याची उपासना करत आहोत हे पाहून आनंदित होईल.
[तळटीप]
a ८ व्या स्तोत्रातील दाविदाचे भविष्यसूचक शब्द, परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्त याला देखील लागू होतात.—इब्री २:५-९.
तुमचे उत्तर काय असेल?
• यहोवा देवाचा मान, महिमा, आणि वैभव यांमुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे?
• एका कुष्ठरोग्याशी येशू ज्या प्रकारे वागला, त्यावरून सन्माननीय आचरणाबद्दल आपण काय शिकू शकतो?
• आपण कोणत्या सन्माननीय मार्गांनी यहोवाचे गौरव करू शकतो?
[१२ पानांवरील चित्र]
यहोवाने कशा प्रकारे हाबेलाचा आदर केला?
[१४ पानांवरील चित्र]
यहोवाने केलेल्या अन्नाच्या तरतुदीतूनही त्याची अद्भुत कार्ये प्रकट होतात
[१५ पानांवरील चित्र]
एका कुष्ठरोग्याशी येशू ज्या प्रकारे वागला, त्यावरून सन्माननीय आचरणाबद्दल तुम्हाला काय शिकायला मिळाले?
[१६ पानांवरील चित्र]
सन्माननीय उपासनेत यहोवाच्या मान व महिम्याला शोभेल अशा प्रकारे वागणे समाविष्ट आहे