वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w06 १/१ पृ. ८-पृ. ११ परि. १०
  • एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मंदिर पुनः बांधले जाते
  • (एज्रा १:१–६:२२)
  • शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:
  • एज्रा जेरुसलेमेत येतो
  • (एज्रा ७:१–१०:४४)
  • यहोवा आपले वचन पूर्ण करतो
  • अचानक आलेल्या परिस्थितींमध्येही तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • एज्राने लोकांना देवाचे नियम शिकवले
    बायबलमधून शिकू या!
  • तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट असतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
w06 १/१ पृ. ८-पृ. ११ परि. १०

यहोवाचे वचन सजीव आहे

एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे

बायबलमधील दुसरा इतिहास पुस्तकाचा अहवाल जिथे संपतो तेथून एज्रा नामक पुस्तकातला अहवाल सुरु होतो. या पुस्तकाचा लेखक, याजक एज्रा अहवालाची सुरुवात, पर्शियाचा राजा कोरेश याने पाठवलेल्या फर्मानाने करतो. बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेले शेष यहुदी आपल्या मायदेशी परत जाऊ शकतात, असे या फर्मानात म्हटले होते. अहवालाच्या शेवटी, देशांतील लोकांबरोबर भ्रष्ट झालेल्यांना शुद्ध करण्यासाठी एज्रा कोणती निर्णायक पावले उचलतो त्याचा वृत्तांत आहे. एकूणच, या पुस्तकात ७० वर्षांच्या कालावधीचा—सा.यु.पू. ५३७ पासून सा.यु.पू. ४६७ पर्यंतचा—वृत्तांत आहे.

पुस्तकाचे लिखाण करतेवेळी एज्राच्या मनात इरादा स्पष्ट होता: बॅबिलोनमधील आपल्या लोकांना बंधमुक्‍त करण्याविषयी व यरुशलेममध्ये खऱ्‍या उपासनेची पुनःस्थापना करण्याविषयी यहोवाने दिलेले अभिवचन त्याने कसे पूर्ण केले ते दाखवणे. त्यामुळे, त्या उद्देशाशी संबंधित असलेल्या घटनांवरच एज्राने आपले लिखाण केंद्रित केले आहे. एज्राच्या पुस्तकात, मंदिराची पुनःबांधणी कशी करण्यात आली व विरोध होत असूनही आणि देवाचे लोक अपरिपूर्ण असूनही यहोवाची उपासना पुन्हा कशी स्थापित झाली, याचा वृत्तांत देणारा अहवाल आहे. या अहवालावर आज आपण खास लक्ष देण्याची गरज आहे कारण आपणही पुनःस्थापनेच्या एका काळात जगत आहोत. लोकांचे लोंढेंच्या लोंढे, ‘परमेश्‍वराच्या पर्वताकडे’ येत आहेत आणि सबंध पृथ्वी ‘परमेश्‍वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरून’ जाणार आहे.—यशया २:२, ३; हबक्कूक २:१४.

मंदिर पुनः बांधले जाते

(एज्रा १:१–६:२२)

कोरेशच्या मुक्‍तता फर्मानानुसार, सुमारे ५०,००० यहुदी बंदिवान प्रांताधिकारी जरुबाबेल किंवा शेशबस्सर याच्या नेतृत्वाखाली जरुसलेमला परततात. परतलेले यहुदी लगेच मंदिर असलेल्या ठिकाणी वेदी बांधतात आणि यहोवाला बलिदाने अर्पू लागतात.

दुसऱ्‍या वर्षी इस्राएली लोक यहोवाच्या मंदिराचा पाया घालतात. शत्रू पक्षाचे लोक, बांधकामात अडथळे आणत राहतात. इतकेच नव्हे तर ते काम थांबवण्यासाठी राजाला एक आज्ञाही द्यायला लावतात. पण संदेष्टे हाग्गय व जखऱ्‍या लोकांना प्रोत्साहन देतात आणि यहुदी लोक बंदी असूनही मंदिराचे बांधकाम चालू ठेवतात. परंतु, सुरुवातीला पर्शियन राजा कोरेश याने काढलेल्या फर्मानाविरुद्ध जाण्याची कोणाचीही हिंमत नसल्यामुळे विरोधक मूग गिळून गप्प बसतात; राजाने दिलेली आज्ञा कोणीही बदलू शकत नव्हता. अधिकृत तपासणीत दिसून येते, की कोरेशने “यरूशलेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने . . . ठराव केला” होता. (एज्रा ६:३) मंदिराचे बांधकाम सुरळीत चालते व पूर्णही होते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:३-६—आपल्या मायदेशी परत जाण्यास इच्छुक नसलेले इस्राएली त्यांच्या विश्‍वासात कमजोर झाले होते का? काही जण, भौतिकवादी झाल्यामुळे किंवा खऱ्‍या उपासनेबद्दलची त्यांची कदर कमी झाल्यामुळे जेरुसलेमेस पुन्हा आले नसावेत; परंतु सर्वांच्याच बाबतीत असे नव्हते. एकतर आहे, जेरुसलेमला जाण्याच्या १,६०० किलोमीटरच्या प्रवासाला चार ते पाच महिने लागणार होते. शिवाय, ७० वर्षे उजाड असलेल्या देशात जाऊन राहणे व तेथे बांधकाम पुन्हा सुरू करणे तोंडची गोष्ट नव्हती; याला धडधाकट असण्याची गरज होती. म्हणूनच, आजारपण, म्हातारपण, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या यांसारख्या काही प्रतिकूल परिस्थितींमुळे काही जणांनी जेरुसलेमला पुन्हा जाण्याची इच्छा दर्शवली नसावी.

२:४३—नथीनीम कोण होते? हे गैर-इस्राएली लोक होते जे मंदिरात दास किंवा सेवक म्हणून काम करत होते. त्यांच्यामध्ये यहोशवाच्या दिवसांतील गिबोनी लोकांचे पूर्वज आणि ‘दावीद व सरदार यांनी लेव्यांच्या सेवेसाठी ज्यांना नेमून दिले होते’ असेही इतरजण होते.—एज्रा ८:२०.

२:५५—शलमोनाच्या चाकरांचे वंशज कोण होते? हे गैरइस्राएली लोक होते ज्यांना यहोवाच्या सेवेत खास नेमणूका देण्यात आल्या होत्या. ते मंदिरात शास्त्री किंवा नक्कलाकार म्हणून काम करत असावेत किंवा इतर अधिकारपदी असावेत.

२:६१-६३—यहोवाकडून उत्तर हवे असताना वापरले जाणारे उरीम व थुम्मीम परतलेल्या बंदिवानांना उपलब्ध होते का? आपली वंशावळी शाबीत करू न शकलेले, उरीम व थुम्मीमचा उपयोग करून आपण याजकीय वंशाचे आहोत हा दावा सिद्ध करू शकले असते. ही एक शक्यता होती, असे एज्रा म्हणतो. पण तेव्हा आणि त्यानंतर उरीम व थुम्मीमचा उपयोग केल्याविषयीचा कसलाही उल्लेख शास्त्रवचनात नाही. यहुदी परंपरेनुसार, सा.यु.पू. ६०७ मध्ये मंदिराचा नाश झाला तेव्हा उरीम व थुम्मीमही नाहीसे झाले.

३:१२—“ज्या वृद्ध लोकांनी [यहोवाचे] पूर्वीचे मंदिर पाहिले होते” त्यांना रडू का कोसळले? शलमोनाने बांधलेल्या मंदिराचे काय वैभव होते, हे या लोकांच्या आठवणीत होते. त्यांच्या नजरेत, ते पाहत असलेल्या नवीन मंदिराचा पाया, पहिल्या मंदिराच्या तुलनेत “शून्य” होता. (हाग्गय २:२, ३) त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी पूर्वीच्या मंदिराचे वैभव नवीन मंदिराला पुन्हा मिळू शकणार होते का? या गोष्टीचे त्यांना वाईट वाटून ते रडत असावेत.

३:८-१०; ४:२३, २४; ६:१५, १६—मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी किती वर्षे लागली? सा.यु.पू. ५३६ मध्ये म्हणजे ते ज्या वर्षी आले त्याच्या दुसऱ्‍या वर्षी मंदिराचा पाया घालण्यात आला. सा.यु.पू. ५२२ मध्ये अर्तहशश्‍त राजाच्या आमदानीत बांधकाम थांबवण्यात आले. दारयावेश राजाच्या कारकीर्दीच्या दुसऱ्‍या वर्षापर्यंत म्हणजे सा.यु.पू. ५२० पर्यंत बांधकामावर बंदी होती. दारयावेश राजाच्या कारकीर्दीच्या सहाव्या वर्षी म्हणजे सा.यु.पू. ५१५ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. (“सा.यु.पू. ५३७ पासून सा.यु.पू. ४६७ पर्यंतचे पर्शियन राजे” असा मथळा असलेला चौकोन पाहा) अशाप्रकारे, मंदिराच्या बांधकामाला सुमारे २० वर्षे लागली.

४:८–६:१८—एज्रा पुस्तकातील हा भाग अरेमिक भाषेत का लिहिण्यात आला? या भागात बहुतेककरून, सरकारी अधिकाऱ्‍यांकडून राजांना आणि राजांकडून अधिकाऱ्‍यांना आलेल्या पत्रांच्या आणि या पत्रांच्या उत्तराच्या प्रती आहेत. एज्राने सार्वजनिक अहवालांतून त्यांची अरेमिक भाषेत नक्कल केली. त्या दिवसांत अरेमिक भाषेतच व्यापाराचे व्यवहार चालत असत आणि अरेमिक भाषा ही सरकारी भाषा होती. एज्रा ७:१२-१६, यिर्मया १०:११ आणि दानीएल २:४ख–७:२८ हे बायबलमधील काही भाग आहेत जे या प्राचीन सेमिटीक भाषेत लिहिण्यात आले होते.

आपल्याकरता धडे:

१:२. सुमारे २०० वर्षांपूर्वी यशयाने जे भाकीत केले ते खरे झाले. (यशया ४४:२८) यहोवाच्या वचनातील भविष्यवाण्या केव्हाही फोल ठरल्या नाहीत.

१:३-६. बॅबिलोनमध्येच राहिलेल्या काही इस्राएलांप्रमाणे, अनेक यहोवाचे साक्षीदार असे आहेत ज्यांना पूर्णवेळेची सेवा करता येत नाही किंवा अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करता येत नाही. पण जे असे करू शकतात त्यांना ते पाठिंबा व उत्तेजन देतात आणि राज्य-प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याच्या वृद्धीसाठी स्वच्छेने दान देतात.

३:१-६. सा.यु.पू. ५३७ सालच्या सातव्या महिन्यात (तिशरी, सप्टेंबर/ऑक्टोबरच्या दरम्यान येणारा), परत आलेल्या विश्‍वासू इस्राएलांनी आपले पहिले अर्पण चढवले. सा.यु.पू. ६०७ सालच्या पाचव्या महिन्यात (अब, जुलै/ऑगस्टच्या दरम्यान येणाऱ्‍या महिन्यात) नबुखद्‌नेस्सर राजा जरुशलेमेस आला आणि त्यानंतर दोन महिन्यांनंतर शहराचा पूर्णपणे नाश झाला. (२ राजे २५:८-१७, २२-२६) भाकीत केल्याप्रमाणे, जेरुसलेमचा ७० वर्षांचा उजाड राहण्याचा कालावधी उचित वेळी समाप्त झाला. (यिर्मया २५:११; २९:१०) यहोवाचे वचन जे काही भाकीत करते ते सत्य ठरते.

४:१-३. आम्हीही तुमच्याबरोबर मंदिर बांधू असा शत्रू पक्षातील लोकांनी प्रस्ताव मांडला तेव्हा विश्‍वासू शेष जणांनी त्यांना नकार दिला. त्यांना होकार देण्याचा अर्थ, खोट्या उपासकांबरोबर धार्मिक संबंध जोडणे, असा झाला असता. (निर्गम २०:५; ३४:१२) आज, यहोवाचे उपासक कोणत्याही मिश्र विश्‍वास असलेल्या कार्यहालचालींत भाग घेत नाहीत.

५:१-७; ६:१-१२. आपल्या लोकांना यश देण्याकरता यहोवा घटनांना वळण देऊ शकतो.

६:१४, २२. यहोवाच्या कामात आवेशाने भाग घेतल्यास आपण त्याची मर्जी प्राप्त करू शकतो व त्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो.

६:२१. यहोवाचे कार्य कसे पुढे चालले आहे हे पाहून, यहुदी देशात राहणारे शोमरोनी लोक तसेच मूर्तिपूजक प्रभावांना बळी पडलेले परतलेले लोक आपल्या जीवनात बदल करण्यास प्रवृत्त झाले. देवाने आपल्याला दिलेल्या कामात आणि राज्याचा प्रचार करण्याच्या कामात आपण उत्साहाने भाग घेऊ नये का?

एज्रा जेरुसलेमेत येतो

(एज्रा ७:१–१०:४४)

यहोवाच्या पुनःबांधलेल्या मंदिराचा उद्‌घाटन समारंभ होऊन पन्‍नास वर्षे उलटली आहेत. ते सा.यु.पू. ४६८ साल आहे. आपल्याबरोबर देवाच्या शेष लोकांना व दानपेटीतील निधी घेऊन एज्रा बॅबिलोनहून जेरुसलेमेस जातो. तेथे गेल्यावर तो काय पाहतो?

राजपुत्र एज्राला असे सांगतात: “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत.” एवढेच नव्हे तर, “सरदार व शास्ते यांचा हात या पातकात प्रमुख आहे.” (एज्रा ९:१, २) एज्राला धक्का बसतो. पण त्याला ‘हिंमत धरून कार्य’ करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. (एज्रा १०:४) एज्रा निर्णायक पावले उचलतो आणि लोकही त्याला अनुकूल प्रतिसाद देतात.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

७:१, ७, ११—ही सर्व वचने बांधकाम थांबवणाऱ्‍या अर्तहशश्‍ताला सूचित करतात का? नाही. अर्तहशश्‍त हे एक नाव किंवा पदवी आहे जी दोन पर्शियन राजांना लागू होते. यांपैकी एक बार्दिया किंवा गौमाता असावा ज्याने सा.यु.पू. ५२२ मध्ये मंदिराचे बांधकाम थांबवण्याचा हुकूम दिला. एज्रा जेरुसलेमेत आला तेव्हा त्या काळचा अर्तहशश्‍त हा अर्तहशश्‍त लाँगीमेनस आहे.

७:२८–८:२०—बॅबिलोनमधील अनेक यहुदी एज्राबरोबर जेरुसलेमेस जायला कचरत का होते? यहुद्यांचा पहिला गट आपल्या मायदेशी जाऊन ६० पेक्षा अधिक वर्षे उलटली होती तरीसुद्धा जेरुसलेमचे काही काही भागच वसलेले होते. जेरुसलेमेत येऊन राहणे म्हणजे कठीण, घातक परिस्थितीत नवीन जीवन सुरू करणे. बॅबिलोनमध्ये ज्यांची चंगळ होती अशा यहुद्यांसाठी त्या दिवसांतील जेरुसलेममध्ये कसल्याही भौतिक सुखसोयी नव्हत्या. शिवाय, जेरुसलेमकडे जाणारा रस्ता सुरक्षित नव्हता. जेरुसलेमला परत येणाऱ्‍या लोकांना, यहोवावर भक्कम विश्‍वास, खऱ्‍या उपासनेबद्दल खरा आवेश आणि प्रवास करण्याचे धाडस हवे होते. एज्राने देखील स्वतःला यहोवाच्या बाहुबलामुळे मजबूत केले. एज्राच्या प्रोत्साहनामुळेच १,५०० कुटुंबे—कदाचित एकूण ६,००० लोक—त्याच्याबरोबर जेरुसलेमेस जायला तयार झाले. एज्राने आणखी काही पावले उचलल्यावर, ३८ लेवी आणि २२० नेथीनीम त्याच्याबरोबर यायला तयार झाले.

९:१, २—देशांतील लोकांबरोबर विवाहाद्वारे संधान बांधणे किती धोकादायक होते? पुनर्स्थापित इस्राएल राष्ट्राला, मशिहा येईपर्यंत यहोवाची उपासना चालू ठेवायची होती. परराष्ट्रांतील लोकांबरोबर विवाहाद्वारे संधान बांधल्यास खऱ्‍या उपासनेला धोका होता. काही इस्राएल लोकांनी मूर्तिपूजक लोकांबरोबर विवाह संधान बांधल्यास संपूर्ण राष्ट्र कालांतराने मूर्तिपूजक राष्ट्रांमध्ये सामील झाले असते. शुद्ध उपासना पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीशी झाली असती. मग मशिहा कोणासाठी आला असता? म्हणूनच एज्रा जेव्हा जेरुसलेमेत जे काही चालले आहे ते पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो!

१०:३, ४४—स्त्रियांबरोबर मुलांना देखील का पाठवून देण्यात आले? मुले जर मागे राहिली असती तर पाठवून दिलेल्या स्त्रिया त्यांच्या आठवणीने निश्‍चितच पुन्हा आल्या असत्या. शिवाय, लहान मुलांना सहसा आपल्या आईची गरज असते.

आपल्याकरता धडे:

७:१०. देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यासक व प्रभावशाली शिक्षक या नात्याने एज्राने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. त्याने यहोवाच्या नियमशास्त्राचा सल्ला स्वीकारण्याकरता आपले हृदय प्रार्थनापूर्वक तयार केले. सल्ला घेत असताना त्याने, यहोवा जे काही सांगत आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकले. एज्राने शिकलेल्या गोष्टींचा अवलंब केला आणि त्या गोष्टी इतरांना शिकवण्यासाठी त्याने आपले सर्वस्व पणाला लावले.

७:१३. यहोवाला आपखुशीने त्याची आज्ञा मानणारे सेवक आवडतात.

७:२७, २८; ८:२१-२३. एज्राने सर्व श्रेय यहोवाला दिले. जेरुसलेमचा तो लांब, जीवघेणा प्रवास करण्याआधी यहोवाला कळकळीने विनंती केली आणि यहोवाच्या गौरवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास तयार झाला. अशाप्रकारे, त्याने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले.

९:२. “केवळ प्रभूमध्ये लग्न” करा, ही बायबलमधील आज्ञा आपण गंभीरतेने घेतली पाहिजे.—१ करिंथकर ७:३९.

९:१४, १५. वाईट संगतीमुळे आपण यहोवाची मर्जी गमावू शकतो.

१०:२-१२, ४४. अन्य जातीच्या स्त्रियांबरोबर विवाह करणाऱ्‍या इस्राएली पुरुषांनी पश्‍चात्ताप केला आणि आपले चुकीचे मार्गाक्रमण सुधारले. त्यांची मनोवृत्ती व कार्य आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

यहोवा आपले वचन पूर्ण करतो

एज्राचे पुस्तक आपल्यासाठी खरोखरच किती मौल्यवान आहे! उचित वेळी यहोवाने, आपल्या लोकांना बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍त करून जेरुसलेममध्ये खरी उपासना पुन्हा स्थापण्याविषयी दिलेले वचन पूर्ण केले. यामुळे यहोवावरील आणि त्याच्या अभिवचनांवरील आपला भरवसा आणखी मजबूत होत नाही का?

एज्रा पुस्तकातील उदाहरणांवर विचार करा. एज्राने तसेच जेरुसलेममध्ये शुद्ध उपासनेची पुनःस्थापना व्हावी अशी इच्छा बाळगणाऱ्‍या शेष जणांनी यहोवाची पूर्ण मनाने भक्‍ती केली. हे आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. या पुस्तकात, देवाचे भय बाळगणाऱ्‍या विदेशी लोकांचे तसेच पश्‍चात्तापी लोकांच्या नम्र मनोवृत्तीचे देखील ठळक उदाहरण आहे. होय, एज्राचे ईश्‍वरप्रेरित लिखाण हा स्पष्ट पुरावा देते, की “देवाचे वचन सजीव, सक्रिय,” आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०६ १/१५)

[९ पानांवरील तक्‍ता/चित्र]

“सा.यु.पू. ५३७ पासून सा.यु.पू. ४६७ पर्यंतचे पर्शियन राजे”

महान कोरेश (एज्रा १:१) सा.यु.पू. ५३० मध्ये मरण पावला

संबायसिस, किंवा अहश्‍वेरोश (एज्रा ४:६) सा.यु.पू. ५३०-२२

अर्तहशश्‍त—बार्दिया किंवा गौमाता (एज्रा ४:७) सा.यु.पू. ५२२ (केवळ सात महिने राज्य केल्यानंतर त्याचा वध करण्यात आला)

दारयावेश १ (एज्रा ४:२४) सा.यु.पू. ५२२-४८६

झरक्सीस, किंवा अहश्‍वेरोशa सा.यु.पू. ४८६-७५ (दारयावेश पहिला याच्याबरोबर सहशासक म्हणून सा.यु.पू. ४९६-८६ पर्यंत राज्य केले)

अर्तहशश्‍त लाँगीमेनस (एज्रा ७:१) सा.यु.पू. ४७५-२४

[तळटीपा]

a एज्रा पुस्तकात झरक्सीस राजाचा उल्लेख नाही. पण बायबलमधील एस्तेर नामक पुस्तकात त्याचा अहश्‍वेरोश असा उल्लेख करण्यात आला आहे.

[चित्र]

अहश्‍वेरोश

[८ पानांवरील चित्र]

कोरेश

[८ पानांवरील चित्र]

कोरेश सिलिंडरवर, बंदिवानांना पुन्हा आपल्या मायदेशी पाठवण्याच्या व्यवस्थेविषयी लिहिण्यात आले आहे

[चित्राचे श्रेय]

सिलिंडर: Photograph taken by courtesy of the British Museum

[११ पानांवरील चित्र]

एज्रा कुशल शिक्षक कशामुळे बनला हे तुम्हाला माहीत आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा