तुम्ही अनिश्चिततेचा सामना करू शकता
“निश्चितच!” “खात्रीने!” “शंभर टक्के” असे शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. परंतु आपल्या दैनंदिन जीवनात, आपण ज्यांची पक्की खात्री बाळगू शकतो अशा फार कमी गोष्टी असतात. जीवनात कधी काय घडेल हे सांगता येत नसल्यामुळे अशी कोणती गोष्ट आहे का, की जिच्याविषयी आपण निश्चित विचार करू शकतो, असा प्रश्न पुष्कळदा आपल्या मनात येतो. शंका, अनिश्चितता जीवनाचा जणू एक भागच बनल्या आहेत.
आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित व आनंदी राहावे अशी पुष्कळ लोक अपेक्षा करतात हे समजण्याजोगे आहे. यासाठी ते सहसा, पैसा आणि भौतिक वस्तू मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात ज्या त्यांच्यामते त्यांना सुखी आणि सुरक्षित ठेवू शकतील. परंतु, एखादा भूकंप, एखादे वादळ, एखादा अपघात किंवा एखादा हिंसक गुन्हा यांमुळे अशा मालमत्तेचा क्षणार्धात नाश होऊ शकतो. गंभीर आजारपण, घटस्फोट किंवा बेकारी यांमुळे लोकांचे जीवन एका रात्रीत बदलू शकते. कबूल आहे, की तुमच्यावर कदाचित असे संकट कोसळणार नाही. तरीपण, कोणत्याही प्रसंगी काही तरी भयंकर घडू शकते ही केवळ कल्पनासुद्धा मन अस्वस्थ आणि खिन्न करू शकते. इतक्यावरच हे थांबत नाही.
अनिश्चतता हा शंका या शब्दाचा समानार्थी आहे आणि एका शब्दकोशात “शंका” या शब्दाचा अर्थ, निर्णय घेताना बहुतेकदा अडखळण ठरणारी विश्वासाबद्दलची किंवा मताबद्दलची अनिश्चितता असा सांगण्यात आला आहे. तसेच, मॅनेजिंग युअर माईन्ड या पुस्तकानुसार, “एखाद्या महत्त्वपूर्ण विषयाबद्दलची अनिश्चितता, चिंता आणि काळजीचे प्रमुख कारण ठरू शकते.” जिचे निरसन झाले नाही अशा शंकेमुळे चिंता, चिडचिडेपणा आणि राग उत्पन्न होऊ शकतो. होय, काय होईल, काय होणार नाही याविषयी चिंता केल्यामुळे आपल्या मनावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतात.
यामुळे काही लोक दुसरी टोकाची भूमिका घेतात. ते त्या ब्राझीलियन युवकाप्रमाणे असतात ज्याने म्हटले: “उद्या काय होणार आहे याची चिंता आज कशाला करायची? आजचं आज पाहू आणि उद्याचं उद्या.” “चला, आपण खाऊ, पिऊ” अशा दैववादी मनोवृत्तीमुळे केवळ निराशा, दुःख आणि सरतेशेवटी मृत्यू हेच पदरी पडू शकते. (१ करिंथकर १५:३२) त्यापेक्षा, “तो जागा बदलणाऱ्या छायेसारखा बदलणारा नाही” असे ज्याच्याविषयी म्हटले आहे त्या आपल्या निर्माणकर्त्या यहोवा देवाकडे वळणे सर्वात उत्तम ठरू शकते. (याकोब १:१७, सुबोध भाषांतर) आपण देवाचे वचन बायबल याचे परीक्षण केल्यास आपल्याला त्यात जीवनाच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल. अशा अनिश्चिततेच्या भावना मनात का येतात हे समजण्यासाठी देखील देवाचे वचन आपल्याला मदत करू शकेल.
अनिश्चिततेची कारणे
शास्त्रवचने आपल्याला जीवनाबद्दल वास्तविक दृष्टिकोन बाळगण्यास तसेच अनिश्चित परिस्थिती उद्भवते तेव्हा उचित मनोवृत्ती विकसित करण्यास मदत करतात. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक हुद्दा, बौद्धिकता, चांगले आरोग्य, वगैरे यामुळे काही प्रमाणात सुरक्षितता मिळू शकत असली तरी, या गोष्टी बदलणार नाहीत असा विश्वास करून चालणार नाही किंवा आपण सुखाने जीवन व्यतीत करू अशीही अपेक्षा करून चालणार नाही. सुज्ञ राजा शलमोन याने म्हटले: “वेगवानांसच शर्यतीत यश व वीरांसच युद्धांत विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही.” का नाही? कारण “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” म्हणूनच शलमोनाने पुढे अशी ताकीद दिली: “अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, पाशांत अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यांत ते सापडतात.”—उपदेशक ९:११, १२, पं.र.भा.
येशू ख्रिस्तही, एका अशा काळाविषयी बोलला जेव्हा एका संपूर्ण पिढीवर चिंता आणि अनिश्चिततेचे सावट पसरलेले असेल. स्पष्ट भाषेत तो म्हणाला: “सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशांतील बळे डळमळतील.” परंतु त्याने आजच्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांसाठी एका आशेविषयीही सांगितले: “ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” (लूक २१:२५, २६, ३१) अनिश्चित भवितव्याविषयी मनात भीती बाळगण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवल्याने आपल्याला या अनिश्चित जगाच्या पलीकडे अर्थात एका अद्भुत, सुरक्षित भवितव्याकडे पाहण्यास मदत होईल.
“आशेविषयीची पूर्ण खातरी” बाळगणे
आपण जे काही ऐकतो, वाचतो किंवा पाहतो याविषयी पूर्ण खात्री बाळगू शकत नाही परंतु आपला निर्माणकर्ता याच्यावर मात्र भरवसा ठेवण्यासाठी आपल्याजवळ ठोस कारणे आहेत. तो केवळ सर्वश्रेष्ठच नव्हे तर आपल्या पृथ्वीवरील मुलांची काळजी वाहणारा प्रेमळ पिता देखील आहे. आपल्या अभिवचनाविषयी तो म्हणतो: “ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.
येशू ख्रिस्ताने देवाविषयीचे सत्य शिकवले आणि ज्यांनी त्याची शिकवण ऐकली त्यांनी ती पूर्ण खात्रीनिशी स्वीकारली. उदाहरणार्थ, प्रामाणिक अंतःकरण असलेल्या शोमरोनी लोकांच्या एका समूहाने, येशूची शिकवण पहिल्यांदा ऐकणाऱ्या स्त्रीला सांगितले: “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही; कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे.” (योहान ४:४२) तसेच, सुरक्षितता नसलेल्या या जगात राहत असतानाही आज आपण काय विश्वास करू शकतो याबद्दल मनात कसलीही शंका बाळगण्याची गरज नाही.
धार्मिक विश्वासांच्या बाबतीत, पुष्कळ लोकांचा असा समज आहे की धार्मिक विश्वास समजून घेण्यापेक्षा फक्त ते मानणे पुरेसे आहे. परंतु बायबलचा एक लेखक लूक याचा असा विश्वास नव्हता. त्याने संशोधन केले आणि अचूक माहिती दिली जेणेकरून इतरांना त्याने जे काही लिहून ठेवले ते ‘निश्चितपणे समजेल.’ (लूक १:४) आपल्यासारखा धार्मिक विश्वास न करणाऱ्या आपल्या कौटुंबिक सदस्यांना किंवा मित्रजनांना आपल्याबद्दल अशी काळजी वाटेल, की आपला भ्रमनिरास होईल किंवा आपण निराश होऊ; त्यामुळे आपण आपल्या विश्वासाच्या संबंधाने उत्तर देण्यास तयार असले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) आपण जो काही विश्वास करतो, तो का करतो याचे अचूक कारण समजल्यावरच आपण इतरांनाही देवावर विश्वास करण्यास मदत करू शकू. बायबलमध्ये यहोवाचे अशाप्रकारे वर्णन करण्यात आले आहे: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४.
शेवटले वाक्य, “तो न्यायी व सरळ आहे” याचा जरा विचार करा. याची खात्री बाळगण्यासाठी आपल्याजवळ काय पुरावा आहे? या वास्तविकतेविषयी प्रेषित पेत्राची पूर्ण खात्री होती. एका रोमी शताधिपतीला आणि त्याच्या घराण्याला त्याने असे सांगितले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) पेत्र असे म्हणू शकला होता कारण त्याने नुकतेच देवाचे एक कार्य पाहिले होते; त्याने पाहिले, की पूर्वी अशुद्ध व अस्वीकारयोग्य समजल्या जाणाऱ्या एका विदेशी कुटुंबाला देवाने स्वीकारले होते. पृथ्वीवरील २३० पेक्षा अधिक देशांतून आलेल्या आणि पूर्वीची वाईट जीवनशैली सोडून देऊन धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यास सुरवात केलेल्या साठ लाखांपेक्षा अधिक असलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा पेत्राप्रमाणे आपलीही, देवाच्या निःपक्षपातीपणाची आणि त्याच्या धार्मिकतेची खात्री पटते.—प्रकटीकरण ७:९; यशया २:२-४.
आपण धर्मवेडे किंवा अडेलतट्टू नव्हे तर खऱ्या ख्रिश्चनांप्रमाणे नम्र आणि समजूतदार होऊ इच्छितो. पण, आपण जो काही विश्वास करतो आणि भवितव्यात आपण ज्याची अपेक्षा करतो त्याबद्दल आपल्या मनात कसलीच शंका नाही. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना असे लिहिले: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी.” (इब्री लोकांस ६:११) त्याचप्रमाणे, बायबलमधील सुवार्तेमुळे आपल्याला “आशेविषयीची पूर्ण खातरी” मिळाली आहे. देवाच्या वचनावर आधारित असलेल्या या आशेमुळे “निराशा” होत नाही असे पौलाने म्हटले.—रोमकर ५:५, मराठी कॉमन लँग्वेज.
शिवाय, आपली ही पूर्ण खात्री आहे की इतरांना बायबलमधून सुवार्ता शिकवल्याने त्यांनाही अर्थातच आध्यात्मिक, भावनिक व शारीरिक सुरक्षितता मिळू शकेल. आपणही पौलाप्रमाणे असे म्हणू: “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली.”—१ थेस्सलनीकाकर १:५.
आध्यात्मिक सुरक्षिततेमुळे आताही आशीर्वाद मिळतात
आज आपण संपूर्ण सुरक्षिततेची अपेक्षा करू शकत नसलो तरी, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्याला निदान काही प्रमाणात स्थिर व सुरक्षित जीवन जगण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, सभांमध्ये ख्रिस्ती मंडळीत नियमित सहवास ठेवल्याने स्थैर्य लाभते कारण या सभांमध्ये आपल्याला योग्य आणि तर्कशुद्ध तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जातात. पौलाने लिहिले: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.” (१ तीमथ्य ६:१७) तात्पुरत्या काळासाठी राहणाऱ्या भौतिक गोष्टींवर किंवा सुखावर भरवसा ठेवण्यापेक्षा यहोवावर भरवसा ठेवण्यास शिकल्याने पुष्कळ जण स्वतःला, अशा भौतिक गोष्टींवर भरवसा ठेवल्यामुळे होणाऱ्या चिंतांपासून व निराशेपासून मुक्त करू शकले आहेत.—मत्तय ६:१९-२१.
मंडळीत, आपले प्रेमळ बंधुभगिनी आहेत जे आपल्याला विविध मार्गांनी साहाय्य आणि आधार देतात. प्रेषित पौलावर आणि त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या सोबत्यांवर सेवेत असताना एकदा ‘अतिशय दडपण’ आले आणि ‘आपण जगतो की मरतो असे’ त्यांना वाटले होते. अशा वेळी पौलाला साहाय्य कोठून मिळाले? देवावरील त्याचा विश्वास डगमगला नाही. त्याला मदत करण्यास धावून आलेल्या सहख्रिश्चनांनी त्याला उत्तेजन व सांत्वन दिले. (२ करिंथकर १:८, ९; ७:५-७) आज नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटे कोसळतात तेव्हा नेहमी, घटनास्थळी पहिले पोहंचणारे आपले ख्रिस्ती बांधव असतात जे सहख्रिश्चनांना व गरज असलेल्या इतरांना भौतिक आणि आध्यात्मिक मदत देतात.
जीवनाच्या अनिश्चिततांचा सामना करण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे प्रार्थना. अनपेक्षित दबावाखाली असताना आपण नेहमी आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला हाक मारू शकतो. “परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे.” (स्तोत्र ९:९) पालक कधीकधी आपल्या पाल्याची सुरक्षा करण्यात उणे पडू शकतात. परंतु, देव आपल्याला, आपल्या मनात असलेल्या भीतींचा व अनिश्चिततेच्या भावनांचा सामना करण्यास मदत करण्याकरता सदैव तयार आहे. प्रार्थनेद्वारे यहोवावर आपल्या सर्व चिंता टाकून आपण ही खात्री बाळगू शकतो, की ‘आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास तो समर्थ’ आहे.—इफिसकर ३:२०.
तुम्ही देवाला नियमित प्रार्थना करता का? तुमच्या प्रार्थना देव ऐकतो अशी तुम्हाला खात्री आहे का? साओ पाऊलो मधील एका लहान मुलीने म्हटले: “मी देवाला प्रार्थना केली पाहिजे असं माझ्या आईनं मला सांगितलं. पण मी स्वतःला विचारलं: ‘ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीबरोबर मी का बोलावं?’ परंतु नीतिसूत्रे १८:१० या वचनानं मला हे समजण्यास मदत केली की आपल्याला देवाच्या साहाय्याची आवश्यकता आहे आणि प्रार्थनेद्वारे आपण त्याच्याशी बोललं पाहिजे.” त्या वचनात म्हटले आहे: “परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” पण समजा यहोवाशी प्रार्थनेद्वारे बोलण्याचा आपला रीवाजच नसेल तर आपण त्याच्यावर भरवसा, विश्वास कसा काय ठेवू शकू? आध्यात्मिक सुरक्षिततेचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपण, मनापासून प्रार्थना करण्याची स्वतःला सवय लावली पाहिजे. येशूने म्हटले: “तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३६.
आणखी एक गोष्ट आहे ज्याच्याविषयी आपण पक्की खात्री बाळगू शकतो व ती आहे देवाच्या राज्याची आशा. दानीएल २:४४ मधील शब्दांकडे लक्ष द्या: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” ही आशा ठोस आहे, तिची आपण खात्री बाळगू शकतो. मानव दिलेली वचने पूर्ण करत नाहीत परंतु यहोवाच्या वचनांवर आपण नेहमी विश्वास ठेवू शकतो. यहोवा हा, आपण ज्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही अशाप्रकारचा देव नाही तर तो एका दुर्गाप्रमाणे स्थिर आहे ज्याच्यावर आपण भरवसा ठेवू शकतो. दावीदाप्रमाणे आपल्यालाही असे वाटेल: “माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करितो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला रक्षितोस.”—२ शमुवेल २२:३.
आधी ज्याचा उल्लेख करण्यात आला होता त्या मॅनेजिंग युअर माईन्ड नावाच्या पुस्तकात असे म्हटले होते: “एक व्यक्ती वाईट गोष्टींचा जितका विचार करत राहते तितक्या त्या तिच्या मनात पक्क्या होत राहतात आणि त्यांचा सामना कसा करायचा हे समजण्यास तिला त्याहीपेक्षा कठीण वाटते.” तेव्हा, जगाच्या चिंता आणि शंका आपण आपल्या डोक्यावर का म्हणून वागवाव्यात? जगातील अनिश्चित गोष्टींऐवजी देवाने दिलेल्या पक्क्या वचनांवर आपण आपला भरवसा ठेवू या. यहोवाने दिलेल्या त्याच्या पक्क्या अभिवचनांवर भक्कम विश्वास ठेवल्याने आपण ही खात्री बाळगू शकतो: “त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही.”—रोमकर १०:११.
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
देवाचे वचन भवितव्यासाठी मानवजातीकरता आशीर्वादांची खात्री देते
[३० पानांवरील संक्षिप्त आशय]
“त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही”
[३१ पानांवरील चित्र]
राज्याच्या सुवार्तेमुळे लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना उत्पन्न होते