तुमची ‘वाट पाहत राहण्याची’ वृत्ती आहे का?
“पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:११, १२.
१, २. यहोवाच्या दिवसाची ‘वाट पाहण्याची’ तुलना आपण कशाशी करू शकतो?
एका कुटुंबाने काहीजणांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे आणि ते त्या पाहुण्यांची वाट पाहात आहेत अशी कल्पना करा. त्यांच्या येण्याची ठरलेली वेळ होत आली आहे. सगळा स्वयंपाक व्यवस्थित झाला की नाही याची पत्नी खात्री करत आहे. पती व मुले बाकीची व्यवस्था पाहण्यात गर्क आहेत. सर्वजण उत्साहात आहेत. होय, पाहुण्यांच्या आगमनाची आणि त्यानंतर स्वादिष्ट भोजन व गप्पागोष्टी करण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
२ ख्रिस्ती या नात्याने आपण याहूनही महत्त्वपूर्ण अशा घटनेची वाट पाहात आहोत. ती घटना कोणती? अर्थातच, आपण ‘यहोवाच्या दिवसाची’ वाट पाहात आहोत. तो दिवस येईपर्यंत आपण संदेष्टा मीखा याच्याप्रमाणे झालो पाहिजे, त्याने म्हटले: “मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन.” (मीखा ७:७) याचा अर्थ आपल्याला काहीच करायचे नाही असा होतो का? नाही. बरेच काम करावयाचे आहे.
३. दुसरे पेत्र ३:११, १२ अनुसार, ख्रिश्चनांनी कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
३ प्रेषित पेत्र आपल्याला प्रतीक्षा करत असताना योग्य मनोवृत्ती ठेवण्यास मदत करतो. तो म्हणतो: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) या विधानातून, आपण कशाप्रकारचे लोक असावे यासंबंधी पेत्र संदेह व्यक्त करत नाही हे लक्षात घ्या. त्याच्या दोन प्रेरित पत्रांत त्याने ख्रिस्ती लोकांनी कसे असावे याविषयी वर्णन केले आहे. त्याने त्यांना “पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत” राहण्याचा सल्ला देखील दिला. येशू ख्रिस्ताने “ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह” देऊन आता सुमारे ३० वर्षे होत आली होती पण ख्रिश्चनांनी सावध राहणे सोडायचे नव्हते. (मत्तय २४:३) त्यांनी यहोवाच्या दिवसाची ‘वाट पाहायची व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करायची’ होती.
४. ‘देवाचा दिवस लवकर यावा म्हणून खटपट करण्याचा’ काय अर्थ होतो?
४ अर्थात, आपण खटपट केल्यामुळे यहोवाचा दिवस लवकर येईल असा याचा अर्थ होत नाही. येशू ख्रिस्त येऊन आपल्या पित्याच्या शत्रूंचा न्यायनिवाडा करेल त्या “दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” देखील आपल्याला “ठाऊक नाही.” (मत्तय २४:३६; २५:१३) एका संदर्भ ग्रंथात असे स्पष्टीकरण दिले आहे की ‘लवकर यावा म्हणून खटपट करणे’ याचा अर्थ “‘घाई करणे’ असा होतो आणि त्याअर्थी हे क्रियापद ‘आवेशी, क्रियाशील किंवा कशाविषयी अत्यंत आस्थेवाईक’ असण्याशी संबंधित आहे.” तर पेत्र आपल्या सहविश्वासू बांधवांना यहोवाचा दिवस येण्याची उत्कट इच्छा बाळगण्याचे प्रोत्साहन देत होता. त्या दिवसाविषयी सदोदित जाणीव बाळगण्याद्वारे ते असे करू शकत होते. (२ पेत्र ३:१२) “परमेश्वराचा महान व भयंकर दिवस” इतका जवळ आला असताना, आपणही तीच मनोवृत्ती बाळगली पाहिजे.—योएल २:३१.
‘पवित्र वर्तणुकीत राहून’ वाट पाहणे
५. “देवाचा दिवस” पाहण्याची आपण उत्कट इच्छा बाळगतो हे आपण कसे दाखवू शकतो?
५ आपल्याला यहोवाच्या दिवसातून बचावण्याची उत्कट इच्छा असल्यास, ‘पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहण्याद्वारे’ आपण हे व्यक्त करू. ‘पवित्र वर्तणूक’ ही संज्ञा आपल्याला कदाचित पेत्राच्या या सल्ल्याची आठवण करून देईल: “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’”—१ पेत्र १:१४-१६.
६. पवित्र होण्याकरता आपण काय केले पाहिजे?
६ पवित्र होण्याकरता आपण शारीरिक, मानसिक, नैतिक व आध्यात्मिकरीत्या शुद्ध राहिले पाहिजे. यहोवाचे नाव धारण करणाऱ्या व्यक्ती या नात्याने स्वतःला शुद्ध राखण्याद्वारे आपण ‘यहोवाच्या दिवसाची’ तयारी करत आहोत का? अशी शुद्धता राखणे सोपे नाही कारण जगाचे नैतिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहेत. (१ करिंथकर ७:३१; २ तीमथ्य ३:१३) आपल्या व जगाच्या नैतिक स्तरांतील अंतर आपल्याला वाढताना दिसत आहे का? नसल्यास, ही चिंतेची बाब आहे. आपले वैयक्तिक स्तर जगापेक्षा उच्च दर्जाचे असले तरीसुद्धा, ते दिवसेंदिवस खालावत असल्याचे आपल्याला दिसते का? तसे असल्यास, देवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काही उचित पावले उचलावी लागतील.
७, ८. (अ) ‘पवित्र वर्तणुकीत’ राहण्याच्या महत्त्वाचा आपल्याला कशाप्रकारे विसर पडू शकतो? (ब) सुधारणेकरता कोणती पावले उचलावी लागू शकतात?
७ इंटरनेटवर अश्लील साहित्य उपलब्ध झाल्यापासून, शिवाय, ते अगदी एकांतातही पाहणे शक्य असल्यामुळे, पूर्वी असे अनैतिक साहित्य ज्यांच्या अवाक्याबाहेर होते त्यांना देखील एक वैद्यकीय डॉक्टरच्या शब्दांत, “वासनातृप्तीच्या अमर्याद संधी” प्राप्त झाल्या आहेत. इंटरनेटवरील अशा अनैतिक साइट्स जर आपण पाहत आहोत, तर निश्चितच आपण “अशुद्ध वस्तुला शिवू नका” या बायबलच्या आज्ञेचे उल्लंघन करतो. (यशया ५२:११) मग आपण “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत” आहोत असे म्हणता येईल का? की अशा घृणास्पद साहित्याने आपले मन दूषित केले तरी स्वतःला शुद्ध करण्याकरता अजून बराच वेळ आपल्याजवळ आहे असा युक्तिवाद करून, मनातल्या मनात आपण तो दिवस पुढे ढकलत आहोत? यासंबंधाने आपल्याला समस्या असल्यास, “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे,” अशी लवकरात लवकर यहोवाला विनवणी करणे किती अत्यावश्यक आहे!—स्तोत्र ११९:३७.
८ यहोवाच्या साक्षीदारांपैकी बहुतेकजण आणि केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलेसुद्धा देवाच्या उच्च नैतिक स्तरांचे पालन करतात आणि अशारितीने जगाच्या अनैतिक मोहांना बळी पडण्याचे टाळतात. आपल्या या काळाची निकड ओळखून आणि “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल” या पेत्राच्या ताकिदीनुसार ते “पवित्र वर्तणुकीत” टिकून राहतात. (२ पेत्र ३:१०) त्यांच्या कृतींद्वारे ते दाखवून देतात की ते “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत” आहेत.a
“सुभक्तीत” राहून वाट पाहा
९. सुभक्तीने आपल्याला काय करण्याची प्रेरणा दिली पाहिजे?
९ यहोवाचा दिवस सदोदित मनात बाळगायचा असेल, तर “सुभक्तीत” विलीन राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. “सुभक्तीत” राहण्याचा अर्थ देवाबद्दल आदर बाळगून त्याला जे आवडते त्याप्रमाणे करण्यास प्रवृत्त होणे असा होतो. यहोवाबद्दल वाटणारी निष्ठावान प्रीती ही अशा सुभक्तीशील वर्तणुकीमागील प्रेरक शक्ती आहे. देवाची इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) तर मग लोकांना यहोवाबद्दल शिकण्यास व त्याचे अनुकरण करण्यास मदत करण्याचा होईल तितका प्रयत्न करण्याची, आपल्या सुभक्तीशील मनोवृत्तीने आपल्याला प्रेरणा देऊ नये का?—इफिसकर ५:१.
१०. ‘धनाच्या भुलविणाऱ्या शक्तीपासून’ आपण का सांभाळले पाहिजे?
१० आपण देवाच्या राज्याला जीवनात प्राधान्य दिल्यास, आपोआपच आपले जीवन सुभक्तीशील कार्यांनी परिपूर्ण होईल. (मत्तय ६:३३) याचा अर्थ, भौतिक गोष्टींविषयी आपण संतुलित मनोवृत्ती बाळगली पाहिजे. येशूने ताकीद दिली: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) आपण कधी पैशाच्या लोभामुळे अंधळे होऊ असे कदाचित आपल्याला स्वतःला वाटत नसेल, पण आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे, की ‘या व्यवस्थीकरणाची चिंता व धनाची भुलवणारी शक्ती’ यांमुळे देवाच्या ‘वचनाची वाढ खुंटण्याची’ शक्यता आहे. (मत्तय १३:२२, NW) उदरनिर्वाह चालवणे कदाचित सोपे नसेल. जगाच्या काही भागांत बरेच लोक असा निष्कर्ष काढतात की उत्तम दर्जाचे जीवन जगायचे असेल तर श्रीमंत देशात स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. आणि या प्रयत्नात ते कधीकधी कित्येक वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. देवाच्या लोकांतही काहींची अशी विचारधारा आहे. परदेशी जाऊन कदाचित ते आपल्या कुटुंबाला सर्व आधुनिक सुखसोयी पुरवू शकतील. पण त्यांच्या प्रियजनांच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल काय? कुटुंबात पुढाकार घेणारी योग्य व्यक्ती नसल्यामुळे यहोवाच्या दिवसातून बचावण्याइतपत आध्यात्मिकता त्यांच्याजवळ असेल का?
११. देशांतर केलेल्या एका कामगाराने कशाप्रकारे हे दाखवले की धन कमवण्यापेक्षा सुभक्ती आचरणे अधिक महत्त्वाचे आहे?
११ फिलिपाईन्सहून देशांतर करून आलेल्या एका कामगाराला जपानमध्ये यहोवाच्या साक्षीदारांकडून बायबलचे सत्य शिकायला मिळाले. मस्तकपदाच्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्यांविषयी शिकल्यानंतर त्याला जाणीव झाली की आपण आपल्या कुटुंबियांना यहोवाचे उपासक होण्याकरता मदत केली पाहिजे. (१ करिंथकर ११:३) फिलिपाईन्समध्ये असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्या नव्यानेच गवसलेल्या विश्वासाचा कडाडून विरोध केला; घरी परतून आपल्या कुटुंबाला बायबल आधारित विश्वासांविषयी शिकवण्याऐवजी त्याने तेथेच राहून कुटुंबाकरता पैसा पाठवत राहावा अशी तिची इच्छा होती. पण त्याने मात्र काळाची निकड ओळखून आपल्या प्रियजनांबद्दल असलेल्या प्रेमाखातर घरी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल सहनशीलता दाखवून त्यांच्याप्रती अशाप्रकारे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम प्रतिफळ त्याला मिळाले. कालांतराने त्याचे कुटुंब खऱ्या उपासनेत एकजूट झाले आणि त्याच्या पत्नीने पूर्ण वेळेची सेवा देखील स्वीकारली.
१२. आपण आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्राधान्य का दिले पाहिजे?
१२ आपली स्थिती एका आग लागलेल्या इमारतीतील लोकांसारखी आहे. आग लागलेली ही इमारत कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत असताना, इकडेतिकडे धावपळ करून वस्तू गोळा करणे शहाणपणाचे ठरेल का? त्याऐवजी आपला स्वतःचा, आपल्या कुटुंबियांचा आणि इमारतीत सापडलेल्या इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे नाही का? हे दुष्ट व्यवस्थीकरण अतिशय जलदगतीने सर्वनाशाकडे वाटचाल करत आहे आणि आपल्याकरता हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. हे ओळखून निश्चितच आपण आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे आणि राज्य प्रचाराच्या जीवनदायक कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे.—१ तीमथ्य ४:१६.
“निष्कलंक” असण्याची गरज
१३. यहोवाचा दिवस येईल तेव्हा आपण कोणत्या स्थितीत असावे?
१३ वाट पाहत राहण्याच्या महत्त्वावर जोर देऊन पेत्र म्हणतो: “म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही [देवाच्या] दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.” (२ पेत्र ३:१४) पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत लवलीन राहण्याचा सल्ला देऊन पेत्र तेवढ्यावर थांबत नाही. तर येशूच्या मौल्यवान रक्ताने शुद्ध केलेले असे यहोवाला आढळावे या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या महत्त्वावर तो जोर देतो. (प्रकटीकरण ७:९, १४) यासाठी आवश्यक आहे की एका व्यक्तीने येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवावा आणि यहोवाचा समर्पित व बाप्तिस्मा घेतलेला सेवक बनावे.
१४. “निष्कलंक” राहण्यात काय समाविष्ट आहे?
१४ आपण देवाला “निष्कलंक” असे आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन पेत्र देतो. आपण आपले वस्त्र, अर्थात आपले ख्रिस्ती आचरण व व्यक्तिमत्त्व निष्कलंक व जगाच्या कोणत्याही डागापासून मुक्त ठेवतो का? आपल्या कपड्यांवर एखादा डाग दिसल्यास, आपण लगेच तो काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या कपड्यांवर डाग लागला तर तो काढून टाकण्याचा आपण अधिकच काळजीपूर्वक प्रयत्न करतो. त्याचप्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वातील अथवा आचरणातील एखाद्या दोषामुळे आपल्या ख्रिस्ती वस्त्रांवर लाक्षणिकरित्या डाग पडतो तेव्हा आपण तो काढून टाकण्याकरता तितकाच प्रयत्न करतो का?
१५. (अ) इस्राएल लोकांना त्यांच्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावण्यास का सांगण्यात आले होते? (ब) यहोवाचे सध्याच्या काळातील सेवक वेगळे का दिसून येतात?
१५ इस्राएल लोकांना आपल्या “वस्त्रांच्या टोकांना गोंडे” लावून “प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत” लावण्याची आज्ञा देण्यात आली होती. का? जेणेकरून त्यांनी यहोवाच्या आज्ञा आठवणीत ठेवाव्यात, त्यांचे पालन करावे आणि आपल्या देवाच्या नजरेत “पवित्र व्हावे.” (गणना १५:३८-४०) आजच्या काळातील यहोवाच्या सेवकांच्या भूमिकेत आपण जगापासून वेगळे दिसून येतो कारण आपण देवाच्या नियमांचे व तत्वांचे पालन करतो. उदाहरणार्थ, आपण नैतिकरित्या शुद्ध राहतो, रक्ताच्या पावित्र्याचा आदर करतो आणि सर्व प्रकारची मूर्तिपूजा टाळतो. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) स्वतःला निष्कलंक ठेवण्याच्या आपल्या दृढ संकल्पाबद्दल अनेकजण आपला आदर करतात.—याकोब १:२७.
“निर्दोष” असणे आवश्यक
१६. “निर्दोष” राहण्यात काय सामील आहे?
१६ आपण “निर्दोष” आढळावे असेही पेत्र म्हणतो. हे कसे शक्य आहे? डाग लागला तर तो पुसून टाकता येतो, किंवा तो काढून टाकता येतो. पण दोषी असणे अधिक गंभीर असे काहीतरी सूचित करते. ते आतून काहीतरी बिघाड असल्याचे सूचित करते. प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील सह ख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता.” (फिलिप्पैकर २:१४, १५) या मार्गदर्शनाचे पालन केल्यास आपण कुरकूर व वादविवाद करण्याची प्रवृत्ती टाळू आणि शुद्ध हेतूने देवाची सेवा करू. यहोवाबद्दल व आपल्या शेजाऱ्यांबद्दल असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आपण ‘राज्याची सुवार्ता’ घोषित करू. (मत्तय २२:३५–४०; २४:१४) शिवाय, आपण इतरांना देवाविषयी व त्याचे वचन बायबल याविषयी शिकण्यास मदत करण्याकरता स्वेच्छेने इतका वेळ व शक्ती का खर्च करतो हे सर्वसाधारण लोकांना जरी समजत नसले तरीसुद्धा आपण सुवार्तेची घोषणा करत राहू.
१७. ख्रिस्ती मंडळीतील विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करताना आपला हेतू काय असावा?
१७ “निर्दोष” आढळावे म्हणून आपण कोणतेही कार्य करताना आपले मूळ हेतू तपासून पाहतो. केवळ आपला स्वार्थ पाहण्याची, उदाहरणार्थ, धन व सत्ता मिळवण्यासाठी झटण्याची जगिक प्रवृत्ती आपण त्यागली आहे. ख्रिस्ती मंडळीत विशेषाधिकार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला तरी तो निष्कपट मनाने आणि यहोवाबद्दल व इतरांबद्दल असलेल्या प्रेमाने प्रवृत्त होऊनच करावा. आध्यात्मिक मनोवृत्तीचे पुरुष आनंदाने आणि यहोवाची व आपल्या सहविश्वासू बांधवांची सेवा करण्याच्या नम्र इच्छेने ‘अध्यक्षाचे काम करू पाहतात’ तेव्हा हे सर्वांकरता आनंददायक ठरते. (१ तीमथ्य ३:१, २; २ करिंथकर १:२४) तसेच जे वडिलांच्या भूमिकेत सेवा करण्याच्या योग्यतेचे आहेत ते देखील ‘देवाच्या कळपाचे पालन संतोषाने करतात. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करतात. त्यांच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते असे ते होतात.’—१ पेत्र ५:१-४.
“शांतीत” असणे आवश्यक
१८. यहोवाच्या साक्षीदारांचे कोणते गुण सुविख्यात आहेत?
१८ शेवटी, पेत्र आपल्याला “शांतीत” असलेले आढळावे असा सल्ला देतो. ही अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपले यहोवासोबत व आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतीचे संबंध असले पाहिजेत. पेत्र वारंवार “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति” करण्याच्या व आपल्या सहख्रिस्ती बांधवांसोबत शांतीचे संबंध राखण्याच्या महत्त्वावर जोर देतो. (१ पेत्र २:१७; ३:१०, ११; ४:८; २ पेत्र १:५-७) शांती राखण्याकरता आपसांत प्रीति असणे आवश्यक आहे. (योहान १३:३४, ३५; इफिसकर ४:१, २) खासकरून आपली आंतरराष्ट्रीय अधिवेशने होतात तेव्हा ही प्रीती व शांती स्पष्ट दिसून येते. १९९९ साली कोस्टा रिका येथे अधिवेशन झाले तेव्हा, विमानतळावर अनेक स्थानिक साक्षीदारांनी अधिवेशनाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली. जमलेल्या गर्दीमुळे आपले दुकान लोकांना दिसणार नाही व धंद्यावर परिणाम होईल असे वाटून एक दुकानदार चांगलाच चिडला. पण दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या पाहुण्यांना देण्यात आलेले उत्साही स्वागत पाहून व स्थानिक साक्षीदार या पाहुण्यांना ओळखत नव्हते तरीसुद्धा त्यांनी त्यांच्याप्रती दाखवलेले प्रेम व त्यांच्यातील शांती पाहून तो प्रभावित झाला. शेवटल्या दिवशी तो देखील स्वागत करण्यास पुढे आला आणि त्याने बायबल अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली.
१९. आपल्या सहविश्वासू बांधवांसोबत शांतीसंबंध कायम राखणे का महत्त्वाचे आहे?
१९ आपल्या आध्यात्मिक बंधू भगिनींसोबत शांतीचे संबंध राखण्याचा आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत याचा, आपण यहोवाच्या दिवसाची व त्याच्या प्रतिज्ञात नव्या जगाची किती आतुरतेने वाट पाहात आहोत यावर परिणाम होऊ शकतो. (स्तोत्र ३७:११; २ पेत्र ३:१३) समजा एखाद्या सहविश्वासू बांधवासोबत शांतीसंबंध राखणे आपल्याला कठीण वाटते. तर मग नव्या जगात त्या बांधवासोबत शांतीने नांदण्याची आपण कल्पना करू शकतो का? एखाद्या बांधवाला आपल्याविरुद्ध काही असल्यास, आपण लवकरात लवकर ‘त्याच्याबरोबर समेट केला पाहिजे.’ (मत्तय ५:२३, २४) यहोवासोबत शांती कायम राखण्याकरता असे करणे महत्त्वाचे आहे.—स्तोत्र ३५:२७; १ योहान ४:२०.
२०. ‘वाट पाहत राहण्याची’ मनोवृत्ती कोणत्या मार्गांनी दिसून आली पाहिजे?
२० आपण वैयक्तिकरित्या ‘देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत’ आहोत का? या अनैतिक जगात पवित्र राहण्याद्वारे आपण दुष्टाईचा अंत पाहण्याची आपल्याला मनस्वी इच्छा असल्याचे दाखवतो. शिवाय, यहोवाचा दिवस येण्याची व त्याच्या राज्यात जगण्याची आपली उत्कट लालसा आपल्या सुभक्तीपूर्ण कृत्यांवरून दिसून येते. आणि एका शांतीपूर्ण नव्या जगात राहण्याची आपली आकांक्षा आज आपल्या सहविश्वासू बांधवांसोबत शांती संबंध कायम राखण्याद्वारे दिसून येते. असे करण्याद्वारे आपण दाखवतो की आपली ‘वाट पाहत राहण्याची’ मनोवृत्ती आहे आणि आपण “[देवाचा] दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत” आहोत.
[तळटीप]
a उदाहरणांकरता टेहळणी बुरूज, जानेवारी १, २००० च्या अंकातील पृष्ठ १६ आणि १९९७ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठ ५१ वर पाहा.
तुम्हाला आठवते का?
• “[देवाचा] दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत” राहण्याचा काय अर्थ होतो?
• आपल्या आचरणाच्या संदर्भात ‘वाट पाहण्याची’ मनोवृत्ती कशी दिसून येते?
• ‘सुभक्ती’ का आवश्यक आहे?
• आपण यहोवाला “निष्कलंक, निर्दोष व शांतीत असलेले असे आढळावे” म्हणून काय केले पाहिजे?
[११ पानांवरील चित्र]
‘वाट पाहत राहण्याची’ मनोवृत्ती पवित्र वर्तणुकीतून व्यक्त होते
[१२ पानांवरील चित्रे]
राज्य प्रचाराचे कार्य जीवनदायक आहे
[१४ पानांवरील चित्र]
यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना, आपण इतरांसोबतही शांतीचे संबंध राखले पाहिजेत