वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ७/१५ पृ. ७-११
  • “तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करा
  • “निष्कलंक व निर्दोष” राहा
  • परीक्षांमधून बळ मिळवा
  • यहोवाच्या सेवेत आवेशी राहा
  • तुमची ‘वाट पाहत राहण्याची’ वृत्ती आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • धीरात सुभक्‍तीची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ७/१५ पृ. ७-११

“तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”

“तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून . . . तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:११.

१. पेत्राच्या दुसऱ्‍या पत्रातील सल्ला त्याच्या काळातील ख्रिश्‍चनांसाठी अगदी समयोचित होता असे का म्हणता येईल?

प्रेषित पेत्राने आपले दुसरे प्रेरित पत्र लिहिले तोपर्यंत ख्रिस्ती मंडळीने बराच छळ सोसला होता. असे असले तरी त्यांचा आवेश किंचितही कमी झाला नव्हता, की त्यांची प्रगती मंदावली नव्हती. त्यामुळे सैतानाने अशी एक शक्कल लढवली, जिचा यापूर्वीही त्याने अनेकदा यशस्वीपणे उपयोग केला होता. सैतानाने कोणती शक्कल लढवली? पेत्राने सांगितल्याप्रमाणे, ज्यांच्या “डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली आहे” आणि ज्यांचे “हृदय लोभाला सवकलेले आहे” अशा खोट्या शिक्षकांद्वारे सैतानाने देवाच्या लोकांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. (२ पेत्र २:१-३, १४; यहू. ४) म्हणूनच, पेत्राने लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात तो ख्रिश्‍चनांना शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहण्याचा आग्रहपूर्वक सल्ला देतो.

२. पेत्राच्या दुसऱ्‍या पत्रातील ३ ऱ्‍या अध्यायाचा रोख कशावर आहे, आणि आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

२ पेत्राने लिहिले: “मी ह्‍या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते; कारण मला ठाऊक आहे की, . . . मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे; आणि माझे निर्गमन झाल्यावरहि त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हास करिता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.” (२ पेत्र १:१३-१५) यावरून स्पष्ट होते, की आपला लवकरच मृत्यू होणार आहे याची पेत्राला जाणीव होती. पण, आपण गेल्यानंतरही आपल्या समयोचित सूचना लोकांच्या लक्षात राहाव्यात अशी त्याची इच्छा होती. आणि नेमके तसेच घडले. पेत्राने दिलेल्या सूचना बायबलमध्ये नमूद करण्यात आल्या आणि आज आपण सर्वच त्यांच्यापासून लाभ घेऊ शकतो. पेत्राच्या दुसऱ्‍या पत्रातील ३ रा अध्याय आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण त्याचा संपूर्ण रोख, सध्याच्या जगाच्या ‘शेवटल्या दिवसांवर’ व लाक्षणिक आकाशाच्या व पृथ्वीच्या नाशावर आहे. (२ पेत्र ३:३, ७, १०) त्यात पेत्र आपल्याला काय सल्ला देतो? आणि त्याच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपण यहोवाचे मन कसे आनंदित करू शकतो?

३, ४. (क) पेत्राने कोणते उद्‌गारार्थी विधान केले आणि आपल्याला कोणती ताकीद दिली? (ख) आता आपण कोणत्या मुद्द्‌यांचा बारकाईने विचार करणार आहोत?

३ सैतानाचे जग लयास जाईल हे सांगितल्यानंतर पेत्र म्हणतो: “म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून . . . तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) खरेतर, मूळ भाषेतील या वचनात पेत्र प्रश्‍न विचारत नव्हता, तर तो त्याच्या वाचकांचा उत्साह जागृत करणारे एक उद्‌गारार्थी विधान करत होता. पेत्राला याची जाणीव होती की, येणाऱ्‍या ‘सुडाच्या दिवसातून’ केवळ असेच लोक वाचतील जे यहोवाच्या इच्छेनुसार असलेली कार्ये करतात व देवाला संतुष्ट करणारे गुण आपल्या जीवनात प्रदर्शित करतात. (यश. ६१:२) म्हणूनच त्याने पुढे अशी ताकीद दिली: “तर प्रियजनहो, ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान्‌ लोकांच्या [खोट्या शिक्षकांच्या] भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.”—२ पेत्र ३:१७.

४ ज्यांना भविष्यातील घटनांविषयी ‘पूर्वीपासून कळाले’ होते अशा लोकांपैकी पेत्र देखील एक होता. त्यामुळे साहाजिकच त्याला हे माहीत होते, की शेवटल्या दिवसांत ख्रिश्‍चनांना देवाला एकनिष्ठ राहण्याच्या बाबतीत विशेष दक्षता बाळगावी लागेल. त्यांना असे का करावे लागेल याचे कारण प्रेषित योहानाने पुढे स्पष्ट केले. योहानाला झालेल्या दृष्टांतात त्याने, सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आल्याचे, तसेच तो “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” यांच्याविरुद्ध “अतिशय संतप्त” असल्याचे पाहिले. (प्रकटी. १२:९, १२, १७) पण, सैतानाने कितीही परीक्षा आणल्या तरी देवाचे निष्ठावान अभिषिक्‍त सेवक व ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेले त्यांचे विश्‍वासू सोबती विजयी ठरतील. (योहा. १०:१६) आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काय? त्या वेळी आपण देवाला एकनिष्ठ राहू का? होय, (१) देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करण्याचा, (२) नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या निष्कलंक व निर्दोष राहण्याचा व (३) जीवनात येणाऱ्‍या परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्याचा आपण प्रयत्न केला, तर या गोष्टी देवाला एकनिष्ठ राहण्यास आपले साहाय्य करतील. या मुद्द्‌यांचा आता आपण बारकाईने विचार करू या.

देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करा

५, ६. आपण कोणते चांगले गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि त्यासाठी “होईल तितका प्रयत्न” करणे का जरुरीचे आहे?

५ पेत्राने आपल्या दुसऱ्‍या पत्राच्या सुरुवातीला लिहिले: “तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्‍वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्‍तीची, सुभक्‍तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला; कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करितील.”—२ पेत्र १:५-८.

६ हे खरे आहे, की देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करण्यास साहाय्यक ठरणाऱ्‍या कार्यांत सहभाग घेण्यासाठी “होईल तितका प्रयत्न” करणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ, सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी, दररोज बायबलचे वाचन करण्यासाठी व अर्थपूर्ण वैयक्‍तिक अभ्यासाची सवय टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतात. तसेच, तुमची कौटुंबिक अभ्यासाची संध्याकाळ नियमित, आनंददायक व अर्थपूर्ण असावी म्हणून पराकाष्ठेचा प्रयत्न व उत्तम नियोजनाची गरज आहे. पण, एकदा का आपण चांगला नित्यक्रम स्थापित केला आणि त्याचे फायदे अनुभवले की अशा चांगल्या सवयी टिकवून ठेवणे आपल्याला सोपे जाते.

७, ८. (क) कौटुंबिक उपासनेच्या संध्येविषयी काहींचे काय मनोगत आहे? (ख) तुमच्या कौटुंबिक उपासनेपासून तुम्हाला स्वतःला काय फायदा होत आहे?

७ कौटुंबिक उपासनेच्या व्यवस्थेविषयी एक बहीण म्हणते: “यामुळे कितीतरी नवनवीन विषय शिकायला मिळतात.” दुसरी एक बहीण म्हणते: “प्रामाणिकपणे सांगायचं तर पुस्तक अभ्यासाची सभा ही माझी सगळ्यात आवडती सभा होती. त्यामुळे ती बंद पडली तेव्हा खरंतर मला थोडं वाईट वाटलं. पण, कौटुंबिक उपासनेच्या व्यवस्थेमुळे आता मला जाणवतं की आपल्याला नेमकी केव्हा, कशाची गरज आहे हे यहोवाला अचूक माहीत असतं.” एक कुटुंबप्रमुख म्हणतात: “कौटुंबिक उपासनेचा आम्हाला खूप खूप फायदा होत आहे. विवाहित जोडपं या नात्यानं आमच्या खास गरजांना जुळवून घेणारी जणू ही एक सभाच आहे असं आम्हाला वाटतं आणि याचा आम्हाला फार आनंद वाटतो. आम्हा दोघांच्याही मते, पवित्र आत्म्यामुळे उत्पन्‍न होणारे गुण आता आम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे प्रदर्शित करत आहोत. तसंच, सेवेतही पूर्वीपेक्षा जास्त आनंद आम्हाला मिळत आहे.” आणखी एक कुटुंबप्रमुख म्हणतात: “आमची मुलं स्वतः संशोधन करू लागली आहेत आणि खूप काही शिकत आहेत, तेसुद्धा अतिशय आनंदानं. या व्यवस्थेमुळे आम्हाला राहून राहून याची जाणीव होते, की यहोवाला आमच्या चिंता माहीत आहेत आणि तो आमच्या प्रार्थना ऐकतो.” कौटुंबिक उपासनेच्या या उत्तम आध्यात्मिक तरतुदीबद्दल तुमच्याही भावना अशाच आहेत का?

८ किरकोळ कारणांना तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या आड येऊ देऊ नका. एक विवाहित जोडपे म्हणते: “गेल्या चार आठवड्यांपासून दर गुरुवारी संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे आम्हाला आमचा अभ्यास जवळजवळ रद्दच करावा लागला. पण, आम्ही या गोष्टींना आमच्या अभ्यासाच्या आड येऊ दिलं नाही.” अर्थात, काही वेळा तुम्हाला अभ्यासाच्या ठरलेल्या वेळेत थोडाफार बदल करावा लागू शकतो. पण असे असले, तरी तुमची कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ कधीही चुकवू नका, अगदी एका आठवड्यासाठी देखील!

९. यहोवाने यिर्मयाला कसे सांभाळले आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

९ या बाबतीत यिर्मया संदेष्ट्याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. यहोवाने त्याचे आध्यात्मिक रीत्या भरणपोषण केले आणि याची त्याने मनापासून कदर केली. कारण याचीच तर यिर्मयाला सगळ्यात जास्त गरज होती. या आध्यात्मिक अन्‍नामुळे त्याला, थंड प्रतिसाद दाखवणाऱ्‍या लोकांमध्ये निरुत्साहित न होता प्रचाराचे कार्य करत राहण्याचे बळ मिळाले. त्याने म्हटले: ‘परमेश्‍वराचे वचन माझ्या हाडांत कोंडलेला अग्नि जळत आहे असे झाले.’ (यिर्म. २०:८, ९) तसेच, जेरूसलेमच्या नाशाअगोदरच्या कठीण काळात तग धरून राहणेही त्याला शक्य झाले. आज आपल्याजवळ देवाचे संपूर्ण लिखित वचन, बायबल उपलब्ध आहे. आपण त्याचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास व देवाची विचारसरणी आत्मसात केल्यास यिर्मयाप्रमाणे आपल्याला उत्साहाने आपले सेवाकार्य करणे, परीक्षा आल्या तरी विश्‍वासात टिकून राहणे आणि नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहणे शक्य होईल.—याको. ५:१०.

“निष्कलंक व निर्दोष” राहा

१०, ११. सैतानाच्या दुष्ट जगापासून “निष्कलंक व निर्दोष” राहण्यासाठी आपण होईल तितके प्रयत्न का केले पाहिजेत, आणि त्यासाठी काय करणे जरुरीचे आहे?

१० ख्रिस्ती असल्यामुळे, आपल्याला माहीत आहे की आपण शेवटल्या काळात जगात आहोत. त्यामुळे सध्याचे हे जग लोभ, लैंगिक अनैतिकता आणि हिंसाचार यांसारख्या यहोवाला घृणास्पद वाटणाऱ्‍या गोष्टींनी झपाटलेले आहे याचे आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. थोडक्यात सैतानाची कुयुक्‍ती अशी आहे: ‘देवाच्या लोकांना दहशत बसवणे शक्य नसेल, तर त्यांच्या मनात वाईट इच्छा उत्पन्‍न करून त्यांना भ्रष्ट करता येईल.’ (प्रकटी. २:१३, १४) म्हणूनच, पेत्राने दिलेल्या या प्रेमळ सल्ल्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे: “तुम्ही [देवाच्या] दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.”—२ पेत्र ३:१४.

११ याआधीही पेत्राने “होईल तितका प्रयत्न करा” असा सल्ला दिला होता हे तुम्हाला आठवत असेल. यहोवाने पेत्राला हे शब्द लिहिण्यास प्रेरित केले त्यावरून स्पष्टच आहे, की सैतानाच्या गलिच्छ जगापासून “निष्कलंक व निर्दोष” राहण्याचा आपण नेटाने प्रयत्न केला पाहिजे हे यहोवा जाणतो. नेटाने प्रयत्न करण्यासाठी चुकीच्या इच्छा-अभिलाषांनी आपल्या अंतःकरणात घर करू नये म्हणून आपण आपल्या अंतःकरणाचे रक्षण करणे जरुरीचे आहे. (नीतिसूत्रे ४:२३; याकोब १:१४, १५ वाचा.) तसेच, आपली ख्रिस्ती जीवनशैली पाहून ज्यांना नवल वाटते व जे सतत आपली “निंदा” करतात अशांना खंबीरपणे तोंड देणे देखील जरुरीचे आहे.—१ पेत्र ४:४.

१२. लूक ११:१३ या वचनातून आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते?

१२ आपल्या अपरिपूर्ण स्थितीमुळे, जीवनात योग्य ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच खूप संघर्ष करावा लागतो. (रोम. ७:२१-२५) पण, यहोवाला प्रार्थना केल्यानेच आपण या संघर्षात विजयी ठरू शकतो. कारण जे प्रामाणिकपणे मागतात अशांना यहोवा उदार मनाने आपला पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) जीवनात आपल्याला अनेक प्रलोभनांना व परीक्षांना तोंड द्यावे लागते आणि यहोवाचा दिवस निकट येत आहे तसतशा या परीक्षा अधिकाधिक वाढत जातील. पण, देवाचा आत्मा त्याला संतुष्ट करणारे गुण आपल्यामध्ये विकसित करतो, ज्यामुळे या सर्व परीक्षांना आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.

परीक्षांमधून बळ मिळवा

१३. जीवनात परीक्षा येतात तेव्हा त्यांत टिकून राहण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?

१३ या दुष्ट जगात आपल्यासमोर कोणत्या ना कोणत्या परीक्षा तर येतीलच. पण, आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा खचून जाण्याऐवजी, देवावर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्याची तसेच त्याच्यावर व त्याच्या वचनावर असलेला आपला विश्‍वास आणखी दृढ करण्याची ही एक संधी आहे असा विचार का करू नये? शिष्य याकोबाने म्हटले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” (याको. १:२-४) शिवाय हेही नेहमी लक्षात असू द्या, की “भक्‍तिमान्‌ लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:९.

१४. योसेफाच्या उदाहरणावरून तुम्हाला कोणते उत्तेजन मिळते?

१४ याकोबाचा पुत्र योसेफ याचे उदाहरण विचारात घ्या. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकून टाकले होते. (उत्प. ३७:२३-२८; ४२:२१) त्यांच्या या निर्दयी कृत्यामुळे योसेफाचा विश्‍वास ढळला का? देवाने आपल्यावर असा वाईट प्रसंग येऊ दिल्याबद्दल त्याने देवाविषयी मनात राग बाळगला का? बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगते की त्याने मुळीच असे केले नाही. शिवाय, एवढ्यावरच त्याच्या परीक्षा संपल्या नाहीत. पुढे, बलात्काराचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप त्याच्यावर लावून त्याला तुरुंगात डांबण्यात आले. अशा वेळी देखील एका क्षणासाठीसुद्धा त्याचा विश्‍वास डळमळला नाही. (उत्प. ३९:९-२१) उलट, त्याच्या जीवनात आलेल्या परीक्षांमुळे तो विश्‍वासात बलिष्ठ होत गेला व त्यासाठी पुढे त्याला असंख्य आशीर्वाद देखील लाभले.

१५. नामीच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

१५ परीक्षांमुळे आपण दुःखी होऊ शकतो, निराश होऊ शकतो हे कबूल आहे. योसेफाला काही वेळा असे वाटले असावे. देवाच्या इतर विश्‍वासू सेवकांना देखील असेच वाटले होते. नामीचाच विचार करा. तिचा पती व दोन्ही मुले मरण पावली तेव्हा तिने म्हटले: ‘मला नामी म्हणू नका. मला मारा [याचा अर्थ ‘कडू’] म्हणा. कारण सर्वसमर्थ देवाने माझे जीवन कडू केले आहे.’ (रूथ १:२०, २१, सुबोध भाषांतर) नामीची ही प्रतिक्रिया अगदीच स्वाभाविक व समजण्याजोगी होती. पण, तिच्या जीवनात परीक्षा आल्या, तरीसुद्धा योसेफाप्रमाणेच तिचाही विश्‍वास ढळला नाही किंवा तिची निष्ठा डगमगली नाही. त्यामुळे, या विश्‍वासू स्त्रीला यहोवाने खूप आशीर्वाद दिले. (रूथ ४:१३-१७, २२) सैतानाने व त्याच्या दुष्ट जगाने केलेले सर्व नुकसान, येणाऱ्‍या पृथ्वीवरील नंदनवनात यहोवा भरून काढेल. “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”—यश. ६५:१७.

१६. प्रार्थना करण्याच्या बाबतीत आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे व का?

१६ जीवनात कितीही व कोणत्याही स्वरूपाच्या परीक्षा आल्या तरी यहोवाच्या प्रेमाची छाया नेहमी आपल्यावर राहील. (रोमकर ८:३५-३९ वाचा.) सैतान आपले मनोबल खचवण्याचा सतत प्रयत्न करत राहील हे आपल्याला माहीत आहे. पण, आपण सर्व बाबतीत ‘मर्यादशील’ व “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिलो, तर सैतानाचे सर्व प्रयत्न फोल ठरतील. (१ पेत्र ४:७) येशूने म्हटले: “तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना [“विनंती,” NW] करीत जागृत राहा.” (लूक २१:३६) या ठिकाणी येशूने “विनंती” अर्थात कळकळीची प्रार्थना असा शब्द वापरला याकडे लक्ष द्या. त्याअर्थी, तो या गोष्टीवर भर देत होता, की त्याच्यासमोर व त्याच्या पित्यासमोर आपली जी आध्यात्मिक स्थिती आहे त्याबद्दल हलगर्जीपणा दाखवण्याची ही वेळ नाही. कारण जे आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ असतील केवळ अशांनाच यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसातून निभावण्याची आशा आहे.

यहोवाच्या सेवेत आवेशी राहा

१७. तुमच्या क्षेत्रात प्रचाराचे कार्य करणे सोपे नसल्यास प्राचीन काळातील संदेष्ट्यांच्या उत्तम उदाहरणावरून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

१७ आध्यात्मिक कार्यांत सहभाग घेतल्याने आपल्याला आनंद मिळतो. याबाबतीत पेत्राचे शब्द लक्षात येतात, ज्याने म्हटले: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून . . . तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११) सुभक्‍तीत समाविष्ट असलेले सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे सुवार्तेची घोषणा करणे. (मत्त. २४:१४) लोकांच्या थंड प्रतिसादामुळे, विरोधामुळे किंवा बहुतेक जण सांसारिक चिंतांमध्ये गुरफटलेले असल्यामुळे काही क्षेत्रांत प्रचाराचे कार्य करणे इतके सोपे नसेल हे मान्य आहे. प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांनासुद्धा लोकांच्या अशा मनोवृत्तींचा सामना करावा लागला होता. पण, त्यांनी केव्हाही हार मानली नाही. उलट, लोकांना देवाचा संदेश सांगण्यास ते वारंवार त्यांच्याकडे गेले. (२ इतिहास ३६:१५, १६ वाचा; यिर्म. ७:२४-२६) सेवा कार्यात टिकून राहण्यास त्यांना कशामुळे मदत मिळाली? त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या कार्याकडे त्यांनी जगाच्या नव्हे, तर यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिले. शिवाय, देवाचे नाव धारण करणे ही सगळ्यात बहुमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी मानले.—यिर्म. १५:१६.

१८. भविष्यात देवाच्या नावाचा गौरव होण्यात आपण सध्या करत असलेल्या राज्य प्रचाराच्या कार्याची काय भूमिका आहे?

१८ आज आपल्यालासुद्धा यहोवाच्या नावाची व त्याच्या उद्देशाची घोषणा करण्याचा बहुमान लाभला आहे. विचार करा: आपण करत असलेल्या प्रचाराच्या कार्यामुळेच, भविष्यात देवाचा मोठा दिवस येईल तेव्हा ‘आम्हाला याची कल्पना नव्हती’ असे देवाच्या शत्रुंपैकी एकही जण म्हणू शकणार नाही. उलट, प्राचीन काळातील फारो राजाप्रमाणे त्यांना कळून चुकेल, की त्यांच्यावर न्यायदंड बजावणारा खुद्द यहोवा आहे. (निर्ग. ८:१, २०; १४:२५) त्याच वेळी, आपले विश्‍वासू सेवक खरोखर आपले प्रतिनिधी होते ही गोष्ट अगदी धडधडीतपणे स्पष्ट करून यहोवा आपल्या सेवकांचा सन्मान करेल.—यहेज्केल २:५; ३३:३३ वाचा.

१९. आपण यहोवाच्या सहनशीलतेचा सदुपयोग करू इच्छितो हे आपण कसे दाखवू शकतो?

१९ पेत्राने आपल्या दुसऱ्‍या पत्राच्या शेवटी शेवटी ख्रिस्ती बांधवांना लिहिले: “आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:१५) होय, यहोवाच्या सहनशीलतेचा आपण सदुपयोग करत राहू या. तो कसा? देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करण्याद्वारे, “निष्कलंक व निर्दोष” राहण्याद्वारे, परीक्षांसंबंधी योग्य मनोवृत्ती बाळगण्याद्वारे आणि राज्य प्रचाराच्या कार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे आपण असे करू शकतो. असे केल्यास “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांसंबंधी असलेले असंख्य आशीर्वाद आपल्याला लाभतील.—२ पेत्र ३:१३.

तुम्हाला आठवते का?

• आपण देवाला संतुष्ट करणारे गुण कसे विकसित करू शकतो?

• आपण “निष्कलंक व निर्दोष” कसे राहू शकतो?

• योसेफ व नामीच्या उदाहरणांवरून काय शिकण्यासारखे आहे?

• प्रचाराच्या कार्यात सहभाग घेणे ही मोठ्या बहुमानाची गोष्ट आहे असे का म्हणता येईल?

[९ पानांवरील चित्र]

पतींनो, कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या व्यक्‍तिमत्त्वात देवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करण्यास मदत करेल?

[१० पानांवरील चित्रे]

योसेफाने परीक्षांचा ज्या प्रकारे सामना केला त्यापासून आपण काय शिकू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा