आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती बंधूसमाजाची सेवा
“आंतरराष्ट्रीय सेवक,” “आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक” हे शब्द कधी तुमच्या ऐकिवात आले आहेत का? यहोवाच्या साक्षीदारांचे बनलेले हे स्वयंसेवकांचे गट, बायबलमधील राज्य संदेश छापण्यासाठी व त्यांचे वितरण करण्यासाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी आपला वेळ, आपली कौशल्ये पणाला लावतात. बायबलचे प्रशिक्षण देण्याकरता लागणारी संमेलन गृहे आणि राज्य सभागृहे यांचेही बांधकाम करण्यास हे स्वयंसेवक हातभार लावतात. सध्या, हे स्वयंसेवक ३४ वेगवेगळ्या देशांमध्ये, खासकरून मर्यादित संपत्ती असलेल्या देशांमध्ये बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती बंधूसमाजाची सेवा करत असताना या सेवकांना कोणकोणत्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो आणि कोणत्या आनंदाचा अनुभव मिळतो? ते करत असलेल्या ‘पवित्र सेवेबद्दल’ त्यांना काय वाटते? (प्रकटीकरण ७:९, १५, NW) हे माहीत करून घेण्यासाठी आपण मेक्सिकोत सेवा केलेल्या काही स्वयंसेवकांची भेट घेऊ या.
१९९२ सालच्या मे महिन्यात, मेक्सिकोत पहिल्यांदा स्वयंसेवक परदेशांतून आले. त्यानंतर लगेच त्यांनी मेक्सिकोतील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची देखरेख करणाऱ्या शाखेचा विस्तार करण्याच्या बांधकामात प्रमुख भूमिका बजावली. शाखा दफ्तराच्या या विस्तारात, १४ नवीन इमारती तसेच शाखा दफ्तरात सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी निवासस्थाने, छापखाना आणि कार्यालय इमारत यांचा समावेश आहे.
या बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी कॅनडा, ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि इतर राष्ट्रांहून आलेल्या ७३० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी, मेक्सिकोच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो स्वयंसेवकांबरोबर खांद्याला खांदा लावून कार्य केले. याशिवाय, शाखा दफ्तराच्या जवळपासच्या क्षेत्रात असलेल्या सुमारे १,६०० मंडळ्यांतून २८,००० पेक्षा अधिक साक्षीदार बंधूभगिनी, शनिवार-रविवारच्या दिवशी बांधकाम कार्यांत मदत करायला येत असत. या सर्वांनी स्वेच्छेचा आत्मा दाखवला व विनामूल्य आपल्या कौशल्यांचा उपयोग केला. अशाप्रकारे यहोवाची सेवा करण्याचा आपल्याला विशेषाधिकार मिळाला आहे असे त्यांना वाटले. संपूर्ण बांधकाम होईपर्यंत त्या सर्वांनी, स्तोत्र १२७:१ मधील ईश्वरप्रेरणेने लिहिलेल्या शब्दांची आठवण ठेवली; तेथे म्हटले आहे: “परमेश्वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत.”
अडीअडचणींचा सामना
एका विदेशी नेमणुकीत सेवा करत असताना या स्वयंसेवकांना कोणकोणत्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो? पुढे काहींची मते मांडली आहेत. कर्टीस व सॅली या अमेरिकेतील एका जोडप्याने जर्मनी, झांबिया, पराग्वे, भारत, मेक्सिको, रशिया, रोमानिया, व सेनेगल येथील बांधकाम प्रकल्पांवर काम केले आहे. कर्टीस म्हणतात: “पहिली मोठी अडचण म्हणजे, पायनियर [पूर्ण-वेळेची सेविका] असलेली आमची मुलगी आणि मिन्नेसोटा येथील आमची मंडळी, यांना सोडणं. आम्ही दोघं पतीपत्नी त्या मंडळीबरोबर २४ वर्ष सहवास राखून होतो; आम्हाला तिथं आपलंस वाटायचं.”
सॅली म्हणतात: “अनोळखी ठिकाणी जाऊन राहणं हे पुरुषापेक्षा एखाद्या स्त्रीसाठी कदाचित अधिक आव्हानात्मक आहे; पण मी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले. शिवाय, मला किड्यामुंग्यांचीसुद्धा सवय झाली! एका देशांत तर, आम्ही दहा स्वयंसेवक एकाच अर्पाटमेंटमध्ये राहत होतो; येथे स्वयंपाकघर नव्हते, फक्त दोनच बाथरूम्स होते. इथे मी अधिक धीर धरायला शिकले.”
नवीन भाषा शिकणे ही देखील आणखी एक अडचण आहे जिच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, नम्रता दाखवावी लागते. विविध देशांमध्ये आपल्या पतीबरोबर बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या शरॉन म्हणतात: “तुम्ही ज्या देशात सेवा करायला जाता त्या देशाची भाषा न येणं देखील आव्हानात्मक आहे. सुरवातीला, तुम्हाला तुमच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक बंधूभगिनींच्या जवळ जाणे कठीण वाटते. हे खरोखरच निराश करणारे आहे. पण आमच्या विदेशी नेमणुकींमध्ये आम्हाला भेटत असलेले बंधूभगिनी आमच्याबरोबर खूप धीराने वागतात आणि त्यांना आमच्या कल्याणाची काळजी असते. थोड्याच दिवसांत आम्ही एकमेकांबरोबर भाषेची समस्या असूनही कसेबसे बोलायला लागतो.”
सेवेमध्ये भाग घ्यायला धैर्याची आवश्यकता
हे आत्म-त्यागी स्वयंसेवक बांधकामाच्या प्रगतीला मोठा हातभार लावत असले तरीसुद्धा त्यांना याची जाणीव आहे, की ते सर्वात पहिल्यांदा देवाच्या राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक आहेत. त्यामुळे, ते ज्या मंडळ्यांबरोबर सहवास राखतात त्या मंडळीच्या क्षेत्र सेवेच्या व्यवस्थेला पूर्णपणे पाठिंबा देतात. ग्वादेलूप, मलावी, मेक्सिको, नायजेरिया या देशांतील बांधकाम प्रकल्पांवर काम केलेल्या ऑके आणि इंग-मॉरी नावाच्या या जोडप्याने कबूल केले, की एका विदेशी देशात क्षेत्र सेवेत भाग घेत असताना दुसरी भाषा बोलण्यासाठी धैर्याची गरज आहे.
इंग-मॉरी म्हणतात: “पहिल्यांदा, आमचा प्रचारातील सहभाग मर्यादित होता कारण आम्ही नेहमी स्थानीय साक्षीदारांबरोबरच जायचो आणि आम्हाला लाज वाटत असल्यामुळे, आम्ही बहुतेक घरात त्यांनाच बोलायला लावायचो. पण एक दिवशी सकाळी आम्ही दोघांनीच सेवेला जायचं ठरवलं. आमचे पाय लटपटत होते आणि छातीत धडधडत होतं. आम्ही एका स्त्रीला भेटलो; तिनं मी तयार केलेली सादरता ऐकून घेतली. मी तिला एक वचन वाचून दाखवलं आणि काही साहित्य सादर केले. मग ती मला म्हणाली: ‘मला एक सांगा. माझी एक नातेवाईक यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करतेय. मला हा अभ्यास कसा करता येईल?’ दोन मिनिटे जणू काय माझी शुद्धच हरपली. मग, स्वतःला सावरत मी तिला बायबल अभ्यास सादर केला.”
इंग-मॉरी पुढे म्हणतात: “आम्ही सेवेत जाण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल व लोकांना सत्य सांगण्याची इच्छा दाखवल्याबद्दल यहोवाने आम्हाला दिलेला आशीर्वाद पाहून मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा; मी यहोवाचे आभार मानले.” या स्त्रीने खूप चांगली प्रगती केली आणि मेक्सिको शहरात झालेल्या एका प्रांतीय अधिवेशनात तिने साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला. ऑके आणि इंग-मॉरी आपल्या सेवेचे विवरण थोडक्यांत पुढीलप्रमाणे करतात: “विविध बांधकाम प्रकल्पांवर काम करण्याच्या आम्हाला मिळत असलेल्या नेमणुकींची आम्ही खूप कदर बाळगतो; परंतु, एखाद्या व्यक्तीला सत्य स्वीकारण्यास मदत करण्यात जो आनंद व जे समाधान मिळते त्याची तुलना इतर कशाशीही करता येत नाही.”
आत्म-त्यागाची मनोवृत्ती
हे खरे आहे, की विदेशांतील आपल्या बंधूभगिनींची सेवा करण्यासाठी या स्वयंसेवकांना आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना सोडण्याचा त्याग करावा लागतो परंतु त्यांना अतुलनीय आनंद देखील मिळतो. कोणकोणत्या गोष्टींद्वारे त्यांना आनंद मिळतो?
अंगोला, कोलंबिया, एक्वादोर, एल साल्वादोर, गियाना, मेक्सिको, प्वेर्त रिको येथे आपली पत्नी पमेला हिच्याबरोबर सेवा केलेले हॉवर्ड म्हणतात: “वेगवेगळ्या देशांतील बंधूभगिनींना भेटणे आणि आपल्या आंतरराष्ट्रीय बंधूसमाजात असलेले प्रेमाचे बंधन अनुभवणे खरोखरच एक सुहक्क आहे. आपण पुष्कळदा आपल्या बंधूसमाजाविषयी फक्त ऐकतो पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या संस्कृतीच्या व पार्श्वभूमीच्या बंधूभगिनींबरोबर राहता आणि त्यांच्याबरोबर सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या अनमोल बंधूसमाजाची किंमत जास्त कळते.”
कोलंबिया, कोस्टा रिका, एक्वादोर, मेक्सिको, झांबिया येथे बांधकाम प्रकल्पांवर सेवा केलेले गॅरी यांच्यामतेसुद्धा यामुळे बराच फायदा झाला आहे. ते म्हणतात: “मला नेमलेल्या देशांतील प्रौढ बांधवांबरोबर अनेक वर्षांपासून संगती केल्याने मला जे प्रशिक्षण मिळाले आहे त्याने मला माझ्या नेमणुकींत येणाऱ्या अडचणींचा सामना करायला सज्ज केले आहे. यामुळे माझा विश्वास आणखी पक्का झाला आहे कारण मला, यहोवाच्या जगव्याप्त संघटनेचे वैशिष्ट्य असलेली एकता—भाषा, वंश किंवा संस्कृती यांना पार करणारी एकता अनुभवण्याची सुसंधी मिळते.”
मेक्सिकोतील बांधकाम पूर्ण झाले आणि या वर्षी शाखा दफ्तराचे समर्पण देखील झाले. देवाबद्दलच्या प्रेमाने प्रवृत्त होऊन या आंतरराष्ट्रीय सेवकांनी व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांनी मेक्सिकोत आणि इतरत्र खऱ्या उपासनेच्या वृद्धीला मोठा हातभार लावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींची सेवा करण्याची त्यांची स्वेच्छा आणि आत्म-त्यागी मनोवृत्ती यांची संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार खूप गुणग्राहकता बाळगतात.
[२५ पानांवरील चित्र]
एक्वादोर
[२५ पानांवरील चित्र]
कोलंबिया
[२५ पानांवरील चित्र]
अंगोला
[२६ पानांवरील चित्र]
मेक्सिको शाखेचे सुरू होणारे नवीन बांधकाम
[२६ पानांवरील चित्र]
शाखा दफ्तरातील बाग
[२६ पानांवरील चित्र]
खाली: नवीन बांधलेल्या इमारतींसमोर उभे असलेले बांधकाम विभागाचे काही सदस्य
[२७ पानांवरील चित्र]
बांधकाम स्वयंसेवकांना स्थानीय मंडळीबरोबर प्रचार कार्यात भाग घ्यायला आनंद वाटतो