‘चांगला मनुष्य देवाजवळून अनुग्रह पावतो’
यहोवा देव जीवनाचा स्रोत आहे. (स्तोत्र ३६:९) होय, “आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२८) तसेच, त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध असणाऱ्यांना तो देत असलेल्या प्रतिफळाचा विचार केल्यावर आपले अंतःकरण कृतज्ञतेने भरून येत नाही का? होय, “देवाचे कृपादान . . . सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) आपण यहोवाचा अनुग्रह प्राप्त करावा हे किती महत्त्वाचे आहे!
स्तोत्रकर्ता आपल्याला हमी देतो की, ‘परमेश्वर अनुग्रह देतो.’ (स्तोत्र ८४:११) पण ते तो कोणाला देतो? आज लोक सहसा शिक्षण, संपत्ती, वर्ण, वांशिक पार्श्वभूमी आणि अशाच इतर गोष्टींच्या आधारे इतरांवर अनुग्रह करतात. देवाचा अनुग्रह कोणाला प्राप्त होतो? प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन याचे उत्तर देतो: “चांगला मनुष्य यहोवाजवळून अनुग्रह पावतो, पण वाईट योजणाऱ्या मनुष्याला तो दोषी ठरवील.” (तिरपे वळण आमचे.)—नीतिसूत्रे १२:२, पं.र.भा.
यावरून स्पष्ट होते की, चांगल्या अर्थात सद्गुणी व्यक्तीवर यहोवा प्रसन्न होतो. आत्मशिस्त, अपक्षपात, नम्रता, दयाळुपणा आणि शहाणपण हे चांगल्या मनुष्याचे सद्गुण आहेत. त्याचे विचार धार्मिक, त्याचे शब्द उभारणीकारक, त्याच्या कृती न्यायीपणाच्या आणि कल्याणकारी असतात. नीतिसूत्रे या बायबलच्या पुस्तकाच्या १२ व्या अध्यायाच्या पहिल्या भागात, आपल्या दररोजच्या जीवनात चांगुलपणा कसा दिसून यावा आणि हा गुण प्रदर्शित केल्याचे काय फायदे आहेत ते दाखवले आहे. त्यात सांगितलेल्या गोष्टींचा विचार केल्याने ‘चांगले करण्यासाठी सुज्ञ होण्यास’ मदत मिळेल. (स्तोत्र ३६:३, पं.र.भा.) हा सुज्ञ सल्ला लागू केल्याने आपल्याला देवाचा अनुग्रह प्राप्त करायला मदत मिळेल.
शिस्त महत्त्वाची
“ज्याला [“शिस्त,” NW] प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखितो तो पशुतुल्य होय,” असे शलमोन म्हणतो. (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:१) स्वतःमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक असलेला चांगला मनुष्य शिस्त स्वीकारण्यासही उत्सुक असतो. ख्रिस्ती सभांमध्ये किंवा व्यक्तिगत संभाषणांमध्ये मिळणारा सल्ला तो लागलीच लागू करतो. शास्त्रवचनांतील आणि बायबल-आधारित प्रकाशनांतील शब्द पराणीसारखे असतात जे त्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी ढोसणी देत असतात. तो ज्ञानाचा शोध करतो आणि आपले मार्ग सरळ करण्यास त्याचा उपयोग करतो. होय, ज्याला शिस्त प्रिय असते त्याला ज्ञानही प्रिय असते.
खऱ्या उपासकांसाठी शिस्त, खासकरून आत्मानुशासन खूप आवश्यक आहे. आपल्यालाही देवाच्या वचनाचे गहन ज्ञान असते तर किती बरे झाले असते असे कदाचित आपल्याला वाटत असेल. ख्रिस्ती सेवेत आपण अधिक परिणामकारक असावे आणि देवाच्या वचनाचे उत्तम शिक्षक असावे असेही आपल्याला वाटू शकते. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) पण या इच्छा वास्तवात उतरवायला आत्मशिस्तीची गरज आहे. जीवनाच्या इतर पैलूंमध्येही आत्मशिस्तीची गरज आहे. उदाहरणार्थ, लैंगिक वासना चेतवणारे अमाप साहित्य आज उपलब्ध आहे. अनुचित गोष्टींकडे लक्ष न देण्यास आत्मशिस्त आवश्यक नाही का? शिवाय, “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट” असल्यामुळे आपल्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यातूनच एखादा अशुद्ध विचार येणे शक्य आहे. (उत्पत्ति ८:२१) असले विचार मनात घोळवत राहू न देण्यासाठी आत्मशिस्तीची गरज आहे.
दुसऱ्या बाजूला पाहता, वाग्दंड नको असलेल्या मनुष्याला शिस्त किंवा ज्ञान आवडत नाही. वाग्दंड तुच्छ लेखण्याच्या पापी मानवी प्रवृत्तीला बळी पडून योग्यायोग्याची जाणीव नसलेल्या पशूतुल्य, किंवा जनावरातुल्य तो स्वतःला करतो. या प्रवृत्तीचा आपण खंबीरपणे निषेध केला पाहिजे.
‘न ढळणारे मूळ’
चांगला मनुष्य अधार्मिक किंवा अन्यायी असू शकत नाही. म्हणून यहोवाचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी धार्मिकता आवश्यक आहे. राजा दाविदाने गायिले: “तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस.” (स्तोत्र ५:१२) दुष्ट आणि धार्मिक लोक यांच्या स्थितीतला फरक दाखवून शलमोन म्हणतो: “मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण धार्मिकांचे मूळ ढळत नाही.” (तिरपे वळण आमचे.)—नीतिसूत्रे १२:३.
दुष्ट लोकांचा उत्कर्ष होत आहे असे भासत असेल. स्तोत्रकर्ता आसाफ याच्या अनुभवाचा विचार करा. तो म्हणतो, “माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती.” का? आसाफ याचे उत्तर देतो, “कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.” (स्तोत्र ७३:२, ३) परंतु, देवाच्या मंदिरात आल्यावर त्याला जाणीव झाली की, यहोवाने त्यांना निसरड्या जागी उभे केले होते. (स्तोत्र ७३:१७, १८) दुर्जनांना मिळणारे कसलेही यश तात्पुरते असेल. मग त्यांचा हेवा कशाला करावा?
याच्या उलट, यहोवाचा अनुग्रह ज्याच्यावर आहे तो स्थिर आहे. एका वृक्षाच्या मजबूत मुळांचे रूपक वापरून शलमोन म्हणतो: “धार्मिकांचे मूळ ढळत नाही.” (नीतिसूत्रे १२:३) कॅलिफोर्नियातील महाकाय सिक्वोया वृक्षाची अदृश्य मुळे कित्येक एकरांपर्यंत पसरलेली असतात आणि ती वादळ व जोरदार तुफानात पक्का आधार देतात. सिक्वोयाचा दिमाखदार वृक्ष एखाद्या शक्तिशाली भूकंपातही निभावू शकतो.
पृथ्वीच्या पोषक जमिनीत खोलवर रुतलेल्या या मुळांप्रमाणे, आपले मन आणि हृदय देवाच्या वचनात खोलवर गेले पाहिजे आणि त्यातील जीवनदायक पाण्याने पोषित झाले पाहिजे. अशातऱ्हेने आपला विश्वास मुळावलेला आणि मजबूत होईल, आपली आशा स्थिर आणि अढळ होईल. (इब्री लोकांस ६:१९) मग आपण “प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे” होणार नाही. (इफिसकर ४:१४) अर्थात, तुफानी परीक्षांचा परिणाम आपल्याला जाणवेल आणि काही वेळा तर संकटप्रसंगी आपण घाबरूनही जाऊ. पण आपले ‘मूळ ढळणार नाही.’
“सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट”
“प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक चांगली स्त्री असते” ही म्हण पुष्कळांना ठाऊक आहे. सहयोगी स्त्रीचे महत्त्व दाखवून शलमोन म्हणतो: “सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडविणारी आहे.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:४) “सद्गुणी” या शब्दात चांगुलपणाचे अनेक पैलू सामावले जातात. नीतिसूत्रे ३१ व्या अध्यायात चांगल्या पत्नीचे वर्णन करताना मेहनतीपणा, विश्वासूपणा आणि शहाणपण या सद्गुणांविषयी सांगितले आहे. हे गुण असलेली पत्नी तिच्या पतीला मुकुट आहे कारण तिच्या सद्वर्तनाने त्याचा सन्मान होतो आणि इतरांसमोर त्याचा आदर वाढतो. ती महत्त्वकांक्षी प्रवृत्ती बाळगून स्वतःचे प्रत्येक वेळी खरे करायचा प्रयत्न करत नाही किंवा स्वतःला सन्मान मिळवण्याकरता त्याच्याशी स्पर्धा करत नाही. त्याउलट, ती तिच्या पतीला पूरक ठरणारी सहायक बनते.
एखादी स्त्री लाज कशी आणेल आणि याचा काय परिणाम होतो? भांडखोरपणापासून व्यभिचारापर्यंत असलेले सर्वकाही लाजिरवाण्या वर्तनात मोडते. (नीतिसूत्रे ७:१०-२३; १९:१३) पत्नीच्या अशा वर्तनाने पतीचे नाव खराब होते. ती, “त्याची हाडे सडविणारी” ठरते कारण एका संदर्भ ग्रंथानुसार, “रोगाने शरीर दुर्बल बनते त्याप्रमाणे ती त्याचा सत्यानाश घडवते.” “याला आधुनिक पर्यायी शब्द म्हणजे ‘कर्करोग’—नकळत वाढणारा रोग जो एका व्यक्तीचा जोम हळूहळू नष्ट करतो,” असे आणखी एक संदर्भ म्हणतो. परंतु, ख्रिस्ती पत्नी, सद्गुणी स्त्रीचे गुण प्रदर्शित करून देवाचा अनुग्रह प्राप्त करण्याचा प्रयत्न करोत.
विचारांतून कृती आणि कृतींतून परिणाम
विचारांची कृत्यांमध्ये आणि कृत्यांची परिणामांमध्ये परिणती होत असते. विचार कालांतराने कृत्यांमध्ये कसे बदलतात हे शलमोन पुढे दाखवतो आणि धार्मिकांची तुलना दुर्जनांशी करतो. तो म्हणतो: “धार्मिकांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांस सोडवील.” (तिरपे वळण आमचे.)—नीतिसूत्रे १२:५, ६.
चांगल्या लोकांचे विचार सरळ असून त्यात पक्षपातीपणा किंवा अन्याय नसतो. धार्मिक लोक देवाप्रती आणि सहमानवांप्रती असलेल्या प्रेमाने प्रेरित होत असल्यामुळे त्यांचे हेतू चांगले असतात. दुसऱ्या बाजूला पाहता, दुर्जनांच्या हेतूंमागे स्वार्थ असतो. परिणामतः, त्यांच्या युक्त्या—आपले हेतू साध्य करण्याचे मार्ग—कपटी असतात. त्यांच्या कृती दगाबाज असतात. ते न्यायालयात खोटे आरोप करून निर्दोष लोकांना फसवायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांचे शब्द “रक्तपातासाठी टपून बसलेले असतात” कारण त्यांना बळी पडलेल्या निर्दोष लोकांचे ते वाईट करू पाहतात. सरळ जनांना दुर्जनांच्या युक्त्या ठाऊक असल्यामुळे व सावधान राहण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी त्यांच्याजवळ असल्यामुळे हा धोका ते टाळू शकतात. उलट, बेसावध असलेल्यांना इशारा देऊन ते दुर्जनांच्या कपटी योजनांतून त्यांची सुटका देखील करू शकतात.
धार्मिकांचे आणि दुर्जनांचे काय होईल? शलमोन उत्तर देतो: “दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु धार्मिकांचे घर टिकते.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:७) एका संदर्भ ग्रंथानुसार घर म्हणजे, “घराणे आणि एका व्यक्तीला बहुमोल वाटत असलेले सर्वकाही ज्यामुळे त्याला खरोखर जिवंत राहणे शक्य होते.” ते कुटुंबाला आणि धार्मिकाच्या संतानालाही लागू होऊ शकते. मात्र ही गोष्ट स्पष्ट आहे की: धार्मिक संकटातही स्थिर राहील.
नम्र जन उत्कर्ष पावतील
सुज्ञतेच्या महत्त्वावर जोर देऊन, इस्राएलचा राजा म्हणतो: “मनुष्याची प्रशंसा त्याच्या [“मुखातील,” NW] सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:८) सुज्ञ मनुष्य अविचाराने बोलत नाही. बोलण्याआधी तो विचार करतो आणि अशारीतीने इतरांसोबत त्याचे शांतिपूर्ण संबंध असतात कारण ‘मुखातील सुज्ञतेमुळे’ तो आपले शब्द विचारपूर्वक निवडतो. मूर्खतेचे किंवा निराधार प्रश्न त्याला विचारले जातात तेव्हा सुज्ञ मनुष्य “आपले शब्द आवरतो.” (नीतिसूत्रे १७:२७, पं.र.भा.) अशा मनुष्याची प्रशंसा होते आणि त्याने यहोवा प्रसन्न असतो. ‘कुटिल हृदयातून’ येणारे कुटिल विचार व्यक्त करणाऱ्या मनुष्यापासून असा मनुष्य किती वेगळा असतो!
होय, सुज्ञ मनुष्याची प्रशंसा होते पण पुढील नीतिसूत्रात नम्रतेचे महत्त्व शिकवले गेले आहे. त्यात म्हटले आहे: “जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजावयाचा.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:९) शलमोन येथे असे म्हणत असावा की, समाजात उच्च स्थान मिळवण्याकरता जीवनातील आवश्यक गोष्टी मुकण्यापेक्षा कमी संपत्ती आणि एकच नोकर बरा. आपल्याकरता किती मोलवान सल्ला—अंथरूण पाहून पाय पसरावेत!
शेतकऱ्यांच्या जीवनातून चांगुलपणाचे धडे
शेतकऱ्यांच्या जीवनाचे उदाहरण वापरून शलमोन चांगुलपणासंबंधी दोन धडे शिकवतो. तो म्हणतो, “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:१०) धार्मिक मनुष्य आपल्या जनावरांची चांगली देखरेख करतो. त्याला त्यांच्या गरजा ठाऊक असतात आणि त्यांची त्याला काळजी असते. दुष्ट व्यक्ती कदाचित जनावरांबद्दल आपल्याला काळजी आहे असे बोलून दाखवेल परंतु त्यांच्या गरजांविषयी त्याला खरी चिंता वाटत नसते. तो स्वार्थी असतो, आणि जनावरांकडून किती फायदा घडेल यानुसार तो त्यांना वागवतो. अशा मनुष्याला आपण आपल्या जनावरांची चांगली काळजी घेत आहोत असे वाटेल पण खरे पाहता तो क्रूर वागणूक देत असेल.
जनावरांना चांगली वागणूक देण्याचे तत्त्व पाळीव प्राण्यांनाही लागू करता येते. पाळीव प्राणी ठेवून नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्याशी कठोरतेने वागून त्यांचे हाल करावेत हे किती क्रूरपणाचे असेल! गंभीर रोग किंवा ईजा झाल्यामुळे फार हाल झालेल्या प्राण्याचा अंत करणे चांगुलपणाचे कार्य ठरेल.
शेतकरी जीवनाच्या आणखी एका पैलूचे—जमिनीची मशागत करण्याचे—उदाहरण देऊन शलमोन म्हणतो: “जो आपल्या जमिनीची मशागत करतो, तो भाकरीने तृप्त होईल.” होय, अर्थपूर्ण मेहनतीच्या कामाचे चांगले प्रतिफळ लाभते. “पण जो निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो, तो अक्कलशून्य होय.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:११, सुबोध भाषांतर) चांगली निर्णयशक्ती किंवा समज नसल्यामुळे “अक्कलशून्य” मनुष्य अर्थहीन, धोक्याच्या आणि निरुपयोगी व्यापाराच्या मागे लागतो. या दोन वचनांमधील धडे अगदी स्पष्ट आहेत: दयाळु आणि मेहनती असा.
धार्मिक उत्कर्ष पावतो
“दुष्ट लोकांस मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करितो.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:१२अ) दुष्ट मनुष्य हे कसे करतो? दुष्ट मार्गांनी मिळणाऱ्या फायद्याची तो इच्छा धरतो.
चांगल्या मनुष्याविषयी काय? तो शिस्तप्रिय असतो आणि विश्वासात मुळावलेला असतो. तो धार्मिक आणि न्यायी, शहाणा आणि नम्र, दयाळु आणि मेहनती असतो. शलमोन म्हणतो, “धार्मिकांचे मूळ फळ देते.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १२:१२ब) “धार्मिकांचे मूळ कायम टिकेल,” असे ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन यात म्हटले आहे. असा मनुष्य स्थिर आणि सुरक्षित असतो. होय, ‘चांगला मनुष्य देवाजवळून अनुग्रह पावतो.’ तर मग, आपण ‘यहोवावर भाव ठेवून सदाचाराने वागू या.’—स्तोत्र ३७:३.
[३१ पानांवरील चित्रे]
एखाद्या डौलदार वृक्षाप्रमाणे, धार्मिकाचा विश्वास पक्का मुळावलेला असतो