मृत्यूदंड दिलेल्या यहोवाच्या साक्षीदारांचा स्मृतिदिन
मार्च ७, २००२ रोजी, पश्चिम हंगेरीतील कोरमंड येथील एका शहरात एका स्मृतिपाटीचे अनावरण करण्यात आले. ही स्मृतिपाटी १९४५ साली नात्सींनी ठार मारलेल्या तीन यहोवाच्या साक्षीदारांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ आहे.
ही पाटी, हुन्यादी रोडवरील अग्नीशामक विभागाच्या सध्याच्या मुख्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आली आहे; याच ठिकाणी सार्वजनिकरीत्या मृत्यूदंड दिले जायचे. ही पाटी, १९४५ सालच्या मार्च महिन्यात धार्मिक कारणामुळे युद्धात भाग घेण्यास नकार दिल्याने मृत्यूदंडांची शिक्षा दिलेल्या ख्रिश्चनांच्या स्मरणार्थ लावण्यात आली होती. ॲन्टल होनीच (१९११-१९४५), बर्टलन साबो (१९२१-१९४५), यानोश झॉन्डोर (१९२३-१९४५), २००२, यहोवाचे साक्षीदार.”
दुसऱ्या महायुद्धाचा अंत व्हायच्या फक्त दोन महिन्यांआधीच या साक्षीदारांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. पण कोणत्या कारणासाठी त्यांना मरणदंड मिळाला? वाश नेपे नावाच्या हंगेरियन दैनिकात याप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले होते: “जर्मनीत हिटलर सत्तेवर आल्यानंतर केवळ यहुदीच नव्हे तर विश्वासू यहोवाच्या साक्षीदारांचा देखील छळ, व त्यांना यातना देणे सुरू झाले; आपले धार्मिक विश्वास सोडण्यास नकार दिल्यास त्यांची बंधनागृहांमध्ये रवानगी व्हायची, आणि त्यांना ठार मारले जायचे. . . . १९४५ सालच्या मार्च महिन्यात, हंगेरीच्या पश्चिम भागावर दहशतीचे साम्राज्य होते. . . . यहोवाच्या साक्षीदारांच्या सदस्यांना हद्दपार करून त्यांना ठार मारणे हेही या दहशतीचा एक भाग होते.”
पाटीच्या अनावरणाचा कार्यक्रम दोन भागांत विभाजित करण्यात आला होता. पहिला भाग, बाटथ्यान्यी कॅसल नावाच्या थिएटरमध्ये झाला; येथे भाषण दिलेल्या वक्त्यांपैकी, बुडापेस्टमधील होलोकास्ट डॉक्यूमेंटेशन सेंटरचे प्रमुख प्राध्यापक साबोच सीटा; मानवी हक्क, अल्पसंख्याक आणि धार्मिक बाबींच्या संसदीय समितीचे सदस्य लास्लो डोनच; आणि मृत्यूदंड देताना हजर असलेले व सध्या नगर इतिहासकार असलेले कालमन कोम्याची हे होते. ५०० पेक्षा अधिक उपस्थित असलेले प्रेक्षक मग, कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागासाठी, कोरमंडचे महापौर, योसेफ होनफी यांच्या हस्ते पाटीचे अनावरण करण्यासाठी थिएटरपासून चालत गेले.
आपल्या शेवटल्या पत्रात, यान झॉन्डोर (यानोश झॉन्डोर) या साक्षीदाराने आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींना दुःख न करण्यास आर्जवले. त्याने लिहिले: “माझ्या मनात, ‘मरेपर्यंत तू विश्वासू राहा’ हे प्रकटीकरण २:१० मधील योहानाचे शब्द अजूनही आहेत. घरी सर्वांना, दुःख करीत बसू नका म्हणून सांगणे, कारण मला गुन्हेगार म्हणून शिक्षा मिळालेली नाही तर सत्यासाठी मला मरणदंड मिळाला आहे.”
[३२ पानांवरील चित्र]
बर्टलन साबो
[३२ पानांवरील चित्र]
ॲन्टल होनीच
[३२ पानांवरील चित्र]
यान झॉन्डोर