“कसरत कर”
सर्वात जलद, सर्वात उंच, सर्वात बलशाली! प्राचीन ग्रीस व रोममधील खेळाडूंपुढे हे आदर्श मांडून त्यांना महत्त्वाकांक्षी बनण्याचे उत्तेजन दिले जायचे. अनेक शतकांपर्यंत, ऑलंपिया, डेल्फाय, निमिय आणि करिंथ येथील इस्थमस येथे हजारो प्रेक्षकांसमोर भव्य सामने व्हायचे आणि खेळाडूंवर दैवतांचे “आशीर्वाद” मागितले जायचे. अनेक वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर या खेळाडूंना स्पर्धेत उतरण्याची संधी मिळायची. विजयी वीरांवर आणि ते ज्या शहरांतून येत त्या शहरांवर गौरवाचा वर्षाव व्हायचा.
अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वातावरणात, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी ख्रिश्चनांच्या आध्यात्मिक शर्यतीची तुलना खेळांबरोबर का केली असावी यात आश्चर्य ते काय. पेत्र आणि पौल या दोघा प्रेषितांनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिक्षणाचे जबरदस्त मुद्दे सांगण्यासाठी खेळांवर आधारित दाखल्यांचा उपयोग केला. आपल्या दिवसांतही, त्याच गतीने ख्रिस्ती शर्यत चालू आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना यहुदी व्यवस्थीकरणाला तोंड द्यावे लागले; आज आपल्याला नाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या जगव्याप्त व्यवस्थीकरणाबरोबर ‘युद्ध’ करावे लागते. (२ तीमथ्य २:५; ३:१-५) काहींना त्यांची व्यक्तिगत ‘विश्वासाची स्पर्धा’ कधीही न संपणारी व थकवा आणणारी आहे असे वाटण्याची शक्यता आहे. (१ तीमथ्य ६:१२, सुबोध भाषांतर) बायबलमध्ये खेळांशी केलेल्या काही तुलनांचे परीक्षण केल्यास आपल्याला फायदेकारक धडे शिकता येतील.
उत्तम प्रशिक्षक
खेळाडूचे यश हे पुष्कळ प्रमाणात प्रशिक्षकावर अवलंबून असते. प्राचीन खेळांविषयी, आर्कियॉलॉजिया ग्रीका या पुस्तकात असे म्हटले आहे: “सामन्यांच्या तयारीसाठी सतत दहा महिने तयारी केल्याची खेळाडूंना शपथ घ्यावी लागायची.” ख्रिश्चनांना देखील कडक प्रशिक्षणाची गरज आहे. पौलाने, ख्रिस्ती वडील असलेल्या तीमथ्याला सल्ला दिला: “सुभक्तीविषयी कसरत [“स्वतःला प्रशिक्षित,” NW] कर.” (१ तीमथ्य ४:७) ख्रिस्ती “खेळाडूचा” प्रशिक्षक कोण आहे? दुसरे तिसरे कोणी नव्हे तर स्वतः यहोवा देव! प्रेषित पेत्राने लिहिले: “सर्व कृपेचा देव . . . स्वतः तुम्हांस प्रशिक्षण देईल, दृढ व सबळ करील.” (तिरपे वळण आमचे.)— १ पेत्र ५:१०, NW.
थिओलॉजिकल लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टामेंटनुसार, ‘तुम्हास प्रशिक्षण देईल’ हा वाक्यांश एका ग्रीक क्रियापदातून येतो ज्याचा मूळ अर्थ, “एखाद्या वस्तूला [अथवा व्यक्तीला] एखाद्या उद्देशासाठी लायक बनवणे, तयार करणे आणि ज्यासाठी ती वापरली जाणार आहे त्यानुसार तिच्यात आवश्यक फेरबदल करणे.” तसेच, लिडेल व स्कॉट यांच्या ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन यात असे म्हटले आहे, की या क्रियापदाची व्याख्या “तयार करणे, प्रशिक्षण देणे किंवा पूर्णपणे सज्ज करणे” अशीही केली जाऊ शकते. कोणकोणत्या मार्गांनी यहोवा आपल्याला, कठीण ख्रिस्ती शर्यतीसाठी ‘तयार करतो, प्रशिक्षण देतो व पूर्णपणे सज्ज करतो?’ हे समजण्यासाठी प्रशिक्षकांनी कोणत्या पद्धतींचा अवलंब केला त्यांचा आपण जरा विचार करू या.
प्राचीन ग्रीसमधील ऑलंपिक खेळ (इंग्रजी), नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “तरुणांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक दोन मूलभूत पद्धतींचा वापर करीत; पहिली पद्धत, उत्तम परिणाम मिळवण्याकरता होता होईल तितका शारीरिक प्रयत्न करण्याचे विद्यार्थ्याला उत्तेजन देणे आणि दुसरी पद्धत, विद्यार्थ्याची कार्य करण्याची पद्धत, रीत यांत सुधारणा करणे.”
तसेच, यहोवा देखील आपल्याला, आपल्या कमाल क्षमतेपर्यंत पोहंचण्याचे व त्याच्या सेवेतील आपली कौशल्ये सुधारण्याचे उत्तेजन देतो, शक्ती देतो. आपला देव आपल्याला, बायबल, पृथ्वीवरील त्याची संघटना आणि प्रौढ सहख्रिस्ती यांच्याद्वारे प्रेरणा देतो. कधीकधी ताडन करण्याद्वारे तो आपल्याला प्रशिक्षण देतो. (इब्री लोकांस १२:६) इतर वेळी, तो कदाचित आपल्यावर परीक्षा किंवा कठीण प्रसंग येऊ देतो जेणेकरून आपण धीर विकसित करू शकतो. (याकोब १:२-४) पण तो आपल्याला लागणारी शक्ती देखील पुरवतो. यशया संदेष्ट्याने म्हटले: “परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”—यशया ४०:३१.
या सर्वांहून अधिक म्हणजे, देव आपल्याला मुक्तहस्ते त्याचा पवित्र आत्मा देतो ज्यामुळे आपल्याला त्याची ग्रहणीय पद्धतीने सेवा करण्यास बळकटी मिळते. (लूक ११:१३) पुष्कळ बाबतीत, देवाच्या सेवकांना अनेक काळापर्यंत विश्वासाच्या कठीण परिक्षांचा सामना करावा लागला आहे. ते तुमच्या-आमच्या सारखेच सर्वसामान्य लोक होते. पण देवावर त्यांनी संपूर्ण भरवसा ठेवला होता म्हणूनच ते या परीक्षांत यशस्वीरीत्या तग धरू शकले. खरेच, “सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही.”—२ करिंथकर ४:७.
सहानुभूतीशील प्रशिक्षक
प्राचीन प्रशिक्षकांची एक जबाबदारी, “प्रत्येक खेळाडूला व विशिष्ट खेळाकरता कोणत्या प्रकारच्या व किती प्रमाणात व्यायामाची आवश्यकता आहे ही ठरवण्याची होती,” असे एक विद्वान म्हणतात. देव आपल्याला प्रशिक्षण देतो तेव्हा तो प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाच्या क्षमता, घडण आणि मर्यादा यांची जाणीव ठेवतो. यहोवाकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान बहुतेकदा आपण ईयोबाप्रमाणे त्याला अशी विनंती करतो: “तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडिले आहे हे मनात आण.” (ईयोब १०:९) मग आपल्या प्रशिक्षकाची काय प्रतिक्रिया असते? दाविदाने यहोवाविषयी लिहिले: “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:१४.
तुम्हाला कदाचित एखादी गंभीर आरोग्य समस्या असेल ज्यामुळे तुम्ही सेवेमध्ये मर्यादित भाग घेऊ शकता किंवा स्वतःबद्दल तुम्हाला हीनतेच्या भावना असतील. तुम्ही कदाचित एखादी वाईट सवय सोडण्याचा बराच प्रयत्न करीत असाल किंवा शेजारातील, कामाच्या ठिकाणातील किंवा शाळेतील समवस्यकांच्या दबावाला तुम्ही यशस्वीरीत्या तोंड देऊ शकत नसाल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला तरी, इतर कोणाही पेक्षा—तुमच्या स्वतःपेक्षाही—यहोवाला तुमची समस्या नीट कळते, हे मात्र तुम्ही कधीही विसरू नका. तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर काळजी घेणाऱ्या प्रशिक्षकाप्रमाणे तो सदैव तुम्हाला मदत करायला तयार आहे.—याकोब ४:८.
प्राचीन काळच्या प्रशिक्षकांना, “खेळाडूंना आलेला थकवा किंवा अशक्तपणा कशामुळे आला होता हे सांगता येत असे; व्यायामांमुळे नव्हे तर इतर मानसिक कारणांमुळे जसे की, वाईट मनःस्थिती, तणाव, किंवा आणखी दुसऱ्या कारणामुळे हे खेळाडू थकले होते किंवा अशक्त झाले होते हे ते सांगू शकत होते. . . . प्रशिक्षकांना इतकी मोकळीक होती, की ते खेळाडूंच्या व्यक्तिगत जीवनातही ते काय करतात व करत नाहीत हे पाहायचे आणि कधीकधी त्यांना वाटल्यास ते हस्तक्षेपही करायचे.”
या जगाकडून सतत येणाऱ्या दबावांमुळे व मोहपाशांमुळे तुम्हाला कधीकधी थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो का? तुमचा प्रशिक्षक या नात्याने यहोवाला तुमची खूप काळजी वाटते. (१ पेत्र ५:७) कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक अशक्तपणाचे किंवा थकव्याचे चिन्ह त्याला लगेच दिसते. मानवांच्या इच्छा स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिगत निवडीचा यहोवा आदर करतो, पण आपल्या चिरकालिक कल्याणाची त्याला काळजी असल्यामुळे तो आपल्याला लागणारी भरपूर मदत व सुधारणूकही देतो. (यशया ३०:२१) ती कशी? बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने, मंडळीतील आध्यात्मिक वडील आणि आपला प्रेमळ बंधूसमाज यांद्वारे.
“सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन”
अर्थातच, यशस्वी होण्याकरता केवळ एक चांगला प्रशिक्षक असणे पुरेसे नव्हते. पुष्कळ गोष्टी स्वतः खेळाडूंवर आणि कडक प्रशिक्षणासाठी त्याने घेतलेल्या शपथेवर अवलंबून होत्या. नियम अतिशय कडक होते कारण प्रशिक्षणात, शारीरिक संभोग आणि मद्यपान यांपासून दूर राहण्याविषयी तसेच आहाराविषयी कडक नियम होते. सा.यु.पू. पहिल्या शतकातील होरेस नामक एका कवीने म्हटले, की “आस धरलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी” स्पर्धक “स्त्रिया आणि द्राक्षारस” यांपासून दूर राहात होते. आणि एफ. सी. कूक या बायबल विद्वानाच्या मते, खेळांत भाग घेणाऱ्यांना, “दहा महिन्यांसाठी . . . आत्म-संयम बाळगून . . . आहाराच्या बाबतीत कडक नियम पाळावे लागायचे.”
करिंथमधील ख्रिश्चनांना लिहिताना पौलाने याच उदाहरणाचा वापर केला; हे असे शहर होते ज्याला जवळच्या इस्थमियन खेळांची माहिती होती. त्याने लिहिले: “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.” (१ करिंथकर ९:२५) खरे ख्रिस्ती या जगाची भौतिक, अनैतिक व अशुद्ध जीवनशैली टाळतात. (इफिसकर ५:३-५; १ योहान २:१५-१७) अभक्त आणि शास्त्राला धरून नसलेले गुण काढून टाकून त्याऐवजी ख्रिस्तासारखे गुण विकसित करण्याची गरज आहे.—कलस्सैकर ३:९, १०, १२.
हे कसे केले जाऊ शकते? एका जबरदस्त उदाहरणाद्वारे पौल या प्रश्नाचे उत्तर कसे देतो ते पाहा: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२७.
पौलाने येथे किती प्रभावशाली मुद्दा मांडला! पौल येथे स्वतःला पीडा देण्याची शिफारस करत नाही. तर स्वतःबरोबरच त्याला झगडावे लागत असल्याचे कबूल करतो. कधीकधी, तो अशा गोष्टी करायचा ज्या करण्याची त्याची इच्छा नव्हती आणि ज्या गोष्टी करायची त्याची इच्छा होती त्या तो करीत नव्हता. पण त्याच्या कमतरतेने त्याच्यावर कब्जा करू नये म्हणून तो झगडला. त्याने ‘आपले शरीर कुदलले,’ शारीरिक इच्छा व गुणांवर काबू ठेवण्यास तो झटला.—रोमकर ७:२१-२५.
सर्व ख्रिश्चनांना असेच करण्याची गरज आहे. करिंथमधील काही जे पूर्वी व्यभिचार, मूर्तीपूजा, समलैंगिकता, चोरी, वगैरे करायचे त्यांनी बदल केल्याचे सांगितले आहे. कशामुळे ते असा बदल करू शकले? देवाचे वचन, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तसेच साथ देणारा त्यांचा आत्म-निश्चय, यांमुळेच ते असा बदल करू शकले. पौलाने म्हटले: “तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.” (१ करिंथकर ६:९-११) पेत्राने देखील अशा लोकांविषयी लिहिले ज्यांनी अशा वाईट सवयी सोडून दिल्या होत्या. ख्रिस्ती या नात्याने त्यांनी खरोखरच खूप बदल केले होते.—१ पेत्र ४:३, ४.
उद्देशपूर्ण प्रयत्न
आध्यात्मिक ध्येयांचा पाठलाग करण्यावर आपल्या एकनिष्ठ व स्पष्ट लक्ष्याविषयी सांगताना पौलाने उदाहरण दिले: ‘मी वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही.’ (१ करिंथकर ९:२६) एक पटाईत स्पर्धक कोणत्या दिशेने मुष्टिप्रहार करील? या प्रश्नाचे उत्तर, ग्रीक आणि रोमनांचे जीवन (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात दिले आहे: “फक्तच रानटीपणे शक्तिप्रदर्शनाची आवश्यकता नव्हती तर प्रतिस्पर्ध्याचे कमजोर भाग पाहणाऱ्या चाणाक्ष नजरेची देखील आवश्यकता होती. तसेच, कुस्तींच्या शाळांमध्ये शिकवण्यात आल्याप्रमाणे मारायचे विशिष्ट गुद्दे आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची चपळता, हे काही कमी महत्त्वाचे नव्हते.”
आपले अपरिपूर्ण शरीर जणू आपला प्रतिस्पर्धक आहे. आपल्याला आपल्या व्यक्तिगत ‘कमजोरीची’ माहिती आहे का? इतरजण आपल्याला ज्याप्रमाणे पाहतात आणि खासकरून सैतान आपल्याला ज्याप्रकारे पाहतो त्याप्रमाणे आपण स्वतःकडे पाहण्यास तयार आहोत का? यासाठी प्रामाणिक आत्म-परीक्षणाची व बदल करण्याच्या इच्छेची गरज आहे. आपण स्वतःला अतिशय सहज फसवू शकतो. (याकोब १:२२) एखाद्या अविचारी कार्यासाठी सबब देणे खूप सोपे आहे. (१ शमुवेल १५:१३-१५, २०, २१) हे “वाऱ्यावर मुष्टिप्रहार” करण्यासारखेच आहे.
या शेवटल्या दिवसांत, यहोवाला संतुष्ट करून जीवन प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी, बरोबर आणि चूक, देवाची मंडळी आणि भ्रष्ट जग यांत निवड करताना मागेपुढे पाहू नये. त्यांनी डळमळीतपणा टाळावा; ‘द्विबुद्धीचे व चंचल’ असू नये. (याकोब १:८) निरर्थक गोष्टींमागे त्यांनी आपले श्रम वाया घालवू नयेत. एक व्यक्ती जेव्हा हा सरळसोट, एक मनाचा मार्ग निवडते तेव्हा ती आनंदी होते आणि ‘तिची प्रगती सर्वांस दिसून येते.’—१ तीमथ्य ४:१५.
होय, ख्रिस्ती शर्यत ही अजूनही चालू आहे. यहोवा आपला प्रशिक्षक, धीर धरण्यास व अंतिम विजय मिळण्यास आवश्यक असलेले प्रशिक्षण व साहाय्य प्रेमळपणे आपल्याला देतो. (यशया ४८:१७) इतर प्राचीन खेळाडूंप्रमाणे आपण देखील स्वतःला शिस्त लावली पाहिजे, आत्म-संयम बाळगला पाहिजे आणि विश्वासाच्या आपल्या लढ्यात एकनिष्ठ राहिले पाहिजे. मग आपल्या उद्देशपूर्ण प्रयत्नांवर यहोवाचा समृद्ध आशीर्वाद असेल.—इब्री लोकांस ११:६.
[३१ पानांवरील चौकट]
‘त्याला तेल लावा’
प्राचीन ग्रीसमध्ये, खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा एक भाग, अभिषेक करणाऱ्याचा देखील होता. व्यायाम करणाऱ्या पुरूषांचा तेलाने अभिषेक करण्याचे त्याचे काम होते. प्रशिक्षकांच्या पाहण्यात आले होते, की “प्रशिक्षणाआधी स्नायूंना अतिशय कुशलतेने चोळल्याने चांगले परिणाम होतात, आणि काळजीपूर्वक व हलक्या हाताने केलेल्या मसाजमुळे शरीरातला सर्व थकवा नाहीसा होत असे व दीर्घ प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर त्यामुळे खेळाडूला आराम मिळत,” असे, प्राचीन ग्रीसमधील ऑलंपिक सामने (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले होते.
शरीराचा थकवा दूर करण्यासाठी, रोगोपचारासाठी जसे तेल शरीरावर चोळले जाते तसेच एका थकलेल्या ख्रिस्ती ‘खेळाडूला’ देवाच्या वचनाचे मलम चोळल्यास त्याची सुधारणूक होऊ शकते, त्याला दिलासा मिळू शकतो आणि तो बराही होऊ शकतो. म्हणूनच यहोवाच्या मार्गदर्शनाखाली, अशा मनुष्यासाठी प्रार्थना करण्याचा अर्थात लाक्षणिक अर्थाने ‘प्रभूच्या नावाने त्याला तेल लावण्याचा’ सल्ला मंडळीतील वडिलांना देण्यात आला आहे; आध्यात्मिकरीत्या बरे करण्याकरता ही सर्वात महत्त्वपूर्ण उपचारपद्धत आहे.—याकोब ५:१३-१५; स्तोत्र १४१:५.
[३१ पानांवरील चित्र]
बली चढवल्यानंतर खेळाडू, दहा महिन्यांची तालीम घेतल्याची शपथ घ्यायचे
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]
Copyright British Museum