वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w02 ६/१५ पृ. २६-२९
  • रोमी इतिहासातून एक उद्‌बोधक धडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रोमी इतिहासातून एक उद्‌बोधक धडा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्पर्धक आणि त्यांचे प्रशिक्षण
  • आखाड्यात एक दिवस
  • प्रेक्षकांवर होणारा परिणाम
  • स्पष्ट बोध
  • पहिल्या शतकातील मनोरंजन जगत
    सावध राहा!—२००७
  • ही त्यांची करमणूक
    सावध राहा!—१९९७
  • “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • प्राचीन क्रीडासामने आणि विजय प्राप्त करण्याचे महत्त्व
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
w02 ६/१५ पृ. २६-२९

रोमी इतिहासातून एक उद्‌बोधक धडा

“इफिसात मी श्‍वापदाबरोबर लढाई केली.” काहींचे असे म्हणणे आहे की १ करिंथकर १५:३२ येथे लिहिलेल्या या शब्दांवरून असे कळते, की प्रेषित पौलाला रोमी आखाड्यात लढण्याची शिक्षा देण्यात आली होती. हे खरे असो वा नसो, पण त्याकाळी आखाड्यांत मरेपर्यंत लढण्याचा प्रकार सर्वसामान्य होता. रोमी लोकांच्या या आखाड्यांबद्दल इतिहास आपल्याला काय माहिती देतो?

ख्रिस्ती या नात्याने आपण आपल्या विवेकाला यहोवाच्या विचारसरणीनुसार आकार देऊ इच्छितो, जेणेकरून आपल्याला लोकप्रिय मनोरंजनाविषयी निर्णय घेण्यास मदत होईल. याचा एक पैलू आहे हिंसाचार; याविषयी देवाचे विचार काय आहेत हे समजण्याकरता पुढील शब्दांवर विचार करा: “जुलूम करणाऱ्‍याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको.” (नीतिसूत्रे ३:३१) रोमन असिक्रीडकांचे (ग्लॅडिएटर्स) सामने त्या काळात अतिशय लोकप्रिय होते, पण सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांना याबाबतीत मार्गदर्शक सल्ला देण्यात आला होता. अशा प्रकारच्या सामन्यांत सहसा काय घडायचे यावर विचार करताना आज ख्रिश्‍चनांना यातून कोणता धडा शिकायला मिळतो याकडे आपण लक्ष देऊ या.

रोमन आखाड्यात दोन शस्त्रसज्ज असिक्रीडक एकमेकांच्या पुढ्यात उभे आहेत. ढालीवर तलवारीचा पहिला वार होताच उत्तेजित जमाव आपल्या आवडत्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्याकरता आनंदाने जल्लोष करू लागतो. दोन्ही स्पर्धक शक्‍ती पणाला लावून लढतात. काही वेळातच, त्यांपैकी एकजण घायाळ झालेला असतो; नाईलाजाने तो आपले शस्त्र टाकून देतो आणि गुडघे टेकतो. याचा अर्थ त्याने पराजय स्वीकारला असून तो दयेची भीक मागत आहे. एव्हाना जमाव बेहोष होऊन ओरडत असतो. काहीजण दया दाखवण्याच्या पक्षात असतात तर काहीजण त्याला ठार मारण्याची मागणी करतात; सर्वांची नजर आता सम्राटावर खिळली आहे. जमावाची मागणी लक्षात घेऊन तो पराजित स्पर्धकाला मुक्‍त करू शकतो किंवा अंगठा खालच्या दिशेने दाखवून त्याला मारून टाकण्याचा इशारा करू शकतो.

रोमी लोक असिक्रीडकांच्या सामन्यांविषयी अतिशय उत्साही होते. तुम्हाला कदाचित हे जाणून आश्‍चर्य वाटेल की सुरवातीला हे सामने प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या अंत्यविधीच्या प्रसंगी होत असत. सध्याच्या मध्य इटलीत एकेकाळी वसणाऱ्‍या ऑस्कन किंवा सॅम्नाईट लोकांमध्ये असलेल्या नरबळीच्या प्रथेतून या सामन्यांची सुरवात झाली असावी असा समज आहे. हे बळी मृतांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता दिले जात असत. अशाप्रकारच्या सामन्याला मूनुस अर्थात “बक्षीस” (अनेकवचन, मूनेरा) म्हटले जायचे. रोममध्ये घडलेल्या पहिल्या सामन्यांचा अहवाल सा.यु.पू. २६४ इतका जुना आहे; गुरांच्या बाजारात असिक्रीडकांच्या तीन जोड्यांमध्ये हे सामने झाले होते. मार्कस एमिलियस लेपिडस याच्या अंत्यविधीच्या प्रसंगी २२ द्वंद्वयुद्धे खेळली गेली. पुब्लियस लिसिनियस याच्या अंत्यविधीदरम्यान ६० जोड्या एकमेकांशी झुंजल्या. सा.यु.पू. ६५ साली ज्युलियस सीझरने ३२० योद्ध्‌यांच्या जोड्यांना आखाड्यात उतरवले.

कीथ हॉप्किन्स म्हणतात, की त्याकाळी “अमीर उमरावांचे अंत्यविधी राजकीय स्वरूपाच्या घटना असायच्या आणि अंत्यविधीदरम्यान खेळल्या जाणाऱ्‍या या सामन्यांमागे राजकीय हेतू होते. . . . कारण राजकीय नेत्यांना निवडून देणाऱ्‍या नागरिकांत हे सामने अतिशय लोकप्रिय होते. किंबहुना, महत्त्वाकांक्षी उमरावांमधील प्रतिस्पर्धेमुळेच असिक्रीडकांचे खेळ नावारूपास आले.” ऑगस्टसच्या कारकीर्दीदरम्यान (सा.यु.पू. २७ ते सा.यु. १४), श्रीमंत अधिकारी आपला राजकीय हुद्दा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने लोकांच्या करमणुकीकरता हे खेळ अर्थात मूनेरा त्यांना खर्चीक बक्षीसांच्या रूपात देऊ लागले.

स्पर्धक आणि त्यांचे प्रशिक्षण

तुम्ही कदाचित विचार करत असाल की या स्पर्धेत भाग घेणारे ‘असिक्रीडक कोण असावेत?’ हे गुलाम, मरणदंड ठोठावण्यात आलेले अपराधी, युद्धकैदी किंवा जोशामुळे अथवा नावलौकिकाच्या व धनाच्या लालसेने भाग घेण्यास प्रवृत्त झालेले सर्वसामान्य पुरुषही असू शकतात. या सर्वांना तुरुंगासारख्या शाळांमध्ये प्रशिक्षित केले जायचे. जोकी ए स्पेताकोली (खेळ व तमाशे) या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, प्रशिक्षणादरम्यान “[असिक्रीडकांवर] शिपायांची सतत पाळत असायची, त्यांना अत्यंत कठोर शिस्तीत राहावे लागायचे, अतिशय कठीण नियम आणि कमालीच्या निष्ठुर शिक्षा दिल्या जायच्या . . . अशा कठोर शिस्तीमुळे कित्येकदा आत्महत्या, दंगली व विद्रोह यांसारखे प्रकार घडायचे.” रोमच्या सर्वात मोठ्या असिक्रीडक शाळेत कमीतकमी एक हजार जणांच्या राहण्याची सोय होती. प्रत्येक पुरुषांची काहीतरी खासियत असायची. काहीजण चिलखत घालून, ढाल व तरवार घेऊन लढायचे तर इतर जण जाळी व त्रिशूळ घेऊन. आणखी काही जणांना एका विशिष्ट लोकप्रिय खेळपद्धतीने जंगली श्‍वापदांचा सामना करण्यासाठी तयार करून घेतले जायचे. याला शिकार म्हटले जायचे. पौल कदाचित अशाचप्रकारच्या खेळाविषयी तर बोलत नसावा?

हे खेळ आयोजित करणारे, प्रायोजकांची मदत घ्यायचे. हे प्रायोजक १७ ते १८ वर्षीय मुलांना भरती करून त्यांना असिक्रीडक होण्याचे प्रशिक्षण द्यायचे. माणसांची खरेदी-विक्री त्या काळात एक अतिशय नफ्याचा व्यापार होता. युद्धात विजय मिळवल्यानंतर त्राजनने विजयोत्सवप्रसंगी करवलेल्या एका असाधरण खेळात १०,००० असिक्रीडकांनी व ११,००० प्राण्यांनी भाग घेतला.

आखाड्यात एक दिवस

सकाळी सहसा आखाड्यात शिकार म्हटलेले खेळ व्हायचे. सर्व प्रकारच्या हिंस्र प्राण्यांना आखाड्यात सोडले जायचे. बैल आणि अस्वलाची झुंज प्रेक्षकांची आवडती होती. सहसा हे दोन प्राणी एकमेकांना बांधले जायचे. त्यांपैकी एक मरेपर्यंत ते लढायचे, व यानंतर जिवंत बचावलेल्या प्राण्याला शिकारी मारून टाकायचा. याचप्रकारे, सिंह विरुद्ध वाघ किंवा हत्ती विरुद्ध अस्वलांचे सामने देखील लोकप्रिय होते. साम्राज्याच्या कानाकोपऱ्‍यांतून निरनिराळे प्राणी—बिबळे, गेंडे, पाणघोडे, जिराफ, तरस, उंट, लांडगे, रानडुक्कर आणि हरीण वाटेल त्या किंमतीने मोल देऊन आणले जायचे आणि शिकारी या विलक्षण प्राण्यांची कत्तल करण्यात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करायचे.

या शिकार खेळांना अविस्मरणीय बनवण्याकरता वेगवेगळे बनावटी देखावे तयार केले जायचे. जंगलाचा भास निर्माण करण्याकरता खडक, तलाव आणि झाडे यांचा उपयोग केला जायचा. काही आखाड्यांत जमिनीखालून वर उचलण्याच्या यंत्राने आणि चेरदरवाजांच्या साहाय्याने हे प्राणी जादुईपणे प्रकट झाल्याचा भास निर्माण केला जायचा. शिवाय प्राण्यांच्या अनपेक्षित प्रतिक्रियांमुळे खेळांत अधिकच रंगत यायची. पण या शिकार खेळांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यातील क्रूरता.

यानंतर देहान्त शिक्षा दिल्या जायच्या. हे देखील अतिशय कल्पकतेने करण्याचा प्रयत्न केला जायचा. पुरातन आख्यायिका नाटकाच्या रूपात दाखवल्या जायच्या, ज्यातील पात्र खरोखर मरायचे.

दुपारी, विशिष्ट शस्त्र घेतलेले आणि वेगवगळ्या युद्धपद्धतींचे प्रशिक्षण असलेले असिक्रीडकांचे गट एकमेकांशी लढत. या सामन्यांत मरण पावणाऱ्‍या स्पर्धकांचे मृतदेह बाहेर फरफटत नेणारे, पाताळ देवतेचा काल्पनिक पोशाख घालत.

प्रेक्षकांवर होणारा परिणाम

जमावाची रक्‍ताची तहान सहजासहजी शमणारी नव्हती; त्यामुळे उत्साहीपणे न लढणाऱ्‍या योद्ध्‌यांना चाबकांचे फटके मारून आणि तापवलेल्या लोखंडी सळ्यांचे डाग देऊन चिथावले जायचे. जमाव मोठमोठ्याने ओरडाओरड करायचे: “तो असा मिंध्यासारखा काय लढतोय? असा शक्‍ती नसल्यासारखा काय तरवार चालवतोय? [मर्दासारखा] मरत का नाही? चाबकाचे फटके द्यावे म्हणजे कसा लढत नाही ते पाहू! निधड्या छातीने एकमेकांचे वार झेला!” रोमन मुत्सद्दी सेनेका याच्या लिखाणानुसार खेळांमधील मध्यांतरात एकदा ही घोषणा करण्यात आली: “खेळ पुन्हा सुरू होईपर्यंत मधल्या काळात प्रेक्षकांच्या करमणुकीकरता आणखी थोडी गळेकापी!”

साहजिकच, सेनेका कबूल करतो की हे खेळ पाहून तो घरी परतला तो “आणखी थोडा क्रूर व अमानुष” होऊनच. या प्रेक्षकाची ही स्पष्ट कबुली गांभीर्याने विचार करण्याजोगी आहे. आजच्या काळातले काही खेळ पाहायला जाणाऱ्‍यांवर देखील अशाच प्रकारे परिणाम होत असावा का? ते देखील ‘आणखी थोडे क्रूर व अमानुष होऊन’ घरी परतत असावेत का?

रोमी आखाड्यांतील खेळ पाहायला येणाऱ्‍या काहीजणांना तर घरी परतायलाच मिळायचे नाही. एकदा एका प्रेक्षकाने डॉमिशियन सम्राटाबद्दल काहीतरी विनोद केला तेव्हा सम्राटाने चक्क त्याला त्याच्या जागेवरून फरफटत नेऊन कुत्र्यांसमोर फेकण्याचा हुकूम सोडला. देहान्त शिक्षेकरता पुरेसे अपराधी नव्हते तेव्हा कॅलिग्युलाने प्रेक्षकांपैकी काहीजणांना जबरदस्तीने प्राण्यांसमोर फेकण्याचे फर्मान सोडले. आणि सम्राट क्लॉडियसला एके प्रसंगी जेव्हा रंगभूमीवरील यांत्रिक व्यवस्था आवडली नाही तेव्हा त्याने त्या यांत्रिक बिघाडाला कारणीभूत ठरलेल्या सर्व कर्मचाऱ्‍यांना आखाड्यात लढायला लावले.

प्रेक्षकांच्या अतिरेकी उत्साहामुळेही कधीकधी दुर्घटना व दंगली होत असत. रोमच्या उत्तरेकडे असलेले एक प्रेक्षकागृह कोसळल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. सा.यु. ५९ साली पाँपेईमध्ये एकदा खेळांदरम्यान दंगल सुरू झाली. टॅसिटसच्या वृत्तानुसार स्थानिक जमावाची जवळच्याच एका गावातून आलेल्या प्रतिस्पर्ध्यांशी बाचाबाची झाली; थोड्यावेळाने ते एकमेकांवर दगडफेक करू लागले आणि शेवटी तर त्यांनी तरवारी उपसल्या. कित्येक लोक अपंग व जखमी झाले आणि बरेचजण मरण पावले.

स्पष्ट बोध

अलीकडेच रोममधील कोलसियममध्ये एक प्रदर्शन (सँग ई अरीना, “रक्‍त व वाळू”) भरवण्यात आले होते. या प्रदर्शनातील काही गोष्टी मुनेराची आधुनिक प्रतिरूपे असल्याचा भास झाला. खासकरून यात बैलाची झुंज, व्यावसायिक मुष्टियुद्ध, मोटारींच्या व मोटरसायकलींच्या स्पर्धांतील थरकाप उडवणाऱ्‍या दुर्घटनांची दृश्‍ये, खेळांदरम्यान खेळाडूंची मारामारी आणि प्रेक्षकांची आपसातील दंगलीच्या स्वरूपाची भांडणे दाखवण्यात आली. या देखाव्याच्या शेवटी कोलसियमचे विहंगम दृश्‍य दाखवण्यात आले. यातून प्रदर्शन पाहणाऱ्‍यांना काय निष्कर्ष काढण्याचे सुचवले जात होते? किती जणांना यातून बोध घेता आला असेल?

कुत्र्यांच्या, कोंबड्यांच्या, बैलांच्या झुंजी आणि हिंसाचारी खेळ आज काही देशांत अगदी सर्वसामान्य आहेत. मोटारींच्या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्‍या जमावांच्या करमणुकीकरता जीव धोक्यात घातले जातात. शिवाय दररोज टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या कार्यक्रमांचा विचार करा. एका पाश्‍चात्त्य देशातील अभ्यासांवरून असे निष्पन्‍न झाले की सरासरी वेळ टीव्ही पाहणाऱ्‍या मुलाने दहा वर्षांचे होईपर्यंत १०,००० खून आणि १,००,००० घातक कृत्यांची दृश्‍ये पाहिलेली असतील.

तिसऱ्‍या शतकातील लेखक, टर्टुलियन याने म्हटल्याप्रमाणे या तमाशांतून मिळणारा आनंद “खऱ्‍या धर्मासोबत, आणि खऱ्‍या देवाच्या खऱ्‍या आज्ञापालनाशी सुसंगत नव्हता.” त्याच्या मते हे खेळ पाहायला जाणारे तेथील रक्‍तपातात सामील होते. आजच्याविषयी काय म्हणता येईल? एखादी व्यक्‍ती असा विचार करेल, ‘टीव्ही अथवा इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्‍या रक्‍तपाताची, मृत्यूची व हिंसाचाराची दृश्‍ये पाहून मी स्वतःची करमणूक करतो का?’ स्तोत्र ११:५ (पं.र.भा.) या वचनात काय सांगितले आहे हे आठवणीत ठेवण्याजोगे आहे: “यहोवा न्यायीला पारखतो पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांचा द्वेष करतो.”

[२८ पानांवरील चौकट]

“मृतात्म्यांच्या शांतीकरता” युद्धे

असिक्रीडकांच्या सामन्यांना कशी सुरवात झाली याविषयी तिसऱ्‍या शतकातील लेखक, टर्टुलियन याने म्हटले: “जुन्या लोकांचा असा समज होता की अशाप्रकारच्या काहीशा सुसंस्कृत रूपातील क्रूरतेच्या तमाशांद्वारे मृतात्मे प्रसन्‍न होतील. मृतात्मे मानवी रक्‍ताने शांत होतात अशी धारणा असल्यामुळे जुन्या काळातील लोक अंत्यविधीत निम्न दर्जाच्या युद्धकैद्यांचा व विकत घेतलेल्या गुलामांचा बली द्यायचे. कालांतराने या प्रथेला करमणुकीचे स्वरूप देऊन त्यांनी आपला अधार्मिकपणा लपवण्याचा प्रयत्न केला. योद्धे निवडल्यानंतर, त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्वात चांगल्या शस्त्रांचे शक्य तितक्या चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिले जायचे—एका अर्थाने स्वतःचा घात करून घेण्याचे हे प्रशिक्षण होते!—व यानंतर अंत्यविधीच्या नेमलेल्या दिवशी कबरस्थानात त्यांना ठार मारले जायचे. अशारितीने इतरांचा घात करून ते आपला शोक कमी करायचे. अशाप्रकारे मुनूसची उत्पत्ती झाली. पण या तमाशांत सुधारणा करता करता त्यांतील क्रूरता देखील तितकीच वाढत गेली. आनंदाच्या प्रसंगी हिंस्र पशूंना माणसांच्या शरीराच्या चिंध्या करताना पाहायला न मिळाल्यास करमणूक अर्धवट राहिल्यासारखे वाटे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता दिलेले अर्पण अंत्यविधीचा भाग मानले जात होते.”

[२७ पानांवरील चित्र]

प्राचीन असिक्रीडकांचे टोप आणि मोजे

[२९ पानांवरील चित्रे]

प्राचीन ख्रिस्ती लोकांनी हिंसक करमणुकीला अनुचित मानले. तुम्हीही मानता का?

[चित्राचे श्रेय]

मुष्टियुद्ध: Dave Kingdon/Index Stock Photography; मोटारींची टक्कर: AP Photo/Martin Seppala

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Phoenix Art Museum, Arizona/Bridgeman Art Library

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा