वाचकांचे प्रश्न
एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल, तर अशा वेळी ख्रिस्ती सेवकाने अंत्यविधीचे भाषण देणे उचित ठरेल का?
प्रत्येक ख्रिस्ती सेवकाने देवासमोर शुद्ध विवेक बाळगून, कदाचित आत्महत्या केली असावी अशा व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी त्याला भाषण देता येईल का, हे ठरवले पाहिजे. हे ठरवताना त्याने पुढील प्रश्नांवर विचार केला पाहिजे: आत्महत्येबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे? मरण पावलेल्या व्यक्तीने खरोखर स्वतःचा जीव घेतला का? मानसिक किंवा भावनिक असंतुलनामुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केली का? आत्महत्या केलेल्या व्यक्तीबद्दल समाजातील लोकांचा काय दृष्टिकोन आहे?
ख्रिस्ती या नात्याने आपण, आत्महत्येबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्यास जास्त उत्सुक आहोत. यहोवाच्या नजरेत मानवी जीवन मौल्यवान व पवित्र आहे. (उत्पत्ति ९:५; स्तोत्र ३६:९) हेतुपुरस्सर स्वतःची हत्या करणे म्हणजे आत्मघात करणे व हे यहोवाला मान्य नाही. (निर्गम २०:१३; १ योहान ३:१५) ही वस्तुस्थिती, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी भाषण देण्याला प्रतिबंध घालते का?
इस्राएलच्या शौल राजाच्या उदाहरणाचा विचार करा. पलिष्टी लोकांबरोबरच्या शेवटल्या युद्धात आपण काही वाचणार नाही ही त्याला जाणीव झाली तेव्हा, शत्रूच्या हाती पडून आपले हाल करून घेण्याऐवजी तो “आपली तरवार काढून तिच्यावर पडला.” पलिष्टी लोकांना त्याचा देह सापडला तेव्हा त्यांनी तो बेथ-शानच्या गावकुसास टांगला. पलिष्टी लोकांनी शौलाच्या देहाचे काय केले होते हे समजल्यावर याबेश-गिलादाच्या रहिवाश्यांनी टांगलेला देह उतरवून त्याचे दहन केले. आणि नंतर त्यांनी त्याच्या अस्थी पुरल्या. इस्राएली लोकांच्या पारंपरिक शोकविधीनुसार त्यांनी सात दिवस उपवासही केला. (१ शमुवेल ३१:४, ८-१३; उत्पत्ति ५०:१०) यहोवाचा अभिषिक्त सेवक दावीद याला जेव्हा, याबेश-गिलादच्या रहिवाश्यांनी जे काही केले होते हे कळले तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही आपला स्वामी शौल यास मूठमाती दिली ही तुम्ही त्याजवर दया केली, याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो. आता परमेश्वर तुम्हाशी दयेने व सत्यतेने वर्तो.” (२ शमुवेल २:५, ६) शौल राजाचा अंत्यविधी केल्याबद्दल याबेश-गिलादाच्या रहिवाश्यांची टीका करण्यात आली असे ईश्वरप्रेरणेने लिहिलेल्या अहवालात म्हटलेले नाही. आता, अशा लोकांचा विचार करा ज्यांना, त्यांच्या पापांमुळे पुरण्यात आले नाही. (यिर्मया २५:३२, ३३) शौलाच्या या बायबल अहवालाचा विचार करून, आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी भाषण द्यायचे की नाही हे एक ख्रिस्ती सेवक ठरवील.
अंत्यविधीच्या वेळी भाषण देण्यामागचा हेतू काय आहे यावरही तो कदाचित विचार करील. बाहेरच्या लोकांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास आहे; पण यहोवाचे साक्षीदार, मेलेल्या व्यक्तीला दुसऱ्या एका जगात पाठवावे लागते, असा चुकीचा विश्वास बाळगून अंत्यविधी करत नाहीत. मेलेल्या व्यक्तीला लाभ पोहंचवणे नव्हे तर, शोक करणाऱ्यांना सांत्वन देणे व जमलेल्या लोकांना मृतांच्या स्थितीविषयी सांगणे हा अंत्यविधी करण्यामागचा खास उद्देश आहे. (उपदेशक ९:५, १०; २ करिंथकर १:३-५) अंत्यविधीच्या वेळी भाषण देण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, उपस्थित असलेल्या सर्वांना जीवनाच्या क्षणभंगुरतेवर विचार करायला लावणे. (उपदेशक ७:२) आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी भाषण दिल्याने हे सर्व उद्देश साध्य होतील का?
काहींना असे वाटेल, की आत्महत्या केलेल्या व्यक्तीने जाणूनबुजून आपल्या जीवनाचा अंत केला; आपण यहोवाच्याविरुद्ध पाप करत आहोत याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव होती. परंतु प्रत्येक वेळी असा पुराव्याचा आधार दिला जाऊ शकतो का? त्या व्यक्तीने भावनाविवश होऊन हे कृत्य केले असावे का? काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात खरा, पण मग त्यांचे मन बदलते व ते आत्महत्या करीत नाहीत. मेल्यानंतर एक व्यक्ती आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करू शकत नाही.
दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा, की बहुतेक प्रकरणात काही जण मानसिकरीत्या व भावनिकरीत्या संतुलन गमावल्यामुळे आत्महत्या करतात. यांना खरे तर आत्महत्येचे बळी म्हटले जाऊ शकते. काही आकडेवारींनुसार, आत्महत्या करणाऱ्या ९० टक्के लोकांना, कुठल्यातरी प्रकारची मानसिक, भावनिक समस्या किंवा मादक औषधे घेण्याची सवय असते. अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत आत्मघात केलेल्या लोकांना यहोवा क्षमा करील का? मृत व्यक्तीने यहोवाच्या नजरेत अक्षम्य पाप केले किंवा नाही, हे आपण ठरवू शकत नाही. आत्महत्येला बळी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचे भाषण देण्याचा विचार करणाऱ्या ख्रिस्ती सेवकाने, मृत व्यक्तीची परिस्थिती व वैद्यकीय अहवालाचाही विचार करावा.
विचार करण्याजोगा आणखी एक मुद्दा असा आहे, की समाजातील लोकांचा आत्महत्येबद्दल कसा दृष्टिकोन आहे आणि आत्महत्या केलेल्या व्यक्तीबद्दल त्यांचे काय मत आहे? वडीलजन या गोष्टीचा निश्चितच विचार करतील कारण, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय मंडळीच्या नावलौकिकाची त्यांना काळजी आहे. समाजात आत्महत्येबद्दल सर्रासपणे जो विचार केला जातो त्यानुसार आणि खासकरून आत्महत्येच्या संबंधित प्रकरणात वडील जन, जाहीररित्या अंत्यविधीसाठी संमती देणार नाहीत किंवा तो राज्यसभागृहात होऊ देणार नाहीत.
पण, एखाद्या ख्रिस्ती सेवकाला अंत्यविधीचे भाषण देण्यासाठी सांगितलेच तर मंडळीच्या वतीने नव्हे तर खासगीरीत्या भाषण देण्यात काही हरकत नाही असे त्याला वाटेल. तो भाषण देणार असेल तर, मृत व्यक्तीला पुनरुत्थान मिळेल किंवा नाही याबद्दल त्याने ठामपणे काहीही न बोलण्याची खबरदारी घ्यावी. मेलेल्या व्यक्तीच्या भविष्याची आशा ही आता केवळ यहोवाकडे असल्यामुळे, तिला किंवा त्याला पुनरुत्थान मिळेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही. ख्रिस्ती सेवक मृत्यूविषयी बायबलमध्ये असलेले सत्य सांगण्याचा आणि शोकितांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करील.