सर्व राष्ट्रांच्या लोकांचे देव स्वागत करतो
माली येथे पहिल्यांदा गेलेला जॉन, मामाडू नावाच्या एका गृहस्थाने आणि त्याच्या कुटुंबाने त्याला दाखवलेल्या आतिथ्य सत्काराने हरखून गेला. जमिनीवर बसून सर्वांसोबत एकाच मोठ्या ताटातून काहीशा संकोचाने जेवताना त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. मामाडूला एक अतिशय मोलाची भेटवस्तू—देवाच्या वचनातील अर्थात बायबलमधील राज्याची सुवार्ता कशी द्यावी. माली येथे बोलली जाणारी फ्रेंच भाषा त्याला येत होती; पण अगदीच वेगळ्या धार्मिक पार्श्वभूमीच्या आणि विचारसरणीच्या या लोकांशी कसे बोलावे हेच त्याला कळेना.
साहजिकच, जॉनला बायबलमधील बाबेल शहराच्या वृत्तान्ताची आठवण झाली. त्या शहरातील विद्रोही लोकांच्या भाषेत देवाने गोंधळ निर्माण केला होता. (उत्पत्ति ११:१-९) परिणामस्वरूप, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत विभिन्न भाषा, धर्म, आणि विचारधारा निर्माण झाल्या आहेत. आज प्रवास आणि देशाटन अगदी सुलभ झाल्यामुळे बऱ्याचजणांना आणि तेसुद्धा कधीकधी त्यांच्या स्वतःच्याच परिसरात, जॉनसारख्याच समस्येला तोंड द्यावे लागते: वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना आपल्या बायबल आधारित आशेविषयी कसे सांगावे?
प्राचीन उदाहरण
इस्राएलातील इतर संदेष्ट्यांप्रमाणे योना देखील खासकरून इस्राएल लोकांमध्ये भविष्यवाणी करत असे. त्या काळात इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यातील लोक सर्रास देवाचा अनादर करणाऱ्या प्रथा आचरत होते. (२ राजे १४:२३-२५) योनाला आपला मायदेश सोडून अस्सिरियातील निनवे शहराच्या, अर्थात एका वेगळ्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांना जाऊन देवाचे संदेश सांगण्याची खास कामगिरी सोपवण्यात आली तेव्हा त्याला काय वाटले असेल याची कल्पना करा! योनाला कदाचित निनवेच्या लोकांची भाषा येत नसेल, निदान ती अस्खलित बोलता येत नसेल. आणि समजा येत असली तरीसुद्धा, योनाला ही कामगिरी कठीणच वाटली कारण त्याने चक्क पळ काढला.—योना १:१-३.
यहोवा देव केवळ बाह्य स्वरूप पाहात नाही तर तो अंतःकरण तपासतो हे योनाला अद्याप शिकायचे होते. (१ शमुवेल १६:७) यहोवाने योनाला बुडण्यापासून चमत्कारिकपणे वाचवले आणि दुसऱ्यांदा त्याला निनवेच्या रहिवाशांना जाणून त्याचे संदेश सांगण्याची आज्ञा दिली. योनाने ही आज्ञा पाळली आणि याचा असा परिणाम झाला की निनवेच्या लोकांनी सामूहिकरित्या पश्चात्ताप केला. तरीसुद्धा, योनाचा दृष्टिकोन सुधारला नाही. मग यहोवाने एका प्रभावशाली वस्तुपाठाद्वारे त्याला त्याच्या वृत्तीत बदल करण्याचा सल्ला दिला. यहोवाने योनाला विचारले: “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?” (योना ४:५-११) आज आपल्याविषयी काय म्हणता येईल? वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना आपण कशी मदत करू शकतो?
शोमरोनी व गैर यहुदी लोकांचे स्वागत करणे
पहिल्या शतकात, येशूने त्याच्या शिष्यांना सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवण्याचा आदेश दिला. (मत्तय २८:१९) हे त्यांच्याकरता सोपे नव्हते. येशूचे शिष्य यहुदी होते आणि योनाप्रमाणेच त्यांना आपल्याच पार्श्वभूमीच्या व संस्कृतीच्या लोकांशी बोलण्याची सवय होती. साहजिकच त्यांच्या काळात सर्वसामान्य असलेल्या भेदभावांचा त्यांच्या मनावरही पगडा असेलच. परंतु, यहोवाने त्यांना मार्गदर्शित केले आणि त्यामुळे हळूहळू त्यांना यहोवाची आपल्याकरता काय इच्छा आहे हे कळून चुकले.
त्यांना पार करावे लागलेले पहिले अडखळण म्हणजे यहुदी व शोमरोनी लोकांमधील पूर्वग्रह मनातून काढून टाकणे. यहुदी लोक शोमरोनी लोकांशी मुळीच संबंध ठेवत नव्हते. पण भविष्यात शोमरोनी सुवार्ता स्वीकारतील असे येशूने अनेकदा सुचवले. त्याने एका शोमरोनी स्त्रीशी संभाषण करण्याद्वारे निष्पक्ष वृत्ती दाखवली. (योहान ४:७-२६) दुसऱ्या एका प्रसंगी, चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त देण्याद्वारे त्याने एका धार्मिक यहुद्याला जाणीव करून दिली की यहुदी नसलेले लोकही आपल्या शेजाऱ्यांप्रती प्रेमळपणे वागू शकत होते. (लूक १०:२५-३७) मग, शोमरोनी लोकांना ख्रिस्ती मंडळीत सामील करण्याची यहोवाची वेळ आली तेव्हा फिलिप्प, पेत्र आणि योहान या तिघांनीही, मुळात यहुदी असूनही शोमरोनी लोकांना प्रचार केला. त्यांच्या प्रचारकार्यामुळे त्या शहरात आनंदीआनंद झाला.—प्रेषितांची कृत्ये ८:४-८, १४-१७.
खरे पाहता शोमरोनी लोक मुळात यहुद्यांचे दूरचे नातलगच होते; त्यामुळे जर शोमरोनी लोकांप्रती प्रेम दाखवणे यहुदी ख्रिश्चनांना जड गेले असेल तर मग गैरयहुदी किंवा विदेशी लोकांप्रती शेजारधर्म आणि प्रेम दाखवण्याची गोष्ट दूरच राहिली कारण यहुदी लोक त्यांचा तिरस्कार आणि द्वेष करत होते. पण येशूच्या मृत्यूनंतर यहुदी ख्रिश्चन व विदेशी यांच्यातील बाधा दूर करण्यात आली. (इफिसकर २:१३, १४) ही नवीन व्यवस्था मान्य करण्यास पेत्राला मदत करण्यासाठी यहोवाने त्याला एक दृष्टान्त दाखवला ज्यात त्याने त्याला सांगितले की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.” मग यहोवाच्या आत्म्याने त्याला कर्नेल्य नावाच्या एका विदेश्याकडे जाण्यास मार्गदर्शित केले. विदेश्यांपैकी असलेल्या या माणसाला देवाने शुद्ध केले असल्यामुळे पेत्राने त्याला अशुद्ध मानू नये हा देवाचा दृष्टिकोन पेत्राला समजला तेव्हा देवाच्या प्रेरणेने त्याने पुढील उद्गार काढले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:९-३५) आपण कर्नेल्याला व त्याच्या कुटुंबाला स्वीकारले आहे हे त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतून देवाने प्रदर्शित केले तेव्हा पेत्राला केवढे आश्चर्य वाटले असेल!
पौल—परराष्ट्रीयांकरता निवडलेले पात्र
यहोवा सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करण्यास आणि त्यांना मदत करण्यास कशाप्रकारे क्रमाक्रमाने आपल्या सेवकांच्या मनाची तयारी करतो याचे एक उत्तम उदाहरण पौलाच्या सेवाकार्याद्वारे दिसून येते. पौलाचे परिवर्तन झाले त्या वेळी येशूने म्हटले की पौल त्याचे, म्हणजे येशूचे नाव परराष्ट्रीयांत घोषित करण्याकरता एक निवडलेले पात्र म्हणून सेवा करेल. (प्रेषितांची कृत्ये ९:१५) विदेश्यांना सुवार्ता घोषित करण्याकरता आपला उपयोग करण्याचा देवाचा जो उद्देश आहे त्यावर मनन करण्यासाठी कदाचित, पौल लगेच अरबस्तानात निघून गेला.—गलतीकर १:१५-१७.
आपल्या पहिल्या प्रचार यात्रेदरम्यान पौलाने अत्यंत आवेशाने गैर यहूद्यांना प्रचार केला. (प्रेषितांची कृत्ये १३:४६-४८) यहोवाने पौलाचे कार्य आशीर्वादित केले आणि हा एक पुरावा होता की प्रेषित पौल यहोवाच्या व्यवस्थेच्या एकवाक्यतेत कार्य करत होता. एकदा पेत्राने आपल्या गैरयहुदी बांधवांना टाळण्याद्वारे पक्षपाती वृत्ती दाखवली तेव्हा पौलाने निर्भयपणे त्याची कानउघाडणी केली. पौलाला यहोवाचा दृष्टीकोन पूर्णपणे समजला होता हे यावरून दिसून आले.—गलतीकर २:११-१४.
पौलाचे कार्य देवाच्या मार्गदर्शनानुरूप होते याचा आणखी पुरावा त्याच्या दुसऱ्या प्रचार यात्रेदरम्यान दिसून आला, जेव्हा पवित्र आत्म्याने पौलाला बिथुनियाच्या रोमी प्रांतात प्रचार करण्यापासून रोखले. (प्रेषितांची कृत्ये १६:७) साहजिकच अद्याप याची वेळ आलेली नव्हती. परंतु नंतर बिथुनियातील काही लोक ख्रिस्ती बनले. (१ पेत्र १:१) एका दृष्टान्तात मासेदोनियातील एका माणसाने पौलाला अशी याचना केली की: “इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.” पौलाने यावरून असा निष्कर्ष काढला की त्याने आपला मार्ग बदलून त्या रोमी प्रांतात जाऊन सुवार्ता घोषित करावी.—प्रेषितांची कृत्ये १६:९, १०.
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या पौलाच्या क्षमतेची अथेन्स येथील लोकांना प्रचार करतेवेळी अतिशय प्रकर्षाने परीक्षा झाली. ग्रीक आणि रोमी कायद्यानुसार विदेशी देवांची आणि नव्या धार्मिक प्रथांची ओळख करून देणे निषिद्ध होते. पण लोकांबद्दल असलेल्या प्रेमाने पौलाला त्यांच्या धार्मिक प्रथांचा विचारपूर्वक अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. अथेन्स येथे त्याने “अज्ञात देवाला” ही अक्षरे लिहिलेली वेदी पाहिली. त्याने आपल्या साक्षकार्यात या माहितीचा उल्लेख केला. (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३) आपला संदेश प्रेमळ व आदरणीय पद्धतीने सादर करण्याचा किती उत्तम मार्ग त्याने उपयोगात आणला!
परराष्ट्रीयांकरता प्रेषिताच्या भूमिकेतील आपल्या कार्याच्या चांगल्या परिणामांचे सिंहावलोकन करताना पौलाला किती आनंद वाटला असेल! त्याने करिंथ, थेस्सलनिका आणि गलेशियातील नगरे येथे अशा अनेक मंडळ्या स्थापन करण्यास मदत केली ज्यांत मुळात गैरयहुदी असलेले अनेक ख्रिस्ती होते. दामारी, दिओनुस्य, सिर्ग्य पौल आणि तीत यांसारख्या कित्येक विश्वासू स्त्रीपुरुषांना त्याने मदत केली. यहोवा किंवा बायबलविषयी काहीही माहिती नसलेल्या लोकांना ख्रिस्ती विश्वासाचे सत्य स्वीकारताना पाहण्याची किती बहुमोल सुसंधी पौलाला मिळाली! गैरयहुदी लोकांना सत्याचे ज्ञान मिळवून देण्यातील आपल्या भूमिकेविषयी पौलाने म्हटले: “ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर ‘त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील; ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस [“माझे ध्येय,” NW] होती.” (रोमकर १५:२०, २१) आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीच्या लोकांना सुवार्ता सांगण्यात आपल्यालाही भाग घेता येईल का?
पृथ्वीवरील सर्व लोकांना साहाय्य करणे
शलमोनाने जेरुसलेम येथील मंदिरात येऊन उपासना करणाऱ्या गैर-इस्राएलियांविषयी यहोवाला प्रार्थना केली. त्याने अशी विनंती केली: ‘तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून [परदेशीयाची प्रार्थना] ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे या भूतलावरील सर्व देशाचे लोक तुझे नाम ओळखतील.’ (१ राजे ८:४१-४३) अनेक देशांतील हजारो राज्य प्रचारक आज हीच इच्छा व्यक्त करतात. त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या निनवेच्या रहिवाशांसारखे असणारे लोक भेटतात, ज्यांना ‘उजव्याडाव्या हाताचा भेद कळत नाही.’ आणि अनेक वेगवेगळ्या राष्ट्रांतील लोकांतून खऱ्या उपासकांना एकत्रित करण्याविषयीच्या भविष्यवाण्यांच्या पूर्ततेत भाग घेण्यास हे राज्य प्रचारक उत्सुक आहेत.—यशया २:२, ३; मीखा ४:१-३.
ज्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताच्या लोकांनी बायबलमधील आशादायी संदेश स्वीकारला आहे त्याचप्रमाणे इतर धार्मिक पार्श्वभूमीचे लोकही करत आहेत. याचा वैयक्तिकरित्या तुमच्यावर कसा परिणाम होतो? प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून बघा. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह असल्यास खऱ्या प्रेमाच्या आधारावर ते दूर करा.a देव ज्यांना स्वीकारण्यास तयार आहे अशांना तुम्ही दूर सारू नका.—योहान ३:१६.
दुसऱ्या पार्श्वभूमीच्या व्यक्तीशी बोलण्याआधी चांगली तयारी करा. त्यांच्या समजुती, त्यांच्या विवंचना, त्यांची विचार करण्याची पद्धत आधी समजून घ्या; मग त्यांच्याशी बोलण्याजोगा एखादा समान दृष्टिकोनाचा विषय शोधून काढा. इतरांविषयी चांगुलपणाने आणि सहानुभूतीने वागा. वादविवाद टाळा, आपल्याच मुद्द्यावर अडून राहू नका आणि प्रोत्साहनात्मक पद्धतीने बोला. (लूक ९:५२-५६) असे केल्यामुळे तुम्हाला यहोवाला संतुष्ट करता येईल, कारण “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.”—१ तीमथ्य २:४.
आपल्या मंडळीत अनेक पार्श्वभूमींचे लोक आहेत याचा आपल्याला किती आनंद वाटतो! (यशया ५६:६, ७) फक्त मेरी, जॉन, सुनील आणि टोनी अशीच नावे नाहीत, तर मामाडू, जगन, रेझा आणि चॅन यांसारखी नावे ऐकायला मिळतात हे किती आनंदविणारे आहे! खरोखर आपल्याकरता एक “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार . . . उघडले आहे.” (१ करिंथकर १६:९) निःपक्षपाती देव, यहोवा याने दिलेले आमंत्रण सर्व राष्ट्रांच्या लोकांना देऊन त्यांचे स्वागत करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण पुरेपूर फायदा उचलू या!
[तळटीप]
a सावध राहा! (इंग्रजी) जुलै ८, १९९६ अंकातील पृष्ठे ५-७ वरील “सुसंवादातील बाधा” हा लेख पाहा.
[२३ पानांवरील चित्रे]
जुळवून घेण्यास तयार राहण्याद्वारे पौलाने सर्व ठिकाणच्या लोकांना सुवार्ता सांगितली
. . . अथेन्स येथे
. . . फिलिप्पै येथे
. . . व प्रवासादरम्यान