यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्न करा
“त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल!”—अवाद ५:२९.
१. सर्व लोक भयमुक्त जीवन जगू शकतील असा दिवस येण्याविषयी आपण का खात्री बाळगू शकतो?
भयाने शतकानुशतके मानवजातीला पछाडले आहे. उपासमार, रोगराई, गुन्हेगारी, किंवा युद्ध यांसारख्या गोष्टींमुळे लाखो लोक सतत भयभीत असतात. याच कारणास्तव मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यात, सर्व लोकांना भयमुक्त जीवन जगता येईल असे जग निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.a आनंदाची गोष्ट म्हणजे देव स्वतः आपल्याला आश्वासन देतो की अशाप्रकारचे जग अवश्य येईल—पण मानवी प्रयत्नांनी नव्हे. यहोवाने आपला संदेष्टा मीखा याच्याद्वारे असे आश्वासन दिले की धार्मिकतेच्या त्याच्या नव्या जगात ‘कोणी त्याच्या लोकांना घाबरविणार नाही.’—मीखा ४:४.
२. (अ) बायबल आपल्याला देवाचे भय बाळगण्यास कशाप्रकारे आर्जवते? (ब) देवाचे भय बाळगण्याच्या आपल्या कर्तव्याबद्दल विचार करताना कोणते प्रश्न येऊ शकतात?
२ पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, भय हे सकारात्मकही असू शकते. बायबलमध्ये यहोवाच्या सेवकांना त्याचे भय बाळगण्यास वारंवार आर्जवले आहे. मोशेने इस्राएल लोकांना सांगितले: “तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर.” (अनुवाद ६:१३) अनेक शतकांनंतर शलमोनाने असे लिहिले: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे साक्षकार्य करत आहोत त्यातून आपण लोकांना आग्रह करत आहोत, की “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.” (प्रकटीकरण १४:६, ७) यहोवाचे भय बाळगण्याव्यतिरिक्त ख्रिस्ती लोकांनी पूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. (मत्तय २२:३७, ३८) पण देवावर प्रीती करण्यासोबतच आपण त्याचे भय कसे बाळगू शकतो? एका प्रेमळ देवाचे भय बाळगण्याची काय गरज आहे? देवाची भीती बाळगणे का फायद्याचे आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांकरता आपण आधी हे समजून घेतले पाहिजे की यहोवाचे भय काय आहे आणि हे भय त्याच्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचा अविभाज्य अंग कशाप्रकारे आहे.
विस्मय, आदर आणि भय
३. देवाचे भय बाळगण्याचा काय अर्थ होतो?
३ देवाचे भय ही एक अशी भावना आहे जी सर्व ख्रिश्चनांना आपल्या निर्माणकर्त्याबद्दल वाटली पाहिजे. या भयाची एक व्याख्या, “सृष्टीकर्त्याविषयी विस्मयाची भावना आणि परम आदर असणे आणि त्याला असंतुष्ट करण्याविषयी वाटणारी निकोप धास्ती” अशी करण्यात आली आहे. अशाप्रकारे देवाचे भय आपल्या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम करते: देवाबद्दल आपली मनोवृत्ती आणि त्याला वीट असलेल्या आचरणाविषयी आपली मनोवृत्ती. या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे स्पष्टच असल्यामुळे या गोष्टींचा लक्षपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. वाईन यांच्या एक्पॉसिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वड्र्स यात सांगितल्यानुसार, ही आदरयुक्त भीती ख्रिश्चनांच्या ‘जीवनातील आध्यात्मिक व नैतिक बाबी नियंत्रित करणारी प्रेरक शक्ती आहे.’
४. आपण आपल्या मनात निर्माणकर्त्याविषयी विस्मय व परम आदराच्या भावना कशा निर्माण करू शकतो?
४ आपल्या निर्माणकर्त्याविषयी विस्मय आणि आदराच्या भावना आपण कशा निर्माण करू शकतो? जेव्हा आपण एखादा नयनरम्य देखावा पाहतो, उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा किंवा डोळ्यांचे पारणे फेडणारा सूर्यास्त पाहतो तेव्हा आपण विस्मयाने अक्षरशः स्तब्ध होतो. आणि हे सृष्टीसौंदर्य देवाची हस्तकृती असल्याचे आपण विश्वासाच्या नेत्रांनी ओळखतो तेव्हा तर ही विस्मयाची भावना आणखीनच तीव्र होते. शिवाय, यहोवाच्या विस्मयकारी निर्मीतीपुढे आपण किती क्षुद्र आहोत याची आपल्याला राजा दाविदाला झाली त्याप्रमाणे प्रकर्षाने जाणीव होते. “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” (स्तोत्र ८:३, ४) या गाढ विस्मयातूनच आपल्या मनात पूजनीय आदराची भावना निर्माण होते व ती आपल्याला यहोवाच्या सर्व उपकारांबद्दल त्याचे आभार मानण्याची व त्याचे स्तवन करण्याची प्रेरणा देते. दाविदाने असेही लिहिले: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”—स्तोत्र १३९:१४.
५. आपण यहोवाचे भय का मानले पाहिजे आणि यासंदर्भात आपल्यापुढे कोणाचे उत्तम उदाहरण आहे?
५ विस्मयाच्या व परम आदराच्या भावनांमध्येच निर्माणकर्ता या नात्याने देवाच्या सामर्थ्याविषयी व या विश्वाचा यथान्याय शासक यानात्याने त्याच्या अधिकाराविषयी, सुदृढ व सन्मानयुक्त भय देखील गोवलेले आहे. प्रेषित योहानाने पाहिलेल्या एका दृष्टान्तात, “श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक,” अर्थात आपल्या स्वर्गीय स्थानी पोचलेले ख्रिस्ताचे अभिषिक्त अनुयायी अशी घोषणा करतात: “हे [“यहोवा,” NW] देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?” (प्रकटीकरण १५:२-४) देवाच्या वैभवाबद्दल वाटणाऱ्या परम आदरातून उत्पन्न झालेल्या भयामुळेच ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्यात सहभागी होणारे हे सहशासक देवाचा सर्वश्रेष्ठ अधिकार कबूल करून त्याचे गौरव करतात. यहोवाने आजपर्यंत जे काही केले आहे आणि कशाप्रकारे धार्मिकतेने तो या विश्वाचे नियंत्रण करतो याचा आपण विचार करतो तेव्हा साहजिकच आपणही त्याचे भय मानण्यास प्रवृत्त होत नाही का?—स्तोत्र २:११; यिर्मया १०:७.
६. आपण यहोवाला नाखूष करण्याची सकारात्मक धास्ती का बाळगली पाहिजे?
६ तथापि, विस्मय व आदरासोबतच त्याला नाखूष करण्याची किंवा त्याच्या आज्ञा मोडण्याची एक सकारात्मक धास्ती देखील देवाच्या भयात अंतर्भूत आहे. का? कारण यहोवा जरी ‘मंदक्रोध व दयेचा सागर,’ असला तरीसुद्धा तो “अपराधी जनांची मुळीच गय न करणारा” आहे हे आपण विसरू नये. (निर्गम ३४:६, ७) यहोवा प्रेमळ आणि क्षमाशील असला तरीसुद्धा तो अधार्मिक आचरण आणि जाणूनबुजून केलेल्या चुका खपवून घेत नाही. (स्तोत्र ५:४, ५; हबक्कूक १:१३) जे मुद्दामहून आणि पश्चात्ताप न वाटता यहोवाच्या नजरेत अधर्मी आचरण करत राहतात ते आपणहून स्वतःला त्याचे शत्रू बनवतात आणि अशा लोकांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. प्रेषित पौलाने लिहिल्याप्रमाणे, “जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.” अशा परिस्थितीत सापडण्याची सकारात्मक धास्ती असणे हे शेवटी आपल्याकरता संरक्षक ठरेल.—इब्री लोकांस १०:३१.
“त्यालाच चिकटून राहावे”
७. आपल्याला संकटांतून सोडवण्याच्या यहोवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवण्याकरता आपल्याकडे कोणती कारणे आहेत?
७ यहोवाविषयी आदरयुक्त भय बाळगल्यामुळे आणि त्याच्या विस्मयकारी सामर्थ्याची सतत जाणीव ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल भरवसा व विश्वास निर्माण होतो. लहान मूल जसे आपल्या वडीलाजवळ निर्धास्त असते तसेच आपल्यालाही यहोवाच्या मार्गदर्शक हाताखाली सुरक्षित व आश्वस्त वाटते. यहोवाने इस्राएल लोकांना ईजिप्तमधून बाहेर आणल्यावर त्यांनी कशी प्रतिक्रिया व्यक्त केली ते पाहा, “परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरिले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेविला.” (निर्गम १४:३१) अलीशाच्या अनुभवावरूनही हे सिद्ध होते की “परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.” (स्तोत्र ३४:७; २ राजे ६:१५-१७) यहोवाच्या लोकांच्या आधुनिक काळातील इतिहासावरून आणि कदाचित आपल्या वैयक्तिक अनुभवांवरूनही आपल्याला खात्री पटते की देव त्याची सेवा करणाऱ्यांकरता निश्चितच आपल्या सामर्थ्याचा वापर करतो. (२ इतिहास १६:९) अशाप्रकारे आपल्याला जाणीव होऊ लागते की “यहोवाच्या भयात दृढ भरवसा आहे.”—नीतिसूत्रे १४:२६, पं.र.भा.
८. (अ) देवाचे भय आपल्याला त्याच्या मार्गांत चालण्याची प्रेरणा का देते? (ब) आपण यहोवाला कशाप्रकारे “चिकटून” राहावे हे स्पष्ट करा.
८ देवाविषयी सुदृढ भय असल्यामुळे त्याच्यावर भरवसा आणि विश्वास तर उत्पन्न होतोच पण यामुळे आपल्याला त्याच्या मार्गांत चालण्याची प्रेरणा देखील मिळते. शलमोनाने मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर यहोवाला अशी प्रार्थना केली: “जो देश तू आमच्या पूर्वजांस दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगून तुझ्या मार्गांनी चालतील.” (२ इतिहास ६:३१) याआधी मोशेने इस्राएल लोकांना असे प्रोत्साहन दिले होते: “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे.” (अनुवाद १३:४) या वचनांतून स्पष्टपणे दिसून येते त्याप्रमाणे यहोवाच्या मार्गांत चालण्याची आणि त्यालाच “चिकटून” राहण्याची इच्छा ही त्याच्यावरील आपल्या भरवशातून व विश्वासातून निर्माण होते. होय, यहोवाचे भय आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास व त्याची सेवा करण्यास प्रवृत्त करते; आणि ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या वडिलांवर पूर्ण भरवसा आणि विश्वास बाळगून त्यांना बिलगते त्याप्रमाणे यहोवाला चिकटून राहण्याची ते आपल्याला चालना देते.—स्तोत्र ६३:८; यशया ४१:१३.
देवावर प्रीती करण्याचा अर्थ त्याचे भय बाळगणे
९. देवाबद्दल वाटणारे प्रेम आणि भय यांत कसा संबंध आहे?
९ शास्त्रवचनांच्या दृष्टिकोनातून देवाचे भय मानणे हे त्याच्यावर प्रीती करण्यात कोणत्याही प्रकारे अडथळा आणत नाही. उलट इस्राएल लोकांना असे सांगण्यात आले होते की “परमेश्वर ह्याचे भय धर, जेणेकरून तू त्याच्या सर्व मार्गांनी चालशील व त्याच्यावर प्रीति करशील.” (अनुवाद १०:१२, NW) अशाप्रकारे देवाचे भय व त्याच्यावरील प्रेम यांत जवळचा संबंध आहे. देवाचे भय आपल्याला त्याच्या मार्गांत चालण्याची प्रेरणा देते आणि यावरून आपले त्याच्यावर प्रेम असल्याचे सिद्ध होते. (१ योहान ५:३) हे रास्तच आहे कारण आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीचे मन दुखवण्याची आपल्याला भीती वाटते. इस्राएल लोकांनी अरण्यात असताना यहोवाविरुद्ध बंड करून त्याचे मन दुखवले. निश्चितच, ज्यामुळे आपल्या स्वर्गीय पित्याला अशाप्रकारे दुःख वाटेल असे कोणतेही कृत्य आपण करू इच्छित नाही. (स्तोत्र ७८:४०, ४१) उलट, “जे परमेश्वराचे भय धरितात . . . त्यांच्यावर तो संतुष्ट होतो,” त्याअर्थी आपली आज्ञाधारकता आणि विश्वासूपणा यांमुळे यहोवाचे हृदय आनंदित होते. (स्तोत्र १४७:११; नीतिसूत्रे २७:११) देवावरील प्रेम त्याला संतुष्ट करण्याची आपल्याला प्रेरणा देते, आणि त्याचे भय आपल्याला अशा सर्व गोष्टी करण्यापासून आवरते ज्यांमुळे त्याचे मन दुखावेल. देवाविषयीचे भय व प्रेम परस्परविरोधी नसून एकमेकांस पूरक असे आहेत.
१०. यहोवाचे भय बाळगण्यात आपल्याला आनंद वाटतो हे येशूने कशाप्रकारे दाखवले?
१० देवावर प्रेम करण्यासोबतच त्याचे भय बाळगणेही शक्य आहे हे येशू ख्रिस्ताच्या जीवनावरून स्पष्टपणे दिसून येते. येशूच्या संदर्भात संदेष्टा यशया याने असे लिहिले होते: “परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील; परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल.” (यशया ११:२, ३) या भविष्यवाणीनुसार, देवाच्या आत्म्याने येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याचे भय बाळगण्यास प्रवृत्त केले. शिवाय आपल्याला असेही दिसून येते की देवाचे भय त्याला त्रासदायक नव्हे तर समाधानदायक ठरले. अतिशय कठीण परिस्थितीतही येशूला देवाची इच्छा पूर्ण करण्यात आणि त्याला संतुष्ट करण्यात आनंद प्राप्त झाला. वधस्तंभावर लवकरच आपल्याला मृत्यूदंड दिला जाणार हे माहीत असतानाही त्याने यहोवाला असे म्हटले: “माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९) अशाप्रकारे देवाचे भय बाळगल्यामुळे यहोवाने आपल्या पुत्राच्या याचना ऐकल्या, त्याला सांत्वन पुरवले आणि मृत्यूच्या तावडीतून त्याला सोडवले.—इब्री लोकांस ५:७.
यहोवाचे भय बाळगण्यास शिकणे
११, १२. (अ) आपण देवाचे भय बाळगण्यास का शिकले पाहिजे? (ब) येशू कशाप्रकारे आपल्याला यहोवाचे भय बाळगण्यास शिकवतो?
११ निसर्गातील सामर्थ्य व किमया पाहिल्यावर आपण आपोआप विस्मित होतो; पण देवाचे भय मात्र आपल्या मनात आपोआप उत्पन्न होत नाही. म्हणूनच थोर दावीद, येशू ख्रिस्त, भविष्यवाणीच्या रूपात हे आमंत्रण आपल्याला देतो: “मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन.” (स्तोत्र ३४:११) आपण यहोवाचे भय बाळगण्यास येशूकडून कसे शिकू शकतो?
१२ येशू आपल्या स्वर्गीय पित्याचे अद्भुत व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास आपल्याला साहाय्य करण्याद्वारे त्याचे भय बाळगण्यास शिकवतो. (योहान १:१८) देव कशाप्रकारे विचार करतो, इतरांशी कशाप्रकारे व्यवहार करतो हे येशूच्या उदाहरणावरून प्रकट होते कारण त्याने आपल्या पित्याचे व्यक्तिमत्त्व तंतोतत प्रतिबिंबित केले. (योहान १४:९, १०) शिवाय, येशूच्या बलिदानाद्वारे आपल्या पापांकरता यहोवाकडे क्षमेची याचना करण्याचा मार्ग आपल्याकरता मोकळा झाला आहे. देवाने इतक्या अद्भुत मार्गाने आपल्यावर दया दाखवली आहे हेच त्याचे भय बाळगण्यासाठी एक जोरदार कारण आहे. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.”—स्तोत्र १३०:४.
१३. यहोवाचे भय बाळगण्यास सहायक ठरणारी कोणती पावले उचलण्याचे प्रोत्साहन नीतिसूत्राच्या पुस्तकात आपल्याला देण्यात आले आहे?
१३ नीतिसूत्रांचे पुस्तक, देवाविषयीची भीती निर्माण करण्याकरता आपण कोणती पावले उचलावीत हे आपल्याला सांगते. “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, . . . तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” (नीतिसूत्रे २:१-५) तेव्हा, देवाचे भय बाळगण्याकरता आपण त्याच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, त्यातील मार्गदर्शन समजून घेण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्यातील सल्ल्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
१४. इस्राएलच्या राजांना देण्यात आलेल्या आज्ञांचे आपण कशाप्रकारे पालन करू शकतो?
१४ प्राचीन इस्राएलाच्या प्रत्येक राजाला अशी आज्ञा देण्यात आली होती की त्याने देवाच्या नियमशास्त्राची एक प्रत बनवून “तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा . . . आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल.” (अनुवाद १७:१८, १९) आपल्याला यहोवाचे भय बाळगण्यास शिकायचे असेल तर बायबलचे वाचन व अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या जीवनात बायबलच्या तत्त्वांचे पालन करतो तसतशी देवाची सुबुद्धी आणि ज्ञान आपण आत्मसात करू लागतो. आपल्याला ‘परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल’ कारण त्यामुळे आपल्या जीवनात होणारे उत्तम परिणाम आपल्याला दिसतील आणि देवासोबतचा आपला नातेसंबंध आपल्याला अधिकाधिक बहुमोल वाटू लागेल. शिवाय, सहविश्वासू बांधवांसोबत नियमितपणे एकत्रित होण्याद्वारे सर्व तरुण व वयस्क, देवाच्या शिकवणुकीकडे कान देऊन, देवाचे भय बाळगण्यास व त्याच्या मार्गात चालण्यास शिकू शकतील.—अनुवाद ३१:१२.
यहोवाचे भय बाळगणारे सर्व धन्य आहेत
१५. देवाचे भय कोणत्याप्रकारे आपल्या उपासनेशी संबंधित आहे?
१५ इथपर्यंत आपण विचारात घेतलेल्या माहितीवरून दिसून येते की देवाचे भय बाळगण्याची मनोवृत्ती हितकारक असून आपण सर्वांनी ती विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण यहोवाच्या उपासनेत ती अभिन्नपणे गोवलेली आहे. यहोवाचे भय आपल्याला त्याच्यावर पूर्ण मनाने भरवसा ठेवण्यास, त्याच्या मार्गात चालण्यास आणि त्याला चिकटून राहण्यास प्रवृत्त करते. येशू ख्रिस्ताप्रमाणेच, आपणही समर्पणाच्या वेळी यहोवाला दिलेले वचन आता व सर्वकाळापर्यंत पूर्ण करावे म्हणून देवाचे भय आपल्याला प्रेरित करू शकते.
१६. यहोवा आपल्याला त्याचे भय बाळगण्याचे प्रोत्साहन का देतो?
१६ देवाचे भय दहशत निर्माण करणारे किंवा अवाजवीपणे बंधनकारक नाही. बायबल आपल्याला असे आश्वासन देते की “जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!” (स्तोत्र १२८:१) यहोवा आपल्याला त्याचे भय मानण्याचे प्रोत्साहन देतो कारण हा गुण आपल्याकरता संरक्षक ठरू शकतो हे त्याला माहीत आहे. त्याने मोशेला बोलून दाखवलेल्या पुढील शब्दांवरून त्याचे प्रेम व कळकळ व्यक्त होते: “त्यांचे [इस्राएल लोकांचे] मन नेहमी असेच राहिले [“त्यांनी असे हृदय उत्पन्न केले,” NW] म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.”—अनुवाद ५:२९.
१७. (अ) देवाचे भय बाळगल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात? (ब) देवाच्या भयाशी संबंधित कोणत्या गोष्टींचे आपण पुढील लेखात परीक्षण करणार आहोत?
१७ त्याचप्रकारे जर आपण देवाचे भय बाळगणारे हृदय उत्पन्न केले तर आपले कल्याण होईल. कशाप्रकारे? एकतर अशा मनोवृत्तीमुळे आपण देवाला संतुष्ट करू शकू आणि यामुळे आपण त्याच्या निकट येऊ. दाविदाला वैयक्तिक अनुभवावरून हे समजले होते की “[परमेश्वर] आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.” (स्तोत्र १४५:१९) शिवाय, देवाचे भय बाळगण्याचा आणखी एक फायदा असा की वाईट गोष्टींप्रती आपल्या मनोवृत्तीवर याचा परिणाम होईल. (नीतिसूत्रे ३:७) पुढील लेखात आपण याचे परीक्षण करू की देवाचे भय कशाप्रकारे आपल्याला आध्यात्मिक धोक्यांपासून संरक्षण देते आणि ज्यांनी देवाचे भय बाळगले व वाईटापासून पाठ फिरवली अशा बायबलमधील काही जणांच्या उदाहरणांवरही आपण विचार करू.
[तळटीप]
a संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर, १९४८ रोजी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा अवलंबला.
पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येईल का?
• देवाचे भय बाळगण्याचा काय अर्थ होतो आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?
• देवाचे भय बाळगणे व त्याच्यासोबत चालणे कशाप्रकारे परस्परांशी संबंधित आहे?
• देवाचे भय त्याच्यावर प्रेम करण्याशी संबंधित आहे हे येशूच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?
• आपण यहोवाचे भय बाळगणारे हृदय कशाप्रकारे उत्पन्न करू शकतो?
[१७ पानांवरील चित्र]
इस्राएली राजांना देवाच्या नियमशास्त्राची एक वैयक्तिक प्रत तयार करून दररोज तिचे अध्ययन करण्याची आज्ञा देण्यात आली होती
[१८ पानांवरील चित्र]
लहान मुलाचा आपल्या पित्यावर असतो त्याप्रमाणे यहोवावर पूर्ण भरवसा बाळगण्यास त्याचे भय आपल्याला प्रवृत्त करते
[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]
तारे: Photo by Malin, © IAC/RGO १९९१