यहोवाला शोभेल असे वागण्याकरता इतरांना मदत करा
“आम्हीहि . . . तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, . . . तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे.”—कलस्सैकर १:९, १०.
१, २. लोकांना कोणत्या एका खासप्रकारे मदत केल्यामुळे आपल्याला आनंद व समाधान मिळते?
“आम्ही एका फार्मवर एका मोठ्या ट्रकसारख्या गाडीत राहतो. अगदी साधी राहणी असल्यामुळे आम्हाला लोकांना सुवार्ता सांगण्याकरता जास्त वेळ मिळतो. यहोवाच्या आशीर्वादामुळे आम्ही कित्येक लोकांना, यहोवाला जीवन समर्पित करण्यास मदत करू शकलो; ही आम्ही अत्यंत सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट समजतो.”—दक्षिण आफ्रिकेत पूर्णवेळची सेवा करणारे एक विवाहित जोडपे.
२ इतरांना मदत केल्यामुळे खरच खूप समाधान मिळते, असे तुम्हालाही वाटत नाही का? हेच समाधान मिळवण्यासाठी काहीजण नियमितपणे आजाऱ्यांना, गोरगरिबांना किंवा एकाकी असलेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. खरे ख्रिस्ती मात्र लोकांना यहोवा देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान देतात; यापेक्षा मोठी मदत लोकांना आपण देऊ शकत नाही असे ते मानतात. कारण केवळ याच ज्ञानाच्या योगे लोक येशूच्या खंडणी बलिदानाचा स्वीकार करू शकतात, यहोवा देवासोबत चांगले नाते जोडू शकतात आणि अशारितीने सार्वकालिक जीवनाची आशा बाळगू शकतात.—प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१; १३:४८.
३. कोणाला मदत करण्याविषयी आपण विचार केला पाहिजे?
३ पण जे अगोदरच देवाची सेवा करत आहेत, जे खऱ्या ख्रिस्ती ‘मार्गात’ चालत आहेत अशांनाही आपण मदत करू शकतो का? (प्रेषितांची कृत्ये १९:९) आपल्या बांधवांना मदत करण्याची इच्छा तुम्हाला निश्चितच असेल आणि तुम्ही तसे करतही असाल. पण त्यांना आणखी मदत कशी करता येईल असा कदाचित तुम्ही विचार करत असाल. किंवा कदाचित तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला इच्छा असूनही बांधवांना हवी तितकी मदत करता येत नसेल आणि यामुळे पाहिजे तितके समाधान किंवा आनंद तुम्हाला मिळत नसेल. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) या दोन्ही बाबींबद्दल कलस्सैकर या पुस्तकातून आपण बरेच काही शिकू शकतो.
४. (अ) पौलाने कशा परिस्थितीत कलस्सैकरांना पत्र लिहिले? (ब) या घटनेशी एपफ्रासचा काय संबंध होता?
४ प्रेषित पौलाने कलस्सैकरांना पत्र लिहिले तेव्हा तो रोममध्ये नजरकैदेत होता. इतरांना त्याला जाऊन भेटण्याची परवानगी होती. या मर्यादित स्वातंत्र्याचा फायदा घेऊन पौलाने आपल्याकडे येणाऱ्यांना देवाच्या राज्याचा प्रचार केला. (प्रेषितांची कृत्ये २८:१६-३१) ख्रिस्ती बांधवांनाही पौलाला येऊन भेटण्याची परवानगी होती. काहींना कदाचित पौलासोबत कैदेतही राहावे लागले असेल. (कलस्सैकर १:७, ८; ४:१०) यांपैकी एक होता एपफ्रास. तो आशिया मायनर (सध्याचे तुर्कस्थान) येथील इफिसाच्या पूर्वेकडे फ्रुगिया प्रांतातील कलस्सै शहरात राहणारा एक अतिशय आवेशी सुवार्तिक होता. कलस्सै मंडळीच्या स्थापनेकरता एपफ्रासने हातभार लावला होता, तसेच जवळच्याच लावदिकिया व हेरापलीस मंडळ्यांच्या उन्नतीकरता देखील त्याने बरीच मेहनत घेतली होती. (कलस्सैकर ४:१२, १३) पण एपफ्रास पौलाला भेटण्याकरता रोमला का गेला आणि तो तेथे गेल्यानंतर पौलाने काय केले? त्यातून आपल्याला काही शिकायला मिळेल का?
कलस्सैकरांना उपयुक्त मार्गदर्शन
५. पौलाने कलस्सैकरांना पत्र लिहिण्यामागे काय कारण होते?
५ कलस्सै येथील मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीविषयी पौलाशी विचारविनिमय करण्याकरता, एपफ्रास खडतर प्रवास करून रोमला गेला. तेथे गेल्यावर त्याने पौलाला कलस्सैकर येथील ख्रिस्ती बांधवांच्या विश्वासाबद्दल, प्रीतीबद्दल आणि त्यांच्या सुवार्ता घोषणेच्या कार्याबद्दल सविस्तर सांगितले. (कलस्सैकर १:४-८) पण कलस्सै मंडळीत काही वाईट गोष्टी देखील चालल्या होत्या. या वाईट गोष्टींमुळे मंडळीच्या आध्यात्मिकतेला धोका होता. त्यामुळे याविषयीही एपफ्रासने पौलाला सांगितले असावे. म्हणूनच पौलाने कलस्सैकरांना पत्र लिहिले. या पत्रात त्याने खोट्या शिक्षकांनी पसरवलेल्या काही चुकीच्या शिकवणुकींचे खंडन केले. खासकरून येशू ख्रिस्ताची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्याविषयी त्याने जोर देऊन सांगितले.a पण कलस्सैकरांना मदत करण्याकरता त्याने केवळ बायबलच्या मूलभूत सत्यांविषयीच माहिती दिली का? कलस्सैकरांना आणखी कोणत्या मार्गाने मदत करणे त्याला शक्य होते आणि यावरून इतरांना मदत करण्याविषयी आपण काय शिकू शकतो?
६. पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात कशावर जोर दिला?
६ बांधवांना मदत करण्याचा एक मार्ग ज्याकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे त्याविषयी पौलाच्या पत्राच्या सुरवातीचा भाग वाचूनच आपल्याला कळून येते. ही एक अशी मदत होती जी बांधवांपासून दूर असतानाही करणे शक्य होते. पौल व एपफ्रास कलस्सैपासून कित्येक मैल दूर होते. पण तरीही ते कोणत्याप्रकारे बांधवांना मदत करू शकत होते? पौलाने म्हटले: “आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करितो तेव्हा . . . सर्वदा [तळटीप, “सर्वदा प्रार्थना करतो,” NW] आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुति करितो.” होय, पौल व एपफ्रास खास कलस्सैकरांसाठी प्रार्थना करत होते. पुढे पौल म्हणतो: “ह्यावरून आम्हीहि ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे.”—कलस्सैकर १:३, ९.
७, ८. आपल्या वैयक्तिक प्रार्थनांत आणि मंडळीच्या प्रार्थनांत कशाविषयी सहसा उल्लेख केला जातो?
७ यहोवा ‘प्रार्थना ऐकतो’ हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या इच्छेच्या सामंजस्यात केलेल्या सर्व प्रार्थना तो जरूर ऐकेल याची आपल्याला खात्री आहे. (स्तोत्र ६५:२; ८६:६; नीतिसूत्रे १५:८, २९; १ योहान ५:१४) पण जेव्हा आपण इतरांकरता प्रार्थना करतो तेव्हा काय आठवणीत ठेवले पाहिजे?
८ आपण सहसा प्रार्थना करताना जगातल्या सर्व भाऊ बहिणींविषयी उल्लेख करतो. (१ पेत्र ५:९) किंवा एखाद्या ठिकाणी कोणती नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकट आल्यास आपण त्या ठिकाणी राहणाऱ्या बांधवांच्या संरक्षणाकरता यहोवाला प्रार्थना करतो. पहिल्या शतकात यहुदियात दुष्काळ पडला होता, तेव्हा इतर सर्व ठिकाणी राहणाऱ्या बांधवांनी यहुदियातील बांधवांकरता अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू पाठवण्याआधी निश्चितच त्यांच्याकरता अनेकदा प्रार्थना केली असेल. (प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०) आजही ख्रिस्ती सभांमध्ये, जगभरातल्या बांधवांचा किंवा विशिष्ट प्रदेशातल्या सर्व बांधवांचा प्रार्थनेत सहसा उल्लेख केला जातो. सभांमध्ये प्रार्थना करताना सर्वांना समजेल अशाप्रकारे प्रार्थना करणे गरजेचे असते; तरच प्रार्थनेच्या शेवटी सर्वजण आमेन म्हणू शकतील.—१ करिंथकर १४:१६.
खास एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणे
९, १०. (अ) खास एखाद्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तींसाठी प्रार्थना करणे योग्य आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते? (ब) पौलाकरता कोणी प्रार्थना केली होती?
९ पण, बायबलमध्ये खास एखाद्या व्यक्तीसाठी करण्यात आलेल्या प्रार्थनांची देखील उदाहरणे आहेत. लूक २२:३१, ३२ येथे येशूने काय म्हटले यावर विचार करा. येशूजवळ त्याचे ११ विश्वासू प्रेषित होते. पुढे येणाऱ्या कठीण परीक्षांना तोंड देणे त्या सर्वांनाच कठीण जाणार होते, आणि म्हणून येशूने त्या सर्वांसाठी प्रार्थना केली. (योहान १७:९-१४) तरीसुद्धा, येशूने पेत्रासाठी खास प्रार्थना केली. इतरही उदाहरणे आहेत: जसे की, अलीशाने खास त्याच्या सेवकासाठी देवाला प्रार्थना केली होती. (२ राजे ६:१५-१७) प्रेषित योहानाने देखील गायसच्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याकरता प्रार्थना केली होती. (३ योहान १, २) इतरही प्रार्थनांचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो ज्यांत विशिष्ट लोकांसाठी प्रार्थना करण्यात आली.—ईयोब ४२:७, ८; लूक ६:२८; प्रेषितांची कृत्ये ७:६०; १ तीमथ्य २:१, २.
१० खास एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करण्याविषयी पौलाच्या पत्रांत अनेकदा उल्लेख आढळतो. त्याने आपल्या पत्रांत कित्येकदा बांधवांना त्याच्यासाठी किंवा त्याच्या सोबत्यांसाठी प्रार्थना करण्यास सुचवले. कलस्सैकर ४:२, ३ यात असे म्हटले आहे: “प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुति करीत जागृत राहा; आणखी आम्हासाठीहि प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातहि आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे.” तसेच रोमकर १५:३०; १ थेस्सलनीकाकर ५:२५; २ थेस्सलनीकाकर ३:१; इब्री लोकांस १३:१८ मधील उदाहरणे देखील पडताळून पाहा.
११. रोममध्ये असताना एपफ्रास कोणाकरता प्रार्थना करत होता?
११ रोममध्ये पौलासोबत असणारा एपफ्रास देखील अशाचप्रकारे प्रार्थना करत होता. “एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे.” (कलस्सैकर ४:१२) “जीव तोडून” असे भाषांतर केलेला शब्द, प्राचीन काळातील खेळांमध्ये कसरती करणाऱ्या खेळाडूच्या ‘कठीण परिश्रमाला’ सूचित करतो. एपफ्रास जगभरातल्या ख्रिस्ती बांधवांकरता किंवा सबंध आशिया मायनरमधील बांधवांकरता प्रार्थना करत होता का? नाही. पौलाने सांगितल्याप्रमाणे, एपफ्रास खास कलस्सै येथील बांधवांकरता प्रार्थना करत होता. त्या बांधवांना कोणत्या समस्या होत्या हे आपल्याला माहीत नाही, पण अर्थातच एपफ्रासला त्या माहीत होत्या. आपण काही समस्यांची कल्पना करू शकतो. कदाचित लीन नावाच्या तरुण बांधवाला त्याकाळच्या प्रचलित तत्त्वज्ञानाच्या प्रभावाला बळी न पडण्याकरता संघर्ष करावा लागत असेल, आणि कदाचित रूफसला त्याच्या पूर्वीच्या यहुदी धर्माच्या चालीरिती पूर्णपणे सोडून देणे कठीण जात असेल. पर्सिस हिचा पती ख्रिस्ती नसल्यामुळे तिला आपल्या मुलांना प्रभुचे शिक्षण देण्याकरता सुबुद्धी आणि सहनशीलतेची नितांत गरज असेल, नाही का? तसेच असिन्क्रिटसला त्याच्या गंभीर आजारपणामुळे कदाचित सांत्वनाची जास्त गरज असेल. एप्रफासला त्याच्या मंडळीतल्या बांधवांच्या समस्या माहीत होत्या. म्हणूनच त्याने त्यांच्याकरता जीव तोडून प्रार्थना केली. त्याला आणि पौलालाही मनापासून अशी इच्छा होती की या सर्व विश्वासू बांधवांनी शेवटपर्यंत यहोवाला शोभेल असे वागावे.
१२. आपण आपल्या प्रार्थनेत काही बांधवांचा विशेष उल्लेख कसा करू शकतो?
१२ पौल व एपफ्रासप्रमाणे आपणही इतरांसाठी प्रार्थना करण्याद्वारे त्यांना मदत करू शकतो का? आपण आधी पाहिल्याप्रमाणे, ख्रिस्ती सभांमध्ये सर्वांना समजावे म्हणून सहसा एखाद्याचे नाव घेऊन प्रार्थना करण्याऐवजी सर्व बांधवांचा उल्लेख केला जातो. पण आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रार्थनेत मात्र आपण खास एखाद्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तींसाठी अथवा एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल प्रार्थना करू शकतो. आपण सहसा सर्व प्रवासी पर्यवेक्षकांसाठी किंवा जगभरातल्या मंडळ्यांत सेवा करणाऱ्या सर्व वडिलांसाठी यहोवाला प्रार्थना करतो. पण आपल्या मंडळीला भेट देणाऱ्या सर्किट ओव्हरसियरचा किंवा आपल्या पुस्तक अभ्यास गटाचे नेतृत्व करणाऱ्या बांधवाचा आपल्या प्रार्थनेत खास उल्लेख करता येईल का? फिलिप्पैकर २:२५-२८ आणि १ तीमथ्य ५:२३ या वचनांत पौलाने तीमथ्य व एपफ्रदीत यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. आपणही आपल्या आजारी बांधवांबद्दल त्यांचे नाव घेऊन आपली काळजी व्यक्त करू शकतो.
१३. कोणकोणत्या परिस्थितींत एखाद्या खास समस्येविषयी वैयक्तिक प्रार्थनेत उल्लेख करता येईल?
१३ अर्थात, आपण कोणाच्या खासगी व्यवहारांत दखल देऊ इच्छित नाही. पण ज्यांना आपण ओळखतो आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला काळजी वाटते त्यांच्याविषयी आपण आपल्या प्रार्थनेत मनापासून काळजी व्यक्त करू शकतो. (१ तीमथ्य ५:१३; १ पेत्र ४:१५) कदाचित एखाद्या बांधवाची नोकरी गेली असेल. आपण त्यांना दुसरी नोकरी तर देऊ शकत नाही, पण त्या बांधवाचा उल्लेख करून त्यांच्या समस्येविषयी आपण यहोवाला प्रार्थना निश्चितच करू शकतो. (स्तोत्र ३७:२५; नीतिसूत्रे १०:३) “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याविषयीच्या तत्त्वामुळे अविवाहित राहिलेल्या एखाद्या बहिणीला तुम्ही ओळखता का? (१ करिंथकर ७:३९) पती व मुले नसल्यामुळे कदाचित ती एकाकी असेल. तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेत, यहोवाला तिच्यावर आशीर्वाद देण्याची आणि विश्वासूपणे त्याच्या सेवेत टिकून राहण्यास मदत करण्याची विनंती करण्याचा तुम्ही कधी विचार केला का? दुसरे उदाहरण घ्या, कदाचित एखाद्या बांधवाकडून काही चूक झाल्यानंतर दोन वडिलांनी त्या बांधवाला त्याची चूक लक्षात आणून दिली असेल व सुधारणेसाठी सल्ला दिला असेल. या दोन्ही वडिलांनी आपापल्या वैयक्तिक प्रार्थनेत वेळोवेळी त्या बांधवाविषयी उल्लेख का करू नये?
१४. बांधवांसाठी प्रार्थना करण्याद्वारे आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?
१४ थोडा विचार केल्यास, तुम्हाला विशिष्ट बांधवांकरता प्रार्थना करण्याच्या असंख्य संधी सापडतील. तुमच्या परिचयाचे असे कित्येक बांधव असतील ज्यांना आपल्या समस्येला तोंड देण्याकरता यहोवाच्या साहाय्याची, सांत्वनाची, मार्गदर्शनाची, पवित्र आत्म्याची किंवा पवित्र आत्म्याच्या विशिष्ट फळाची गरज असेल. कदाचित या बांधवांपासून दूर असल्यामुळे किंवा इतर परिस्थितींमुळे त्यांना हवी तितकी मदत करण्यास तुम्ही असमर्थ असाल. पण या बांधवांकरता आणि बहिणींकरता प्रार्थना करायला कधीही विसरू नका. यहोवाच्या मार्गात चालत राहण्याची त्यांची इच्छा आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण कदाचित असे करत राहण्याकरता त्यांना मदतीची आवश्यकता असेल. आणि त्यांच्याकरता प्रार्थना करण्याद्वारे तुम्ही त्यांना एका अर्थाने मदतच करत असता.—स्तोत्र १८:२; २०:१, २; ३४:१५; ४६:१; १२१:१-३.
आपल्याकडून होईल तितकी मदत करा
१५. कलस्सैकर पुस्तकातील शेवटल्या भागाचेही परीक्षण करणे का महत्त्वाचे आहे?
१५ अर्थात, खास एखाद्या बांधवाकरता केवळ मनःपूर्वक प्रार्थना करणेच पुरेसे नाही. तुमच्या जवळच्या, प्रिय लोकांना तुम्ही इतर मार्गांनीही मदत करू शकता. कलस्सैकर या पुस्तकातून ही गोष्ट स्पष्ट होते. बरेच विद्वान असा दावा करतात की या पुस्तकात पौलाने ख्रिस्ती सिद्धान्तांविषयी लिहिले, आचरणाविषयी उपदेश दिला आणि शेवटी केवळ बांधवांना सलाम लिहून पत्र संपवले. (कलस्सैकर ४:७-१८) पण याउलट, आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे, या पुस्तकाच्या शेवटल्या भागातही आपल्याकरता बरेच काही शिकण्यासारखे आहे.
१६, १७. कलस्सैकर ४:१०, ११ येथे उल्लेख केलेल्या बांधवांबद्दल आपण काय म्हणू शकतो?
१६ पौलाने लिहिले, “माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाहि तुम्हाला सलाम सांगतो, (त्याच्या विषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा;) युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.”—कलस्सैकर ४:१०, ११.
१७ या ठिकाणी पौलाने काही बांधवांचा खास उल्लेख केला. हे बांधव सुंता झालेल्यांपैकी म्हणजे यहुदी आहेत असे तो सांगतो. रोममध्ये कित्येक सुंता झालेले यहुदी होते यांपैकी काहीजण आता ख्रिस्ती झाले होते. पण केवळ हे दोन बंधू पौलाला मदत करण्यासाठी पुढे आले होते. यहुदी नसलेल्या ख्रिस्ती बांधवांसोबत उठायबसायला ते मागेपुढे पाहात नसतील. आणि म्हणूनच गैरयहुद्यांना प्रचार करण्याकरता त्यांनी पौलासोबत आनंदाने कार्य केले असेल.—रोमकर ११:१३; गलतीकर १:१६; २:११-१४.
१८. पौलाने त्याच्यासोबत असणाऱ्या काही बांधवांची कशाप्रकारे प्रशंसा केली?
१८ पौलाने काय म्हटले ते पाहा: “हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले [“मला आधार व मदत मिळाली,” NW] आहे.” (तिरपे वळण आमचे.) याठिकाणी पौलाने वापरलेला (पॅराकलिओ) हा मूळ ग्रीक शब्द बायबलमध्ये केवळ एकदाच आला आहे. बऱ्याच बायबलमध्ये या शब्दाचे भाषांतर सांत्वन असेच केलेले आढळते. पण दुसरा एक ग्रीक शब्द सहसा “सांत्वन” असे भाषांतरित केला जातो. कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रातच पौलाने कित्येकदा हा शब्द वापरला आहे, पण याठिकाणी म्हणजे कलस्सैकर ४:११ येथे मात्र तो “आधार व मदत” या अर्थाचा शब्द वापरतो.—मत्तय ५:४; प्रेषितांची ४:३६; ९:३१; २ करिंथकर १:४; कलस्सैकर २:२; ४:८.
१९, २०. (अ) रोममध्ये पौलाला मदत करणाऱ्या बांधवांबद्दल सांगताना त्याने जो विशेष शब्द वापरला त्याचा काय अर्थ होतो? (ब) त्या बांधवांनी पौलाला कशाप्रकारे मदत केली असेल?
१९ पौलाने ज्यांचा उल्लेख केला त्या बांधवांनी केवळ शब्दांनी त्याचे सांत्वन केले नसेल. कलस्सैकर ४:११ येथे “आधार व मदत” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द सर्वसामान्य ग्रीक साहित्यात काहीवेळा वेदना शमविणाऱ्या औषधाच्या संदर्भात वापरलेला आढळतो. न्यू लाइफ व्हर्शन यात या भागाचे अशाप्रकारे भाषांतर केले आहे: “त्यांनी मला खूपच मदत केली!” टुडेज इंग्लिश व्हर्शन याप्रमाणे: “त्यांची मला खूप मदत झाली.” पौलाजवळ राहून या ख्रिस्ती बांधवांनी त्याला कशी मदत केली असावी?
२० पौलाकडे येण्याची लोकांना परवानगी होती, पण त्याला मात्र बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे आवश्यक वस्तूंची खरेदी, उदाहरणार्थ हिवाळ्याकरता अन्नधान्य किंवा गरम कपडे इत्यादींची खरेदी तो स्वतः करू शकत नव्हता. अभ्यासाकरता गुंडाळ्या किंवा लिहिण्याकरता लागणारे साहित्य तो कसे आणत असेल? (२ तीमथ्य ४:१३) साहजिकच, हे बांधव पौलासाठी खरेदी तसेच इतर साधी कामे करण्याद्वारे त्याला मदत करत असतील. कधी पौलाला एखाद्या मंडळीच्या प्रगतीविषयी जाणून घ्यायचे असेल किंवा एखाद्या मंडळीला प्रोत्साहन द्यायचे असेल. पण कैदेत असल्यामुळे साहजिकच तो असे करण्यास असमर्थ होता. तेव्हा या बांधवांनी पौलाच्या वतीने त्यात्या मंडळीत जाऊन पौलाचा संदेश त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या प्रगतीचे वृत्त पौलापर्यंत पोचवले असेल. खरच पौलाच्या कठीण काळात त्यांनी त्याला मोठा आधार दिला!
२१, २२. (अ) कलस्सैकर ४:११ येथे दिलेले शब्द विचार करण्याजोगे का आहेत? (ब) पौलाला मदत करणाऱ्या बांधवांच्या उदाहरणाचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?
२१ पौलाने त्याला “आधार व मदत” देणाऱ्या बांधवांबद्दल जे लिहिले त्यावरून आपणही आपल्या बांधवांना मदत करण्याच्या संदर्भात बरेच काही शिकू शकतो. आपले बांधव यहोवाच्या नीतिनियमांनुसार त्याला शोभेल असे वागत असतील, ख्रिस्ती सभांना नियमित येत असतील आणि प्रचार कार्यातही भाग घेत असतील. हे खरोखर प्रशंसास्पद आहे. पण ज्याप्रकारे पौलाला काही बांधवांनी “आधार व मदत” केली होती, त्याप्रकारे आपल्यालाही आपल्या बांधवांना इतर मार्गांनी मदत करता येईल का?
२२ कदाचित तुम्ही अशा बहिणीला ओळखत असाल, जिने अविवाहित राहण्यासंबंधी बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांनुसार लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल. त्यामुळे आता कदाचित तिला स्वतःचे कुटुंब नसेल. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना घरी जेवायला बोलवता तेव्हा अशा बहिणीलाही सामील करता येईल का? अधिवेशनाला जाताना किंवा सुट्या घालवायला कोठे जाताना तिला तुमच्यासोबत येण्याचा आग्रह करण्यास काय हरकत आहे? किंवा खरेदी करायला जाता तेव्हा तिला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. हेच विधवा बहिणींच्या किंवा विधूर बांधवांच्या तसेच जे गाडी चालवू शकत नसल्यामुळे बाहेर जाण्यास असमर्थ आहेत अशांच्याबाबतीतही लागू होते. या बहिणींच्या किंवा बांधवांच्या सहवासामुळे तुम्हाला त्यांचे अनुभव ऐकायची संधी मिळेल; किंवा फळे, मुलांचे कपडे इत्यादी खरेदी करणे यांसारख्या साध्या कामांतही त्यांचे ज्ञान व अनुभव तुमच्या कामी पडेल. (लेवीय १९:३२; नीतिसूत्रे १६:३१) आणखी एक फायदा होईल, तो असा की या बहीणभावांशी तुमची जवळीक वाढेल. यामुळे कधी त्यांना तुमच्या मदतीची गरज पडलीच, उदाहरणार्थ औषध विकत आणायचे असेल किंवा इतर कोणते काम असेल तर त्यांना तुमची मदत मागायला संकोच वाटणार नाही. रोममध्ये पौलासोबत असलेल्या बांधवांनी त्याला केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीतून “आधार व मदत” दिली. तुम्ही देखील असे करू शकता. यामुळे होणारा आणखी एक फायदा जो पौलाच्या काळातही झाला, तो असा की बांधवांमधील प्रेम वाढत जाईल सर्वांना विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्याचे प्रोत्साहन मिळेल.
२३. आपण सर्वांनी काय केले पाहिजे?
२३ या लेखात उल्लेख केलेल्या काल्पनिक उदाहरणांवर आपण सर्वजण विचार करू शकतो. ही उदाहरणे काल्पनिक असली तरीसुद्धा यांवर विचार केल्यामुळे आपल्याला आपल्या बांधवांना “आधार व मदत” देता येईल असे वास्तव जीवनातील प्रसंग लक्षात येतील. अर्थात आपण समाजसेवकांप्रमाणे कार्य करू लागावे असे येथे सुचवायचे नाही. कलस्सैकर ४:१०, ११ येथे उल्लेख केलेल्या बांधवांचा तो उद्देश नव्हता. ते “देवाच्या राज्याकरिता [पौलाचे] सहकारी” होते. आणि त्यांनी एकमेकांना जे काही साहाय्य केले ते देवाच्या राज्याच्या वाढीकरताच केले होते. आपणही असेच केले पाहिजे.
२४. इतरांकरता प्रार्थना करण्यामागे व त्यांना मदत करण्यामागे कोणते कारण आहे?
२४ आपण आपल्या बांधवांचा प्रार्थनेत खास उल्लेख का करतो आणि त्यांना आधार व मदत देण्याचा प्रयत्न का करतो? कारण आपले हे बहीणभाऊ ‘सर्वप्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागू इच्छितात’ याची आपल्याला जाणीव आहे. (कलस्सैकर १:१०) याच संदर्भात पौलाने आणखी एका मुद्द्यावर कलस्सैकरांच्या पत्रांत लिहिले होते. एपफ्रासने कलस्सैकरांसाठी प्रार्थनेत अशी विनंती केली की “देवाच्या इच्छेनुसार [त्यांनी] परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.” (कलस्सैकर ४:१२) आपण स्वतः हे कसे करू शकतो? याविषयी पुढे पाहू या.
[तळटीप]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स, खंड १, पृष्ठे ४९०-१ आणि ऑल स्क्रिप्चर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲन्ड बेनिफिशियल, पृष्ठे २२६-८ पाहा.
याकडे तुम्ही लक्ष दिले का?
• आपल्या वैयक्तिक प्रार्थनांच्या माध्यमाने आपण बांधवांना कशी मदत करू शकतो?
• काही ख्रिस्ती बांधवांनी पौलाला “आधार व मदत” कशाप्रकारे दिली?
• कोणत्या प्रकारच्या परिस्थितींत आपण “आधार व मदत” देऊ शकतो?
• आपल्या बांधवांकरता प्रार्थना करण्यामागचा व त्यांना मदत करण्यामागचा उद्देश काय आहे?
[१८ पानांवरील चित्र]
कुटुंब मिळून तुम्ही फिरायला जाता तेव्हा एखाद्या ख्रिस्ती बहिणीला किंवा भावालाही सामील करता येईल का?
[चित्राचे श्रेय]
Courtesy of Green Chimney’s Farm