वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ११/१५ पृ. २४-२७
  • पहिल्या मानवी दांपत्याकडून धडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पहिल्या मानवी दांपत्याकडून धडा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “नर व नारी अशी ती निर्माण केली”
  • ‘देवाच्या प्रतिरूपात’
  • हव्वेचे पाप
  • आदाम आपल्या पत्नीचे ऐकतो
  • पापाचे परिणाम
  • आपल्याकरता धडा
  • आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली
    बायबलमधून शिकू या!
  • शेवटला शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ११/१५ पृ. २४-२७

पहिल्या मानवी दांपत्याकडून धडा

देवाने पृथ्वीवर एक नजर टाकली. मानवांच्या वसतीसाठी तो तिची तयारी करत होता. त्याने बनवलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे असे त्याने पाहिले. सर्व काही केल्यानंतर ते सगळे “फार चांगले” आहे असे तो स्वतः म्हणाला. (उत्पत्ति १:१२, १८, २१, २५, ३१) परंतु, ते म्हणण्याआधी एक गोष्ट ‘बरी नाही’ असे देव म्हणाला. अर्थात, देवाने बनवलेल्या कोणत्याही गोष्टीत काही खोट होती अशातला भाग नव्हता. फक्‍त त्याचे निर्मिती कार्य तेव्हा पूर्ण झाले नव्हते. यहोवा म्हणाला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”—उत्पत्ति २:१८.

पृथ्वीच्या बागेसमान परिस्थितीत मानवांनी अनंतकाळ राहावे, तसेच ते सुदृढ, आनंदी व समाधानी असावेत हाच यहोवाचा उद्देश होता. आदाम हा सर्व मानवजातीचा पिता होता. त्याची पत्नी हव्वा “अवघ्या जीवधारी जनांची माता” बनली. (उत्पत्ति ३:२०) त्यांचीच संतती आज पृथ्वीवर पसरलेली आहे, तरी हे लोक परिपूर्ण नाहीत.

आदाम आणि हव्वेची कहाणी सर्वांनाच माहीत आहे. पण तिचा आपल्याला काय फायदा आहे? पहिल्या मानवी दांपत्याकडून आपण काय शिकू शकतो?

“नर व नारी अशी ती निर्माण केली”

आदाम सर्व प्राण्यांना नावे देत होता तेव्हा प्रत्येक प्राण्याची जोडी होती. मात्र त्याला स्वतःसाठी कोणी जोडीदार नव्हता. मग यहोवाने त्याच्या फासळीतून एक सुंदर स्त्री तयार केली; तिला पाहून तो खूप आनंदित झाला. केवळ तीच त्याचा एक भाग होती हे जाणून त्याने म्हटले: “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.”—उत्पत्ति २:१८-२३.

मानवाला ‘साहाय्यकाची’ आवश्‍यकता होती. आणि त्याला अगदी योग्य “साहाय्यक” मिळाला. त्यांच्या बागेसमान घराची आणि प्राण्यांची काळजी घेण्यासाठी, मुलांना जन्म देण्यासाठी, खऱ्‍या साथीदाराप्रमाणे बौद्धिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी हव्वेमध्ये आदामाला पूरक ठरणारे सर्व गुण होते.—उत्पत्ति १:२६-३०.

त्या जोडप्याला लागणारी हरएक वस्तू यहोवाने त्यांना दिली. आदामाला हव्वा देऊन देवाने विवाहाची आणि कुटुंबसंस्थेची सुरवात केली; त्यावरच समाजाची रचना किंवा व्यवस्था अवलंबून असणार होती. उत्पत्तीच्या अहवालात म्हटले आहे: “पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” यहोवाने पहिल्या विवाहित जोडप्याला आशीर्वादित करून फलद्रूप व्हायला सांगितले तेव्हा प्रत्येक बाळाचा जन्म एका कुटुंबात व्हावा, त्याची काळजी घेण्यासाठी त्या कुटुंबात एक पिता आणि एक माता असावी हा त्याचा उद्देश होता.—उत्पत्ति १:२८; २:२४.

‘देवाच्या प्रतिरूपात’

आदाम हा देवाचा परिपूर्ण पुत्र होता. त्याला देवाच्या ‘प्रतिरूपात व त्याच्या सदृश’ असे निर्माण करण्यात आले होते. परंतु “देव आत्मा” असल्यामुळे आदाम आणि देवामधील साम्य स्वरूपात किंवा दिसण्यात असू शकत नव्हते. (उत्पत्ति १:२६; योहान ४:२४) तर त्यांच्या गुणांमध्ये सदृश्‍यता होती. या गुणांमुळेच मानव हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनला. होय, मनुष्यात अगदी सुरवातीपासून प्रीती, बुद्धी, शक्‍ती आणि न्याय हे गुण घालण्यात आले होते. त्याला इच्छा स्वातंत्र्य दिले होते आणि आध्यात्मिक क्षमताही देण्यात आली होती. तसेच नैतिकतेची जाणीव किंवा विवेक देखील त्याला दिला होता ज्यामुळे त्याला योग्य-अयोग्य यातला भेद कळू शकत होता. मानवाला बौद्धिक क्षमताही देण्यात आली होती ज्यामुळे मानव का अस्तित्वात आहे यावर तो मनन करू शकत होता, निर्मात्याविषयी अधिक जाणून घेऊ शकत होता आणि त्याच्याशी जवळचा नातेसंबंध निर्माण करू शकत होता. अशाप्रकारे, देवाच्या पृथ्वीवरील सृष्टीची देखभाल करण्याकरता आदाम योग्य होता.

हव्वेचे पाप

आदाम-हव्वेला एदेन बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी होती, फक्‍त बऱ्‍या-वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नये अशी देवाची आज्ञा होती. आदामाने त्याविषयी हव्वेला सांगितलेच असणार. ही आज्ञा मोडल्यास ते त्याच दिवशी मरणार होते.—उत्पत्ति २:१६, १७.

ही आज्ञा त्यांना मिळता न मिळताच मना केलेल्या फळावरून प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. हव्वेला एका सर्पाने गाठले. खरे तर त्या सर्पामागे एक अदृश्‍य आत्मिक प्राणी होता जो त्या सर्पाचा कठपुतळीसारखा उपयोग करत होता. आपल्याला काही ठाऊकच नाही अशा स्वरात सर्पाने विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हव्वेने त्याला सांगितले की, एका झाडाला सोडून बाकीच्या कोणत्याही झाडाचे फळ खाता येऊ शकते. मग सर्पाने स्त्रीला एकदम उलटच सांगितले; तो म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” हे ऐकल्यावर मना केलेल्या झाडाबद्दल स्त्रीचा दृष्टिकोन बदलला. “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर” आहे असे तिला वाटू लागले. सर्पाच्या बोलण्यामुळे फसून हव्वेने देवाची आज्ञा मोडली.—उत्पत्ति ३:१-६; १ तीमथ्य २:१४.

हव्वेने केलेले पाप साहजिक होते, ते टाळता येण्यासारखे नव्हते हे खरे आहे का? मुळीच नाही! तिच्या जागी तुम्ही आहात असा विचार करा. देवाने आणि आदामाने जे काही सांगितले होते त्याच्या अगदी विरोधात हा सर्प बोलला. समजा तुमचे एखाद्या व्यक्‍तीवर प्रेम आहे, त्याच्यावर भरवसा आहे आणि दुसरी एक अनोळखी व्यक्‍ती तुमच्या आवडत्या व्यक्‍तीवर आरोप लावते तर तुम्हाला कसे वाटले असते? खरे तर हव्वेने अगदी उलट प्रतिक्रिया दाखवायला हवी होती; तिला सर्पाचा तिटकारा वाटायला हवा होता, त्याचा राग यायला हवा होता. मुळात तिने त्याचे ऐकायलाच नको होते. देवाच्या धार्मिकतेवर आणि तिच्या पतीच्या आज्ञेवर आक्षेप घेणारा हा सर्प कोण, असे तिला वाटायला हवे होते. आणि मस्तकपदाला आदर दाखवण्याच्या तत्त्वानुसार हव्वेने कोणताही निर्णय घेण्याआधी आदामाशी बातचीत करायला हवी होती. हा आपल्याकरता एक धडा आहे. देवाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या अगदी विरोधात काही माहिती आपल्याला देण्यात आली तर आपणही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. परंतु, हव्वेने तसे केले नाही. तिने फसवणाऱ्‍यावर विश्‍वास ठेवला आणि बरे-वाईट काय आहे ते स्वतःच ठरवण्याची इच्छा दाखवली. हा विचार तिच्या मनात घोळत राहिला आणि नंतर तिला ती कल्पना आवडू लागली. तेव्हाच वाईट विचार डोक्यातून काढून टाकण्याऐवजी किंवा त्याविषयी आपल्या पतीशी बोलण्याऐवजी ती त्यावर विचार करत राहिली. ही किती मोठी चूक होती!—१ करिंथकर ११:३; याकोब १:१४, १५.

आदाम आपल्या पत्नीचे ऐकतो

आदामालाही आपल्या पापात सामील करायला हव्वेला जास्त वेळ लागला नाही. पण त्याने तिचे मुकाट्याने का ऐकून घेतले? (उत्पत्ति ३:६, १७) आदाम खरे तर पेचात पडला असावा. एकीकडे निर्माणकर्ता होता आणि दुसरीकडे त्याची बायको. त्याने काय केले? ज्या निर्माणकर्त्याने त्याला सर्वकाही दिले होते (प्रिय बायकोसुद्धा) त्याची आज्ञा त्याने पाळली का? त्याने देवाकडून मार्गदर्शन घेतले का? की तो बायकोच्या बाजूला झाला? त्याच्या बायकोची समजूत चुकीची आहे, मना केलेले फळ खाऊन आपण देवासारखे होऊ शकत नाही याची आदामाला बऱ्‍यापैकी कल्पना होती. या विषयी प्रेषित पौलाने प्रेरित होऊन असे लिहिले: “आदाम भुलविला गेला नाही . . . [पण] स्त्री भुलून अपराधात सापडली.” (१ तीमथ्य २:१४) म्हणजेच आदामाने मुद्दामहून यहोवाची आज्ञा धुडकावून लावली. आपली पत्नी आपल्यापासून दूर होईल याची त्याला जास्त भीती वाटली. या परिस्थितीवर उपाय काढण्याची क्षमता देवाकडे आहे असा विश्‍वास त्याने दाखवला नाही.

आदामाचे हे कृत्य आत्महत्या करण्यासारखे होते. अशाप्रकारे त्याने स्वतःचा नाश केला आणि यहोवाच्या दयेने त्याला झालेल्या मुलांवरही पाप ओढून घेतले कारण ते सगळे पापात जन्मले ज्याचा अंतिम परिणाम मृत्यू होता. (रोमकर ५:१२) स्वतःचा स्वार्थ पाहून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याची किती मोठी किंमत मोजावी लागली!

पापाचे परिणाम

पाप केल्यानंतर त्यांना लाज वाटू लागली. यहोवाशी मनमोकळेपणाने बोलण्याची पूर्वीप्रमाणे त्यांना उत्सुकता राहिली नाही, त्याऐवजी ते दोघेही त्याच्यापासून लपू लागले. (उत्पत्ति ३:८) देवासोबतची त्यांची मैत्री कायमची तुटली होती. देवाने त्यांना जाब विचारला तेव्हा आपण देवाची आज्ञा मोडली आहे हे ठाऊक असतानाही त्यांना त्याचे काहीच दुःख वाटले नाही. मना केलेले फळ खाऊन त्यांनी देवाच्या चांगुलपणाकडे पाठ फिरवली.

मग देवाने सांगितले, हव्वेला मुलांना जन्म देताना फार त्रास होईल. तसेच तिला तिच्या पतीबद्दल ओढ वाटेल आणि तो तिच्यावर स्वामित्व गाजवेल. अशाप्रकारे, स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हव्वेला अगदी उलट परिणाम भोगावे लागले. आदामाला आता भूमीची उपज मिळण्यासाठी कष्ट करावे लागणार होते. एदेन बागेत कठीण परिश्रम न करता त्याच्या गरजा पूर्ण होत होत्या, पण आता त्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार होता. यातच त्याचे आयुष्य संपून तो शेवटी जेथून आला त्या मातीत परत मिळणार होता.—उत्पत्ति ३:१६-१९.

शेवटी, आदाम आणि हव्वेला एदेन बागेतून बाहेर काढण्यात आले. यहोवा म्हणाला: “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता त्याने आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेहि फळ काढून खाऊ नये व सर्वकाळ जिवंत राहू नये . . .” गॉर्डन वेन्हॅम हे विद्वान म्हणतात की, “हे वाक्य असे अर्ध्यातच संपते.” यापुढे देवाने काय विचार केला असेल ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. कदाचित त्याने असा विचार केला असेल, “म्हणून मी त्याला बागेतून बाहेर काढतो.” सहसा, बायबलचे लेखक देवाचा विचार असा अर्धवट लिहिणार नाही. पण वेन्हॅम म्हणतात की, या ठिकाणी “ते वाक्य पूर्ण केलेले नाही यावरून देवाने किती लगेच पुढची कृती केली असेल हे कळते. त्याचे बोलून झालेही नव्हते तोच त्यांना बागेतून बाहेर काढण्यात आले.” (उत्पत्ति ३:२२, २३, NW) त्यानंतर, यहोवा आदाम व हव्वा यांच्याशी बोलल्याचा उल्लेख आढळत नाही.

आदाम आणि हव्वेचा त्याच दिवशी म्हणजे २४ तासांत शारीरिक मृत्यू झाला नाही. पण ते आध्यात्मिक अर्थाने मरण पावले. जीवनाच्या उगमापासून ते पूर्णतः दुरावले आणि त्यानंतर त्यांची मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली. त्यांच्या पहिल्या मुलाने अर्थात काईनाने त्यांच्या दुसऱ्‍या मुलाचा अर्थात हाबेलचा घात केला तेव्हा त्यांना मृत्यूचा पहिला अनुभव आला; तो अनुभव त्यांच्याकरता किती कष्टदायक असेल याची आपण कल्पना करू शकतो!—उत्पत्ति ४:१-१६.

त्यानंतर, पहिल्या मानवी दांपत्याबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. आदाम १३० वर्षांचा झाल्यावर त्यांना शेथ झाला. शेथ त्यांचा तिसरा मुलगा होता. त्यानंतर आदाम आणखी ८०० वर्षे जगला; त्याला आणखी “मुलगे व मुली झाल्या.” शेवटी तो ९३० वर्षांचा होऊन मरण पावला.—उत्पत्ति ४:२५; ५:३-५.

आपल्याकरता धडा

पहिल्या विवाहित दांपत्याच्या अहवालातून आपल्याला आजच्या मानवी समाजाच्या दयनीय स्थितीचे कारण कळते. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या अहवालातून आपल्याला एक महत्त्वपूर्ण धडा शिकायला मिळतो. यहोवा देवाचे प्रतिबंध धुडकावून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे निखळ मूर्खपणा आहे. जे खरेच शहाणे आहेत ते यहोवा आणि त्याच्या वचनावर विश्‍वास ठेवतील, स्वतःच्या “बुद्धीवर” अवलंबून राहणार नाहीत. योग्य-अयोग्य ठरवणारा यहोवा आहे. योग्य गोष्ट करणे म्हणजेच त्याची आज्ञा पाळणे होय. त्याच्या नियमांचा भंग करणे किंवा त्याच्या तत्त्वांना न जुमानणे हा अपराध आहे.

देवाने आधीही मानवांना सर्वकाळचे जीवन, स्वातंत्र्य, समाधान, आनंद, आरोग्य, शांती, संपन्‍नता आणि नवनवीन गोष्टींचा शोध करण्याची क्षमता दिली होती आणि अजूनही हे सर्व त्याने मानवांसमोर ठेवले आहे. आपल्या या सर्व स्वाभाविक इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल, तर आधी आपल्याला हे मान्य करावे लागेल की, आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यावर आपण पूर्णपणे विसंबून आहोत.—उपदेशक ३:१०-१३; यशया ५५:६-१३.

[२६ पानांवरील चौकट/चित्र]

आदाम-हव्वेची कहाणी काल्पनिक आहे का?

प्राचीन काळातल्या बॅबिलोनी, असेरियन, ईजिप्शियन आणि इतर लोकांमध्ये पापामुळे मूळ परादीस (बाग) गमावण्यात आले हा विश्‍वास रूढ होता. जीवनाचा एक वृक्ष होता आणि त्याचे फळ खाणाऱ्‍या लोकांना अनंतकाळचे जीवन मिळणार होते ही गोष्ट बहुतेक सर्वच अहवालांमध्ये आढळत होती. याचाच अर्थ, एदेन बागेत काहीतरी अघटित घडल्याचे लोकांना आठवत होते.

आज, बहुतेक लोकांना वाटते की, बायबलमधील आदाम-हव्वेची गोष्ट केवळ एक दंतकथा आहे. परंतु, बहुतेक शास्त्रज्ञसुद्धा हे मान्य करतात की, मानवजात एकाच कुटुंबातून आली आहे; सर्वांचा एकच उगम आहे. आपल्या सर्वांच्या मूळ पूर्वजाने पाप केल्यामुळे मानवजातीत त्याचे परिणाम पसरले हे पुष्कळशा बायबल विद्वानांना देखील अमान्य करता येत नाही. कारण संपूर्ण मानवजातीचा कोणी मूळ पालक नसून ही मानवजात वेगवेगळ्या व्यक्‍तींपासून आली आहे असे म्हटले तर पापसुद्धा एका नव्हे तर अनेक पूर्वजांनी केले असे त्यांना मान्य करावे लागेल. असे असेल तर मानवजातीची सुटका करणारा ख्रिस्त हा “शेवटला आदाम” होता असे त्यांना म्हणता येणार नाही. पण येशूचा किंवा त्याच्या शिष्यांचा असा गोंधळ झाला नाही. उत्पत्तीचा अहवाल सत्य आहे हे त्यांनी ओळखले होते.—१ करिंथकर १५:२२, ४५; उत्पत्ति १:२७; २:२४; मत्तय १९:४, ५; रोमकर ५:१२-१९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा