शेवटला शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल
“जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” —१ करिंथ. १५:२६.
१, २. आदाम आणि हव्वा यांना निर्माण करण्यात आले तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होती, आणि त्यामुळे कोणते प्रश्न उद्भवतात?
आदाम आणि हव्वा यांना निर्माण करण्यात आले तेव्हा त्यांचा एकही शत्रू नव्हता. ते परिपूर्ण मानव म्हणून नंदनवनात राहत होते. निर्माणकर्त्याची मुले या नात्याने त्यांचा त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध होता. (उत्प. २:७-९; लूक ३:३८) देवाने त्यांच्यावर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. (उत्पत्ति १:२८ वाचा.) ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्यांना किती काळ जिवंत राहणे गरजेचे होते? “पृथ्वी व्यापून” टाकण्याची कामगिरी काही काळात पूर्ण होण्यासारखी होती. पण, “पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता” चालवण्याची कामगिरी पुढेही बजावत राहण्यासाठी मात्र, आदाम आणि हव्वा यांनी सदासर्वकाळ जिवंत राहणे गरजेचे होते.
२ तर मग, आज परिस्थिती इतकी वेगळी का आहे? मानवांच्या वाट्याला मृत्यू हा सर्वात मोठा शत्रू, तसेच इतर शत्रू कसे आले? या शत्रूंचा कायमचा नाश करण्यासाठी देव काय करेल? या व अशा इतर प्रश्नांची उत्तरे आपल्याला बायबलमध्ये सापडतात. आता आपण त्यांपैकी काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ या.
एक प्रेमळ ताकीद
३, ४. (क) देवाने आदाम आणि हव्वेला कोणती आज्ञा दिली होती? (ख) या आज्ञेचे पालन करणे इतके महत्त्वाचे का होते?
३ आदाम आणि हव्वा यांना सदासर्वकाळ जगण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले असले, तरी त्यांना अमर जीवन देण्यात आले नव्हते. जिवंत राहण्यासाठी त्यांना श्वास घेण्याची, अन्नपाणी सेवन करण्याची आणि झोप घेण्याची गरज होती. पण, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जीवन निर्माणकर्त्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेसंबंधावर अवलंबून होते. (अनु. ८:३) जीवनाचा आनंद घेत राहण्यासाठी, त्यांनी देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे महत्त्वाचे होते. ही गोष्ट देवाने हव्वेला निर्माण करण्याआधीच आदामाला स्पष्टपणे सांगितली होती. यहोवा देवाने, “आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”—उत्प. २:१६, १७.
४ बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड एका विशिष्ट गोष्टीला चित्रित करत होते. ती म्हणजे, चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा हक्क फक्त देवालाच आहे. आदामाजवळ चांगले काय आणि वाईट काय यात फरक करण्याची क्षमता आधीपासूनच होती कारण त्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. तसेच, आपल्याला नेहमीच यहोवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे याची आठवण आदाम आणि हव्वा यांना बागेतील त्या झाडामुळे होणार होती. त्यामुळे, त्या झाडाचे फळ खाणे हे जणू देवाला असे म्हणण्यासारखे होते, की “आम्हाला तुझ्या नियमांची गरज नाही.” त्यांनी असे केल्यास त्यांना व त्यांच्या संततीला भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार होते. देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या संततीवर मृत्यू ओढवणार होता.
मानवांमध्ये मृत्यू कसा आला?
५. आदाम आणि हव्वा यांना देवाची आज्ञा मोडण्यास कशा प्रकारे बहकावण्यात आले?
५ हव्वेची निर्मिती झाल्यानंतर आदामाने तिला देवाच्या आज्ञेविषयी सांगितले. तिला ती आज्ञा चांगल्या प्रकारे माहीत होती आणि तिने ती तोंडपाठ असल्यासारखी अगदी शब्दशः सांगितली. (उत्प. ३:१-३) सर्पाच्या माध्यमाने धूर्तपणे बोलणारा मुळात देवाचा एक आत्मिक पुत्र, दियाबल सैतान होता. या आत्मिक पुत्राने स्वतःच्या मनात चुकीच्या इच्छा घोळू दिल्या. त्याला देवाच्या अधिकाराखाली राहायचे नव्हते आणि मानवांनी देवाऐवजी आपली उपासना करावी अशीही त्याची इच्छा होती. (याकोब १:१४, १५ पडताळून पाहा.) आपल्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने देवावर खोटे बोलण्याचा आरोप लावला. त्याने हव्वेला हे पटवून दिले की जर तिने देवाच्या अधिकाराखाली राहण्याचे नाकारले तर ती मरणार नाही, याउलट ती देवासारखी होईल. (उत्प. ३:४, ५) हव्वेने सैतानाच्या या लबाडीवर विश्वास ठेवला आणि फळ खाण्याद्वारे देवाच्या अधिकाराखाली राहण्याचे नाकारले. तिने आपल्या पतीलाही ते फळ खायला लावले. (उत्प. ३:६, १७) सैतान खोटे बोलत होता. (१ तीमथ्य २:१४ वाचा.) असे असले, तरी आदामाने “आपल्या स्त्रीचे ऐकले.” तो सर्प एखाद्या मित्राप्रमाणे वाटत असला, तरी त्याच्या माध्यमातून जो बोलत होता तो दियाबल सैतान खरेतर एक निर्दयी शत्रू होता. आपण हव्वेला जे करण्यासाठी सांगत आहोत त्याचे परिणाम फार भयंकर होतील याची त्याला पूर्णपणे जाणीव होती.
६, ७. यहोवाने बंडखोरांचा न्याय कसा केला?
६ स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी आदाम आणि हव्वा या दोघांनीही देवाची आज्ञा मोडली. ज्याने त्यांना जीवन आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही दिले होते त्याचीच आज्ञा त्यांनी मोडली. अर्थात देवाला घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल माहीत होते. (१ इति. २८:९; नीतिसूत्रे १५:३ वाचा.) पण, तो आदाम, हव्वा व सैतान या तिघांनाही हे दाखवण्याची संधी देत होता की त्यांना देवाबद्दल मनापासून काय वाटते. या तिघांनीही जेव्हा यहोवाविरुद्ध बंड केले, तेव्हा पिता या नात्याने त्याला नक्कीच अतोनात दुःख झाले असेल. (उत्पत्ति ६:६ पडताळून पाहा.) पण, त्याला एका न्यायाधीशाप्रमाणे न्याय करावा लागला आणि त्या बंडखोरांना शिक्षा द्यावी लागली.
७ देवाने आदामाला आधीच सांगितले होते की, “ज्या दिवशी त्याचे [बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे] फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” आदामाला हा ‘दिवस’ २४ तासांचा वाटला असावा. देवाची आज्ञा मोडल्यानंतर, सूर्यास्त होण्याआधीच यहोवा आपल्याला मरण देईल असे आदामाला वाटले असेल. यहोवा या जोडप्याशी सूर्यास्त होण्याआधी बोलला. (उत्प. ३:८) त्याने जणू एक न्यायसभा भरवली. यहोवाने आदाम आणि हव्वा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. (उत्प. ३:९-१३) त्यानंतर त्याने या बंडखोरांना शिक्षा सुनावली. (उत्प. ३:१४-१९) आदाम आणि हव्वा यांना यहोवाने त्याच दिवशी मरण दिले असते तर त्यांच्या व त्यांच्या संततीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण होऊ शकला नसता. (यश. ५५:११) आदाम आणि हव्वा त्याच दिवसापासून पाप केल्याचे परिणाम भोगू लागले. असे असले, तरी यहोवाने त्यांना काही काळ जगू दिले. त्याने आदाम आणि हव्वा यांना मुले होऊ दिली. यामुळे, भविष्यात तो ज्या तरतुदी करणार होता त्यांचा फायदा त्या मुलांना होणार होता. देवाच्या नजरेत आदाम आणि हव्वा पाप केल्याच्या दिवशीच मरण पावले कारण देवाच्या दृष्टिकोनात एक दिवस हा १,००० वर्षांप्रमाणे आहे.—२ पेत्र ३:८.
८, ९. आदामाच्या पापामुळे त्याच्या संततीला कोणते परिणाम भोगावे लागले? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
८ आदाम आणि हव्वा यांनी जे केले त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागणार होते का? नक्कीच. याबद्दल रोमकर ५:१२ मध्ये असे म्हणण्यात आले आहे, की “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” मरण पावणाऱ्यांमध्ये विश्वासू पुरुष हाबेल हा सर्वात पहिला होता. (उत्प. ४:८) त्यानंतर आदामाची इतर संततीही म्हातारी होऊन मरण पावली. त्यांना मृत्यूसोबत पापही वारशाने मिळाले का? प्रेषित पौलाने या प्रश्नाचे उत्तर दिले: “एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले.” (रोम. ५:१९) आणि यामुळे आदामाकडून वारशाने मिळालेले पाप आणि मृत्यू हे मानवाचे सर्वात मोठे शत्रू बनले. या शत्रूंपासून स्वतःची सुटका करणे अपरिपूर्ण मानवांना शक्य नाही. शारीरिक दृष्ट्या आदामाकडून त्याच्या मुलांना व त्यांच्या संततीला पाप आणि मृत्यू यांचा वारसा नेमका कशा प्रकारे मिळाला हे जरी आपण स्पष्टपणे सांगू शकत नसलो, तरी त्याचे परिणाम आज आपण पाहू शकतो.
९ म्हणून, बायबल आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाची आणि मृत्यूची तुलना “झाकून टाकणारे झाकण” आणि “सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन” यांच्याशी करते. (यश. २५:७) या तुलनेवरून दिसून येते की वारशाने मिळालेल्या या दोन्ही गोष्टी एखाद्या आच्छादनासारख्या किंवा अडकवून टाकणाऱ्या जाळ्यासारख्या आहेत ज्यात संपूर्ण मानवजात अडकलेली आहे. म्हणूनच, “आदामामध्ये सर्व मरतात.” (१ करिंथ. १५:२२) तेव्हा, पौलाने जो प्रश्न विचारला तो आपल्याही मनात येऊ शकतो: “मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवेल?” त्याला कोणी सोडवू शकत होते का?a—रोम. ७:२४.
पाप आणि मृत्यू नाहीसे करण्यात येतील
१०. (क) आदामाकडून मिळणारा मृत्यू यहोवा नाहीसा करेल हे कोणत्या वचनांतून आपल्याला कळते? (ख) या वचनांतून यहोवा आणि येशू यांच्याबद्दल आपल्याला काय कळते?
१० खरे पाहिल्यास पौलाच्या त्या निराशाजनक परिस्थितीतून यहोवा त्याला सोडवू शकत होता. झाकून टाकणाऱ्या ‘झाकणाचा’ उल्लेख केल्यानंतर यहोवा भविष्यात काय करेल याबद्दल यशया पुढील वचनात असे म्हणतो: “तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो, प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो.” (यश. २५:८) कोणत्याही मानवी पित्याला आपल्या मुलांच्या दुःखाचे कारण काढून टाकण्यास व त्यांचे अश्रू पुसण्यास आनंद वाटतो. त्याचप्रमाणे मृत्यू नाहीसा करण्याची यहोवाची मनापासून इच्छा आहे! ही गोष्ट साध्य करण्यासाठी त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. पहिले करिंथकर १५:२२ मध्ये असे म्हटले आहे: “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” तसेच, ‘मला कोण सोडवेल?’ असे विचारल्यानंतर पौलाने पुढे म्हटले: “आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोम. ७:२५) यहोवाने मानवांना प्रेमापोटी निर्माण केले. त्याचे हे प्रेम आदाम-हव्वेने पाप केल्यानंतरही कमी झाले नाही. तसेच, आदाम-हव्वेच्या संततीप्रती येशू ख्रिस्ताचेही प्रेम कमी झाले नाही. येशूने त्यांची निर्मिती करण्यात यहोवाला मदत केली होती. (नीति. ८:३०, ३१) पण, मानवांना पाप आणि मृत्यू यांपासून कसे सोडवण्यात येणार होते?
११. मानवांना मदत करण्यासाठी यहोवाने कोणती तरतूद केली?
११ आदामाच्या पापामुळे आणि यहोवाने त्यांना न्यायीपणे जी शिक्षा दिली तिच्यामुळे मानवी अपरिपूर्णता आणि मृत्यू हे आले आहेत. (रोम. ५:१२, १६) बायबलमध्ये असे म्हटले आहे की: “एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते.” (रोम. ५:१८) तर मग, आपल्या नीतिमान स्तरांना जडून राहून मानवांना शिक्षेपासून मुक्त करण्यासाठी यहोवा काय करणार होता? याचे उत्तर आपल्याला येशूच्या पुढील शब्दांवरून मिळते: “मनुष्याचा पुत्र . . . पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्त. २०:२८) येशूने स्पष्ट केले की परिपूर्ण मानव या नात्याने तो “सर्वांसाठी मुक्तीचे मोल” देईल. ही खंडणी यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार होती, असे का म्हणता येईल?—१ तीम. २:५, ६.
१२. यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार समतुल्य खंडणी कशी देण्यात आली?
१२ परिपूर्ण मानव या नात्याने येशू सर्वकाळ जगू शकत होता. आदामासाठी यहोवाचा हाच उद्देश होता. आदामाच्या परिपूर्ण संततीने ही पृथ्वी भरावी अशी यहोवाची इच्छा होती. येशूचे आपल्या पित्यावर आणि आदामाच्या संततीवर गाढ प्रेम होते. म्हणूनच, त्याने आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान दिले. आदामाने गमावलेल्या परिपूर्ण जीवनाच्या बदल्यात येशूने आपले परिपूर्ण जीवन दिले. याअर्थी, खंडणीचे मोल समतुल्य होते. येशूचा मृत्यू झाल्यानंतर, यहोवाने आपल्या पुत्राला आत्मिक शरीर देऊन पुन्हा जिवंत केले. (१ पेत्र ३:१८) येशू ख्रिस्ताने दिलेली खंडणी समतुल्य असल्यामुळे ती देवाने स्वीकारली. ज्या प्रकारे रक्कम देऊन एखादी वस्तू विकत घेता येते, त्याच प्रकारे यहोवाने खंडणीचे मोल देऊन आदामाच्या संततीला पाप आणि मृत्यू यांच्या दास्यातून विकत घेतले. यहोवाच्या या तरतुदीमुळे आदामाने गमावलेले परिपूर्ण जीवन त्याच्या संततीला मिळणे शक्य झाले. एकाअर्थी, येशूने आदामाची जागा घेतली. पौलाने म्हटले: “असा शास्त्रलेख आहे की, पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.”—१ करिंथ. १५:४५.
मरण पावणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असलेल्या हाबेलाला येशूच्या खंडणीमुळे फायदा मिळेल (परिच्छेद १३ पाहा)
१३. “शेवटला आदाम” मृत लोकांसाठी काय करेल?
१३ लवकरच अशी वेळ येणार आहे जेव्हा “शेवटला आदाम,” म्हणजेच ख्रिस्त आदामाच्या संततीला सार्वकालिक जीवन देईल. त्यांच्यापैकी मरण पावलेल्या बहुतेकांना पृथ्वीवर जगण्यासाठी पुन्हा जिवंत केले जाईल.—योहा. ५:२८, २९.
१४. मानवांना मिळालेली अपरिपूर्णता काढून टाकण्यासाठी यहोवाने काय केले आहे?
१४ वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेशी झुंज देणाऱ्या मानवजातीची सुटका कशी केली जाईल? यहोवाने स्वर्गात एका सरकाराची स्थापना केली आणि “शेवटला आदाम” असलेल्या येशू ख्रिस्ताला त्याचा राजा बनवले. तसेच, त्याने त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी काही मानवांना निवडले. (प्रकटीकरण ५:९, १० वाचा.) येशूसोबत जे स्वर्गात राज्य करतील त्यांनी अपरिपूर्णता अनुभवली असेल. एक हजार वर्षांच्या काळादरम्यान येशू व त्याचे सहराजे देवाच्या राज्याद्वारे पृथ्वीवरील मानवांना मदत करतील. मानव झुंज देत असलेल्या अपरिपूर्णतेला ते नाहीसे करतील.—प्रकटी. २०:६.
१५, १६. (क) मानवांचा ‘शेवटला शत्रू मृत्यू’ हा कशामुळे आला आहे, आणि त्याचा कायमचा नाश केव्हा होईल? (ख) पहिले करिंथकर १५:२८ नुसार कालांतराने येशू काय करेल?
१५ देवाच्या राज्याच्या हजार वर्षांच्या शेवटास, आदामाच्या बंडाळीमुळे निर्माण झालेल्या सर्व शत्रूंपासून मानवजात मुक्त झालेली असेल. बायबल म्हणते: “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील; पण प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे [त्याचे सहराजे] ते त्याच्या आगमन काळी. नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल. कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवेपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” (१ करिंथ. १५:२२-२६) आदामापासून मिळालेला मृत्यू हा नाहीसा केला जाईल. पाप आणि मृत्यू यांच्या जाळ्यात अडकलेल्या मानवजातीला मुक्त केले जाईल.—यश. २५:७, ८.
१६ आपल्या देवप्रेरित शब्दांची समाप्ती प्रेषित पौल पुढीलप्रमाणे करतो: “त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.” (१ करिंथ. १५:२८) येशूच्या राज्य शासनाचा उद्देश तेव्हा पूर्ण झालेला असेल. मानव परिपूर्ण झालेले असतील आणि त्यानंतर येशू आनंदाने त्याला देण्यात आलेला अधिकार यहोवाला परत करेल.
१७. सैतानाचे शेवटी काय होईल?
१७ पण ज्याच्यामुळे सर्व मानवजातीला हे दुःखद परिणाम भोगावे लागत आहेत त्या सैतानाचे काय? प्रकटीकरण २०:७-१५ मध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. सर्व मानव परिपूर्ण झाल्यानंतर त्यांची शेवटची परीक्षा घेतली जाईल. यादरम्यान सैतानाला त्यांना भुलवण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर सैतान आणि जे त्याला साथ देतील त्या सर्वांचा कायमचा नाश केला जाईल. बायबल याला “दुसरे मरण” असे म्हणते. (प्रकटी. २१:८) या परीक्षेत ज्यांचा नाश होईल त्यांना कोणतीही आशा नाही. त्यामुळे बायबल ज्याला “दुसरे मरण” म्हणते त्याला नाहीसे करण्याची गरज नाही. कारण, “दुसरे मरण” देवाच्या विश्वासू सेवकांचा शत्रू नाही.
१८. यहोवाने आदामाला सोपवलेली कामगिरी कशी पूर्ण होईल?
१८ परिपूर्ण झालेली मानवजात, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी देवाच्या नजरेत पात्र ठरेल. त्या वेळी त्यांचा एकही शत्रू नसेल. आदामाला जी कामगिरी सोपवण्यात आली होती ती त्याच्याविनाच पूर्ण झालेली असेल! पृथ्वी त्याच्या संततीने भरून जाईल. त्याची संतती पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व जीवांवर अधिकार गाजवेल. यहोवाचे मानवांवर प्रेम असल्यामुळे तो शेवटला शत्रू, मृत्यू याचा अंत करणार आहे. तेव्हा, आपल्या प्रेमळ पित्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता बाळगू या.
a म्हातारपण आणि मरण का आले यामागचे कारण शोधणाऱ्या वैज्ञानिकांबद्दल इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स असे म्हणते: “हे वैज्ञानिक एका महत्त्वाच्या सत्याकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणजे, स्वतः निर्माणकर्त्याने पहिल्या मानवी जोडप्याला मृत्यूची शिक्षा दिली. आणि यामुळे वैज्ञानिकांना मृत्यूचे कारण आजपर्यंत समजलेले नाही.”—खंड. २, पृ. २४७.