‘त्याची वेळ आली आहे!’
‘ह्या जगातून पित्याकडे जाण्याची त्याची वेळ आली आहे.’—योहान १३:१.
१. सामान्य युग ३३ च्या वल्हांडण सणाआधी येरुशलेमेत लोक कोणत्या विषयावर फार चर्चा करत आहेत आणि का?
सामान्य युग २९ मध्ये बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने आपल्या सेवाकार्याला आरंभ केला. या सेवाकार्याच्या शेवटी त्याला ठार मारले जाणार होते. त्यानंतर त्याचे पुनरुत्थान व गौरव केले जाणार होते. आता सा.यु. ३३ चा वसंत ऋतू आहे. काही आठवड्यांपूर्वीच यहुदी उच्च न्यायालयाच्या सदस्यांनी मिळून येशूला ठार मारण्याची खुणगाठ बांधली होती. पण, त्यांच्यापैकी एक सदस्य, निकदेम याचे येशूबरोबर चांगले संबंध असल्यामुळे त्याने कदाचित या कटाबद्दल येशूला सांगितले असावे. त्यामुळे येशू येरुशलेम सोडून यार्देनेपलीकडील गावांत निघून जातो. वल्हांडण सण आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे गावातले पुष्कळ लोक येरुशलेमेत येऊ लागतात. येरुशलेमेत प्रत्येक ठिकाणी येशूचीच चर्चा होत आहे. लोक आपसात बोलत आहेत: “तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?” अशा शंका व्यक्त करण्याचे एक कारण म्हणजे याजक आणि परुशी यांनी लोकांना हुकूम दिला होता की येशू कोठे आहे हे कोणाला कळाल्यास त्यांनी लगेच खबर द्यावी.—योहान ११:४७-५७.
२. मरियेच्या कोणत्या कृतीवर शिष्य आक्षेप घेतात आणि उरलेल्या वेळेची येशूला जाणीव आहे हे त्याच्या उत्तरावरून कसे समजते?
२ आता निसान ८, शुक्रवारचा दिवस आहे. येशू बेथानीमध्ये म्हणजे येशूचा मित्र लाजर, मार्था आणि मरिया राहतात तिथे पोहंचतो. बेथानी हे येरुशलेमेपासून केवळ ३ किलोमीटर दूर आहे. आणि वल्हांडण सणासाठी अजून सहा दिवस बाकी आहेत. शुक्रवार सायंकाळपासून शब्बाथाचा दिवस सुरू होतो. ती संध्याकाळ येशू बेथानीमध्येच घालवतो. मग पुढच्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी एक खास घटना घडते. मरिया येशूला अत्यंत बहुमोल सुगंधी तेल लावते. पण, त्याचे शिष्य आक्षेप घेतात. तेव्हा येशू त्यांना म्हणतो: “हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या; कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.” (योहान १२:१-८; मत्तय २६:६-१३) “आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे,” याची येशूला जाणीव आहे. (योहान १३:१) आता फक्त पाच दिवस राहिले आहेत. त्यानंतर तो “पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण” देणार आहे. (मार्क १०:४५) त्यामुळे येथून पुढे येशू जे काही करतो आणि जे काही शिकवतो त्यावरून लक्षात येते, की उरलेल्या वेळातला एक-एक क्षण त्याच्यासाठी फार बहुमोल आहे. येशूच्या या मनोवृत्तीवरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो. या जगाचा अंत होण्यासाठी आता फार कमी वेळ बाकी आहे. त्यामुळे आपणही आपल्या कार्यावरून हेच दाखवले पाहिजे की उरलेल्या या वेळेची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. आता दुसऱ्या दिवशी येशू काय करतो ते आपण पाहू या.
येशूचे जंगी स्वागत
३. (अ) निसान ९, रविवारच्या दिवशी येशू येरुशलेमेत कसा प्रवेश करतो आणि लोक त्याचे कसे स्वागत करतात? (ब) परुशी लोक येशूला आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगतात तेव्हा येशू त्यांना काय उत्तर देतो?
३ आता निसान ९, रविवारचा दिवस आहे. येशू येरुशलेमेत येतो आणि एखाद्या विजयी राजासारखे त्याचे स्वागत केले जाते. जखऱ्या ९:९ मध्ये सांगितले होते त्याप्रमाणे तो गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून नगराकडे येतो. बहुतेक लोक आपली वस्त्रे त्याच्या वाटेवर पसरतात; तर काहीजण झाडाच्या डहाळ्या तोडून त्या वाटेवर पसरतात आणि उच्च स्वरात म्हणतात: “प्रभूच्या [यहोवाच्या] नावाने येणारा राजा धन्यवादित असो.” त्यावर परुशी लोक येशूला आपल्या शिष्यांना गप्प करण्यास सांगतात. पण, येशू त्यांना उत्तर देतो: “मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.”—लूक १९:३८-४०; मत्तय २१:६-९.
४. येशू येरुशलेमेत पोहंचताच सर्व शहरात खळबळ का माजते?
४ काही आठवड्यांपूर्वीच येशूने लाजराला मेलेल्यांतून उठवल्याचा चमत्कार लोकसमुदायातील काहींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. आणि आता येरुशलेमेतील इतर लोकांना ते या चमत्काराविषयी सांगत आहेत. त्यामुळे येशू येरुशलेमेत पोहंचताच सर्व नगरात खळबळ माजते. लोक एकमेकांना विचारतात: “हा कोण?” येशूबरोबर आलेले लोक उत्तर देतात: “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय.” हे ऐकून परुशांचे पित्त खवळते. आणि ते म्हणतात: “पाहा जग त्याच्यामागे चालले आहे.”—मत्तय २१:१०, ११; योहान १२:१७-१९.
५. येशू मंदिरात जातो तेव्हा काय होते?
५ थोर शिक्षक, येशू येरुशलेमेत पोहंचतो तेव्हा नेहमीप्रमाणे लोकांना शिकवण्यासाठी तो मंदिरात जातो. अंधळे व लंगडे त्याच्याकडे येतात आणि तो त्यांना बरे करतो. मंदिरातली मुले मोठ्याने गजर करतात: “दावीदाच्या पुत्राला होसान्ना.” हे सर्व पाहून याजक आणि शास्त्री भयंकर क्रोधित होतात आणि येशूला म्हणतात: “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” तेव्हा येशू त्यांना म्हणतो: “हो; बाळके व तान्ही मुले ह्यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” मग येशू लोकांना शिकवू लागतो आणि शिकवता शिकवताच मंदिरात चाललेल्या कार्यहालचालींवरून तो लक्षपूर्वक नजर फिरवतो.—मत्तय २१:१५, १६; मार्क ११:११.
६. येशूमध्ये आता कोणता बदल झाल्याचे दिसून येते आणि त्याच्यामध्ये हा बदल का होतो?
६ आता सहा महिन्यापूर्वी घडलेल्या गोष्टीचे जरा स्मरण करा. मंडपांच्या सणाकरता येशू येरुशलेमेत आला तेव्हा तो “उघडपणे न जाता गुप्तपणे” आला होता. (योहान ७:१०) त्यावेळी आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव होताच कमालीची सावधगिरी बाळगून तो आपल्या शत्रूंच्या हातून निसटून गेला होता. पण, आता त्याच्यामध्ये किती बदल झाला आहे तो पाहा! या वेळी लोकांना त्याला पकडण्याचा हुकूम दिलेला असतानाही तो अगदी उघडपणे, सगळ्यांच्या देखत येरुशलेमेत प्रवेश करतो! आणखी एक गोष्ट म्हणजे, यापूर्वी त्याने जाहीरपणे कधीच असे घोषित केले नव्हते की तो मशीहा आहे. (यशया ४२:२; मार्क १:४०-४४) शिवाय, लोकांनी आपण मशीहा असल्याची दवंडी पिटावी किंवा आपल्याबद्दल जाहीर चर्चा करावी अशीही कधी येशूची इच्छा नव्हती. परंतु आता लोकसमुदाय अगदी उघड उघड येशूला आपला राजा आणि तारणारा म्हणून घोषित करत आहे. आणि तरीही येशू त्यांना गप्प करत नाही. लोकांना शांत करण्यास धर्मगुरू त्याला सांगतात तेव्हा तो त्यांना देखील झिडकारतो. हा बदल का? कारण येशूने दुसऱ्याच दिवशी सांगितले त्याप्रमाणे आता “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.”—योहान १२:२३.
साहसी कार्य आणि अति महत्त्वपूर्ण शिकवण
७, ८. सा.यु. ३० च्या वल्हांडण सणाच्या दिवशी आणि सा.यु. ३३ निसानच्या १० व्या दिवशी येशूने मंदिरात जे काही केले त्यात कोणता फरक दिसून येतो?
७ निसान १०, सोमवारच्या दिवशी येशू पुन्हा मंदिरात येतो. त्याने रविवारी मंदिरात जे काही पाहिले होते त्याविरुद्ध आता तो कार्यवाही करतो. ‘मंदिरात क्रय-विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागतो. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी तो उलथून टाकतो; तो कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू देत नाही.’ मंदिरात अशी कामे करणाऱ्यांना तो म्हणतो: “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”—मार्क ११:१५-१७.
८ हे लक्षात घ्या, की येशूने तीन वर्षांपूर्वी म्हणजे सा.यु. ३० मध्ये जे काही केले होते तेच येथेही केले आहे. पण, यावेळी मात्र तो अतिशय कडक शब्दांत व्यापार करणाऱ्यांचा समाचार घेतो. तो त्यांना ‘लुटारू’ म्हणतो. (लूक १९:४५, ४६; योहान २:१३-१६) ते खरोखर लुटारू म्हणण्यालायक होते. कारण अर्पणाच्या पशु-पक्षांच्या अवाजवी किंमती लावून ते लोकांना किती लुटायचे त्याचा हिशेबच नव्हता. येशूने केलेल्या या कामाविषयी याजक, शास्त्री आणि इतर मोठमोठे लोक ऐकतात तेव्हा ते पुन्हा एकदा येशूचा जीव घेण्याचा मार्ग शोधू लागतात. पण, येशूचा काटा कसा काढावा हे त्यांना सुचत नाही. कारण लोकांवर त्याच्या शिक्षणाचा इतका प्रभाव पडला आहे, की त्याचा उपदेश ऐकण्यासाठी ते सतत त्याच्या अवतीभोवती फिरत असतात.—मार्क ११:१८; लूक १९:४७, ४८.
९. येशू लोकांना कोणती शिकवण देतो आणि तो त्यांना काय करायला सांगतो?
९ व्यापार करणाऱ्यांना मंदिरातून घालवून दिल्यानंतर येशू मंदिरात लोकांना शिकवू लागतो. त्यावेळी तो म्हणतो: “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.” होय, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचे फक्त काही दिवस बाकी आहेत याची येशूला पूर्ण कल्पना असते. मग, तो गव्हाच्या दाण्याचे उदाहरण देत म्हणतो की गव्हाचा दाणा प्रथम जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. त्याप्रमाणे त्याला देखील प्रथम मारले जाईल आणि मग तो इतरांना अनंतकालिक जीवन देईल. त्यामुळे तो लोकांना एक आमंत्रण देतो: “जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकहि असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.”—योहान १२:२३-२६.
१०. आपल्या यातनामय मरणाविषयी येशूला कसे वाटते?
१० येशूच्या मृत्यूला आता अवघे चार दिवस बाकी आहेत. आपण कोण-कोणत्या भयानक यातना भोगणार आहोत आणि कशाप्रकारे आपल्यावर यातनामय मरण येणार त्याचा विचार करत तो पुढे म्हणतो: “आता माझा जीव व्याकुळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.” पण, येशूवर जे प्रसंग येणार आहेत ते टाळले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तो असे म्हणतो: “मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे.” होय, कोणतेही आणि कितीही भयंकर प्रसंग वाट्याला आले तरी शेवटपर्यंत देवाच्या इच्छेनुसार चालण्याचा त्याने दृढनिश्चय केला होता. (योहान १२:२७) आपणही देवाच्या इच्छेनुसार चालण्याचा निर्धार केला आहे; तेव्हा, येशूप्रमाणे आपणही कधीच आपला निश्चय ढळू देऊ नये.
११. आकाशवाणी ऐकलेल्या लोकांना येशू काय समजावून सांगतो?
११ आपल्या मृत्यूमुळे आपल्या पित्याच्या नावावर कलंक लागणार याचे येशूला आत्यंतिक दुःख आहे. त्यामुळे तो प्रार्थना करतो: “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” एवढ्यात आकाशवाणी होते: “मी ते [नाव] गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.” हे ऐकून मंदिरात उपस्थित असलेले सगळेच लोक चकित होतात. मग, ही आकाशवाणी का झाली, आपल्या मृत्यूमुळे कोणता फायदा होणार आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे का जरूरीचे आहे हे थोर शिक्षक, येशू लोकसमुदायाला समजावून सांगतो. (योहान १२:२८-३६) अशाप्रकारे रविवारी आणि सोमवारी तो साहजिकच फार व्यस्त असतो. पण, दुसऱ्या दिवशी आणखी काहीतरी अतिशय खळबळजनक घडणार आहे.
धर्मगुरूंचा धिक्कार
१२. निसान ११, मंगळवारच्या दिवशी धर्मगरू कशाप्रकारे येशूला फसवण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी काय होते?
१२ आता निसान ११, मंगळवारचा दिवस आहे. येशू पुन्हा एकदा मंदिरात शिकवण्यासाठी जातो. याजक आणि वडील जन त्याच्यासाठी पाळतीवरच असतात. आदल्या दिवशी येशूने मंदिरात जी कार्यवाही केली होती त्याविषयी ते त्याला विचारतात: “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” तेव्हा येशू त्यांना अशाप्रकारे उत्तर देतो, की त्यांची जणू वाचाच बसते? त्यानंतर तो तीन दाखले देतो. दोन द्राक्षमळ्याचे आणि एक लग्नाच्या मेजवानीचा. हे दाखले देऊन तो धर्मगुरूंचा दांभिकपणा उघड करतो. त्यामुळे धर्मगुरूंचा राग अनावर होतो. त्यांना त्याच क्षणी त्याला धरायचे असते. पण, लोकांच्या भीतीमुळे ते कसेतरी आपल्या रागावर ताबा ठेवतात; कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते. मग त्याला बोलण्यात पकडण्यासाठी ते आपसात मसलत करतात. परंतु, येशूच्या उत्तरामुळे पुन्हा एकदा त्यांचे तोंड बंद होते.—मत्तय २१:२३–२२:४६.
१३. शास्त्री आणि पुरुशांसंबंधी येशू लोकांना कसे सावध करतो?
१३ परुशी आणि शास्त्री देवाच्या नियमशास्त्राचे शिक्षक असल्याचा दावा करतात. पण, त्यांच्याविषयी येशू लोकांना सावध करतो: “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.” (मत्तय २३:१-३) सबंध लोकसमुदायापुढे किती जबरदस्त धिक्कार! पण, येशू एवढ्यावर थांबत नाही. आज मंदिरात त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एक-एक करून अगदी निर्भीडपणे तो त्यांची कार्ये उघड करतो. त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द त्यांना चाबकाच्या फटक्याप्रमाणे लागतो!
१४, १५. येशू कशाप्रकारे शास्त्री आणि परुशी यांना धिक्कारतो?
१४ त्यांचा धिक्कार करत येशू सहा वेळा म्हणतो: ‘अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!’ ते लोकांसमोर स्वर्गाचे राज्य बंद करतात आणि जाणाऱ्यालाही आत जाऊ देत नाही म्हणून येशू त्यांना असे म्हणतो. एक मतानुयायी मिळविण्यासाठी ते समुद्र व भूमि पालथी घालतात आणि शेवटी स्वतःसारखे त्यालाही विनाशाच्या खाईत लोटून देतात. नियमशास्त्राच्या लहानसहान गोष्टी अगदी काटेकोरपणे ते पूर्ण करतात, प्रत्येक गोष्टीचा दशांश देतात पण, “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास” ते आचरत नाहीत. ते ‘ताटवाटी बाहेरून साफ करतात’ पण “ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत.” याचा अर्थ हा, की ते वरून धार्मिकतेचा बुरखा घालतात; पण, त्यांचे मन कुजलेले आणि सडलेले आहे. लोकांनी त्यांची स्तुती करावी म्हणून ते संदेष्ट्यांच्या कबरा बांधतात आणि सजवतात. पण, वास्तविकता ही आहे की ते ‘संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहेत.’—मत्तय २३:१३-१५, २३-३१.
१५ देवाच्या सिद्धान्तांसाठी त्यांच्या मनात काडी इतकाही आदर नाही. त्यामुळेच तर येशू त्यांना धिक्कारतो: “अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!” कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची हे त्यांना दिसत नसल्यामुळे येशू त्यांना अंधळे म्हणतो. मंदिरातील यहोवाच्या उपासनेपेक्षा मंदिरावरील सोन्याला ते महत्त्व देतात. त्यानंतर येशू अतिशय कडक शब्दांत त्यांना धिक्कारतो: “अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?” या कडक शब्दांद्वारे येशू त्यांचे खरे स्वरूप त्यांच्या लक्षात आणून देतो आणि म्हणतो की दुष्टाईचा जो मार्ग त्यांनी पत्करला आहे त्याच्या परिणामांपासून अर्थात सार्वकालिक विनाशापासून ते कधीच स्वतःला वाचवू शकणार नाहीत. (मत्तय २३:१६-२२, २३) येशूप्रमाणे आपणही निर्भीडपणे साक्ष देत राहू. मग त्यासाठी खोटा धर्म उघड करावा लागला तरी अगदी निर्भीडपणे आपण साक्ष देत राहू.
१६. जैतुनांच्या पर्वतावर गेल्यावर येशू कोणती महत्त्वपूर्ण भविष्यवाणी करतो?
१६ आता दुपार टळत आहे आणि येशू मंदिरातून निघून आपल्या प्रेषितांसह जैतुनांच्या पर्वतावर जातो. तिथे बसून तो एक भविष्यवाणी करतो. त्या भविष्यवाणीत तो मंदिराचा विनाश, आपल्या उपस्थितीचे चिन्ह आणि या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी सांगतो. आज या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता होत आहे. या दिवशी संध्याकाळी येशू आपल्या शिष्यांना असेही म्हणतो: “तुम्हास ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल.”—मत्तय २४:१-१४; २६:१, २.
येशूने ‘स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले’
१७. (अ) निसान १४ ला, वल्हांडण सणाच्या वेळी येशू बारा प्रेषितांना कोणता धडा शिकवतो? (ब) यहूदा इस्कार्योतला घालवून दिल्यानंतर येशू काय करतो?
१७ पुढचे दोन दिवस म्हणजे निसान १२ आणि १३ ला येशू मंदिरात येत नाही. कारण निसान १४ ला वल्हांडण सण आहे आणि तो त्याच्या जीवनाचा शेवटचा दिवस देखील आहे. आपल्या प्रेषितांसह कोणत्याही अडथळ्याविना तो वल्हांडण सण साजरा करू इच्छितो. कारण तो जर का मंदिरात गेला तर त्याच्या जिवावर उठलेले धर्मगुरू नक्कीच मोठी समस्या निर्माण करतील याची त्याला खात्री आहे. त्यामुळे निसान १२ आणि १३ चे दिवस तो फक्त आपल्या प्रेषितांच्या सहवासात घालवतो. आता गुरुवार, निसान १४ ची संध्याकाळ आहे. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे. आणि येशू आणि त्याचे प्रेषित येरुशलेमेत एका खोलीत वल्हांडण सण साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत. वल्हांडणाच्या वेळी येशू आपल्या बाराही प्रेषितांचे पाय धुतो आणि त्यांना नम्रतेचा धडा शिकवतो. पण, त्यांच्यापैकी एक प्रेषित यहूदा इस्कार्योत विश्वासघातकी आहे. चांदीच्या ३० तुकड्यांसाठी तो आपल्या धन्याला धरून देण्यास तयार होतो. मोशेच्या नियमशास्त्रानुसार ही केवळ एका दासाची किंमत होती. यहूदाला घालवून दिल्यानंतर येशू इतर प्रेषितांसह आपल्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करतो.—निर्गम २१:३२; मत्तय २६:१४, १५, २६-२९; योहान १३:२-३०.
१८. आपल्या ११ विश्वासू प्रेषितांना येशू आणखीन काय शिकवतो आणि लवकरच तो जाणार असल्यामुळे तो त्यांच्या मनाची तयारी कशी करतो?
१८ त्यानंतर लगेच, आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून प्रेषितांमध्ये मोठा वाद सुरू होतो. पण, त्यांना दटावण्याऐवजी येशू अतिशय धीराने त्यांना समजावून सांगतो की दुसऱ्यांची सेवा करण्यातच श्रेष्ठत्व आहे. मग, संकटप्रसंगी शिष्यांनी त्याला सोडले नाही याबद्दल येशू त्यांची प्रशंसा करतो. आणि त्यामुळे तो त्यांच्यासोबत राज्याचा एक करार करतो. (लूक २२:२४-३०) त्याने त्यांच्यावर प्रेम केले तसे त्यांनीही एकमेकांवर प्रेम करावे अशी आज्ञाही तो त्यांना देतो. (योहान १३:३४) आता येशूची जाण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी तो त्यांच्या मनाची तयारी करतो. तो त्यांना आश्वासन देतो, की तो कधीच त्यांना सोडणार नाही. त्यांनी नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवावा असे तो त्यांना सांगतो. शिवाय, त्यांना मदत करण्यासाठी तो पवित्र आत्मा पाठवण्याचे वचनही त्यांना देतो. (योहान १४:१-१७; १५:१५) मग, तिथून निघण्याआधी तो आपल्या पित्याकडे याचना करतो: “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.” येशूने त्याच्या शिष्यांच्या मनाची पूर्ण तयारी केली आहे. तसेच त्याने ‘स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले’ यांत कोणतीही शंका नाही.—योहान १३:१; १७:१.
१९. गेथशेमाने बागेत असताना येशू इतका व्याकूळ का होतो?
१९ आता मध्यरात्र टळून गेली आहे. येशू आपल्या ११ प्रेषितांसह गेथशेमाने बागेत येतो. येथे तो आधी देखील बऱ्याचदा आपल्या प्रेषितांसह आला आहे. (योहान १८:१, २) काही तासांतच त्याला एका गुन्हेगाराप्रमाणे मारले जाईल. आता तो जे काही सोसणार आहे त्यामुळे आणि त्याच्या मृत्यूमुळे देवाच्या नावावर कलंक लागणार याचा विचार करून तो अत्यंत व्याकूळ होतो. तो अगदी कळकळून प्रार्थना करत असताना त्याचा घाम अक्षरशः रक्ताच्या थेंबांप्रमाणे जमिनीवर पडू लागतो. (लूक २२:४१-४४) त्यानंतर तो प्रेषितांना म्हणतो: “घटका आली आहे . . . पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” त्याचे हे शब्द अजून तोंडातच असतात तोच यहूदा इस्कार्योत एका मोठ्या टोळीला घेऊन तिथे पोहंचतो. लोकांची ही टोळी सोबत तरवारी आणि सोटे आणि हत्यारे घेऊन येशूला धरण्यास आली आहे. या वेळी मात्र येशू स्वतःला वाचवण्याचा किंवा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत नाही. तो अगदी शांत राहतो. कारण तो म्हणतो “असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?”—मार्क १४:४१-४३; मत्तय २६:४८-५४.
मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला!
२०. (अ) येशूला अटक झाल्यानंतर त्याला कोण-कोणत्या यातना सोसाव्या लागतात? (ब) मरण्याआधी येशू “पूर्ण झाले आहे” असे का म्हणतो?
२० येशूला अटक केल्यानंतर खोटे साक्षीदार त्याच्यावर दोषारोप लावतात. न्यायाधीश देखील पक्षपात करून त्याला अपराधी घोषित करतात. पंतय पिलात त्याला मरणदंडाची शिक्षा ठोठावतो. धर्मगुरू आणि लोकसमुदाय त्याची थट्टा करतात. शिपाई देखील त्याची निंदा-नालस्ती करून त्याला अनामिक यातना देतात. (मार्क १४:५३-६५; १५:१, १५; योहान १९:१-३) शुक्रवारी दुपारी येशूला अतिशय क्रूरपणे वधस्तंभावर खिळले जाते. त्याचे संपूर्ण शरीर केवळ त्या खिळ्यांवर लटकलेले असते. खिळ्यांमुळे त्याचे हात व पाय चिरू लागतात. या यातना सहनशक्तीपलीकडच्या असतात. (योहान १९:१७, १८) दुपारी सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून बोलतो: “पूर्ण झाले आहे.” होय, पृथ्वीवर ज्या कामासाठी तो आला होता ते कार्य त्याने पूर्ण केले! मग तो आपला जीव देवाच्या हवाली सोपवतो आणि मस्तक लववून शेवटचा श्वास सोडतो. (योहान १९:२८, ३०; मत्तय २७:४५, ४६; लूक २३:४६) तिसऱ्या दिवशी यहोवा त्याला मृतातून परत उठवतो. (मार्क १६:१-६) त्यानंतर चाळीसाव्या दिवशी येशू स्वर्गात जातो आणि तिथे त्याचे गौरव होते.—योहान १७:५; प्रेषितांची कृत्ये १:३, ९-१२; फिलिप्पैकर २:८-११.
२१. आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून कसे चालू शकतो?
२१ आतापर्यंत आपण येशूच्या जीवनाची एक झलक पाहिली आहे. ती लक्षात ठेवून आपण “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून” कसे चालू शकतो? (१ पेत्र २:२१) त्याकरता येशूप्रमाणे आपणही जीव ओतून प्रचाराचे आणि शिष्य बनविण्याचे काम करू आणि निर्भीडपणे देवाचे वचन लोकांना सांगू. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये ४:२९-३१; फिलिप्पैकर १:१४) सध्या आपण काळाच्या कोणत्या वळणावर आहोत हे लक्षात ठेवून आपण नेहमी एकमेकांवर प्रेम करत राहू आणि एकमेकांसाठी सत्कर्मे करत राहू. (मार्क १३:२८-३३; इब्री लोकांस १०:२४, २५) येशूप्रमाणे आपणही आपल्या जीवनातले प्रत्येक काम दोन प्रमुख गोष्टी लक्षात ठेवून करू या. प्रथम, देव आपल्याकडून जे अपेक्षित आहे त्यानुसार कार्य करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ‘अंत’ अतिशय जवळ आहे याची सतत जाणीव ठेवणे.—दानीएल १२:४.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• येशूचा मृत्यू जवळ येतो तसा येरुशलेमेच्या मंदिरातील त्याच्या सेवाकार्यात कोणता बदल झाल्याचा दिसून येतो?
• येशूने ‘स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले’ हे कशावरून दिसून येते?
• मृत्यूच्या काही तासांपूर्वी येशूला जे काही सोसावे लागले त्यातून आपण काय शिकू शकतो?
• आपल्या सेवाकार्यात आपण ख्रिस्त येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून कसे चालू शकतो?
[१८ पानांवरील चित्र]
येशूने ‘शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले’