“त्याची वेळ तोवर आली नव्हती”
“कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.”—योहान ७:३०.
१. पृथ्वीवर असताना कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवून येशूने कार्य केले?
“मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे,” असे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते. (मत्तय २०:२८) येशूच्या या बोलण्यावरून लक्षात येते की आपल्याला का मरावे लागणार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. तसेच, मरण्याआधी आपल्याला कोणते काम करायचे आहे याची देखील त्याला कल्पना होती. कारण रोमी सुबेदार पंतय पिलात यास त्याने म्हटले: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) शिवाय, हे कार्य करण्याकरता आपल्याकडे फक्त साडेतीन वर्षे आहेत हेसुद्धा त्याला माहीत होते. कारण दानीएलाच्या भविष्यवाणीत भाकीत केले होते, की सत्तराव्या सप्ताहाच्या सुरवातीला म्हणजे सा.यु. २९ मध्ये मशीहा प्रकट होईल आणि आपले सेवाकार्य सुरू करील. मग, अर्धा सप्ताह संपल्यानंतर म्हणजे सा.यु. ३३ मध्ये त्याचा वध होईल. (दानीएल ९:२४-२७: मत्तय ३:१६, १७; २०:१७-१९) त्यामुळे पृथ्वीवर असताना दोन मुख्य गोष्टी लक्षात ठेवूनच येशूने कार्य केले. पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीवर येण्याचा त्याचा उद्देश आणि दुसरी पृथ्वीवर कार्य करण्यासाठी त्याच्या हातात असलेला वेळ.
२. बायबलमधील शुभवर्तमानाच्या पुस्तकांनुसार येशू ख्रिस्त कसा होता आणि त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होती हे कसे समजते?
२ बायबलमधील शुभवर्तमानाची पुस्तके वाचल्यानंतर लक्षात येते की येशू अत्यंत परिश्रमी व आवेशी होता. पॅलेस्टाईनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याने देवाची सुवार्ता सांगितली आणि अनेक चमत्कारही केले. त्याने आपले सेवाकार्य सुरू केले त्या काळाविषयी बायबल म्हणते: “त्याची वेळ तोवर आली नव्हती.” येशूने स्वतः देखील म्हटले की, “माझा समय अजून पूर्ण झाला नाही.” परंतु, त्याचे कार्य पूर्ण होण्यास आले तेव्हा त्याने म्हटले: “वेळ आली आहे.” (योहान ७:८, ३०; १२:२३) देवाने आपल्याला दिलेली जबाबदारी अर्थात आपले बलिदान आणि सेवाकार्य आपल्याला किती समयात पूर्ण केले पाहिजे याची येशूला पूर्ण जाणीव होती. हीच गोष्ट लक्षात ठेवून येशूने प्रत्येक पाऊल उचलले. त्याचे परीक्षण केल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या विचारसरणीची समज आपल्याला प्राप्त होईल. आणि आपल्यालाही त्याच्या ‘पावलांवर पाऊल ठेवून चालणे’ शक्य होईल.—१ पेत्र २:२१.
देवाची इच्छा पूर्ण करण्याचा दृढसंकल्प
३, ४. (अ) काना गावात लग्नाच्या वेळी काय घडते? (ब) द्राक्षारस कमी पडतो तेव्हा मरीयेने सुचवलेल्या गोष्टीवर येशू आक्षेप का घेतो आणि त्यावरून आपण काय शिकू शकतो?
३ सा.यु. २९ चे वर्ष आहे. काही दिवसांपूर्वीच येशूने आपल्या नवीन शिष्यांची निवड केली आहे आणि त्यांच्यासोबत तो गालील प्रांतातील काना या गावात एका लग्नासाठी आला आहे. लग्नात द्राक्षरस कमी पडल्याचे लक्षात येते. तेव्हा येशूची आई मरीया त्याला म्हणते: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशूने ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करावे असे ती सुचवत असते. त्यावर येशू तिला उत्तर देतो: “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”—योहान १:३५-५१; २:१-४.
४ “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध?” ही प्रश्न विचारण्याची एक प्राचीन पद्धत आहे आणि हा प्रश्न विचारून आपल्या आईने सुचवलेल्या गोष्टीवर येशू आक्षेप घेत होता. पण का? कारण तो आता तीस वर्षांचा झाला होता आणि काही आठवड्यांपूर्वीच त्याचा बाप्तिस्माही झाला होता. त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा देवाने पवित्र आत्म्याने त्याचा मशीहा म्हणून अभिषेक केला होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील त्याला “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” असे म्हटले. (योहान १:२९-३४; लूक ३:२१-२३) बाप्तिस्म्यानंतर येशूला केवळ देवाच्या मार्गदर्शनानुसार चालायचे होते आणि केवळ देवाच्या इच्छेनुसार कार्य करायचे होते. (१ करिंथकर ११:३) त्यामुळे दुसऱ्या कोणी—अगदी त्याच्या कौटुंबिक सदस्यांनी देखील त्याला सूचना देणे योग्य नव्हते. आणि त्यामुळे मरीयेने सुचवलेल्या गोष्टीवर येशू आक्षेप घेतो. त्याने दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट होते, की त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा दृढसंकल्प केला होता! देवाप्रती ‘आपले कर्तव्य’ पूर्ण करण्यासाठी आपणही असाच दृढसंकल्प करू या.—उपदेशक १२:१३.
५. काना गावात येशू कोणता चमत्कार करतो आणि याचा इतरांवर काय परिणाम होतो?
५ येशूच्या बोलण्यातला अर्थ मरीयेला लगेच कळतो. त्यामुळे लुडबूड न करता ती चाकरांना म्हणते: “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” तेव्हा येशू चाकरांना रांजणांत पाणी भरण्यास सांगतो आणि पाण्याचे दर्जेदार द्राक्षरसात रूपांतर करतो. अशाप्रकारे येशू द्राक्षरसाचा तुटवडा भरून काढतो आणि समस्या सोडवतो. त्याशिवाय, आपल्या चमत्कारिक शक्तीचा पहिला पुरावा तो देतो. आणि त्याच्यावर देवाचा आत्मा आहे हे त्या चमत्कारावरून जाहीर होते. येशूचा हा चमत्कार पाहून नवीन शिष्यांचा विश्वास साहजिकच मजबूत होतो.—योहान २:५-११.
यहोवाच्या मंदिराविषयीचा आवेश
६. येरुशलेमेच्या मंदिरात येशूचा राग का भडकतो आणि तो काय करतो?
६ आता सा.यु. ३० चा वसंत ऋतू आहे. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी येशू आपल्या शिष्यांसह येरुशलेमेस जात आहे. येरुशलेमेत गेल्यानंतर शिष्य येशूला असे काही करताना पाहतात जे पूर्वी त्यांनी कधीच पाहिले नसेल. यहुदी व्यापारी येरुशलेमेत देवाच्या मंदिराच्या आत बसून अर्पणासाठी लागणारे पशु-पक्षी विकत होते आणि त्यांवर जास्त किंमती लावत होते. अशाप्रकारे जे यहुदी उपासक हे विकत घेण्यासाठी तिथे यायचे त्यांना ते लुबाडत होते. हे सर्व येशू पाहतो तेव्हा त्याचा राग भडकतो. तो दोऱ्याचा एक कोरडा करून व्यापार करणाऱ्यांना मंदिरातून घालवून देतो. सराफांचा खुर्दा ओतून टाकतो व चौरंग पालथे करतो. आणि कबुतरे विकणाऱ्यांना हुकूम देतो: “ही येथून काढून घ्या.” येशूचा हा ज्वलंत आवेश पाहून शिष्यांना देवाच्या पुत्रासंबंधी केलेली ही भविष्यवाणी आठवते: “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.” (योहान २:१३-१७, स्तोत्र ६९:९) या जगाचा प्रभाव आपल्यावर पडून आपली उपासना अशुद्ध होऊ नये म्हणून आपणही येशूप्रमाणे नेहमी सावध असले पाहिजे.
७. (अ) निकदेम येशूला भेटायला का जातो? (ब) येशूने शोमरोनी स्त्रीला जी साक्ष दिली त्यावरून आपण काय शिकू शकतो?
७ येरुशलेमेत येशू मोठमोठी चिन्हे करतो आणि त्यामुळे पुष्कळजण त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात. सन्हेद्रिनचा अर्थात यहुदी उच्च न्यायालयाचा एक सदस्य, निकदेमसुद्धा इतका प्रभावित होतो की अधिक शिकण्यासाठी तो रात्रीच्या अंधारात येशूला येऊन भेटतो. अशाप्रकारे येशू आणि त्याचे शिष्य “यहूदीया प्रांतात” प्रचार करण्यात आणि शिष्य बनवण्यात व्यस्त राहतात. जवळजवळ आठ महिने ते तिथे राहून कार्य करतात. पण, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कैद होते तेव्हा ते यहुदियातून गालील प्रांताकडे निघतात. वाटेत शोमरोनातून जात असताना येशू संधी साधून एका शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो. मग, ती स्त्री नगरात जाऊन सर्वांना येशूविषयी सांगते; त्यामुळे बरेच शमरोनी त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात. येशूप्रमाणे आपणसुद्धा एकही संधी न हुकवता सुवार्तेची साक्ष दिली पाहिजे.—योहान २:२३; ३:१-२२; ४:१-४२; मार्क १:१४.
गालीलमध्ये अधिक आवेशपूर्ण प्रचार
८. गालीलमध्ये येशू काय करतो?
८ आपल्या मृत्यूची “वेळ” येण्याआधी येशूला आपल्या स्वर्गीय पित्याच्या सेवेत बरेच काही करायचे आहे. यहुदिया आणि येरुशलेमेतही केले नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात तो गालीलमध्ये प्रचार कार्य करतो. तो “यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर” फिरतो. (मत्तय ४:२३) आणि येशूचे हे शब्द संपूर्ण गालीलमध्ये ऐकू येतात: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ४:१७) काही महिन्यांनंतर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे दोन शिष्य येशूबद्दल जाणून घेण्यासाठी येशूकडे येतात. तेव्हा तो त्यांना म्हणतो: “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”—लूक ७:२२, २३.
९. लोकांचे थवे येशूच्या मागे का जातात आणि यावरून आपण काय शिकू शकतो?
९ येशूची “कीर्ति चहूकडील प्रदेशात” पसरते. त्यामुळे गालील, दकापलीस, येरुशलेम, यहूदीया तसेच यार्देनेपलीकडील प्रदेशातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे येऊ लागतात. (लूक ४:१४, १५; मत्तय ४:२४, २५) केवळ बरे होण्यासाठी नाही; तर त्याची शिकवण वाखाणण्याजोगी असल्यामुळे ते त्याच्या मागे जातात. लोकांची मने जिंकण्याची आणि लोकांना उत्तेजन देण्याची विलक्षण शक्ती त्याच्या संदेशात होती. (मत्तय ५:१–७:२७) त्याचे शब्द मधुर आणि कृपायुक्त होते. (लूक ४:२२) “त्याच्या शिक्षणावरून” लोक “थक्क” होतात. कारण तो पूर्ण अधिकाराने बोलतो. (मत्तय ७:२८, २९; लूक ४:३२) अशी क्षमता असलेल्या व्यक्तीकडे कोण आकृष्ट होणार नाही? तर मग, येशूप्रमाणे आपणही शिक्षण देण्याची आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करून प्रमाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्याकडे आकर्षित करू.
१०. नासरेथचे लोक येशूला मारण्याचा प्रयत्न का करतात आणि त्यांचा प्रयत्न निष्फळ का ठरतो?
१० पण, येशूकडे येणारा प्रत्येकजण केवळ संदेश ऐकण्यासाठी त्याच्याकडे येत नाही. त्याच्या स्वतःच्या गावातल्या अर्थात नासरेथच्या लोकांचेच उदाहरण घ्या. आपल्या सेवाकार्याच्या सुरवातीला येशू शिक्षण देण्यासाठी सभास्थानात जातो तेव्हा लोक त्याचे मधुर शब्द आणि त्याची “कृपावचने” ऐकून प्रभावित होतात खरे, पण, एवढ्यावर त्यांचे समाधान होत नाही. ते येशूकडून आणखीन कशाची तरी, अर्थात चमत्काराची अपेक्षा करतात. पण, ते स्वार्थी आहेत. त्यांचा विश्वास कमी होता हे ओळखून येशू त्यांची इच्छा पूर्ण करत नाही. उलट, तो त्यांचा कपटीपणा उघड करतो. त्यामुळे साहाजिकच ते भयंकर संतापतात. ते त्याला गावाबाहेर काढतात, आणि डोंगराच्या कड्यावरून त्याला लोटून देण्याचा प्रयत्न करतात. पण, तो त्यांच्यामधून निघून जातो कारण त्याच्या मृत्यूची “वेळ” अद्याप आलेली नसते.—लूक ४:१६-३०.
११. (अ) काही धर्मगुरू कोणत्या उद्देशाने येशूचा उपदेश ऐकण्यास येतात? (ब) येशूवर शब्बाथाचा नियम मोडण्याचा आरोप का लावला जातो?
११ येशूची शिकवण ऐकण्यासाठी सहसा शास्त्री, परुशी आणि सदूकी यांसारखे धर्मगुरू देखील येतात. पण, त्यांच्यापैकी बहुतेकजण त्याच्यापासून शिकायला नव्हे तर त्याच्या शिकवण्यात कोणती ना कोणती चूक शोधून त्याला फसवण्याच्या उद्देशाने येतात. (मत्तय १२:३८; १६:१; लूक ५:१७; ६:१, २) उदाहरणार्थ, सा.यु. ३१ मध्ये वल्हांडण सण साजरा करण्यासाठी येशू येरुशलेमेत जातो तेव्हा काय होते त्याकडे लक्ष द्या. शब्बाथाच्या दिवशी, मंदिराजवळ ३८ वर्षांपासून आजारी असलेल्या एका रोग्याला तो बरे करतो. हे पाहून धर्मगुरू येशूवर असा आरोप लावतात, की ‘तू शब्बाथाच्या दिवशी काम करून शब्बाथ मोडत आहेस.’ त्यावर येशू त्यांना म्हणतो: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.” त्यानंतर ते येशूवर आणखीन एक आरोप लावतात की, ‘तू देवाला आपला पिता म्हणवून देवाची निंदा करत आहेस.’ आणि त्यामुळे ते त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करतात. पण, येशू आपल्या शिष्यांसह येरुशलेम सोडून गालीलात जातो. येशूवर आला तसा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो. प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे काम करत असताना लोक आपला कडाडून विरोध करतील. अशावेळी त्यांच्याशी वाद घालून संकटाला आमंत्रण देण्याऐवजी येशूप्रमाणे तिथून काढता पाय घेणे नक्कीच शहाणपणाचे ठरेल.—योहान ५:१-१८; ६:१.
१२. गालीलमध्ये येशू प्रचाराचे कार्य किती प्रमाणात करतो?
१२ त्यानंतर पुढच्या जवळजवळ दीड वर्षांपर्यंत गालीलमध्येच राहून येशू प्रचाराचे कार्य करतो आणि येरुशलेमेस फक्त तीन वार्षिक सण साजरे करण्यासाठी जातो. साडेतीन वर्षांच्या काळादरम्यान येशू तीन वेळा गालीलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराचे कार्य करतो. पहिल्यांदा, आपल्या चार नवीन शिष्यांसह, दुसऱ्यांदा बारा प्रेषितांसह आणि शेवटी तो तेथे मोठ्या प्रमाणात प्रचार करतो; त्या वेळी प्रशिक्षण मिळालेल्या आपल्या प्रेषितांनाही तो सोबत घेतो. साहजिकच, गालीलमध्ये मोठ्या प्रमाणात आवेशपूर्ण कार्य केले जाते!—मत्तय ४:१८-२५; लूक ८:१-३; ९:१-६.
यहुदीया आणि पेरिया येथे धाडसीपणे प्रचार
१३, १४. (अ) यहुदी कोणत्या प्रसंगी येशूला धरण्याचा प्रयत्न करतात? (ब) कामदार येशूला का धरत नाहीत?
१३ आता सा.यु. ३२ चा शरद ऋतू आहे. आणि येशू अजूनही गालीलमध्येच आहे. त्याची “वेळ” अद्यापही आलेली नाही. मंडपांचा सण जवळ आला आहे. त्यामुळे येशूचे भाऊ त्याला अशी गळ घालतात: “तू येथून निघून यहूदीयात जा.” त्यांची अशी इच्छा असते, की येशूने सणाला जाऊन सर्व लोकांसमोर आपल्या चमत्कारिक शक्तीचा पुरावा दाखवावा. पण, येशूला माहीत आहे, की आता तिथे जाणे धोकेदायक आहे. त्यामुळे तो त्यांना उत्तर देतो: “माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्या सणास जात नाही.”—योहान ७:१-८.
१४ काही दिवस येशू गालीलमध्येच राहतो आणि मग येरुशलेमेला जाण्यास निघतो. पण, ‘उघडपणे नव्हे तर गुप्तपणे.’ शेवटी, येशूला वाटले होते अगदी तसेच घडते. येरुशलेमेत यहुदी खरोखरच त्याला शोधत होते आणि “तो आहे तरी कोठे?” अशी चौकशी करत होते. मग सण अर्धा संपल्यावर येशू मोठ्या धाडसाने मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. यहुदी त्याला धरण्यास पाहतात. त्यांना त्याला गजाआड तरी करायचे असते किंवा ठार तरी मारायचे असते. पण, पुन्हा एकदा ते निष्फळ ठरतात. कारण ‘त्याचा समय अजून आलेला नसतो.’ येरुशलेमेत सणाच्या वेळी येशूची शिकवण ऐकून बरेच लोक त्याच्यावर विश्वास करू लागतात. इतका की त्याला धरण्यास परुशांनी ज्या कामदारांना पाठवलेले असते ते रिकाम्या हाती परततात आणि परुशांना म्हणतात: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”—योहान ७:९-१४, ३०-४६.
१५. येशूला मारण्यासाठी यहुदी दगड का उचलतात आणि नंतर येशू मोठ्या आवेशाने कार्य कसे सुरू करतो?
१५ वल्हांडण सणाच्या वेळी येशू लोकांना आपल्या पित्याविषयी शिकवतो, पण त्याचे शत्रू त्याचा विरोध करतात. सणाच्या संपूर्ण काळादरम्यान असेच चाललेले असते. सणाच्या शेवटच्या दिवशी येशू म्हणतो, की तो अब्राहामच्या आधी अस्तित्वात होता. हे ऐकून धर्मगुरू क्रोधिष्ट होतात आणि त्याला मारण्यासाठी दगड उचलतात. पण, येशू तिथून गुप्तपणे निघून जातो. (योहान ८:१२-५९) त्यानंतर तो येरुशलेम सोडून संपूर्ण यहूदीयामध्ये अतिशय आवेशाने साक्ष देतो. पुढे तो ७० शिष्यांची निवड करतो. त्यांना मार्गदर्शक सूचना देऊन दोघे-दोघे असे प्रचार करण्यास पाठवतो. येशू आणि त्याचे शिष्य नंतर जाणार असतात त्या यहूदियाच्या प्रत्येक शहरात आणि क्षेत्रात तो त्यांना आपल्यापुढे पाठवतो.—लूक १०:१-२४.
१६. पुनःस्थापनेच्या सणादरम्यान येशू कोणत्या संकटातून वाचतो आणि त्यानंतर तो पुन्हा कोणत्या कामात स्वतःला झोकून देतो?
१६ आता सा.यु. ३२ चे वर्ष आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि येशूच्या मृत्यूची “वेळ” जवळ येत आहे. या वेळी तो पुनःस्थापनेचा सण साजरा करण्यासाठी येरुशलेमेत आला आहे. अजूनही यहुदी त्याला ठार मारण्याची संधी शोधत आहेत. येशू मंदिराच्या देवडीत फिरत असता यहुदी येऊन त्याला घेरतात. पुन्हा एकदा त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावून त्याला मारण्यासाठी दगड उचलतात. पण, नेहमीप्रमाणे तो त्यांच्या हाती न लागता निघून जातो. मग तो यार्देन नदी पार करून पेरियाला जातो. तिथे नगरा-नगरात व गावा-गावात जाऊन पुन्हा एकदा लोकांना आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या कामात स्वतःला झोकून देतो. आणि पुष्कळ लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. पण, तिथे असताना त्याला आपला जिवलग मित्र लाजर याच्या आजाराची बातमी मिळते; त्यामुळे त्याला परत यहुदियात यावे लागते.—लूक १३:३३; योहान १०:२०-४२.
१७. (अ) पेरियामध्ये असताना येशूला कोणती बातमी मिळते? (ब) आपल्याला केव्हा काय करायचे आहे हे येशूला ठाऊक होते असे आपण का म्हणू शकतो?
१७ लाजर आजारी असल्याचा निरोप लाजरच्या बहिणी मरीया आणि मार्था यांनी येशूला पाठवलेला असतो. लाजर आणि त्याच्या बहिणी यहुदियातील बेथानी या नगरात राहतात. लाजरच्या आजाराची बातमी घेऊन येणारा म्हणतो: “प्रभुजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणतो, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे.” त्यामुळे येशू दोन-तीन दिवस मुद्दाम परियामध्येच राहतो. मग तो आपल्या शिष्यांना म्हणतो: “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” पण, शिष्य गोंधळात पडतात आणि साशंकपणे त्याला विचारतात: “गुरुजी, यहूदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?” पण, येशूला या गोष्टीची पूर्ण कल्पना असते की त्याच्याकडे फार कमी वेळ, किंबहुना फक्त काही ‘दिवस’ उरले आहेत. आणि उरलेल्या या वेळात आपल्याला काय करायचे आहे आणि ते कशाला करायचे आहे हे देखील त्याला ठाऊक असते.—योहान ११:१-१०.
सगळ्यांना मान्य करावा लागला असा चमत्कार
१८. बेथानीमध्ये गेल्यानंतर येशू काय पाहतो आणि मग तो काय करतो?
१८ येशू बेथानीमध्ये पोहंचतो तेव्हा सर्वात प्रथम त्याला मार्था भेटते. ती त्याला म्हणते: “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” मग मरीया आणि तिच्या घरात असलेले लोक देखील येशूला भेटायला येतात. ते सर्व रडत आहेत. तेव्हा येशू विचारतो: “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणतात: “प्रभुजी, येऊन पाहा.” लाजरला एका गुहेत ठेवलेले असते आणि गुहेच्या तोंडावर धोंड ठेवून गुहा बंद केलेली असते. सर्व लोक लाजरच्या कबरेजवळ येतात तेव्हा येशू म्हणतो: “धोंड काढा.” येशू आता काय करणार आहे हे मार्थेला समजत नाही. त्यामुळे ती आक्षेप घेत म्हणते: “प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” पण, येशू तिला म्हणतो: तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”—योहान ११:१७-४०.
१९. लाजराचे पुनरुत्थान करण्याआधी येशू सर्वांदेखत प्रार्थना का करतो?
१९ कबरेवरून धोंड काढल्यावर येशू मोठ्याने प्रार्थना करतो जेणेकरून सगळ्यांना समजावे की तो जो चमत्कार आता करणार आहे तो देवाच्या शक्तीने करणार आहे. प्रार्थना केल्यानंतर तो मोठ्याने हाक मारतो: “लाजरा, बाहेर ये.” आणि लाजर खरेच बाहेर येतो! त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले असते आणि तोंड रुमालाने वेष्टिलेले असते. त्यामुळे येशू म्हणतो: “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”—योहान ११:४१-४४.
२०. ज्यांनी लाजरचे पुनरुत्थान पाहिले ते काय करतात?
२० जे लोक मार्था आणि मरियेचे सांत्वन करण्यास आले आहेत त्यांपैकी बरेचजण येशूचा हा चमत्कार पाहून त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात. पण, इतर काहीजण या चमत्काराविषयी परुशांना जाऊन सांगण्यास लगेच निघून जातात. ही बातमी ऐकताच याजक आणि परुशी ताबडतोब यहुदी उच्च न्यायालयाच्या सदस्यांची सभा भरवतात. अतिशय भयभीत होऊन ते म्हणतात: “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो; आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रहि हिरावून घेतील.” तेव्हा कयफा नावाचा महायाजक म्हणतो: “तुम्हाला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हितावह आहे, हेहि तुम्ही लक्षात आणीत नाही.” त्यामुळे त्या दिवसापासून त्यांनी येशूला जिवे मारण्याचा आपसात निश्चय केला!—योहान ११:४५-५३.
२१. लाजरचे पुनरुत्थान केल्यानंतर येशूच्या जीवनाला नवे वळण मिळते असे का म्हणता येईल?
२१ बेथानीला पोहंचण्यास उशीर केल्यामुळेच येशू तिथे असा एक चमत्कार करू शकतो जो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. देवाच्या शक्तीने तो अशा एका व्यक्तीला जिवंत करतो ज्याला मरून चार दिवस झाले आहेत! त्या प्रतिष्ठित यहुदी उच्च न्यायालयालाही हा चमत्कार मान्य करावा लागतो. त्यामुळे ते भयंकर क्रोधित होतात; इतके की ते त्याच्यावर मरणदंडाची शिक्षा ठोठावतात. अशाप्रकारे या चमत्कारानंतर येशूच्या जीवनाला एक नवे वळण मिळते कारण आता त्याची “वेळ आली” आहे.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• देवाने आपल्याला दिलेल्या जबाबदारीची येशूला जाणीव होती हे तो कसे दाखवून देतो?
• द्राक्षरसासंबंधी येशूच्या आईने त्याला दिलेल्या सूचनेवर येशू आक्षेप का घेतो?
• येशू आपल्या विरोधकांशी ज्यारितीने वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो?
• लाजराच्या आजाराची बातमी ऐकूनही त्याच्याकडे जाण्यास येशू उशीर का करतो?
[१२ पानांवरील चित्रे]
देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यास येशूने स्वतःला वाहून घेतले