वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ३/१ पृ. २९-३१
  • यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपले अंतःकरण तयार करणे
  • आपल्या अंतःकरणाच्या ‘जमिनीची’ कस वाढवणारे घटक
  • नम्रता अंतःकरणास कोमल बनवते
  • प्रामाणिकपणा आणि ईश्‍वरी भय
  • तयार अंतःकरण म्हणजे दृढ विश्‍वास
  • प्रेम—सर्वश्रेष्ठ गुण
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्‍चयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • आपल्या हृदयाचे रक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ३/१ पृ. २९-३१

यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे

एज्रा हा इस्राएली याजक एक उल्लेखनीय संशोधक, विद्वान, नकलाकार आणि नियमशास्त्राचा शिक्षक होता. पूर्ण अंतःकरणाने सेवा करण्याबाबतीतही तो आजच्या ख्रिश्‍चनांकरता एक उत्तम उदाहरण आहे. ते कसे? खोट्या दैवतांची व दुरात्म्यांची उपासना चाललेल्या बॅबिलोन शहरात राहूनही त्याने ईश्‍वराची भक्‍ती करण्याचे सोडून दिले नव्हते.

परंतु, ईश्‍वराची भक्‍ती करीत राहणे एज्रास कसे शक्य झाले? यासाठी त्याला पुष्कळ प्रयत्न करावे लागले. तो आपल्याला सांगतो की: “परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा” त्याने “निश्‍चयच केला होता.” (तिरपे वळण आमचे.) (एज्रा ७:१०) येथे ‘निश्‍चय’ असे ज्या शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे त्या शब्दाचा अर्थ खरे तर अंतःकरण ‘तयार करणे’ असा होतो. याचा अर्थ, एज्राने परमेश्‍वराचे नियमशास्त्र स्वीकारून त्यानुसार चालण्याकरता आपले अंतःकरण तयार केले होते.

खऱ्‍या उपासनेचा विरोध करणाऱ्‍या जगात राहताना यहोवाचे लोक एज्राप्रमाणे यहोवा त्यांच्याकडून जे अपेक्षितो ते करू इच्छितात. एज्राप्रमाणे आपणही आपले अंतःकरण तयार करू या. ‘यहोवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याकरता’ आपण आपले विचार, आपली मनोवृत्ती, आपल्या इच्छा आणि प्रेरणा अर्थात आपले अंतःकरण आपण कसे तयार करू शकतो त्याचे परीक्षण करू या.

आपले अंतःकरण तयार करणे

द न्यू स्टॅण्डर्ड डिकश्‍नरीनुसार “तयार” या शब्दाचा अर्थ “सिद्ध केलेला, परिपूर्ण झालेला, बनवलेला, सज्ज” असा होतो. अर्थातच, तुम्ही देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेतले आहे व यहोवाला तुमचे जीवन समर्पण केले आहे म्हणजेच तुमचे अंतःकरण एकप्रकारे तयार स्थितीत आहे. येशूने पेरणाऱ्‍याच्या दाखल्यात ज्या ‘चांगल्या जमिनीचा’ उल्लेख केला त्या चांगल्या जमिनीप्रमाणे तुमचे अंतःकरण आहे.—मत्तय १३:१८-२३.

तरीपण आपल्या अंतःकरणाकडे सतत लक्ष देण्याची व ते शुद्ध करण्याची आवश्‍यकता आहे. का? याची दोन कारणे आहेत. पहिले कारण, आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या जमिनीत तणासारखे हानीकारक विचार सहजरीत्या मूळ धरू शकतात. या ‘शेवटल्या काळात’ तर असे सहजपणे होण्याचा मोठा धोका आहे कारण सैतानी व्यवस्थीकरणाच्या ‘हवेत’ हानीकारक विचारांचे तण सगळीकडे पसरलेले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५; इफिसकर २:२, NW) आणि दुसरे कारण थेट जमिनीशीच, अर्थात आपल्या अंतःकरणाशी निगडीत आहे. जमिनीकडे दुर्लक्ष झाल्यास ती कोरडी, निबर व निकस होऊ शकते. किंवा, मग पुष्कळ लोकांनी तिला आपल्या पायाखाली तुडवल्यामुळे ती कठीण बनू शकते. आपल्या अंतःकरणाच्या लाक्षणिक जमिनीबद्दल हेच आहे. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आपल्या आध्यात्मिक कल्याणात ज्यांना रस नाही अशा लोकांद्वारे तुडवली जाऊन ती निकस बनू शकते.

यास्तव, “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे” हा बायबलचा सल्ला अनुसरणे किती महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे ४:२३.

आपल्या अंतःकरणाच्या ‘जमिनीची’ कस वाढवणारे घटक

चांगल्या उत्पन्‍नाकरता आपल्या अंतःकरणाच्या ‘जमिनीची’ कस वाढवू शकणाऱ्‍या काही घटकांची किंवा गुणांची आपण चर्चा करू या. आपल्या अंतःकरणाची स्थिती सुधारू शकणाऱ्‍या अनेक गोष्टी आहेत, परंतु या लेखात आपण सहा घटकांची चर्चा करू या: आपली आध्यात्मिक गरज ओळखणे, नम्रता, प्रामाणिकपणा, ईश्‍वरी भय, विश्‍वास आणि प्रेम.

“आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य,” असे येशू म्हणाला. (मत्तय ५:३, NW) आपल्याला अन्‍नाची गरज आहे याची आठवण जशी आपल्याला भूक लागल्यावर होते तशीच आपल्या आध्यात्मिक गरजांविषयीची जाणीव आपली आध्यात्मिक अन्‍नाची भूक वाढवते. अशा अन्‍नाची स्वभावतःच मानवांना आस असते कारण त्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ व उद्देश मिळतो. सैतानी व्यवस्थीकरणाकडून येणारे दबाव किंवा देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा निव्वळ आळसामुळे आपली ही जाणीव हळूहळू मरू शकते. तरीपण, येशू म्हणतो: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.

नियमित, संतुलित व सकस आहारामुळे शारीरिक स्वास्थ्य वाढते व भूक देखील वाढते. आध्यात्मिक भूक लागण्याबाबतीतही असेच आहे. तुम्ही कदाचित अभ्यासू प्रवृत्तीचे नसाल परंतु देवाच्या वचनाचे दररोज वाचन करण्याची तुम्ही स्वतःला सवय लावता व नियमाने बायबल आधारित प्रकाशनांचा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमची आध्यात्मिक भूक हळूहळू वाढत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. उलट, तुमच्या बायबल अभ्यासाची वेळ केव्हा येईल असे तुम्हाला वाटायला लागते. तेव्हा, इतक्यातच हार मानू नका; योग्य आध्यात्मिक भूक वाढवण्याचा नेटाने प्रयत्न करा.

नम्रता अंतःकरणास कोमल बनवते

अंतःकरणास तयार करताना नम्रतेची अत्यंत आवश्‍यकता आहे, कारण तेव्हाच अंतःकरण ग्रहणीय बनते व प्रेमळ सल्ला व सुधारणूक आनंदाने स्वीकारते. राजा योशियाच्या उत्तम उदाहरणाचा विचार करा. त्याच्या कारकिर्दीत, मोशेद्वारे देण्यात आलेल्या देवाच्या नियमशास्त्राचे एक हस्तलिखित सापडले. नियमशास्त्रातील गोष्टी त्याने ऐकल्या. आपले पूर्वज शुद्ध उपासनेपासून किती लांब भरकटत गेले होते हे त्यास समजले तेव्हा त्याने आपले वस्त्र फाडले आणि तो यहोवापुढे रडला. देवाचे वचन राजाच्या अंतःकरणास इतके का झोंबले? त्याचे अंतःकरण “कोमल” होते व यहोवाची वचने ऐकल्यावर त्याने स्वतःला दीन केले, असे अहवाल आपल्याला सांगतो. यहोवाने योशियाचे नम्र, ग्रहणीय अंतःकरण पाहिले व त्यानुसार त्याला आशीर्वादित केले.—२ राजे २२:११, १८-२०, पं.र.भा.

नम्रतेमुळेच येशूचे “निरक्षर व अज्ञानी” असलेले शिष्य, “जगाच्या दृष्टीने” “ज्ञानी आणि विचारवंत” असलेल्या लोकांच्या नजरेतून सुटलेले आध्यात्मिक सत्य समजू शकले व आपल्या जीवनात ते लागू करू शकले. (प्रेषितांची कृत्ये ४:१३; लूक १०:२१; १ करिंथकर १:२६) हे ज्ञानी व विचारवंत लोक यहोवाचे वचन स्वीकारायला तयार नव्हते, कारण गर्वामुळे त्यांचे अंतःकरण निबर झाले होते. आता तुम्हाला कळाले, यहोवाला गर्वाचा इतका वीट का आहे?—नीतिसूत्रे ८:१३; दानीएल ५:२०.

प्रामाणिकपणा आणि ईश्‍वरी भय

“हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” असे संदेष्टा यिर्मयाने लिहिले. (यिर्मया १७:९) हा कपटीपणा अनेक प्रकारे दिसतो; जसे की, आपण जेव्हा चुका करतो तेव्हा चुकांना झाकण्याकरता लगेच कारण देऊ लागतो. आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील गंभीर खोट जेव्हा आपण लपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हाही हा कपटीपणा दिसतो. परंतु, प्रामाणिकपणा आपल्याला कपटी अंतःकरणावर विजय मिळवण्यास साहाय्य करील; यामुळे आपल्याला स्वतःबद्दलचे सत्य पचवायला मदत मिळेल व त्यानुसार आपण सुधारणूक करू शकतो. एका प्रार्थनेद्वारे स्तोत्रकर्त्याने असा प्रामाणिकपणा व्यक्‍त केला. तो म्हणाला: “हे परमेश्‍वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.” खरेच, आपले अंतःकरण कसास लावून त्याची पारख करण्यास यहोवाला परवानगी देण्याद्वारे स्तोत्रकर्त्याने आपले अंतःकरण तयार केले होते. यासाठी कदाचित त्याला स्वतःची वैगुण्ये देखील कबूल करावी लागली असतील जेणेकरून त्याला सुधारणूक करता येईल.—स्तोत्र १७:३; २६:२.

स्वतःची पारख करताना ईश्‍वरी भयामुळे आपल्याला शक्‍तिशाली साहाय्य मिळते. ईश्‍वरी भय याचाच अर्थ “दुष्कर्माचा द्वेष.” (नीतिसूत्रे ८:१३) यहोवाची प्रेमळ दया आणि चांगुलपणा यांची गुणग्राहकता बाळगण्यासोबतच यहोवाचे खरोखर भय बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला सतत याची जाणीव असते, की यहोवाच्या आज्ञांचे पालन न करणाऱ्‍यांना शिक्षा (मृत्यूची शिक्षा देखील) देण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याचे भय बाळगणारे त्याच्या आज्ञांचे पालनही करतात हे त्याने इस्राएलविषयी बोलताना दाखवून दिले: “त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.”—अनुवाद ५:२९.

परंतु, एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे. आपण भीतीने व थरथर कापत देवाच्या अधीन असावे हा ईश्‍वरी भयामागचा हेतू नाही तर, आपल्या प्रेमळ पित्याच्या आज्ञांचे पालन करण्यास आपण प्रवृत्त व्हावे हा ईश्‍वरी भयामागचा हेतू आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की, देवाला आपल्या सर्वांच्या कल्याणाची काळजी आहे. उलट, अशाप्रकारचे हे ईश्‍वरी भय हर्षविणारे व आनंदविणारे आहे. अशाच प्रकारचे भय स्वतः येशू ख्रिस्ताने देखील अनेकवेळा दाखवले होते.—यशया ११:३; लूक १२:५.

तयार अंतःकरण म्हणजे दृढ विश्‍वास

विश्‍वासात मजबूत असलेल्या अंतःकरणास माहीत असते की यहोवा त्याच्या वचनाद्वारे जे काही अपेक्षितो किंवा जे काही सांगतो ते नेहमीच योग्य व भल्याकरता असते. (यशया ४८:१७, १८) अशाप्रकारचे अंतःकरण असलेल्या व्यक्‍तीला नीतिसूत्रे ३:५, ६ मधील आर्जवाचे अनुकरण केल्यामुळे खूप समाधान व संतोष मिळतो. त्या वचनात असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” परंतु, राज्य आस्थेवर लक्ष केंद्रित ठेवण्याकरता जीवन साधेसोपे ठेवायला अनेक त्याग करावे लागतात तेव्हा खासकरून विश्‍वास नसलेले अंतःकरण यहोवावर भरवसा ठेवण्यास राजी होणार नाही. (मत्तय ६:३३) म्हणूनच यहोवा अविश्‍वासू अंतःकरणाला “दुष्ट” लेखतो.—इब्री लोकांस ३:१२.

आपल्या घरात आपण खासगीत ज्या कोणत्या गोष्टी करतो त्यातून आणि इतर अनेक गोष्टींतून यहोवावरील आपला विश्‍वास दिसून येतो. उदाहरणार्थ, गलतीकर ६:७ मधील तत्त्वाचा विचार करा. “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” आपण जे चित्रपट पाहतो, जी पुस्तके वाचतो, किती प्रमाणात बायबल अभ्यास करतो व आपल्या प्रार्थना या गोष्टींतून या तत्त्वावरील आपला विश्‍वास दिसून येतो. ‘आत्म्यासाठी पेरण्यास’ प्रवृत्त करणारा दृढ विश्‍वास, यहोवाचे वचन स्वीकारून त्याचे पालन करण्यास तयार असलेले अंतःकरण असण्याकरता एक प्रमुख घटक आहे.—गलतीकर ६:८.

प्रेम—सर्वश्रेष्ठ गुण

इतर सर्व गुणांपेक्षा प्रेम आपल्या अंतःकरणाच्या जमिनीला भुसभुशीत बनवते जेणेकरून आपण अगदी सहजपणे यहोवाचे वचन स्वीकारतो. म्हणूनच, प्रेमाची तुलना विश्‍वास आणि आशा यांच्याबरोबर करताना प्रेषित पौलाने प्रेमाला “श्रेष्ठ” म्हटले. (१ करिंथकर १३:१३) देवाबद्दल प्रेम असलेल्या अंतःकरणाला देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने खूप समाधान व आनंद मिळतो; देव ज्या अपेक्षा करतो त्याबद्दल त्याला चीड येत नाही. प्रेषित योहानाने म्हटले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) असेच काहीसे येशूनेही म्हटले: “ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील.” (योहान १४:२३) अशाप्रकारचे प्रेम एकतर्फी नसते याची कृपया नोंद घ्यावी. प्रेमाने प्रेरित होऊन यहोवाकडे येणाऱ्‍यांवर तोही मनापासून प्रेम करतो.

आपण अपरिपूर्ण आहोत व त्याच्याविरुद्ध नेहमी पाप करतो हे यहोवाला माहीत आहे. तरीसुद्धा तो आपल्याला त्याच्यापासून दूर करत नाही. यहोवा आपल्या सेवकांचे ‘पूर्ण हृदय’ पाहतो; हेच पूर्ण हृदय किंवा अंतःकरण त्यांना “उत्सुक मनाने” त्याची सेवा आनंदाने करण्यास प्रवृत्त करते. (१ इतिहास २८:९, पं.र.भा.) अर्थातच, आपल्या अंतःकरणात चांगले गुण विकसित करून आत्म्याची फळे उत्पन्‍न करण्याकरता वेळ आणि प्रयत्न लागतात हे यहोवाला माहीत आहे. (गलतीकर ५:२२, २३) म्हणूनच तर तो आपल्याबाबतीत धीर धरतो, तो ‘आपली प्रकृती जाणतो. आपण केवळ माती आहोत हे तो आठवतो.’ (स्तोत्र १०३:१४) येशूचीही हीच मनोवृत्ती असल्यामुळे आपल्या शिष्यांची त्याने कधीही कठोरपणे खरडपट्टी केली नाही तर धीराने त्याने त्यांना मदत केली व उत्तेजन दिले. यहोवाचे आणि येशूचे हे प्रेम, ही दया आणि हा धीर पाहून आपल्याला त्यांना अधिक प्रेम करण्यास प्रेरणा मिळत नाही का?—लूक ७:४७; २ पेत्र ३:९.

तुम्हाला कधीकधी तुमच्यातील खोलवर रुतलेले तणासारखे गुण उपटून टाकण्यास किंवा कठीण, निबर झालेल्या सवयी मोडून काढण्यास जोराचा प्रयत्न करावा लागतो तेव्हा निराश होऊ नका. तर “प्रार्थनेत तत्पर” राहून सुधारणूक करत राहा; यहोवाकडे त्याच्या आत्म्याच्या साहाय्याकरता वारंवार विनवणी करा. (रोमकर १२:१२) त्याच्या मदतीने तुम्हालाही एज्राप्रमाणे ‘यहोवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याकरता’ पूर्णपणे तयार झालेले अंतःकरण मिळवण्यात यश मिळेल.

[३१ पानांवरील चित्र]

बॅबिलोनमध्ये राहताना देखील एज्राने ईश्‍वराची भक्‍ती करण्याचे सोडले नाही

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Garo Nalbandian

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा