प्रबळ सत्ताधीश—यहोवा
“तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश [शक्तिमान] आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६.
१, २. (अ) आपण सर्वजण कोणत्या भौतिक शक्तीवर अवलंबून आहोत? (ब) सर्व प्रकारच्या शक्तीचा शेवटी उगम हा यहोवा देवच आहे असे का म्हणता येईल हे समजावून सांगा.
शक्ती, मग ती कोणत्याही प्रकारची असो, तिचे महत्त्व फार कमी लोक ओळखतात. उदाहरणार्थ, विद्युतशक्ती. या शक्तीमुळेच आपल्याला प्रकाश आणि इतर कितीतरी सुविधा मिळतात. आपल्याजवळ असलेली कितीतरी उपकरणे विद्युत शक्तीशिवाय निरुपयोगी ठरली असती; पण आपण सहसा याचा विचार करत नाही. एखाद्यावेळेस जेव्हा अचानक वीज पुरवठा बंद पडतो तेव्हा कोठे आपल्याला जाणीव होते, की ही शक्ती नसल्यास शहरी माणसाचे जीवनच ठप्प पडेल. आपले जीवन जिच्यावर इतके अवलंबून आहे त्या विद्युतशक्तीचा सर्वात मोठा आणि भरवशाचा स्रोत म्हणजे सूर्य.a दर सेकंदाला ही सौर अणुभट्टी ५० लाख टन आण्विक इंधन पोटात जिरवून पृथ्वीवरील जीवसृष्टीला अत्यावश्यक असणारी ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देते.
२ सूर्याला ही शक्ती कोठून मिळते? अवकाशात हे अद्भुत शक्ती केंद्र कोणी निर्माण केले? यहोवा देवाने. स्तोत्र ७४:१६ यात यहोवाविषयी असे म्हटले आहे: “चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.” होय, ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या जीवांचा उत्पन्नकर्ता यहोवा देव आहे त्याचप्रमाणे, सर्व प्रकारच्या शक्तीचाही तोच उगम आहे. (स्तोत्र ३६:९) त्याच्या शक्तीला आपण कधीही गृहीत धरू नये. संदेष्टा यशया याच्याकडून यहोवा आपल्याला स्वर्गातील चंद्र, सूर्य, ताऱ्यांकडे पाहून त्यांच्या अस्तित्वाविषयी चिंतन करण्याचे प्रोत्साहन देतो. “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश [शक्तिमान] आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६; यिर्मया ३२:१७.
३. यहोवाच्या शक्तीसामर्थ्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
३ यहोवा इतका प्रबळ आणि शक्तिमान असल्यामुळे आपण याची पूर्ण खातरी बाळगू शकतो की आपले जीवन ज्यावर अवलंबून आहे त्या सूर्याकडून आपल्याला प्रकाश आणि ऊब सदैव मिळत राहील. पण यहोवाच्या शक्तीमुळे केवळ आपल्या शारीरिक गरजांच पुरवल्या जात नाहीत; तर यहोवाच्या शक्तीमुळेच आपल्याला पाप व मृत्यूच्या विळख्यातून सुटका, भविष्याची आशा आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवण्याचा आधार मिळतो. (स्तोत्र २८:६-९; यशया ५०:२) बायबलमध्ये अशी कितीतरी उदाहरणे आहेत, जी दाखवून देतात की यहोवाजवळ त्याच्या लोकांची सुटका करण्याचे, त्यांना संकटातून वाचवण्याचे आणि शत्रूंचा नायनाट करण्याचे सामर्थ्य आहे. पण याव्यतिरिक्त, देवाने निर्माण केलेल्या सृष्टीतूनही देवाच्या असीम शक्तीची प्रचिती येते.
सृष्टीतून उलगडणारे देवाचे सामर्थ्य
४. (अ) रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहून दावीदाच्या मनात कोणता विचार आला? (ब) आकाशातील खज्योती देवाच्या शक्तीविषयी काय प्रकट करतात?
४ प्रेषित पौलाने स्पष्टपणे सांगितले की आपल्या निर्माणकर्त्याचे ‘सनातन सामर्थ्य निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसते.’ (रोमकर १:२०) कितीतरी शतकांपूर्वी दाविदाने स्तोत्रे लिहिली. मेंढपाळ असल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा तो आकाशाकडे पाहून अद्भुत विश्वाबद्दल आणि त्याला घडवणाऱ्या सामर्थ्यशाली निर्माणकर्त्याबद्दल विचार करत असेल यात काही शंका नाही. म्हणूनच त्याने लिहिले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” (स्तोत्र ८:३, ४) आकाशातील खज्योतींबद्दल दाविदाला शास्त्रशुद्ध ज्ञान नव्हते, पण एवढे मात्र त्याला जरूर समजले होते की या अफाट विश्वाच्या निर्माणकर्त्यासमोर आपण अगदी समुद्रातल्या थेंबाप्रमाणे आहोत. आज तर खगोलशास्त्रज्ञांना विश्वाच्या अफाटपणाविषयी आणि त्याला अस्तित्वात ठेवणाऱ्या अगाध शक्तीविषयीही बरीच माहिती मिळाली आहे. उदाहरणार्थ, हे शास्त्रज्ञ सांगतात की दर सेकंदाला सूर्यातून उत्पन्न होणारी ऊर्जा ही १०,००० कोटी मेगाटन टीएनटीच्या (शक्तिशाली विस्फोटक) विस्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेइतकी आहे.b या ऊर्जेतील केवळ एक लहानसा अंश पृथ्वीपर्यंत पोचतो; पण तरीही त्याच्या साहाय्याने आपल्या या ग्रहावरील जीवसृष्टी कायम राहते. आणि तरीसुद्धा, आपल्या सूर्याला विश्वातला सर्वात शक्तिशाली तारा म्हणता येणार नाही. कारण सूर्यातून दिवसभरात जितकी ऊर्जा उत्पन्न होते तितकीच ऊर्जा एका सेकंदात उत्पन्न करणारे काही तारे देखील अस्तित्वात आहेत. मग अशा या खज्योती निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे किती सामर्थ्य असेल याची कल्पना करा! एलीहूने यहोवाबद्दल जे म्हटले ते अगदी योग्य आहे: “सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे.”—ईयोब ३७:२३.
५. यहोवाच्या सृष्टीतून आपल्याला त्याच्या सामर्थ्याचा कोणता पुरावा दिसून येतो?
५ दाविदाप्रमाणे आपणही ‘परमेश्वराच्या कृत्यांचा शोध केला,’ तर आपल्या सभोवती असणाऱ्या कितीतरी गोष्टींतून—घोंघावणारा वारा, उफाळत्या लाटा, गरजणारे मेघ, कडाडणाऱ्या विजा, उसळत्या नद्या व गगनचुंबी पर्वत या सर्वांतून आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्याचा प्रत्यय येईल. (स्तोत्र १११:२; ईयोब २६:१२-१४) शिवाय, यहोवाने इयोबाला आठवण करून दिल्याप्रमाणे विविध पशूपक्षी देखील त्याच्या सामर्थ्याची प्रचिती करून देतात. उदाहरणार्थ, बेहेमोथ किंवा पाणघोडा. यहोवाने ईयोबाला सांगितले: “त्याच्या कमरेत ताकद असते . . . त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज.” (ईयोब ४०:१५-१८) बायबल काळांत आणखी एक प्राणी लोकांच्या माहितीतला होता, तो म्हणजे अतिशय भयानक आणि शक्तिशाली रानबैल. दाविदाने प्रार्थनेत असे म्हटले: “सिंहाच्या जबड्यापासून मला वाचीव, रानबैलांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला.”—स्तोत्र २२:२१; ईयोब ३९:९-११.
६. बायबलमध्ये बैल कशाला सूचित करतो आणि का? (तळटीप पाहा.)
६ बैल अत्यंत शक्तिशाली प्राणी आहे; म्हणूनच बायबलमध्ये यहोवाच्या सामर्थ्याच्या संदर्भात त्याचा प्रतिकात्मक उल्लेख करण्यात आला आहे.c प्रेषित योहानाने दृष्टान्तात यहोवाच्या सिंहासनाभोवती चार प्राणी पाहिले; यांपैकी एकाचे तोंड बैलासारखे (गोऱ्हासारखे) होते. (प्रकटीकरण ४:६, ७) या चार करूबांपैकी एक, यहोवाच्या चार मुख्य गुणांपैकी एकास, अर्थात त्याच्या सामर्थ्यास चित्रित करतो. त्याचे इतर गुण आहेत प्रीती, बुद्धी आणि न्याय. सामर्थ्य हे यहोवाच्या व्यक्तिमत्त्वात अभिन्नपणे गोवलेले असल्यामुळे त्याच्या या गुणाविषयी नीट समजून घेणे आणि तो आपल्या सामर्थ्याचा कसा वापर करतो हे जाणून घेणे आवश्यक आहे; यामुळे आपण यहोवाच्या निकट येऊ, तसेच आपल्या हातात सत्ता किंवा सामर्थ्य दिले जाते तेव्हा त्याचा वापर करताना आपण यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकू.—इफिसकर ५:१.
‘सेनाधीश परमेश्वर, समर्थ देव’
७. नीतीचा अनीतीवर विजय होईल असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?
७ बायबलमध्ये यहोवाला “सर्वसमर्थ देव” म्हटले आहे. त्याला दिलेली ही उपाधी आपल्याला आठवण करून देते की आपण यहोवाच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नये; तसेच, शत्रूंना पराभूत करण्याच्या त्याच्या शक्तीबद्दलही आपण कधी शंका बाळगू नये. (उत्पत्ति १७:१; निर्गम ६.३) सैतानाचे हे दुष्ट व्यवस्थीकरण अगदी सुस्थापित आहे असे वरवर भासत असले तरीसुद्धा, यहोवाच्या नजरेत मात्र “राष्ट्रे पोहऱ्यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत.” (यशया ४०:१५) तो सर्वसमर्थ आहे आणि म्हणून आपण पूर्णपणे आश्वस्त आहोत की नीती अनीतीवर जरूर विजय मिळवेल. आज दुष्टाई सर्वत्र पसरली असली तरीसुद्धा “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा समर्थ देव” लवकरच दुष्टांचा कायमचा नायनाट करील हे माहीत असल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळते.—यशया १:२४; स्तोत्र ३७:९, १०.
८. यहोवाच्या नेतृत्त्वाखाली असलेले स्वर्गीय सैन्य कशाला सूचित करते आणि त्यांच्या शक्तीचा आपण कशावरून अंदाज लावू शकतो?
८ “सेनाधीश यहोवा” हा देवाच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा आणखी एक शब्दप्रयोग आहे; हा शब्दप्रयोग बायबलमध्ये २८५ वेळा आढळतो आणि यातील ‘सेना’ हा शब्द यहोवाच्या हुकुमाच्या अधीन असणाऱ्या आत्मिक प्राण्यांच्या सैन्याला सूचित करतो. (स्तोत्र १०३:२०, २१; १४८:२) यांपैकी एका स्वर्गदूताने एका रात्रीत, जेरूसलेमवर हल्ला करणाऱ्या १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार केले. (२ राजे १९:३५) यहोवाच्या स्वर्गीय सैन्याची शक्ती आपण ओळखली असल्यास विरोधकांच्या दबावामुळे आपण सहजासहजी घाबरून जाणार नाही. अलीशा संदेष्ट्याला मारून टाकण्यासाठी एका मोठ्या सैन्याने त्याला घेरले तेव्हा त्याचा सेवक घाबरला. पण तो स्वतः जराही घाबरला नाही कारण यहोवावर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी सुसज्ज असलेले स्वर्गीय सैन्य त्याला अक्षरशः दिसत होते.—२ राजे ६:१५-१७.
९. देवाच्या संरक्षक शक्तीवर येशूप्रमाणे आपणही का विश्वास ठेवला पाहिजे?
९ गेथशेमानेच्या बागेत जेव्हा तरवारी व सोटे घेऊन एक मोठा समुदाय येशूला धरायला आला तेव्हा त्याला देखील स्वर्गदूतांच्या साहाय्यावर विश्वास होता. तरवार जागच्या जागी घाल असे पेत्राला सांगितल्यानंतर त्याने सांगितले की गरज पडल्यास तो आपल्या पित्याकडे “देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक” पाठवण्याची विनंती सहज करू शकतो. (मत्तय २६:४७, ५२, ५३) देवाच्या हातात असलेल्या या स्वर्गीय सैन्याबद्दल आपल्यालाही जाणीव असेल तर तो आपल्याला साहाय्य करू शकतो असा पूर्ण विश्वास आपण बाळगू. प्रेषित पौलाने लिहिले: “तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”—रोमकर ८:३१.
१०. यहोवा कोणासाठी आपले सामर्थ्य उपयोगात आणतो?
१० देवाच्या संरक्षणावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तो नेहमी चांगल्या कारणासाठीच, त्याचप्रमाणे न्याय, बुद्धी आणि प्रीती या त्याच्या इतर गुणांच्या एकवाक्यतेत आपल्या सामर्थ्याचा वापर करतो. (ईयोब ३७:२३; यिर्मया १०:१२) शक्तिशाली लोक सहसा आपल्या स्वार्थाकरता गरीब, असहाय्य लोकांवर अत्याचार करतात, पण यहोवा “कंगालांस धुळींतून उठवितो” तसेच तो “तारण करण्यास समर्थ” आहे. (स्तोत्र ११३:५-७; यशया ६३:१) येशूची विनम्र आणि निरभिमानी आई मरिया हिला देखील जाणीव होती की “समर्थ” देवाचे भय मानणाऱ्यांसाठी देव आपले सामर्थ्य दाखवतो, गर्विष्ठांना नमवतो आणि दीनांस उंच करतो.—लूक १:४६-५३.
यहोवा आपल्या सेवकांसाठी सामर्थ्य प्रकट करतो
११. सा.यु.पू. १५१३ साली इस्राएल लोकांना देवाच्या सामर्थ्याचा कशाप्रकारे प्रत्यय आला?
११ यहोवाने बऱ्याच वेळा आपल्या सेवकांसमोर आपले सामर्थ्य प्रकट केले आहे. सा.यु.पू. १५१३ साली सिनाय पर्वतावर एकदा त्याने असे केले होते. त्याच वर्षी इस्राएल लोकांनी देवाची शक्ती प्रकट करणारी बरीच महत्कृत्ये पाहिली होती. दहा विध्वंसकारी पीडा आणून यहोवाने स्वतःला इजिप्तच्या दुर्बळ देवतांपेक्षा शक्तिशाली सिद्ध केले होते. त्याच्या काही काळानंतरच इस्राएलांनी तांबडा समुद्र चमत्कारिकपणे पार केला आणि फारोचे सैन्य नष्ट झाले तेव्हा देखील देवाची शक्ती प्रकट झाली. तीन महिन्यांनंतर, सिनाय पर्वताच्या पायथ्याशी यहोवाने इस्राएली लोकांना ‘सर्व लोकांपेक्षा त्याचा खास निधि होण्याचे’ आव्हान केले. यावर इस्राएल लोकांनी वचन दिले: “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्गम १९:५, ८) मग यहोवाने आपली शक्ती अतिशय विलक्षणरित्या प्रकट केली. विजांचा गडगडाट होऊ लागला, शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला; सिनाय पर्वतावर धूर पसरला आणि सर्व पर्वत थरथरू लागला. काही अंतरावर उभे असलेल्या लोकांचा थरकाप झाला. पण मोशेने त्यांना सांगितले की या अनुभवातून त्यांनी यहोवाचे योग्य प्रकारचे भय बाळगायला शिकावे; असे भय, जे त्यांना आपल्या सर्वसमर्थ आणि एकमेव खऱ्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा पाळण्यास प्रेरित करील.—निर्गम १९:१६-१९; २०:१८-२०.
१२, १३. एलिया आपले काम सोडून का पळून गेला, पण यहोवाने त्याला कशाप्रकारे साहस दिले?
१२ बऱ्याच शतकांनंतर एलियाच्या काळात सिनाय पर्वतावर पुन्हा एकदा देवाने आपली शक्ती प्रकट केली. संदेष्टा एलिया याने याआधीही देवाच्या शक्तीचे प्रकटन पाहिले होते. इस्राएल राष्ट्र खोट्या उपासनेत बुडाल्यामुळे देवाने साडेतीन वर्षे “आकाशकपाटे बंद केली.” (२ इतिहास ७:१३) यामुळे इस्राएलात दुष्काळ पडला; पण करीथ ओहळाजवळ कावळे एलियाला नियमितपणे भोजन आणून देत असत. यानंतर एका गरीब विधवेच्या घरातले थोडेसे पीठ आणि तेल कधी संपणार नाही असा चमत्कारिक आशीर्वाद यहोवाने दिला, आणि या विधवेच्या घरात एलियाला दुष्काळात अन्न मिळाले. यहोवाने एलियाला या विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान करण्याचीही शक्ती दिली. शेवटी, कार्मेल पर्वतावर यहोवा हाच खरा देव आहे हे चमत्कारिकरित्या सिद्ध करण्यात आले तेव्हा स्वर्गातून अग्नि उतरला आणि त्याने एलियाचा होमबली भस्म करून टाकला. (१ राजे १७:४-२४; १८:३६-४०) पण काही काळानंतर जेव्हा ईजबेल हिने एलियाला मारून टाकण्याची धमकी दिली, तेव्हा तो घाबरला आणि अतिशय निराश झाला. (१ राजे १९:१-४) भविष्यवाणी घोषित करण्याचे काम पूर्ण झाले आहे असे समजून तो देश सोडून पळून गेला. त्याला दिलासा आणि साहस देण्यासाठी यहोवाने खास त्याच्यासमोर आपले सामर्थ्य पुन्हा प्रकट केले.
१३ एलिया एका गुहेत लपून बसला; तेव्हा त्याला यहोवाच्या नियंत्रणात असणाऱ्या शक्तींपैकी तीन शक्तींचे अचंबित करणारे प्रदर्शन पाहायला मिळाले: सुसाट्याचा वारा, भूमिकंप आणि शेवटी अग्नी. पण एलियाशी मात्र यहोवा ‘शांत, मंद वाणीत’ बोलला. त्याने एलियावर आणखी जबाबदारी सोपवली आणि त्याला सांगितले की इस्राएलात अद्याप ७,००० लोक आहेत जे यहोवाची विश्वासूपणे उपासना करत आहेत. (१ राजे १९:९-१८) एलियाप्रमाणे आपल्यालाही कदाचित सेवेत चांगले परिणाम न मिळाल्यामुळे निराशा वाटत असेल; असे असल्यास आपण यहोवाला प्रार्थना करून ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देण्याची विनंती केली पाहिजे. देवाकडून मिळालेल्या या सामर्थ्याच्या साहाय्याने आपण हिंमत न हारता प्रचार कार्य करत राहू शकतो.—२ करिंथकर ४:७.
यहोवाचे सामर्थ्य —त्याच्या सर्व अभिवचनांच्या पूर्ततेची हमी
१४. यहोवाच्या नावावरून काय सूचित होते आणि त्याच्या नावाशी त्याच्या सामर्थ्याचा कसा संबंध आहे?
१४ यहोवाच्या सामर्थ्याचा त्याच्या नावाशी आणि त्याच्या इच्छेच्या पूर्णतेशीही संबंध आहे. यहोवा हे एक अद्वितीय नाव असून त्याचा अर्थ “तो व्हावयास लावतो” असा होतो. यावरून हे सूचित होते की यहोवा आपल्या अभिवचनांचा पूर्तिकर्ता होतो. संशयी लोकांना कदाचित देवाचे उद्देश काल्पनिक वाटत असतील पण त्यांच्या पूर्णतेत काहीही किंवा कोणीही अडथळा आणू शकत नाही. येशूने एकदा आपल्या प्रेषितांना सांगितले होते त्याप्रमाणे, “देवाला . . . सर्व शक्य आहे.”—मत्तय १९:२६.
१५. यहोवाला काही अशक्य नाही याची अब्राहाम आणि सारा यांना कशाप्रकारे आठवण करून देण्यात आली?
१५ उदाहरणार्थ, यहोवाने अब्राहाम व सारा यांना अभिवचन दिले होते, की त्यांच्याद्वारे एक महान राष्ट्र निर्माण होईल. पण अनेक वर्षांपर्यंत त्यांना मूलच झाले नाही. आपण आपले अभिवचन पूर्ण करणार आहोत असे यहोवाने सांगितले तेव्हा ते दोघेही अगदी म्हातारे झाले होते आणि त्यामुळे साराला या गोष्टीचे हसू आले. यावर स्वर्गदूताने विचारले: “परमेश्वराला काही असाध्य आहे काय?” (उत्पत्ति १२:१-३; १७:४-८; १८:१०-१४) चार शतकांनंतर मोशेने अब्राहामच्या सर्व संततीला (जी आता एक मोठे राष्ट्र बनली होती) मवाबाच्या मैदानावर एकत्रित केले व देवाने आपले अभिवचन कशाप्रकारे पूर्ण केले याची त्यांना आठवण करून दिली. मोशे त्यांना म्हणाला: “त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीति केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणिले. तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशांत न्यावे आणि त्यांची भूमि तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहा.”—अनुवाद ४:३७, ३८.
१६. मृतांच्या पुनरुत्थानावर विश्वास न ठेवण्याची चूक सदूकी लोकांनी का केली?
१६ बऱ्याच शतकांनंतर येशूने पुनरुत्थानावर विश्वास न ठेवणाऱ्या सदूकी लोकांची निर्भत्सना केली. मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याच्या देवाने दिलेल्या अभिवचनावर हे लोक विश्वास का ठेवत नव्हते? येशू त्यांना म्हणाला: ‘तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नाही.’ (मत्तय २२:२९) बायबल आपल्याला आश्वासन देते की “कबरेतील सर्व माणसे [मनुष्याच्या पुत्राची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२७-२९) देवाच्या सामर्थ्यावर आपला विश्वास असेल तर मृत लोक परत जिवंत होतील असे जे बायबलमध्ये सांगितले आहे त्याविषयी आपण खातरी बाळगू. देव “मृत्यु कायमचा नाहीसा करितो, . . . कारण परमेश्वर हे बोलला आहे.”—यशया २५:८.
१७. येणाऱ्या काळात आपल्याला एका खास प्रकारे यहोवावर विश्वास ठेवण्याची गरज केव्हा उद्भवेल?
१७ निकट भविष्यात, अशी वेळ येत आहे जेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला देवाच्या तारणशक्तीवर खास प्रकारे विश्वास प्रकट करावा लागेल. दियाबल सैतान देवाच्या लोकांवर हल्ला करील आणि तेव्हा ते अगदीच असहाय्य, असुरक्षित आहेत असे भासेल. (यहेज्केल ३८:१४-१६) मग परमेश्वर आपल्या संरक्षणासाठी त्याचे महान सामर्थ्य प्रकट करील आणि सर्वांना हे समजेल की तोच यहोवा आहे. (यहेज्केल ३८:२१-२३) सर्वसमर्थ परमेश्वरावर आपला विश्वास आणि भरवसा अगदी पक्का करण्याची हीच वेळ आहे; असे केल्यास जेव्हा ती कठीण घडी येईल तेव्हा आपण न डगमगता खंबीर राहू शकू.
१८. (अ) देवाच्या शक्तीविषयी मनन केल्यास कोणते फायदे आपल्याला मिळू शकतात? (ब) पुढच्या लेखात कोणता प्रश्न विचारात घेतला जाईल?
१८ यहोवाची शक्ती व सामर्थ्य आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला लावते. त्याच्या महत्कृत्यांविषयी विचार करताना आपण नम्रपणे आपल्या महान निर्माणकर्त्याची स्तुती करण्यासाठी प्रेरित होतो. तो आपले सामर्थ्य सुबुद्धीने आणि प्रीतीने उपयोगात आणत असल्यामुळे आपण त्याचे आभार मानू शकतो. सेनाधीश यहोवावर भरवसा ठेवल्यास आपण कधीही भयभीत होणार नाही. त्याच्या अभिवचनांवर आपण दृढ विश्वास ठेवू. पण आपल्याला देखील देवाच्याच प्रतिमेनुसार निर्माण करण्यात आले असल्यामुळे आपल्याजवळही, मर्यादित प्रमाणातच का होईना, पण शक्ती आहे. आपण आपल्या शक्तीचा किंवा अधिकाराचा वापर करतो तेव्हा आपण आपल्या निर्माणकर्त्याचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो? हाच पुढच्या लेखाचा विषय आहे.
[तळटीपा]
a शक्ती केंद्रांतील ऊर्जेचे मुख्य स्रोत असणाऱ्या तेल आणि कोळसा यांसारख्या जीवाश्म इंधनांना सूर्यापासून ऊर्जा मिळते असे मानले जाते.
b चाचणी करण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली परमाणु बॉम्बची विस्फोटक शक्ती ५७ मेगाटन टीएनटीच्या बरोबरीची होती.
c बायबलमध्ये ज्या रानबैलांचा उल्लेख केला आहे ते कदाचित ऑरक्स (लॅटिन भाषेत युरस) हे प्राणी असावेत. दोन हजार वर्षांपूर्वी हे प्राणी गॉल (आताचे फ्रांस) येथे आढळले होते आणि ज्युलियस सीझर याने त्यांचे असे वर्णन केले होते: “युराय जवळजवळ हत्तींइतकेच मोठे आहेत पण त्यांचा स्वभाव, रंग आणि शरीराची घडण बैलांसारखी आहे. त्यांची शक्ती आणि वेग विलक्षण आहे: त्यांच्या दृष्टीस पडणाऱ्या कोणालाही ते सोडत नाहीत, माणूस असो वा पशू.”
तुम्ही या प्रश्नांचे उत्तर देऊ शकता का?
• सृष्टीतून यहोवाचे सामर्थ्य कशाप्रकारे दिसून येते?
• आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी यहोवा कोणत्या सैन्याचा वापर करू शकतो?
• यहोवाने कोणकोणत्या प्रसंगी आपले सामर्थ्य प्रकट केले?
• यहोवा त्याची सर्व अभिवचने पूर्ण करील याची आपण का खातरी बाळगू शकतो?
[१० पानांवरील चित्रे]
“आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले?”
[चित्राचे श्रेय]
Photo by Malin, © IAC/RGO १९९१
[१३ पानांवरील चित्रे]
ज्या महत्कृत्यांतून यहोवाने आपले सामर्थ्य प्रकट केले त्यांवर मनन केल्यास त्याच्या अभिवचनांवर आपला विश्वास दृढ होईल