एथोस पर्वत—“पवित्र पर्वत”?
ऑर्थोडॉक्स चर्चच्या २२,००,००,००० सदस्यांना उत्तर ग्रीसमधील समुद्रकिनाऱ्याचा उंच व समुद्रात बुडालेला उबडखाबड एथोस पर्वत हा “ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांच्या खास स्थळांपैकी सर्वात पवित्र पर्वत आहे.” त्यांच्यापैकी अनेकांना एथोसच्या ‘पवित्र पर्वतावर’ तीर्थयात्रेसाठी जाण्याचे स्वप्न असते. हा “पवित्र पर्वत” आहे तरी काय? त्याला इतके महत्त्व कसे प्राप्त झाले? आणि देवाला भिऊन वागणाऱ्या लोकांनी आध्यात्मिक मार्गदर्शनाकरता आणि खऱ्या उपासनेकरता त्या ‘पर्वताकडे’ वळावे का?
“पवित्र डोंगर” किंवा “पवित्र पर्वत” अशी अभिव्यक्ती बायबलमध्ये जरूर आढळते. हा “पवित्र डोंगर” किंवा “पवित्र पर्वत” खरा देव यहोवा याच्या पवित्र, शुद्ध आणि उंचावलेल्या उपासनेशी संबंधित आहे. प्राचीन जेरूसलेममधील सीयोन पर्वतावर राजा दावीदाने कराराचा कोश आणला तेव्हा तो ‘पवित्र डोंगर’ झाला. (स्तोत्र १५:१; ४३:३; २ शमुवेल ६:१२, १७) मोरिया डोंगरावर शलमोनाचे मंदिर बांधल्यानंतर, मंदिराचे क्षेत्रही ‘सीयोनात’ गणले जाऊ लागले; म्हणूनच सीयोन हे देवाचे ‘पवित्र डोंगर’ म्हणून राहिले. (स्तोत्र २:६; योएल ३:१७) देवाचे मंदिर जेरूसलेममध्ये असल्यामुळे काही वेळा त्या शहराला देवाचा ‘पवित्र पर्वत’ असेही संबोधले जात होते.—यशया ६६:२०; दानीएल ९:१६, २०.
आज काय? एथोस पर्वत—किंवा दुसरे कोणतेही पर्वतशिखर—‘पवित्र पर्वत’ आहे का जेथे लोकांनी स्वीकार्य पद्धतीने देवाची उपासना करण्यासाठी गेले पाहिजे?
आश्रम असलेले ‘पवित्र पर्वत’
कॅलसिदसी द्वीपकल्पाच्या पौर्वात्य टोकाला आधुनिक दिवसातील थेसलनिकीच्या पूर्वेलाच इजियन समुद्रातून वर आलेले एक निमुळते जमिनीचे टोक हेच एथोस पर्वत आहे. समुद्रसपाटीपासून ६,६६७ फूट उंच सुळ्यासारखे असलेले हे शिखर डोळे दिपवून टाकणाऱ्या संगमरवरी दगडाचे आहे.
एथोसला फार पूर्वीपासून पवित्र स्थळ मानले जाते. ग्रीक दंतकथांनुसार ऑलिम्पस पर्वतावर देवतांचे वस्तीस्थान होण्याआधी एथोस पर्वत हेच त्यांचे वस्तीस्थान होते. थोर कॉन्स्टंटाईननंतरच (सा.यु. चवथे शतक) एथोस हे ख्रिस्ती चर्चेसचे पवित्र स्थळ बनले. एका दंतकथेनुसार, “कुमारिका” मरियम आणि सुवार्तिक योहान लाजारला भेटायला सायप्रसला जात असताना अचानक वादळ आल्यामुळे आश्रयासाठी एथोसवर थांबले. त्या पर्वताचे सौंदर्य पाहून मरियमने येशूला तो पर्वत मागितला. यास्तव, एथोसला “पवित्र कुमारिकेची बाग” असेही नाव पडले. नवव्या शतकाच्या सुमारास या खडकाळ पर्वताला पवित्र पर्वत असे संबोधले जाऊ लागले. सा.यु. १०४६ मध्ये सम्राट कॉन्स्टंटाईन नववे मोनॉमकस यांनी जारी केलेल्या आदेशाने पवित्र पर्वत या नावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली.
एथोस पर्वताची उबडखाबड जमीन आणि अलिप्त स्थळ हेच मुळात बैरागी जीवनासाठी उपयुक्त ठरते. कित्येक शतकांपासून ग्रीक, सर्बियन, रोमेनियन, बल्गेरियन, रशियन आणि ऑर्थोडॉक्स सांप्रदायातले इतर सर्व धार्मिक पुरुष या ठिकाणाने आकर्षित झाले आहेत; त्यांनी येथे पुष्कळ आश्रम, चर्चेस आणि वसाहती स्थापित केल्या. यातले सुमारे २० आश्रम आजही पाहायला मिळतात.
आजचा एथोस पर्वत
आज, एथोस पर्वत एक स्वयंशासित प्रदेश आहे; १९२६ साली त्याचे सनद मंजूर करण्यात आले. अनेक वर्षे मठवासियांची संख्या कमी होत गेली होती; पण आता पुन्हा ती २,००० हून जास्त झाली आहे.
प्रत्येक आश्रमाच्या मालकीचे मळे, देऊळ आणि वसाहत आहे. या मठवासियांचे सर्वात शेवटले आश्रम कॉरुल्या नावाच्या वस्तीत आहे; हे स्थळ एथोस पर्वताच्या अगदी टोकावरील कडांवर इतक्या उंचीवर आहे की खाली पाहून चक्कर येऊ लागते. इथल्या विखुरलेल्या झोपड्यांपर्यंत फक्त कठीण पायवाटा, दगडी पायऱ्या आणि साखळ्यांच्या साहाय्याने पोचता येते. एथोस पर्वतावरील मठवासी अजूनही प्राचीन बायझंटाईन घड्याळानुसार (सूर्यास्ताने दिवसाची सुरवात करून) व ज्युलियन दिनदर्शिकेनुसार (ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या १३ दिवस मागे) आपला प्राचीन उपासनेचा नित्यक्रम अनुसरतात.
हे धार्मिक स्थळ एका स्त्रीमुळे “पवित्र” बनले असे म्हटले जात असले तरीही गेल्या १,००० वर्षांपासून येथील मठवासी आणि बैरागी कोणत्याही प्रकारच्या मादीला (मानव असो अथवा प्राणी) त्याचप्रमाणे नपुंसक किंवा दाढी नसलेल्या मनुष्याला येथे येण्यास परवानगी देत नाहीत. अलीकडे, दाढी नसलेल्या पुरुषांच्या आणि मादा प्राण्यांच्या बाबतीत नियम जरा सैल झाले असले, तरीही एथोस किनारपट्टीच्या ५०० मीटरच्या प्रदेशात स्त्रियांना यायला अद्यापही मनाई आहे.
सर्वांकरता ‘पवित्र पर्वत’
मग देवाला भिऊन वागणाऱ्या ख्रिश्चनांसाठी एथोस हे ‘पवित्र पर्वत’ आहे का? तेथे जाऊन त्यांनी उपासना करण्याची गरज आहे का? गेरीझिम पर्वतावर देवाची उपासना करावी असा विश्वास करणाऱ्या एका शोमरोनी स्त्रीशी बोलताना येशूने हे स्पष्ट केले की, कोणतेही खरोखरचे पर्वत देवाची उपासना करण्याचे स्थळ राहणार नाही. “तुम्ही पित्याची उपासना [गेरीझिम] डोंगरावर व यरुशलेमेतहि करणार नाही अशी वेळ येत आहे,” असे येशू म्हणाला. का तो असे म्हणाला? “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (तिरपे वळण आमचे.)—योहान ४:२१, २४.
आपल्या काळाकडे निर्देश करत संदेष्ट्या यशयाने भाकीत केले होते की, “परमेश्वराच्या मंदिराचा [लाक्षणिक] डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात” येणार होता आणि “सर्व डोंगरांहून तो उंच” होणार होता आणि सर्व राष्ट्रांतील लोक त्याकडे लोटणार होते.—यशया २:२, ३.
देवाला संतुष्ट करील असा त्याच्यासोबत नातेसंबंध ठेवण्याची इच्छा असलेल्या पुरुषांना आणि स्त्रियांनासुद्धा यहोवाची “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करायला आमंत्रण दिले गेले आहे. जगभरात लाखो लोकांना ‘यहोवाच्या डोंगराकडे’ जाणारी वाट मिळाली आहे. त्यांनाही एका ग्रीक वकिलाप्रमाणेच वाटते; त्या वकिलाने एथोसविषयी असे म्हटले होते की: “आध्यात्मिकता चार भिंतींच्या आतच किंवा मठांमध्येच आढळते याची मला शंका आहे.”—पडताळा प्रेषितांची कृत्ये १७:२४.
[३१ पानांवरील चौकट]
काळाच्या ओघात गुडुप झालेला खजिना
गेल्या अनेक शतकांमध्ये एथोस येथील मठवासियांनी एक मौल्यवान साठा केला आहे; त्यामध्ये अंदाजे १५,००० हस्तलिखिते आहेत. त्यातली काही तर अगदी चवथ्या शतकातली असल्यामुळे हा जगातला सर्वात जुना खजिना आहे. त्यामध्ये गुंडाळ्या आहेत, संपूर्ण खंड आणि शुभवर्तमानांची, स्तोत्रांची व स्तुतिस्तोत्रांची काही पाने आहेत; याशिवाय, फार जुन्या चित्रकला, मूर्ती, पुतळे आणि धातूच्या वस्तू आहेत. असा अंदाज केला जातो की, जगातल्या ग्रीक हस्तलिखितांपैकी एक चतुर्थांश हस्तलिखिते एथोस पर्वताकडे आहेत; तथापि त्यांच्यातल्या अनेक हस्तलिखितांची योग्य पद्धतीने अद्याप नोंद झालेली नाही. १९९७ साली, पहिल्यांदाच मठवासियांनी आपल्या या संग्रहापैकी काही वस्तूंचे थेसलनिकी येथे प्रदर्शन केले होते.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Telis/Greek National Tourist Organization