वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१५ पृ. २९-३१
  • तीमथ्य—“विश्‍वासू पुत्र”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तीमथ्य—“विश्‍वासू पुत्र”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौलाने निवडलेला
  • तीमथ्याने राज्य आस्थांना बढावा दिला
  • तीमथ्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर प्रकाश
  • देवाची सेवा करण्याकरता पुढे या!
  • सेवा करण्यास तयार असलेला—तीमथ्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • पौल आणि तीमथ्य
    बायबलमधून शिकू या!
  • तीमथ्याला लोकांना मदत करायची इच्छा होती
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • सत्याचे वचन नीट सांगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१५ पृ. २९-३१

तीमथ्य—“विश्‍वासू पुत्र”

ख्रिस्ती प्रेषित पौलाने तीमथ्याला प्रवासी सोबती म्हणून निवडले तेव्हा तो तसा लहानच होता. त्यानंतर त्या दोघांनी सुमारे पंधरा वर्षे सोबत काम केले. त्या दोघांचा संबंध इतका वाढला की, पौल तीमथ्याविषयी असे म्हणू शकला: “माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्‍वासू पुत्र.” आणि “विश्‍वासातील माझे खरे लेकरू.”—१ करिंथकर ४:१७; १ तीमथ्य १:१.

तीमथ्याच्या व्यक्‍तिमत्त्वामध्ये अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तो पौलाचा इतका प्रिय झाला? तीमथ्याचे सहकार्य इतके मोलाचे कसे ठरले? तीमथ्याच्या कार्याविषयीच्या प्रेरित अहवालावरून आपल्याला कोणता चांगला धडा शिकता येईल?

पौलाने निवडलेला

सुमारे सा.यु. ५० मध्ये पौलाने लुस्त्रला (आधुनिक दिवसांतील टर्कीला) दुसऱ्‍यांदा मिशनरी भेट दिली तेव्हा तीमथ्य नावाचा एक तरुण शिष्य त्याला तेथे आढळला. त्यावेळी तीमथ्य कदाचित एकोणीसवीस वर्षांचा असावा; लुस्त्रांतल्या आणि इकुन्यातल्या ख्रिस्ती बांधवांत तो नावाजलेला होता. (प्रेषितांची कृत्ये १६:१-३) “देवाचा आदर करणारा” असा त्याच्या नावाचा अर्थ होतो आणि तो त्याच्या नावानुरूप जगला. तीमथ्याला लहानपणापासून त्याची आजी लोईस आणि आई युनीके यांच्यापासून पवित्र शास्त्रवचनाचे धडे मिळाले होते. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) एकदोन वर्षांआधी पौलाने त्यांच्या शहराला पहिल्यांदा भेट दिली होती तेव्हा कदाचित त्यांनी ख्रिस्ती विश्‍वासाचा अंगीकार केला असावा. पण आता पवित्र आत्म्याद्वारे एका संदेशात हे स्पष्ट झाले, की तीमथ्याचे भवितव्य काय असणार होते. (१ तीमथ्य १:१८) त्या मार्गदर्शनानुसार पौलाने आणि मंडळीतील वडीलवर्गाने त्यांचे हात या तरुण तीमथ्यावर ठेवले आणि अशाप्रकारे त्याला खास सेवेकरता वाहिले; पुढे प्रेषित पौलाने तीमथ्याला त्याचा मिशनरी सोबती म्हणून निवडले.—१ तीमथ्य ४:१४; २ तीमथ्य १:६.

तीमथ्याचे वडील ग्रीक असून ख्रिस्ती विश्‍वासात नव्हते त्यामुळे त्याची सुंता झाली नव्हती. अर्थात, सुंता करण्याचा नियम ख्रिश्‍चनांवर बंधनकारक नव्हताच. पण, तीमथ्य आणि पौल ज्या यहुद्यांना भेट देणार होते त्यांना अडखळण होऊ नये म्हणून तीमथ्याने ही वेदनादायक क्रिया करवून घेतली.—प्रेषितांची कृत्ये १६:३.

तीमथ्याला आधी यहुदी असे मानण्यात आले होते का? काही विद्वानांचे असे म्हणणे आहे, की रब्बी अधिकाऱ्‍यांच्या सांगण्यानुसार, “यहुदी व गैर-यहुदी यांत विवाह झाल्यास मुलांचा धर्म हा वडिलांच्या नव्हे तर आईच्या धर्मावरून ठरवला जायचा.” म्हणजेच, “यहुदी स्त्रीची मुले यहुदी होती.” पण लेखक शेय कोहन असे प्रश्‍न उभे करतात, की “सा.यु. पहिल्या शतकात व्यक्‍तिगत रब्बी नियमाचे अस्तित्व होते का?” आणि आशिया मायनरमध्ये त्या नियमाचे पालन करण्यात यायचे का? ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून त्यांनी असा निष्कर्ष काढला, की विदेशी पुरुषाने इस्राएल स्त्रीशी विवाह केल्यानंतर “ते कुटुंब इस्राएल देशात राहत असेल तरच त्या कुटुंबातील मुलांना इस्राएली मानण्यात येई. आईच्या देशात राहात असल्यास, मुलांना आईच्या धर्माचे मानले जायचे. इस्राएली स्त्रीने तिच्या विदेशी पतीसोबत राहण्याकरता तिचा देश सोडल्यानंतर तिच्या मुलांना विदेशी म्हणूनच ओळखले जायचे.” तेव्हा, तीमथ्याला यहुदी समजले जायचे की नाही हे निश्‍चित सांगता येत नाही, पण एवढे मात्र म्हणता येईल की तीमथ्याची आई यहुदी आणि वडील हेल्लेणी असल्यामुळे प्रचार कार्यात त्याला निश्‍चितच याचा फायदाच झाला असेल. कारण यामुळे त्याला यहुदी आणि विदेशी या दोन्ही प्रकारच्या लोकांशी सुसंवाद साधणे सोपे गेले असेल; कदाचित त्यांचे आपसांतील मतभेद दूर करणेही त्याला शक्य झाले असेल.

पौलाने लुस्त्रला भेट दिल्यानंतर तीमथ्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याची तयारी आणि ख्रिस्ती वडिलांना नम्रपणे सहकार्य देण्याच्या प्रवृत्तीमुळे लहान वयातच तीमथ्याला अनेक आशीर्वाद आणि सेवेचे अनेक विशेषाधिकार मिळाले. त्यावेळी तीमथ्याला याची कदाचित कल्पनाही नसेल, की पौलाच्या मार्गदर्शनाखाली पुढे आपल्याला ख्रिस्ती मंडळीची अनेक महत्त्वाची कामे नियुक्‍त करण्यात येतील आणि ती पार पाडण्यासाठी आपल्याला घरापासून दूर, अगदी रोमी साम्राज्याच्या राजधानी, रोमपर्यंतही जावे लागेल.

तीमथ्याने राज्य आस्थांना बढावा दिला

तीमथ्याच्या कार्याचा आपल्याला फक्‍त इत्यंभूत अहवाल माहीत आहे, पण राज्य आस्थांना बढावा देण्यासाठी त्याने खूप लांबपर्यंत प्रवास केला. सा.यु. ५० मध्ये तीमथ्य पौल आणि सीला यांच्यासोबत पहिल्यांदा आशिया मायनर आणि युरोपमध्ये गेला. त्याठिकाणी फिलिप्पै, थेस्सलनीका आणि बिरुया या शहरांतील प्रचार मोहिमेत तीमथ्य सहभागी झाला. तेथे खूप विरोध आल्यामुळे पौलाला अथेनला जावे लागले; पण तीमथ्य आणि सीला स्थापन झालेल्या शिष्यांच्या गटाची काळजी घेण्यासाठी बिरुयामध्येच राहिले. (प्रेषितांची कृत्ये १६:६–१७:१४) त्यानंतर, पौलाने तीमथ्याला थेस्सलनीकामधील नवीन मंडळीला मजबूत करण्यासाठी पाठवले. तीमथ्य पौलाला करिंथमध्ये भेटला तेव्हा त्याने त्या मंडळीच्या प्रगतीचा आनंददायक अहवाल पौलाला दिला.—प्रेषितांची कृत्ये १८:५; १ थेस्सलनीकाकर ३:१-७.

तीमथ्य करिंथकरांसोबत किती दिवस राहिला याविषयी शास्त्रवचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. (२ करिंथकर १:१९) पण कदाचित सा.यु. ५५ च्या सुमारास पौलाने त्याला पुन्हा एकदा करिंथला पाठवण्याचा विचार केला कारण करिंथकरांविषयी अस्वस्थ करणाऱ्‍या बातम्या पौलाच्या कानावर आल्या होत्या. (१ करिंथकर ४:१७; १६:१०) त्यानंतर एरास्तसोबत तीमथ्याला इफिसपासून मासेदोनियाला पाठवण्यात आले. आणि करिंथमधून पौलाने रोमकरांना लिहिले तेव्हा पुन्हा एकवार तीमथ्य त्याच्यासोबत होता.—प्रेषितांची कृत्ये १९:२२; रोमकर १६:२१.

पौल यरुशलेमला जायला निघाला तेव्हा त्याच्यासोबत तीमथ्य आणि इतरजणही करिंथमधून निघाले; त्यांनी किमान त्रोवसपर्यंत पौलाला सोबत दिली. त्यानंतर तीमथ्य पुढे यरुशलेमला गेला किंवा नाही याविषयी काही माहिती नाही. पण सा.यु ६०-६१ च्या सुमारास रोमच्या तुरुंगातून पौलाने लिहिलेल्या तिन्ही पत्रांच्या सुरवातीला तीमथ्याच्या नावाचा उल्लेख आढळतो.a (प्रेषितांची कृत्ये २०:४; फिलिप्पैकर १:१; कलस्सैकर १:१; फिलमोन १) तीमथ्याला रोमपासून फिलिप्पैला पाठवण्याची योजना पौल करत होता. (फिलिप्पैकर २:१९) आणि पौलाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रेषित पौलाच्या मार्गदर्शनानुसार तीमथ्य इफिसमध्येच राहिला.—१ तीमथ्य १:३.

पहिल्या शतकातील प्रवास इतका सोपा, सोईस्कर नव्हता, तरी मंडळ्यांकरता अनेकदा प्रवास करण्याची तीमथ्याने दाखवलेली स्वेच्छा खरोखरच प्रशंसास्पद होती. (पाहा टेहळणी बुरूज, ऑगस्ट १५, १९९६, पृष्ठ २९, पेटी.) त्याच्या एका प्रवासाविषयीच्या पुढील माहितीवर विचार करा आणि ही माहिती तीमथ्याविषयी काय सांगते ते पहा.

तीमथ्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर प्रकाश

रोममधील तुरुंगात असताना प्रेषित पौलाने फिलिप्पैमध्ये छळ सोसणाऱ्‍या लोकांना लिहिले त्यावेळी तीमथ्य देखील त्याच्यासोबत होता; पौलाने त्यांना असे लिहिले: “तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाहि धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभु येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबीसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही; कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.”—फिलिप्पैकर १:१, १३, २८-३०; २:१९-२२.

वरील शब्दांवरून तीमथ्याला आपल्या बांधवांविषयी वाटणारी कळकळ दिसून आली. बोटीने न गेल्यास रोमपासून फिलिप्पैला जाण्याकरता ४० दिवस पायी चालावे लागत असे आणि या प्रवासात एड्रियाटीक समुद्राचा देखील लहानसा भाग पार करावा लागत असे आणि त्यानंतर पुन्हा रोमला येण्यासाठी आणखी ४० दिवस लागत. आपल्या बंधुभगिनींच्या सेवेकरता तीमथ्य हे सर्व करायला तयार होता.

तीमथ्याने बराच प्रवास केला हे खरे आहे, पण काहीवेळा तीमथ्याची शारीरिक प्रकृती चांगली नसायची. त्याला पोटाचा कसलासा त्रास होता आणि तो “वारंवार” आजारी पडायचा. (१ तीमथ्य ५:२३) तरीसुद्धा सुवार्तेकरता त्याने खूप श्रम केले. त्यामुळेच पौलाचा त्याच्याशी एक अतुट संबंध तयार झाला!

प्रेषित पौलाच्या हाताखाली काम करता करता आणि त्याच्यासोबत बऱ्‍याच वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड देता देता, त्याचे बरेच गुण तीमथ्याच्या व्यक्‍तिमत्त्वात उतरले. त्यामुळे पौल तीमथ्याविषयी असे म्हणू शकला: “तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्‍वास, सहनशीलता, प्रीति, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस; मला अंत्युखियात, इकुन्यात, लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस.” तीमथ्याने पौलाला सुखदुःखात साथ दिली, तो त्याच्या प्रार्थनेत होता आणि राज्य आस्थांना बढावा देण्यासाठी त्याने त्याच्यासोबत अथक परिश्रम केले.—२ तीमथ्य १:३, ४; ३:१०, ११.

पौलाने तीमथ्याला असे उत्तेजन दिले, की ‘त्याच्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये.’ यावरून हे दिसून येते, की तीमथ्य काहीसा बुजरा होता; अधिकार गाजवण्यात काकू करणारा होता. (१ तीमथ्य ४:१२; १ करिंथकर १६:१०, ११) अर्थात, एकट्याने देवाची सेवा करण्याचे त्याला भय वाटत नव्हते आणि पौल देखील त्याला जबाबदारीच्या कामांकरता मोठ्या विश्‍वासाने पाठवू शकत होता. (१ थेस्सलनीकाकर ३:१, २) इफिसमध्ये कडक ईश्‍वरशासित देखरेखीची आवश्‍यकता आहे, असे पौलाला वाटले तेव्हा त्याने तीमथ्याला असे आर्जवले, की त्याने तिथेच राहावे आणि ‘कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, त्यांनी अन्य शिक्षण देऊ नये.’ (१ तीमथ्य १:३) तीमथ्यावर इतक्या सर्व जबाबदाऱ्‍या सोपवल्या होत्या तरी तो विनयशील होता. आणि स्वभावाने बुजरा असला तरी देखील त्याच्यामध्ये धैर्य होते. उदाहरणार्थ, रोममध्ये पौलाची त्याच्या विश्‍वासाकरता परीक्षा होत होती तेव्हा तीमथ्य तेथे गेला. खरे तर, तीमथ्याला देखील काही काळापर्यंत तुरुंगात डांबण्यात आले; कदाचित त्याच कारणास्तव.—इब्री लोकांस १३:२३.

तीमथ्य पौलाकडून पुष्कळ काही शिकला. प्रेषित पौलाचेही आपल्या या सहकाऱ्‍याबद्दल किती चांगले मत होते हे या गोष्टीवरून दिसून येते की त्याने देवाच्या प्रेरणेने त्याला दोन पत्रे लिहिली जी आज ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत समाविष्ट करण्यात आली आहेत. सुमारे सा.यु. ६५ मध्ये आपला आता लवकरच मृत्यू होणार आहे, असे पौलाला जाणवले तेव्हा त्याने पुन्हा एकदा तीमथ्याला बोलावून घेतले. (२ तीमथ्य ४:६, ९) प्रेषित पौलाला मृत्यूदंड देण्यात आला त्यापूर्वी तीमथ्याला त्याची भेट घेता आली किंवा नाही याविषयी शास्त्रवचनांत सांगण्यात आलेले नाही.

देवाची सेवा करण्याकरता पुढे या!

तीमथ्याच्या उत्तम उदाहरणावरून पुष्कळकाही शिकण्यासारखे आहे. पौलाचा सहवास लाभल्यामुळे त्याला खूप फायदा झाला; अर्थात एका बुजऱ्‍या मुलाचे पर्यवेक्षकात रुपांतर झाले. अशाचप्रकारच्या सहवासाद्वारे आजचे ख्रिस्ती तरुण मुलेमुली पुष्कळ काही प्राप्त करू शकतात. आणि त्यांनी यहोवाच्या सेवेला त्यांचे जीवनध्येय बनवले, तर पुष्कळ काही त्यांना करता येईल. (१ करिंथकर १५:५८) त्यांना त्यांच्या स्थानिक मंडळीमध्ये पायनियर म्हणजे, पूर्ण वेळेचे सेवक होता येईल अथवा राज्यप्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तेथे त्यांना सेवा करता येईल. दुसऱ्‍या देशात जाऊन तेथे मिशनरी कार्य करण्याची संधी देखील त्यांच्यासमोर आहे किंवा वॉच टावर संस्थेच्या जागतिक मुख्यालयात किंवा एखाद्या शाखेत तुम्हाला सेवा करता येईल. आणि अर्थात, पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याद्वारे तीमथ्याने जो आत्मा प्रकट केला तो तर सर्व ख्रिश्‍चनांना दाखवता येण्यासारखा आहे.

आध्यात्मिकरित्या प्रगती करत राहण्याची, यहोवाच्या संघटनेत त्याने दिले ते काम करण्याची तुमची इच्छा आहे का? तर मग तीमथ्याप्रमाणे करा. देवाची सेवा करण्याकरता पुढे या. कोण जाणे, कदाचित तुमच्यावरही भविष्यात एखादी खास सेवा सोपवण्यात येईल.

[तळटीपा]

a तीमथ्याचा उल्लेख पौलाच्या आणखी चार पत्रांमध्येही आढळतो—रोमकर १६:२१; २ करिंथकर १:१; १ थेस्सलनीकाकर १:१; २ थेस्सलनीकाकर १:१.

[३१ पानांवरील चित्र]

“असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा