“यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं”
ऑक्टोबर १५, १९९८ च्या अंकातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाचा उल्लेख करणारा लेख वाचल्यानंतर पोलंडमधील एका तुरुंग अधिकाऱ्याने असे म्हटले. “दगडास पाझर फुटतो तेव्हा,” नावाच्या या लेखामध्ये पोलंड देशातील वोवुफ शहरातील तुरुंगातील कैद्यांसोबत काम करताना यहोवाच्या साक्षीदारांना मिळालेल्या यशाचे वर्णन करण्यात आले होते.
वर उल्लेख केलेल्या टेहळणी बुरूज नियतकालिकाची प्रत प्रसिद्ध करण्यापूर्वी, वोवुफ तुरुंगामध्ये सप्टेंबर १३, १९९८ रोजी कैद्यांकरता एक खास सभा घेण्यात आली. या सभेकरता स्थानिक साक्षीदार, तुरुंगातील बाप्तिस्माप्राप्त आणि आस्थेवाईक कैदी तसेच काही तुरुंग अधिकारी देखील आले होते. यांपैकी काही लोकांनी आपली मते पुढील शब्दांत मांडली.
तुरुंगामध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी बाप्तिस्मा घेतलेले येरझी यांनी असे म्हटले: “आम्हाला मदत करण्याकरता आसपासच्या मंडळ्यातील बंधुभगिनींनी केलेल्या प्रयत्नांविषयी वाचायला मिळाल्यानंतर आनंद झाल्याशिवाय राहत नाही.” त्यांनी पुढे असे म्हटले: “मी स्वतःला सुधारण्याचा खूप प्रयत्न करतोय आणि यहोवाला माझ्या व्यक्तिमत्त्वाला कशाप्रकारे हळूहळू आकार देतोय, हेही मला प्रत्यक्ष पाहता येतंय.”
झेशवॉफ नावाच्या दुसऱ्या एका कैद्याने तुरुंगात चालणाऱ्या प्रचारकार्याविषयी असे म्हटले: “सध्या चौघे जण बाप्तिस्म्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि नवनवीन आस्थेवाईक जण देखील सभागृहात नेहमी येत असतात. या लेखामुळे भविष्यात आणखी जोमाने काम करायला उत्तेजन मिळेल.” झेशवॉफ यांची ही किती सकारात्मक मनोवृत्ती, त्यांना अजून १९ वर्षं तुरुंगात काढायची आहेत!
वोवुफ शहरातील तुरुंगावर प्रकाशित झालेला लेख वाचल्यानंतर एका तुरुंग अधिकाऱ्याने असे म्हटले: “हा आमच्याकरता फार मोठा बहुमान आहे. या तुरुंगाला संपूर्ण जगभरात १३० भाषेत एवढी चांगली प्रसिद्धी मिळेल असा विचार माझ्या मनात चुकून देखील आला नव्हता. मला तुमचे लोक आवडतात आणि तुरुंगातील कैद्यांच्या संदर्भाने तुम्ही करत असलेल्या कामाची मी वाखाणणी करतो.” आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं. धर्मांध लोक असं मी पूर्वी तुम्हाला समजायचो. पण आता मला समजलंय, की तुम्ही तत्त्वनिष्ठ लोक आहात.”
वोवुफ तुरुंगाचे मुख्य अधिकारी मॉरेक गायॉस यांनी अगदी आनंदाने असे म्हटले: “तुमच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल याविषयी मी सुरवातीला साशंक होतो. बायबलच्या आधारावर तुरुंगातील कैद्यांचं पुनर्वसन करण्याची इच्छा बाळगणाऱ्या इतर धर्मांप्रमाणे तुम्हीही आहात असं मला वाटलं होतं. पण तुमच्या सुरवातीच्या कार्याचा परिणाम पाहिल्यावर तुम्हाला हातभार लावण्याचं आम्ही ठरवलं. तुम्ही मागील नऊ वर्षांपासून येथे अथकपणे येत आहात आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाची स्तुती करावी तितकी कमीच आहे.”
वोवुफ तुरुंगातील बाकीच्या कैद्यांना प्रकाशित झालेला लेख कसा वाटला? या लेखामुळे तुरुंगातील बाकीच्या कैद्यांच्या मनात इतकी उत्सुकता निर्माण झाली, की साक्षीदारांजवळ असलेल्या या अंकाच्या सर्व प्रती संपल्या. तुरुंगातील बाकीच्या अधिकाऱ्यांनी देखील आस्था दाखवली आणि त्यांनी स्वतःकरता जादा ४० प्रती मागवल्या. ही जादा प्रतींची मागणी पुरवण्यासाठी स्थानिक मंडळ्या पुढे आल्या आणि त्यांनी तुरुंगातील बांधवांना नियतकालिकाच्या जादा १०० प्रती पुरवल्या. त्याचवेळी, तुरुंगात चालणाऱ्या सभांच्या उपस्थितीमध्ये देखील वाढ झाली.
यहोवाच्या साक्षीदारांना सहकार्य देणारे पायॉट हॉड्युअन यांनी असे म्हटले: “तुरुंगातील प्रत्येक सूचना फलकावर या लेखाची प्रत लावण्याचं आम्ही ठरवलं. आमची हीच इच्छा आहे, की तुरुंगातील ज्या कैद्यांनी अद्याप तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास केला नाही त्यांनीही हे नियतकालिक वाचावं.”
साक्षीदारांच्या उत्तम उदाहरणामुळे आणि अथकपणे प्रचार करण्याच्या त्यांच्या निर्धारामुळे खूप चांगले परिणाम अजूनही होत आहेत. तुरुंगातील १५ जणांनी बाप्तिस्मा घेण्यापर्यंत प्रगती केली आहे, दोघा तुरुंग अधिकाऱ्यांनी यहोवाला त्यांच्या जीवनाचे समर्पण केले आहे आणि दुसऱ्या एका तुरुंग अधिकाऱ्याने बायबल अभ्यासाची विनंती केली आहे. पण वोवुफ तुरुंगामध्ये प्रचार करणारे सर्व बांधव त्यांना मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय यहोवा देवाला देतात.—पडताळा १ करिंथकर ३:६, ७.
[२८ पानांवरील चित्र]
तीन साक्षीदार आणि एक कैदी तुरुंगाच्या सभागृहात मासिकाच्या प्रसिद्धी समारंभप्रसंगी