वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१५ पृ. १६-२१
  • आपल्याकडून यहोवा अवास्तव अपेक्षा करतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्याकडून यहोवा अवास्तव अपेक्षा करतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गतकाळातील यहोवाची अपेक्षा
  • इस्राएलकरता यहोवाचे नियमशास्त्र
  • यहोवाचे नियमशास्त्र कठीण होते का?
  • यहोवाला खरोखर काय हवे आहे?
  • अवास्तव नाही
  • योद्धा आणि एक लहान मुलगी
    बायबलमधून शिकू या!
  • तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तिची मदत करायची इच्छा होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • धाडसाने बोलणारी एक लहान मुलगी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१५ पृ. १६-२१

आपल्याकडून यहोवा अवास्तव अपेक्षा करतो का?

“नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

१. काही लोक यहोवाची सेवा का करत नाहीत?

यहोवा आपल्या लोकांकडून निश्‍चितच काही अपेक्षा करतो. पण मीखाच्या भविष्यवाणीतील वरील शब्दांवरून तुम्हाला कळून आलेच असेल की देवाच्या अपेक्षा अवास्तव नाहीत. असे असूनही, अनेक लोक महान निर्माणकर्त्या देवाची सेवा करत नाहीत आणि असेही काही लोक आहेत जे आधी त्याची सेवा करायचे पण आता त्यांनी त्याची सेवा करण्याचे सोडून दिले आहे. का? कारण त्यांना असे वाटते, की देव आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करतो. यात काही तथ्य आहे का? की यहोवाच्या अपेक्षांकडे पाहण्याचा एखाद्या व्यक्‍तीचा दृष्टिकोनच चुकीचा आहे? एका खास ऐतिहासिक अहवालाकडे थोडे बारकाईने पाहिल्याने या विषयाची आणखी माहिती मिळेल.

२. नामान कोण होता आणि यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला काय करण्यास सांगितले?

२ अरामचा सेनापती नामान याला कोड झाला होता; आणि बरे होण्याकरता इस्राएलमधील यहोवाच्या संदेष्ट्याला भेटण्याचा सल्ला त्याला देण्यात आला. म्हणून नामान आणि त्याचा सेवक इस्राएलला निघाले आणि शेवटी देवाचा संदेष्टा अलीशा याच्या घरासमोर येऊन पोहंचले. या बड्या आसामीला भेटण्यासाठी घराबाहेर येण्याऐवजी अलीशाने आपल्या सेवकाद्वारे नामानाला असा निरोप धाडला: “यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.”—२ राजे ५:१०.

३. यहोवाचे ऐकण्यास नामान सुरवातीला का तयार झाला नाही?

३ देवाच्या संदेष्ट्याचे नामानाने ऐकले असते तर त्याचा हा किळसवाणा रोग लगेच बरा झाला असता. मग यहोवा नामानाकडून अवास्तव अपेक्षा करत होता असे म्हणता येईल का? नाही. तरीसुद्धा यहोवाने सांगितल्याप्रमाणे करायची नामानाची मुळीच इच्छा नव्हती. “दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्‍या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांत स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय?” असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन तेथून निघून गेला.—२ राजे ५:१२.

४, ५. (अ) नामानाच्या आज्ञाधारकतेचे त्याला काय प्रतिफळ मिळाले आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? (ब) आता आपण कोणत्या गोष्टींचा विचार करणार आहोत?

४ नामानाने देवाने सांगितल्याप्रमाणे का केले नाही? त्याला सांगितलेली गोष्ट फारच कठीण होती अशातला भाग नाही. त्याच्या सेवकांनीही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, की “संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?” (२ राजे ५:१३) खरे तर नामानाची मनोवृत्तीच चुकीची होती. आपल्यासारख्या सेनापतीचा मानसन्मान करायचे सोडून, यार्देनेत सात वेळा स्नान करण्यास सांगणे म्हणजे आपला धडधडीत अपमान आहे अशी त्याची समजूत झाली होती. पण सेवकांनी समजूत घातल्यावर नामानाने त्यांचा सल्ला ऐकला आणि यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबक्या मारल्या. ‘त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन शुद्ध झाले’ तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. देवाचे कसे उपकार मानावेत हेच त्याला कळेना. त्याने मनाशी निर्धार केला, की येथून पुढे तो यहोवाशिवाय इतर कोणत्याही देवाची उपासना करणार नाही.—२ राजे ५:१४-१७.

५ संपूर्ण मानव इतिहासात बऱ्‍याच प्रसंगी यहोवाने लोकांना वेगवेगळे कायदेकानून देऊन त्यांचे पालन करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली. त्यांपैकी काहींचा विचार करण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. देवाने आपल्या विशिष्ट सेवकांकडून केलेल्या या अपेक्षा विचारात घेत असताना स्वतःला विचारा, की हीच अपेक्षा जर यहोवाने माझ्याकडून केली असती, किंवा हेच काम जर मला दिले असते, तर मी काय केले असते. त्यानंतर आपण हे पाहू, की यहोवा आज आपल्याकडून कोणत्या गोष्टींची मागणी करतो.

गतकाळातील यहोवाची अपेक्षा

६. पहिल्या मानवी दांपत्याला कोणती कामे देण्यात आली होती आणि तीच जर तुम्हाला देण्यात आली असती तर तुम्ही काय केले असते?

६ आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी दांपत्याला यहोवाने मुलांचे संगोपन करण्याचे, पृथ्वीवर सत्ता चालवण्याचे आणि प्राणिजीवनावर अधिकार गाजवण्याचे काम दिले होते. देवाने त्या दोघांना राहण्यासाठी एक सुंदर विस्तीर्ण बगीचा देखील दिला होता. (उत्पत्ति १:२७, २८; २:९-१५) पण याचा अर्थ त्यांच्यावर कोणतेच बंधन नव्हते असे नाही. एदेन बागेतील एका झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने पहिल्या मानवी दांपत्याला सांगितले होते; पण त्या बागेत हे एकच झाड होते असे नाही, तेथे अनेक फळांची झाडे होती. (उत्पत्ति २:१६, १७) तेव्हा, देवाने त्यांच्याकडून केलेली अपेक्षा अवास्तव होती असे खरच म्हणता येईल का? सदासर्वकाळच्या आणि पूर्णपणे निरोगी जीवनाचे अभिवचन देऊन देवाने हेच काम जर तुम्हाला दिले असते, तर ते पूर्ण करण्यात तुम्हाला आनंदच वाटला नसता का? या बागेत येऊन सैतानाने तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता, तरी तुम्ही त्याचा युक्‍तिवाद खोडून काढला नसता का? शिवाय, एखादे साधे बंधन घालण्याचा यहोवाला पूर्ण अधिकार आहे हे तुम्ही मान्य केले नसते का?—उत्पत्ति ३:१-५.

७. (अ) नोहाला कोणते काम सांगण्यात आले होते आणि त्याला कशाप्रकारे विरोधाला तोंड द्यावे लागले? (ब) यहोवाने नोहाला सांगितलेल्या कामाविषयी तुम्हाला काय वाटते?

७ त्यानंतर, जगव्याप्त जलप्रलयातून वाचण्याकरता यहोवाने नोहाला एक तारू बांधण्यासाठी सांगितले. ते प्रचंड तारू बांधण्याचे काम तर साधेसुधे नव्हतेच, शिवाय लोकांनी नोहाला वेड्यात काढले असेल आणि त्याच्या कार्याला बराच विरोध देखील केला असेल. तरीसुद्धा, नोहाद्वारे त्याच्या सर्व कुटुंबीयांचा तसेच असंख्य प्राणीमात्रांचा जीव वाचला हा त्याच्याकरता किती मोठा बहुमान होता! (उत्पत्ति ६:१-८, १४-१६; इब्री लोकांस ११:७; २ पेत्र २:५) अशाप्रकारचे काम तुम्हाला दिले असते तर ते तुम्ही मनापासून पूर्ण केले असते का? की यहोवा आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहे असा तुम्ही विचार केला असता?

८. अब्राहामाला काय करण्यास सांगण्यात आले होते आणि या घटनेने काय दाखवून दिले?

८ देवाने अब्राहामाला खूप अवघड काम सांगितले होते; देव त्याला म्हणाला: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” (उत्पत्ति २२:२) यहोवाने आधीच असे अभिवचन दिले होते की इसहाकाला पुढे संतान होईल; पण अजून इसहाकाला मूल झालेले नव्हते. त्यामुळे इसहाक मरण पावला तरीसुद्धा यहोवा त्याला पुन्हा जिवंत करू शकतो या गोष्टीवर अब्राहामाचा कितपत विश्‍वास आहे, याची ही परीक्षा होती. अब्राहाम, इसहाकाचा वध करणारच होता तोच देवाने त्याला रोखले. देवही आपल्या प्रिय पुत्राचे मानवजातीकरता बलिदान देऊन नंतर त्याचे पुनरुत्थान करील हे या घटनेने दाखवून दिले.—उत्पत्ति १७:१९; २२:९-१८; योहान ३:१६; प्रेषितांची कृत्ये २:२३, २४, २९-३२; इब्री लोकांस ११:१७-१९.

९. यहोवाने अब्राहामाकडून अवास्तव अपेक्षा केली नव्हती असे का म्हणता येईल?

९ काहींना कदाचित असे वाटेल, की यहोवा देव अब्राहामाकडून अवास्तव अपेक्षा करत होता. पण खरोखरच असे म्हणता येईल का? ज्याने आपल्याला जीवन दिले आहे आणि जो मृत्यूनंतरही आपले पुनरुत्थान करू शकतो, तो देव आपल्याला मरण आले तरीसुद्धा आज्ञाधारक राहण्याची अपेक्षा करतो, यावरून त्याचे आपल्यावर प्रेम नाही असे म्हणणे बरोबर आहे का? येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या आरंभीच्या अनुयायांनी अशी मनोवृत्ती बाळगली नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याकरता शारीरिक छळाला इतकेच काय तर मृत्यूला देखील सामोरे जाण्यास ते तयार होते. (योहान १०:११, १७, १८; प्रेषितांची कृत्ये ५:४०-४२; २१:१३) तुमच्यावरही अशी वेळ आल्यास तुम्ही त्यांच्याप्रमाणे करण्यास तयार असाल का? आता, जे लोक स्वतःहून देवाचे खास लोक बनायला तयार झाले होते त्या लोकांकडून देवाच्या काय अपेक्षा होत्या हे आपण विचारात घेऊ.

इस्राएलकरता यहोवाचे नियमशास्त्र

१०. यहोवाच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू असा कोणी शब्द दिला आणि देवाने त्यांना काय दिले?

१० अब्राहामाच्या वंशाचे पुढे त्याचा पुत्र इसहाक आणि नातू याकोब किंवा इस्राएल यांच्याद्वारे इस्राएलचे राष्ट्र बनले. यहोवाने इस्राएल लोकांची इजिप्तच्या दास्यत्वातून सुटका केली. (उत्पत्ति ३२:२८; ४६:१-३; २ शमुवेल ७:२३, २४) त्यानंतर त्यांनी लगेच असा शब्द दिला, की देव जे काही सांगेल त्याप्रमाणेच ते वागतील. त्यांनी म्हटले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्गम १९:८) यहोवाच्या सांगण्याप्रमाणे वागण्याच्या इस्राएली लोकांनी व्यक्‍त केलेल्या इच्छेनुरूप देवाने त्या राष्ट्राला दहा आज्ञांसह ६०० हून अधिक नियम दिले. मोशेद्वारे देण्यात आलेल्या देवाच्या या नियमांना कालांतराने नियमशास्त्र असे म्हणण्यात येऊ लागले.—एज्रा ७:६; लूक १०:२५-२७; योहान १:१७.

११. नियमशास्त्राचा एक उद्देश काय होता आणि कोणत्या काही नियमांमुळे हा उद्देश साध्य झाला?

११ इस्राएली लोकांना हे नियमशास्त्र देण्यामागचा एक उद्देश असा होता की लैंगिक नैतिकता, व्यापार, मुलांचे संगोपन यांसारख्या विषयांवर त्यांना हितकारक ठरतील अशा नियमांद्वारे त्यांचे संरक्षण व्हावे. (निर्गम २०:१४; लेवीय १८:६-१८, २२-२४; १९:३५, ३६; अनुवाद ६:६-९) एकमेकांशी कसे वागावे, प्राण्यांविषयी कोणता दृष्टिकोन बाळगावा यांविषयी देखील नियम देण्यात आले होते. (लेवीय १९:१८; अनुवाद २२:४, १०) वार्षिक सणांविषयी आणि उपासनेकरता एकत्र येण्यांविषयी देण्यात आलेल्या नियमांमुळे या राष्ट्रातील लोकांचे आध्यात्मिक दृष्ट्या संरक्षण झाले.—लेवीय २३:१-४३; अनुवाद ३१:१०-१३.

१२. नियमशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता होता?

१२ या नियमशास्त्राच्या एका प्रमुख उद्देशाविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “ज्या संतानाला वचन दिले ते [ख्रिस्त] येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे [“पातके उघड करण्याकरता,” NW] लावून देण्यात आले.” (गलतीकर ३:१९) नियमशास्त्राने इस्राएल लोकांना याचे स्मरण करून दिले, की ते अपरिपूर्ण आहेत. त्यामुळे, साहजिकच त्यांच्या पातकांचे पूर्णपणे क्षालन होण्याकरता त्यांना एका परिपूर्ण अर्पणाची आवश्‍यकता होती. (इब्री लोकांस १०:१-४) म्हणूनच, मशीहा किंवा ख्रिस्त असलेल्या येशूचा स्वीकार करण्याकरता लोकांना तयार करणे हा नियमशास्त्राचा मूळ उद्देश होता. पौलाने लिहिले: “आपण विश्‍वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.”—गलतीकर ३:२४.

यहोवाचे नियमशास्त्र कठीण होते का?

१३. (अ) अपरिपूर्ण मानवांनी नियमशास्त्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले आणि का? (ब) नियमशास्त्र मुळात कठीण होते का?

१३ नियमशास्त्र “पवित्र, यथान्याय व उत्तम” होते तरी अनेक लोकांना ते कठीण वाटायचे. (रोमकर ७:१२) खरे तर नियमशास्त्र परिपूर्ण असल्यामुळे इस्राएल लोकांना त्यातील उच्च दर्जांनुसार तंतोतंत चालता आले नाही. (स्तोत्र १९:७) त्यामुळेच प्रेषित पेत्राने नियमशास्त्राविषयी म्हटले, की ‘आपले पूर्वज आणि आपणही हे जोखड वाहावयास समर्थ नव्हतो.’ (प्रेषितांची कृत्ये १५:१०) नियमशास्त्र मुळात कठीण नव्हते, उलट त्यानुसार चालल्यामुळे लोकांना लाभच होणार होता.

१४. नियमशास्त्र इस्राएल लोकांच्या लाभाकरताच होते हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

१४ उदाहरणार्थ, नियमशास्त्रानुसार चोरांना तुरुंगात टाकले जायचे नाही तर त्यांनी केलेल्या चोरीची दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त भरपाई देण्यासाठी त्यांच्याकडून काम करून घेतले जायचे. यामुळे ज्याची चोरी झाली असेल त्याला तर तोटा होत नसेच, शिवाय प्रामाणिकपणे काम करणाऱ्‍या लोकांचे श्रम तुरुंगांची व्यवस्था पाहण्यात खर्च होत नसे. (निर्गम २२:१, ३, ४, ७) शरीराला हानीकारक असलेले अन्‍न नियमशास्त्रात निषिद्ध ठरवण्यात आले होते. उदाहरणार्थ, डुकराचे आणि सशाचे अर्धवट शिजवलेले मांस खाल्ल्याने त्यांतील हानीकारक ट्रिकिनोसिसचे आणि ट्युलारिमाआचे जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. (लेवीय ११:४-१२) त्याचप्रमाणे मृत शरीराला स्पर्श करू नये, हा नियम देखील लोकांच्या संरक्षणासाठी होता. नियमशास्त्रानुसार, एखाद्याने शवाला स्पर्श केल्यास त्याला स्वतःला शुद्ध करावे लागायचे; स्वतःची वस्त्रेही शुद्ध करावी लागायची. (लेवीय ११:३१-३६; गणना १९:११-२२) जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून विष्ठा जमिनीत झाकून टाकावी असे नियमशास्त्रात सांगण्यात आले होते. शास्त्रज्ञांना मात्र यातील तथ्य अगदी अलीकडच्या शतकांमध्ये पटले आहे.—अनुवाद २३:१३.

१५. इस्राएल लोकांवर कोणते ओझे लादण्यात आले?

१५ नियमशास्त्राने तर लोकांकडून अवास्तव अपेक्षा केल्या नाहीत. पण, नियमशास्त्राचा अर्थ सांगण्याचा आपल्याला हक्क आहे असे समजणाऱ्‍यांच्या बाबतीत मात्र हे म्हणता येणार नाही. त्यांनी लोकांवर लादलेल्या नियमांविषयी जेम्स हेस्टिंग्स यांच्या अ डिक्शनरी ऑफ द बायबल या ग्रंथात असे म्हटले आहे: “बायबलच्या प्रत्येक आज्ञेच्या भोवती या लोकांनी असंख्य अनावश्‍यक नियमांचे जाळे विणले होते. . . . प्रत्येक बारीकसारीक गोष्टीला नियमशास्त्राच्या चष्म्यातून पाहण्याचा आणि मनुष्याच्या वर्तनासंबंधी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर स्वतःच्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा. . . . विवेकाचा आवाज दाबून टाकण्यात आला होता; देवाच्या जिवंत वचनाच्या सामर्थ्याला निष्क्रिय करून टाकण्यात आले, या असंख्य अतिरिक्‍त नियमांखाली त्याला तुडवून टाकण्यात आले.”

१६. धार्मिक पुढाऱ्‍यांनी लादलेले कठीण नियम आणि परंपरा यांविषयी येशूने काय म्हटले?

१६ लोकांवर हे असंख्य नियम लादणाऱ्‍या धार्मिक पुढाऱ्‍यांची टीका करताना येशूने असे म्हटले: “जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहीत.” (मत्तय २३:२, ४) या धार्मिक पुढाऱ्‍यांनी लोकांवर, मनुष्यांनी बनवलेल्या कठीण नियमांचे व परंपरांचे ओझे लादले. उदाहरणार्थ, हात धुण्याच्या साध्याशा कृतीलाही त्यांनी एखाद्या लांबलचक विधीचे रूप दिले होते. येशूने दाखवून दिले, की अशा या कठीण नियमांकरवी या धार्मिक पुढाऱ्‍यांनी “देवाचे वचन रद्द [केले].” (मार्क ७:१-१३; मत्तय २३:१३; २४-२६) अर्थात, हा प्रकार काही नवीन नव्हता, येशू पृथ्वीवर येण्याआधी देखील, इस्राएलातील धार्मिक पुढारी यहोवाच्या नियमांचा विपर्यास करत होते.

यहोवाला खरोखर काय हवे आहे?

१७. अविश्‍वासू इस्राएल लोकांच्या अर्पणांमुळे यहोवा का संतुष्ट झाला नाही?

१७ संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने असे म्हटले: “मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची वपा यांनी माझी अति तृप्ति झाली आहे; बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्‍ताने मला संतोष होत नाही.” (यशया १:१०, ११) खरे तर, नियमशास्त्रामध्ये देवाने स्वतः अर्पणे वाहण्याची आज्ञा दिली होती, मग त्याला या अर्पणांबद्दल तिरस्कार का वाटू लागला होता? (लेवीय १:१–४:३५) कारण लोक त्याचा अनादर करत होते. म्हणूनच यहोवाने त्या लोकांना असे बजावले: “आपणास धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा; अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.” (यशया १:१६, १७) यहोवाला त्याच्या लोकांकडून काय हवे आहे, हे यावरून स्पष्ट होत नाही का?

१८. इस्राएल लोकांकडून यहोवाला खरे तर काय हवे होते?

१८ देवाला खरोखर काय हवे आहे, हे येशूने दाखवून दिले. “नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” असा त्याला प्रश्‍न विचारण्यात आला तेव्हा त्याने हे स्पष्ट केले. तो म्हणाला, “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर. ह्‍या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” (मत्तय २२:३६-४०; लेवीय १९:१८; अनुवाद ६:४-६) हाच मुद्दा संदेष्टा मोशे यानेही मांडला होता, कारण त्याने असे विचारले: “हे इस्राएला, तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गानी चालावे, त्याच्यावर प्रीति करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्‍वर ह्‍याची सेवा करावी आणि परमेश्‍वराच्या ज्या आज्ञा व विधि मी आज तुझ्या बऱ्‍यासाठी सांगत आहे ते तू पाळावे; तुझा देव परमेश्‍वर तुझ्यापासून ह्‍यापेक्षा जास्त काय मागतो?”—अनुवाद १०:१२, १३; १५:७, ८.

१९. इस्राएल लोकांनी पावित्र्याचा आव आणण्याचा कसा प्रयत्न केला, पण यहोवाचे त्यांना काय म्हणणे होते?

१९ इस्राएल लोक दुष्टाचरणी होते; पण त्यांनी पावित्र्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. नियमशास्त्रानुसार त्यांना केवळ वार्षिक प्रायश्‍चित्त दिनीच उपवास करायची आज्ञा होती, पण त्यांनी वारंवार असे उपवास करण्यास सुरवात केली होती. (लेवीय १६:३०, ३१) पण, यहोवाने त्यांना कडक शब्दांत सुनावले: “दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्‍या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्‍त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्‍न भुकेल्यास वाटावे; तू लाचारास व निराश्रितांस आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?”—यशया ५८:३-७.

२०. दांभिक धार्मिक पुढाऱ्‍यांची येशूने का निंदा केली?

२० स्वतःला अतिशय धार्मिक समजणाऱ्‍या या इस्राएली लोकांचे वागणे त्या ढोंगी धर्मपुढाऱ्‍यांसारखेच होते, ज्यांना येशूने म्हटले: “पुदिना, बडिशेप व जिरे ह्‍यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत; ह्‍या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही.” (मत्तय २३:२३; लेवीय २७:३०) यहोवाला आपल्याकडून खरोखरच काय हवे आहे, हे समजण्याकरता येशूचे वरील शब्द आपल्याला मदत करत नाहीत का?

२१. यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो आणि काय नाही हे संदेष्टा मीखा याने थोडक्यात कसे सांगितले?

२१ यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो आणि काय नाही हे स्पष्ट करण्याकरता देवाचा संदेष्टा मीखा याने असे विचारले: “मी काय घेऊन परमेश्‍वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबलि, एका वर्षांची वासरे घेऊन त्याचपुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्त्र नद्या यांनी परमेश्‍वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:६-८.

२२. नियमशास्त्र देण्यात आलेल्या लोकांकडून यहोवाने विशेषतः कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली होती?

२२ तर मग, ज्यांना नियमशास्त्र देण्यात आले होते, त्यांच्याकडून यहोवाची नेमकी काय अपेक्षा होती? अर्थात, त्यांनी यहोवा देवावर तर प्रेम करायचेच होते. शिवाय, प्रेषित पौलाने म्हटले: “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.” (गलतीकर ५:१४) रोममधील ख्रिश्‍चनांना देखील पौलाने असेच लिहिले: “जो दुसऱ्‍यावर प्रीति करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. . . . प्रीति हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.”—रोमकर १३:८-१०.

अवास्तव नाही

२३, २४. (अ) यहोवाने आपल्याकडून काहीही जरी मागितले तर ते आपल्याला कधीही अवास्तव का वाटायला नको? (ब) आपण पुढे कोणत्या गोष्टींचा विचार करणार आहोत?

२३ यहोवा देवाचे प्रेम, त्याची विचारशीलता, आणि त्याची दया खरोखर भारावून टाकणारी नाही का? देवाच्या याच प्रेमाची महिमा लोकांसमोर अधिक मोठ्या प्रमाणात प्रगट करण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. देवाच्या नजरेत त्यांचे किती मोल आहे हे दाखवण्यासाठी तो पृथ्वीवर आला होता. देवाच्या प्रेमाविषयी समजावून सांगण्याकरता येशूने चिमुकल्या चिमण्यांचे उदाहरण देऊन म्हटले: “तुमच्या पित्यावाचून त्यांतून एकहि भूमीवर पडणार नाही.” त्यावरून, त्याने पुढे असे म्हटले: “भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९-३१) आपल्यावर इतके प्रेम करणाऱ्‍या देवाने आपल्याकडून काहीही जरी मागितले तरी ते आपण निश्‍चितच कधी अवास्तव समजू नये!

२४ पण आज यहोवा आपल्याकडे काय मागतो? आणि देव आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करतो असे काही लोकांना का वाटते? या प्रश्‍नांचा नीट अभ्यास केल्यानंतर आपल्याला दिसून येईल, की यहोवाची कोणतीही अपेक्षा पूर्ण करणे हा खरे तर आपल्याकरता एक मोठा बहुमानच आहे.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

◻ काही लोक यहोवाची सेवा करण्याचे का नाकारतात?

◻ संपूर्ण इतिहासात वेगवेगळ्या लोकांकडून यहोवाने कोणत्या वेगवेगळ्या अपेक्षा केल्या?

◻ नियमशास्त्रामुळे कोणकोणते उद्देश साध्य झाले?

◻ यहोवा आपल्याकडून जे अपेक्षितो ते अवास्तव का नाही?

[१८ पानांवरील चित्र]

मनुष्याने बनवलेले नियम लादल्यामुळे देवाची उपासना करणे कठीण झाले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा