वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१ पृ. १३-१८
  • तरुणांनो—आपल्या ज्ञानेंद्रियांचा सराव करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो—आपल्या ज्ञानेंद्रियांचा सराव करा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ज्ञानेंद्रियाचा सराव करणे
  • मनोरंजनाच्या बाबतीत समजबुद्धी
  • शिक्षणाच्या बाबतीत समजबुद्धी
  • लग्नाआधीचे सद्वर्तन
  • “तरुणपणापासून” शिकवलेले
  • तुमची समजशक्‍ती वाढवा
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्ही ‘बऱ्‍यावाईटातला भेद ओळखू’ शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • “आपली प्रतीति पाहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१ पृ. १३-१८

तरुणांनो—आपल्या ज्ञानेंद्रियांचा सराव करा!

“ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.”—इब्री लोकांस ५:१४.

१, २. (अ) आजची आपली परिस्थिती इफिस येथील प्राचीन ख्रिस्ती लोकांसारखी कशाप्रकारे म्हणता येईल? (ब) कोणते गुण तुम्हाला धोक्यापासून बचावतील आणि तुम्ही हे गुण कशाप्रकारे आत्मसात करू शकता?

“अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) प्रेषित पौलाने दोन हजार वर्षांपूर्वी हे शब्द लिहिले होते; आणि आता तर ‘दुष्ट व भोंदू माणसे दुष्टपणात अधिक सरसावली आहेत.’ आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ किंवा दुसऱ्‍या एका अनुवादाप्रमाणे “अत्यंत धोक्याच्या” काळात जगत आहोत.—२ तीमथ्य ३:१-५, १३; फिलिप्स.

२ पण तुम्ही तुमच्या मार्गात लपलेल्या धोक्यांपासून स्वतःला बचावू शकता; त्यासाठी तुम्हाला “चातुर्य, . . . ज्ञान व चाणाक्षपण” यांसारखे गुण विकसित करावे लागतील. (नीतिसूत्रे १:४) नीतिसूत्रे २:१०-१२ म्हणते: “ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील.” पण हे गुण तुम्हाला कशाप्रकारे विकसित करता येतील? इब्री लोकांस ५:१४ म्हणते: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.” ज्ञानेंद्रियांचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्यासाठी त्यांचा सराव करणे अत्यावश्‍यक आहे, आणि इतर कोणतेही कौशल्य संपादन करण्याच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. पौलाने या ठिकाणी जो ग्रीक शब्द वापरला त्याचा शब्दशः अर्थ “व्यायामपटूसारखा सराव झालेला” असा होतो. हा सराव कसा सुरू करावा?

ज्ञानेंद्रियाचा सराव करणे

३. निर्णय घेतेवेळी, तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांचा कशाप्रकारे उपयोग करू शकता?

३ तुमच्या ज्ञानेंद्रियांना—चांगले काय व वाईट काय हे समजण्याच्या तुमच्या शक्‍तीला—“वहिवाटीने” सराव होतो हे लक्षात घ्या. निर्णय घेतेवेळी अंदाज बांधणे, त्याक्षणी जे वाटेल त्याप्रमाणे वागणे किंवा चारचौघे विशिष्ट प्रकारे वागताहेत म्हणून त्यांचे अनुकरण करणे शहाणपणाचे ठरणार नाही; असे केल्याने चांगले निर्णय घेता येत नाहीत. चांगले निर्णय घेण्याकरता तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग केला पाहिजे. तो कसा? सर्वप्रथम, कोणत्याही परिस्थितीचे सर्व दृष्टिकोनांतून परीक्षण करा आणि त्या परिस्थितीविषयी पूर्ण माहिती गोळा करा. त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. तुमच्यापुढे असलेले पर्याय विचारात घ्या. नीतिसूत्रे १३:१६ म्हणते: “प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करितो.” यानंतर, त्या विशिष्ट परिस्थितीशी बायबलमधील कोणत्या नियमांचा अथवा तत्त्वांचा संबंध आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. (नीतिसूत्रे ३:५) अर्थात, असे करण्यासाठी तुम्हाला बायबलचे ज्ञान असले पाहिजे. म्हणूनच पौल आपल्याला “जड अन्‍न” घेण्याचे—सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” समजून घेण्याचे प्रोत्साहन देतो.—इफिसकर ३:१८.

४. देवाच्या तत्त्वांबद्दल ज्ञान असणे का महत्त्वाचे आहे?

४ असे करणे फार महत्त्वाचे आहे कारण आपण अपरिपूर्ण, पापी प्रवृत्तीचे आहोत. (उत्पत्ति ८:२१; रोमकर ५:१२) यिर्मया १७:९ सांगते त्याप्रमाणे, “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” आपल्या मार्गदर्शनाला देवाची तत्त्वे नसल्यास कदाचित आपण—केवळ आपल्या शरीराच्या वासनेमुळे—वाईटालाही चांगले म्हणून स्वतःची फसगत करू शकतो. (पडताळा यशया ५:२०.) स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धि प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करितो.”—स्तोत्र ११९:९, १०४.

५. (अ) आज काही तरुण वाममार्गाला का लागतात? (ब) एका तरुणीने सत्याची पूर्ण खात्री कशी करून घेतली?

५ ख्रिस्ती कुटुंबांत लहानाचे मोठे झालेले काही तरुण वाममार्गाला का लागले आहेत? त्यांनी कधी ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजूनच घेतले’ नाही, असे तर नाही? (रोमकर १२:२) काही तरुण आपल्या आईवडिलांसोबत सभांना जात असतील, आणि विचारल्यास कदाचित ते बायबलच्या मूलभूत गोष्टींविषयी सांगू शकतील. पण आपला विश्‍वास पुराव्यासहित स्पष्ट करण्याची किंवा देवाच्या वचनातील गहन सत्ये समजावून सांगण्याची वेळ आली तर त्यांचे ज्ञान अगदीच त्रोटक असल्याचे दिसून येते. असे तरुण सहज बहकू शकतात. (इफिसकर ४:१४) तुमचीही अशीच स्थिती असल्यास तुम्ही या स्थितीत बदल करण्याचा निर्धार का करत नाही? एक तरुण भगिनी आपला अनुभव सांगते: “मी सखोल अभ्यास केला. मी स्वतःला म्हणाले, ‘हाच खरा धर्म आहे याचा पुरावा तो काय? देवाचे नाव यहोवा आहे हे कशावरून?’”a बायबलचे कसून परीक्षण केल्यामुळे, आपण आपल्या आईवडिलांकडून ज्या गोष्टी शिकलो त्या खऱ्‍या आहेत याची तिला पूर्ण खात्री झाली!—पडताळा प्रेषितांची कृत्ये १७:११.

६. यहोवाला ‘काय संतोषकारक आहे’ हे तुम्ही कशाप्रकारे ‘पारखून घेऊ’ शकता?

६ यहोवाच्या तत्त्वांचे ज्ञान तुमच्याजवळ असल्यास, ‘प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेणे’ तुम्हाला जास्त सोपे जाईल. (इफिसकर ५:१०) पण तरीही एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कोणता मार्ग पत्करणे शहाणपणाचे ठरेल हे तुम्हाला ठरवता येत नसेल, तर? मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना करा. (स्तोत्र ११९:१४४) आईवडिलांशी किंवा एखाद्या अनुभवी ख्रिस्ती बंधू अथवा भगिनीशी यासंबंधी विचारविनिमय करा. (नीतिसूत्रे १५:२२; २७:१७) तसेच, बायबल आणि वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांचा सखोल अभ्यास केल्यास, त्यातूनही तुम्हाला मदतदायक मार्गदर्शन मिळू शकेल. (नीतिसूत्रे २:३-५) तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांचा जितका उपयोग कराल तितकीच ती अधिक तीक्ष्ण होतील.

मनोरंजनाच्या बाबतीत समजबुद्धी

७, ८. (अ) एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांचा कशाप्रकारे उपयोग करू शकता? (ब) मनोरंजनाविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

७ आता आपण अशा काही खास परिस्थितींचा विचार करू, ज्यांत तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ, असे समजा की तुम्हाला एका पार्टीला बोलावले आहे. कदाचित तुम्हाला निमंत्रणाचे कार्डही मिळाले असेल. साक्षीदारांपैकी अनेक तरुण मुलेमुली या पार्टीला येणार आहेत. पार्टीला येणारा खर्च सर्वजण मिळून उचलणार आहेत. या पार्टीला जावे का?

८ हीच वेळ आहे तुमच्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्याची. पहिल्यांदा, पूर्ण माहिती गोळा करा. ही पार्टी किती मोठी असणार आहे? कोणकोण येणार आहेत? किती वाजता सुरू होईल? कितीला संपेल? पार्टीत कायकाय करण्याचे ठरवले आहे? कार्यक्रमावर कोणाची देखरेख असेल? यानंतर टेहळणी बुरूज प्रकाशन सूचीb (इंग्रजी) यातल्या “सामाजिक प्रसंग” आणि “करमणूक” या विषयांवर थोडा अभ्यास करा. या अभ्यासातून तुम्हाला काय दिसून येईल? पहिले म्हणजे, एकत्र येऊन मौजमजा करण्याला यहोवा देवाचा विरोध नाही. उलट, उपदेशक ८:१५ यात तर असे म्हटले आहे की, परिश्रम करण्यासोबत “ह्‍या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही.” स्वतः येशू ख्रिस्तही खास मेजवान्यांना आणि एका लग्नालाही उपस्थित राहिला होता. (लूक ५:२७-२९; योहान २:१-१०) मर्यादा राखल्यास अशा प्रकारच्या सहवासाने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

९, १०. (अ) काही कार्यक्रमांत कोणते अनिष्ट प्रसंग येऊ शकतात? (ब) एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही हे ठरवण्याआधी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता?

९ पण तेच जर या कार्यक्रमांचे नीट आयोजन केले नसेल, तर कधीकधी अतिशय वाईट परिणामही होऊ शकतात. १ करिंथकर १०:८ येथे आपण वाचतो की कशाप्रकारे कुसंगतीमुळे काहींनी जारकर्म केले आणि त्यामुळे “एका दिवसात तेवीस हजार मरून पडले.” आपल्याला सावध करणारी आणखी एक ताकीद रोमकर १३:१३ येथे वाचायला मिळते: “दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्‍तीत, कलहात व मत्सरात नसावे.” (पडताळा १ पेत्र ४:३.) अर्थात, एखाद्या सामाजिक प्रसंगी किती लोकांनी एकत्र यावे यावर काही बंधन घालता येत नाही. पण अनुभवावरून असे दिसून येते, की जितके जास्त लोक असतात तितकेच त्या कार्यक्रमाची देखरेख करणे कठीण बनते. जेव्हा कार्यक्रमांना कमी लोक असतात आणि व्यवस्था चांगली केलेली असते, तेव्हा पार्टीला ‘बेफामपणाचे’ स्वरूप येत नाही.—गलतीकर ५:२१, बाइंग्टन.

१० त्यासोबतच हा अभ्यास करताना आणखीही काही प्रश्‍न आपोआपच समोर येतील, उदाहरणार्थ: या प्रसंगी कोणी प्रौढ, अनुभवी ख्रिस्ती देखील असतील का? विशेष म्हणजे, हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे? या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, बांधवांनी एकमेकांच्या सहवासाचा निर्भेळ आनंद लुटावा हा? की एखाद्याचा आर्थिक फायदा? कोणकोण येऊ शकतात यावर काही बंधन आहे का? आठवड्याच्या सुटीदरम्यान हा कार्यक्रम ठेवला असेल, तर कार्यक्रमाला येणारे बांधव दुसऱ्‍या दिवशी ख्रिस्ती प्रचार कार्याला जाऊ शकतील या बेताने तो वेळेवर संपेल का? गाणेबजावणे, डान्स इत्यादी होणार असेल तर हे सर्व ख्रिस्ती लोकांना शोभेल असे असेल का? (२ करिंथकर ६:३) तुम्ही म्हणाल, इतके प्रश्‍न कोण विचारेल? पण नीतिसूत्रे २२:३ ताकीद देते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो. भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” होय, आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग केल्यामुळे तुम्ही बरेच धोकेदायक प्रसंग टाळू शकता.

शिक्षणाच्या बाबतीत समजबुद्धी

११. भविष्यासाठी योजना करताना तरुण आपल्या ज्ञानेंद्रियांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतात?

११ भविष्यासाठी योजना करणे शहाणपणाचे आहे असे बायबल सांगते. (नीतिसूत्रे २१:५) तुम्ही आणि तुमच्या आईवडिलांनी तुमच्या भविष्याविषयी चर्चा केली आहे का? कदाचित तुम्ही एक पायनियर बनून पूर्ण वेळेची सेवा करण्याचे ठरवले असेल. आणि खरे पाहता, पायनियरिंगमधून तुम्हाला जे समाधान मिळेल ते आणखी कोणत्याही करियरमधून मिळू शकत नाही. तुम्ही नियमित वैयक्‍तिक अभ्यासाची सवय लावली असेल आणि सेवेतही अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर एकप्रकारे तुम्ही पायनियरिंगच्या आनंददायक करियरसाठी तयारी करत आहात. पायनियर सेवा करताना आपला खर्च कसा भागवाल हे तुम्ही विचारात घेतले आहे का? भविष्यात जर तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्‍या घेण्याचे ठरवले तर ती अतिरिक्‍त जबाबदारी पेलणे तुम्हाला शक्य होईल का? अशा गोष्टींसंबंधी तुम्हाला वास्तवाचे भान ठेवून रास्त निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करावा लागेल.

१२. (अ) बदलती आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन काही कुटुंबांनी कशाप्रकारे निर्णय घेतले आहेत? (ब) पायनियरिंगचे ध्येय ठेवले असल्यास अतिरिक्‍त शिक्षण घेऊच नये असे काही आहे का? समजावून सांगा.

१२ काही देशांत, काही उपयोगी कामे किंवा व्यवसाय शिकण्यासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी करण्याची सोय असते. काही तरुण आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे चालवण्याचे प्रशिक्षण घेतात किंवा ज्यांचा काही उद्योग आहे अशा आपल्या ओळखीच्या लोकांकडून प्रशिक्षण घेतात. इतर काही तरुण शालेय शिक्षणासोबत असे काही कोर्स करतात की जे पैसा कमवण्यासाठी पुढे त्यांना उपयोगी पडतील. अशा सोयी उपलब्ध नसल्यास, आईवडिलांनी काळजीपूर्वक विचार करून आपल्या मुलांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर काही पूरक शिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. प्रौढ जीवनातील जबाबदाऱ्‍या पेलता याव्यात आणि विशेष म्हणजे बरीच वर्षे पायनियर सेवा करता यावी म्हणून अशाप्रकारे भविष्यासाठी योजना करणे योग्यच आहे; याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्याला प्राधान्य देत नाहीत असे नाही. (मत्तय ६:३३) आणि पूरक शिक्षण घेत असताना तुम्ही पायनियरिंग करू शकत नाही असेही नाही. उदाहरणार्थ एका साक्षीदार तरुणीला पायनियर व्हायची बऱ्‍याच काळापासून इच्छा होती. तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर, स्वतः नियमित पायनियर असणाऱ्‍या तिच्या आईवडिलांनी तिला काही पूरक शिक्षण देण्याचे ठरवले. हे शिक्षण घेत असताना ती पायनियरिंगही करत होती आणि आज तिच्याजवळ असलेल्या प्रशिक्षणाच्या साहाय्याने ती आपला उदरनिर्वाह करते आणि तिचे पायनियरिंगही सुरूच आहे.

१३. पूरक शिक्षणाचा निर्णय घेताना कुटुंबांनी कोणता मागचा पुढचा विचार केला पाहिजे?

१३ पूरक शिक्षणाच्या बाबतीत स्वतःचा निर्णय घेण्याचा प्रत्येक कुटुंबाला हक्कच नाही, तर ती त्यांची जबाबदारीही आहे. कोणत्या प्रकारचे पूरक शिक्षण घ्यायचे हे विचारपूर्वक ठरवल्यास ते फायद्याचे ठरू शकते. पण हा एक पाशही ठरू शकतो. तुम्ही पूरक शिक्षण घेण्याचे ठरवले असल्यास, असे करण्यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? प्रौढ जीवनातील जबाबदाऱ्‍या प्रामाणिकपणे पेलता याव्यात, हा? की तुम्ही “मोठाल्या गोष्टींची” आकांक्षा करत आहात? (यिर्मया ४५:५; २ थेस्सलनीकाकर ३:१०; १ तीमथ्य ५:८; ६:९) शिवाय दुसऱ्‍या गावी, कदाचित वसतिगृहात राहून हे पूरक शिक्षण घेण्याबाबत काय म्हणता येईल? “कुसंगतीने नीति बिघडते,” हा पौलाचा इशारा लक्षात घेता, असे करणे योग्य ठरेल का? (१ करिंथकर १५:३३; २ तीमथ्य २:२२) तसेच हेही आठवणीत असू द्या, की “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथकर ७:२९) हा अभ्यासक्रम किती मुदतीचा आहे? तुमच्या तरुणपणाची अधिकांश वर्षे तुम्ही त्यासाठी खर्चणार का? मग, “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या बायबलच्या सल्ल्याचे तुम्ही कसे पालन करणार? (उपदेशक १२:१) शिवाय, हे शिक्षण घेत असताना सभा, क्षेत्र सेवा, आणि वैयक्‍तिक अभ्यास यांसारख्या अत्यावश्‍यक ख्रिस्ती कार्यांसाठी तुम्हाला वेळ मिळेल का? (मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२४, २५) तुमची ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण असल्यास भविष्यासाठी योजना आखताना तुम्ही व तुमचे आईवडील आध्यात्मिक ध्येयांकडे कधीही दुर्लक्ष होऊ देणार नाहीत.

लग्नाआधीचे सद्वर्तन

१४. (अ) लग्नापूर्वी गाठीभेटी करणाऱ्‍या जोडप्यांनी एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम व्यक्‍त करताना कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजे? (ब) याबाबतीत पर्याप्त निर्णयशक्‍ती नसल्याचे काही जोडप्यांनी कशाप्रकारे दाखवून दिले?

१४ ज्ञानेंद्रियांचा उपयोग आणखी एका बाबतीत करणे आवश्‍यक आहे—लग्नाआधीच्या गाठीभेटी. आपल्याला आवडणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल वाटणारे प्रेम व्यक्‍त करण्याची इच्छा स्वाभाविक आहे. गीतरत्नांतल्या निष्कलंक जोडप्यानेही लग्नाआधी आपले प्रेम मर्यादेने व्यक्‍त केले होते. (गीतरत्न १:२; २:६; ८:५) आज काही जोडप्यांनाही कदाचित असे वाटत असेल की हात धरणे, चुंबन घेणे आणि आलिंगन देणे चुकीचे नाही; विशेषतः, लग्न जवळजवळ ठरलेलेच असते तेव्हा हे चालण्यासारखे आहे असे कदाचित त्यांना वाटेल. पण लक्षात असू द्या: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख.” (नीतिसूत्रे २८:२६) दुःखाची गोष्ट म्हणजे, बऱ्‍याच जोडप्यांनी याबाबतीत पर्याप्त निर्णयशक्‍ती नसल्याचे दाखवून दिले आणि आपणहून स्वतःवर असे नाजूक प्रसंग ओढवून घेतले. नियंत्रण गमवल्यामुळे त्यांच्या हातून वाईट कृत्ये घडली, जी शेवटी लैंगिक अनैतिकतेत परिणीत झाली.

१५, १६. लग्नाआधी गाठीभेटी करताना आपले आचरण नेहमी आदरणीय राहावे म्हणून विवाहेच्छुक जोडप्यांनी कोणती काळजी घेणे योग्य आहे?

१५ तुम्ही आपल्या भावी जोडीदाराला जाणून घेण्यासाठी भेटीगाठी करत असल्यास त्याच्या अथवा तिच्यासोबत अनुचित परिस्थितीत एकटे राहण्याचे टाळणे शहाणपणाचे ठरेल. इतरांसोबत असताना किंवा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे सर्वात चांगले. काही जोडपी बाहेर जाताना इतर कोणाला सोबत नेतात. तसेच होशेय ४:११ येथे जे सांगितले आहे, त्यावरही विचार करा: “द्राक्षारस व नवा द्राक्षारस ही त्यांचा विवेक नष्ट करितात.” मादक पेयांमुळे व्यक्‍ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि यामुळे एखाद्या जोडप्याकडून नकळत असे कृत्य घडू शकते, ज्याबद्दल नंतर त्यांना पस्तावा होईल.

१६ नीतिसूत्रे १३:१० म्हणते: “गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणाऱ्‍यांजवळ ज्ञान असते.” तेव्हा एकमेकांची ‘मसलत घ्या’ आणि योग्य वर्तन कसे असावे यावर चर्चा करा. एकमेकांच्या भावनांबद्दल आणि विवेकाबद्दल आदर दाखवून, प्रेम व्यक्‍त करताना कधीही मर्यादा सोडू नका. (१ करिंथकर १३:५; १ थेस्सलनीकाकर ४:३-७; १ पेत्र ३:१६) अशा नाजूक विषयावर चर्चा करणे कदाचित तुम्हाला सुरवातीला अवघड जाईल पण यामुळे पुढे येणाऱ्‍या बऱ्‍याच गंभीर समस्या टाळता येतात.

“तरुणपणापासून” शिकवलेले

१७. दाविदाने यहोवाला ‘तरुणपणापासून [आपले] श्रद्धास्थान कशाप्रकारे बनवले आणि यातून आज तरुणांना काय शिकण्यासारखे आहे?

१७ सैतानाचे मोहपाश टाळण्यासाठी तुम्हाला सतत सतर्क राहावे लागेल—आणि प्रसंगी, मोठे धैर्यही दाखवावे लागेल. कधीकधी तर केवळ तुमचे सोबतीच नव्हे, तर सारे जग तुमच्या विरोधात असेल. स्तोत्रकर्त्या दाविदाने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, परमेश्‍वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्‌भुत कृत्ये वर्णिली आहेत.” (स्तोत्र ७१:५, १७)c दावीद किती धैर्यवान होता हे सर्वज्ञात आहे. पण हे धैर्य त्याने केव्हा संपादन केले? तरुणपणातच! त्याने कशाप्रकारे गल्याथाचा सामना केला होता हे तर आपल्याला माहितच आहे, पण त्याही आधी दाविदाने आपल्या वडिलांच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या धैर्यवानपणे संकटांचा सामना केला—त्याने एकदा सिंहाला आणि अस्वलाला मारले होते. (१ शमुवेल १७:३४-३७) पण दाविदाने आपल्या वीरतेचे सर्व श्रेय यहोवाला दिले, त्याने यहोवाला “तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान” असे म्हटले. यहोवावर विसंबून राहिल्यामुळे कोणतीही परीक्षा दाविदासाठी मोठी नव्हती. तुम्हीही यहोवावर विसंबून राहिलात, तर तो तुम्हाला असे धैर्य आणि सामर्थ्य देईल ज्यामुळे तुम्ही “जगावर जय” मिळवू शकाल.—१ योहान ५:४.

१८. देवभिरू तरुणांना आज कोणते प्रोत्साहन दिले जाते?

१८ तुमच्यासारख्या हजारो तरुणांनी मोठे धैर्य दाखवले आहे आणि आज ते बाप्तिस्मा घेऊन सुवार्तेचे प्रचारक म्हणून सेवा करत आहेत. तुम्हा तरुणांचा विश्‍वास आणि धैर्य पाहून आम्ही देवाचे आभार मानतो! या भ्रष्ट जगापासून अलिप्त राहण्याचा आपला निर्धार कायम टिकवा. (२ पेत्र १:४) बायबलच्या आधारावर तयार केलेल्या आपल्या ज्ञानेंद्रियांचा सदैव उपयोग करत राहा. असे केल्याने आता तर तुम्ही अनेक संकटापासून वाचालच पण शेवटीही तुमचे निश्‍चित तारण होईल. आमच्या शेवटल्या लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनात यशस्वी व्हाल.

[तळटीपा]

a सावध राहाच्या! नोव्हेंबर ८, १९९८ अंकातील “तरुण लोक विचारतात . . . मी सत्य स्वतःलाच कसे पटवू शकते?” हा लेख पाहा.

b टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, १९९२ (इंग्रजी) अंकातील “सामाजिक मनोरंजन—फायदा करून घ्या, धोके टाळा” या लेखात सदर विषयावर बरीच उपयुक्‍त माहिती दिली आहे.

c स्तोत्र ७१ हा ७० व्या स्तोत्राचाच उर्वरित भाग आहे आणि त्याच्या सुरवातीला हे दाविदाचे स्तोत्र असल्याचे सांगितले आहे.

उजळणीचे प्रश्‍न

◻ तरुण आपल्या ज्ञानेंद्रियांना कशाप्रकारे तयार करू शकतात?

◻ ख्रिस्ती बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना तरुण व्यक्‍ती आपल्या ज्ञानेंद्रियांचा कशाप्रकारे उपयोग करू शकते?

◻ शिक्षणासंबंधी योजना करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

◻ लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटीगाठी करणारी जोडपी लैंगिक अनैतिकतेच्या पाशात पडण्याचे कसे टाळू शकतात?

[१५ पानांवरील चित्र]

सखोल अभ्यास केल्याने तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांना तयार करू शकाल

[१६ पानांवरील चित्र]

कार्यक्रमांत कमी लोक असल्यास त्यांवर देखरेख करणे सोपे जाते आणि असे प्रसंग सहसा नियंत्रणाबाहेर जात नाहीत

[१६ पानांवरील चित्र]

शिक्षणासंबंधी योजना करताना आईवडिलांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे

[१७ पानांवरील चित्र]

इतरांसोबत असताना एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात चांगले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा