सैतान आपल्याला आजारी पाडतो का?
आजारपण असायलाच नको होते. कारण देवाने आपल्याला परिपूर्ण आरोग्य देऊन अनंतकाळ जगण्यासाठी निर्माण केले होते. पण एका आत्मिक प्राण्याने आपल्या पहिल्या पालकांना, आदाम आणि हव्वेला पाप करायला लावून आजारपण, दुःख आणि मरण आपल्यावर ओढून घेतले.—उत्पत्ति ३:१-५, १७-१९; रोमकर ५:१२.
याचा अर्थ, सर्वच आजार दुरात्मिक जगाच्या हस्तक्षेपामुळे येतात असा होतो का? मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अनेकांना तसे वाटते. चिमुकल्या ओमाजीच्या आजीलाही तसेच वाटले. उष्ण प्रदेशातील मुलांचा कधीकधी बळी घेणारा हा आजार अर्थात अतिसार, ओमाजीला दुरात्म्यांमुळे झाला होता का?
सैतानाची भूमिका
बायबल या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्टपणे देते. सर्वात पहिल्यांदा ते दाखवते, की आपल्या पूर्वजांचे आत्मे जिवंतांना त्रास देऊ शकत नाहीत. लोक मेल्यावर त्यांना “काहीच कळत नाही.” मेल्यानंतर त्यांचे आत्मे जिवंत राहत नाहीत. ते कबरेत निद्रा घेत असतात; तेथे “काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) तेव्हा, मृत लोक जिवंत असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारे आजारी पाडू शकत नाहीत!
परंतु, दुरात्मे अस्तित्वात असल्याचे बायबल स्पष्ट करते. संपूर्ण विश्वात पहिली बंडाळी करणारा एक आत्मिक प्राणी होता; आता त्याला सैतान म्हटले जाते. इतर आत्मिक प्राणी त्याला जाऊन मिळाले आणि त्यांना दुरात्मे म्हटले जाऊ लागले. सैतान आणि दुरात्मे लोकांना आजारी पाडू शकतात का? काही वेळा असे झाले आहे. येशूने चमत्काराने बरे केलेल्यांमध्ये दुरात्म्यांना काढून टाकणाऱ्या चमत्काराचा देखील समावेश होतो. (लूक ९:३७-४३; १३:१०-१६) परंतु, येशूने ज्या लोकांना बरे केले त्यांपैकी बहुतेकांना दुरात्म्यांनी थेटपणे आजारी पाडले नव्हते. (मत्तय १२:१५; १४:१४; १९:२) तसेच आजही बहुतेकदा, आजारपण हे अलौकिक नव्हे तर नैसर्गिक कारणांमुळे येते.
जादूटोण्याविषयी काय? नीतिसूत्रे १८:१० आपल्याला हमी देते: “परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” याकोब ४:७ म्हणते: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.” जादूटोणा किंवा कोणत्याही प्रकारच्या दुरात्मिक गोष्टींपासून देव आपल्या विश्वासू लोकांना संरक्षण देऊ शकतो. “सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” या येशूच्या बोलण्याचा हा एक अर्थ होतो.—योहान ८:३२.
काही जण विचारतील, ‘मग ईयोबाविषयी काय? एका दुष्ट आत्म्याने त्याला आजारी पाडले नव्हते काय?’ होय, ईयोबावर सैतानामुळे आजारपण आले होते असे बायबल सांगते. परंतु ईयोबाची गोष्ट वेगळी होती. ईयोबाला फार पूर्वीपासून दुरात्मिक हल्ल्यापासून ईश्वरी संरक्षण होते. मग सैतानाने ईयोबावर हल्ला करण्याचे आव्हान यहोवाला केले आणि यामध्ये पुष्कळ मोठे वादविषय गोवलेले असल्यामुळे, यहोवाने फक्त या एकाच बाबतीत काही काळासाठी आपल्या उपासकावरून आपले संरक्षण काढून घेतले.
परंतु यहोवाने सैतानावर काही मर्यादा घातल्या. त्याने ईयोबाला पीडित करण्याची परवानगी सैतानाला दिली तेव्हा सैतान काही काळासाठी ईयोबाला आजारी पाडू शकत होता पण त्याला ठार मारू शकत नव्हता. (ईयोब २:५, ६) कालांतराने, ईयोबावरील संकट निघून गेले आणि यहोवाने त्याच्या एकनिष्ठेबद्दल त्याला विपुल प्रमाणात आशीर्वादित केले. (ईयोब ४२:१०-१७) ईयोबाच्या एकनिष्ठेमुळे सिद्ध झालेली तत्त्वे फार पूर्वीच बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेली आहेत व ती आपल्या सर्वांपुढे स्पष्ट आहेत. दुसऱ्या चाचणीवजा केसची काही गरज नाही.
सैतान कसे कार्य करतो?
बहुतेक बाबतीत, सैतान आणि मानवी आजारपण यांच्यातील एकमात्र संबंध, सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याला मोहात पाडले आणि त्यांनी पाप केले ही वस्तुस्थिती आहे. तो आणि त्याचे दुरात्मे प्रत्येक आजारपणाचे थेट कारण नाहीत. पण, सैतान कधीकधी आपल्याला मूर्ख निर्णय घ्यायला व आपल्या विश्वासाशी तडजोड करायला लावण्याचा प्रयत्न करतो ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्याने आदाम आणि हव्वेवर जादूटोणा केला नाही, त्यांचा खून केला नाही किंवा त्यांना आजाराने पीडित केले नाही. त्याने देवाची आज्ञा मोडण्यास हव्वेचे मन वळवले आणि आदामानेही तिच्याप्रमाणेच अवज्ञा केली. त्याचे परिणाम आजार आणि मृत्यू हे होते.—रोमकर ५:१९.
मवाबाच्या राजाने बलाम नावाच्या एका अविश्वासू संदेष्ट्याला एकदा मजुरी दिली व मवाबाच्या सीमेवर तळ ठोकलेल्या इस्राएल राष्ट्रावर शाप आणण्यास सांगितले; मवाबातील सर्व लोक या इस्राएली लोकांना पाहून घाबरले होते. बलामाने इस्राएली लोकांना शाप द्यायचा प्रयत्न केला परंतु त्याचे काही चालले नाही कारण इस्राएल राष्ट्रावर यहोवाचे संरक्षण होते. मवाबी लोकांनी मग इस्राएल लोकांना मूर्तिपूजा व लैंगिक अनैतिकता करण्याचे आमिष दाखवले. त्यांची ही युक्ती सफल ठरली आणि इस्राएल राष्ट्राने यहोवाचे संरक्षण गमावले.—गणना २२:५, ६, १२, ३५; २४:१०; २५:१-९; प्रकटीकरण २:१४.
या प्राचीन घटनेतून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. ईश्वरी साहाय्य देवाच्या विश्वासू उपासकांना दुरात्म्यांकडून होणाऱ्या थेट हल्ल्याविरुद्ध संरक्षण देते. परंतु, सैतान लोकांना त्यांच्या विश्वासाशी तडजोड करायला लावण्याचा प्रयत्न करील. तो त्यांना अनैतिकतेच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे तो त्यांना घाबरवेल आणि त्यांच्या हातून असे कार्य घडेल ज्यामुळे ते देवाचे संरक्षण गमावून बसतील. (१ पेत्र ५:८) म्हणूनच, प्रेषित पौल सैतानाला “मरणावर सत्ता गाजविणारा” असे म्हणतो.—इब्री लोकांस २:१४.
ओमाजीच्या आजीने हावाला, ओमाजीला आजाराविरुद्ध संरक्षण म्हणून ताईत आणि गंडेदोरे बांधायची खूप गळ घातली. हावा हे सर्व बांधायला तयार झाली असती तर? तर तिने यहोवावर संपूर्ण भरवसा नसल्याचे दाखवले असते व त्याच्या संरक्षणाची ती पुन्हा कधीच अपेक्षा करू शकली नसती.—निर्गम २०:५; मत्तय ४:१०; १ करिंथकर १०:२१.
सैतानाने ईयोबाला देखील गळ घालायचा प्रयत्न केला. त्याचे कुटुंब, त्याची संपत्ती आणि त्याचे आरोग्य त्याच्याकडून हिरावून घेतल्यावरही त्याचे समाधान झाले नाही. ईयोबाची पत्नीही त्याला टोचून म्हणाली: “देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” (ईयोब २:९) त्यानंतर त्याचे तीन “मित्र” त्याला भेटायला आले; तो स्वतःच त्याच्या आजारपणाला कारणीभूत होता हे त्याला पटवून द्यायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. (ईयोब १९:१-३) अशाप्रकारे, ईयोबाला निरुत्साहित करण्याचा व यहोवाच्या धार्मिकतेवरील त्याचा भरवसा डगमगवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सैतानाने ईयोबाच्या दुर्बळ स्थितीचा फायदा उचलला. तरीपण ईयोबाने आपली आशा यहोवावरच ठेवली.—पडताळा स्तोत्र ५५:२२.
आजारी असतो तेव्हा आपणही खिन्न होतो. अशा परिस्थितीत, सैतान इतका चपळपणे आपल्याकडून असे कार्य घडवून आणतो ज्यात आपण आपल्या विश्वासाशी तडजोड करू. यास्तव, आपण आजारी पडतो तेव्हा, कोणताही गूढ प्रभाव नव्हे तर वारशाने मिळालेली अपरिपूर्णता, आपल्या आजाराचे मूळ कारण असल्याचे आपण लक्षात ठेवले पाहिजे. विश्वासू इसहाक आपल्या मृत्यूपूर्वी कित्येक वर्षे आंधळा झाला होता, हे तुम्हाला आठवत असेल. (उत्पत्ति २७:१) त्याच्या आंधळेपणाचं कारण दुरात्मे नव्हते तर वृद्धापकाळ होते. राहेल, बाळाला जन्म देताना मरण पावली ते सैतानामुळे नव्हे तर मानवी कमजोरीमुळे. (उत्पत्ति ३५:१७-१९) कालांतराने, प्राचीन काळचे सर्व विश्वासू लोक मरण पावले—जादूटोणा किंवा शाप यांमुळे नव्हे तर वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे.
आपल्यावर येणाऱ्या सर्व आजारांवर अदृश्य आत्म्यांचा थेट संबंध आहे अशी कल्पना करणे खरे तर एक पाश ठरू शकतो. त्यामुळे आपल्या मनात अदृश्य आत्म्यांविषयी विकृत भीती निर्माण होऊ शकते. आणि मग, आपण आजारी पडतो तेव्हा त्यांच्यापासून दूर राहण्याऐवजी त्यांना खूष करायचा आपल्याला मोह होऊ शकतो. आणि सैतानाने आपल्याला घाबरवून दुरात्मिक चालीरीती अनुसरायला लावल्या तर आपण खरा देव यहोवाचा विश्वासघात केला असे होईल. (२ करिंथकर ६:१५) आपल्याला देवाबद्दलची आदरयुक्त भीती असली पाहिजे; त्याच्या शत्रूबद्दलची अंध भीती नव्हे.—प्रकटीकरण १४:७.
चिमुकल्या ओमाजीला तर आधीपासूनच दुरात्म्यांपासून शक्य ते सर्व संरक्षण आहे. प्रेषित पौलानुसार देव तिला सत्यात असलेल्या तिच्या आईमुळे “पवित्र” समजतो आणि तिची आई, देवाकडे त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तिचे संरक्षण करण्याकरता प्रार्थना करू शकते. (१ करिंथकर ७:१४) अचूक ज्ञानामुळे हावा, ताईतांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या चिमुकल्या ओमाजीला प्रभावकारी वैद्यकीय उपचार देऊ शकली.
आजारपणाची विविध कारणे
बहुतेक लोकांचा दुरात्म्यांवर विश्वास नाही. ते आजारी पडतात तेव्हा परवडत असेल तर डॉक्टरांकडे जातात. अर्थातच, कधीकधी डॉक्टरच्या अनेक उपायानंतरही रोगी बरा होत नाही. डॉक्टर चमत्कार करू शकत नाहीत. परंतु अंधश्रद्धा बाळगणारे पुष्कळ लोक, जे लगेच बरे होऊ शकत होते ते खूप उशीर झाल्यावर डॉक्टरकडे जातात. पहिल्यांदा ते तंत्रमंत्राने आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा त्यांना यश मिळत नाही तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरकडे जातात. यामुळे पुष्कळ लोकांचा फुकटच मृत्यू होतो.
इतर लोकांवर अज्ञानामुळे अकाली मृत्यू ओढावतो. त्यांना आजाराची लक्षणे ओळखता येत नाहीत व आजारपण टाळण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत ते त्यांना माहीत नसते. ज्ञान एखाद्याला अनावश्यक दुःख टाळण्यास मदत करते. अशिक्षित मातांपेक्षा शिक्षित मातांची मुले आजारामुळे कमी प्रमाणात मृत्यूमुखी पडतात ही गोष्ट उल्लेखण्याजोगी आहे. होय, अज्ञानीपणा घातक ठरू शकतो.
आजारपणाचे आणखी एक कारण आहे, दुर्लक्ष. उदाहरणार्थ, पुष्कळ लोक जेवणावर किटकांना फिरू देतात आणि मग असले अन्न खाल्ल्यामुळे ते आजारी पडतात किंवा स्वयंपाक करणारे लोक जेवण बनवण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धूत नसल्यामुळे पुष्कळ जण आजारी पडतात. मलेरिया ग्रस्त भागांत मच्छरदाणी न लावता झोपणे देखील घातक आहे.a आरोग्याच्या बाबतीत, “उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.” हे खरे आहे.
अविचारीपणे जीवन जगल्यामुळे लाखो लोक आजारी पडतात व त्यांचा अकाली मृत्यू होतो. दारूबाजी, लैंगिक अनैतिकता, अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तंबाखूचे सेवन यांमुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. या सवयी जडलेला मनुष्य आजारी पडतो तेव्हा त्याचा अर्थ, त्याच्यावर कोणीतरी जादूटोणा केला किंवा दुरात्म्याने त्याच्यावर हल्ला केला म्हणून तो आजारी पडला, असा होतो का? नाही, ती व्यक्ती स्वतःच तिच्या आजारासाठी कारणीभूत आहे. दुरात्म्यांना दोष देणे म्हणजे, अविचारी जीवनशैलीची जबाबदारी झटकणे होय.
अर्थातच, काही गोष्टींवर आपण नियंत्रण करू शकत नाही. जसे की, ज्यांमुळे रोग होतात असे सूक्ष्म जंतू किंवा प्रदूषण यांचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. ओमाजीच्या बाबतीत असेच झाले होते. आपल्या मुलीला अतिसार का होत आहे हे तिच्या आईला समजले नाही. दुसऱ्या मुलांप्रमाणे हावाची मुले सहसा आजारी पडत नाहीत कारण ती आपले घर आणि अंगण स्वच्छ ठेवते व स्वयंपाकाला सुरवात करण्याआधी नेहमी हात धुते. परंतु सर्वच मुले कधी ना कधी तरी आजारी पडतातच. अतिसार २५ विविध जैविक संसर्गांमुळे होऊ शकतो. ओमाजीला कोणत्या संसर्गामुळे त्रास सुरू झाला हे कदाचित कोणाला माहीतही नसेल.
दीर्घोपाय
आपल्या आजारपणाचा दोष देवाला दिला जाऊ शकत नाही. “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.” (याकोब १:१३) यहोवाचा कोणताही उपासक आजारी पडतो तेव्हा तो त्याला आध्यात्मिकरीत्या सांभाळतो. “तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला संभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलितोस.” (स्तोत्र ४१:३) होय, देव करुणामय आहे. तो आपल्याला दुःख नव्हे तर मदत देवू इच्छितो.
यहोवाकडे आजारपणावर दीर्घोपाय आहे—येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान. येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे धार्मिक लोकांना आपल्या पापी अवस्थेतून सुटका मिळते आणि कालांतराने त्यांना परादीस पृथ्वीवर परिपूर्ण आरोग्य व सार्वकालिक जीवन मिळेल. (मत्तय ५:५; योहान ३:१६) येशूचे चमत्कार हे, देवाच्या राज्याद्वारे लोकांना बरे केले जाईल याची पूर्व झलक होती. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांनाही देव काढून टाकील. (रोमकर १६:२०) होय, यहोवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी त्याने अद्भुत गोष्टी राखून ठेवल्या आहेत. आपल्याला फक्त सहनशीलता व धीर हवा.
पण तोपर्यंत देव, बायबल आणि विश्वासू उपासकांच्या जगव्याप्त बंधुसमाजाद्वारे व्यावहारिक बुद्धी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देत आहे. आरोग्याच्या समस्या ज्यामुळे उद्भवू शकतात त्या गोष्टी आपण कशा टाळू शकतो हे तो दाखवतो. आणि समस्या येतात तेव्हा त्या कशा सोडवाव्यात हे दाखवण्यासाठी त्याने आपल्याला खरे मित्र दिले आहेत.
ईयोबाचा विचार करा. ईयोब मांत्रिकाकडे गेला असता तर त्याचे खूप वाईट झाले असते! तो देवाच्या संरक्षणाला मुकला असता आणि त्याच्यावर आलेल्या संकटानंतर त्याला जितके आशीर्वाद मिळाले ते सर्व त्याने गमावले असते. देव ईयोबाला विसरला नाही आणि तो आपल्यालाही विसरणार नाही. “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे,” असे शिष्य याकोब लिहितो. (याकोब ५:११) आपणही हार मानली नाही तर देवाच्या उचित समयी अद्भुत आशीर्वाद प्राप्त करू.
ओमाजीचे काय झाले? टेहळणी बुरूज मासिकाबरोबरच निघणाऱ्या सावध राहा! मासिकात रिहायड्रेशन उपचाराबद्दलचा एक लेख तिच्या आईला आठवला.b त्यातील सूचनांनुसार तिने ओमाजीसाठी एक पेय बनवले. आता ही चिमुरडी चांगली ठणठणीत आहे.
[तळटीपा]
a जवळजवळ ५० कोटी लोकांना मलेरिया होतो. सुमारे २० लाख लोक बहुतेककरून आफ्रिकेत दर वर्षी या आजाराला बळी पडतात.
b सावध राहा! (gbr-MR) पृष्ठे ६-३, “जीवन वाचविणारे एक खारट पेय!” लेख पाहा.
[७ पानांवरील चित्रं]
यहोवाने आजारपणावर कायमचा उपाय योजला आहे