आजारपणाचे गूढ
चिमुकल्या ओमाजीला अतिसार झाला आहे. मुलीला निर्जलीकरण होते की काय अशी भीती तिच्या आईला म्हणजे हावाला लागली आहे; कारण गावी असलेल्या तिच्या एका चुलत बहिणीचे बाळ अलिकडे याकारणानेच मृत्यू पावले होते. ओमाजीला मांत्रिकाकडे न्यावे असे हावाच्या सासूचे म्हणणे आहे. “दुरात्मा बाळाला आजारी पाडतोय, तू तिला ताईत घातलं नाहीस ना, म्हणूनच हा त्रास तिला सुरू झालाय बघ!” अशी ती हावाला म्हणते.
अशी परिस्थिती जगाच्या बहुतेक भागांत पाहायला मिळते. लाखो लोकांना वाटते, की आजारपणाचं अज्ञात कारण दुरात्मेच आहेत. हे खरे आहे का?
रहस्याची सुरवात
अदृश्य दुरात्मे आजारपण आणतात हे तुम्ही स्वतः कदाचित कबूल करणार नाही. खरे तर तुम्ही विचार कराल, की लोकांनी तरी असा विचार का करावा कारण शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे, की बहुतेक आजार विषाणू व सूक्ष्मजंतूंमुळे होतात. पण एक गोष्ट विसरू नका; मानवजातीला सुरवातीपासून या सूक्ष्म रोगजनकांची माहिती नव्हती. ॲन्टोनी व्हॅन लिउवेनहोकने १७ व्या शतकात सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्यानंतरच मानवी डोळ्यांना सूक्ष्म जग दिसू लागले. तरीसुद्धा, १९ व्या शतकात लोईस पास्टरच्या संशोधनानंतरच विज्ञान, रोगजनक आणि रोग यांच्यातील संबंध समजू लागले.
मानवांना पुष्कळ काळापर्यंत आजारपणाचे कारण माहीत नसल्यामुळे, पुष्कळ अंधश्रद्धा निर्माण झाल्या; यात, सर्व आजार दुष्टात्म्यांमुळे होतात ही अंधश्रद्धा देखील होती. या अंधश्रद्धांचा विकास कसा झाला असावा याचे एक कारण द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका मध्ये सांगितले आहे. विश्वकोश म्हणतो, की प्राचीन काळी, रोग बरा करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या जडीबुटी आणि मिळेल त्याद्वारे रोग्याला बरे करण्याचा प्रयत्न केला. कधीकधी त्यांचे हे औषध चालायचे. मग, रोग बरा करणारा मनुष्य खूप काही तंत्रमंत्र करायचा, असे करून आजार ज्यामुळे बरा झाला तो खरा उपाय लोकांपासून लपवला जायचा. पण लोकांवर तो मांत्रिक इतका प्रभाव पाडायचा की ते पुन्हा त्याच्याकडेच जायचे. अशाप्रकारे औषध राहिले बाजूला आणि लोक मदतीसाठी अलौकिक विश्वाकडून साह्य मिळवण्याचा प्रयत्न करू लागले.
परंपरेनुसार चालत आलेल्या या रूढी आजही अनेक देशांत चालू आहेत. पुष्कळांचे म्हणणे आहे, की आजारपण मृत पूर्वजांच्या आत्म्यांमुळे येते. काहीजण म्हणतात, की देव लोकांना आजारी पाडतो व आजारपण हे आपल्या पापांची शिक्षा आहे. सुशिक्षित लोकांना आजारपणाचे जैविक कारण माहीत असते तरीसुद्धा अलौकिक प्रभावांकडून आपल्याला त्रास होईल अशी त्यांना भीती असते.
चेटूक करणारे व मांत्रिक, लोकांना असलेल्या याच भीतीचा गैरफायदा घेतात. तेव्हा, आपण काय विश्वास केला पाहिजे? आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आपण दुरात्म्यांच्या साहाय्याची अपेक्षा केल्याने काही उपयोग होतो का? बायबल काय म्हणते?