वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१५ पृ. ४-७
  • “खरे जीवन” लुटा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “खरे जीवन” लुटा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तेव्हा “खरे जीवन”
  • “खरे जीवन” वास्तविकता आहे—ते मिळवण्याचा प्रयत्न करा!
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
  • विश्‍वासू जणांना दिलेली अभिवचने यहोवा पूर्ण करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवावर त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी भाव ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • शांतीदायक नवीन जगातील जीवन
    शांतीदायक नवीन जगातील जीवन
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१५ पृ. ४-७

“खरे जीवन” लुटा

यहोवा देवाने मानवाच्या मनात अनंतकालाची कल्पना घातली आहे. (उपदेशक ३:११) यामुळे, मृत्यूपुढे मानवाचे काहीही चालत नसले, तरी त्याच्यामध्ये जगण्याची एक नितान्त इच्छा असते.

देवाचे प्रेरित वचन, पवित्र बायबल आपल्याला फार मोठी आशा देते. (२ तीमथ्य ३:१६) प्रीती हा प्रमुख गुण असलेला यहोवा, मानवाला चिरकालतेची कल्पना समजण्याच्या कुवतीसह निर्माण करतो आणि मग काही वर्षांचेच जीवन त्याच्या पदरी टाकतो, हे शक्य नाही. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे दुःख भोगण्यासाठी आपल्याला निर्माण करणे हे देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाशी अगदीच विसंगत आहे. ‘नैसर्गिक नियमानुसार पकडले जाऊन नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे’ आपल्याला निर्माण करण्यात आले नव्हते.—२ पेत्र २:१२.

यहोवा देवाने आदाम आणि हव्वेला जन्मतःच चिरकालतेची भावना देऊन काहीतरी “फार चांगले” निर्माण केले होते; अनंतकाळ जगण्याच्या क्षमतेसह त्याने त्यांना निर्माण केले होते. (उत्पत्ति १:३१) पण खेदाची गोष्ट म्हणजे, पहिल्या जोड्याने स्वतंत्र इच्छेचा दुरुपयोग केला; निर्माणकर्त्याच्या स्पष्ट हुकूमाचे उल्लंघन केले व आपले मूळ परिपूर्णत्व गमावले. परिणामतः ते मरण पावले; अपरिपूर्णता आणि मृत्यूचा वारसा त्यांनी आपल्या वंशाच्या हवाली केला.—उत्पत्ति २:१७; ३:१-२४; रोमकर ५:१२.

जीवनाचा उद्देश व मृत्यू काय आहे याविषयी बायबल आपल्याला अंधारात ठेवत नाही. बायबल म्हणते, की मनुष्य मेल्यावर कसलाही “उद्योग, युक्‍तिप्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान” नसते आणि मृत लोकांना “काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५, १०) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे म्हणजे, मेलेले खरोखरच मेलेले असतात. अमर आत्म्याची शिकवण बायबलमधून नसल्यामुळे मृतांच्या स्थितीविषयी असे कसलेही गूढ राहिलेले नाही जे उकलणे बाकी आहे.—उत्पत्ति ३:१९; स्तोत्र १४६:४; उपदेशक ३:१९, २०; यहेज्केल १८:४.a

देवाचा एक उद्देश होता; त्याने पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून” निर्माण केली नाही. तर, परादीसमय वातावरणात परिपूर्ण लोकांची तिच्यावर ‘वस्ती’ व्हावी म्हणून त्याने ती बनवली होती आणि आजही देवाचा तोच उद्देश आहे. (यशया ४५:१८; मलाखी ३:६) तो उद्देश पूर्ण करण्याकरता त्याने त्याच्या पुत्राला पृथ्वीवर पाठवले. मरेपर्यंत विश्‍वासू राहण्याद्वारे येशू ख्रिस्ताने मानवाला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्याचा मार्ग तयार केला. किंबहुना, येशू म्हणाला: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

फार पूर्वी देवाने अभिवचन दिले, की तो “नवे आकाश व नवी पृथ्वी” निर्माण करणार आहे. (यशया ६५:१७; २ पेत्र ३:१३) त्यासाठी त्याला विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या एका मर्यादित गटाला स्वर्गीय जीवनासाठी निवडावे लागणार होते. येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचे एक शासकीय केंद्र तयार होते. बायबलमध्ये याला “स्वर्गाचे राज्य” किंवा “देवाचे राज्य” म्हटले आहे; ते “पृथ्वीवर” राज्य करील. (मत्तय ४:१७; १२:२८; इफिसकर १:१०; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३) विश्‍वातील सर्व अधार्मिकता काढून पृथ्वीला स्वच्छ केल्यावर देव एक धार्मिक नवा मानवी समाज किंवा “नवी पृथ्वी” आणील. यामध्ये असे लोक असतील ज्यांना देवाने या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या जवळ येऊन ठेपलेल्या नाशातून वाचवलेले असेल. (मत्तय २४:३, ७-१४, २१; प्रकटीकरण ७:९, १३, १४) अभिवचन दिलेल्या पुनरुत्थानात ज्यांना पुन्हा जिवंत केले जाईल तेही या लोकांमध्ये सामील होतील.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

तेव्हा “खरे जीवन”

“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो,” असे म्हणून देवाने भवितव्यातील परादीसमय पृथ्वीवरील जीवनाच्या रोमांचकारी वर्णनाला पुष्टी दिली. (प्रकटीकरण २१:५) मानवजातीसाठी देव जी अद्‌भुत कामे करणार आहे त्यांचे पूर्णपणे आकलन होणे मानवी बुद्धीला शक्य नाही. तो संपूर्ण पृथ्वीला परादीस बनवेल; एदेन बागेचा तो नमुना असेल. (लूक २३:४३) एदेनप्रमाणेच येथेही सौंदर्य, सुखावह रंगसंगती, सुंदर आवाज आणि चव असेल. दारिद्र्‌य आणि अन्‍नटंचाई नसेल; कारण बायबल म्हणते, तेव्हा “पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” असतील. (प्रकटीकरण २१:४; स्तोत्र ७२:१६) “मी रोगी आहे” असे कोणीही म्हणणार नाही कारण तेव्हा आजारपण कायमचे काढून टाकले जाईल. (यशया ३३:२४) होय, ज्या ज्या गोष्टींमुळे दुःख होते त्या त्या सर्व गोष्टी नाहीशा केल्या जातील, अगदी मानवजातीचा जुना शत्रू मृत्यू देखील. (१ करिंथकर १५:२६) ख्रिस्ताच्या राजवटीखालील नवीन मानवी समाजाच्या अर्थात ‘नव्या पृथ्वीच्या’ आश्‍चर्यचकित करणाऱ्‍या दृष्टान्तात प्रेषित योहानाने एक वाणी ऐकली जी असे म्हणाली: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” या ईश्‍वरी अभिवचनाच्या पूर्ततेपेक्षा आणखी मोठे सांत्वन आणि आनंद दुसऱ्‍या कोणत्या गोष्टीने मिळेल?

भवितव्यातील जीवनाचे वर्णन करताना बायबल खासकरून, मानवाच्या नैतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाकांक्षांना तृप्त करणाऱ्‍या परिस्थितींबद्दल ठळकपणे सांगते. मानवजात आजपर्यंत ज्या वाजवी ध्येयांसाठी फुकटच झटली आहे ती सर्व ध्येये पूर्णार्थाने गाठता येतील. (मत्तय ६:१०) याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्याला न्याय मिळावा असे लोकांना वाटते पण तो काही मिळत नाही कारण दुर्बळांवर वर्चस्व गाजवणाऱ्‍या क्रूर जुलूमकर्त्यांनी मानवाला नेहमीच दुःख दिले आहे. (उपदेशक ८:९) ख्रिस्ताच्या राजवटीखालील परिस्थितीविषयी स्तोत्रकर्त्याने भविष्यसूचकपणे असे लिहिले: “त्याच्या दिवसांत न्यायी भरभराटीस येईल आणि . . . उदंड शांति होईल.”—स्तोत्र ७२:७, पं.र.भा.

समानता ही आणखी एक इच्छा आहे ज्याच्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. “पुनरुत्पत्तीत” देव सर्वप्रकारचा भेदभाव नाहीसा करील. (मत्तय १९:२८) सर्वांना समान आदर दिला जाईल. कोणत्याही कठोर सरकारी राजवटीद्वारे ही समानता अंमलात आणली जाणार नाही. तर भेदभावाला कारणीभूत असलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील; त्याचप्रमाणे, दुसऱ्‍यावर सत्ता चालवण्यास किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्ता बळकावण्यास लोकांना प्रवृत्त करणारा लोभ आणि गर्वही नाहीसा होईल. यशयाने भाकीत केले: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

व्यक्‍तिगत आणि सामूहिक झगड्यांमुळे होणाऱ्‍या रक्‍तपाताचा मानवाला किती त्रास सहन करावा लागला! हाबेलाच्या हत्येपासून आजच्या काळापर्यंतच्या युद्धापर्यंत हे चालूच आहे. मानवांनी शांती यावी म्हणून किती आशा ठेवली, किती थांबून राहिले परंतु सर्व काही व्यर्थच! पुनर्स्थापित परादीसमध्ये सर्व लोक शांतिमय व नम्र असतील; “ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

यशया ११:९ म्हणते: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आणि इतर कारणांमुळे आपण वरील शब्दांचा काय अर्थ आहे हे आज पूर्णपणे समजू शकत नाही. देवाच्या परिपूर्ण ज्ञानाने त्याच्याशी आपला समेट कसा घडून येईल आणि त्यामुळे आपल्याला आनंद कसा मिळेल हे आपल्याला कदाचित नंतर शिकायला मिळेल. परंतु यहोवा देव शक्‍ती, बुद्धी, न्याय आणि प्रीती यांबाबतीत अद्‌भुत आहे असे शास्त्रवचने आपल्याला सांगत असल्यामुळे ‘नव्या पृथ्वीच्या’ सर्व रहिवाशांनी केलेल्या प्रार्थना तो ऐकेल याची आपण खात्री बाळगू शकतो.

“खरे जीवन” वास्तविकता आहे—ते मिळवण्याचा प्रयत्न करा!

अनेकांना वाटते, की चांगल्या जगात चिरकालिक जीवन हे केवळ एक स्वप्न किंवा भ्रम आहे. परंतु, बायबलच्या भविष्यवाण्यांवर ज्यांचा खरोखर विश्‍वास आहे त्यांच्याकरता ही आशा एक वास्तविकता आहे. ती त्यांच्या जीवाला नांगराप्रमाणे आहे. (इब्री लोकांस ६:१९) नांगर जसा एखाद्या जहाजाला भरकटू देत नाही तर स्थिर ठेवतो त्याचप्रमाणे चिरकालिक जीवनाची आशा देखील लोकांना स्थिर करते, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करते तसेच जीवनातील गंभीर समस्यांना तोंड देऊन त्यांच्यावर मात करण्यास मदत करते.

देव आपली अभिवचने पूर्ण करील अशी आपण खात्री बाळगू शकतो. त्याने, न बदलणारे वचन देऊन अर्थात शपथ घेऊन पूर्णतेची हमी दिली आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाने आपण दिलेल्या वचनाच्या वतनदारांना आपल्या संकल्पाचे अढळपण विशेष दाखवावे या इच्छेने शपथ वाहून तो संकल्प स्थापित केला. यासाठी की, ज्यांविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा न पालटणाऱ्‍या दोन गोष्टींच्याद्वारे . . . आपणांस आपल्यासमोर ठेवलेली आशा धरून ठेवायला जोरदार उत्तेजन मिळावे.” (इब्री लोकांस ६:१७, १८, पं.र.भा.) त्या ‘न पालटणाऱ्‍या दोन गोष्टी’ ज्या देव कधीच रद्द करू शकत नाही त्या आहेत, त्याचे अभिवचन आणि त्याची शपथ; त्यांच्याच आधारावर आपण आशा ठेवली आहे.

देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवल्याने खूप सांत्वन व आध्यात्मिक बळ मिळते. इस्राएल लोकांचा नेता यहोशवा याच्याकडे अशाप्रकारचा विश्‍वास होता. यहोशवाने इस्राएल लोकांना शेवटचे भाषण दिले तेव्हा तो म्हातारा झाला होता व आपण जास्त दिवस जगणार नाही हे त्याला माहीत होते. तरीसुद्धा, देवाच्या अभिवचनांवर त्याचा पूर्ण भरवसा असल्यामुळे त्याने शक्‍ती व अतूट निष्ठा प्रदर्शित केली. मी “जगाच्या रहाटीप्रमाणे,” म्हणजे मानवजातीला मृत्यूकडे नेणाऱ्‍या मार्गावर जात आहे, असे म्हणाल्यावर यहोशवा पुढे म्हणाला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” होय, देव आपली सर्व अभिवचने पूर्ण करतो असे यहोशवाने तीन वेळा म्हटले.—यहोशवा २३:१४, (तिरपे वळण आमचे).

लवकरच स्थापन होणाऱ्‍या नवीन जगाविषयी देवाने दिलेल्या अभिवचनाबद्दल तुम्हीही असाच विश्‍वास दाखवू शकता. बायबलचा गंभीरपणे अभ्यास केल्यावर, यहोवा कोण आहे व तो तुमच्या पूर्ण भरवशास पात्र का आहे हे तुम्हाला कळेल. (प्रकटीकरण ४:११) अब्राहाम, सारा, इसहाक, याकोब आणि इतर प्रारंभिक विश्‍वासू जनांना यहोवा देवाच्या पूर्ण ज्ञानाच्या आधारावर अतूट विश्‍वास होता. ते जिवंत होते तोपर्यंत “त्यांना देवाच्या अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही,” तरीसुद्धा त्यांनी दृढ आशा बाळगली. मात्र, त्यांना “दुरूनच [अभिवचनाचे] दर्शन घडले व त्यांनी त्याचे स्वागत केले.”—इब्री लोकांस ११:१३, मराठी कॉमन लँग्वेज.

बायबल भविष्यवाणींचा अर्थ आपल्याला समजल्यामुळे आपल्याला कळते की ‘सर्वसमर्थ देवाचा मोठा दिवस’ जवळ आला आहे ज्यावेळी पृथ्वीवरील सर्व दुष्टाई काढून टाकली जाईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) प्राचीन विश्‍वासू लोकांप्रमाणे आपणही, विश्‍वासाने त्याचप्रमाणे देवाबद्दलच्या आणि ‘खऱ्‍या जीवनाबद्दलच्या’ प्रीतीने प्रवृत्त होऊन पूर्ण भरवशाने भवितव्यातील घटनांची आशा केली पाहिजे. नवीन जग जवळ आले आहे त्यामुळे यहोवावर विश्‍वास व प्रेम करणाऱ्‍यांना जोरदार प्रेरणा मिळते. जवळ येऊन ठेपलेल्या देवाच्या महान दिवसादरम्यान त्याची कृपापसंती व संरक्षण मिळवायचे असेल तर अशाप्रकारचा विश्‍वास व प्रीती विकसित करणे आवश्‍यक आहे.—सफन्या २:३; २ थेस्सलनीकाकर १:३; इब्री लोकांस १०:३७-३९.

तेव्हा, तुम्हाला जीवन प्रिय आहे का? शिवाय, आनंदी जीवनाची होय, चिरकालिक जीवनाची आशा असलेल्या देवाच्या स्वीकृत सेवकाचे जीवन अर्थात “खरे जीवन” जगण्याची तुमची इच्छा आहे का? हेच जीवन मिळवायचा तुमचा प्रयत्न आहे तर प्रेषित पौलाच्या सल्ल्याकडे लक्ष द्या; ‘चंचल धनावर नव्हे तर जिवंत देवावर आशा ठेवा’ असे त्याने लिहिले. “खरे जीवन ते बळकट धरण्यास” देवाचा आदर करणाऱ्‍या “सत्कर्माविषयी धनवान असावे” असेही त्याने पुढे लिहिले.—१ तीमथ्य ६:१७-१९.

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारून तुम्ही “सार्वकालिक जीवन” देणारे ज्ञान प्राप्त करू शकता. (योहान १७:३) केवढ्या प्रेमाने, पित्यासमान असलेल्या देवाचे हे आमंत्रण बायबलमध्ये सर्वांसाठी दिले आहे: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील.”—नीतिसूत्रे ३:१, २.

[तळटीपा]

a या विषयाच्या सविस्तर माहितीकरता, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी), हे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित माहितीपत्रक पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा