“नम्रतारूपी कमरबंद बांधा”
“देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.
१, २. परस्परविरोधी असणाऱ्या कोणत्या दोन मानसिक प्रवृत्तींमुळे लोकांच्या बोलण्या-चालण्यावर खूप प्रभाव पडतो?
देवाच्या वचनात ज्या अनेक प्रवृत्तींविषयी सांगण्यात आले आहे, त्यांपैकी दोन प्रवृत्ती परस्परांच्या अगदी विरुद्ध आहेत. आणि या दोन्ही प्रवृत्तींचा लोकांच्या बोलण्या-चालण्यावर खूप प्रभाव पडतो. त्यांपैकी एक आहे ‘नम्रता.’ (१ पेत्र ५:५) “नम्र” या शब्दाचा एका शब्दकोशात असा अर्थ सांगण्यात आला आहे, “वागण्यात आणि एकंदर प्रवृत्तीत विनयशील असणे: अहंकाराचा, गर्वाचा जरासुद्धा गंध नसणे.” नम्रता अथवा लीनता देवाच्या दृष्टीने अत्यंत इष्ट गुण आहे.
२ याच्या विरुद्ध असणारी प्रवृत्ती म्हणजे गर्व. याची अशी व्याख्या केली जाते, “अवाजवी आत्माभिमान” बाळगणे किंवा “तुच्छ” लेखणे. गर्विष्ठ प्रवृत्तीचा माणूस आत्मकेंद्रित असतो; तो स्वतःच्याच फायद्याच्या, भौतिकवादी गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो, मग इतरांचे नुकसान झाले तरी त्याला त्याची काही पर्वा नसते. अशा प्रवृत्तीचा काय परिणाम होतो याविषयी बायबल म्हणते: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” तसेच बायबलमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की आपसांत ‘चढाओढ’ करणे जणू “वायफळ उद्योग” आहे कारण मनुष्य मरताना ‘आपल्या श्रमाचे काहीही फळ सोबत घेऊन जाऊ शकत नाही.’ अशा प्रकारच्या गर्वाचा देवाला वीट आहे.—उपदेशक ४:४; ५:१५; ८:९.
जगात सर्रास दिसणारा आत्मा
३. जगामध्ये कोणता आत्मा सर्रासपणे आढळतो?
३ वरील दोन प्रवृत्तींपैकी कोणती प्रवृत्ती आज जगामध्ये सर्रास आढळून येते? जगात सर्रासपणे कोणत्या प्रकारचा आत्मा दिसून येतो? जागतिक लष्कर आणि सामाजिक खर्च १९९६ (इंग्रजी) या पुस्तकाने असे म्हटले: “या २० व्या शतकात जितका . . . पाशवी हिंसाचार झाला तितका इतर कोणत्याही शतकात झाला नाही.” राजकीय सत्ता आणि आर्थिक संपत्तीसाठी चढाओढ—तसेच राष्ट्रीय, धार्मिक, जातीय आणि वांशिक संघर्ष—यांमुळे या शतकात दहा कोटींपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. व्यक्तिगत पातळीवर देखील हे आत्मकेंद्रित वर्तन वाढल्याचे दिसून येते. शिकागो ट्रिब्युन या वृत्तपत्राने असे म्हटले: “बेपर्वाईने केलेली हिंसा, मुलांवर अत्याचार, घटस्फोट, दारूबाजी, एड्स, किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या, मादक पदार्थ, टोळीयुद्धे, बलात्कार, व्यभिचार, गर्भपात, अश्लील साहित्य . . . खोटे बोलणे, फसवणे, राजकीय भ्रष्टाचार या सर्व गोष्टी म्हणजे समाजाला कीड लागल्याची लक्षणे आहेत. . . . बरोबर आणि चूक ही नैतिक संकल्पनाच नाहीशी झाली आहे.” संयुक्त राष्ट्र इतिवृत्त (इंग्रजी) या मासिकाने असा इशारा दिला: “समाजाचा ऱ्हास होत चालला आहे.”
४, ५. आपल्या दिवसाकरता केलेल्या बायबलमधील भविष्यवाणीत जगाच्या आत्म्याचे अचूक वर्णन कशाप्रकारे दिले आहे?
४ ही परिस्थिती संपूर्ण जगभर पाहायला मिळते. आणि ती आपल्या काळासंबंधाने करण्यात आलेल्या या बायबलमधील भविष्यवाणीशी तंतोतंत जुळते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली” अशी होतील.—२ तीमथ्य ३:१-४.
५ या जगात व्यापक प्रमाणात आढळणाऱ्या प्रवृत्तीचे हे अचूक वर्णन आहे. ही प्रवृत्ती म्हणजे मी-पणाची प्रवृत्ती. राष्ट्रांमधील संघर्षाच्या भावना सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारांतही दिसून येतात. उदाहरणार्थ, स्पर्धात्मक खेळांमध्ये, बऱ्याच खेळाडूंना आपणच अव्वल ठरावे असे वाटते, मग यामुळे इतरांना भावनात्मकरित्या किंवा शारीरिकरित्या देखील दुखापत झाली तरी त्यांना काही वाटत नाही. अशाप्रकारची आत्मकेंद्रित प्रवृत्ती लहान वयात वाढीस लागते आणि मोठे झाल्यानंतरही जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये ती डोकावते. परिणामस्वरूप, “वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी” निर्माण होतात.—गलतीकर ५:१९-२१.
६. स्वार्थी मानसिकतेला खतपाणी घालणारे कोण आहेत आणि यहोवाला अशा मानसिकतेविषयी काय वाटते?
६ बायबल हे दाखवून देते, की या जगाची आत्मकेंद्रित प्रवृत्ती ही मुळात ‘सर्व जगाला ठकविणाऱ्या दियाबलाची, सैतानाची’ प्रवृत्ती आहे. या शेवटल्या कठीण काळातील लोकांवर पडणाऱ्या सैतानाच्या प्रभावाविषयी बायबल भाकीत करते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:९-१२) त्यामुळे सैतानाने आणि त्याच्या दुष्टात्म्यांनी मानवी कुटुंबात स्वार्थी मानसिकतेला खतपाणी घालण्याचे प्रयत्न आणखी तीव्र केले आहेत. पण यहोवाला अशा प्रवृत्तीविषयी कसे वाटते? त्याचे वचन म्हणते: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.”—नीतिसूत्रे १६:५.
यहोवा दीन लोकांसोबत आहे
७. लीन लोकांकडे यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो आणि तो त्यांना काय शिकवतो?
७ पण, लीन मनाच्या लोकांना यहोवा आशीर्वादित करतो. यहोवाला गायलेल्या गीतामध्ये राजा दावीदाने म्हटले: “दीन जनांस तू तारितोस, उन्मत्त जनांवर दृष्टि ठेवून त्यांचा अधःपात करितोस.” (२ शमुवेल २२:१, २८) म्हणून देवाच्या वचनात असा सल्ला दिला आहे: “देशांतील सर्व नम्र जनांनो, . . . त्याचा आश्रय करा, [“यहोवाचा शोध घ्या,” NW] धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टिआड व्हाल.” (सफन्या २:३) यहोवाचा नम्रपणे शोध घेणाऱ्यांना तो जगाच्या प्रवृत्तीपेक्षा अगदी वेगळी मनोवृत्ती विकसित करण्याचे शिकवतो. “तो दीनांस आपला मार्ग शिकवतो.” (स्तोत्र २५:९; यशया ५४:१३) हा प्रेमाचा मार्ग आहे. देवाच्या दर्जांनुसार जे योग्य ते करणे, हेच या मार्गाचे मूलतत्त्व आहे. बायबलनुसार हे तत्त्वबद्ध प्रेम “बढाई मारीत नाही, फुगत नाही, . . . स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:१-८) शिवाय, हे प्रेम नम्रतेतून दिसून येते.
८, ९. (अ) तत्त्वबद्ध प्रेमाचा उगम कोण आहे? (ब) येशूने दाखवलेल्या प्रेमाचे आणि त्याच्या नम्रतेचे अनुकरण करणे महत्त्वाचे का आहे?
८ पौलाला आणि पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना अशाप्रकारच्या प्रेमाविषयी येशूच्या शिकवणींतून शिकायला मिळाले. आणि येशू स्वतः त्याच्या पित्याकडून, यहोवाकडून हे शिकला कारण बायबल म्हणते: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) येशूला माहीत होते की, त्याने प्रेमाच्या नियमानुरूप जगावे ही देवाची इच्छा आहे आणि तो त्यानुरूप जगलाही. (योहान ६:३८) त्यामुळेच त्याने पददलितांवर, गोरगरिबांवर आणि पातक्यांवर दया दाखवली. (मत्तय ९:३६) त्याने त्यांना म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय ११:२८, २९.
९ आपल्या प्रेमाचे आणि नम्रतेचे अनुकरण करण्याच्या महत्त्वाबद्दल येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. त्याने त्यांना असे म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) या स्वार्थी जगात त्यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे दिसून येणार होते. त्यामुळे आपल्या अनुयायांविषयी येशू असे म्हणू शकला, की ‘ते या जगाचे नाहीत.’ (योहान १७:१४) कारण ते सैतानाच्या जगाच्या गर्विष्ठ, स्वार्थी मनोवृत्तीचे अनुकरण करत नाहीत. त्याउलट ते येशूने दाखवलेल्या प्रेमाचे आणि नम्रतेचे अनुकरण करतात.
१०. आपल्या दिवसांतील नम्र लोकांना यहोवा काय करत आहे?
१० देवाच्या वचनात असे भाकीत करण्यात आले होते, की या शेवटल्या काळात नम्र जनांना एका जगव्याप्त समाजात एकत्रित केले जाईल; आणि हा समाज प्रेम आणि नम्रतेच्याच आधारावर उभारलेला असेल. अशाप्रकारे, दिवसेंदिवस स्वार्थी होत चाललेल्या या जगात यहोवाचे साक्षीदार अगदी त्याउलट असणारा गुण प्रदर्शित करतात—नम्रता. हे लोक म्हणतात: “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर [त्याच्या खऱ्या उच्च उपासनेकडे] . . . जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यशया २:२, ३) देवाच्या पथांनी चालणारा हा जगव्याप्त समाज म्हणजे यहोवाचे साक्षीदार. त्यांच्यामध्ये ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता येत नाही असा मोठा लोकसमुदाय आहे.’ (प्रकटीकरण ७:९) या मोठ्या लोकसमुदायाची संख्या आता लाखोंच्या घरात गेली आहे. या सर्वांना यहोवा नम्र होण्याकरता कशाप्रकारे प्रशिक्षण देत आहे?
नम्र व्हायला शिकणे
११, १२. देवाचे सेवक नम्रता कशी दाखवतात?
११ देवाचा आत्मा त्याच्या मर्जीनुसार चालण्यास इच्छुक असणाऱ्या त्याच्या लोकांत क्रियाशील आहे, आणि त्यामुळे ते या जगाच्या दुष्ट प्रवृत्तींवर मात करून देवाच्या आत्म्याची फळे प्रदर्शित करू शकतात. ही फळे “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारख्या गुणांतून दिसून येतात. (गलतीकर ५:२२, २३) हे गुण विकसित करण्याकरता देवाच्या सेवकांना असा सल्ला दिला जातो, की त्यांनी “पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२६) त्याचप्रमाणे प्रेषित पौलाने म्हटले: “मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, . . . मर्यादेने स्वतःला माना.”—रोमकर १२:३.
१२ देवाचे वचन खऱ्या ख्रिश्चनांना सल्ला देते: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना [देवाच्या सेवकांना] आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:३, ४) “तुम्ही केवळ स्वतःपुरताच विचार करू नये, तर दुसऱ्यांचाही विचार करावा.” (१ करिंथकर १०:२४, सुबोध भाषांतर) होय, प्रांजळ शब्दांतून आणि निःस्वार्थ कृतींतून “प्रीती [इतरांची] उन्नति करिते.” (१ करिंथकर ८:१) यामुळे स्पर्धात्मक प्रवृत्तीस नव्हे, तर सहकार्याच्या भावनेला चालना मिळते. मी-पणाच्या प्रवृत्तीस यहोवाच्या सेवकांमध्ये कोणतेही स्थान नाही.
१३. नम्रता का शिकण्यास हवी आणि ती कशी शिकता येते?
१३ पण, आपल्या वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे नम्रता हा गुण घेऊन आपण जन्माला येत नाही. (स्तोत्र ५१:५) तो आपल्याला शिकून आत्मसात करावा लागतो. पण ज्यांना लहानपणापासून यहोवाच्या मार्गांविषयी शिकायला मिळाले नाही, ज्यांनी बऱ्याच वर्षांनंतर ते स्वीकारले, अशा लोकांना हा गुण आत्मसात करणे कदाचित तितके सोपे जाणार नाही. कारण या जुन्या जगाच्या प्रवृत्तींच्या आधारावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आधीच आकार घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना ‘पूर्वीच्या आचरणासंबंधी त्यांच्या जुन्या मनुष्याचा त्याग’ करण्याचे आणि “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्याचे शिकून घ्यावे लागते. (इफिसकर ४:२२, २४) “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण” करण्याची देवाची अपेक्षा प्रामाणिक अंतःकरणाचे लोक त्याच्या मदतीने पूर्ण करू शकतात. (तिरपे वळण आमचे.)—कलस्सैकर ३:१२.
१४. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याची मनीषा बाळगण्याच्या विरोधात येशूने काय म्हटले?
१४ येशूच्या शिष्यांना हा गुण शिकून आत्मसात करावा लागला. प्रौढपणी येशूचे शिष्य बनल्यामुळे त्यांच्यामध्येही काही प्रमाणात जगाची स्पर्धात्मक भावना होती. त्यांच्यापैकी दोघांच्या आईने जेव्हा आपल्या मुलांना विशेष स्थान मिळावे अशी येशूकडे विनंती केली तेव्हा त्याने म्हटले: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात . . . तसे तुम्हामध्ये नाही; तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र [येशू] सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२०-२८) स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्यासाठी पदव्यांचा उपयोग करू नये असे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितल्यानंतर त्याने पुढे असे म्हटले: “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.”—मत्तय २३:८.
१५. पर्यवेक्षकाचे काम करू पाहणाऱ्यांनी कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
१५ येशूचा खरा अनुयायी हा सेवक असतो, अर्थात आपल्या ख्रिस्ती बांधवांचा दास असतो. (गलतीकर ५:१३) मंडळीमध्ये पर्यवेक्षक होऊ पाहणाऱ्या लोकांना हे तत्त्व विशेषत्वाने लागू होते. त्यांनी कधीही मोठेपणा किंवा अधिकार मिळवण्यासाठी आपसांत स्पर्धा करू नये; शिवाय, त्यांनी ‘देवाने त्यांच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करू नये, तर कळपाला कित्ता व्हावे.’ (१ पेत्र ५:३) स्वार्थी प्रवृत्तीवरून निश्चितच हे दिसून येते, की अशाप्रकारची मनोवृत्ती बाळगणारा मनुष्य मंडळीत पर्यवेक्षकाचे काम करण्यास योग्य नाही. असा मनुष्य मंडळीकरता घातक ठरू शकतो. ‘अध्यक्षाचे काम करू पाहणे’ यात गैर असे काही नाही, पण असे करताना आपल्या सहख्रिश्चनांची सेवा करण्याचा उद्देश मनी असला पाहिजे. हे काम म्हणजे उच्च स्थान किंवा अधिकाराचे पद नाही; पर्यवेक्षकांचे काम करणाऱ्यांनी तर मंडळीमध्ये सर्वात नम्र असले पाहिजे.—१ तीमथ्य ३:१, ६.
१६. देवाच्या वचनात दियत्रफेसची निर्भर्त्सना का करण्यात आली?
१६ यासंबंधी चुकीचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या एका मनुष्याविषयी प्रेषित योहान आपल्याला असे सांगतो: “मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही.” हा मनुष्य स्वतःला आणखीन अधिकार मिळावा म्हणून इतरांना अनादराने वागवत होता. पण बायबलमध्ये, मी-पणाची प्रवृत्ती बाळगणाऱ्या या दियत्रफेसची निर्भर्त्सना करण्यास देवाच्या आत्म्याने योहानाला प्रेरित केले.—३ योहान ९, १०.
योग्य मनोवृत्ती
१७. पेत्र, पौल आणि बर्णबा यांनी नम्रता कशी दाखवली?
१७ नम्रतेच्या योग्य मनोवृत्तीविषयी बायबलमध्ये कित्येक उदाहरणे आहेत. पेत्र, कर्नेल्याच्या घरी गेला तेव्हा त्याने “त्याच्या [पेत्राच्या] पाया पडून त्याला नमन केले.” पण या सत्काराचा स्वीकार करण्याऐवजी “पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मीहि मनुष्यच आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:२५, २६) पौल आणि बर्णबा लुस्त्रमध्ये होते तेव्हा पौलाने जन्मतः पांगळ्या असलेल्या एका मनुष्याला बरे केले. हे पाहून लोक म्हणू लागले, की हे प्रेषित देवच आहेत. पण पौल आणि बर्णबा “ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत.” (प्रेषितांची कृत्ये १४:८-१५) या नम्र ख्रिस्ती व्यक्तींनी लोकांकडून कधीच स्वतःचा गौरव करून घेतला नाही.
१८. एका शक्तिशाली देवदूताने नम्रपणे योहानाला काय म्हटले?
१८ प्रेषित योहानाला “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” एका देवदूताद्वारे देण्यात आले. (प्रकटीकरण १:१) देवदूताजवळ किती सामर्थ्य असते हे लक्षात घेता, योहानाचे भयचकित होणे समजण्यासारखे आहे, कारण एका देवदूताने एका रात्रीत अश्शुरी गोटातील १,८५,००० लोकांना ठार मारले होते. (२ राजे १९:३५) योहान सांगतो: “जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू . . . ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” (प्रकटीकरण २२:८, ९) या शक्तिशाली देवदूताने किती नम्रता दाखवली!
१९, २०. विजयी रोमी सेनापतींची घमंडी मनोवृत्ती आणि येशूची नम्रता यांतील भिन्नता दाखवा.
१९ नम्रतेच्या बाबतीत येशू सर्वात उत्तम उदाहरण होता. तो देवाचा एकुलता एक पुत्र, देवाच्या स्वर्गीय राज्याचा होणारा राजा होता. त्याने लोकांसमोर स्वतःला देवाच्या राज्याचा राजा म्हणून सादर केले तेव्हा तो त्या काळातील विजयी रोमी सेनापतींप्रमाणे लोकांसमोर मिरवला नाही. विजयी रोमी सेनापतींच्या सन्मानार्थ—जंगी मिरवणुका काढल्या जायच्या—त्यामध्ये सोन्याने आणि हस्तिदंताने सजवलेले, पांढऱ्या घोड्यांनी किंवा हत्ती, सिंह किंवा वाघ यांच्याद्वारे ओढण्यात येणारे शोभिवंत रथ रस्त्यांवरून निघत. या मिरवणुकांमध्ये विजयी गीते गायली जात. तसेच लुटीच्या वस्तूंनी भरलेल्या आणि युद्धांमधील देखाव्यांचे प्रदर्शन असलेल्या गाड्यासुद्धा या मिरवणुकांमध्ये असत. तसेच कैद केलेल्या राजांची, राजपुत्रांची आणि सेनापतींची व त्यांच्या कुटुंबियांची धींड काढली जात असे; त्यांचा अवमान करण्याकरता बहुतेक वेळा त्यांना विवस्त्र केले जात असे. या मिरवणुकी म्हणजे खरे तर त्या लोकांच्या गर्वाचे, घमंडाचे घृणास्पद प्रदर्शन होते.
२० पण, याउलट येशूने लोकांसमोर स्वतःला कशा पद्धतीने सादर केले हे विचारात घ्या. त्याच्याविषयी केलेल्या भविष्यवाणीनुसार त्याने नम्रपणे व स्वेच्छेने अधीनता दाखवली: “पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर . . . बसून येत आहे.” तो नम्रपणे ओझ्याच्या जनावरावर बसला; मिरवणुकींतल्या दिमाखदार रथात नव्हे. (जखऱ्या ९:९; मत्तय २१:४, ५) नव्या जगात सबंध पृथ्वीवर यहोवाचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्त राज्य करील ही सर्व नम्र लोकांसाठी किती आनंदाची गोष्ट आहे, कारण तो खऱ्या अर्थाने नम्र, लीन, प्रेमळ, सहानुभूतिशील व दयाशील आहे!—यशया ९:६, ७; फिलिप्पैकर २:५-८.
२१. नम्रता कशाचे लक्षण नाही?
२१ नम्रता म्हणजे दुबळेपणाचे लक्षण आहे, या धारणेला येशू, पेत्र, पौल आणि बायबल काळातील विश्वासू स्त्री-पुरुषांनी खरे तर फाटा दिला कारण ते स्वतः नम्र होते. नम्रता दुबळेपणाचे नव्हे, तर शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे कारण हे विश्वासू लोक धैर्यशील आणि आवेशी होते. त्यांच्याकडे असणाऱ्या विलक्षण मानसिक आणि नैतिक सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी कठीण परीक्षांना तोंड दिले. (इब्री लोकांस, अध्याय ११) आज देखील, यहोवाचे लोक नम्रता दाखवतात तेव्हा त्यांच्याकडेही या विश्वासू लोकांप्रमाणे सामर्थ्य असते कारण स्वतः देव नम्र लोकांना त्याच्या शक्तिशाली पवित्र आत्म्याद्वारे पाठबळ देतो. म्हणूनच, आपल्याला असे आर्जवले जाते: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे.”—१ पेत्र ५:५, ६; २ करिंथकर ४:७.
२२. पुढील लेखात कोणत्या गोष्टीची चर्चा करण्यात येईल?
२२ देवाच्या लोकांना अनुकरण करता येईल असा नम्रतेचा आणखी एक सकारात्मक पैलू आहे. नम्रतेच्या या पैलूमुळे मंडळीमध्ये प्रेमाची उभारणी होते आणि सहकार्याचा आत्मा विकसित होतो. किंबहुना हा नम्रतेचाच एक आवश्यक घटक आहे. त्याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.
उजळणी
◻ जगामध्ये सर्रास दिसणाऱ्या आत्म्याचे वर्णन करा.
◻ नम्र लोकांना यहोवा कशाप्रकारे आशीर्वादित करतो?
◻ नम्रता शिकून आत्मसात का करावी लागते?
◻ बायबलमध्ये दिलेली नम्रतेची काही उदाहरणे कोणती?
[१५ पानांवरील चित्र]
देवदूताने योहानाला म्हटले: “असे करू नको! मी तुझ्या सोबतीचा . . . दास आहे”