त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
प्रतिफलदायी ठरलेली भेट
शबाहून जेरुसलेमपर्यंतच्या प्रवासाने राणी अतिशय थकून गेली असावी. कारण तिला ऐषोआरामात राहण्याची सवय होती. आता ती उंटाच्या गतीने २,४०० किलोमीटरच्या खडतर प्रवासाला लागली होती आणि तेही तळपत्या वाळवंटातून. एका अंदाजानुसार, तिला जेरुसलेमपर्यंत फक्त जायलाच सुमारे ७५ दिवस लागले असावेत!a
पण या श्रीमंत राणीने शबातील आपले ऐषोआरामाचे घर सोडून हा शिणवून टाकणारा प्रवास का केला बरे?
कुतूहलजनक अहवाल
“परमेश्वराच्या [यहोवाच्या] नामासंबंधाने शलमोनाची कीर्ति” ऐकून शबाची राणी जेरुसलेमला आली. (१ राजे १०:१) राणीने नेमके काय ऐकले होते ते सांगण्यात आलेले नाही. पण आपल्याला इतके माहीत आहे, की यहोवाने शलमोनाला अतिशय बुद्धी, संपत्ती आणि सन्मान दिला होता. (२ इतिहास १:११, १२) हे राणीला कसे काय माहीत झाले बरे? शबा हे व्यापाराचे केंद्र असल्यामुळे तिच्या देशात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तिने शलमोनाची कीर्ती ऐकली असावी. यांतील काही व्यापारी, शलमोनाचे ज्या देशाशी बराच व्यापारी व्यवहार होता त्या देशात अर्थात ओफिर येथे जाऊन आले असावेत.—१ राजे ९:२६-२८.
असो, राणी “आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली.” (१ राजे १०:२अ) काहींचे म्हणणे आहे की “मोठा लवाजमा” यांत सशस्त्र संरक्षक होते. हे समजण्याजोगे आहे कारण, एकतर राणी ही शक्तिशाली प्रतिष्ठित व्यक्ती होती; शिवाय तिच्याबरोबर अंदाज लावता येत नाही इतक्या किंमतीचे सामानसुमान होते.b
पण, राणीने “परमेश्वराच्या [यहोवाच्या] नामासंबंधाने” शलमोनाची कीर्ती ऐकली होती, याकडे लक्ष द्या. तेव्हा हा प्रवास फक्त व्यापारी हेतूचा नव्हता. पुराव्यानुसार राणीने प्रामुख्याने शलमोनाच्या बुद्धीविषयी ऐकले होते—कदाचित त्याचा देव यहोवा याच्याविषयी ती माहीत करून घ्यायला आली असावी. ती कदाचित, यहोवाचे उपासक असलेल्या शेम किंवा हाम यांच्या वंशातून असल्यामुळे तिला आपल्या पूर्वजांच्या धर्माबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता असावी.
कूट प्रश्न, समाधानकारक उत्तरे
शलमोनाला भेटल्यावर राणी त्याला ‘कूट प्रश्न’ विचारून त्याची परीक्षा पाहू लागली. (१ राजे १०:१) येथे वापरण्यात आलेल्या इब्री शब्दाचे भाषांतर “कोडे” असे केले जाऊ शकते. पण याचा असा अर्थ होत नाही, की राणीने शलमोनाला क्षुल्लक खेळांमध्ये गुंग ठेवले. आस्थेची गोष्ट म्हणजे, स्तोत्र ४९:४ मध्ये, पाप, मृत्यू आणि सुटका यांच्याविषयीच्या गंभीर प्रश्नांचे वर्णन देण्याकरता त्याच इब्री शब्दाचा वापर करण्यात आला आहे. तेव्हा कदाचित, शबाच्या राणीने शलमोनाबरोबर अतिशय गहन विषयांवर चर्चा करण्याद्वारे त्याच्या बुद्धीच्या गहनतेची परीक्षा घेतली असावी. बायबल म्हणते, की “आपल्या मनांत जे काही होते ते सर्व ती त्याजपुढे बोलली.” आणि शलमोनाने “तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकहि गोष्ट नव्हती.”—१ राजे १०:२ब, ३.
शलमोनाची बुद्धी व त्याच्या राज्याचे ऐश्वर्य पाहून शबाची राणी इतकी प्रभावित झाली की ती “गांगरून गेली.” (१ राजे १०:४, ५) काहींच्या मते या वाक्यांशाचा अर्थ असा होतो, की राणीने आश्चर्याने आपला “श्वास रोखला.” एक विद्वान तर म्हणतात, की ती बेशुद्ध पडली! काहीही असो, ती जे पाहत होती व ऐकत होती त्यामुळे राणी चाट पडली. अशा राजाची सुज्ञता ऐकायला मिळत असल्यामुळे तिने शलमोनाच्या दासांना धन्य म्हटले; शलमोनाला सिंहासनावर विराजमान केल्याबद्दल तिने यहोवाचे आभार मानले. मग तिने राजाला किंमती देणग्या दिल्या; त्यातील फक्त सोन्याचीच किंमत आधुनिक किंमतीप्रमाणे ४,००,००,००० डॉलर होते. शलमोनानेही तिला देणग्या दिल्या; शलमोनाने, “तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरविली.”c—१ राजे १०:६-१३.
आपल्यासाठी धडा
शास्त्री आणि परुशांसाठी वस्तुपाठ म्हणून येशूने शबाच्या राणीचे उदाहरण दिले. तो त्यांना म्हणाला: “दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (मत्तय १२:४२) होय, देवाने दिलेल्या सुज्ञतेबद्दल शबाच्या राणीने मोठी कृतज्ञता दाखवली. शलमोनाचे सुज्ञ बोल ऐकायला ती २,४०० किलोमीटर दूर प्रवास करून आली होती तर शास्त्री आणि परुशी यांच्या अगदी समोर असलेल्या येशूचे त्यांनी किती लक्षपूर्वक ऐकायला हवे होते!
आपण आज महान शलमोन, येशू ख्रिस्त याला मनापासून कृतज्ञता दाखवू शकतो. ते कसे? एक मार्ग म्हणजे, “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” या त्याच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे. (मत्तय २८:१९) आणि दुसरा मार्ग आहे, येशूच्या उदाहरणाचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा जवळून विचार करून त्यांचे अनुकरण करण्याद्वारे.—फिलिप्पैकर २:५; इब्री लोकांस १२:२, ३.
महान शलमोनाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण आपल्याला त्याचे समृद्ध प्रतिफळ मिळेल. होय, आपण स्वत्यागी आत्मा दाखवला तर तो ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद आपल्यावर वर्षवेल’ असे यहोवा त्याच्या लोकांना वचन देतो.—मलाखी ३:१०.
[तळटीपा]
a शबा हे अनेक विद्वानांच्या मते, आज ज्याला येमेनचे प्रजासत्ताक म्हटले जाते त्या नैर्ऋत्य अरेबियात होते.
b प्राचीन ग्रीक भूगोलतज्ज्ञ स्ट्रॅबोनुसार, शबाचे लोक फार श्रीमंत होते. त्यांनी आपल्या फर्निचरसाठी, भांड्यांसाठी इतकेच नव्हे तर आपल्या घराच्या भिंतींवर, दारांवर व छप्परांवर सोन्याचा नाही नाही तेथे वापर केला होता.
c काहींच्या मते या वाक्यांशाचा अर्थ असा होतो, की राणीने शलमोनाबरोबर लैंगिक संबंध ठेवले. दंतकथा म्हणतात, की त्यांना एक पुत्रही झाला. परंतु यांतील कोणतीही गोष्ट शाबीत करण्यासाठी कसलाच पुरावा उपलब्ध नाही.