वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. ७-९
  • द्वीपाला आनंदविणारी ऐतिहासिक भेट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • द्वीपाला आनंदविणारी ऐतिहासिक भेट
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • आनंदी पुनर्मिलन
  • अधिवेशनाच्या विशेषता
  • “आम्ही हे कधीही विसरणार नाही”
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. ७-९

द्वीपाला आनंदविणारी ऐतिहासिक भेट

क्यूबा हे कॅरबीनमधील एक सुंदर द्वीप असून अलीकडेच या द्वीपावरील लोकांना आध्यात्मिकरित्या ताजेतवाने होण्याचा एक अभूतपूर्व अनुभव आला. या वेस्ट इंडियन देशात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना १९९८ च्या अखेरीस फार काळापासून वाट पाहत असलेला आशीर्वाद मिळाला. ३० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सदस्यांनी पहिल्यांदाच या देशाला भेट दिली आणि त्यांच्यासोबत इतर १५ प्रतिनिधींनी देखील या द्वीपाला भेट दिली. हे भेट देणारे लोक ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, इटली, न्यूझीलंड, आणि प्वेर्त रिको येथून आले होते.

तेथील ८२,२५८ राज्य प्रचारकांकरता आणि १९९८ च्या वसंत ऋतूमध्ये प्रभूच्या सांज भोजनाकरता त्यांच्यासोबत उपस्थित राहिलेल्या ८७,८९० लोकांकरता ही एक ऐतिहासिक घटना होती.

डिसेंबर १ ते ७, १९९८ या दिवसांत लॉइड बॅरी, जॉन बार आणि गेरिट लॉश यांनी हवाना येथील बेथेल गृहाला भेट दिली आणि क्यूबामध्ये पार पडलेल्या “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” या काही प्रांतीय अधिवेशनांना ते उपस्थित राहिले. प्रवासी वडीलांना भेटायला मिळाल्यामुळे आणि क्यूबाच्या राजकीय अधिकाऱ्‍यांशी चांगला परिचय झाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.

जॉन बार यांनी म्हटले: “ही घटना माझ्या आणि माझ्या पत्नीच्या जीवनातील एक सुस्मरणीय ईश्‍वरशासित घटना होती. क्यूबामधील आमच्या प्रिय बंधूंना आणि बहिणींना सत्याविषयी केवढा आवेश आहे! तेथून निघताना मला हे जाणवलं, की आपलं विश्‍वव्यापी बंधुत्त्व खरोखरच अनमोल आहे!” लॉइड बॅरी यांनी असे म्हटले: “या संस्मरणीय आठवड्यामुळे मला या देशातील बांधवाच्या परिस्थितीची आणखी समज मिळाली.”

क्यूबामधील यहोवाच्या साक्षीदारांना मागील पाच वर्षांच्या काळात उपासनेच्या बाबतीत अधिक स्वातंत्र्य लाभले आहे आणि क्यूबाच्या अधिकाऱ्‍यांच्या अभिप्रायांवरून असे माहीत होते की हीच स्थिती असावी अशी त्यांची इच्छा आहे.

सप्टेंबर १९९४ मध्ये, हवाना येथील बेथेल गृहात छपाईच्या कामास सुरवात करण्यात आली. यहोवाचे साक्षीदार पुन्हा एकदा मोकळेपणाने एकत्र येऊ शकत होते आणि घरोघरचे साक्षकार्य करू शकत होते. त्यानंतर १९९८ मध्ये क्यूबाच्या अधिकाऱ्‍यांनी, यहोवाच्या साक्षीदारांच्या १८ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना देशात येण्याची परवानगी दिली; या प्रतिनिधींमध्ये तीन नियमन मंडळाचे सदस्य होते.

आनंदी पुनर्मिलन

हवाना येथील होसे मॉर्टी विमानतळावर प्रतिनिधी उतरल्यानंतर क्यूबाच्या काही सरकारी अधिकाऱ्‍यांनी तसेच बेथेल गृहाच्या गटाने त्यांचे आनंदाने स्वागत केले. त्या गटातील एका बांधवाला मिल्टन हेंशल यांनी १९६१ मध्ये क्यूबाला दिलेली शेवटची भेटही आठवत होती. ते बांधव त्यावेळी १२ वर्षांचे होते; आता ते प्रवासी पर्यवेक्षक आहेत.

हे प्रतिनिधी बेथेल गृहात पोहंचले तेव्हा ग्लॅडीओलाय, गुलाब, जाई, पिवळ्या आणि लाल रंगांचे डेझी यांचे गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले; या फुलांची झाडे एका बांधवाने खास या प्रसंगाकरता वाढवली होती. बेथेल कुटुंबाने प्रतिनिधींचे स्वागत केले तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यानंतर भोजनासाठी खास क्यूबन रोस्टेड पोर्क, भात आणि बिन्स, सलाड, युक्कासोबत मॉखो (लसणाचा आणि जैतुनाच्या तेलाचा सॉस) आणि ताजी फळे होती. जेवणानंतर नियमन मंडळाच्या प्रत्येक सदस्याने, बेथेल सेवा एक ठेवा कसा आहे यावर उभारणीकारक भाषण दिले. बंधू लॉश स्पॅनिश भाषेत बोलले तेव्हा त्यांचे विवेचन प्रेरणा देणारे ठरले. या बेथेल कुटुंबात ४८ नियमित स्वयंसेवक आहेत तर १८ तात्पुरते मदत करणारे स्वयंसेवक आहेत.

क्यूबामधील बांधवांकरता आवश्‍यक असणारी पुस्तके आणि बायबलच्या प्रती इटलीमध्ये छापल्या जात असल्या, तरी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांच्या कृष्णधवल प्रती याच देशात दोन मिमिओग्राफ मशीनवर छापल्या जातात. आवश्‍यक असणाऱ्‍या नियतकालिकांचे उत्पादन करण्याकरता त्यांना अरुंद जागेत कित्येक तास, अंगमेहनतीचे तेच ते काम करावे लागते. हे स्वयंसेवक यहोवाची सेवा करण्याच्या या ठेव्याला अत्यंत मौल्यवान समजतात.—२ करिंथकर ४:७.

अधिवेशनाच्या विशेषता

हवाना, कामाग्वे आणि हॉल्जिन—येथील प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहण्याकरता आलेले १८ प्रतिनिधी तीन गट करून तीन वेगवेगळ्या ठिकाणी पांगले गेले. या तिन्ही दिवशी, अनेक वडील आणि पायनियर यांच्यासहित बंधू आणि बहिणींच्या मोठ्या गटाला या अधिवेशनांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. स्थानिक साक्षीदारांना हे सांगण्यात आले होते, की हा एक खास प्रसंग असणार आहे, पण या प्रसंगी नियमन मंडळाचे सदस्य उपस्थित राहतील याची त्यांना कल्पनाच नव्हती. शुक्रवारी सकाळी नियमन मंडळाचे हे बांधव त्यांच्या पत्नींसह भाडोत्री बसमधून उतरले तेव्हा या स्थानिक बांधवांना झालेल्या आश्‍चर्याची कल्पना करा!

अधिकाऱ्‍यांच्या परवानगीने बांधवांनी अधिवेशनाची व्यवस्था मोकळ्या जागेत केली होती. येथील अधिवेशनाच्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील एका पाषाणावर “स्तोत्र १३३:१” असे लिहिले होते. त्यामुळे बांधवांना त्या वचनातील शब्दांचे स्मरण झाले: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” निश्‍चितच, त्या अधिवेशनाच्या वेळी सर्व बांधव एकमेकांशी मिळूनमिसळून वागत होते आणि सगळीकडे आनंदी वातावरण होते.

या अधिवेशनातील भाषणे आणि मुलाखती खूपच चांगल्या होत्या असे श्रोते म्हणाले तसेच दानीएलाच्या तिसऱ्‍या अध्यायावर आधारित असलेले आणि प्राचीन बॅबिलोनचे दृश्‍य सादर करण्यात आलेले नाटक पाहूनही ते फारच प्रभावित झाले. एका बहिणीने असे म्हटले: “सर्व पात्रे अगदी उत्कृष्ट होती आणि पात्रांचं बोलणं तर इतकं अचूक होतं की त्यांच्या आवाजाचं आधीच ध्वनिमुद्रण करण्यात आले होतं हे कळतही नव्हतं. . . . दुष्ट बॅबिलोनी लोक खरोखरच दुष्ट दिसत होते आणि तीन हिब्रू दृढ आणि ठाम भासत होते.”

या अधिवेशनाला आलेले धार्मिक कार्यवाही खात्यातील प्रतिनिधी तसेच इतर सरकारी अधिकारी यांनी बांधवांच्या सुव्यवस्थेबद्दल आणि उत्तम वर्तणुकीबद्दल त्यांचे कौतुक केले. बंधू बॅरी यांनी क्यूबाच्या अधिकाऱ्‍यांनी भेट देणाऱ्‍या प्रतिनिधींना दिलेल्या उत्तम वागणुकीबद्दल प्रामाणिक कृतज्ञता व्यक्‍त केली. त्यांनी बांधवांच्या सुव्यवस्थितपणाची आणि त्यांच्या उत्तम वर्तणुकीची प्रशंसा केली. भाषणांप्रती आणि या अधिवेशनाकरता अधिकाऱ्‍यांनी दिलेली परवानगी यांविषयी कदर व्यक्‍त करण्याकरता बांधव कित्येक मिनिटे टाळ्यांचा गजर करत होते. एका ख्रिस्ती कुटुंबाने म्हटले: “आमच्या अपेक्षेपेक्षा पुष्कळ आम्हाला मिळालं—हे अधिवेशन एका लहानशा आंतरराष्ट्रीय अधिवेशनासारखंच होतं. हे विस्मयकारी होतं, कारण यामुळे अभिवचने पूर्ण करण्याच्या यहोवाच्या महान शक्‍तीचा आम्हाला पुरावा मिळाला आहे.”

साक्षीदारांना चांगल्याप्रकारे जाणून घेण्याकरताही या अधिवेशनाने मदत केली. एक बस चालक शनिवारी आणि रविवारीसुद्धा अधिवेशनाकरता उपस्थित राहिला. त्याने म्हटले, की यहोवाच्या साक्षीदारांविषयी अनेक गोष्टी त्याने ऐकल्या होत्या, पण त्याला आता कळले, की यहोवाचे साक्षीदार चांगले आणि शांतिप्रिय लोक आहेत.

“आम्ही हे कधीही विसरणार नाही”

क्यूबातील लोकांचे प्रेम आणि मनमोकळेपणा पाहून आलेले प्रतिनिधी खूपच प्रभावित झाले. क्यूबा देशातील लोक मेहनती, तत्त्वनिष्ठ आणि प्रेमळ आहेत. एका प्रतिनिधीने म्हटले: “कित्येक वेळा या अनोळखी स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली.”

क्यूबामधील सहविश्‍वासू साक्षीदारांचा विश्‍वास, आनंद आणि प्रेम पाहून प्रतिनिधी खूपच प्रभावित झाले. कित्येक अडथळे आले असतानाही त्यांनी यहोवाला त्यांचा दुर्ग बनवले आहे. (स्तोत्र ९१:२) जॉन बार यांनी म्हटले: “क्यूबाला दिलेल्या या पहिल्या भेटीत मी अनेक गोष्टीमुळे आश्‍चर्यचकित झालो—या देशाचे सौंदर्य, या लोकांचा चांगला स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्यूबामधील साक्षीदारांचा उत्साह. माझ्या संपूर्ण जीवनात मी राज्यगीते इतके समरस होऊन गाताना आणि मनाला स्पर्श करणाऱ्‍या आध्यात्मिक गोष्टीची कदर म्हणून टाळ्यांचा इतका वेळ कडकडाट होताना कधीच पाहिले नाही! या गोष्टींचे आम्हाला कधीही विस्मरण होणार नाही. आम्ही या आठवणी नेहमी जतन करून ठेवू.”

स्तोत्र ९७:१ म्हणते: “दीपसमूह हर्ष करो.” आपल्या देवाची उपासना करण्याकरता मिळालेल्या अधिक स्वातंत्र्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या या ऐतिहासिक भेटीमुळे क्यूबाच्या द्वीपावरील यहोवाच्या साक्षीदारांनी खरोखरच हर्ष केला.

[८ पानांवरील चित्र]

“ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” या क्यूबामधील खास प्रांतीय अधिवेशनांकरता अनेक कुटुंबे उपस्थित राहिली

[८ पानांवरील चित्र]

सन १९९४ मध्ये हवाना येथील बेथेलगृह परत एकदा उघडण्यात आले

[८ पानांवरील चित्र]

सरकारी अधिकाऱ्‍यांना देण्याकरता बायबलच्या बक्षीस प्रतींवर नियमन मंडळाचे सदस्य स्वाक्षरी करताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा