वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. ३-६
  • तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दळणवळणातील दरा
  • विचारपूर्वक प्रयत्न आवश्‍यक
  • देवाच्या वचनातून साहाय्य
  • पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • दोन पिढ्यातील अंतर तुम्हाला मिटवता येईल का?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • देवाच्या नव्या जगात तुमचे कुटुंब बचावून जाण्यासाठी परिश्रम घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. ३-६

तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवता का?

“कामात व्यस्त व मुलांबरोबर खेळण्यात सुस्त, तरी—जपानी पिता प्रिय!” काही वर्षांपूर्वी मिनिची शिम्बुन नामक बातमीपत्रात हा ठळक मथळा आला होता. सरकारद्वारे घेतलेल्या एका सर्वेत, ८७.८ जपानी मुलांनी मोठे झाल्यावर आपल्या पित्याची काळजी घेण्याची इच्छा व्यक्‍त केली. मात्र या बातमीपत्रकाच्या इंग्रजी आवृत्तीत हाच विषय जरा वेगळ्या मथळ्याखाली होता. “पिता आणि पुत्र: एक उपेक्षा केस.” जपानी बातमीपत्रकाच्या अगदी उलट या लेखाने त्याच सर्वेची दुसरी बाजू प्रकाशात आणली: कामाच्या दर दिवशी जपानी पिता आपल्या मुलांबरोबर केवळ ३६ मिनिटे घालवत होते. याच्या तुलनेत, पश्‍चिम जर्मनीतील पिता शनिवार-रविवार सोडून ४४ मिनिटे आणि संयुक्‍त संस्थानांतील पिता ५६ मिनिटे घालवत होते.

फक्‍त पिताच आपल्या मुलांबरोबर कमी वेळ घालवतात असे नाही. अनेक मातांनाही बाहेर कामाला जावे लागते. जसे की, पुष्कळ एकट्या मातांना आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता प्रापंचिक नोकरी करावी लागते. यामुळे, पालक—पिता आणि माता दोघेही—आपल्या मुलांबरोबर जो वेळ घालवत आहेत त्यात हळूहळू घट होत चालली आहे.

सन १९९७ मध्ये १२,००० पेक्षा अधिक अमेरिकन युवकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की ज्या युवकांचे आपल्या पालकांबरोबर जवळचे नातेसंबंध असतात त्या मुलांवर भावनिक तणाव कमी असतो व ते आत्महत्येचा विचार, हिंसा किंवा अंमली पदार्थांचा वापर यांसारख्या गोष्टी करण्याची शक्यता कमी असते. आणि एका विस्तृत अभ्यासातील संशोधकाने म्हटले: “तुम्ही जोपर्यंत त्यांच्यासाठी वेळ काढत नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर जवळीक साधू शकणार नाही.” म्हणजेच, मुलांबरोबर वेळ घालवणे व त्यांच्याबरोबर दळणवळण राखणे खरोखरच महत्त्वाचे आहे.

दळणवळणातील दरा

ज्या कुटुंबात एखादा पालक घरापासून दूर नोकरी करत असतो अशा कुटुंबात दळणवळणाचा मार्ग सुरळीत नसतो. अर्थातच, एखादा पालक नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहतो म्हणून त्यांच्यात दळणवळणाचा दरा निर्माण होतो असे नाही. काही पालक घरात राहूनसुद्धा सकाळी मुले उठण्याआधीच कामाला निघून जातात व मुले झोपल्यावर घरी येतात. मग, आठवडाभरात मुलांबरोबर वेळ घालवता न आल्यामुळे काही पालक मग शनिवार-रविवार किंवा सुटीच्या दिवशी ती उणीव भरून काढतात. ते आपल्या मुलांबरोबर “क्वालिटी” टाईम, अर्थात उच्च प्रतीचा वेळ घालवण्याच्या बाता करतात.

पण मुलांना जो जास्त प्रमाणात वेळ द्यायचा असतो त्याचे संतुलन उच्च प्रतीच्या वेळेने होऊ शकेल का? संशोधक लॉरन्स स्टीनबर्ग याचे अशाप्रकारे उत्तर देतात: “सामान्यपणे, जी मुले आपल्या पालकांबरोबर जास्त वेळ घालवतात ती मुले, आपल्या पालकांबरोबर कमी वेळ घालवणाऱ्‍या मुलांपेक्षा बरी असतात. वेळेची ती उणीव भरून काढणे इतके सोपे नाही. उच्च प्रतीच्या वेळेला फाजील महत्त्व दिले जाते.” असेच एका म्यानमारच्या स्त्रीला वाटते. अस्सल जपानी असलेला तिचा पती कामावरून रोज पहाटे एक किंवा दोन वाजता येतो. शनिवारी-रविवारी तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत असला तरी, त्याची पत्नी म्हणते: “शनिवार-रविवार घरी राहिल्याने, संपूर्ण आठवडाभरात कुटुंबाबरोबर न राहिल्याची दरी भरून निघत नसते. . . . आठवडाभर जेवायचं नाही, आणि शनिवारी-रविवारी आठवड्याचं खाल्ल्याने चालेल का?”

विचारपूर्वक प्रयत्न आवश्‍यक

कुटुंबामध्ये चांगले दळणवळण राखा असे बोलणे कृतीपेक्षा जास्त सोपे वाटते. जीवनाचा गाडा ओढावा लागत असल्यामुळे पित्याला किंवा प्रापंचिक नोकरी करणाऱ्‍या मातेला कुटुंबाबरोबर वेळ घालवणे इतके सोपे वाटणार नाही. परिस्थितीमुळे घरापासून दूर राहणारे अनेक जण टेलिफोनद्वारे किंवा पत्राद्वारे नियमितरीत्या आपल्या कुटुंबाबरोबर दळणवळण राखतात. पण घरी एकत्र असोत किंवा नसोत, चांगले कौटुंबिक दळणवळण राखण्याकरता विचारपूर्वक प्रयत्न आवश्‍यक आहेत.

आपल्या कुटुंबाबरोबर दळणवळण राखण्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्‍या पालकांना मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या कुटुंबाबरोबर फार कमी वेळ घालवणाऱ्‍या, निदान जेवायला सुद्धा त्यांच्याबरोबर नसणाऱ्‍या एका पित्याला गंभीर परिणाम भोगावे लागले. त्याचा मुलगा खूप हिंसक झाला व त्याच्या मुलीला दुकानांत चोरी करताना पकडण्यात आले. एके रविवारी सकाळी पिता गॉल्फ खेळायला जाण्यासाठी तयार होत असताना, त्याच्या मुलाच्या भावना उफाळून आल्या व तो म्हणाला: “या घरात फक्‍त आईच आमची पालक आहे का?” त्याने म्हटले, “आईच कुटुंबासाठी सर्व करते. आणि बाबा . . . असून नसल्यासारखे!”

या बोलण्याने पिता विचार करू लागला. सुरवातीला त्याने ठरवले, की तो आपल्या कुटुंबाबरोबर सकाळी नाश्‍ता करेल. पहिल्यांदा पहिल्यांदा तर फक्‍त तो आणि त्याची पत्नीच असायचे. मग हळूहळू त्यांची मुले येऊ लागली आणि अशाप्रकारे सकाळी नाश्त्याची वेळ म्हणजे गप्पाटप्पा मारण्याची वेळ. आणि हळूहळू संध्याकाळचे जेवण एकत्र होऊ लागले. अशाप्रकारे हा पिता पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आपल्या कुटुंबाला वाचवू शकला.

देवाच्या वचनातून साहाय्य

आपल्या मुलांबरोबर दळणवळण करण्याचे उत्तेजन बायबल पालकांना देते. संदेष्टा मोशेद्वारे इस्राएली लोकांना सूचना देण्यात आली होती: “हे इस्राएला, श्रवण कर, आपला देव [यहोवा, NW] परमेश्‍वर हा अनन्य परमेश्‍वर आहे; तू आपला देव [यहोवा, NW] परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:४-७) होय, आपल्या मुलांच्या मनांत व अंतःकरणात आपण देवाची वचने बिंबवू इच्छितो तर आपण आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यात पुढाकार घेतला पाहिजे.

आधी सांगितलेल्या, सन १९९७ मधील त्या १२,००० पेक्षा अधिक अमेरिकन युवकांच्या सर्वेत असेही दिसून आले, की त्यांच्यापैकी “धर्म पाळत असलेल्या . . . सुमारे ८८ टक्के [युवकांनी] धर्म आणि प्रार्थना संरक्षक असल्यामुळे त्यांस महत्त्व दिले होते.” घरामध्ये मुलांना योग्य धार्मिक मार्गदर्शन दिल्यास, अंमली पदार्थांचा दुरूपयोग, भावनात्मक तणाव, आत्महत्या, हिंसा आणि इतर समस्यांपासून युवकांना संरक्षण मिळते, हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी ओळखले आहे.

काही पालकांना आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला कठीण वाटते. खासकरून, आपल्या मुलांबरोबर वेळ घालवण्याची खूप इच्छा असूनही प्रापंचिक नोकरीमुळे तसे करता येत नाही अशा एकट्या मातांबाबतीत हे खरे आहे. त्या आपल्या कुटुंबाबरोबर त्यांच्या मौल्यवान वेळेतून वेळ कशा काढू शकतात? “व्यावहारिक ज्ञान व विचारशक्‍ती ही संभाळून ठेव,” असे बायबल आर्जवते. (नीतिसूत्रे ३:२१, NW) पालक कुटुंबासाठी वेळ काढण्याकरता आपल्या ‘विचारशक्‍तीचा’ उपयोग करू शकतात. ते कसे?

तुम्ही प्रापंचिक नोकरी करणारी माता असाल व दिवसभराचे काम करून तुम्हाला थकायला होत असेल तर, तुमच्याबरोबर स्वयंपाकात हातभार लावायला तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता, हो ना? अशाप्रकारे एकत्र वेळ घालवल्याने तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकाल. सुरवातीला तुमच्या मुलांना कामात सामील करून घ्यायला वेळ लागेल. पण लवकरच तुम्हाला मजा येईल व तुमचा वेळही वाचेल.

समजा तुम्ही एक पिता आहात व शनिवारी-रविवारी करायच्या गोष्टींची तुमच्याकडे एक यादीच आहे. यांतील काही कामे तुमच्या मुलांबरोबर करायला काय हरकत आहे? काम करता करता तुम्ही त्यांच्याबरोबर बोलूही शकता व त्यांना मौल्यवान प्रशिक्षणही देऊ शकता. तुमच्या मुलांमध्ये देवाचे वचन बिंबवा ही बायबलची आज्ञा तुम्हाला “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता,” म्हणजे प्रत्येक प्रसंगी त्यांच्याबरोबर बोलण्याचे प्रोत्साहन देते. एकत्र काम करताना आपल्या मुलांबरोबर संवाद करणे हे ‘व्यावहारिक ज्ञानाचे’ एक प्रदर्शन आहे.

आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवल्यामुळे दीर्घ फायदे प्राप्त होतात. बायबलमधील एक नीतिसूत्रे म्हणते, “चांगली मसलत घेणाऱ्‍यांजवळ ज्ञान असते.” (नीतिसूत्रे १३:१०) आपल्या कुटुंबाबरोबर दळणवळण करण्याकरता वेळ काढण्याद्वारे तुम्ही, दररोजच्या जीवनांतील समस्यांशी कसे झगडायचे याबाबतचे सुज्ञ मार्गदर्शन त्यांना देऊ शकाल. आज अशाप्रकारचे मार्गदर्शन दिल्याने तुमचा खूप वेळ आणि भवितव्यातील डोकेदुःखी देखील वाचेल. शिवाय, तुम्हाला आणि इतरांना यांतून आनंद मिळेल. अशाप्रकारचे मार्गदर्शन देण्याकरता तुम्हाला आधी, देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये आढळणारे लाख मोलाचे ज्ञान प्राप्त करावे लागेल. तुमच्या मुलांना शिकवण्याकरता व तुमच्या कुटुंबाच्या पावलांना मार्गदर्शन देण्याकरता त्याचा उपयोग करा.—स्तोत्र ११९:१०५.

[४ पानांवरील चित्र]

आपल्या पालकांबरोबर जवळचे नातेसंबंध असलेल्या युवकांना भावनिक तणाव बहुदा सहन करावा लागत नाही

[५ पानांवरील चित्र]

चांगल्या दळणवळणाचे कौटुंबिक जीवनात समृद्ध फायदे प्राप्त होतात

[६ पानांवरील चित्र]

आपल्या मुलाबरोबर काम करत असताना तुम्ही त्याच्याशी बोलू शकता व त्याला अमूल्य प्रशिक्षण देऊ शकता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा