वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. २०-२४
  • दक्ष आणि कष्टाळू असा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दक्ष आणि कष्टाळू असा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पाच शहाण्या कुमारींप्रमाणे दक्ष असा!
  • अंत जवळ येतो तसे कष्टाळू व्हा
  • त्याच्या उपस्थितीदरम्यान दक्ष आणि कष्टाळू
  • तुम्ही “जागृत” राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • शेवटल्या दिवसांचे चिन्ह
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. २०-२४

दक्ष आणि कष्टाळू असा!

“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्तय २५:१३.

१. प्रेषित योहान कशाची वाट पाहत होता?

बायबलमधील शेवटल्या संवादात येशूने वचन दिले: “मी लवकर येतो.” उत्तरात त्याच्या प्रेषित योहानाने म्हटले: “आमेन. ये, प्रभु येशू, ये.” येशूच्या येण्याबद्दल त्या प्रेषिताला कसलीही शंका नव्हती. “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [ग्रीक, पराऊसिया] व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” अशी येशूला विचारणा करण्यात आली तेव्हा योहानही त्या प्रेषितांमध्ये उपस्थित होता. होय, येशूच्या भवितव्यातील उपस्थितीची योहानाने आत्मविश्‍वासाने वाट पाहिली.—प्रकटीकरण २२:२०; मत्तय २४:३.

२. येशूची उपस्थिती लक्षात घेता, चर्चेसमध्ये आज काय परिस्थिती आहे?

२ आजकाल अशाप्रकारचा आत्मविश्‍वास क्वचितच पाहायला मिळतो. अनेक चर्चेसमध्ये येशूच्या ‘येण्याविषयी’ अधिकृत सिद्धान्त आहे, पण त्यांच्यातील फार कमी सदस्य त्याची खरोखर अपेक्षा करतात. त्यांची जीवनशैली तर याच्या उलटच दाखवते. द पराऊसिया इन द न्यू टेस्टमेंट नामक पुस्तकात म्हटले आहे: “चर्चच्या लोकांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि कार्यावर, पराऊसियाच्या आशेचा फार कमी प्रभाव आहे. . . . चर्चने पश्‍चात्ताप आणि शुभवर्तमानाची घोषणा जितक्या आवेशाने केली पाहिजे तो आवेश पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी कमी झाला आहे.” पण सर्वांच्याच बाबतीत असे नाही!

३. (अ) पराऊसिया याबद्दल खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कसे वाटते? (ब) आपण आता खासकरून कशावर विचार करणार आहोत?

३ येशूचे खरे शिष्य सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे एकनिष्ठेने करत असताना आपण येशूच्या उपस्थितीत ज्या कशाचा समावेश होतो त्याबद्दल उचित दृष्टिकोन बाळगणे व त्यानुसार कार्य करणे आवश्‍यक आहे. अशाने ‘आपण शेवटपर्यंत टिकून राहू व तरु.’ (मत्तय २४:१३) मत्तय २४ आणि २५ अध्यायांमधील भविष्यवाणी देतेवेळेस, आपण आपल्या चिरकाल फायद्यासाठी लागू करू शकू असा सुज्ञ सल्ला येशूने दिला. २५ व्या अध्यायातील दाखले कदाचित तुम्हाला माहीतच असतील; त्यांच्यातील एक दाखला दहा कुमारींचा (शहाण्या आणि मूर्ख कुमारी) आणि एक दाखला रुपयांचा आहे. (मत्तय २५:१-३०) या दाखल्यांतून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?

पाच शहाण्या कुमारींप्रमाणे दक्ष असा!

४. कुमारींच्या दाखल्याचे सार काय आहे?

४ मत्तय २५:१-१३ मधील कुमारींचा दाखला तुम्हाला पुन्हा वाचावासा वाटेल. तेथे एका भव्य यहुदी विवाहसोहळ्याचे दृश्‍य आहे; वर वधूला आपल्या घरी (स्वतःच्या पित्याच्या घरी) नेण्याकरता तिच्या पित्याच्या घरी जातो. अशा वरातीत वाजंत्री आणि गायक असू शकतात, व वरातीची येण्याची वेळ काही निश्‍चित नसते. त्या दाखल्यात, दहा कुमारी वराच्या येण्याची वाट रात्रभर पाहत होत्या. पाच मूर्ख कुमारींनी दिव्याचे पुरेसे तेल आपल्याबरोबर न आणल्यामुळे त्यांना आणखी तेल विकत आणण्यासाठी परत जावे लागले. इतर पाच सुज्ञ कुमारींनी पात्रांमध्ये जास्त तेल आपल्याबरोबर आणले होते जेणेकरून थांबलेले असताना गरज भासलीच तर त्या दिव्यांमध्ये पुन्हा तेल घालू शकत होत्या. वर आला तेव्हा फक्‍त या पाच जणींच उपस्थित व तयार होत्या. म्हणून फक्‍त त्यांनाच समारंभात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. पाच मूर्ख कुमारी परत आल्या तोपर्यंत फार उशीर झाला होता, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

५. कुमारींच्या दाखल्याचा लाक्षणिक अर्थ समजण्याकरता कोणती शास्त्रवचने मदत करतात?

५ या दाखल्यातील अनेक पैलू लाक्षणिक समजले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, शास्त्रवचनांत येशूला वर म्हटले आहे. (योहान ३:२८-३०) येशूने स्वतःची तुलना एका राजपुत्राबरोबर केली ज्याच्यासाठी लग्नाची मेजवानी तयार करण्यात आली होती. (मत्तय २२:१-१४) आणि बायबल ख्रिस्ताची तुलना एका पतीबरोबर करते. (इफिसकर ५:२३) मनोवेधक गोष्ट म्हणजे, अभिषिक्‍त जणांचे वर्णन इतरत्र ख्रिस्ताची “वधू” असे करण्यात आले असले तरी, दाखल्यात मात्र वधूचा उल्लेख नाही. (योहान ३:२९; प्रकटीकरण १९:७; २१:२, ९) पण ते दहा कुमारींबद्दल जरूर बोलते व अभिषिक्‍तांची तुलना इतरत्र एका कुमारिकेसोबत करण्यात आली आहे जी विवाहासाठी ख्रिस्ताबरोबर वाग्दत्त आहे.—२ करिंथकर ११:२.a

६. कुमारींच्या दाखल्याच्या समाप्तीला येशूने कोणता सल्ला दिला?

६ अशाप्रकारची सविस्तर माहिती व कोणत्याही भविष्यसूचक अवलंबांव्यतिरिक्‍त, या दाखल्यात उत्तम तत्त्वे आहेत ज्यांतून आपण नक्कीच शिकू शकतो. जसे की, लक्षात घ्या, येशूने या दाखल्याची समाप्ती अशा शब्दांनी केली: “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.” या दाखल्यावरून हे स्पष्ट होते, की आपण प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे, या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या येऊ घातलेल्या अंताविषयी जागृत असले पाहिजे. आपण अचूक तारीख सांगू शकत नसलो तरी अंत हा अटळ आहे. याबाबतीत, कुमारींच्या दोन्ही गटांनी दाखवलेल्या मनोवृत्तीचा विचार करा.

७. दाखल्यातील पाच कुमारी कोणत्या अर्थाने मूर्ख ठरल्या?

७ येशू म्हणाला: “पाच मूर्ख होत्या.” वर येणार आहे यावर त्यांचा विश्‍वास नव्हता म्हणून त्या मूर्ख होत्या का? त्या सुखचैनीच्या मागे लागल्या होत्या का? की कोणी त्यांना फसवले होते? यातले एकही कारण नव्हते. येशू म्हणाला, की या पाच जणी “आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्‍या जाण्यास निघाल्या.” तो येणार आहे हे त्यांना माहीत होते, त्यांनाही त्यात भाग घ्यायचा होता, “लग्नात” सामील व्हायचे होते. पण त्या पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या का? त्या त्याच्यासाठी काही काळ थांबून राहिल्या, ‘मध्यरात्रीपर्यंत’ थांबून राहिल्या, पण त्याच्या केव्हाही—त्यांनी सुरवातीला अपेक्षिल्याप्रमाणे आधी किंवा नंतर—होणाऱ्‍या आगमनासाठी त्या तयार नव्हत्या.

८. दाखल्यातील पाच कुमारी कोणत्या अर्थाने शहाण्या ठरल्या?

८ दुसऱ्‍या पाच जणी—ज्यांना येशूने शहाण्या म्हटले—त्याही हातात जळते दिवे घेऊन वराच्या आगमनाची वाट पाहत उभ्या राहिल्या. त्यांनाही थांबावे लागले, पण त्या “शहाण्या” होत्या. “शहाण्या” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “समंजस, समजदार, व्यावहारिकरीत्या बुद्धीमान,” असा होऊ शकतो. आवश्‍यकता भासल्यास आपल्या दिव्यात तेल ओतण्याकरता पात्रात जादा तेल आणल्यामुळे या पाच कुमारी शहाण्या ठरल्या. खरे तर, वराला भेटण्यासाठी त्या इतक्या उत्सुक होत्या की त्या आपले तेल इतरांना द्यायला तयार नव्हत्या. वराचे आगमन झाले तेव्हा त्या तेथे पूर्ण तयारीनिशी उपस्थित होत्या त्यावरून हे सिद्ध झाले की त्यांचा दक्षपणा अनाठायी नव्हता. ह्‍या कुमारी “ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.”

९, १०. कुमारींच्या दाखल्याचा काय मुद्दा आहे व आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

९ विवाहाच्या वेळी कसे वागायचे किंवा आपल्याजवळ जे आहे ते इतरांनाही द्यावे याबाबतीत येशू धडा देत नव्हता. “तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही” हा त्याचा मुद्दा होता. स्वतःला विचारा, ‘येशूच्या उपस्थितीच्याबाबतीत मी खरोखरच दक्ष आहे का?’ येशू आता स्वर्गात राज्य करतो आहे असा आपला विश्‍वास आहे, पण ‘मनुष्याचा पुत्र आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येईल’ या वास्तविकतेवर आपले लक्ष कितपत केंद्रित आहे? (मत्तय २४:३०) कुमारी वराला भेटायला पहिल्यांदा आल्या होत्या तेव्हापेक्षा ‘मध्यरात्री’ त्याच्या आगमनाची वेळ निश्‍चितच जवळ आली होती. तसेच, सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याकरता मनुष्याच्या पुत्राच्या येण्याची वाट आपण पाहू लागलो होतो तेव्हापेक्षा त्याचे आगमन आता जवळ आले आहे. (रोमकर १३:११-१४) आपण आपली दक्षता टिकवून ठेवली आहे का, वेळ जसजसा जवळ येत राहतो तसतसे आपण आणखी दक्षता बाळगत आहोत का?

१० “तुम्ही जागृत राहा,” या आज्ञेचे पालन करण्याकरता सतत दक्ष राहणे आवश्‍यक आहे. पाच कुमारी आपल्याकडचे तेल संपेपर्यंत थांबून राहिल्या आणि मग आणखी तेल विकत आणण्यासाठी गेल्या. एक ख्रिस्ती देखील आज अशाप्रकारे विचलित होऊ शकतो; म्हणून येशूच्या येऊ घातलेल्या आगमनासाठी तो पूर्णपणे तयार नसेल. पहिल्या शतकातील काही ख्रिश्‍चनांच्याबाबतीत देखील असेच घडले होते. आज काहींच्या बाबतीतही असे होऊ शकते. तेव्हा आपण स्वतःला विचारून पाहू या: ‘माझ्या बाबतीत असं होत आहे का?’—१ थेस्सलनीकाकर ५:६-८; इब्री लोकांस २:१; ३:१२; १२:३; प्रकटीकरण १६:१५.

अंत जवळ येतो तसे कष्टाळू व्हा

११. येशूने नंतर कोणता दाखला दिला व तो कशाशी जुळतो?

११ दुसऱ्‍या दाखल्यात, येशूने त्याच्या अनुयायांना फक्‍त दक्ष असण्याविषयीच आर्जवले नाही. शहाण्या आणि मूर्ख कुमारींबद्दल सांगितल्यावर त्याने रुपयांचा दाखला दिला. (मत्तय २५:१४-३० वाचा.) पुष्कळ बाबतीत हा दाखला येशूने आधी दिलेल्या मोहरांच्या दाखल्याशी जुळणारा आहे. “देवाचे राज्य एव्हांच प्रगट होणार आहे” असे अनेकांना वाटत असल्यामुळे त्याने हा दाखला दिला होता.—लूक १९:११-२७.

१२. रुपयांच्या दाखल्याचे सार काय आहे?

१२ रुपयांच्या दाखल्यात येशूने एका मनुष्याविषयी सांगितले ज्याने दूर देशाच्या प्रवासाला निघण्याआधी आपल्या तीन दासांना बोलावले. “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” तो एकाला पाच हजार रुपये, दुसऱ्‍याला दोन हजार आणि तिसऱ्‍याला फक्‍त एक हजार रुपये देतो. रुपये म्हणजे नाणे; कदाचित प्रमाणभूत रकमेचे चांदीचे नाणे, एक कामगार १४ वर्षांत जितके कमवेल तितके मूल्य त्या एका नाण्याची किंमत होती; ही रक्कम बरीच मोठी होती! प्रवासाला गेलेला मनुष्य पुन्हा येतो तेव्हा, ‘बऱ्‍याच काळासाठी’ तो बाहेर गेलेला असताना त्याच्या दासांनी दिलेल्या पैशांचे काय केले त्याचा हिशेब तो मागतो. पहिल्या दोन दासांनी त्यांना दिलेल्या रकमेचे दुप्पट केले होते. तेव्हा तो त्यांना “शाबास” म्हणाला; प्रत्येकाला आणखी जबाबदारी देण्याचे त्याने त्यांना वचन दिले व शेवटी म्हणाला: “आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” पण ज्याला एक हजार रुपये दिले होते त्याने असा दावा केला, की त्याचा धनी खूप कठोर होता म्हणून त्याने त्याला मिळालेल्या नाण्याचा फायदेकारक वापर केला नव्हता. व्याज मिळवण्यासाठी त्याने ते पैसे सावकाराकडेही ठेवले नाहीत उलट ते दडवून ठेवले. धन्याने त्याला “दुष्ट व आळशी” म्हटले कारण त्याने त्याच्या धन्याची मालमत्ता वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परिणामतः, त्याच्याकडून पैसे काढून घेण्यात आले व त्याला बाहेर अर्थात जेथे “रडणे व दातखाणे” चालते तेथे टाकण्यात आले.

१३. येशू दाखल्यातील धन्याप्रमाणे कसे काय सिद्ध झाला?

१३ याबाबतीतही यांचा लाक्षणिक अर्थ होतो. जसे की, दूर देशी गेलेला तो मनुष्य येशूला चित्रित करतो जो आपल्या शिष्यांना सोडून स्वर्गात जाणार होता व राज्य सत्ता मिळेपर्यंत पुष्कळ वेळ थांबून राहणार होता.b (स्तोत्र ११०:१-४; प्रेषितांची कृत्ये २:३४-३६; रोमकर ८:३४; इब्री लोकांस १०:१२, १३) आता पुन्हा आपल्याला एक विस्तृत धडा किंवा तत्त्व दिसून येते जे आपल्यापैकी सर्वांनी आपल्या जीवनात लागू केले पाहिजे. ते काय आहे?

१४. रुपयांचा दाखला कोणत्या महत्त्वपूर्ण गरजेवर जोर देतो?

१४ आपली आशा स्वर्गातील अमर जीवनाची असो किंवा परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची असो, ख्रिस्ती कार्यांत आपण सर्वांनी झटले पाहिजे हे येशूच्या दाखल्यावरून स्पष्ट होते. खरे तर या दाखल्याचा सारांश केवळ एका शब्दात दिला जाऊ शकतो: कष्ट. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून प्रेषितांनी याबाबतीत एक चांगला नमुना ठेवला. तेथे लिहिले आहे: “[पेत्राने] दुसऱ्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांस साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्‍या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” (प्रेषितांची कृत्ये २:४०-४२) त्याच्या श्रमाची त्याला गोड फळे चाखायला मिळाली! प्रेषितांबरोबर इतरजणही ख्रिस्ती प्रचार करू लागले तेव्हा त्यांनीही खूप कष्ट घेतले; सुवार्तेची ‘सर्व जगात’ घोषणा होत होती.—कलस्सैकर १:३-६, २३; १ करिंथकर ३:५-९.

१५. कोणत्या खास मार्गाने आपण रुपयांच्या दाखल्याचा मुख्य मुद्दा लागू केला पाहिजे?

१५ या दाखल्याचा संदर्भ काय आहे तो लक्षात घ्या—येशूच्या उपस्थितीविषयीची ती एक भविष्यवाणी आहे. येशूची पराऊसिया चालू आहे व फार लवकर ती कळसास पोहंचणार आहे याचा पुष्कळ पुरावा आपल्याकडे आहे. “अंत” आणि ख्रिश्‍चनांना करावयाचे काम यांतील संबंध येशूने कसा जोडला ते आठवा: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) हे लक्षात ठेवून आपण कोणत्या प्रकारच्या दासासारखे आहोत? स्वतःला विचारा: ‘कदाचित आपल्याच व्यक्‍तिगत गोष्टींत गुंतून गेलेल्या व दिलेली रक्कम दडवून ठेवणाऱ्‍या त्या दासासारखा मी आहे असे माझ्याबाबतीत म्हणता येईल का? की, भल्या व विश्‍वासू दासांसारखा मी आहे हे स्पष्ट होते? प्रत्येक प्रसंगी धन्याची मालमत्ता वाढवण्याचा माझा पूर्ण निर्धार आहे का?’

त्याच्या उपस्थितीदरम्यान दक्ष आणि कष्टाळू

१६. आपण चर्चा केलेल्या दोन दाखल्यांतून तुम्हाला कोणता संदेश मिळतो?

१६ या दोन दाखल्यांच्या लाक्षणिक किंवा भविष्यसूचक अर्थांव्यतिरिक्‍त, ते आपल्याला खूप प्रोत्साहन देतात कारण ते स्वतः येशूच्या मुखातून आले आहेत. त्याचा संदेश हाच आहे: दक्ष असा, कष्टाळू असा, आणि तेही खासकरून ख्रिस्ताच्या पराऊसियाचे चिन्ह दिसते तेव्हा. आणि ती वेळ आता आहे. तेव्हा आपण खरोखरच दक्ष व कष्टाळू आहोत का?

१७, १८. येशूच्या उपस्थितीविषयी शिष्य याकोबाने कोणता सल्ला दिला?

१७ येशूचा सावत्र भाऊ याकोब जैतुनांच्या डोंगरावर येशूची भविष्यवाणी ऐकायला तेथे उपस्थित नव्हता; पण नंतर त्याने ती भविष्यवाणी जाणून घेतली आणि स्पष्टपणे तिचे महत्त्व समजून घेतले. त्याने लिहिले: “अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीहि धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.” (तिरपे वळण आमचे.)—याकोब ५:७, ८.

१८ आपल्या धनाचा गैरवापर करणाऱ्‍यांवर देव प्रतिकूल न्यायदंड बजावणार आहे याची आपल्याला खात्री दिल्यामुळे, यहोवाने कार्य करावे म्हणून थांबून असताना अधीर न होण्यास याकोबाने ख्रिश्‍चनांना आर्जवले. अधीर ख्रिश्‍चनाच्या मनात सूड भावना निर्माण होऊ शकते, जणू काय, घडणाऱ्‍या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार त्यालाच मिळाला आहे. परंतु असे होता कामा नये कारण न्यायदंडाचा समय नक्की येणार आहे. याकोबाने विवेचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्‍याच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते.

१९. एक इस्राएली शेतकरी कोणत्या प्रकारचा धीर दाखवू शकत होता?

१९ एका इस्राएली शेतकऱ्‍याला बी पेरल्यानंतर, पहिल्यांदा कोंब वर येईपर्यंत, नंतर रोपटे प्रौढ होईपर्यंत आणि मग कापणीपर्यंत थांबावे लागत होते. (लूक ८:५-८; योहान ४:३५) या सर्व महिन्यांत त्याच्याकडे वेळही होता आणि कदाचित त्याला चिंताही वाटत होती. पहिला पाऊस येईल का, आणि तोही पुरेसा पडेल का? नंतरचा पाऊस कसा असेल? किड लागून किंवा वादळामुळे रोपट्यांची नासधूस होईल का? (पडताळा योएल १:४; २:२३-२५.) तरीसुद्धा, सर्वसाधारणपणे एक इस्राएली शेतकरी यहोवावर आणि त्याने ठरवून दिलेल्या नैसर्गिक चक्रांवर भरवसा ठेवू शकत होता. (अनुवाद ११:१४; यिर्मया ५:२४) शेतकऱ्‍याचा धीर असा होता की तो आत्मविश्‍वासाने अपेक्षा करायचा. तो ज्याची वाट पाहत होता ते नक्की येईल असा त्याला विश्‍वास होता. ते खरोखरच येणार होते!

२०. याकोबाच्या सल्ल्याच्या सुसंगतेत आपण धीर कसा काय प्रदर्शित करू शकतो?

२० कापणी केव्हा होईल याची थोडीफार माहिती शेतकऱ्‍याला असते; पण येशूची उपस्थिती केव्हा होईल त्याचा पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना अंदाज लावता आला नाही. पण ती निश्‍चित होणार होती. याकोबाने लिहिले: “प्रभूच्या आगमनाची [ग्रीक पराऊसिया] वेळ आली आहे.” याकोबाने हे लिहिले तेव्हा, ख्रिस्ताच्या उपस्थितीचे विश्‍वव्यापी चिन्ह किंवा मोठ्या प्रमाणावरील चिन्ह अद्याप प्रकट झाले नव्हते. पण आता ते स्पष्ट दिसते! तेव्हा या काळात आपल्याला कसे वाटले पाहिजे? चिन्ह तर अगदी स्पष्ट दिसत आहे. आपण ते पाहतो. आपण खात्रीने म्हणू शकतो, ‘मी चिन्ह पूर्ण होताना पाहत आहे.’ आपण आणखी भरवशाने म्हणू शकतो: “प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे आणि अंत आता जवळ आहे.”

२१. आपला काय करण्याचा पूर्ण निर्धार आहे?

२१ यासाठी आपण आता ज्यांची चर्चा केली त्या येशूने दिलेल्या दोन दाखल्यांचे मूलभूत धडे आत्मसात करून त्यांना लागू करण्यासाठी आपल्याकडे आणखी सबळ कारण आहे. तो म्हणाला: “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.” (मत्तय २५:१३) आपल्या ख्रिस्ती सेवेत आवेशी राहण्याची हीच वेळ आहे यात काही शंका नाही. येशूचा मुद्दा आपल्याला समजला आहे हे आपण आपल्या दैनंदिन जीवनातून दाखवू या. आपण दक्ष राहू या! आपण कष्टाळू असू या!

[तळटीपा]

a दाखल्याच्या लाक्षणिक सविस्तर माहितीसाठी वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित गॉड्‌स किंग्डम ऑफ अ थाऊझन्ड इयर्स हॅझ अप्रोच्ड पृष्ठे १६९-२११ पाहा.

b गॉड्‌स किंग्डम ऑफ अ थाऊझन्ड इयर्स हॅझ अप्रोच्ड, पृष्ठे २१२-५६ पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ शहाण्या आणि मूर्ख कुमारींच्या दाखल्यावरून तुम्ही कोणता मुख्य मुद्दा शिकला आहात?

◻ रुपयांच्या दाखल्याद्वारे येशू तुम्हाला कोणता मूलभूत सल्ला देत आहे?

◻ तुमचा धीर कोणत्या अर्थाने त्या इस्राएली शेतकऱ्‍याच्या पराऊसियाशी संबंधित आहे?

◻ आपण ज्या काळात जगत आहोत तो काळ खासकरून अद्‌भुत व आव्हानात्मक का आहे?

[२३ पानांवरील चित्र]

कुमारींच्या आणि रुपयांच्या दाखल्यावरून तुम्ही कोणते धडे शिकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा