वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. ४-७
  • प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सांप्रत काळाची दुःखे”
  • “व्यर्थतेच्या स्वाधीन”
  • ‘देवाच्या पुत्रांचे प्रगट होणे’
  • अखेरीस खरे स्वातंत्र्य
  • मुक्‍त पण जबाबदार लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. ४-७

प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल

“आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टि देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:१८-२२.

बहुतेक वेळा जीवन निरस तसेच दुःखमय का वाटते आणि जीवनात खरे स्वातंत्र्य का नाही, याबद्दल प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या त्याचा पत्राच्या वरील भागात थोडक्यात पण उल्लेखनीयरित्या सांगितले आहे. आपल्याला खरे स्वातंत्र्य कसे मिळू शकते याविषयीही तो समजावून सांगतो.

“सांप्रत काळाची दुःखे”

“आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत” असे पौलाने म्हटले तेव्हा तो सांप्रत काळातील दुःखे कमी लेखत नव्हता. पौलाच्या काळादरम्यान आणि त्यानंतरही मानवी हक्कांची पर्वा नसलेल्या रोमी अधिकाऱ्‍यांच्या क्रूर हुकूमशाही राजवटीमध्ये ख्रिश्‍चनांना खूप छळ सहन करावा लागला. ख्रिश्‍चनांमुळे राज्याला धोका आहे, असे रोमला वाटू लागले तेव्हा ख्रिश्‍चनांना निर्दयीपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे. एम. रॉबट्‌र्स हे इतिहासकार असे म्हणतात: “राजधानी [रोममध्ये] अनेक ख्रिश्‍चनांना आखाड्यात क्रूरपणे ठार मारण्यात आले किंवा त्यांना जिवंत जाळण्यात आले.” (शॉर्टर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड) नीरोच्या छळाला बळी पडलेल्या या लोकांविषयी आणखी एक अहवाल असे म्हणतो: “काही लोकांना वधस्तंभावर खिळण्यात आले, काहींवर प्राण्यांचे कातडे पांघरून त्यांना कुत्र्यांचे शिकार बनविण्यात आले तर काहींवर डांबर फासून रात्रीच्या वेळी मशाली म्हणून जिवंत जाळण्यात आले.”—एफ. एफ. ब्रूस यांचे न्यू टेस्टमेंट हिस्ट्री.

अशाप्रकारच्या छळापासून त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांना निश्‍चितच मुक्‍त व्हावेसे वाटले असेल, पण मुक्‍त होण्याकरता येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या शिकवणुकीचे उल्लंघन करण्यास ते तयार नव्हते. ते पूर्णपणे तटस्थ राहिले; उदाहरणार्थ, रोमी राज्याधिकारी आणि स्वातंत्र्य सैनिक असलेल्या झीलॉट यांच्यातील संघर्षात ख्रिश्‍चनांनी भाग घेतला नाही. (योहान १७:१६; १८:३६) “त्या काळातील संघर्षात, देवाच्या नियुक्‍त वेळेची वाट पाहावी, अशी वार्ता करत बसण्याची ही वेळ नव्हती,” तर रोमच्या “शत्रूंच्या विरोधात हिंसक कारवाई” करण्याची गरज होती असे झीलॉटांचे म्हणणे होते. (न्यू टेस्टामेंट हिस्ट्री) आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी वेगळ्याप्रकारे विचार केला. “देवाच्या नियुक्‍त वेळेची वाट पाहावी,” हाच एकमेव वास्तविक पर्याय त्यांच्यापुढे होता. “सांप्रत काळाची दुःखे” कायमची दूर करण्याकरता तसेच खरे आणि कायमस्वरूपी स्वातंत्र्य मिळण्याकरता ईश्‍वरी हस्तक्षेपाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी आरंभीच्या ख्रिश्‍चनांची खात्री पटली होती. (मीखा ७:७; हबक्कूक २:३) हे कसे घडेल ते पाहण्याआधी ‘सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन का करण्यात आली,’ याविषयी आपण आधी पाहूया.

“व्यर्थतेच्या स्वाधीन”

द एम्फॅटिक डायग्लॉट यात बेंजॅमिन विल्सन असे म्हणतात की, “सृष्टी” या शब्दाचा अर्थ काहींना वाटतो त्याप्रमाणे “बुद्धिहीन आणि अचेतन सृष्टी असा होत नाही” तर त्या शब्दाचा अर्थ “संपूर्ण मानवजात” असा होतो. (पडताळा कलस्सैकर १:२३.) हा शब्द संपूर्ण मानवी कुटुंबाला—स्वातंत्र्य हवे असणाऱ्‍या आपल्या सर्वांना सूचित करतो. आपल्या आरंभीच्या पालकांनी केलेल्या कार्यामुळे आपण “व्यर्थतेच्या स्वाधीन” झालो आहोत. “आपखुशीने” किंवा व्यक्‍तिगत निर्णयाची निवड केल्यामुळे आपण व्यर्थतेच्या स्वाधीन झालो नाही. आपण वारशाने या परिस्थितीत आलो आहोत. “मानव स्वतंत्र जन्मला होता” हे रुसो यांचे विधान शास्त्रवचनीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चुकीचे ठरते. आपल्यांपैकी प्रत्येक जण पाप आणि अपरिपूर्णतेच्या बंधनात जन्मला आहे जणू नैराश्‍य आणि व्यर्थता यांनी भरलेल्या व्यवस्थेचे दासच आहोत.—रोमकर ३:२३.

हे असे का झाले? कारण आदाम आणि हव्वा या आपल्या पहिल्या पालकांना “देवासारखे,” व्हायचे होते; त्यांना स्वतः निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हवा होता, काय चांगले आणि काय वाईट हे त्यांना स्वतः ठरवायचे होते. (उत्पत्ति ३:५) स्वातंत्र्याच्या एका महत्त्वाच्या पैलूकडे त्यांनी दुर्लक्ष केले. केवळ निर्माणकर्त्याला पूर्ण स्वातंत्र्य असू शकते. तो विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधिकारी आहे. (यशया ३३:२२; प्रकटीकरण ४:११) मानवी स्वातंत्र्य म्हणजे मर्यादेत स्वातंत्र्य अनुभवणे. म्हणूनच, शिष्य याकोबाने त्याच्या काळातील ख्रिश्‍चनांना ‘स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांच्या’ अंकित राहण्यास आर्जवले.—याकोब १:२५.

यहोवाने योग्यपणे आदाम आणि हव्वेला त्याच्या सार्वत्रिक कुटुंबातून वेगळे केले आणि परिणामी ते मरण पावले. (उत्पत्ति ३:१९) पण त्यांच्या संततीविषयी काय? ही संतती त्यांच्या पुढील पिढीला अपरिपूर्णता, पाप आणि मृत्यूच देणार होती; तरी देखील देवाने दया दाखवून मुले प्रसवण्याची त्यांना मुभा दिली. “सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) त्या अर्थाने देवाने ‘सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन केली.’

‘देवाच्या पुत्रांचे प्रगट होणे’

यहोवाने या ‘आशेच्या आधारावर’ सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन केले की, एके दिवशी “देवाच्या पुत्रांच्या” कार्यवाहीद्वारे मानवी कुटुंबाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य प्राप्त करून दिले जाईल. हे ‘देवाचे पुत्र’ कोण आहेत? ते येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत ज्यांचा बाकीच्या ‘मानवी सृष्टीप्रमाणे’ पापाच्या आणि अपरिपूर्णतेच्या बंधनात जन्म झाला आहे. देवाच्या शुद्ध, परिपूर्ण सार्वत्रिक कुटुंबात राहण्याचा त्यांना जन्मतः हक्क नाही. पण, यहोवा त्यांच्याकरता विलक्षण असे काही करतो. येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे यहोवा वारशाने मिळालेल्या पापाच्या बंधनातून त्यांची सुटका करतो आणि त्यांना “नीतिमान” किंवा आध्यात्मिकरीत्या शुद्ध व्यक्‍ती घोषित करतो. (१ करिंथकर ६:११) त्यानंतर देव त्यांना ‘त्याचे पुत्र’ म्हणून दत्तक घेतो; त्यांना पुन्हा एकदा त्याच्या सार्वत्रिक कुटुंबात परत आणतो.—रोमकर ८:१४-१७.

यहोवाच्या या दत्तक पुत्रांना एक वैभवी विशेषाधिकार प्राप्त होईल. ते देवाच्या स्वर्गीय राज्याचे किंवा शासनाचे भाग या नात्याने येशू ख्रिस्तासोबत ‘देवासाठी याजक असे केले जातील आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.’ (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-४) हे शासन पूर्णपणे स्वातंत्र्य आणि न्यायाच्या तत्त्वांवर आधारलेले असेल—त्या शासनामध्ये कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा जुलूम नसेल. (यशया ९:६, ७; ६१:१-४) प्रेषित पौल म्हणतो, की हे देवाचे पुत्र फार आधीच अभिवचन दिलेल्या ‘अब्राहामाच्या संतानाचे’ अर्थात येशूचे सहकारी आहेत. (गलतीकर ३:१६, २६, २९) तसे पाहिले तर, देवाने त्याचा मित्र, अब्राहाम याला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यात हे देवाचे पुत्र महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्या अभिवचनाचा काही भाग असा आहे की, अब्राहामाच्या संतानाद्वारे (किंवा, वंशाद्वारे) “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे . . . आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति २२:१८.

त्यामुळे मानवजातीला कोणता आशीर्वाद प्राप्त होईल? आदामाच्या पापामुळे मानवी कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्‍या भयंकर परिणामातून मुक्‍त करण्यात आणि मानवजातीला पुन्हा एकदा परिपूर्णतेप्रत पोहंचवण्याकरता देवाचे पुत्र मदत करतील. “सर्व राष्ट्रे, वंश, लोक” येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारे आणि त्याच्या जनहितेच्छू राज्याच्या अधीन होण्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करू शकतात. (प्रकटीकरण ७:९, १४-१७; २१:१-४; २२:१, २; मत्तय २०:२८; योहान ३:१६) अशाप्रकारे ‘सर्व सृष्टी’ पुन्हा एकदा ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍ततेचा’ आनंद घेईल. मर्यादित, तात्पुरत्या स्वरूपाच्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा हे स्वातंत्र्य वेगळे असेल; आदाम आणि हव्वा यांनी देवाच्या सार्वभौमत्वाचा अव्हेर केल्यापासून मानवी कुटुंबाला ज्या ज्या गोष्टींमुळे दुःख आणि क्लेष सहन करावा लागला त्या सर्वांपासून मानवाला स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळेच प्रेषित पौल असे म्हणू शकला, की विश्‍वासू लोकांना भवितव्यात मिळणाऱ्‍या वैभवी सेवेशी तुलना करता “सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत”!

“देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची” सुरवात केव्हा होते? आता लवकरच ही सुरवात होणार आहे जेव्हा देवाचे पुत्र कोण आहेत हे यहोवा स्पष्ट करील. आत्मिक क्षेत्रातील हे पुनरुत्थित ‘पुत्र’ हर्मगिदोन या देवाच्या युद्धात पृथ्वीवरील दुष्टता आणि दडपशाही काढण्यात येशू ख्रिस्ताला मदत करतील तेव्हा त्यांच्या प्रकट होण्यास सुरवात होईल. (दानीएल २:४४; ७:१३, १४, २७; प्रकटीकरण २:२६, २७; १६:१६; १७:१४; १९:११-२१) देवाने पुष्कळ काळापासून सहन केलेला विद्रोह आणि त्यामुळे पसरलेली दुष्टता संपुष्टात येईल त्या ‘शेवटल्या काळाच्या’ आपण अगदी अखेरीस आलो आहोत याचा भरपूर पुरावा आपल्याला सभोवार पाहायला मिळतो.—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३-३१.

होय, प्रेषित पौलाने जे म्हटले ते अगदी खरे आहे: “सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे”—पण लवकरच सृष्टीला स्वातंत्र्य प्राप्त होईल. “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले” ते सर्व पूर्ण होत असल्याचे सध्या जिवंत असलेले लाखो लोक पाहतील; अर्थात सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचवण्यात संपूर्ण मानवजातीला शांती, स्वातंत्र्य आणि न्याय प्राप्त होण्याचा समावेश आहे.—प्रेषितांची कृत्ये ३:२१.

अखेरीस खरे स्वातंत्र्य

“देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी” म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? येशू ख्रिस्ताने म्हटले: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहान ८:३१, ३२) स्वातंत्र्याची तीच गुरुकिल्ली आहे—ख्रिस्ताच्या आज्ञा आणि त्याची शिकवण शिकणे आणि त्यानुसार चालणे. असे केल्यामुळे आता देखील काही प्रमाणात आपल्याला स्वातंत्र्य मिळते. आणि अलीकडच्या भवितव्यात येशू ख्रिस्ताच्या शासनाखाली पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त होईल. बायबलचा अभ्यास करण्याद्वारे येशूचे ‘वचन’ जाणून घेणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. (योहान १७:३) आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे, ख्रिस्ताच्या खऱ्‍या शिष्यांच्या मंडळीमध्ये आवेशाने सहभाग घ्या. असे केल्यामुळे, आज यहोवा त्याच्या संस्थेद्वारे पुरवत असलेल्या मुक्‍त करणाऱ्‍या सत्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.—इब्री लोकांस १०:२४, २५.

“देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा” करत असताना ख्रिस्ताची संरक्षणात्मक काळजी आणि त्याचा पाठिंबा यांवर पौलाचा जसा विश्‍वास होता तशाच प्रकारचा विश्‍वास तुम्ही विकसित करू शकता; छळ आणि अन्याय कदाचित असह्‍य वाटत असला तरीसुद्धा. देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची चर्चा केल्यानंतर, पौलाने विचारले: “ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्‍त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्‍त करतील काय?” (रोमकर ८:३५) होय, रुसोच्या शब्दांत सांगायचे झाल्यास पौलाच्या दिवसांतील ख्रिश्‍चन कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दडपशाहीच्या “बंधनात” होतेच. ‘कापावयाच्या मेंढराप्रमाणे’ त्यांचा “वध दिवसभर होत” होता. (रोमकर ८:३६) यामुळे ख्रिश्‍चनांनी हार मानली का?

पौल लिहितो: “उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीति केली त्याच्या योगे ह्‍या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.” (रोमकर ८:३७) इतके सर्व सहन करावे लागले असतानाही प्रारंभिक ख्रिश्‍चन महाविजयी ठरले? कसे काय? पौल याचे उत्तर देतो: “कारण माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही.” (रोमकर ८:३८, ३९) दरम्यान, तुम्हाला “क्लेष, आपत्ती, छळवणूक” यांस तोंड द्यावे लागले तरी तुम्ही त्यांत ‘विजयी होऊ शकता.’ देवाचे प्रेम आपल्याला याची खात्री देते, की आता लवकरच ‘नश्‍वरतेच्या सर्व दास्यातून मुक्‍त होऊन आपल्याला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल.’

[६ पानांवरील चित्र]

“सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे”

[७ पानांवरील चित्र]

‘सृष्टी नश्‍वरतेच्या सर्व दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा