तुम्हाला आठवते का?
तुम्हाला टेहळणी बुरूजचे अलीकडचे लेख आवडले का? मग, पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतात का, ते पाहा:
◻ “ख्रिस्ताच्या वतीने वकिली करितो,” असे जे पौलाने म्हटले ते अभिषिक्त ख्रिश्चनांच्या बाबतीत म्हणणे अगदी उचित का आहे? (२ करिंथकर ५:२०)
प्राचीन काळात, खासकरून दोन राज्यांत शत्रुत्व असताना युद्ध टाळण्यासाठी बोलाचाली करण्याकरता राजदूत किंवा वकील यांना पाठवले जात असे. (लूक १४:३१, ३२) मानवजातीचे पापमय जग देवाला पारखे झाल्यामुळे लोकांना देवासोबत समेट करण्यास आर्जवण्यासाठी आणि त्याच्या कोणत्या अटी आहेत याविषयी सांगण्याकरता तो त्याचे अभिषिक्त राजदूत पाठवत आहे.—१२/१५, पृष्ठ १८.
◻ अब्राहामाचा विश्वास बळकट करणाऱ्या चार गोष्टी कोणत्या होत्या?
पहिली म्हणजे, यहोवा जेव्हा त्याच्याबरोबर बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन अब्राहामाने देवावर असलेला आपला विश्वास प्रकट केला (इब्री लोकांस ११:८); दुसरी गोष्ट, अब्राहामाचा विश्वास त्याच्या आशेशी निगडीत होता (रोमकर ४:१८); अब्राहाम बऱ्याचदा यहोवासोबत बोलत असे, ही तिसरी गोष्ट; आणि चौथी अशी, की अब्राहामाने यहोवाच्या निर्देशनांचे पालन केले तेव्हा यहोवाने त्याला साहाय्य केले. याच गोष्टी आज आपल्या विश्वासालाही बळकट करू शकतात.—१/१, पृष्ठे १७, १८.
◻ “आम्हास परीक्षेत आणू नको” असे म्हणण्याचा काय अर्थ होतो? (मत्तय ६:१३)
असे म्हणताना आपण देवाला अशी विनंती करत असतो की त्याच्या आज्ञांचा भंग करण्याचा मोह होतो तेव्हा त्या मोहावर विजय मिळवण्यासाठी त्याने आपल्याला मदत करावी. आपण मोहाला बळी पडू नये आणि ‘वाईटाने,’ म्हणजेच सैतानाने आपल्याला कह्यात घेऊ नये म्हणून यहोवा आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो. (१ करिंथकर १०:१३)—१/१५, पृष्ठ १४.
◻ देवाकडून आपल्या चुकांची क्षमा होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
पाप कबूल करण्यासोबतच आपल्याला त्याबद्दल पश्चात्ताप झाला पाहिजे आणि “पश्चात्तापास योग्य अशी फळे” आपल्यांत दिसून आली पाहिजेत. (लूक ३:८) पश्चात्तापी वृत्ती आणि केलेली चूक सुधारण्याची इच्छा असेल तर आपण आपोआपच ख्रिस्ती वडिलांकडे जाऊन आध्यात्मिक साहाय्य मागायला प्रवृत्त होऊ. (याकोब ५:१३-१५)—१/१५, पृष्ठ १९.
◻ आपण नम्र होण्याचा सतत प्रयत्न का केला पाहिजे?
नम्र मनुष्य धीर धरणारा आणि सहनशील असतो आणि तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. नम्रतेमुळे तुमच्यावर प्रेम करणारे खरे मित्र तुम्हाला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे यहोवाचा आशीर्वाद मिळतो. (नीतिसूत्रे २२:४)—२/१, पृष्ठ ७.
◻ येशूचा मृत्यू आणि आदामाचा मृत्यू यांत एक महत्त्वाचा फरक कोणता?
आदाम मरणास पात्र होता कारण त्याने आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेचे जाणूनबुजून उल्लंघन केले होते. (उत्पत्ति २:१६, १७) दुसरीकडे पाहता, येशू मरणास मुळीच पात्र नव्हता, कारण त्याने कोणतेच “पाप केले नाही.” (१ पेत्र २:२२) त्यामुळे, येशूच्या मृत्यूच्या वेळी त्याच्याजवळ अतिशय मौल्यवान असे काहीतरी होते जे पापी आदामाजवळ त्याच्या मृत्यूच्या वेळी नव्हते—परिपूर्ण मानवी जीवनाचा हक्क. अशाप्रकारे, मानवजातीला मुक्त करण्यासाठी येशूच्या मृत्यूला बलिदानाचे मूल्य होते.—२/१५, पृष्ठ १५, १६.
◻ यहेज्केलाच्या भविष्यसूचक दृष्टान्तात, नगर कशास सूचित करते?
हे नगर अधार्मिक (अपवित्र) देशात असल्यामुळे, ते पृथ्वीवरीलच काहीतरी असावे. तेव्हा हे नगर पार्थिव प्रशासनास चित्रित करत असावे, जे नीतिमान पार्थिव समाजातील सर्वांना लाभदायक ठरेल.—३/१, पृष्ठ १८.
◻ सा.यु. ३३ सालचा वल्हांडण साजरा करतेवेळी येशूने आपल्या शिष्यांचे पाय का धुतले?
येशूने पाय धुण्याचा एक नवीन रिवाज सुरू करण्यासाठी असे केले नाही. उलट, तो आपल्या प्रेषितांना एक नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करत होता; अर्थात, एक विनम्रतेचा आणि आपल्या बांधवांसाठी सर्वात कमी दर्जाचे काम करण्यासही तयार असण्याचा दृष्टिकोन.—३/१, पृष्ठ ३०.
◻ दुसऱ्यांना शिकवताना, स्वाभाविक कौशल्यांपेक्षा महत्त्वाचे काय असते?
स्वाभाविक क्षमतांपेक्षा, आपल्या विद्यार्थ्यांना ज्यांचे अनुकरण करता येतील असे गुण किंवा आपण स्वतःला लावून घेतलेल्या आध्यात्मिक सवयी अधिक महत्त्वाच्या आहेत. (लूक ६:४०; २ पेत्र ३:११)—३/१५, पृष्ठे ११, १२.
◻ जाहीर वक्तव्य करणारे, बायबल वाचनात सुधारणा कसे करू शकतात?
सरावाने. अगदी अस्खलित वाचता येत नाही तोपर्यंत मोठ्याने वारंवार वाचत राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. बायबलच्या ध्वनीफिती उपलब्ध असल्यास, त्या ऐकून वाचक कोठे जोर देतो, त्याच्या आवाजातील उतार चढाव आणि नावांचे, नवीन शब्दांचे उच्चारण तो कसे करतो याकडे लक्ष देणे सहायक ठरू शकते.—३/१५, पृष्ठ २०.
◻ व्यक्ती मरते, तेव्हा ‘देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जातो,’ तो कोणत्या अर्थाने? (उपदेशक १२:७)
आत्मा म्हणजे जीवनी शक्ती, त्यामुळे ही जीवनी शक्ती ‘देवाकडे परत जाते.’ ती या अर्थाने, की त्या मृत व्यक्तीला भविष्यात जीवन मिळण्याची आशा ही आता पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. केवळ देवच हा आत्मा किंवा जीवनी शक्ती त्या व्यक्तीला पुन्हा देऊन तिला नव्याने जिवंत करू शकतो. (स्तोत्र १०४:३०)—४/१, पृष्ठ १७.