वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१५ पृ. २६-२९
  • सीला—उत्तेजनाचा स्रोत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सीला—उत्तेजनाचा स्रोत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुंतेचा वादविषय
  • पौलासोबत प्रवास करतो
  • मारझोड आणि तुरुंगवास
  • मासेदोनिया ते बाबेल
  • अनुकरण करण्याजोगे उदाहरण
  • “मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • जेलचा अधिकारी ख्रिस्ती बनतो
    बायबलमधून शिकू या!
  • तीमथ्य–पौलाचा नवा मदतनीस
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१५ पृ. २६-२९

सीला—उत्तेजनाचा स्रोत

ख्रिस्ती इतिहासाच्या अगदी सुरवातीच्या काळापासून, देवाच्या लोकांच्या मंडळ्यांना उत्तेजन देण्यासाठी तसेच दूर दूर सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी विश्‍वासू प्रवासी पर्यवेक्षकांचे कार्य अतिमहत्त्वाचे ठरले आहे. सगळ्यात सुरवातीला नियुक्‍त करण्यात आलेल्या पर्यवेक्षकांपैकी एक होता सीला; तो एक संदेष्टा आणि यरुशलेमेतील मंडळीचा एक प्रमुख सदस्यही होता. प्रचार कार्यात महत्त्वपूर्ण विकास घडवून आणण्यात तसेच युरोपीयन क्षेत्रात प्रथमच सुवार्तेचा प्रचार करण्यात त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. हे सर्व करण्यासाठी कशामुळे सीला खास पात्र ठरला? आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वातील कोणती गुणवैशिष्ट्ये आज आपल्याला अनुकरण करण्यासारखी आहेत?

सुंतेचा वादविषय

सा.यु. ४९ मध्ये सुंतेच्या विषयावरून एक वादविषय निर्माण झाला होता; यामुळे ख्रिस्ती मंडळीत फुटी पडण्याचा धोका होता. हा वादविषय मिटवण्यासाठी यरुशलेमेतील नियमन मंडळाला सुस्पष्ट असे मार्गदर्शन सर्व ख्रिश्‍चनांना द्यायचे होते. बायबलमध्ये याच घटनेच्या संदर्भात सीलाचा उल्लेख आढळतो; या सीलाला सिल्वान असे देखील म्हटलेले आहे. सदर वादविषयासंबंधी निर्णय घेणाऱ्‍यांमध्ये तो देखील एक असावा आणि घेतलेला निर्णय “अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्‍यांना” सांगण्यासाठी नंतर ‘प्रेषित आणि वडीलवर्गाचा’ एक गुप्तदूत म्हणून त्याची निवड करण्यात आली असावी. बर्णबा आणि पौल यांच्यासोबतच सीला आणि यहूदा (बर्शब्बा) यांनी देखील नियमन मंडळाचा लिखित संदेश अंत्युखियातील ख्रिश्‍चनांना सांगितला; सुंतेच्या वादविषयासंबंधी यरुशलेमेत झालेल्या सभेत जे काही घडले, जे निष्कर्ष काढण्यात आले तसेच पत्रातील विषय या सर्व गोष्टी त्यांनी अंत्युखियातील ख्रिश्‍चनांना तोंडी सांगितल्याचे स्पष्ट होते. शिवाय, त्यांनी “पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.” याचा एक चांगला परिणाम असा झाला, की अंत्युखियातील ख्रिश्‍चनांना “आनंद झाला.”—प्रेषितांची कृत्ये १५:१-३२.

अशाप्रकारे, एक मूलभूत वादविषय मिटवण्यात सीलाने महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. पण, त्याची ही कामगिरी फार सोपी होती असे नाही. सुंतेच्या संदर्भात जो काही निर्णय घेण्यात आला होता त्याच्याप्रती अंत्युखिया मंडळीची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे, “प्रेषितांनी आपल्या पत्रात जे काही लिहिले होते त्याचा खुलासा करून सांगण्यासाठी एका सुज्ञ आणि व्यवहारकुशल व्यक्‍तीची गरज होती,” असे एक समीक्षक म्हणतो. ही नाजूक कामगिरी हाताळण्यासाठी सीलाची निवड करण्यात आली त्यावरून त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी आपल्याला थोडीफार माहिती मिळते. नियमन मंडळाच्या मार्गदर्शक सूचना तो जशाच्या तशा विश्‍वासूपणे ख्रिश्‍चनांपर्यंत पोहंचवेल इतका भरवसा त्याच्यावर ठेवला जाऊ शकत होता. शिवाय, मंडळीसाठी धोकेदायक असणारा वादविषय निर्माण झाला तेव्हा हा वादविषय मिटवून मंडळीत सीला समेट घडवून आणू शकत होता; त्यावरून तो एक सुज्ञ पर्यवेक्षक देखील असावा असे म्हणता येईल.

पौलासोबत प्रवास करतो

ही कामगिरी पूर्ण केल्यानंतर सीला यरुशलेमेस परत गेला की नाही हे सांगता येत नाही. पण, योहान मार्कवरून बर्णबा आणि पौल यांच्यात खटके उडाले तेव्हा एका नवीन दौऱ्‍यावर जाण्यासाठी पौलाने अंत्युखियात असलेल्या सीलाची निवड केली; आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी पौलाने ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला होता त्या त्या ठिकाणी पुन्हा भेटी देणे हा त्या नवीन दौऱ्‍याचा मूळ उद्देश होता.—प्रेषितांची कृत्ये १५:३६-४१.

विदेशी क्षेत्रात जाऊन मिशनरी कार्य करण्याची स्वेच्छा-वृत्ती सीलामध्ये होती आणि संदेष्टा तसेच नियमन मंडळाचा प्रवक्‍ता या नात्याने सूरिया आणि किलिकियातील विश्‍वासू बांधवांना नियमन मंडळाने घेतलेले निर्णय सांगण्याचा अधिकारही त्याला होता; यामुळेच कदाचित पौलाने त्याची निवड केली असावी. आणि याचे परिणाम निश्‍चित चांगले निघाले. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक म्हणते: “तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्‍यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. ह्‍यावरून मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.”—प्रेषितांची कृत्ये १६:४, ५.

मिशनरी दौऱ्‍यावर असताना दोन वेळा पवित्र आत्म्याने या मिशनऱ्‍यांना त्यांच्या नियुक्‍त मार्गावरून परावृत्त केले. (प्रेषितांची कृत्ये १६:६, ७) तीमथ्यासंबंधी अनिश्‍चित ‘भविष्यवचन’ केल्यानंतर वाटेत अर्थात लुस्त्रामध्ये तो देखील यांच्या गटात सामील झाला. (१ तीमथ्य १:१८, पं.र.भा.; ४:१४) भविष्यवाणी करण्याचे दान मिळालेल्या पौलाला एक दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतात या प्रवासी सोबत्यांना युरोपमधील मासेदोनियात जाण्याची सूचना देण्यात आली.—प्रेषितांची कृत्ये १६:९, १०.

मारझोड आणि तुरुंगवास

फिलिप्पैमध्ये अर्थात ‘त्या प्रांतातल्या पहिल्या [प्रमुख] शहरात’ सीलाला एका अविस्मरणीय दिव्यातून जावे लागले. एकदा पौलाने एका दासी मुलीच्या अंगातून भविष्य सांगणारा आत्मा घालविला होता; आता आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून दासी मुलीच्या धन्यांनी पौल आणि सीला ह्‍यांना धरून अधिकाऱ्‍यांकडे ओढून नेले. अशाप्रकारे, अपराधी म्हणून या दोघांना लोकांसमोर आणले गेले, त्यांची बाह्‍य वस्त्रे फाडली गेली आणि भर बाजारपेठेत छड्यांचा मार देऊन त्यांचा अपमान करण्यात आला.—प्रेषितांची कृत्ये १६:१२, १६-२२.

मानवी सहनशक्‍तीचा अंत पाहणारी ही मारहाण केवळ भयंकर स्वरूपाची शिक्षाच नव्हती तर पौल आणि सीला यांच्या बाबतीत पाहू जाता ती बेकायदेशीर देखील होती. का? कारण रोमी कायद्याखाली कोणत्याही रोमी नागरिकावर हात टाकण्याची अनुमती नव्हती. पौल स्वतः एक रोमी नागरिक असून सीला देखील रोमी असल्याची शक्यता आहे. “पुष्कळ फटके मारल्यावर” पौल आणि सीला यांना बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले गेले. गुस्टाफ स्टाहलीन यांच्या मते खोडे ही “भयंकर स्वरूपाची साधने असून त्यांत कैद्यांचे पाय शक्य तितके फाकले जायचे; त्यामुळे त्यांना झोपणे देखील मुश्‍कील व्हायचे.” पौल आणि सीला यांच्या पाठीवर वेदनामय जखमा झाल्या असतील यात शंका नाही; पण तरीही, मध्यरात्रीच्या सुमारास ‘पौल व सीला हे प्रार्थना करीत होते आणि गाणे गाऊन देवाची स्तुति करीत होते.’—प्रेषितांची कृत्ये १६:२३-२५.

यावरून सीलाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी आपल्याला आणखीन काही माहीत होते. ते म्हणजे, ख्रिस्ताच्या नावाखातर दुःख सहन करत असल्यामुळे तो आनंदी होता. (मत्तय ५:११, १२; २४:९) त्याच्या याच आनंदी वृत्तीमुळे आधी एकदा अंत्युखियात कार्य करत असताना सीलाला आणि त्याच्या सोबत्यांना प्रभावकारीरित्या मंडळीला उत्तेजन देण्यास आणि मजबूत करण्यास शक्य झाले आणि त्यामुळेच त्यांचे सहख्रिश्‍चन हर्षित झाले होते. भूकंपामुळे पौल आणि सीला यांची बंदीशाळेतून अद्‌भुतरित्या सुटका झाल्यामुळे तसेच आत्महत्या करण्यास निघालेल्या बंदिशाळेच्या नायकाला आणि त्याच्या कुटुंबाला देवावर विश्‍वास ठेवण्यास आपल्याला मदत करता आली यांमुळे देखील त्या दोघांचा आनंद द्विगुणीत झाला असावा.—प्रेषितांची कृत्ये १६:२६-३४.

पौल आणि सीला दोघेही फटक्यांच्या मारामुळे किंवा तुरुंगात डांबल्यामुळे घाबरले नाहीत. उलट, त्यांना बंदीशाळेतून सोडून द्यावी अशी आज्ञा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्‍यांनी अपेक्षिल्याप्रमाणे गुप्तपणे, लज्जास्पदरित्या फिलिप्पैतून निघून जाण्यास त्यांनी नकार दिला. हार न मानता त्यांनी त्या मगरूर, जुलमी अधिकाऱ्‍यांवरच बाजू उलटविली. “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरविल्यावाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय?” असे पौलाने विचारले. “हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.” पुढील परिणाम लक्षात घेऊन घाबरलेल्या अधिकाऱ्‍यांना या दोघांना नगरातून निघून जाण्याची अक्षरशः विनंती करावी लागली.—प्रेषितांची कृत्ये १६:३५-३९.

अशाप्रकारे रोमन या नात्याने असलेले आपले नागरी हक्कांची अधिकाऱ्‍यांना जाणीव करून दिल्यावर आणि आपल्या मित्रपरिवाराचा निरोप घेतल्यावर पौल आणि सीला यांनी अधिकाऱ्‍यांची विनंती मान्य केली. एव्हाना, बांधवांना उत्तेजन देणे हे प्रचाराच्या दौऱ्‍याचे एक मुख्य वैशिष्ट्य ठरले होते; त्यानुसार सीला आणि त्याचा सोबती यांनी पुन्हा एकदा बांधवांना “धीर” [“उत्तेजन,” NW] दिला आणि ते मार्गस्थ झाले.—प्रेषितांची कृत्ये १६:४०.

मासेदोनिया ते बाबेल

आपल्या वाट्याला आलेल्या अशा कटू अनुभवांमुळे निरुत्साही होण्याऐवजी पौल, सीला आणि त्यांचे सोबती नवनवीन मिशनरी क्षेत्रात सुवार्ता सांगत राहिले. पण, थेस्सलनीका येथे पुन्हा एकदा त्यांना संकटप्रसंगांचा सामना करावा लागला. तीन शब्बाथांपर्यंत पौल त्याच्या सेवेत यशस्वी झाला तेव्हा त्याच्या द्वेषी विरोधकांनी घोळका जमवून शहरात खळबळ माजवली; त्यामुळे या मिशनऱ्‍यांना रात्रीच्या वेळी सुज्ञपणे शहर सोडून जावे लागले. मग ते बिरुयाला गेले. त्या शहरातही पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना यश मिळत आहे हे समजताच त्यांचे विरोधक पार थेस्सलनीकावरून बिरुयात आले. त्यामुळे पौलाला एकटे पुढे निघून जावे लागले; पण नवीन आस्थेवाईक लोकांना मदत करण्यासाठी सीला आणि तीमथ्य मात्र बिरुयातच राहिले. (प्रेषितांची कृत्ये १७:१-१५) करिंथमध्ये पुन्हा सीला आणि तीमथ्य, सुवार्ता घेऊन तसेच मासेदोनियातील विश्‍वासू मित्रांची देणगी घेऊन पौलाच्या सोबतीला आले. त्यामुळेच कदाचित या गरजू प्रेषिताला त्याने दरम्यान हाती घेतलेले आपले प्रापंचिक काम सोडून जोमाने पूर्ण-वेळेचे प्रचार कार्य करण्यासाठी जाणे शक्य झाले असावे. (प्रेषितांची कृत्ये १८:१-५; २ करिंथकर ११:९) करिंथमध्ये असताना सीला आणि तीमथ्य यांना सुवार्तिक आणि पौलाचे सोबती असेही संबोधले आहे. त्यावरूनच स्पष्ट होते, की त्या शहरातही त्यांचे कार्य मंदावले नव्हते.—२ करिंथकर १:१९.

याच काळात करिंथमधून थेस्सलनीकाकरांना दोन पत्रे लिहिली होती; या दोन्ही पत्रांमध्ये “आम्ही” हे सर्वनाम वापरलेले आहे; त्यावरून सीला आणि तीमथ्य या दोघांनी ही पत्रे लिहिण्यात हातभार लावला असावा असे गृहित धरले जाते. पण, सीलानेही लिखाण केले होते ही कल्पना मुख्यत्वे पेत्र त्याच्या स्वतःच्या पत्राविषयी जे काही म्हणतो त्यावर आधारित आहे. पेत्र म्हणतो, की त्याने बाबेलमधून आपले पहिले पत्र लिहिले ते ‘विश्‍वासू बंधु सिल्वान ह्‍याच्या हाती.’ (१ पेत्र ५:१२, १३) यावरून, सिल्वानने केवळ ते पत्र पोचते केले होते असा अर्थ होत असला तरी पेत्राच्या पहिल्या दोन पत्रांमधील भिन्‍न लेखन-शैलीवरून त्याने फक्‍त पहिले पत्र सिल्वानकडून लिहून घेतले असावे असे सूचित होते. यावरून, सीलाच्या बहुविध देणग्या आणि ईश्‍वरशासित विशेषाधिकार यांव्यतिरिक्‍त तो एक सचीव देखील असावा अशी शक्यता आहे.

अनुकरण करण्याजोगे उदाहरण

सीलाने जे काही केले त्याचा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा त्याचे चरित्र आपल्याला प्रभावित करते. आधुनिक काळातील मिशनऱ्‍यांसाठी तसेच प्रवासी पर्यवेक्षकांसाठी तो एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने परिश्रम आणि अनेक त्याग करून निःस्वार्थपणे दूर दूर प्रवास केला; हा प्रवास भौतिक फायदा किंवा मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठी नव्हे तर इतरांना मदत करण्यासाठी केला. सुज्ञ आणि व्यवहारकुशल सल्ला, उत्तम प्रकारे तयार केलेली सस्नेह भाषणे आणि सेवेतील आपला आवेश यांद्वारे लोकांना उत्तेजन देणे हा त्यामागचा त्याचा उद्देश होता. आज यहोवाच्या संघटनेत तुम्ही कोणत्याही भूमिकेत काम करत असलात तरी तुम्ही देखील, अगदी संकटप्रसंगांच्या काळातही अशाचप्रकारे सकारात्मक असण्याचा प्रयत्न केल्यास सहविश्‍वासूंसाठी तुम्ही देखील उत्तेजनाचे स्रोत व्हाल.

[२९ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

पौलाचा दुसरा मिशनरी दौरा

महासमुद्र

अंत्युखिया

दर्बे

लुस्त्रा

इकुनिया

त्रोवस

फिलिप्पै

अंफिपुली

थेस्सलोनीका

बिरुया

अथेन

करिंथ

इफिस

यरुशलेम

कैसरीया

[Credit Line]

Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा