संघर्ष—एका “पवित्र” स्थळासाठी
जुलै १५, १०९९ रोजी, रोमच्या पोपने चिथावलेल्या पहिल्या धर्मयुद्धाने जेरूसलेम काबीज करण्याचा हेतू अखेर साध्य केलाच. तेव्हा झालेली कत्तल खरोखर महाभयंकर होती! त्यातून मोजून दोघांचा—प्रांताधिकाऱ्याचा आणि त्याच्या अंगरक्षकाचा बचाव झाला, तोही भलीमोठी लाच दिल्यानंतर. बाकीच्या मुस्लिम आणि यहुदी रहिवाशांचे काय झाले याचा अहवाल देताना धर्मयुद्धे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात पाळक ॲन्टनी ब्रीज म्हणतात: “शहरात वाटेल ते करण्याची धर्मयोद्ध्यांना मोकळीक मिळताच त्यांनी अमाप, महाभयंकर रक्तपात केला. . . . शहरात दिसेल त्या पुरुषाची, स्त्रीची आणि चक्क मुलाबाळांची देखील ते कत्तल करत सुटले. सगळ्यांची कत्तल करून झाल्यावर या विजेत्यांनी शहराच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढली आणि द चर्च आफ होली सेपल्करमध्ये जाऊन देवाचे आभार मानले.”
धर्मयुद्धात जेरूसलेम शहराचा ताबा मिळवल्यानंतर ख्रिस्ती धर्मजगताने येथे आपला जम बसवला खरा पण रोमन कॅथलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स आणि इतर तथाकथिक ख्रिस्ती धर्म यांच्यात सतत संघर्ष होत आला आहे. सन १८५० मध्ये, जेरूसलेममध्ये तसेच त्याच्या आसपास असलेल्या पवित्र स्थळांवरून विविध चर्च पुढाऱ्यांमध्ये झालेला वादविवाद क्रिमियन युद्धाची ठिणगी पाडण्यास कारणीभूत ठरला. इंग्लंड, फ्रान्स आणि ओटोमॅन राज्य यांनी रशियाविरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यात पाच लाख लोकांचे जीव गेले.
पण, या युद्धामुळे जेरूसलेम आणि आसपासच्या पवित्र स्थळांच्या प्रश्नावरून ख्रिस्ती धर्मजगतात चाललेल्या वादाला विरामचिन्ह मिळाले नाही. त्याकाळी देशावर अधिकार गाजवणाऱ्या ओटोमॅन लोकांनी पवित्र स्थळांची निरनिराळ्या धार्मिक गटांत वाटणी करून शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. याचा खुलासा करताना हे जेरुसलेम आहे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. मनाशा हारेल म्हणतात: “नोव्हेंबर १९४७ मध्ये वाटणीच्या ठरावासोबतच संयुक्त राष्ट्रांनी हे तत्त्व स्वीकारले होते. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहे.” परिणामस्वरूप, द चर्च ऑफ होली सेपल्करची रोमन कॅथलिक, ग्रीक ऑर्थोडॉक्स, अर्मेनियन्स, सिरियन्स आणि कॉप्ट्स यांमध्ये वाटणी झाली आहे. शेवटी, उरले ईथिओपियन लोक; त्यांनी देखील आपल्या काही सदस्यांना या चर्चच्या छपरावर झोपड्या बांधून राहण्यास सांगितले आणि असे करून चर्चवरील आपला हक्क सांगितला. अनेकांच्या मते चर्च ऑफ द होली सेपल्कर हे ख्रिस्ती धर्मजगताचे सगळ्यात पवित्र स्थळ आहे. त्यात असंख्य देव्हारे, प्रतिमा आणि मूर्ती आहेत. आणखीन एक तथाकथित पवित्र स्थळ म्हणजे गोर्डोनचे कॅलव्हरी; काही प्रोटेस्टंट लोकांच्या मते याच ठिकाणी येशूला मृत्यूदंड देऊन त्याला मूठमाती देण्यात आली होती.
फार पूर्वी, पवित्र स्थळांवर विश्वास ठेवणाऱ्या एका स्त्रीला येशूने म्हटले होते: “तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतहि करणार नाही अशी वेळ येत आहे, . . . खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील.” (योहान ४:२१-२४) त्यामुळेच आज खरे ख्रिस्ती पवित्र स्थळांना पूज्य मानत नाहीत. सा.यु. ७० मध्ये रोमी सैन्यांनी विश्वासघातकी जेरूसलेमचा जो नाश केला तो आजच्या ख्रिस्ती धर्मजगतासाठी एक थरारक इशारा आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील मूर्तिपूजा, फुटी आणि रक्तदोष या गोष्टी ख्रिस्ती असण्याचा त्यांचा दावा खोटा ठरवतात. त्यामुळेच, मोठ्या बाबेलचा भाग असणाऱ्या सर्व धर्मांचे जे काही होईल असे देवाने पूर्वभाकीत केले त्यातून तिलाही सुटका मिळणार नाही.—प्रकटीकरण १८:२-८.