गर्वाची किंमत—किती मोठी?
तुम्हाला मुद्दामहून कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याशी तुमचा कधी संबंध आला आहे का? तुम्हाला अशाप्रकारची वाईट वागणूक देणारा तो कदाचित तुमचा व्यवस्थापक, मालक, पर्यवेक्षक इतकेच नव्हे तर तुमचा एखादा नातेवाईक तर नाही ना? तुम्हाला त्या व्यक्तीविषयी कसे वाटले? तो मनुष्य तुम्हाला आवडेल का? मुळीच नाही! का? कारण गर्वामुळे दरी तयार होते आणि बोलण्याचालण्याची शक्यताच राहत नाही.
गर्विष्ठ व्यक्ती मग ती स्त्री असो अथवा पुरुष, प्रत्येकवेळी स्वतःला उंचवण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असते. अशाप्रकारची मनोवृत्ती असलेला मनुष्य क्वचितच दुसऱ्यांविषयी काही चांगले बोलेल. दुसऱ्याची टीका करायला तो सदैव तयार असतो जसे की—“त्याच्याकडे काही चांगले गुण आहेत हे मान्य आहे, पण अमुक एक गोष्ट कमी आहे.”
चांदीच्या शब्दांत सोन्याचे विचार (इंग्रजी) या पुस्तकात गर्वाविषयी असे म्हणण्यात आले आहे: “गर्व असा दुर्गुण आहे ज्यामुळे एखादा मनुष्य पूर्णपणे गिळंकृत होतो. त्यामुळे मनुष्य भिकेला लागतो. अशा गर्विष्ठ व्यक्तीकडे लोक पाहत देखील नाहीत.” गर्विष्ठ व्यक्तीकडे कोणाला जायला आवडत नाही, यात आश्चर्य करण्यासारखे काही आहे का? खरे तर, गर्वाची किंमत खऱ्या मित्रांना मुकण्याकरवीच चुकती करावी लागते. हेच पुस्तक पुढे म्हणते: “दुसऱ्या बाजूला पाहता, नम्र लोकांवर जग प्रेम करते—नम्रतेचा गर्व करणाऱ्यांवर नव्हे, तर खरोखरच नम्र असणाऱ्यांवर.” बायबलमध्ये अगदी उचितरीत्या सांगण्यात आले आहे: “गर्व मनुष्याला खाली उतरितो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.”—नीतिसूत्रे २९:२३.
मैत्री आणि लोकांकडून आदर मिळवण्यावर गर्वामुळे निश्चितच परिणाम होतो, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्वामुळे देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कोणता परिणाम होतो? गर्विष्ठ, शिष्ट आणि मगरूर व्यक्तीला देव कोणत्या दृष्टीने पाहतो? आपल्या गर्वाचा किंवा नम्रतेचा देवाला काही फरक पडतो का?
नम्रतेचा एक धडा
नीतिसूत्राच्या लेखकाने ईश्वरी प्रेरणेने लिहिले: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.” (नीतिसूत्रे १६:१८, १९) या शब्दांतील सुज्ञतेची खात्री आपल्याला सीरियाचा सेनापती, नामान याच्यावरून मिळते. अलीशा या इस्राएली संदेष्ट्याच्या काळात नामान होऊन गेला.
नामानाला कोड झाला होता. उपाय शोधण्याकरता त्याने सामरियापर्यंत प्रवास केला. तेथे पोहंचल्यानंतर अलीशा स्वतः आपल्यावर इलाज करेल असे त्याला वाटले होते. पण, संदेष्टा अलीशा याने स्वतः त्याला भेटण्याऐवजी त्याच्या दासाला असा निरोप घेऊन नामानाकडे धाडले, की त्याने यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारावी. अशाप्रकारच्या वागणुकीने आणि सल्ल्याने नामान क्रोधित झाला. त्याने म्हटले, की मला स्वतःला जातीने भेटायला येण्याऐवजी अलीशाने त्याच्या दासाला माझ्याकडे का पाठवावे? यार्देन नदीप्रमाणेच सीरियामधील नद्याही चांगल्याच होत्या ना! गर्व ही त्याची खरी समस्या होती. त्याचा परिणाम काय झाला? चांगला सल्ला ऐकल्यामुळे त्याचे भले झाले. “मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारिल्या तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.”—२ राजे ५:१४.
काहीवेळा थोडीशी नम्रता दाखवल्याने फार मोठा लाभ होतो.
आढ्यतेची किंमत
गर्वामुळे आपल्याला जी किंमत मोजावी लागते ती फार मोठी असू शकते. गर्वाचे आणखी एक प्रमाण आहे ज्याची कल्पना “हब्रिस” या शब्दातून येते. “अगदी टोकाचा गर्व किंवा अहंकार ज्यामुळे बहुतेकवेळा शिक्षा मिळू शकते,” अशी त्या शब्दाची व्याख्या केली जाते. (वेब्स्टअर्स नाईन्थ न्यू कॉलिजिऍट डिक्शनरी) हा शब्द मूळचा ग्रीक भाषेतला आहे आणि ग्रीक भाषेचा पंडित, विल्यम बार्कले यांच्या मते “हब्रिस या शब्दाचा अर्थ आहे, क्रुरतेचा समावेश असलेला गर्व . . . यामध्ये अशाप्रकारची आढ्यता असते ज्यामुळे लोक दुसऱ्यांना कमी लेखता यावे म्हणून त्यांचे मन दुखवतात.”
गर्वाच्या बाबतीत अगदी कळस केल्याचे स्पष्ट उदाहरण बायबलमध्ये आहे. हानून, या अम्मोनी लोकांच्या राजाची ही गोष्ट. इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स हे पुस्तक म्हणते: “हानूनचे वडील, नाहाश यांनी दावीदावर दया केली होती म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर दावीदाने हानूनचे सांत्वन करण्याकरता आपले काही दूत पाठवले. पण हानूनच्या सरदारांनी त्याला असे सांगितले, की देश हेरण्याकरता दावीदाने षडयंत्र रचले आहे आणि त्याकरताच त्याने या दूतांना पाठवले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून हानूनने दावीदाच्या सेवकांना पकडले, त्यांची अर्धीअर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना परत पाठवले.”a या घटनेविषयी बार्कले असे म्हणतात: “अशाप्रकारच्या वागण्याला हब्रिस म्हणतात. कोणाचाही अपमान करणे, बेअब्रू करणे आणि सर्वांसमोर मानखंडणा करणे या सर्व गोष्टी यात येतात.”—२ शमुवेल १०:१-५.
होय, गर्विष्ठ माणूस अहंकारी, उर्मट होऊन दुसऱ्यांचा अपमान करतो. दुसऱ्यांना दुखवण्यात त्याला काही वाटत नाही, दुसऱ्याची खिन्नता आणि बदनामी पाहून त्याला खूप मजा वाटते. पण एखाद्याला कमी लेखणे किंवा बदनाम करणे हे दुहेरी तलवारीसारखे आहे. त्यामुळे मित्र त्याला सोडून जातो आणि कदाचित पुढे त्याचा शत्रूही बनू शकतो.
एखादा खरा ख्रिस्ती मनुष्य गर्वामुळे कोणाचे मन दुखवू शकतो का आणि तेही त्याच्या गुरुने, “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर,” अशी आज्ञा दिलेली असताना? (मत्तय ७:१२; २२:३९) असे करणे म्हणजे देवाच्या आणि ख्रिस्ताच्या विरोधात जाणे होय. यामुळे बार्कले यांनी गंभीर परीक्षण केले आहे: “हा अशाप्रकारचा गर्व आहे ज्यामुळे एखादा मनुष्य देवाचा विरोधक होतो.” अशाप्रकारचा गर्विष्ठ मनुष्य म्हणतो: “देव नाही.” (स्तोत्र १४:१) किंवा स्तोत्रसंहिता १०:४ येथे सांगण्यात आल्याप्रमाणे: “दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही; देव नाही असाच त्याच्या सर्व विचारांचा सार.” अशाप्रकारच्या गर्वामुळे किंवा अहंकारामुळे आपले मित्र आणि नातेवाईकच आपल्यापासून दुरावत नाहीत, तर देवही आपल्यापासून दुरावतो. गर्वाची किती मोठी किंमत मोजावी लागते!
गर्वाने तुमच्या गुणांचा ऱ्हास होऊ देऊ नका
अनेक गोष्टींचा गर्व असतो—देश, जात, समाजातील पत, शिक्षण, संपत्ती, प्रतिष्ठा आणि शक्ती. या ना त्याप्रकारे आपल्यामध्ये अगदी सहजरीत्या गर्व निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपल्यांतील चांगल्या गुणांचा ऱ्हास होऊ शकतो.
अनेकजण, आपल्यापेक्षा मोठ्या किंवा बरोबरीच्या लोकांसोबतही मोठ्या विनयशीलपणे वागत असल्याचे दिसून येते. पण, अशाप्रकारच्या नम्रता दाखवणाऱ्या मनुष्याला अधिकार मिळाल्यानंतर काय होते? तो अचानकपणे हुकूमशाही सुरू करतो आणि आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांच्या नाकी नऊ आणतो! अधिकाराचा गणवेश किंवा एखादे पदक मिळाल्यानंतर काही लोकांच्या बाबतीत असे होऊ शकते. इतकेच काय तर सरकारी कर्मचारीसुद्धा लोकांशी गर्वाने वागू शकतात. त्यांना असे वाटेल, की ते लोकांची सेवा करण्यासाठी नाहीत, तर लोक त्यांची सेवा करण्यासाठी आहेत. गर्वामुळे तुम्ही कठोर, पाषाणहृदयी होता; पण नम्रतेमुळे तुम्हाला दयाळू होण्यास मदत मिळू शकते.
येशूलाही गर्वाने वेडे होऊन त्याच्या शिष्यांशी कठोरपणे वागता आले असते. कारण तो परिपूर्ण, देवाचा पुत्र होता; पण त्याला त्याच्या अपरिपूर्ण, असंयमी आणि उतावीळ शिष्यांसोबत राहावे लागले. असे असतानाही त्याचे ऐकणाऱ्यांना तो कोणते आमंत्रण देतो? “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.
येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो का? किंवा आपण कठोर, ताठ, जुलमी, निर्दयी, गर्विष्ठ आहोत? येशूप्रमाणे, लोकांना उभारा, त्यांना दाबून टाकू नका. गर्वाचा नाशक प्रभाव टाळा.
हे सर्व पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो, कोणत्याही प्रकारचा गर्व चुकीचा आहे का?
आत्मसन्मानाविरुद्ध अहंभाव
गर्व “योग्य किंवा उचित आत्मसन्मानीय देखील असतो.” (वेब्स्टअर्स नाईन्थ न्यू कॉलिजिऍट डिक्शनरी) स्वतःविषयी सन्मान असणे, हा आत्मसन्मानाचा अर्थ आहे. याचा हा अर्थ होतो, की दुसऱ्यांना आपल्याविषयी काय वाटते, याकडे तुम्ही लक्ष देता. तुम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्या नावाविषयी काळजी वाटते. पुढील स्पॅनिश म्हण अगदी खरी आहे, “तू कोणाबरोबर संगती राखतो ते मला सांग, मी तुला तुझ्याविषयी सांगतो.” तुम्हाला निष्काळजी, आळशी, असभ्य आणि ओंगळ भाषा बोलणाऱ्यांशी राहायला आवडत असेल, तर एके दिवशी तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखे व्हाल. त्यांचे गुण तुमच्यात येतील आणि तुम्हीही त्यांच्याप्रमाणे स्वतःचा आत्मसन्मान गमवाल.
गर्वाची दुसरी एक टोकाची बाजू आहे—गर्व एखाद्या मनुष्याला फारच अहंकारी किंवा बढाईखोर बनवू शकतो. येशूच्या दिवसांतील शास्त्री आणि परुशी गर्विष्ठ होते; त्यांना त्यांच्या परंपरांचा आणि फाजील धार्मिक पेहरावाचा मोठा गर्व होता. येशूने त्यांना असा इशारा दिला: “आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करितात, ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करितात; जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते.”—मत्तय २३:५-७.
यास्तव, योग्य आत्मसन्मान हा संतुलित असला पाहिजे. हेसुद्धा लक्षात ठेवा, की यहोवा बाह्यस्वरूप पाहत नाही, तर तो हृदय पाहतो. (१ शमुवेल १६:७; यिर्मया १७:१०) फाजील धार्मिकता म्हणजे देवाची धार्मिकता नव्हे. तर मग प्रश्न पडतो की आपण स्वतःमध्ये खरी नम्रता कशाप्रकारे विकसित करू शकतो आणि गर्वाची मोठी किंमत मोजण्यापासून कसे वाचू शकतो?
[तळटीपा]
a वॉच टावर बायबल अण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[४ पानांवरील चित्र]
थोडीशी नम्रता दाखवल्यामुळे नामानाला खूप फायदा झाला