“तुम्ही अगदी देवाच्या अपेक्षेप्रमाणे वागता”
“प्रभूकरिता” सरकारी अधिकाऱ्यांशी वागताना ख्रिस्ती लोक ‘चांगले करणारे’ अशी प्रशंसा मिळवण्याची अपेक्षा करू शकतात. (१ पेत्र २:१३-१५) अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांनी एका महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भरवलेल्या प्रांतीय अधिवेशनात त्यांना याच गोष्टीचा अनुभव आला.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या महाविद्यालयाच्या सेक्युरटी पोलिसांना नेहमीप्रमाणे या लोकांविषयी असे वाटले, की हे लोकही इतर अधिवेशनांकरता येणाऱ्या लोकांप्रमाणे रागीट, सहकार्य न करणारे असतील. पण यापूर्वी यहोवाच्या साक्षीदारांशी त्यांचा केव्हाही संबंध न आल्याने त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला!
महाविद्यालयाच्या आवारात फाटकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक गाडीची पोलिस नेहमीप्रमाणे तपासणी करत होते. गाड्यांची तपासणी करताना उशीर होत होता तरीदेखील या अधिवेशनाला येणाऱ्या लोकांचे मैत्रिपूर्ण, सहनशील आणि आदराचे वागणे पाहून पोलिस आवाक राहिले. या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध, बाचाबाची आणि ओंगळ भाष्य नव्हते. एका सेक्युरटी अधिकाऱ्याने असे म्हटले: “तुमची नम्रता आणि मर्यादशीलता आमच्या नजरेतून सुटली नाही, इतरवेळी लोक येथे येतात तेव्हा मात्र या गोष्टी नावालाही नसतात.”
सेक्युरटी प्रमुख अधिकाऱ्याला यहोवाचे साक्षीदार सहकार्य दाखवत असल्याचे समजल्यानंतर त्याला साक्षीदारांच्या गाड्यांची तपासणी करण्याची काही आवश्यकता भासली नाही कारण त्याने म्हटले, “तुम्ही खरोखरच शिस्तप्रिय लोक आहात.” त्यामुळे “जे डब्ल्यू” असे लिहिलेल्या गाड्यांना तपासणी न करता आत जाऊ दिले.
या अधिवेशनाच्या अखेरीस सेक्युरटी प्रमुख अधिकाऱ्याने असे म्हटले, की यहोवाच्या साक्षीदारांनी लवकरच या सभागृहात पुन्हा यावे. तो म्हणाला: “असे शिष्टाचाराने वागणारे लोक आम्ही कधी पाहिलेच नव्हते. तुम्ही देवाच्या अपेक्षेप्रमाणे वागता.” अशाप्रकारच्या प्रशंसेमुळे खऱ्या ख्रिश्चनांना ‘चागंले आचरण ठेवण्यास’ आणखी प्रेरणा मिळते ज्यामुळे अनेक लोक ‘त्यांची सत्कृत्ये पाहून देवाचे गौरव करतील.’—१ पेत्र २:१२.