विश्वास आहे असे अनेकजण म्हणतात
“येशूसारखी महान, श्रेष्ठ व्यक्ती नाही!” ब्राझीलमधल्या एका धार्मिक स्त्रीने असे म्हटले. होय, येशूच्या नावात शक्ती आहेच. इतिहासात पाहिले तर आपल्याला दिसून येईल, की अनेक लोकांनी त्याच्याकरता हसतहसत दुःख आणि मृत्यूदेखील सहन केला.
प्रेषित पेत्राने आणि योहानाने जेरुसलेममध्ये ‘येशूच्या नावाने’ प्रचार केला. असे केल्यामुळे त्यांना अटक झाली आणि मारही खावा लागला. तरीसुद्धा ते “[येशूच्या] नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.”—प्रेषितांची कृत्ये ५:२८, ४१.
पहिल्या शतकातील अंतिपा यानेही येशूच्या नावाचे मोल जाणले. प्रकटीकरण या बायबलच्या शेवटल्या पुस्तकात येशूने त्याचा उल्लेख, “जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला,” असा केला. (प्रकटीकरण २:१३) पर्गमच्या इतर ख्रिश्चनांसोबत अंतिपानेही येशूवरील आपला विश्वास नाकारला नाही. अंतिपा येशूच्या नावाला जडून राहिला त्याकरता त्याला त्याचा जीवही गमवावा लागला तरी त्याने त्याची तमा बाळगली नाही!
त्यानंतर सुमारे अर्ध्या शतकानंतर, सा.यु. १५५ मध्ये पॉलीकार्प या ख्रिश्चनाने अशाचप्रकारच्या परीक्षेला तोंड दिले. ख्रिस्ताच्या नावाची निर्भर्त्सना करण्याची त्याला आज्ञा देण्यात आली होती. त्याची प्रतिक्रिया अशी होती: “मी त्याची सहाऐंशी वर्षे सेवा केली आहे आणि त्याची माझ्यावर कधीही अवकृपा झाली नाही. माझे तारण केलेल्या राजाची निंदा मी कशी करू?” ख्रिस्ताच्या नावाची निंदा करण्यास नाकारल्यामुळे पॉलीकार्पला खांबावर जाळण्यात आले.
प्रेषित, अंतिपा आणि इतरजण ख्रिस्ताची साक्ष देत राहिले त्यासाठी त्यांनी त्यांच्या जिवाचीही पर्वा केली नाही! आजच्या लोकांविषयी काय?
आज येशूचे नाव
आजही लोकांना येशूच्या नावाविषयी तितकाच आवेश आहे. अलीकडील दशकांमध्ये लॅटीन अमेरिकेत येशूवर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या चर्चेसमधील वाढ सर्वाधिक आहे. खेडेगावातही एखादे पेंटेकॉस्टल चर्च पाहायला मिळते. असे असताना अशाप्रकारच्या चर्चेसचा राजकीय प्रभाव मात्र वाढत आहे. उदाहरणार्थ, ब्राझीलच्या काँग्रेसमध्ये आणि लोकसभेत ३१ जागा अशाप्रकारच्या चर्चेसच्या सदस्यांच्या आहेत.
संयुक्त संस्थानांतील एका नवीन धार्मिक चळवळीचा केंद्रबिंदू येशूच आहे. या संस्थेचे सभासद स्वतःला प्रॉमिस किपर्स (अभिवचन पाळणारे) म्हणवून घेतात. १९९७ मध्ये टाईम मॅग्झीनने अहवाल दिला, की या संस्थेच्या सभांची उपस्थिती १९९१ मध्ये ४,२०० होती ती वाढून १९९६ मध्ये १० लाख दहा हजार इतकी झाली आहे. या संस्थेचे एक स्तुतिगीत असे आहे: “माझा सर्वकाळचा उद्धारकर्ता, येशू विजयी होवो.”
पण येशूच्या नावामध्ये लोकांच्या ज्या भावना गुंतलेल्या असतात त्यांमागे चांगला हेतू असतोच असे नाही. त्याच्या नावानेच युद्धाचा झेंडा फडकावण्यात आला आहे. यहुद्यांची कत्तल करणे, गैरख्रिस्ती लोकांचा संहार करणे, विरोधकांना छळणे, अधू करणे, खांबावर जाळणे—हे सगळे कोणाच्या तर येशूच्या नावाखाली करण्यात आले. अलीकडच्या काळात सुवार्तेचे व्यापारीकरण अगदी सर्वसामान्य झाले आहे. येशूच्या नावाचा किती विपर्यास आणि किळसवाणा दुरुपयोग!
यामुळे आपल्यासमोर काही समर्पक प्रश्न येतात: येशूच्या नावावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? या विषयावर यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात मिळतील.