देवाबरोबर चालणे—पहिली पावले
“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.
१, २. यहोवाची सेवा करणे हा विशेषाधिकार आहे असे तुम्ही का म्हणाल?
त्याने कित्येक वर्षांपासून तुरुंगवास सहन केला होता. मग त्याला त्या देशाच्या शासकासमोर हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. एका पाठोपाठ सर्व घडू लागले. एक दिवस अचानक, त्याला पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली बादशाहच्या दिम्मतीस येण्यास सांगितले. पूर्वी कैदी असलेल्या या मनुष्याला जबाबदार पद व विशेष आदर देण्यात आला. एकेकाळी पायात बेड्या असलेला योसेफ आता राजाच्या सोबत उठबस करू लागला!—उत्पत्ति ४१:१४, ३९-४३; स्तोत्र १०५:१७, १८.
२ आज मानवांना इजिप्तच्या फारोपेक्षा अतिमहान असलेल्या व्यक्तीची सेवा करण्याचा विशेषाधिकार आहे. विश्वाचा परात्पर देव आम्हा सर्वांना त्याची सेवा करण्याचे आवाहन करीत आहे. सर्वसमर्थ यहोवा देवाची सेवा करण्याचा व त्याच्याबरोबर एक जवळचा नातेसंबंध विकसित करण्याचा काय हा भव्य विशेषाधिकार! शास्त्रवचनांमध्ये, उदात्त शक्ती आणि भव्यता तसेच शांती, सौंदर्य आणि प्रसन्नता हे गुण त्याच्याशी संबंधित असल्याचे दाखवले आहे. (यहेज्केल १:२६-२८; प्रकटीकरण ४:१-३) त्याच्या सर्व व्यवहारांमध्ये प्रीती दिसून येते. (१ योहान ४:८) तो केव्हाही लबाड बोलत नाही. (गणना २३:१९) आणि त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्यांना यहोवा केव्हाही निराश करीत नाही. (स्तोत्र १८:२५) त्याच्या धार्मिक अपेक्षांनुसार स्वतःला जुळवून घेण्याद्वारे आपण आता आनंदी व अर्थपूर्ण जीवन व्यतीत करू शकतो—आणि भवितव्यात चिरकालिक जीवन व्यतीत करू शकतो. (योहान १७:३) कोणताही मानवी शासक आपल्याला या आशीर्वादांसारखे व विशेषाधिकारांसारखे काही देऊ शकत नाही.
३. कशाप्रकारे “नोहा देवाबरोबर चालला”?
३ खूप वर्षांपूर्वी, कुलपिता नोहाने देवाची इच्छा आणि उद्देश यांच्या सुसंगतेत जीवन जगण्याचा निश्चय केला होता. त्याच्याविषयी बायबल म्हणते: “नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९) नोहा अक्षरशः देवाच्या बरोबर चालला नाही; कारण कोणाही मानवाने अद्याप “देवाला . . . कधीच पाहिले नाही.” (योहान १:१८) तर, देवाने त्याला जे सांगितले त्यानुसार वागण्याद्वारे नोहा देवाबरोबर चालला. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता नोहाने आपले जीवन वाहून दिल्यामुळे तो सर्वसमर्थ देवाबरोबर एक उबदार, जवळचा नातेसंबंध राखू शकला. नोहाप्रमाणे आज कोट्यवधी लोक यहोवाचा सल्ला आणि सूचना यांच्या सुसंगतेत जगण्याद्वारे ‘देवाबरोबर चालत’ आहेत. एक व्यक्ती अशा मार्गाक्रमणाची सुरवात कशी करते?
अचूक ज्ञान आवश्यक
४. यहोवा त्याच्या लोकांना प्रशिक्षण कसे देतो?
४ यहोवाबरोबर चालण्याकरता आपण आधी त्याला ओळखले पाहिजे. संदेष्टा यशयाने भाकीत केले: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू; कारण सीयोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.” (यशया २:२, ३) त्याच्या मार्गांत चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना यहोवा प्रशिक्षण देईल असा भरवसा आपण बाळगू शकतो. यहोवाने आपल्याला त्याचे वचन अर्थात बायबल दिले आहे व ते समजण्यास तो आपल्याला मदत करतो. मदत करण्याचा एक मार्ग, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ होय. (मत्तय २४:४५-४७) बायबल आधारित प्रकाशने, ख्रिस्ती सभा आणि मोफत गृह बायबल अभ्यासाची व्यवस्था यांद्वारे आध्यात्मिक प्रशिक्षण देण्याकरता यहोवा ‘विश्वासू दासाचा’ उपयोग करत आहे. देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारेसुद्धा लोकांना त्याचे वचन समजण्याकरता साहाय्य करतो.—१ करिंथकर २:१०-१६.
५. शास्त्रवचनीय सत्य इतके मौल्यवान का आहे?
५ बायबल सत्यासाठी आपण पैसे मोजत नसलो तरी, ते फार मौल्यवान आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास करीत असताना, स्वतः देवाविषयी, त्याच्या नावाविषयी, त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्याच्या उद्देशाविषयी आणि मानवांबरोबरच्या त्याच्या व्यवहारांविषयी आपण शिकतो. आपण येथे का आहोत? देवाने दुःखाला अनुमती का दिली? भवितव्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे? आपण वृद्ध होतो व मरतो, ते का? मृत्यूनंतर जीवन आहे का?, यांसारख्या मूलभूत प्रश्नांची मुक्तीदायक उत्तरे आपण शिकलो. तसेच, देवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे, म्हणजेच, देवाला पूर्णपणे संतुष्ट करण्याकरता आपण कशाप्रकारे चालले पाहिजे हेही आपण शिकतो. त्याच्या अपेक्षा रास्त आहेत आणि आपण त्यांच्यानुसार जगतो तेव्हा आपल्याला त्यांचा किती तरी फायदा होतो, हेही आपल्याला समजते. देवाचे प्रशिक्षण नसते तर इतक्या गोष्टी आपल्याला समजल्याच नसत्या.
६. अचूक बायबल ज्ञान आपल्याला कोणत्या मार्गाचा पाठलाग करण्यास मदत करते?
६ बायबल सत्य शक्तिशाली आहे व आपल्या जीवनात बदल करावयास ते आपल्याला प्रवृत्त करते. (इब्री लोकांस ४:१२) शास्त्रवचनांचे ज्ञान घेण्याआधी आपण “ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे” चालत होतो. (इफिसकर २:२) परंतु आपण “प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे,” म्हणून देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान आपल्यासाठी एक वेगळा मार्ग सविस्तरपणे आखून देते. (कलस्सैकर १:१०) अख्ख्या विश्वातील दिमाखदार व्यक्तीबरोबर अर्थात यहोवाबरोबर चालण्यासाठी पहिली पावले उचलणे किती आनंदाचे आहे!—लूक ११:२८.
दोन महत्त्वाची पावले—समर्पण आणि बाप्तिस्मा
७. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा मानवी नेतृत्त्वाविषयीचे कोणते सत्य स्पष्ट होते?
७ बायबलविषयी आपली समज जसजशी वाढत जाते तसतसे आपण देवाच्या वचनातील आध्यात्मिक प्रकाशात मानवी व्यवहार व आपले स्वतःचे जीवन यांचे परीक्षण करू लागतो. याद्वारे एक महत्त्वपूर्ण सत्य स्पष्ट होते. संदेष्टा यिर्मयाने अनेक वर्षांपूर्वी ते सत्य प्रकट केले होते: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) मानवांना—आपल्या सर्वांनाच—देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
८. (अ) कशामुळे लोक देवाला समर्पण करण्यास प्रवृत्त होतात? (ब) ख्रिस्ती समर्पण म्हणजे काय?
८ ही महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती समजल्यामुळे आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यास प्रवृत्त होतो. देवाबद्दल असलेली प्रीती आपले जीवन त्याला समर्पित करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. देवाला समर्पण करणे म्हणजे, विश्वासूपणे त्याची सेवा करण्याकरता आणि विश्वासूपणे त्याच्या मार्गात चालण्याकरता आपण आपले जीवन व्यतीत करणार असे प्रार्थनेत त्याला गंभीरपणे वचन देणे होय. असे करताना आपण, दृढनिश्चयाने ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याकरता यहोवासमोर स्वतःला सादर करणाऱ्या येशूचे उदाहरण गिरवत असतो.—इब्री लोकांस १०:७.
९. लोक यहोवाला आपल्या जीवनाचे समर्पण का करतात?
९ यहोवाला समर्पण करण्याकरता तो कोणावरही दबाव आणत नाही किंवा सक्ती करीत नाही. (पडताळा २ करिंथकर ९:७.) शिवाय, कोणी भावनाविवश होऊन त्याला समर्पण करावे अशीही तो कोणाकडून अपेक्षा करीत नाही. बाप्तिस्मा घेण्याच्या आधीच एखाद्याने शिष्य असले पाहिजे आणि यासाठी ज्ञान घेण्याकरता मनापासून प्रयत्न आवश्यक आहेत. (मत्तय २८:१९, २०) ज्यांनी आधीच बाप्तिस्मा घेतला होता अशांना पौलाने, ‘आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ असे समर्पण आणि विचारशक्तीनुसारची सेवा’ करण्यास विनवले. (रोमकर १२:१) याच प्रकारे आपण आपल्या विचारशक्तीद्वारे यहोवा देवाला समर्पण करतो. यामध्ये कशाचा समावेश होतो आणि सदर परिस्थितीवर काळजीपूर्वक विचार केल्यावर आपण स्वेच्छेने व आनंदाने आपले जीवन देवास समर्पित करतो.—स्तोत्र ११०:३.
१०. समर्पणाचा बाप्तिस्म्याशी कसा संबंध आहे?
१० आपण खाजगीत प्रार्थनेद्वारे देवाला, त्याच्या मार्गात चालणार हा आपला संकल्प व्यक्त केल्यानंतर दुसरे पाऊल उचलतो. पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपण आपले समर्पण जाहिररीत्या प्रकट करतो. आपण देवाची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेत आहोत याची ही जाहीर घोषणा आहे. येशूने पृथ्वीवरील त्याच्या सेवेच्या सुरवातीला योहानाकडून बाप्तिस्मा घेतला व याद्वारे आपल्यासाठी एक कित्ता घालून दिला. (मत्तय ३:१३-१७) नंतर, येशूने त्याच्या अनुयायांना, लोकांस शिष्य बनवून त्यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली. तेव्हा, यहोवाबरोबर चालू इच्छिणाऱ्यांकरता समर्पण व बाप्तिस्मा ही महत्त्वपूर्ण पावले आहेत.
११, १२. (अ) बाप्तिस्म्याची तुलना विवाहासोबत कशी करता येते? (ब) यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणि पतीपत्नी यांच्यातील नातेसंबंध यांत कोणती समांतरता आहे?
११ येशू ख्रिस्ताचा समर्पित, बाप्तिस्माप्राप्त शिष्य होणे बरेचसे विवाह करण्यासारखे आहे. अनेक देशांत, विवाहाच्या दिवसाआधी पुष्कळ गोष्टी घडतात. जसे की, एक पुरुष व एक स्त्री आधी भेटतात, एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतात मग प्रेमात पडतात. नंतर त्यांची मागणी होते. विवाह करून पतीपत्नी या नात्याने एकत्र राहण्याबद्दल खाजगीत जे ठरवण्यात येते ते विवाहाद्वारे जाहीर करण्यात येते. तो विवाह, त्या खास नातेसंबंधाची सुरवात जाहीरपणे दाखवून देतो. त्या तारखेपासून त्यांच्या विवाहाची सुरवात होते. तसेच बाप्तिस्म्यानंतर, यहोवाबरोबर समर्पित नातेसंबंधात चालण्याकरता वाहून घेतलेल्या जीवनाची सुरवात होते.
१२ असेच आणखी एक उदाहरण घ्या. विवाहानंतर पतिपत्नीतील प्रीती गहिरी व प्रौढ झाली पाहिजे. एकमेकांच्या आणखी नजीक येण्याकरता दोघांनीही आपले वैवाहिक नातेसंबंध टिकवण्याकरता व मजबूत करण्याकरता निःस्वार्थीपणे झटले पाहिजे. आपला जरी देवाबरोबर विवाह होत नसला तरी, बाप्तिस्म्यानंतर आपण यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता आपण करत असलेले प्रयत्न तो पाहतो आणि त्यांची प्रशंसा करतो आणि मग आपल्या समीप येतो. शिष्य याकोबाने लिहिले: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८.
येशूच्या पावलांवर पाऊल ठेवणे
१३. देवाबरोबर चालताना आपण कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे?
१३ यहोवाबरोबर आपल्याला चालायचे आहे तर आपण येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या उदाहरणानुसार वागले पाहिजे. प्रेषित पेत्राने लिहिले: “ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) येशू परिपूर्ण होता व आपण अपरिपूर्ण असल्यामुळे त्याने घालून दिलेल्या उदाहरणाचे आपण तंतोतंत पालन करू शकत नाही. तरीसुद्धा, आपल्याला होईल तितका आपण प्रयत्न करावा असे यहोवा आपल्याकडून अपेक्षितो. येशूच्या जीवनाच्या व सेवेच्या पाच विशेषतांचा आपण विचार करू या ज्यांचे अनुकरण समर्पित ख्रिश्चनांनी करायचा प्रयत्न केला पाहिजे.
१४. देवाचे वचन जाणून घेण्यात काय सामावलेले आहे?
१४ येशूला देवाच्या वचनाचे अचूक व परिपूर्ण ज्ञान होते. त्याच्या सेवेदरम्यान येशूने बहुतेकदा इब्री शास्त्रवचनांतील उतारे दिले. (लूक ४:४, ८) तसे तर त्याच्या काळातील दुष्ट धार्मिक नेत्यांनी देखील शास्त्रवचनांचा उल्लेख केला होता. (मत्तय २२:२३, २४) पण फरक इतकाच होता, की येशूला शास्त्रवचनांचा अर्थ माहीत होता आणि त्याने त्यांना आपल्या जीवनात लागू केले. त्याला नियमशास्त्रातले केवळ नियम माहीत नव्हते तर त्यांचा खरा अर्थ माहीत होता. ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करताना आपणही देवाचे वचन समजण्याचा, त्याचे तात्पर्य किंवा त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने आपण, ‘सत्याचे वचन नीट सांगणारे,’ ईश्वराकडून अनुमोदन प्राप्त झालेले सेवक होऊ.—२ तीमथ्य २:१५.
१५. देवाविषयी बोलण्याबाबत येशूने कसे उदाहरण मांडले?
१५ ख्रिस्त येशू इतरांबरोबर आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल बोलला. देवाच्या वचनाचे येशूला असलेले ज्ञान त्याने आपल्याजवळच ठेवले नाही. त्याचे शत्रू देखील त्याला “गुरुजी” म्हणायचे कारण तो जिथे गेला तिथे तो इतरांना यहोवा आणि त्याच्या उद्देशांविषयी सांगत असे. (मत्तय १२:३८) येशूने मंदिराच्या आवारात, सभास्थानांत, शहरांत आणि गावांत जाहीरपणे प्रचार केला. (मार्क १:३९; लूक ८:१; योहान १८:२०) त्याने प्रेमळपणे व दयाळुपणे लोकांना शिकवले, ज्यांना त्याने मदत केली अशांना त्याने प्रीती दाखवली. (मत्तय ४:२३) येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणारे देखील विविध ठिकाणी लोकांना यहोवा देवाविषयी आणि त्याच्या अद्भुत उद्देशांविषयी विविध मार्गांद्वारे शिकवतात.
१६. यहोवाच्या सहउपासकांबरोबर येशूचा किती घनिष्ठ नातेसंबंध होता?
१६ यहोवाची उपासना करणारे येशूला जवळचे वाटले. एके प्रसंगी येशू जेव्हा एका लोकसमुदायासमोर बोलत होता तेव्हा त्याची आई आणि सत्यात नसलेले त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलायला आले. बायबल वृत्तान्त सांगतो: “कोणीएकाने त्याला सांगितले, पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पाहा, माझी आई व माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.” (मत्तय १२:४७-५०) याचा अर्थ असा होत नाही, की येशूने आपल्या कुटुंबाला सोडून दिले, कारण त्यानंतरच्या घटना दाखवून देतात, की त्याने तसे केले नव्हते. (योहान १९:२५-२७) तरीसुद्धा येशूला सहविश्वासूंबद्दल किती प्रीती होती हे या अहवालावरून ठळकपणे दिसते. तसेच आजही, देवाबरोबर चालणारे यहोवाच्या इतर सेवकांचा सहवास मिळण्याचा तसेच त्यांना अगदी मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न करतात.—१ पेत्र ४:८.
१७. आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा करण्याबाबत येशूला कसे वाटले व याचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?
१७ ईश्वरी इच्छा पूर्ण करून येशूने आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल असलेली प्रीती व्यक्त केली. येशूने यहोवाची प्रत्येक गोष्ट ऐकली. तो म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” (योहान ४:३४) ख्रिस्ताने असेही म्हटले: “जे [देवाला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ८:२९) येशूने आपल्या स्वर्गीय पित्यावर इतकी प्रीती केली की, “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:८) याच्या बदल्यात, यहोवाने येशूला आशीर्वाद दिला, त्याला आपल्या खालोखालचा अधिकार व सन्मान देऊन उंचावले. (फिलिप्पैकर २:९-११) येशूप्रमाणे आपणही, देवाच्या आज्ञा पाळण्याद्वारे व त्याची इच्छा पूर्ण करण्याद्वारे त्याच्याबद्दल असलेली प्रीती दाखवतो.—१ योहान ५:३.
१८. प्रार्थनेबाबत येशूने कशाप्रकारे कित्ता घालून दिला?
१८ येशूने नेहमी प्रार्थना केली. बाप्तिस्म्याच्या प्रसंगी त्याने प्रार्थना केली. (लूक ३:२१) आपल्या १२ प्रेषितांची निवड करण्याआधी त्याने अख्खी रात्र प्रार्थना करण्यात घालवली. (लूक ६:१२, १३) येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची ते शिकवले. (लूक ११:१-४) त्याचा मृत्यू व्हायच्या आदल्या रात्री त्याने त्याच्या शिष्यांसाठी व शिष्यांबरोबर प्रार्थना केली. (योहान १७:१-२६) येशूच्या जीवनात प्रार्थनेला अहंम स्थान होते; आपल्याही जीवनात असले पाहिजे कारण आपण त्याचे अनुयायी आहोत. विश्वाच्या सार्वभौम राजाबरोबर प्रार्थनेत बोलणे म्हणजे केवढा तो सन्मान! शिवाय, यहोवा आपल्या प्रार्थनांची उत्तरे देतो, कारण योहानाने लिहिले: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेहि आपल्याला ठाऊक आहे.”—१ योहान ५:१४, १५.
१९. (अ) येशूच्या कोणत्या गुणांचे आपण अनुकरण केले पाहिजे? (ब) येशूचे जीवन आणि सेवा यांचा अभ्यास केल्याने आपला कोणता फायदा होतो?
१९ येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाचे व सेवेचे जवळून परीक्षण केल्याने आपण किती काय शिकू शकतो! प्रीती, करुणा, दया, शक्ती, समतोलपणा, समंजसपणा, नम्रता, धैर्य आणि निःस्वार्थपणा या त्याने दाखवलेल्या गुणांवर मनन करा. येशूविषयी आपण जितके अधिक शिकू तितकी त्याचे विश्वासू अनुयायी होण्याची आपली इच्छा अधिक तीव्र होते. येशूविषयीचे ज्ञान आपल्याला यहोवाच्या समीप आणते. कारण, येशू तर त्याच्या स्वर्गीय पित्याचे परिपूर्ण प्रतिबिंब होता. तो यहोवाच्या अगदी समीप असल्यामुळेच असे म्हणू शकला, की: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान १४:९.
तुम्हाला निभावून नेण्याकरता देवावर भरवसा ठेवा
२०. आपण आत्मविश्वासाने देवाबरोबर कसे चालू शकतो?
२० लहान मुले जेव्हा चालायला शिकतात तेव्हा त्यांची पावले डगमगतात. ते आत्मविश्वासाने चालायला कसे शिकतात? सवयीने व चिकाटीनेच. तसेच, यहोवाबरोबर चालणारे आत्मविश्वासाने, अचल पावले टाकण्याचा प्रयत्न करतात. यासाठीसुद्धा वेळेची आणि चिकाटीची गरज आहे. देवाबरोबर चालण्यातील चिकाटीचे महत्त्व समजवताना पौलाने लिहिले: “बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करितो व प्रभु येशूमध्ये बोध करितो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.”—१ थेस्सलनीकाकर ४:१.
२१. यहोवाबरोबर चालत असताना आपण कोणते आशीर्वाद उपभोगू शकतो?
२१ देवाला आपण स्वतःचे जीवन पूर्णपणे वाहून दिल्यास, त्याच्याबरोबर चालत राहण्यास तो आपल्याला मदत करील. (यशया ४०:२९-३१) त्याच्या मार्गात चालणाऱ्यांना तो प्रदान करीत असलेल्या आशीर्वादांच्या तुलनेत या जगाकडे आपल्याला देण्यासारखे काही नाही. तो आपल्याला ‘जे हितकारक ते शिकवतो; ज्या मार्गाने आपण गेले पाहिजे त्याने आपल्याला नेतो. आपण त्याच्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकल्या तर बरे होईल. मग आपली शांती नदीसारखी, आपली धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी होईल.’ (यशया ४८:१७, १८) देवाबरोबर चालण्याचे आमंत्रण स्वीकारण्याद्वारे व विश्वासाने चालत राहण्याद्वारे आपण अनंतकाळपर्यंत त्याच्याशी शांतीत राहू.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ खऱ्या देवाबरोबर चालणे हे सन्मानाचे का आहे?
◻ अभ्यास, समर्पण आणि बाप्तिस्मा ही देवाबरोबर चालण्याची पहिली पावले का आहेत?
◻ आपण येशूच्या पावलांवर पाऊल कसे ठेवू शकतो?
◻ यहोवाबरोबर चालताना तो आपल्याला निभावून नेईल हे आपल्याला कसे माहीत होते?
[१३ पानांवरील चित्रं]
अभ्यास, समर्पण आणि बाप्तिस्मा ही देवाबरोबर चालण्याची पहिली पावले आहेत