आपल्या काळाबाबत तुम्ही सावध आहात?
धोक्याबद्दल सजग असल्याने कधी कधी जीवही वाचू शकतो. दोन ज्वालामुखी बेटांवर जे घडले त्याचे उदाहरण देऊन हे स्पष्ट करता येते.
पेली पर्वत या ज्वालामुखीचा मे ८, १९०२ रोजी मार्टिनिकच्या कॅरिबियन बेटावर उद्रेक झाला; विसाव्या शतकातला हा सर्वात घातक ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या पायथ्याशी वसलेल्या सॅन पायर या शहरातल्या ३०,००० रहिवाश्यांपैकी काही वगळता बहुतेक जण मृत्युमुखी पडले.
जून १९९१ मध्ये, पिनट्युबो पर्वताचा विस्फोट झाला; या शतकातला तो सर्वात मोठा उद्रेक होता असे म्हणता येईल. फिलिपाईन्सच्या एका गजबजलेल्या भागात हा उद्रेक झाला आणि त्यामुळे सुमारे ९०० लोकांना आपला प्राण गमवावा लागला. परंतु, या वेळी दोन कारणांमुळे हजारो लोकांचे जीव वाचले: (१) धोक्याबद्दल सजगता आणि (२) दिलेल्या इशाऱ्यांनुरूप पावले उचलण्याची तयारी.
योग्य पाऊल उचलल्याने बचाव साधला
पिनट्युबो पर्वत शेकडो वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत होता; पण एप्रिल १९९१ मध्ये उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली. ज्वालामुखीच्या शंकूतून धूर आणि सल्फर डायऑक्साईड बाहेर येऊ लागला. तिथल्या रहिवाश्यांना भूकंपाचे एका पाठोपाठ एक हादरे बसले आणि घट्ट लाव्हाचा भीषण घुमट वर येऊ लागला. फिलिपाईन इंस्टिट्यूट ऑफ वोलकॅनोलॉजी ॲण्ड सीएसमोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस लक्ष ठेवून कालांतराने अधिकाऱ्यांना पटवून दिले की, जवळपासच्या शहरांमधील व गावांमधील ३५,००० लोकांना तेथून वेळीच हलवलेले बरे.
कारण नसताना घरदार सोडून जायला लोकांना जिवावर आले होते; पण ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर कोणते धोके संभावतात याचे स्पष्ट चित्र दाखवणारा व्हिडिओ पाहिल्यावर मात्र ते सारे काही सोडून जायला तयार झाले. पुष्कळ लोकांनी आपआपले बिऱ्हाड हलवले ते अगदी वेळेवर. दोन दिवसांनंतरच, एक मोठा विस्फोट झाला आणि सभोवतालच्या ४ किलोमीटर क्षेत्रापर्यंत राख फेकली गेली. नंतर, चिखली प्रवाह किंवा लाहार यांमुळे शेकडो लोक मरण पावले. पण, येणाऱ्या धोक्याबाबत सावध झाल्यामुळे आणि दिलेल्या इशाऱ्यांनुरूप योग्य ती पावले उचलल्यामुळे हजारो लोकांच्या जिवावरील धोका टळला होता.
मानवनिर्मित विपत्तीतून बचाव
आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकात, जेरूसलेम येथील ख्रिश्चनांना देखील आपले घरदार सोडून जावे की जाऊ नये असा निर्णय घ्यावा लागला होता. इतर रहिवासी आणि सा.यु. ७० च्या वल्हांडणासाठी जेरूसलेममध्ये आलेले हजारो यहुदी यांवर आलेल्या नाशातून हे ख्रिस्ती वाचू शकले कारण त्यांनी सा.यु. ६६ मध्येच त्या शहरातून पलायन केले होते. वल्हांडण साजरा करण्यासाठी दहा लाखांहून अधिक लोक तटबंदी असलेल्या त्या शहरात जमलेले होते; त्या वेळी रोमी सैन्याने त्या शहराची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. उपासमारीमुळे, सत्तेच्या संघर्षात आणि रोमी लोकांच्या सततच्या होणाऱ्या हल्ल्यांत दहा लाखांहून अधिक लोक मरण पावले.
रोमविरुद्ध यहुद्यांनी केलेल्या विद्रोहाचा विपत्तीने अंत झाला. या विपत्तीविषयी यहुद्यांना पूर्णपणे माहीत होते. अनेक दशकांआधी येशू ख्रिस्ताने असे भाकीत केले होते, की जेरूसलेमला घेरा घालण्यात येईल. तो म्हणाला: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) या सूचना अगदी स्पष्ट होत्या आणि येशूच्या अनुयायांनी त्यांकडे कानाडोळा केला नाही.
सिझेरिया येथील चवथ्या शतकातील युसेबियस नामक इतिहासकाराने अहवाल दिला, की यहुदीयातल्या सर्व ख्रिश्चनांनी येशूच्या इशाऱ्यानुरूप कार्य केले. सा.यु. ६६ मध्ये, रोमी लोकांनी माघार घेतल्यावर अनेक यहुदी ख्रिस्ती, पिरिया प्रांतातल्या पेल्ला या विदेश्यांच्या शहरात राहायला गेले. काळाबाबत सजग राहिल्याने व येशूने दिलेल्या इशाऱ्यानुरूप कार्य केल्याने, “सबंध इतिहासातील सर्वात भयानक वेढा” असे संबोधलेल्या वेढ्यातून ते तरले.
आजही, अशाच तऱ्हेने सजग राहण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने खास कृती करण्याचीही गरज आहे. पुढील लेखात त्याचे कारण दिले जाईल.
[Picture Credit Line on page 3]
Godo-Foto, West Stock