सावध होण्याची वेळ आताच!
“समय ओळखा; कारण तुमची झोपेतून उठण्याची वेळ आताच आहे.” (रोमकर १३:११, नॉक्स) हे शब्द प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्चनांना लिहिले होते. सा.यु. ७० मधील यहुदी व्यवस्थीकरणाचा विनाशकारी अंत होण्याच्या सुमारे १४ वर्षांआधी. यहुदी ख्रिस्ती आध्यात्मिकरित्या सावध असल्यामुळे या खडतर काळात जेरूसलेममध्ये उपस्थित नव्हते; परिणामी त्यांचा जीव वाचला शिवाय ते रोमी लोकांचे दासही झाले नाहीत. पण त्यांनी शहराच्या जवळपासही फिरकू नये हे त्यांना कसे कळाले?
जेरूसलेमला शत्रू घेरतील आणि तिच्या रहिवाश्यांना धुळीस मिळवतील अशी ताकीद येशू ख्रिस्ताने आधीच दिली होती. (लूक १९:४३, ४४) त्यानंतर, येशूने त्याच्या अनुयायांना सहज ओळखता येईल, असे बहुसमावेशक चिन्ह देऊ केले. (लूक २१:७-२४) जेरूसलेममध्ये राहणाऱ्या त्या ख्रिश्चनांना शहर सोडणे म्हणजे नोकरीवर, घरादारावर पाणी सोडण्यासारखेच होते. तरीसुद्धा, सजगतेमुळे आणि तेथून पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
येशूने जेरूसलेमच्या विनाशाविषयी भाकीत केले तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय”? (मत्तय २४:३) त्यांना उत्तर देताना, येशूने त्याच्या भविष्यातील उपस्थितीची तुलना नोहाच्या काळात जागतिक प्रलय येण्याआधीच्या समयाशी केली. येशूने दाखवले की, जलप्रलयात सर्व दुष्ट जण वाहून गेले. (मत्तय २४:२१, ३७-३९) याद्वारे त्याने हे स्पष्ट केले की, देव पुन्हा एकदा मानवी व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करील. परंतु हा हस्तक्षेप किती मोठा असेल? देव, सबंध दुष्ट जगाचा किंवा व्यवस्थीकरणाचा पार अंत करून टाकील! (पडताळा २ पेत्र ३:५, ६.) आपल्या काळात असे घडणे शक्य आहे का?
अजूनही सर्वकाही होते तसेच?
आपले पवित्र शहर, जेरूसलेम नाश होईल ही कल्पना सुद्धा पहिल्या शतकातल्या पुष्कळ यहुद्यांना पटली नसेल. ज्वालामुखीच्या जवळपासच्या क्षेत्रात राहणाऱ्या परंतु तिचा प्रत्यक्ष उद्रेक न पाहिलेल्या लोकांनाही अगदी असेच वाटते. इशारा दिला जातो तेव्हा, “मी जिवंत असेपर्यंत तरी हे घडणार नाही” अशी प्रतिक्रिया सर्रासपणे दाखवली जाते. “दोन किंवा तीन शतकानंतर ज्वालामुखीचा उद्रेक होतो,” असे ज्वालामुखीतज्ज्ञ लायनल विल्सन सांगतात. “आईवडिलांच्या काळात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्यांना घर बदलावे लागले असल्यास, आपल्या मनाला हुरहूर लागते पण तेच जर आजी-आजोबांच्या काळात घडले असेल, तर ‘ती केव्हा काळची गोष्ट’ असे म्हणून आपण त्याकडे कानाडोळा करतो.”
परंतु अचूक माहितीमुळे धोक्याची सूचना ओळखून त्यानुसार पावले उचलायला मदत मिळते. पेली पर्वताहून जीव मुठीत धरून पळ काढलेल्या लोकांपैकी एकाला ज्वालामुखींविषयी माहिती होती आणि त्याला धोक्याचे संकेतही ओळखता येत होते. पिनट्युबो पर्वताचा उद्रेक होण्याच्या काही काळाआधी असेच संकेत पाहून धोक्याची सूचना देण्यात आली होती. पर्वताच्या आतील अदृश्य शक्तींच्या कार्याची पाहणी करणाऱ्या ज्वालामुखीतज्ज्ञांनी तेथील लोकांना तो परिसर सोडणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले.
धोक्याच्या संकेतांकडे कानाडोळा करणारे आणि अघटित काही घडणारच नाही असे म्हणणारे लोक असतीलच. उलट जे लोक पाऊल उचलतात त्यांचीच टिंगल करतील. आपल्या दिवसांत अशी ही प्रवृत्ती सर्वसामान्य असेल असे प्रेषित पेत्राने आधीच सांगितले. तो म्हणाला, “प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”—२ पेत्र ३:३, ४.
आपण “शेवटल्या दिवसांत” आहोत यावर तुमचा विश्वास आहे का? कोलंबिया हिस्टरी ऑफ द वर्ल्ड यात जॉन ए. गॅरटी आणि पीटर गे असा प्रश्न विचारतात: “आपल्या संस्कृतीला उतरती कळा लागल्याचे आपल्याला दिसते का?” मग हे इतिहासकार सरकारविषयक समस्या, गुन्हेगारी आणि कायद्याला धाब्यावर बसविणारे नागरिक यांच्यात जगभर होणारी वाढ, कुटुंबांचे मोडकळीस येणे, सामाजिक समस्या सोडवण्यात विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला आलेले अपयश, अधिकारविषयक समस्या तसेच जगभरातील नैतिकतेचा व धार्मिकतेचा ऱ्हास यांचे परीक्षण करतात. त्यांचा निष्कर्ष असा होता: “ही एका निश्चित अंताची चिन्हे नसली, तरी त्यासारखीच दिसतात.”
‘अंत’ अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे असा विश्वास ठेवण्यासाठी आपल्याकडे योग्य कारण आहे. पृथ्वीचा नाश होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही कारण बायबल म्हणते की, देवाने ‘पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहे की ती कधीही ढळणार नाही.’ (स्तोत्र १०४:५) तथापि, मानवजातीच्या या भयंकर दुःखास कारणीभूत ठरलेले हे दुष्ट व्यवस्थीकरण लवकरच नाहीसे होईल, अशी अपेक्षा आपण करू शकतो. का? कारण, येशू ख्रिस्ताने सांगितल्यानुसार या व्यवस्थेच्या शेवटल्या दिवसांची ओळख करून देणारी अनेक स्पष्ट चिन्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. (“शेवटल्या दिवसांची काही चिन्हे” ही पेटी पाहा.) येशूच्या शब्दांची आणि जागतिक घटनांची आपण तुलना का करू नये? असे केल्याने तुम्हाला स्वतःबाबत आणि तुमच्या कुटुंबाबाबत सुज्ञ निर्णय घेण्यास मदत मिळेल. पण त्यासाठी आताच कार्य करण्याची काय गरज?
सजग राहण्याची खरी गरज
ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या सुमारास होणार हे शास्त्रज्ञांना ठाऊक असले, तरी त्याची निश्चित वेळ त्यांना सांगता येत नाही. त्याचप्रमाणे, या व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी येशू म्हणाला: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) सद्य व्यवस्थीकरणाचा अंत नेमका केव्हा होईल हे आपल्याला ठाऊक नसल्यामुळे, येशूने आपल्याला हा इशारा दिला: “आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र [येशू] येईल.”—मत्तय २४:४३, ४४.
येशूचे हे शब्द दाखवून देतात की, या व्यवस्थेचा भयंकर अंत अचानक होईल तेव्हा जगाला धक्का बसेल. आपण त्याचे अनुयायी असलो, तरी आपल्याला ‘सिद्ध असण्याची’ गरज आहे. ज्याच्या घरी चोर अचानक येतो त्याच्यासारखी आपली गत आहे कारण तो चोर घर केव्हा फोडेल हे त्याला ठाऊक नसते.
त्याचप्रमाणे, प्रेषित पौलाने थेस्सलनीकातल्या ख्रिश्चनांना म्हटले: “कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.” पौलाने असेही आर्जवले: “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:२, ४, ६, तळटीप, NW) “जागे व सावध राहावे” याचा काय अर्थ होतो?
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी जेरूसलेममधून पलायन केले त्याप्रमाणे जीव वाचवण्यासाठी आपल्याला एखादे शहर सोडून जाण्याची गरज नाही. रोममधील आपल्या सहविश्वासू जणांना झोपेतून जागे व्हावे असे उत्तेजन दिल्यानंतर, पौलाने त्यांना “अंधाराची कामे टाकून द्यावी” आणि “प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान” करावे असे आर्जवले. (रोमकर १३:१२, १४) येशूच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केल्याने, आपण काळाबाबत सजग आहोत हे दाखवून देऊ आणि याच आध्यात्मिक सजगतेमुळे या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत होईल तेव्हा आपल्याला ईश्वरी संरक्षण प्राप्त होईल.—१ पेत्र २:२१.
येशू ख्रिस्ताचे अनुयायी अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगतात. यहोवाच्या लाखो साक्षीदारांना याचा प्रत्यय आला आहे की, ख्रिस्ती शिष्यत्वाचे जू सोयीचे आणि विसावा देणारे आहे. (मत्तय ११:२९, ३०, तळटीप, NW) शिष्य होण्याचे पहिले पाऊल म्हणजे, ‘देवाविषयी व त्याने ज्याला पाठवले त्या येशू ख्रिस्ताविषयी ज्ञान’ घेणे. (योहान १७:३) लोकांनी “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” म्हणून त्यांची मदत करण्यासाठी साक्षीदार दर आठवडी लाखो लोकांच्या घरी जातात. (१ तीमथ्य २:४) तुमच्या घरी तुमच्यासोबत मोफत बायबल अभ्यास करायला त्यांना आवडेल. देवाच्या वचनाविषयी तुमचे ज्ञान जसजसे वाढत जाते तसतशी आपल्या दिवसांतील वेगळेपणाची तुम्हाला खात्री पटेल. झोपेतून सावध होण्याची वेळ आताच आहे, यात काही शंका नाही.
[७ पानांवरील चौकट/चित्रं]
शेवटल्या दिवसांची काही चिन्हे
‘राष्ट्रावर राष्ट्र उठेल’; ‘पृथ्वीवरील शांतता हरण केली जाईल’ (मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:४)
या शतकातल्या दोन जागतिक युद्धांनी त्याचप्रमाणे कित्येक इतर लढायांनी पृथ्वीवरील शांतता हरण केली आहे. “पहिले—आणि त्यानंतर झालेले दुसरे—महायुद्ध पूर्वी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा भिन्न होते,” असे इतिहासकार जॉन कीगन लिहितात. “प्रमाण, तीव्रता, व्यापकता आणि जीवित व वित्त हानी या सर्वांबाबतीत ते निराळे होते. . . . पूर्वी झालेल्या कोणत्याही युद्धात पृथ्वीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक बळी पडले नाहीत, इतका खर्च झाला नाही आणि इतके लोक पीडाग्रस्त झाले नाहीत जितके या जागतिक युद्धात घडले.” आजकालच्या युद्धांचा सैनिकांवर परिणाम होण्याऐवजी त्यांत सामान्य बायका-मुलेच बळी पडतात. युनिसेफ संस्थेच्या अंदाजानुसार, गेल्या दहा वर्षांमध्ये वीस लाख बालके युद्धांमध्ये ठार झाली आहेत.
“दुष्काळ” (मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:५, ६, ८)
सन १९९६ मध्ये गहू आणि मक्याचे भाव जबरदस्त वधारले. त्याचे कारण? सबंध जगभरात या धान्यांचा केवळ ५० दिवस पुरेल इतकाच साठा उरला होता; आजवर नोंदलेली ही सर्वात कमी संख्या. दररोज लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे भाव वाढताहेत म्हणजे जगातले कोट्यवधी गरीब लोक—बहुतेक बालकेच—उपाशी पोटी झोपी जातात.
“जागोजागी . . . भूमिकंप होतील.” (मत्तय २४:७)
गेल्या २,५०० वर्षांमध्ये केवळ नऊ असे भूकंप झाले, ज्या प्रत्येकाने १,००,००० हून अधिक लोकांचा बळी घेतला. यांतील चार भूकंप तर १९१४ नंतर घडले.
‘अनीतीत वाढ’ (मत्तय २४:१२)
विसाव्या शतकाचा अंत होत आहे तसा, अनीती किंवा कायद्याचे उल्लंघन करणे ही सर्वसामान्य गोष्ट होऊन बसली आहे. नागरिकांवर अतिरेक्यांचे हल्ले, निर्घुण हत्या आणि सामुहिक हत्याकांड असले भयानक प्रकार या शेवटल्या हिंसक दिवसांमध्ये घडत आहेत.
“जागोजाग मऱ्या येतील” (लूक २१:११)
सन १९९० च्या दशकात, ३ कोटी लोक क्षयरोगाने मरण पावतील. औषधांप्रती रोगवाहक जिवाणूंची प्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मलेरिया या आणखी एका घातक रोगाचा दर वर्षी सुमारे ३० कोटी ते ५० कोटी लोकांना संसर्ग होतो आणि अंदाजे २० लाख लोकांचा बळी घेतो. या दशकाच्या अंतापर्यंत, एड्स रोगामुळे दर वर्षी १८ लाख लोक मरण पावलेले असतील, असा अंदाज बांधला आहे. “आज मानवजातीत साथींची साथ आहे,” असे द स्टेट ऑफ द वर्ल्ड १९९६ यात म्हटले होते.
“सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४)
सन १९९७ मध्ये, यहोवाच्या साक्षीदारांनी राज्य सुवार्तेच्या प्रचारात शंभर कोटींहून अधिक तास खर्च केले. पन्नास लाखांहून अधिक साक्षीदार २३२ देशांतील लोकांना नियमितपणे हा संदेश ऐकवतात.
[चित्राचे श्रेय]
FAO photo/B. Imevbore
U.S. Coast Guard photo
[४, ५ पानांवरील चित्र]
ख्रिश्चनांनी जेरूसलेममधून पलायन केले कारण ते आध्यात्मिकरित्या जागृत होते