वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ८/१५ पृ. २५-२९
  • स्वातंत्र्यासाठी ह्‍यूगेनॉट लोकांचे पलायन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वातंत्र्यासाठी ह्‍यूगेनॉट लोकांचे पलायन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुरवातीपासूनच विरोध
  • आणखी कडक कारवाई
  • पुन्हा तीच गत
  • लपणार, लढणार की पलायन करणार?
  • स्वागतार्ह आश्रय
  • धडे मिळाले का?
  • धार्मिक स्वातंत्र्य—आशीर्वाद की शाप?
    सावध राहा!—१९९९
  • फ्रेंच बायबलचा निभावण्याकरता संघर्ष
    सावध राहा!—१९९८
  • गुलामगिरीच्या कुरूप गतइतिहासाला भेट
    सावध राहा!—१९९९
  • वेस्टफेलियातील शांती तह युरोपमधील कलाटणी देणारा काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ८/१५ पृ. २५-२९

स्वातंत्र्यासाठी ह्‍यूगेनॉट लोकांचे पलायन

“राजा आणि राणीकडून, . . . ही घोषणा आहे की, या आमच्या राज्यात शरण घेणाऱ्‍या आणि येथे येणाऱ्‍या सर्व फ्रेंच प्रोटेस्टंट लोकांना राजाचे केवळ संरक्षणच नव्हे तर . . . सर्व उचित मार्गांनी आणि पद्धतींनी आम्ही त्यांना आधार, साहाय्य आणि मदत देण्याचाही प्रयत्न करू . . . जेणेकरून या राज्यात त्यांचे वास्तव्य आरामदायक आणि सुखाचे होईल.”

इंग्लंडचे राजा विल्यम आणि राणी मेरी यांच्या १६८९ च्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते. परंतु, फ्रेंच प्रोटेस्टंट लोकांना किंवा ह्‍यूगेनॉट असे नाव पडलेल्यांना फ्रान्सच्या बाहेर शरण आणि संरक्षण घेण्याची काय गरज होती? फ्रान्समधून ३०० वर्षांपूर्वीचे त्यांचे पलायन आज आपल्याकरता मनोवेधक का असावे?

सोळाव्या शतकातले युरोप, धार्मिक युद्ध आणि मतभेदांनी ग्रस्त होते. त्यामुळे, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातील धर्मासंबंधी युद्धांपासून (१५६२-१५९८) फ्रान्स काही वाचू शकले नाही. तथापि, १५९८ मध्ये फ्रेंच राजा हेन्री चौथे यांनी धार्मिक सहिष्णुतेच्या नॅन्ट्‌सच्या आज्ञापत्रावर सही करून प्रोटेस्टंट ह्‍यूगेनॉट लोकांना थोडेफार धार्मिक स्वातंत्र्य देऊ केले. युरोपमध्ये अशाप्रकारे दोन धर्मांना मान्यता देणे काहीशी अनोखी गोष्ट होती. यामुळे, ३० हून अधिक वर्षे ज्या धार्मिक संघर्षांनी १६ व्या शतकातल्या फ्रान्सला डागाळले होते ते संघर्ष काही काळासाठी थांबले.

नान्टेसचे आज्ञापत्र “कायमस्वरूपी आणि रद्द न करता येण्याजोगे” असावे हा उद्देश होता, तरी १६८५ मध्ये फॉनतंब्लोच्या आज्ञापत्राद्वारे ते रद्द करण्यात आले. फ्रेंच तत्त्ववेत्ता वोलटायर यांनी नंतर या रद्द करण्याला “फ्रान्सची सर्वात मोठी शोकांतिका” असे म्हटले. त्यानंतर लागलीच सुमारे २,००,००० ह्‍यूगेनॉट लोकांना इतर देशांमध्ये पलायन करावे लागले. हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही, त्याचे दीर्घ परिणामही होते. पण धार्मिक सहिष्णुतेचे ते नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द का करण्यात आले?

सुरवातीपासूनच विरोध

कायद्यानुसार नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र ९० वर्षे अंमलात होते, तरीपण एका इतिहासकाराच्या मते, “१६८५ साली ते रद्द करण्यात आले; पण त्याआधीच त्याचे कोणी पालन करत नव्हते.” निश्‍चितच, या आज्ञापत्राला भक्कम आधार नव्हता. अगदी सुरवातीपासूनच, त्याच्यामुळे कॅथलिक पादरीवर्ग आणि त्यांनी ज्यांना “आर.पी.आर.” (तथाकथित सुधारित धर्म) असे नाव ठेवले यांच्यामध्ये एक प्रकारचे “शीतयुद्ध” चालू झाले. नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र १५९८ साली लागू करण्यात आले तेव्हापासून ते १६३० च्या सुमारापर्यंत त्याबद्दल विरोध केवळ प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यातील जाहीर वादविवाद आणि धार्मिक साहित्य यांद्वारे व्यक्‍त केला जात होता. परंतु, असहिष्णुतेचे अनेक पैलू होते.

सन १६२१ पासून १६२९ पर्यंत प्रोटेस्टंट लोकांचा विरोध केल्यानंतर फ्रेंच सरकाराने दडपशाहीने त्यांना कॅथलिक धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. हा छळ चौदावे लुई, “सन किंग” यांच्या सत्तेखाली आणखी तीव्र झाला. छळवणुकीच्या त्यांच्या धोरणामुळेच नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द करण्यात आले.

आणखी कडक कारवाई

आणखी कडक कारवाई म्हणून, प्रोटेस्टंट लोकांचे नागरी हक्क हळूहळू त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. १६५७ आणि १६८५ या सालांदरम्यान, ह्‍यूगेनॉट लोकांविरुद्ध बहुधा पादरीवर्गाने सुचवलेले सुमारे ३०० नियम करण्यात आले. त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर या नियमांनी घाला घातला. उदाहरणार्थ, ह्‍यूगेनॉट लोकांना अनेक व्यवसाय जसे की, डॉक्टरकी, वकिली, आणि दाईचे काम सुद्धा करण्याची मनाई होती. दाईच्या कामाविषयी एका इतिहासकाराने अशी कारणमीमांसा केली: “ज्याला सद्य व्यवस्थेचा समूळ नाश करायचा आहे अशा पाखंड्याच्या हाती कोणाचा जीव कसा सोपवता येईल?”

ह्‍यूगेनॉट लोकांच्या गळ्याभोवतीचा हा फास १६७७ मध्ये आणखीनच आवळण्यात आला. कोणा ह्‍यूगेनॉटला कॅथलिक व्यक्‍तीचे धर्मांतर करताना पकडले गेल्यास, त्याला एक हजार फ्रेंच पाऊंड दंड भरावा लागे. भारी कर आकारणींमधून गोळा केलेला राज्य निधी ह्‍यूगेनॉट लोकांनी धर्मांतर करावे म्हणून आमिष दाखवण्यासाठी उपयोगात आणला जात असे. १६७५ साली, कॅथलिक पाळकवर्गाने राजा चौदावे लुई यांना ४५ लाख फ्रेंच पाऊंड देऊन म्हटले: “आता याची परतफेड म्हणून तुम्ही तुमच्या अधिकाराच्या बळावर पाखंडाचा संपूर्ण नायनाट करावा.” लोकांना “विकत” घेऊन त्यांचे धर्मांतर करण्याच्या या युक्‍तीमुळे केवळ तीन वर्षांत सुमारे १०,००० लोकांचे कॅथलिक धर्मात परिवर्तन करण्यात आले.

सन १६६३ मध्ये, प्रोटेस्टंट धर्मात परिवर्तन करणे बेकायदेशीर करण्यात आले. शिवाय, ह्‍यूगेनॉट लोक कोठे राहू शकतात आणि कोठे नाही यावरही निर्बंध घालण्यात आले. हे नियम किती जुलमी होते याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, अगदी सात वयाच्या लहान मुलांना देखील आपल्या पालकांच्या इच्छेविरुद्ध कॅथलिक होता येत होते. आपल्या मुलांना जेसूट किंवा इतर कॅथलिक शिक्षकांकडून मिळत असलेल्या शिक्षणाचा खर्च प्रोटेस्टंट पालकांना उचलावाच लागे.

ह्‍यूगेनॉट लोकांवर दडपण आणण्याचे आणखी एक साधन म्हणजे गुप्त रीतीने चालवले जाणारे कोम्पान्ये द्यू साँ साक्रमाँ (कंपनी ऑफ द होली सॅक्रमेंट). ही एक कॅथलिक संघटना होती; इतिहासकार झानीन गॅरीसाँ यांच्या मते, तिचे सबंध फ्रान्समध्ये “भले मोठे जाळे” पसरले होते. समाजातील अत्यंत प्रतिष्ठित लोकांपर्यंत तिची पोहोंच असल्यामुळे तिच्याजवळ आर्थिक संसाधनांचा किंवा गुप्त माहितीचा तुटवडा नव्हता. गॅरीसाँ म्हणतात की, काम साधण्याचे तिचे अनेकानेक मार्ग होते: “दबावापासून ते अडथळा आणण्यापर्यंत, कह्‍यात ठेवण्यापासून ते दोषारोप करण्यापर्यंत, कोम्पान्येने प्रोटेस्टंट समाजाला कमकुवत करण्यात कोणतीच कसर राहू दिली नाही.” असे असतानाही, बहुतांश ह्‍यूगेनॉट लोक, छळाच्या या काळादरम्यान फ्रान्समध्येच राहिले. इतिहासकार गॅरीसाँ म्हणतात: “या प्रोटेस्टंट लोकांप्रती हळूहळू विरोध वाढतच गेला तरी मोठ्या प्रमाणात आपला देश सोडून हे लोक का गेले नाहीत हे समजणे जरा कठीणच आहे.” परंतु, कालांतराने मात्र पलायन करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पुन्हा तीच गत

नायमेगनचा शांतीकरार (१६७८) आणि रॅटीस्बोनचा तह (१६८४) यांमुळे राजा चौदावे लुई इतर राष्ट्रांच्या युद्धापासून मुक्‍त झाले. खाडीच्या पलीकडे, इंग्लंडमध्ये एक कॅथलिक राजा फेब्रुवारी १६८५ साली गादीवर आला. या नवीन स्थितीचा चौदावे लुई यांनी फायदा उचलला. काही वर्षांआधी, फ्रान्समधील कॅथलिक पाळकांनी चार गॅलिकन लेख प्रकाशित केले होते ज्यांमध्ये पोपच्या अधिकारावर मर्यादा घातल्या होत्या. त्यामुळे पोप इनोसंट अकरावे यांच्या मते “फ्रेंच कॅथलिक चर्च फूट पाडणारे” बनले होते. परिणामी, नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द करून चौदावे लुई आपली कलंकित प्रतिमा बदलू शकले आणि पोपसोबत पुन्हा पूर्वीसारखे चांगले संबंध ठेवू शकले.

प्रोटेस्टंट लोकांप्रती राजाचे धोरण काय होते ते अगदीच उघड झाले. पूर्वीची सौम्य पद्धत (मन वळवणे आणि अधिकाराचा उपयोग करणे) इतकी काही प्रभावशाली ठरली नव्हती. दुसऱ्‍या बाजूला पाहता, अलीकडचेच ड्रॅगोनेड्‌सa मोहिमांना चांगलेच यश आले होते. म्हणून १६८५ मध्ये, चौदावे लुई यांनी फॉनतंब्लोच्या आज्ञापत्रावर सही करून नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द केले. नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द केल्यानंतर जी भयंकर छळवणूक करण्यात आली त्यामुळे ह्‍यूगेनॉट लोकांची स्थिती नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र अंमलात आणण्याआधीच्या स्थितीपेक्षाही बिकट झाली. आता ते काय करणार?

लपणार, लढणार की पलायन करणार?

काही ह्‍यूगेनॉट लोकांनी गुप्तपणे उपासना करण्याचे ठरवले. त्यांची सभास्थाने उद्‌ध्वस्त करण्यात आल्यामुळे आणि जाहीरपणे उपासना करण्यावर बंदी असल्यामुळे, ते ‘चर्च ऑफ द डेसर्ट’ यात सहभागी झाले किंवा गुप्तपणे उपासना करू लागले. अशाप्रकारच्या सभा चालवणाऱ्‍या लोकांना, जुलै १६८६ साली दिलेल्या एका नियमानुसार मृत्यूदंडाची शिक्षा होण्याचा धोका असतानाही ते असे करत होते. काही ह्‍यूगेनॉट लोकांनी, आपल्याला नंतर पुन्हा धर्मांतर करता येईल असा विचार करून स्वतःचा धर्म तात्पुरता त्यागला. अशाप्रकारे धर्मांतर केलेले लोक नाममात्र कॅथलिक धर्माचे पालन करत होते की ज्याची नक्कल पुढची पिढी करणार होती.

धर्मांतरे योग्य तऱ्‍हेने पार पाडण्यात येतात हे निश्‍चित करण्याचा सरकारने प्रयत्न केला. नवीन नोकऱ्‍या मिळवण्यासाठी, धर्मांतर केलेल्या नवीन लोकांना आपण कॅथलिक धर्माचे आहोत हे सिद्ध करणारे एक सर्टिफिकेट द्यावे लागायचे ज्यावर पाळकांची सही होती व जे चर्चमधील उपस्थितीची नोंद ठेवायचे. मुलांचा बाप्तिस्मा करून त्यांना कॅथलिक म्हणून वाढवले नाही, तर ती पालकांपासून विलग केली जात. शाळांमध्ये कॅथलिक शिक्षण द्यावे लागायचे. प्रोटेस्टंट लोकांना “पुस्तकाचे [बायबलचे] लोक” असे संबोधले जायचे; तर त्यांच्यासाठी कॅथलिक धर्माचे समर्थन करणारी धार्मिक पुस्तके तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारने दहा लाखांहून अधिक पुस्तके छापली आणि मग जेथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडली होती त्या ठिकाणी पाठवली. त्यांचे नियम इतके कडक होते की, कोणा आजारी व्यक्‍तीने मरणाला टेकलेले असताना कॅथलिक धर्मातला मरणापूर्वीचा शेवटला धार्मिक विधी नाकारला आणि त्यानंतर तो बरा झाला, तर त्याला उरलेले सर्व आयुष्य तुरुंगात काढावे लागे किंवा जहाजांवर गुलाम म्हणून काम करावे लागे. आणि नंतर तो मेल्यावर कचऱ्‍यासारखे त्याचे शव फेकून दिले जाई आणि त्याच्या वस्तू जप्त केल्या जात.

काही ह्‍यूगेनॉट लोक, प्रतिकार करण्यासाठी शस्त्रांचा उपयोग करू लागले. धर्मांध उत्साहासाठी प्रसिद्ध असलेल्या सेवन्स भागात, कॅमेझार्ड नावाच्या शस्त्रधारी ह्‍यूगेनॉट गटाने १७०२ मध्ये विद्रोह केला. या कॅमेझार्ड लोकांच्या रात्रीच्या वेळी केलेल्या आकस्मिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सरकारने अख्खीच्या अख्खी गावे जाळून टाकली. काही काळापर्यंत, ह्‍यूगेनॉट लोकांचे हल्ले अधूनमधून होत राहिले, तरीसुद्धा १७१० या सालापर्यंत राजा लुईच्या शक्‍तिशाली सैन्याने कॅमेझार्ड लोकांना जवळजवळ नाहीसेच करून टाकले होते.

फ्रान्सला पलायन करणे ही ह्‍यूगेनॉट लोकांची दुसरी प्रतिक्रिया होती. या स्थानांतराला महास्थलांतरण म्हणण्यात आले आहे. देश सोडून जाताना बहुतांश ह्‍यूगेनॉट लोक कंगाल झाले होते कारण सरकारने त्यांच्या मालकीच्या वस्तू जप्त केल्या होत्या; यातील संपत्तीचा काही भाग कॅथलिक चर्चला मिळाला होता. म्हणून पलायन काही सोपे नव्हते. काय घडते आहे हे लक्षात येताच फ्रेंच सरकारने तत्काळ पावले उचलली आणि देशातून बाहेर जाणाऱ्‍या सर्व मार्गांवर आणि जहाजांवर पाळत ठेवली. फ्रान्सहून निघालेल्या जहाजांवर लुटारू तुटून पडत कारण पलायन करणाऱ्‍या लोकांना पकडून दिल्यावर त्यांना तगडे बक्षीस मिळत असे. पलायन करताना पकडलेल्या ह्‍यूगेनॉट लोकांना कडक शिक्षा मिळायची. त्यातल्या त्यात, लोकांमध्येच वावरणारे गुप्तहेर, कोण पळून जाणार आहे आणि कोणत्या मार्गाने हे शोधून काढायचा प्रयत्न करत. दररोजच्या दररोज, पत्रव्यवहार अडवणे, कागदांवर खोटे बदल करणे आणि गुप्तपणे कट रचणे या गोष्टी होऊ लागल्या.

स्वागतार्ह आश्रय

ह्‍यूगेनॉट लोकांनी फ्रान्समधून केलेले पलायन आणि इतर राष्ट्रांनी त्यांचे केलेले स्वागत याला आश्रय असे म्हटले जाऊ लागले. ह्‍यूगेनॉट लोक हॉलंड, स्वीत्झर्लंड, जर्मनी आणि इंग्लंड या देशांमध्ये गेले होते. त्यानंतर काहीजण स्कॅन्डेनेव्हिया, अमेरिका, आयर्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि रशिया येथे गेले.

ह्‍यूगेनॉट लोकांनी आपल्या राष्ट्रांमध्ये स्थानांतर करावे असे उत्तेजन देणारी आज्ञापत्रे अनेक युरोपियन देशांनी तयार केली. त्यांना मोफत नागरिकत्व, करमुक्‍ती आणि व्यापारी संघटनांमध्ये मोफत सदस्यत्व यांसारख्या सवलती दिल्या गेल्या. इतिहासकार एलिझाबेथ लाब्रुस यांच्या मते, बहुतेक ह्‍यूगेनॉट “उत्साही, मेहनती व अत्यंत इमानदार . . . तरुण होते.” यास्तव, फ्रान्स हे त्यावेळी अत्यंत शक्‍तिशाली राष्ट्र बनण्याच्या मार्गावर असताना त्याचे कित्येक कारागीर हातून गेले. होय, ह्‍यूगेनॉट आपल्यासोबत “संपत्ती, मालमत्ता आणि कौशल्ये” ही बाहेरगावी घेऊन गेले. ह्‍यूगेनॉट लोकांना आश्रय देण्यामागे धार्मिक आणि राजकीय कारणे देखील होती. परंतु, या स्थलांतरणाचे दीर्घकालीन परिणाम कोणते होते?

नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द केल्यामुळे आणि त्यासोबत झालेल्या छळामुळे इतर राष्ट्रांकडून टीका झाली. फ्रेंच विरोधी मनोवृत्तीचा फायदा घेऊन ऑरेंजच्या विल्यम यांनी नेदरलंडचे राजत्व हस्तगत केले. त्यानंतर, ह्‍यूगेनॉट अधिकाऱ्‍यांच्या मदतीने, ते कॅथलिक राजा दुसरे जेम्स यांची जागा घेऊन ग्रेट ब्रिटनचेही राजा बनले. इतिहासकार फिलिप झूतॉर म्हणतात की, “दुसरे जेम्स यांचे राजपद जाण्यामागचे [आणि] ऑग्सबर्ग संघाची निर्मिती होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे चौदावे लुई यांचे प्रोटेस्टंट लोकांविरुद्धचे धोरण होते. . . . [या] घटना युरोपच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्‍या ठरल्या, ज्यामुळे फ्रान्सचे वर्चस्व जाऊन इंग्रजांचे वर्चस्व आले.”

युरोपमध्ये ह्‍यूगेनॉट लोकांची एक महत्त्वाची सांस्कृतिक भूमिका होती. प्रबोधन काळातल्या तत्त्वज्ञानाला आणि सहिष्णुतेच्या कल्पनांना नवी दिशा देणारे साहित्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या नवीन स्वातंत्र्याचा उपयोग केला. उदाहरणार्थ, एका फ्रेंच प्रोटेस्टंट लेखकाने जॉन लॉक या इंग्रजी तत्त्ववेत्त्याच्या लिखाणाचे भाषांतर करून मानवी हक्कांच्या कल्पनेचा प्रसार केला. इतर प्रोटेस्टंट लेखकांनी विवेकाला पटेल त्यानुसार निवड करण्याच्या स्वातंत्र्याच्या महत्त्वावर जोर दिला. शासकांच्या संपूर्ण अधीन राहण्याची गरज नाही आणि शासकांनी स्वतःमधील आणि लोकांमधील करार जर मोडला तर त्यांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करता येते ही नवी कल्पना सुरू झाली. म्हणून, इतिहासकार चार्ल्झ रीड यांच्या स्पष्टीकरणानुसार, नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द झाले तेच “फ्रेंच क्रांतीमागचे एक स्पष्ट कारण” होते.

धडे मिळाले का?

छळवणुकीचे उलट परिणाम आणि कित्येक मौल्यवान लोक देश सोडून गेल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता, राजा चौदावे लुई यांच्या लष्करी सल्लागाराने अर्थात मारक्विस दे वाऊबान यांनी राजाला नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र पुन्हा कार्यरत करावे असे उत्तेजन देत म्हटले: “अंतःकरणांचे परिवर्तन करण्याचे काम फक्‍त देवाचे आहे.” तर मग, फ्रेंच सरकारने धडा शिकून आपला निर्णय का बदलला नाही? निश्‍चितच, त्याचे एक कारण म्हणजे आपले राज्य कमकुवत होईल अशी राजाला भीती वाटत होती. शिवाय, स्वतःचे हित साधण्यासाठी १७ व्या शतकातल्या फ्रान्समधील कॅथलिक धर्माचे पुनरुज्जीवन आणि धार्मिक असहिष्णुता यांना खतपाणी घालणे त्यांना सोयीस्कर वाटले.

नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र रद्द केल्यानंतर, घडलेल्या घटनांमुळे काहींनी असा प्रश्‍न केला, “एखाद्या समाजात केवढी वैविध्यता असावी व केवढी सहन केली जावी?” अर्थात, इतिहासकारांनी सांगितल्यानुसार, ह्‍यूगेनॉट लोकांच्या कहाणीच्या संदर्भात “सत्तेचा वापर आणि गैरवापर” हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. अधिकाधिक भिन्‍न जाती आणि विविध धर्म असलेल्या आजच्या समाजांमध्ये, ह्‍यूगेनॉट लोकांनी स्वातंत्र्यासाठी केलेले पलायन, जनतेच्या हितापेक्षा चर्चने उद्युक्‍त केलेले राजकारण महत्त्वाचे ठरते तेव्हा काय घडते याची एक मर्मभेदक आठवण आहे.

[तळटीपा]

a पृष्ठ २८ वरील पेटी पाहा.

[२८ पानांवरील चौकट]

दहशतीने धर्मांतर करण्याची

ड्रॅगोनेड्‌स पद्धत

काहीजण या ड्रॅगुन्सना (जबरदस्तीने धर्मांतर करवणारे) “उत्कृष्ट मिशनरी” मानत होते. परंतु, त्यांचे नाव ऐकताच ह्‍यूगेनॉट लोकांचा थरकाप व्हायचा, आणि काही वेळा तर ते येत आहेत अशी बातमी मिळताच अख्खीच्या अख्खी गावे कॅथलिक धर्मात परिवर्तन करायची. पण हे ड्रॅगुन्स होते तरी कोण?

ड्रॅगुन्स हे शस्त्रधारी सैनिक होते जे ह्‍यूगेनॉट लोकांच्या घरी राहून घरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करायचे. अशारीतीने ड्रॅगुन्स यांचा उपयोग करण्याला ड्रॅगोनेड्‌स असे म्हटले जात. कुटुंबांना आणखी जड जावे म्हणून कुटुंबाची ऐपत नसेल इतके सैनिक एका घरात पाठवले जात. ड्रॅगुन्सना कुटुंबांवर अत्याचार करायला मोकळीक होती, ते त्यांना झोपू देत नसत आणि त्यांच्या वस्तूंचा नाश करत असत. घरातल्या लोकांनी प्रोटेस्टंट धर्म त्यागला तर हे ड्रॅगुन्स तेथून निघून जात.

सन १६८१ मध्ये, प्वॉटु, पश्‍चिम फ्रान्स येथे ह्‍यूगेनॉट लोकांची दाट वस्ती असलेल्या क्षेत्रात धर्मांतर करण्यासाठी या ड्रॅगोनेड्‌सचा उपयोग करण्यात आला होता. दोन-चार महिन्यांतच ३०,००० ते ३५,००० लोकांनी धर्मांतर केले. सन १६८५ मध्ये, देखील याच पद्धतीने ह्‍यूगेनॉट लोकांच्या इतर वसाहतींमध्ये धर्मांतरे करण्यात आली. काही महिन्यांतच सुमारे ३,००,००० ते ४,००,००० लोकांनी आपला धर्म त्यागला. इतिहासकार झान केन्यार यांच्या मते, ड्रॅगोनेड्‌स यशस्वी ठरल्यामुळे, “[सहिष्णु नॅन्ट्‌सचे आज्ञापत्र] रद्द करणे अनिवार्य झाले, कारण आता ते शक्य होते.”

[Credit Line]

© Cliché Bibliothèque Nationale de France, Paris

[२५ पानांवरील चित्र]

सन १६८९ मध्ये केलेल्या या जाहीरनाम्यामुळे धार्मिक अत्याचारापासून संरक्षण मिळवू पाहणाऱ्‍या फ्रेंच प्रोटेस्टंट लोकांना आश्रय मिळाला

[Credit Line]

By permission of The Huguenot Library, Huguenot Society of Great Britain and Ireland, London

[पानांवरील चित्र २६]

Documents conservés au Centre Historique des Archives nationales à Paris

[Credit Line]

नॅन्ट्‌सच्या आज्ञापत्राचे रद्दीकरण, १६८५ (रद्दीकरणाचे हे पहिले पृष्ठ आहे)

[२६ पानांवरील चित्र]

अनेक प्रोटेस्टंट देवळे नष्ट करण्यात आली

[Credit Line]

© Cliché Bibliothèque Nationale de France, Paris

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा