मरियेचा मृत्यू नैसर्गिक होता का?
व्हॅटिकन वृत्तपत्र लॉस्सॉर्वाटोरे रोमानो यानुसार मरियेच्या स्वर्गारोहणाची कॅथलिक शिकवण म्हणते: “मूळ पापापासून निष्कलंक राखलेल्या पवित्र कुमारीचे पार्थिव जीवन संपुष्टात आले तेव्हा देह व आत्मा यांसह स्वर्गीय गौरवात तिला वर घेण्यात आले होते.” या शिकवणुकीमुळे काही कॅथलिक धर्मशास्त्रवेत्ते असे प्रतिपादन करतात की, “मरियेचा मृत्यूच झाला नाही आणि तिला लागलेच पार्थिव जीवनातून स्वर्गीय गौरवात घेण्यात आले,” असे वृत्तपत्राचे म्हणणे आहे.a
अलीकडेच, पोप जॉन पॉल दुसरे यांनी सदर विषयावर वेगळाच प्रकाशझोत टाकला. जून २५, १९९७ रोजी व्हॅटिकनमधील सामान्य श्रोतेगणांशी बोलताना त्यांनी असे म्हटले: “कोणत्या परिस्थितींत मरियेचा मृत्यू झाला याविषयी नवा करार काहीएक सांगत नाही. यामुळे एखादी व्यक्ती असे गृहीत धरण्यास प्रवृत्त होते, की मरियेचा मृत्यू नैसर्गिक असून, उल्लेखण्याजोगा कोणताही विशिष्ट तपशील उपलब्ध नाही. . . . तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असे म्हणणाऱ्यांची मते अगदीच बिनबुड्याची वाटतात.”
पोप जॉन पॉल यांच्या या विधानामुळे ‘मरीयेचा पवित्र जन्म’ [इमॅक्यूलेट कंसेप्शन] या शिकवणुकीतील एक घोडचूक उघड होते. जर येशूच्या आईला, “सर्व मूळ पापापासून निष्कलंक राखण्यात आले होते” तर तिचा मृत्यू “नैसर्गिक” कसा असू शकतो; कारण नैसर्गिक मृत्यू खरा तर पापमय आदामामुळेच परिणीत होतो? (रोमकर ५:१२) येशूच्या आईविषयी कॅथलिक चर्च बाळगत असलेल्या विपर्यस्त दृष्टिकोनामुळेच हा धर्मशास्त्रवेत्तीय पेच निर्माण होतो. सदर बाबीमुळे कॅथलिक चर्चमध्ये विभाजन होऊन गोंधळ माजला नाही तरच नवल.
एक नम्र, विश्वासू व धर्मपरायण स्त्री म्हणून बायबल मरियेला चित्रित करत असले तरी, ‘मरियेचा पवित्र जन्म’ या शिकवणुकीचे समर्थन करण्यासाठी मात्र बायबल या गुणांचा उपयोग करत नाही. (लूक १:३८; प्रेषितांची कृत्ये १:१३, १४) बायबल केवळ असे म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) होय, बाकीच्या सर्व मानवजातीप्रमाणेच मरियेला देखील अनुवंशिकरित्या पाप आणि अपरिपूर्णता प्राप्त झाली; तसेच, तिचा मृत्यू नैसर्गिक नसून दुसरा काही होता हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.—पडताळा १ योहान १:८-१०.
[तळटीपा]
a फेब्रुवारी १५, १९९४ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील पृष्ठे २६-९ वरील “मरियेचे स्वर्गारोहण—देवाने प्रकट केलेले प्रमाणवचन?” हा लेख पाहा.