वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१ पृ. २६-२९
  • फ्रान्समधील अविस्मरणीय घटना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फ्रान्समधील अविस्मरणीय घटना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • यहोवा त्यास वाढवितो
  • अविस्मरणीय मेळावा
  • “वाळवंटात पाणथळ”
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१ पृ. २६-२९

फ्रान्समधील अविस्मरणीय घटना

“यहोवा नगर नको!” असे संपूर्ण शहरात पोस्टर्सवर लिहिण्यात आले होते. एका विरोधी गटाने चेतवले, “आपण एकत्र येऊन यहोवा प्रकल्पाचा विरोध करू या.” वर्तमानपत्रातील अक्षरशः लाखो लेखांनी ही गोष्ट लोकांसमोर आणली. अर्जांवर स्वाक्षरी करण्यात आली आणि या प्रकल्पाविषयी माहिती देणाऱ्‍या पाच लाखांपेक्षा अधिक पत्रिकांनी स्थानिक टपाल पेट्या भरल्या. फ्रान्सच्या वायव्येकडे असणारे शांत शहर लुवीएमध्ये कोलाहल माजवणारा हा प्रकल्प होता तरी कोणता? यहोवाच्या साक्षीदारांचे नवे शाखा दप्तर आणि निवासी इमारत उभारण्याची योजना.

यहोवा त्यास वाढवितो

फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे काम १९ व्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले. बायबल साहित्याचे पहिले भांडार, दक्षिणीय फ्रान्सच्या बोवेन गावात १९०५ साली उघडण्यात आले. सन १९१९ मध्ये पॅरीसमधील एक छोटे कार्यालय कार्यरत होते. सन १९३० मध्ये त्या शहरात अधिकृत शाखा दप्तर उघडण्यात आले आणि त्यानंतरच्या वर्षी त्या दप्तरातील कर्मचारी बेथेल गृहामध्ये राहू लागले. हे बेथेल गृह पॅरीसच्या उत्तर दिशेला आँगाँ-ला-बाँ येथे होते. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर बेथेल कुटुंब पुन्हा पॅरीसला गेले आणि सन १९५९ मध्ये राजधानीच्या पश्‍चिमेकडील बुलोन बीयाँकुर येथील पाच मजल्यांच्या इमारतीत शाखेला हलविण्यात आले.

राज्य प्रचाराचे कार्य वाढत होते त्यामुळे १९७३ मध्ये छापखाना आणि शिपिंग विभाग पॅरीसच्या पश्‍चिमेपासून १०० किलोमीटरवरील लुवीए शहरात स्थलांतरीत करण्यात आला. परंतु दप्तर मात्र बुलोन बीयाँकुर येथेच राहिले. तथापि, फ्रान्समधील प्रचारकांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे लुवीएची जागाही कमी पडू लागली आणि खरे तर १९७८ आणि १९८५ मध्ये येथील सुविधांमध्ये विस्तार करण्यात आला होता तरी सुद्धा. यास्तव हा निर्णय घेण्यात आला, की संपूर्ण बेथेल कुटुंबाला एकत्र राहता येईल, इतकी विस्तृत जागा घेण्यात यावी. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, हा प्रकल्प सर्वांनाच आवडला नाही. अशाप्रकारचा विरोध असतानाही, छापखान्यापासून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर जागा पाहण्यात आली. सहा वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर अखेरीस २३ वर्षांच्या विभाजनानंतर संपूर्ण बेथेल कुटुंब ऑगस्ट १९९६ मध्ये लुवीए शहरात एकत्र आले.

अशाप्रकारे शनिवार, नोव्हेंबर १५, १९९७ रोजी फ्रान्सच्या बेथेल कुटुंबाच्या ३०० सदस्यांसोबत १,१८७ लोकांचा एक आनंदी गट आणि इतर ४२ शाखांचे ३२९ प्रतिनिधी मोठ्या आनंदाने नियमन मंडळाचे सदस्य, बंधू लॉईड बॅरी यांनी दिलेले समर्पणाचे भाषण ऐकण्यासाठी आले. तथापि, या वास्तविकतेला लक्षात ठेवून, की हा समर्पणाचा कार्यक्रम संपूर्ण फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या विरोधात असलेला शत्रुभाव आणि पुष्कळ काळापासून खोट्या प्रचार मोहिमेच्या वातावरणात होत आहे असा निर्णय घेण्यात आला, की फ्रान्सच्या सर्व साक्षीदारांना या विजयाच्या आनंदात सहभागी होण्यास हवे. यास्तव, रविवार, नोव्हेंबर १६ रोजी पॅरीसच्या उत्तरेकडील वीलपाँत प्रदर्शन केंद्रामध्ये एक खास सभा घेण्यात आली. त्या खास सभेचा विषय होता “ख्रिस्ताच्या प्रेमात टिकून राहा.” फ्रान्सच्या सर्व यहोवाच्या साक्षीदारांना आणि बेल्जियम आणि स्वित्झर्लंडमधील फ्रेंच भाषा बोलणाऱ्‍या साक्षीदारांना तसेच ब्रिटन, जर्मनी, लक्झेम्बर्ग आणि नेदरलँड्‌सच्या मंडळ्यांनाही आमंत्रण देण्यात आले.

अविस्मरणीय मेळावा

या मेळाव्याची तयारी सहा महिने आधीच सुरू करण्यात आली. समर्पण दोन आठवड्यावर आले असताना फ्रान्सच्या ट्रक चालकांनी बंद पुकारला आणि त्यामुळे प्रमुख रस्ते बंद पडले तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली. खुर्च्या आणि इतर सामान वेळेवर पोचणार होते का? रस्त्यावरील हे अडथळे बांधवांना येण्यापासून रोखणार होते का? एका सप्ताहानंतर जेव्हा संप संपला आणि गाड्या पुन्हा रस्त्यावरून धावू लागल्या तेव्हा कुठे सुटकेचा निःश्‍वास टाकण्यात आला. समर्पणाच्या आधी, शुक्रवारी संध्याकाळी ३८ ट्रकमधून भाड्याने घेतलेल्या दोन भल्या मोठ्या सभागृहांमध्ये ८४,००० खुर्चा पोचविण्यात आल्या. सुमारे ८०० पेक्षा अधिक भाऊबहिणींनी संपूर्ण रात्रभर काम केले आणि शनिवार सकाळी साडेनऊपर्यंत खुर्च्या, व्यासपीठ, ध्वनी साहित्य आणि नऊ मोठे व्हिडिओ स्क्रिन लावण्यात आले.

रविवारी सकाळी ६ वाजता दरवाजे उघडण्यात आले आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी आत येऊ लागल्या. भाड्याने घेतलेल्या १७ रेल्वेमधून १३,००० पेक्षा अधिक साक्षीदार राजधानीमध्ये दाखल झाले. या प्रवाशांच्या स्वागतासाठी आणि त्यांना मेळाव्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर दोनशेपेक्षा अधिक स्थानिक भाऊबहिण हजर होते. एका बहिणीने म्हटले, की या प्रेमळ योजनेमुळे त्यांना “सुरक्षिततेचा आणि आनंदाचा प्रत्यय” आला.

इतर लोक विमानाने किंवा कारने पॅरीसमध्ये आले. तथापि, बहुतेक लोक ९५३ बसमधून आले होते आणि पॅरीसच्या परिसरातील साक्षीदार बसने किंवा रेल्वेने प्रदर्शन केंद्रावर आले होते. अनेक लोकांनी संपूर्ण रात्रभर प्रवास केला होता किंवा भल्या पहाटेच प्रवासाला सुरवात केली होती, परंतु सभेला उपस्थित राहण्याचा त्यांचा उत्साह पाहण्यालायक होता. कित्येक वर्षे न भेटलेले अनेक मित्र एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत होते. वेगवेगळ्या देशांचे पोशाख परिधान केलेला आनंदी जमाव जागतिक ऐक्याची ग्वाही देत होता. निश्‍चितच, काहीतरी अनन्यसाधारण घडत होते.

सकाळी १० वाजता कार्यक्रमास सुरवात झाली तेव्हा एकही खुर्ची रिकामी नव्हती आणि तरीही प्रत्येक मिनिटाला शेकडो लोक येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. हजारो लोक उभे राहिले किंवा खाली जमिनीवर बसले. या संमेलनाच्या विषयाच्या एकवाक्यतेत वयस्कर लोकांना बसण्यास जागा मिळावी म्हणून अनेक तरुण लोक उभे राहिले. एका दांपत्याने लिहिले: “आमच्या ओळखीच्या नसलेल्या आणि तरीही आम्हाला प्रिय असणाऱ्‍या भाऊबहिणींना आमची जागा देण्यात आम्हाला किती आनंद वाटत होता!” अनेक लोकांनी उत्तम आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवली: “आम्ही संपूर्ण दिवस खुर्च्यांशेजारी उभे होतो ज्या खुर्च्या लावण्यास आम्ही शुक्रवारची संपूर्ण रात्र घालवली होती. परंतु तेथे फक्‍त उपस्थित होणे यहोवाचे मनःपूर्वक आभार मानण्यास पुरेसे होते.”

थकवा आणि अस्वस्थता असतानाही, तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी इतर देशांच्या अहवालांचे तसेच नियमन मंडळाचे सदस्य असलेल्या लॉईड बॅरी आणि डॅनिएल सिडलिक यांची भाषणे अगदी लक्ष देऊन ऐकली. “यहोवा विपुल बल देतो,” या विषयावर बंधू बॅरी बोलले आणि यहोवाने त्याच्या लोकांना अनेक परीक्षा असतानाही कशाप्रकारे वृद्धीचा आशीर्वाद दिला आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘ज्या लोकांचा देव यहोवा आहे ते धन्य!’ हे बंधू सिडलिक यांच्या भाषणाचे शीर्षक होते. त्यावेळी फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या विरोधाला लक्षात घेता ही दोन्ही भाषणे फारच समयोचित ठरली. बंधू सिडलिक यांनी दाखवून दिले, की खरा आनंद बाहेरच्या गोष्टींनी मिळत नाही, तर यहोवा सोबतचा आपला नातेसंबंध आणि आपले जीवन यांप्रती आपल्या मनोवृत्तीवर तो अवलंबून असतो. “तुम्ही आनंदी आहात का?” असे त्यांनी श्रोत्यांना विचारले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होऊन त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले.

“जीवनातील आनंद नाहीसा” झालेल्या एका बहिणीने नंतर असे लिहिले: “मला अचानक या गोष्टीची जाणीव झाली, की मी आनंद प्राप्त करू शकते. मी वेगळ्याच दिशेने प्रयत्न करीत होते आणि या भाषणाद्वारे यहोवाने मला कोठे परिवर्तन करण्याची गरज आहे हे दाखवले.” एका बांधवाने असे म्हटले: “यहोवाचे हृदय आनंदित करण्याकरता कडा प्रयत्न करण्याची माझी इच्छा आहे. आंतरिक आनंदाची मला जाण होऊ लागली आहे आणि कोणत्याही गोष्टीने हा आनंद हिरावून घ्यावा असे मला वाटत नाही.”

सभेच्या समारोपाला अध्यक्षांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित असलेल्या लोकांची संख्या सांगितली: ९५,८८८—आतापर्यंत फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा हा सर्वात मोठा मेळावा होता!

समारोपाचे गीत गाताना अनेकांचे डोळे पानावले आणि समाप्तीच्या प्रार्थनेनंतर बांधव संमिश्र भावनांसह आपआपल्या घरी जाण्यास निघाले. या मेळाव्यातील प्रेममय आणि मित्रत्वाचे वातावरण लोकांच्या डोळ्यांत भरले. बस-चालकांनी या मेळाव्याकरता आलेल्या लोकांच्या प्रवृत्तीची वाहवा केली. दळणवळणाच्या व्यवस्थेमुळे देखील ते प्रभावित झाले ज्यामुळे केवळ दोन तासांच्या आत कोठेही कोंडी न होता सर्व ९५३ बसगाड्या प्रदर्शन केंद्रातून बाहेर पडल्या! रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन यांच्या कर्मचाऱ्‍यांनीही प्रतिनिधीच्या वर्तनाची प्रशंसा केली. अनेक चांगल्या चर्चा सुरू झाल्या आणि एक चांगली साक्ष देण्यात आली.

“वाळवंटात पाणथळ”

प्रेषित पौलाने सहख्रिश्‍चनांना आर्जवले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. . . . एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) निश्‍चितच, या विशेष सभेमुळे सर्वजणांना खूप उत्तेजन मिळाले. “वाळवंटात पाणथळ” असे एका बहिणीने याचे वर्णन केले. टोगो शाखेच्या बांधवांनी लिहिले: “आम्ही आवेश आणि उत्तेजन प्राप्त करून, मजबूत होऊन तसेच यहोवाच्या सेवेत पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहण्याचा निर्धार करून घरी परतलो.” एका विभागीय पर्यवेक्षकांनी असे म्हटले: “जे लोक निराश होते, घरी परताना हेच लोक आनंदी झाले.” “बांधवांना उत्तेजन मिळाले आणि ते मजबूत झाले” असे एकाने म्हटले. एक दांपत्य हे लिहिण्यास प्रेरित झाले: “यहोवाच्या संघटनेच्या इतक्या जवळ असल्याचे आम्हाला यापूर्वी कधी वाटले नव्हते.”

“माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभात मी परमेश्‍वराचा धन्यवाद करीन,” असे स्तोत्रकर्त्याने घोषित केले. (स्तोत्र २६:१२) अशाप्रकारचे ख्रिस्ती मेळावे संकटांना तोंड देत असता आध्यात्मिकरीत्या आपले पाय स्थिर ठेवण्यास मदत करतात. एका बहिणीने खात्री दिली: “कोणत्याही प्रकारचे संकट आले तरी हे अनन्यसाधारण क्षण आमच्या हृदयात फार खोलवर मुळावलेले आहेत आणि आमचे सांत्वन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.” असेच एका विभागीय पर्यवेक्षकांनी लिहिले: “जेव्हा संकटे येतात तेव्हा परादीसच्या पडछायेच्या आठवणी त्या संकटांना तोंड देण्यास आपल्याला मदत करतील.”

“अहो मानवकुलांनो; परमेश्‍वराचे गौरव करा; परमेश्‍वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा,” असे स्तोत्र ९६:७ आर्जवते. निश्‍चितच, फ्रान्समधील नवीन शाखा दप्तराचे समर्पण म्हणजे यहोवाचा फार मोठा विजय आहे. अशाप्रकारे सर्वत्र करारी आणि निग्रही विरोध असताना केवळ तोच ही योजना वास्तविकतेत आणू शकत होता. फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांचा ‘ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राहण्याचा’ आणि आपला ‘प्रकाश पाडण्याचा’ निर्धार पहिल्यापेक्षा अधिक मजबूत आहे. (योहान १५:९; मत्तय ५:१६) या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण स्तोत्रकर्त्याच्या पुढील भावनेशी पूर्ण मनाने सहमत आहेत: “ही परमेश्‍वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्‌भुत आहे.”—स्तोत्र ११८:२३.

[२६ पानांवरील चित्र]

लॉईड बॅरी

[२६ पानांवरील चित्र]

डॅनिएल सिडलिक

[२६ पानांवरील चित्र]

वीलपाँत प्रदर्शन केंद्रामधील खास कार्यक्रमाची उपस्थिती ९५,८८८ इतकी होती

[२८ पानांवरील चित्र]

उपस्थित असलेले हजारो लोक ऐकण्यासाठी उभे राहिले किंवा खाली जमिनीवर बसले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा