येशू—‘प्राचीन काळी उद्भव’ झालेला शासक
खूप दिवसांनंतर येणाऱ्या तुमच्या नातलगाला पाहण्याची तुम्हाला उत्कट इच्छा असते. अखेरीस तुम्ही त्याला भेटता आणि प्रेमळपणे त्याचे अभिवादन करता. त्याच्या पित्याने त्याला तुमच्याकडे का पाठवले ते तुम्ही त्याच्याकडून शांतपणे व लक्षपूर्वक ऐकून घेता. वेळ इतका लवकर उडून जातो, की आता त्याला निघायचे असते. त्याचा निरोप घेताना तुम्हाला वाईट वाटते. परंतु तो आपल्या घरी सुखरूप पोहंचला ही बातमी तुम्हाला कळते तेव्हा, त्याच्या निघण्याच्या वेळी तुम्हाला झालेले दुःख कुठल्या कुठे जाते.
नंतर, काही जुनी पत्रं शोधत असताना तुम्हाला त्याची काही पत्रं सापडतात ज्यात, तुम्हाला भेटण्याकरता येण्याआधी त्याने केलेल्या शूर कृत्यांचा थोडक्यात उल्लेख केलेला असतो. त्या पत्रांतून तुम्हाला त्याच्या दर्जाची रंजक माहिती मिळते व त्याने दिलेली भेट तसेच त्याचे सध्याचे काम यांबद्दल तुमची गुणग्राहकता वाढते.
“प्राचीन काळापासून”
पहिल्या शतकातील यहुद्यांकडे असलेल्या प्राचीन दस्तऐवजांपैकी, देवाचा संदेष्टा मीखा याची लिखाणे होती; ती सुमारे सातशे वर्षांआधी लिहिण्यात आली होती. ही लिखाणे मशीहाच्या जन्मस्थळाचे अचूक वर्णन करतात. “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुजमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.” (मीखा ५:२) या शब्दांच्या पूर्णतेत, येशूचा जन्म, आता ज्याला सा.यु.पू. २ वर्ष म्हटले जाते त्या वर्षी बेथलेहेमच्या यहुदी गावात झाला. पण, मग त्याचा “उद्भव प्राचीन काळापासून” कसा काय?
येशूला मानवप्रकृती पूर्वीचे अस्तित्व होते. कलस्सैतील ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या पत्रात प्रेषित पौलाने येशूचे वर्णन, “अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पतीत ज्येष्ठ,” असे केले आहे. (तिरपे वळण आमचे.)—कलस्सैकर १:१५.
बुद्धीचा उगम असलेल्या यहोवाने, राजा शलमोनाने नीतिसूत्रांच्या पुस्तकात लिहिलेल्या ईश्वरप्रेरित अभिव्यक्तीचा उपयोग करण्याकरता, “प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य” म्हणून आपल्या पहिल्या पुत्राची निर्मिती केली. येशूचा पृथ्वीवरील तात्पुरता मुक्काम आणि त्याचे स्वर्गाला परतणे यानंतर, तो खरोखरच “देवाच्या सृष्टीचे आदिकरण” होता याची त्याने साक्ष दिली. ज्ञानाच्या व्यक्तिरूपात, मानवप्रकृती पूर्वीचे अस्तित्व असलेल्या येशूने म्हटले: ‘यहोवाने आकाशे तयार केली तेव्हा मी तेथे होतो.’—नीतिसूत्रे ८:२२, २३, २७, पं.र.भा.; प्रकटीकरण ३:१४.
प्रारंभापासून, देवाच्या पुत्राला एक अनोखी नेमणूक मिळाली; आपल्या पित्याबरोबर “कुशल कारागीर” म्हणून काम करण्याची नेमणूक. यामुळे यहोवाला किती आनंद झाला! नीतिसूत्रे ८:३० [पं.र.भा.] म्हणते, “नित्य मी त्याचा [यहोवाचा] आनंद होतो” आणि पुढे ते म्हणते, “मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.”
यहोवाने नंतर आपल्या ज्येष्ठ पुत्राला मानवजातीच्या निर्मितीत सहभाग घेण्यासही बोलावले. तो म्हणाला: “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.” (उत्पत्ति १:२६) यामुळे दुसऱ्या प्रकारची आवड निर्माण झाली. मानवप्रकृती पूर्वीचे अस्तित्व असलेला येशू म्हणाला: “मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.” (नीतिसूत्रे ८:३१) प्रेषित योहानाने त्याच्या शुभवर्तमानाच्या सुरवातीला, सृष्टीत येशूची मानवप्रकृती पूर्वीची भूमिका कबूल केली: “सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही.”—योहान १:३.
यहोवाचा प्रवक्ता
योहानाचे शब्द, देवाच्या पुत्राने अनुभवलेल्या आणखी एका विशेषाधिकाराकडे आपले लक्ष आकर्षित करतात; तो, प्रवक्ता होण्याचा विशेषाधिकार आहे. पहिल्यापासूनच त्याने शब्द म्हणून कार्य केले. म्हणूनच, यहोवा आदामाबरोबर बोलला तेव्हा आणि नंतर आदाम आणि हव्वा या दोघांशी बोलला तेव्हा तो कदाचित शब्द याच्याद्वारे बोलला. मानवजातीच्या कल्याणासाठी असलेल्या देवाच्या सूचना मानवजातीबद्दल ज्याला प्रेम आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला इतक्या चांगल्याप्रकारे देता आले असते का?—योहान १:१, २.
प्रथम हव्वेला आणि मग आदामाला त्यांच्या निर्माणकर्त्याची अवज्ञा करताना पाहून शब्द याला किती दुःख झाले असावे! शिवाय, त्यांच्या अवज्ञेमुळे त्यांच्या मुलाबाळांवर आलेले संकट दूर करण्याची त्याला किती उत्कट इच्छा वाटली असेल! (उत्पत्ति २:१५-१७; ३:६, ८; रोमकर ५:१२) हव्वेला बंडाळी करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सैतानाला यहोवा म्हणाला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.” (उत्पत्ति ३:१५) एदेनात जे झाले ते प्रत्यक्षात पाहिलेल्या शब्द याने जाणले की, तो स्त्रीची प्रमुख “संतति” असल्यामुळे क्रूर द्वेषाचे लक्ष्य बनणार होता. सैतान मनुष्यघातक असल्याचे त्याला माहीत होते.—योहान ८:४४.
सैतानाने नंतर विश्वासू ईयोबाच्या सचोटीवर शंका घेतली तेव्हा, आपल्या पित्याविरुद्ध केलेले निंदनीय आरोप ऐकून शब्द याला किती क्रोध आला असेल. (ईयोब १:६-१०; २:१-४) होय, आद्य देवदूताच्या भूमिकेत शब्द याला मीखाएल असे संबोधण्यात आले आहे; त्याच्या या नावाचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?” असा होतो व हे नाव, देवाची सार्वभौम सत्ता बळकावण्याचा मनोरथ बाळगणाऱ्या सर्वांविरुद्ध तो यहोवाची कड कशी घेईल हे सूचित करते.—दानीएल १२:१; प्रकटीकरण १२:७-१०.
इस्राएलच्या इतिहासाची पाने जसजशी उलटत गेली तसतसे सैतानाने मानवांना शुद्ध उपासनेपासून दूर नेण्याचा कसा प्रयत्न केला ते शब्द याने पाहिले. इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर इस्राएलला देवाने मोशेद्वारे असे सांगितले: “पाहा, वाटेने तुला संभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोंचविण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवीत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक; त्याची अवज्ञा करू नको; कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.” (निर्गम २३:२०, २१) हा दूत कोण होता? बहुधा, मानवप्रकृती पूर्वीचा येशू.
विश्वासू आज्ञाधारकता
सा.यु.पू. १४७३ मध्ये मोशे मरण पावला; “मवाब देशातील बेथ–पौरासमोरील एका खोऱ्यात” त्याला पुरण्यात आले. (अनुवाद ३४:५, ६) स्पष्टतः, मूर्तीपूजेला बढावा देण्याकरता सैतानाला त्याच्या शवाचा उपयोग करायचा होता. मीखाएलने याला विरोध केला पण ती बाब आज्ञाधारकपणे आपला पिता यहोवा याच्या अधिकाराखाली सोपवून ती लांबणीवर टाकली. “त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही; तर ‘प्रभु तुला धमकावो’” एवढेच मीखाएलने सैतानाला बजावले.—यहूदा ९.
इस्राएलने नंतर कनानमधील वाग्दत्त देशावर विजय मिळवण्यास सुरवात केली. जेरिको शहरानजीक, शब्द याने राष्ट्रावर आपली सतत देखरेख असल्याची हमी यहोशवाला दिली. तेथे तो हातात उपसलेली तलवार घेऊन उभ्या असलेल्या एका मनुष्याला भेटला. यहोशवा त्या अनोळख्या मनुष्याकडे गेला आणि त्याने त्याला विचारले: “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?” कल्पना करा, त्या मनुष्याने, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापति ह्या नात्याने आलो आहे,” अशी जेव्हा स्वतःची ओळख दिली तेव्हा यहोशवा किती चकित झाला असेल. म्हणूनच यहोशवाने, यहोवाच्या या उदात्त प्रतिनिधीला दंडवत घातले; यात काहीच शंका नाही, की हाच मानवप्रकृती पूर्वीचा येशू “मशीहा जो अधिपति,” होणार होता.—यहोशवा ५:१३-१५; दानीएल ९:२५, पं.र.भा.
देवाचा संदेष्टा दानीएलाच्या दिवसांत, सैतानाशी त्याचा पुन्हा एकदा मुकाबला झाला. या प्रसंगी, पारसाचा पिशाच्च अधिपती जेव्हा तीन आठवड्यांसाठी “आडवा” आला तेव्हा मीखाएलने आपल्या सहदेवदूताला पाठिंबा दिला होता. देवदूत म्हणाला: “पाहा; मुख्य अधिपतींपैकी एक मीखाएल माझ्या साहाय्यास आला; व मी पारसाच्या राजांच्या जवळ राहिलो.”—दानीएल १०:१३, २१.
मानवप्रकृती पूर्वीचे आणि मानवरूपातील वैभव
सा.यु.पू. ७७८ मध्ये, यहुदी राजा उज्जीया मरण पावला त्या वर्षी, देवाचा संदेष्टा यशया याने एक दृष्टान्त पाहिला, ज्यात यहोवा आपल्या उच्च सिंहासनावर विराजमान होता. यहोवाने विचारले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” (तिरपे वळण आमचे.) यशयाने जाण्याची तयारी दर्शवली पण, त्याचे सहइस्राएली त्याच्या घोषणांकडे दुर्लक्ष करतील असे यहोवाने त्याला आधीच सांगितले. प्रेषित योहानाने, पहिल्या शतकातील अविश्वासू यहुद्यांची तुलना यशयाच्या दिवसांतील लोकांबरोबर केली आणि म्हटले: “यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून तो असे म्हणाला.” कोणाचे गौरव? यहोवा आणि स्वर्गीय आवारात त्याच्या शेजारी असलेला मानवप्रकृती पूर्वीचा येशू या दोघांचे गौरव.—यशया ६:१, ८-१०; योहान १२:३७-४१.
त्यानंतर काही शतकांनंतर, येशूच्या सर्वात महान नेमणुकीची वेळ आली. यहोवाने स्वर्गातून आपल्या प्रिय पुत्राची जीवनी शक्ती मरीयाच्या गर्भाशयात स्थलांतरीत केली. नऊ महिन्यांनी तिने एका पुत्राला, येशूला जन्म दिला. (लूक २:१-७, २१) प्रेषित पौलाच्या शब्दांत, “काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले; तो स्त्रीपासून” जन्मला. (गलतीकर ४:४) तसेच, प्रेषित योहानाने कबूल केले: “शब्द देही झाला, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.”—योहान १:१४.
मशीहा प्रकट होतो
किमान १२ व्या वर्षी, तरुण येशूला, आपण आपल्या पित्याच्या कामात मग्न असले पाहिजे हे समजून आले. (लूक २:४८, ४९) सुमारे १८ वर्षांनंतर, येशू यार्देन नदीजवळ बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे आला व त्याचा बाप्तिस्मा झाला. येशू प्रार्थना करत असताना, आकाश उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. कल्पना करा, तेव्हा त्याला, आपण आपल्या पित्याबरोबर अगणिक सहस्रावधींसाठी कुशल कारागिर, प्रवक्ता, देवाच्या सैन्याचा अधिपती आणि आद्यदेवदूत मीखाएल या नात्याने कार्य केल्याच्या एका मागोमाग एक आठवणी त्याच्या मनात ताज्या झाल्या. आणि मग, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाशी बोलताना आपल्या पित्याचा आवाज ऐकण्याचा आनंद त्याला मिळाला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मत्तय ३:१६, १७; लूक ३:२१, २२.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूच्या मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाबद्दल मुळीच शंका केली नाही. येशू त्याच्याकडे आला तेव्हा योहान म्हणाला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” आणि पुढे म्हणाला: “माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १:१५, २९, ३०) प्रेषित योहानालाही येशूच्या पूर्व अस्तित्वाबद्दल माहीत होते. त्याने लिहिले: “जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; . . . जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे; जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो.” (तिरपे वळण आमचे.)—योहान ३:३१, ३२.
सा.यु. ६१ या वर्षाच्या सुमारास, प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना, मशीहाच्या पृथ्वीवरील येण्याचे आणि महायाजक या नात्याने त्याच्या कार्याचे पूर्ण महत्त्व जाणून घेण्यास आर्जवले. प्रवक्ता या नात्याने येशूच्या भूमिकेकडे लक्ष वेधून पौलाने लिहिले: “देव . . . ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; . . . आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले.” हे, सृष्टीच्या वेळी येशूच्या ‘कुशल कारागीराच्या’ भूमिकेला सूचित करत असो किंवा मानवाच्या समेटाकरता देवाच्या प्रगतीशील व्यवस्थेमध्ये त्याच्या सहभागितेला सूचित करत असो, पौलाने मात्र येथे येशूच्या मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाची ग्वाही दिली आहे.—इब्री लोकांस १:१-६; २:९.
“प्राचीन काळापासून” एकनिष्ठा
“अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले,” अशी विनंती पौलाने फिलिप्पै येथील पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना केली. (फिलिप्पैकर २:५-८) येशूचे पुनरुत्थान करून आणि त्याचे स्वर्गात आपल्या स्वगृही स्वागत करून यहोवाने त्याच्या एकनिष्ठ कार्याला प्रेमळपणे प्रतिसाद दिला. युगानुयुगांपासून सचोटीचे किती मौलिक उदाहरण येशूने आपल्यासाठी घालून दिले आहे!—१ पेत्र २:२१.
बायबल आपल्याला येशूच्या मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाची झलक दाखवत असल्याबद्दल आपण किती आभारी आहोत! यामुळे त्याच्या एकनिष्ठ सेवेचे उदाहरण गिरवण्याचा आपला निश्चय आणखी दृढ होतो; खासकरून आता, कारण तो देवाच्या मशिही राज्याचा राजा या नात्याने राज्य करीत आहे. तेव्हा, ‘प्राचीन काळी उद्भव’ झालेला आपला राज्यपाल आणि शासक व “शांतीचा अधिपति” अर्थात ख्रिस्त येशू याचा आपण जयजयकार करू या!—यशया ९:६; मीखा ५:२.
[२४ पानांवरील चौकट]
मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाचा पुरावा
खाली दिलेले येशूच्या तोंडचे शब्द त्याच्या मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाचा भरघोस पुरावा देतात:
◻ “स्वर्गातून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीहि स्वर्गात चढून गेला नाही.”—योहान ३:१३.
◻ “मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. . . . मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.”—योहान ६:३२, ३३, ३८.
◻ “स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.”—योहान ६:५०, ५१.
◻ “मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर?”—योहान ६:६२.
◻ “माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; . . . तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे, तुम्ही या जगाचे आहा, मी ह्या जगाचा नाही.”—योहान ८:१४, २३.
◻ “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठविले.”—योहान ८:४२.
◻ “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”—योहान ८:५८.
◻ “माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली.”—योहान १७:५, २४.
[२३ पानांवरील चित्र]
यहोशवा यहोवाच्या सैन्याच्या अधिपतीला भेटतो