विश्वासू जणांना दिलेली अभिवचने यहोवा पूर्ण करतो
“ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे.”—इब्री लोकांस १०:२३.
१, २. यहोवाच्या अभिवचनांवर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?
आपल्या सेवकांनी आपल्यावर आणि आपल्या अभिवचनांवर दृढ विश्वास विकसित करून तो टिकवावा असे यहोवा स्वतःच्या सेवकांना सांगतो. अशा विश्वासासह एखादी व्यक्ती, यहोवाने जे करण्याचे अभिवचन दिले आहे ते तो जरूर करील असा पूर्ण भरवसा ठेवू शकते. त्याचे प्रेरित वचन सांगते: “सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की, मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.”—यशया १४:२४.
२ “सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे,” या वाक्यावरून आपली अभिवचने पूर्ण करण्यासाठी तो गांभिर्याने प्रतिज्ञा करतो हे दिसून येते. म्हणूनच त्याचे वचन असे म्हणते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) आपण यहोवावर भाव ठेवतो आणि स्वतःला त्याच्या बुद्धीने मार्गदर्शित होऊ देतो तेव्हा आपले मार्ग निश्चितच सार्वकालिक जीवनाकडे जातील कारण देवाच्या बुद्धीला “जे . . . धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे.”—नीतिसूत्रे ३:१८; योहान १७:३.
प्राचीन समयात खरा विश्वास
३. नोहाने यहोवावर विश्वास कसा प्रदर्शित केला?
३ खरा विश्वास प्रदर्शित करणाऱ्यांप्रती यहोवाने जे केले त्या अहवालावरून त्याच्या विश्वसनीयतेची पुष्टी मिळते. उदाहरणार्थ, ४,४०० वर्षांआधी देवाने नोहाला सांगितले की, त्याच्या समयातील जगाचा जागतिक प्रलयाकरवी नाश होणार होता. मानवांचे आणि प्राण्यांचे जीवन वाचवायला त्याने नोहाला एक भले मोठे तारू बांधण्याची सूचना दिली. नोहाने काय केले? इब्री लोकांस ११:७ आपल्याला सांगते: “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले.” पूर्वी कधीच न घडलेल्या गोष्टीवर, “जे पाहण्यात आले नव्हते” अशावर नोहाने विश्वास का ठेवला? कारण मानवी कुटुंबाबरोबर देवाच्या पूर्वीच्या व्यवहारांविषयी त्याला चांगलीच माहिती होती आणि म्हणून जे देव म्हणतो ते खरे ठरते हे त्याने जाणून घेतले होते. यास्तव, जलप्रलयही येईल याची नोहाला खात्री होती.—उत्पत्ति ६:९-२२.
४, ५. अब्राहामाने यहोवावर पूर्ण भरवसा का ठेवला?
४ खऱ्या विश्वासाचे आणखी एक उदाहरण अब्राहामाचे आहे. सुमारे ३,९०० वर्षांआधी देवाने त्याला त्याची पत्नी सारा हिच्याकरवी झालेला एकुलता एक मुलगा इसहाक याचे अर्पण करायला सांगितले होते. (उत्पत्ति २२:१-१०) अब्राहामाने कशी प्रतिक्रिया दाखवली? इब्री लोकांस ११:१७ म्हणते: “अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले.” तथापि, अगदी शेवटच्या घटकेला यहोवाच्या देवदूताने अब्राहामाला रोखले. (उत्पत्ति २२:११, १२) तरीसुद्धा, अब्राहाम असे करायचा विचार तरी कसा करू शकत होता? इब्री लोकांस ११:१९ नुसार, “[इसहाकाला] मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले” म्हणून. परंतु, अब्राहामाने कोणाचे पुनरुत्थान होताना कधी पाहिले नसताना आणि असे घडल्याचा कोणताही अहवाल नसताना पुनरुत्थानावर विश्वास कसा ठेवला?
५ देवाने जेव्हा त्यांना पुत्र देण्याचे वचन दिले त्यावेळी सारा ८९ वर्षांची होती हे आठवा. सारेचे उदर मूल प्रसवण्यास असमर्थ होते—जणू ते निर्जीव होते. (उत्पत्ति १८:९-१४) देवाने सारेचे उदर कार्यशील केले आणि तिला इसहाक जन्मला. (उत्पत्ति २१:१-३) अब्राहामाला ठाऊक होते की, देवाने सारेचे उदर पुन्हा कार्यशील केले त्याअर्थी गरज भासलीच तर तो इसहाकालाही पुन्हा जीवन देऊ शकतो. रोमकर ४:२०, २१ अब्राहामाविषयी म्हणते: “देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.”
६. यहोशवाने यहोवावर भरवसा असल्याचे कसे व्यक्त केले?
६ तीन हजार चारशेहून अधिक वर्षांआधी, शंभरी ओलांडलेल्या यहोशवाने यहोवाची विश्वसनीयता अनेकदा अनुभवली होती तेव्हा त्याने आपल्या भरवशाचे हे कारण सांगितले: “आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही. तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या. त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.
७, ८. पहिल्या शतकात विश्वासू ख्रिश्चनांनी जीवन वाचवणारे कोणते पाऊल उचलले आणि का?
७ सुमारे १,९०० वर्षांआधी अनेक नम्र लोकांनी खरा विश्वास प्रदर्शित केला. बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेवरून येशू हाच मशीहा असल्याचे त्यांनी जाणून घेतले आणि त्याच्या शिकवणी स्वीकारल्या. वास्तविकतांच्या आणि इब्री शास्त्रवचनांच्या भक्कम आधारे त्यांनी येशूच्या शिकवणीवर विश्वास ठेवला. यास्तव, यहुदिया आणि जेरूसलेमच्या अविश्वासूपणामुळे त्यांच्यावर देवाचा न्याय येत आहे असे येशूने म्हटले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि स्वतःचे जीव वाचवायला काय करावे हे त्याने सांगितल्यावर त्यांनी अगदी तसेच केले.
८ येशूने विश्वासू जणांना सांगितले की, जेरूसलेमला सैन्यांचा घेरा पडेल तेव्हा त्यांनी पळ काढावा. सा. यु. ६६ मध्ये रोमी सैन्य जेरूसलेमविरुद्ध आले. पण, काही स्पष्ट कारण नसताना रोमी सैन्य पुन्हा निघून गेले. तेव्हा शहर सोडण्याचे ख्रिश्चनांना हेच चिन्ह होते कारण येशू म्हणाला होता: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) ज्यांचा खरा विश्वास होता ते जेरूसलेम आणि अवतीभोवतीच्या परिसरामधून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी गेले.
विश्वास न केल्याचे परिणाम
९, १०. (अ) धार्मिक पुढाऱ्यांनी येशूवर विश्वास नाही हे कसे प्रदर्शित केले? (ब) अशाप्रकारे विश्वास न दर्शवल्याचे काय परिणाम होते?
९ खरा विश्वास नसलेल्यांनी काय केले? संधी असताना त्यांनी पळ काढला नाही. आपले पुढारी आपल्याला वाचवतील असे त्यांना वाटले. पण, त्या पुढाऱ्यांना आणि त्यांच्या अनुयायांना देखील येशूच्या मशीहापदाची पुष्टी मिळाली होती. मग त्यांनी येशूची सूचना का स्वीकारली नाही? त्यांच्या दुष्ट अंतःकरणामुळे. लाजराला पुनरुत्थित केल्यावर अनेक सर्वसामान्य लोक येशूकडे गर्दी करत असल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा हे आधी उघडकीस आले. योहान ११:४७, ४८ सांगते: “मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा [यहुदी उच्च न्यायालय] भरवून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य [येशू] तर पुष्कळ चिन्हे करितो; आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रहि हिरावून घेतील.” ५३ वे वचन म्हणते: “ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला.”
१० येशूने केवढा अद्भुत चमत्कार केला होता—लाजराला चक्क मृतातून उठवले होते! पण ते केल्यामुळे धार्मिक पुढाऱ्यांना येशूला ठार मारायचे होते. ‘लाजरामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवीत होते म्हणून मुख्य याजकांनी लाजरालाही जिवे मारण्याचा निश्चय केला’ तेव्हा त्यांचा हा धडधडीत दुष्टपणा आणखी उघडकीस आला. (योहान १२:१०, ११) लाजराला नुकतेच मृतातून उठवले होते आणि त्या याजकांना त्याला पुन्हा मारायचे होते! देवाची इच्छा किंवा लोकांचे कल्याण याची त्यांना फिकीर नव्हती. ते स्वार्थी होते, स्वतःच्या स्थानांची आणि फायद्यांची केवळ त्यांना चिंता होती. “त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले.” (योहान १२:४३) पण विश्वास न दाखवल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्य परतले आणि त्याने त्यांचे स्थान, त्यांचे राष्ट्र आणि त्यांच्यातील अनेकांचा नाश केला.
आपल्या समयात प्रदर्शित केलेला विश्वास
११. या शतकाच्या पूर्वार्धात, खरा विश्वास कसा प्रदर्शित केला गेला?
११ या शतकातही, खरा विश्वास असणारे अनेक स्त्री-पुरुष होते. उदाहरणार्थ, १९०० शतकाच्या पूर्वार्धात, सर्वसामान्यपणे लोक शांतिमय, संपन्न भविष्याची वाट पाहत होते. त्याच वेळी, यहोवावर विश्वास ठेवणारे लोक, मानवजात अद्याप सर्वात भयानक समयात पदार्पण करणार आहे अशी घोषणा करत होते. मत्तय २४ अध्याय, २ तीमथ्य ३ अध्याय आणि इतर ठिकाणी देवाच्या वचनात हेच भाकीत केले होते. विश्वास करणाऱ्या त्या लोकांनी जे सांगितले अगदीच तेच घडले; त्याची सुरवात १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाने झाली. जगाने खरोखर “कठीण दिवस” असलेल्या ‘शेवटल्या काळात’ पदार्पण केले. (२ तीमथ्य ३:१) त्या वेळी इतरांना काहीच माहीत नसताना यहोवाच्या सेवकांना जगीक परिस्थितींच्या वास्तविकतेची माहिती का होती? कारण, यहोशवाप्रमाणे, यहोवाचे एकही वचन खोटे ठरणार नाही असा त्यांना विश्वास होता.
१२. आज, यहोवाच्या कोणत्या अभिवचनावर त्याचे सेवक पूर्ण भरवसा करतात?
१२ आज, यहोवावर भरवसा करणारे असे त्याचे जगभर जवळजवळ साठ लाख सेवक आहेत. देवाच्या भविष्यसूचक वचनाच्या पूर्णतेच्या पुराव्यानिशी त्यांना ठाऊक आहे की, लवकरच या हिंसक, अनैतिक व्यवस्थीकरणाचा तो अंत करणार आहे. म्हणून १ योहान २:१७ ची पूर्णता पाहायला मिळेल तो काळ नजीक आहे याचा त्यांना आत्मविश्वास आहे; तेथे असे म्हटले आहे: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” या अभिवचनाची यहोवा पूर्ती करील असा पूर्ण भरवसा त्याच्या सेवकांना आहे.
१३. यहोवावर तुम्ही कितपत भरवसा ठेवू शकता?
१३ तुम्ही यहोवावर कितपत भरवसा ठेवू शकता? तुम्ही तुमचे जीवनही पणाला लावू शकता! त्याची सेवा करताना तुम्ही तुमचे जीवन सुद्धा गमावले तरी, तो पुनरुत्थानात तुम्हाला याहीपेक्षा उत्तम जीवन मिळवून देईल. येशू आपल्याला खात्री देतो: “[“स्मृती,” NW] कबरेतील [अर्थात, देवाच्या स्मरणातील] सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) असे करू शकणारा कोणी डॉक्टर, राजकारणी नेता, वैज्ञानिक, व्यापारी किंवा इतर कोणताही मानव तुम्हाला ठाऊक आहे का? त्यांच्या पूर्वीच्या इतिहासावरून ते असे करू शकत नाहीत हे स्पष्ट होते. पण, यहोवा मात्र हे करू शकतो आणि तो ते करील!
विश्वासू जणांकरता एक सुंदर भविष्य
१४. विश्वासू जणांकरता देवाचे वचन कोणत्या अद्भुत भविष्याचे अभिवचन देते?
१४ देवाच्या स्वर्गीय राज्याखालच्या नवीन जगाची निश्चितता दाखवून येशूने म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) यामुळे स्तोत्र ३७:२९ मधील देवाच्या अभिवचनाला बळकटी मिळाली; तेथे म्हटले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” येशूचा मृत्यू होण्याच्या काही क्षणाआधीच एका अपराध्याने त्याच्यावर विश्वास असल्याचे व्यक्त केले तेव्हा येशू त्या मनुष्याला म्हणाला: “तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.” (लूक २३:४३, NW) होय, देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, त्या परादीसमध्ये सर्वकाळ जगण्याच्या आशेने या मनुष्याला पृथ्वीवर पुनरुत्थित केले जाईल याची खात्री येशू करील. आज, यहोवाच्या राज्यावर विश्वास ठेवणारे लोकही परादीसमध्ये जगण्याची वाट पाहू शकतात जेव्हा “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:४.
१५, १६. नवीन जगात जीवन इतके शांतिमय का असेल?
१५ त्या नवीन जगात असल्याचे कल्पनाचित्र स्वतःसमोर उभे करा. आपण आताच तेथे राहात आहोत अशी कल्पना करा. लगेच, आपल्याला सगळीकडे फक्त शांतीत राहणारे आनंदी लोक दिसतील. यशया १४:७ मध्ये वर्णिले आहे तशाच परिस्थितींचा ते आनंद घेत आहेत: “सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे. लोक गाण्याचा गजर करीत आहेत.” ते असे का आहेत? एक कारण म्हणजे, पाहा तर, त्यांच्या घरांच्या दारांना कुलपे नाहीत. त्यांची काही गरजच नाही, कारण गुन्हेगारी किंवा हिंसाच नाही. देवाच्या वचनाने सांगितले होते अगदी तसेच हे वातावरण आहे: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
१६ युद्धही राहिले नाही, कारण या नवीन जगात युद्धावर बंदी आहे. सर्व हत्यारे शांतीच्या साधनांमध्ये रूपांतरित केलेली आहेत. अगदी पूर्णार्थाने, यशया २:४ ची पूर्णता झाली आहे: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” आपण हीच तर अपेक्षा केली होती! याचे कारण? कारण नवीन जगाच्या अनेक रहिवाशांनी जुन्या जगात देवाची सेवा करताना हे शिकून घेतले होते.
१७. देवाच्या राज्यातील राहणीमान कसे असेल?
१७ तुम्हाला आणखी एक गोष्ट दिसत असेल, ती म्हणजे गरिबी नाही. कोणीही घाणेरड्या झोपडीत राहत नाहीत किंवा कोणाच्याही कपड्यांच्या चिंध्या झालेल्या नाहीत किंवा कोणीही बेघर नाही. सर्वांचे एक टुमदार घर आणि सुंदर वृक्ष आणि फुलांनी बहरलेली स्वच्छ बाग आहे. (यशया ३५:१, २; ६५:२१, २२; यहेज्केल ३४:२७) शिवाय, उपासमारही नाही कारण सर्वांसाठी विपुल अन्न असेल हे देवाचे अभिवचन पूर्ण झाले आहे: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.” (स्तोत्र ७२:१६) अर्थात, देवाच्या राज्याच्या मार्गदर्शनाखाली, एदेनमध्ये देवाने उद्देशिले होते अगदी तसेच एक भव्य परादीस जगभर विस्तारते.—उत्पत्ति २:८.
१८. नवीन जगात लोकांना आणखी कोणत्या गोष्टींची भीती राहणार नाही?
१८ सर्वजण किती तगडे आहेत हेसुद्धा पाहून तुम्ही थक्क झाला आहात. त्यांची शरीरे आणि मने आता परिपूर्ण असल्याचा हा परिणाम आहे. आजारपण, दुःख किंवा मृत्यू आता राहिलेले नाहीत. व्हील चेअरमध्ये किंवा इस्पितळातील खाटेवर कोणीही नाही. ते सर्वकाही हमेशासाठी नाहीसे झाले आहे. (यशया ३३:२४; ३५:५, ६) इतकेच काय तर, प्राण्यांचाही धोका राहिलेला नाही कारण देवाच्या शक्तीने ते शांतिमय झाले आहेत!—यशया ११:६-८; ६५:२५; यहेज्केल ३४:२५.
१९. नवीन जगातील प्रत्येक दिवस “उदंड शांतिसुखाचा” का असेल?
१९ या नवीन जगाच्या विश्वासू रहिवाशांची केवढी ही सुंदर संस्कृती! त्यांची शक्ती आणि कौशल्ये व पृथ्वीची साधनसंपत्ती हानीकारक नव्हे, तर फायदेकारक गोष्टींमध्ये लावली गेली आहे; इतरांसोबत सहयोग करण्याच्या हेतूने, त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे. तसेच, तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही भरवसा करू शकता कारण देवाच्या अभिवचनानुसार सर्वजण “परमेश्वरापासून शिक्षण पावतील.” (यशया ५४:१३) सर्वजण देवाच्या नियमांनी नियंत्रित असल्यामुळे “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) खरेच, स्तोत्र ३७:११ म्हणते त्यानुसार या नवीन जगातील प्रत्येक दिवस “उदंड शांतिसुखाचा” असेल.
आनंदी भविष्याची हमी
२०. शांतिमय भविष्याचा आनंद उपभोगण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
२० त्या आनंदी भविष्यात सामील होण्यासाठी आपण काय करावे? यशया ५५:६ सांगते: “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.” आपण शोधत असताना आपली मनोवृत्ती स्तोत्र १४३:१० मध्ये वर्णिल्याप्रमाणे असावी: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.” जे लोक असे करतील ते या शेवटल्या काळात यहोवाच्या समोर निष्कलंक ठरतील आणि पुढील सर्वोत्कृष्ट भविष्याची वाट पाहू शकतील. “सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल.”—स्तोत्र ३७:३७, ३८.
२१, २२. देव आज काय तयार करत आहे आणि हे प्रशिक्षण कसे पार पाडले जात आहे?
२१ यहोवाच्या इच्छेप्रमाणे करू इच्छिणाऱ्या लोकांना सध्या तो प्रत्येक राष्ट्रातून गोळा करत आहे. बायबल भविष्यवाणीने भाकीत केल्याप्रमाणे, तो त्यांना त्याच्या नवीन पार्थिव समाजाचा पाया बनवत आहे: “शेवटल्या दिवसात [आपण सध्या जगत आहोत त्या काळात] असे होईल की . . . लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर [त्याच्या उंचावलेल्या खऱ्या उपासनेकडे] . . . चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—यशया २:२, ३.
२२ प्रकटीकरण ७:९ यांचे वर्णन, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” ह्यांचा “मोठा लोकसमुदाय” असे करते. १४ वे वचन म्हणते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत;” सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतामधून ते वाचून येतात. या नवीन जगाचा हा पाया सुमारे साठ लाख व्यक्तींचा मिळून बनलेला आहे; अनेक नवोदितही दर वर्षी याचे भाग होत आहेत. यहोवाच्या या सर्व विश्वासू सेवकांना त्याच्या नवीन जगातील जीवनासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करण्यासाठी आवश्यक असलेली आध्यात्मिक तसेच इतर कौशल्ये ते शिकून घेत आहेत. आणि या परादीसचे वास्तविकतेत रूपांतर होईल असा त्यांचा पूर्णपणे भरवसा आहे कारण “ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे.”—इब्री लोकांस १०:२३.
उजळणीसाठी मुद्दे
◻ पहिल्या शतकात विश्वास न ठेवल्याचा काय परिणाम झाला?
◻ देवाचे सेवक त्याच्यावर कितपत भरवसा ठेवू शकतात?
◻ विश्वासू जणांकरता कोणते भविष्य राखून ठेवले आहे?
◻ देवाच्या नवीन जगात स्वतःकरता आनंदी भविष्य मिळवायला आपण काय केले पाहिजे?
[१८ पानांवरील चित्र]
सध्या यहोवा नवीन पार्थिव समाजाचा पाया घालत आहे