थोर कॉन्स्टंटाईन—ख्रिस्ती धर्माचा कैवारी?
इतिहासाने आजवर काही मोजक्याच लोकांना “थोर” हा किताब बहाल केला आहे; रोमी सम्राट कॉन्स्टंटाईन हा त्याच मोजक्या लोकांत गणला जातो. शिवाय, ख्रिस्ती धर्मजगताने त्याच्या नावापुढे आणखी काही पदव्या जोडल्या आहेत, अर्थात “संत,” “तेरावा प्रेषित,” “प्रेषितांच्या बरोबरीचा पवित्र पुरुष,” आणि ‘सबंध जगात सर्वात मोठे स्थित्यंतर घडून आणण्याकरता देवाने निवडलेला.’ नाण्याची दुसरी बाजू पाहता, काहींनी कॉन्स्टंटाईनचे वर्णन, “रक्तपातामुळे बदनाम, असंख्य अत्याचारांमुळे कुविख्यात, पक्का दगलबाज . . . क्रूर जुलूमशहा, अघोरी गैरकृत्यांसाठी जबाबदार,” असेही केलेले आढळते.
तथाकथित ख्रिश्चनांना असे शिकवण्यात आले आहे, की थोर कॉन्स्टंटाईन हा ख्रिस्ती धर्माचा एक सर्वात मोठा वाली होऊन गेला आहे. ख्रिस्ती धर्मीयांना रोमी लोकांच्या जुलमापासून मुक्त करून धार्मिक स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे श्रेय ते त्याला देतात. शिवाय कित्येकजण असेही मानतात की तो येशू ख्रिस्ताचा विश्वासू अनुयायी होता आणि ख्रिस्ती धार्मिक चळवळीला पुढे आणण्याची त्याची प्रबळ इच्छा होती. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चने आणि कॉप्टिक चर्चने कॉन्स्टंटाईन आणि त्याची आई हेलेना या दोघांना “संत” ही पदवी दिली आहे. जून ३ रोजी किंवा चर्चच्या दिनदर्शिकेनुसार मे २१ रोजी, त्यांच्या नावाने सण पाळला जातो.
थोर कॉन्स्टंटाईन शेवटी होता तरी कोण? प्रेषितोपरांत ख्रिस्ती धर्माच्या विकासात त्याने कितपत हातभार लावला? इतिहास आणि अभ्यासक या प्रश्नांचे कसे उत्तर देतात हे पाहणे अत्यंत ज्ञानवर्धक ठरेल.
इतिहासाच्या पानांवरील कॉन्स्टंटाईन
कॉन्स्टंटाईन हा कॉन्स्टान्टियुस ख्लॉरस याचा पुत्र. सर्बिया देशातील नेइसस शहरात सा.यु. २७५ सालाच्या सुमारास त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सा.यु. २९३ साली रोमच्या पश्चिमी प्रांतांचे सम्राट बनले तेव्हा तो सम्राट गॅलेरियसच्या आदेशावरून डॅन्युब नदीकाठी युद्ध लढत होता. सा.यु. ३०६ साली कॉन्स्टंटाईन आपल्या मरणासन्न पित्याला भेटायला ब्रिटनला परतला. पित्याच्या मृत्यूनंतर लगेच, सैन्याने कॉन्स्टंटाईनला सम्राटपदी बसवले.
त्यावेळी, सम्राट असल्याचा दावा करणारे आणखी पाच जण होते. सा.यु. ३०६ ते ३२४ या दरम्यानचा काळ अथक यादवी युद्धांत गेला, ज्यानंतर, कॉन्स्टंटाईन हा एकमेव सम्राट बनला. दोन लष्करी स्वाऱ्या करून मिळवलेल्या यशामुळे कॉन्स्टंटाईनचे नाव रोमी इतिहासात कायमचे कोरले गेले आणि रोमी साम्राज्याची सर्वसत्ता त्याच्या हाती आली.
सा.यु. ३१२ साली कॉन्स्टंटाईन याने रोमपासून काही अंतरावर असलेल्या, मिलव्हियन पुलावरच्या लढाईत माक्झेनट्युस या आपल्या शत्रूला पराजित केले. ख्रिस्ती तत्त्व समर्थकांचे असे म्हणणे होते की या स्वारीच्या वेळेस, सूर्याच्या खाली एक ज्वालामय क्रूस दिसला होता, ज्यावर, “या चिन्हाच्या साहाय्याने विजयी हो,” या अर्थाचे इन हॉक सीग्नो विनकेस हे लॅटिन शब्द होते. असेही मानले जाते की कॉन्स्टंटाईनने आपल्या सैनिकांच्या ढालींवर ग्रीक भाषेत ख्रिस्ताच्या नावाची पहिली दोन अक्षरे रंगवावीत, असे त्याला स्वप्नात सांगण्यात आले होते. तथापि, या आख्यायिकेत कालक्रमासंबंधी कितीतरी विपर्यास आढळतात. ख्रिस्ती धर्माचा इतिहास (इंग्रजी) या पुस्तकात सांगितल्यानुसार: “या स्वप्नाची नेमकी वेळ, नेमके ठिकाण आणि इतर तपशीलांविषयी उपलब्ध पुरावे परस्परविरोधी आहेत.” कॉन्स्टंटाईन याचे रोममध्ये स्वागत करताना एका गैरख्रिस्ती सीनेटने त्याला सर्वश्रेष्ठ ऑगस्टस (आदरणीय) आणि पॉन्टिफेक्स मॅक्झिमस अर्थात रोमी साम्राज्याच्या मूर्तिपूजक धर्माचा सर्वोच्च पुरोहित या पदव्या बहाल केल्या.
सा.यु. ३१३ साली, कॉन्स्टंटाईन याने रोमच्या पौर्वात्य प्रांतांचा शासक लायसिनियुस याच्यासोबत एक भागीदारीचा ठराव केला. मिलानच्या धर्मादेशाद्वारे त्या दोघांनी एकमताने सर्व धार्मिक गटांना उपासनेचे स्वातंत्र्य आणि समान हक्क प्रदान केले. तथापि, अनेक इतिहासकार या दस्तऐवजाला फारसे महत्त्व देत नाहीत; त्यांचे म्हणणे असे, की हा धर्मादेश ख्रिस्ती धर्माबद्दल असलेल्या धोरणात बदल झाल्याचे सूचित करणारा महत्त्वपूर्ण राजकीय दस्तऐवज नसून एक साधे अधिकृत पत्र होते.
पुढच्या दहा वर्षांच्या आत, कॉन्स्टंटाईन याने आपला शेवटचा उरलेला प्रतिस्पर्धी लायसिनियुस याचा पराभव केला व अशारितीने तो रोमी साम्राज्याचा सर्वेसर्वा बनला. सा.यु. ३२५ साली अद्याप बाप्तिस्मा झालेला नसताना, त्याने “ख्रिस्ती” चर्चच्या पहिल्याच मोठ्या सर्वपंथीय परिषदेत अध्यक्षपद गाजवले; या परिषदेत एरियनवादाची निंदा करण्यात आली आणि नायसीन क्रीड नामक मूलभूत विश्वासांची एक यादी तयार करण्यात आली.
सा.यु. ३३७ साली कॉन्स्टंटाईनला असाध्य रोगाने ग्रासले. जीवनाच्या त्या शेवटल्या घटकेला, त्याला बाप्तिस्मा देण्यात आला; लवकरच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर सीनेटने त्याला रोमी देवतांच्या रांगेत बसवले.
धर्म आणि कॉन्स्टंटाईनचे राजकीय डावपेच
तिसऱ्या आणि चौथ्या शतकांतील रोमी सम्राटांच्या धर्मासंबंधाने असलेल्या सामान्य प्रवृत्तीबद्दल इस्डॉरीया टू एलिनिकू एथ्नूस (ग्रीक राष्ट्राचा इतिहास) या पुस्तकात असे म्हटले आहे: “रोमी साम्राज्याचे राज्यपद भूषवणारे राजे जरी फारसे धार्मिक प्रवृत्तीचे नसले, तरीसुद्धा त्या त्या कालखंडातील प्रचलित विचारधारेशी जुळवून घेण्याकरता त्यांना आपल्या राजकीय योजनांच्या सीमारेषांमध्ये शक्य होईल तेवढ्या प्रमाणावर धर्माला प्राधान्य देणे, आपल्या कारवाया धार्मिक स्वरूपाच्या आहेत असा आव आणणे भाग पडायचे.”
कॉन्स्टंटाईन हा निश्चितच आपल्या काळानुरूप जगणारा माणूस होता. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला, त्याला कोणत्या न कोणत्या “दैवी” स्वरूपाच्या पाठिंब्याची गरज होती; अर्थातच रोमी देवांचा पगडा कमी कमी होत असल्यामुळे त्यांच्याकडून पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. रोमी साम्राज्यासहित त्यातील धर्म आणि इतर संस्था देखील अवनतीच्या मार्गाला लागले असल्यामुळे, त्यात नवजीवन आणण्याच्या दृष्टीने, नवे आणि उत्साहवर्धक असे काहीतरी येण्याची आवश्यकता भासू लागली. ईड्रीया नामक विश्वकोशानुसार: “कॉन्स्टंटाईनला ख्रिस्ती धर्मात विशेष स्वारस्य होते कारण त्यामुळे त्याच्या विजयाला तर हातभार लागलाच, शिवाय, आपल्या साम्राज्याची पुनर्रचना करण्यातही त्याला मदत मिळाली. चोहीकडे पसरलेले ख्रिस्ती चर्च त्याचे राजकीय आधारस्तंभ बनले. . . . तो त्या काळातील नामांकित धर्माध्यक्षांसोबत सहवास राखू लागला . . . , आणि त्यांनी आपले ऐक्य कायम ठेवावे असे त्याने आवाहन केले.”
“ख्रिस्ती” धर्म, एव्हाना धर्मत्यागी आणि अत्यंत भ्रष्ट झाला असला तरीसुद्धा—कॉन्स्टंटाईनला हे कळून चुकले होते की सार्वभौम सम्राट बनण्याची आपली महत्त्वाकांक्षी योजना सिद्धीस नेण्याच्या उद्देशाने साम्राज्यात नवजीवन आणि ऐक्य परत आणण्याकरता याच ख्रिस्ती धर्माचा एक परिणामकारक साधन म्हणून उपयोग करता येईल. स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी धर्मत्यागी ख्रिस्ती धर्माचा आधार घेऊन त्याने सर्व लोकांना एकाच “कॅथलिक,” अर्थात जागतिक धर्माखाली एकत्र आणण्याचे ठरवले. गैरख्रिस्ती चालीरिती आणि सणावारांना “ख्रिस्ती” नावे देण्यात आली. शिवाय, “ख्रिस्ती” पाळकांना गैरख्रिस्ती पुरोहितांचा दर्जा, मानधन आणि त्यांच्यासारख्याच चलतीची पदवी देण्यात आली.
राजकीय उद्देशांसाठी धार्मिक ऐक्य घडवून आणायला निघालेला कॉन्स्टंटाईन, कोणतेही विरोधी मत प्रकट करणाऱ्यांचे लगेच तोंड बंद करीत असे, आणि हे सैद्धान्तिक सत्याच्या आधारावर नव्हे, तर केवळ अधिकांश लोकांना जे स्वीकार्य असेल त्याच्याच आधारावर तो करीत असे. मोठ्या प्रमाणावर विभाजित झालेल्या “ख्रिस्ती” चर्चमध्ये सिद्धान्तांवरून जे जमीन अस्मानाचे मतभेद मुळावलेले होते त्यांमुळे कॉन्स्टंटाईनला “देवाने पाठवलेल्या” मध्यस्थाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली. उत्तर आफ्रिकेतील डोनेटिस्ट मतवादी आणि साम्राज्यातील पूर्व प्रदेशांतील एरियसचे अनुयायी यांच्यासोबतच्या व्यवहारांतून त्याला लगेच लक्षात आले की एक मजबूत, संयुक्त धर्म स्थापन करण्यासाठी केवळ खात्री पटवून देणे पुरेसे नव्हते.a असाच एक एरियन लोकांचा मतभेद सोडवण्याच्या प्रयत्नात, चर्चच्या इतिहासातील सर्वप्रथम सर्वपंथीय परिषद त्याने आयोजित केली.—“कॉन्स्टंटाईन आणि नायसियाची परिषद,” या शीर्षकाची पेटी पाहा.
कॉन्स्टंटाईनच्या संबंधाने इतिहासकार पॉल जॉनसन यांनी लिहिले: “ख्रिस्ती धर्माला खपवून घेण्याचे मुख्य कारण हे असावे की त्यामुळे त्याला [कॉन्स्टंटाईनला] आणि सरकारला चर्चच्या रूढीवाही धोरणाची आणि रूढीविरोधी कारवाया हाताळण्याची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवणे शक्य झाले.”
तो कधीतरी ख्रिस्ती बनला का?
जॉनसन सांगतात त्याप्रमाणे, “कॉन्स्टंटाईनने सूर्योपासना कधीही त्यागली नाही आणि त्याच्या नाण्यांवर असलेले सूर्याचे चित्र देखील त्याने बदलले नाही.” कॅथलिक एन्सायक्लोपिडिया असे म्हणते की, “कॉन्स्टंटाईनच्या नजरेत दोन्ही धर्म सारखेच होते. सर्वोच्च पुरोहित या नात्याने त्याने गैरख्रिस्ती उपासनेचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले.” ईड्रीया नामक विश्वकोशानुसार, “कॉन्स्टंटाईन कधी ख्रिस्ती बनलाच नाही.” याच विश्वकोशात पुढे म्हटले आहे की “त्याचे जीवनचरित्र लिहिणाऱ्या सिझरियाच्या युसेबियसचे असे म्हणणे आहे की शेवटले श्वास घेताना तो ख्रिस्ती बनला होता. पण यात काही तथ्य नाही, कारण सर्वोच्च पुरोहिताचे पद देखील तो [कॉन्स्टंटाईन] सांभाळत असल्यामुळे त्याने आदल्या दिवशीच झ्यूस देवतेला यज्ञ केला होता.”
सा.यु. ३३७ साली मृत्यू झाला त्या दिवसापर्यंत, कॉन्स्टंटाईनने सर्वोच्च धार्मिक अधिकाराचे पॉन्टिफेक्स मॅक्झिमस हे गैरख्रिस्ती पद भूषविले. त्याच्या बाप्तिस्म्याविषयी बोलायचे झाल्यास, साहजिकच काही प्रश्न उद्भवतात, जसे, बायबलच्या अटीनुसार, बाप्तिस्म्याआधी खरा पश्चात्ताप करून तो पूर्वीच्या आचरणातून मागे फिरला होता का? (प्रेषितांची कृत्ये २:३८, ४०, ४१) यहोवा देवाला कॉन्स्टंटाईनने केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून त्याचा बाप्तिस्मा पाण्यात पूर्णपणे बुडवून करण्यात आला होता का?—पडताळा प्रेषितांची कृत्ये ८:३६-३९.
“संत”?
एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकाप्रमाणे: “कॉन्स्टंटाईनला त्याच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा त्याच्या कर्तुत्वाच्याच आधारावर थोर म्हटले गेले. कारण व्यक्तिमत्त्वाच्या मापदंडाने परीक्षा केल्यास, प्राचीन किंवा अर्वाचीन काळात ज्या कोणालाही हा किताब [थोर] बहाल करण्यात आला आहे त्या सर्वांमध्ये तो सर्वात खालच्या स्थानी राहील.” ख्रिस्ती धर्माचा इतिहास या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार: “फार सुरवातीपासून त्याच्या तापट स्वभावाचे आणि रागाच्या भरात क्रूरपणे वागण्याचे अहवाल उपलब्ध होते. . . . मानवी जीवनाविषयी त्याला कवडीचाही आदर नव्हता . . . वय वाढत गेले तसतसे त्याचे खासगी जीवन आणखी भयंकर होत गेले.”
कॉन्स्टंटाईनला व्यक्तिमत्त्वासंबंधी कितीतरी गंभीर समस्या होत्या. एका ऐतिहासिक संशोधकाने म्हटले आहे की “तापट स्वभावामुळे सहसा त्याच्या हातून गुन्हे घडायचे.” (“राजघराण्यातील हत्या” शीर्षकाची पेटी पाहा.) युरोपचा इतिहास (इंग्रजी) या पुस्तकात इतिहासकार, एच. फिशर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की कॉन्स्टंटाईनचे “व्यक्तिमत्त्व ख्रिस्ती” नव्हते. वस्तुस्थिती पाहिल्यास, तो ‘नवा मनुष्य’ धारण केलेला खरा ख्रिस्ती होता किंवा प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगूलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही देवाच्या पवित्र आत्म्याची फळे त्याच्या ठिकाणी होती असे काही दिसून येत नाही.—कलस्सैकर ३:९, १०; गलतीकर ५:२२, २३.
त्याच्या प्रयत्नांचे फळ
गैरख्रिस्ती पॉन्टिफेक्स मॅक्झिमस—आणि त्याअर्थी रोमी साम्राज्याच्या धार्मिक प्रमुखपदी असल्यामुळे कॉन्स्टंटाईन याने धर्मत्यागी चर्चच्या बिशपांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना रोमच्या सरकारी धर्माचे अधिकारी म्हणून सत्ता, प्रसिद्धी आणि वैभव देऊ केले. कॅथलिक एन्सायक्लोपिडियाने कबूल केल्यानुसार: “दरबारी दिमाखाने आंधळे होऊन काही बिशप सम्राटाची चक्क देवदूत म्हणून स्तुती करू लागले, तो एखादा पवित्र प्राणी असल्यागत; शिवाय ते भविष्यवाणी करू लागले की तो देवाच्या पुत्रासमान स्वर्गात राज्य करील.”
राजकीय सरकारासोबत धर्मत्यागी ख्रिस्ती धर्माची जवळीक जसजशी वाढू लागली तसतसा तो या जगाच्या, अर्थात या प्रापंचिक व्यवस्थीकरणाच्या रंगात रंगून येशू ख्रिस्ताच्या शिकवणींपासून अधिकाधिक दुरावत गेला. (योहान १५:१९; १७:१४, १६; प्रकटीकरण १७:१, २) परिणामस्वरूप, ‘ख्रिस्ती धर्मात’ खोटे सिद्धान्त आणि चालीरिती मिसळल्या गेल्या—उदाहरणार्थ त्रैक्यवाद, जीवाचे अमरत्व, नरकाग्नी, परगेटरी, मृतांसाठी प्रार्थना, रोझरीचा वापर, मूर्ती, प्रतिमा इत्यादि.—पडताळा २ करिंथकर ६:१४-१८.
चर्चची सत्तावादी प्रवृत्ती देखील कॉन्स्टंटाईनकडूनच घेतलेली आहे. हेन्डरसन आणि बक या अभ्यासकांच्या मते: “निर्मळ शुभवर्तमान कलंकित होऊन भपकेबाज विधीसंस्कारांची सुरवात करण्यात आली, ख्रिस्ती धर्माचे शिक्षण देणाऱ्यांना जगीक पदव्या आणि मानधन बहाल करण्यात आले आणि अशारितीने ख्रिस्ताचे राज्य अगदी या जगाच्या राज्यातच बदलले.”
खरा ख्रिस्ती धर्म कोठे आहे?
ऐतिहासिक सत्ये कॉन्स्टंटाईनच्या ‘थोरपणामागील’ खरी हकीकत सांगतात. ख्रिस्ती धर्मजगत हे खऱ्या ख्रिस्ती मंडळीचे मस्तक येशू ख्रिस्त याच्याद्वारे स्थापन करण्यात आलेले नसून अंशतः, एका गैरख्रिस्ती सम्राटाच्या राजकीय संधीसाधुपणामुळे आणि चालबाज युक्त्यांमुळे अस्तित्वात आले आहे. इतिहासकार पॉल जॉनसन यासंबंधाने एक अत्यंत समर्पक प्रश्न उभा करतात: “[रोमी] साम्राज्य ख्रिस्ती धर्मापुढे नमले की उलट ख्रिस्ती धर्मानेच एखाद्या वेश्येसारखे स्वतःला साम्राज्याकडून विटाळून घेतले?”
ज्या कोणाला शुद्ध ख्रिस्ती धर्माचे अनुसरण करण्याची खरोखर इच्छा आहे त्यांना आज खऱ्या ख्रिस्ती मंडळीची ओळख पटवून तिच्यासोबत संगती करण्यासाठी साहाय्य केले जाऊ शकते. जगभरातील यहोवाचे साक्षीदार खरा ख्रिस्ती धर्म ओळखण्यासाठी आणि देवाला स्वीकार्य असलेल्या मार्गाने त्याची उपासना करण्यासाठी नम्र अंतःकरणाच्या लोकांना अगदी आनंदाने मदत करू इच्छितात.—योहान ४:२३, २४.
[तळटीप]
a डोनेटिझम हा सा.यु. चौथ्या आणि पाचव्या शतकातील “ख्रिस्ती” पंथ होता. या पंथाच्या अनुयायांचे असे म्हणणे होते की, पवित्र विधींची परिणामकारकता ही धर्मसेवकाच्या नैतिक चारित्र्यावर अवलंबून आहे, शिवाय गंभीर पातक करणाऱ्यांकडून चर्चने सदस्यत्व काढून घ्यावे असेही त्यांचे मत होते. एरियनिसम ही ख्रिस्ताचे देवत्व नाकारणारी चौथ्या शतकातील “ख्रिस्ती” चळवळ होती. देवाला कोणी जनक नाही आणि तो अनादी आहे अशी एरियसची शिकवणूक होती. पित्याप्रमाणे पुत्र देव असू शकत नाही कारण त्याला जनक आहे. पुत्र हा सर्वकाळापासून अस्तित्वात नव्हता, तर त्याला निर्माण करण्यात आले आणि तो पित्याच्या इच्छेने अस्तित्वात आहे.
[२८ पानांवरील चौकट]
कॉन्स्टंटाईन आणि नायसियाची परिषद
बाप्तिस्मा न घेतलेल्या सम्राट कॉन्स्टंटाईनने नायसियाच्या परिषदेत कोणती भूमिका बजावली? एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका सांगते त्यानुसार: “कॉन्स्टंटाईनने स्वतः अध्यक्षपद गाजवले व वादविवादांचे सक्रियपणे संचालन केले . . . केवळ दोघांचा अपवाद वगळता, सम्राटाचा दरारा पाहून भयचकित झालेल्या सर्व बिशपांनी, आणि यांपैकी पुष्कळांनी आपल्या इच्छेविरुद्ध धर्मतत्त्वांच्या यादीवर हस्ताक्षऱ्या केल्या.”
दोन महिने प्रचंड धार्मिक वितंडवाद झाल्यानंतर, या गैरख्रिस्ती राजकारणपटूने हस्तक्षेप करून येशू हा देव आहे असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. पण का? ख्रिस्ती शिकवणुकीचा एक संक्षिप्त इतिहास (इंग्रजी) यात म्हटल्यानुसार, “कॉन्स्टंटाईनला ग्रीक धर्मशास्त्रासंबंधी उठवलेल्या प्रश्नांबद्दल जराही माहिती नव्हती.” त्याला फक्त एवढेच माहीत होते की, धर्माचे विभाजन आपल्या साम्राज्याला धोकेदायक आहे आणि आपले साम्राज्य बळकट करण्याचा त्याचा दृढ संकल्प होता.
नायसियाच्या परिषदेत कॉन्स्टंटाईनच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या शेवटल्या दस्तऐवजाविषयी इस्डॉरीया टू एलिनिकू एथ्नूस (ग्रीक राष्ट्राचा इतिहास) यात पुढीलप्रमाणे सांगितले आहे: “या दस्तऐवजातून [कॉन्स्टंटाईनची] सैद्धान्तिक बाबींविषयीची बेपर्वाई . . . कोणत्याही किंमतीवर चर्चमध्ये ऐक्य आणण्याचे त्याचे आग्रही प्रयत्न आणि ‘चर्चच्या बाहेर असलेल्या लोकांचा’ बिशप या नात्याने कोणत्याही धार्मिक प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा आपल्यालाच अधिकार आहे हा त्याचा निग्रह दिसून येतो.” अशा परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांना परमेश्वराच्या आत्म्याचा पाठिंबा असू शकेल का?—पडताळा प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
[२९ पानांवरील चौकट]
राजघराण्यातील हत्या
या शीर्षकाखाली, इस्डॉरीया टू एलिनिकू एथ्नूस (ग्रीक राष्ट्राचा इतिहास) या ग्रंथात कॉन्स्टंटाईनने आपल्या ‘कुटुंबातच केलेल्या भयंकर गुन्ह्यांचे’ वर्णन आढळते. कुटुंब सत्तेवर आल्यावर काही काळातच, अनपेक्षित यशाचा आनंद ओसरला आणि आपल्या सभोवतालच्या धोक्यांची त्याला चाहूल लागली. स्वभावानेच शंकेखोर असल्यामुळे, शिवाय लाळघोट्यांच्या फुसलावण्याने तो लायसिनिॲनस नावाच्या आपल्या भाच्याकडे शंकेखोर दृष्टीने पाहू लागला—कॉन्स्टंटाईनने आधीच, संभाव्य प्रतिस्पर्धी समजून वधलेल्या एका सहसम्राटाचा हा मुलगा होता. त्याची हत्या केल्यानंतर कॉन्स्टंटाईनचा स्वतःचा ज्येष्ठ पुत्र क्रिसपस याचा त्याची सावत्र आई फॉस्टा हिने काटा काढला कारण तो तिच्या मुलाच्या सर्वसत्तेच्या आड येऊ शकला असता.
फॉस्टाचे हे कृत्य तिच्या स्वतःच्या नाट्यमय मृत्यूचे कारण बनले. या खुनात, आपला मुलगा कॉन्स्टंटाईन याच्यावर शेवटपर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या सम्राज्ञिनी हेलेनाचा हात होता असे दिसते. कॉन्स्टंटाईनवर सहसा नियंत्रण करणाऱ्या त्याच्या तर्कशून्य भावनांमुळे त्याच्या किती मित्रांना आणि परिचितांना मरणदंडाला सामोरे जावे लागले याचा तर हिशेबच नाही. मध्य युगांचा इतिहास (इंग्रजी) या ग्रंथात शेवटी म्हटले आहे: “स्वतःच्या मुलाचा आणि बायकोचाही त्याने वध केला, यावरून तर अगदीच स्पष्ट आहे की ख्रिस्ती धर्मातील आध्यात्मिकतेचा लवलेशही त्याच्यात नव्हता.”
[३० पानांवरील चित्र]
कॉन्स्टंटाईनच्या सन्मानार्थ रोममधील एक कमान
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris